Friday, December 5, 2025

मार्तंड वर्मा (पद्मनाभदास) - त्रावणकोर Gods Own Country

भारतातील व्यापारामुळे युरोपीय सत्ता मोठ्या झाल्या आणि भारताशी संबंध बदलल्याने लयाला गेल्या. पोर्तुगीज आणि विजयनगरचे संबंध अतिशय उत्तम होते, त्यामुळे विजयनगरच्या भरभराटीच्या काळात पोर्तुगीजांची भरभराट झाली. पण विजयनगर साम्राज्य बुडाल्यावर पोर्तुगीज सुद्धा मागे पडले. त्याचप्रमाणे अजून एक युरोपीय सत्तेने आधी भरभराट आणि नंतर उतरती कळा पहिली, ती म्हणजे डच! डचांना उतरती कळा लागल्यानेच इंग्रजांना ती पोकळी मिळाली. त्या पोकळीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.

आपल्याला सागरी सत्ता म्हणून चोल राजा राजेंद्र माहीत असतात. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं आणि कान्होजी आंग्र्यांनी ज्याचा दबदबा निर्माण केला ते मराठा आरमार माहीत असतं. पण ज्या सागरी आणि जमिनीवरील सत्तेने एक परकीय सत्ता केवळ भारतातून नाही तर जगाच्या क्रमवारीत तिला मागे टाकले अश्या त्रावणकोरच्या मार्तंड वर्मांचे नाव क्वचितच माहीत असते...

१८व्या शतकाच्या सुरुवातीला केरळच्या इतिहासात एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व उदयास आले – मार्तंड वर्मा, त्रावणकोरचा राजा. त्यांचा जीवनपट भारतीय किनारपट्टीवरील परकीय वर्चस्व मोडून काढणारा आणि राज्याला धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान देणारा ठरला.  

मार्तंड वर्मा यांचा जन्म १७०६ मध्ये झाला. ते त्रावणकोरच्या राजघराण्यातील होते, पण बालपणातच त्यांना राजकीय संघर्षांचा सामना करावा लागला. स्थानिक सरदार, नायर प्रमुख, आणि परकीय व्यापारी यांच्यातील सत्तास्पर्धा तीव्र होती. या संघर्षातूनच मार्तंड वर्मा यांनी आपली राजकीय बुद्धिमत्ता आणि लढाऊ वृत्ती विकसित केली.  

१७२९ मध्ये ते त्रावणकोरच्या गादीवर बसले. गादीवर बसताच त्यांनी राज्य एकत्र करण्याचे आणि परकीय शक्तींना आव्हान देण्याचे ठरवले. 

त्या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने मलबार किनाऱ्यावर आपली पकड मजबूत केली होती. मसाल्यांच्या व्यापारावर त्यांचे नियंत्रण होते आणि स्थानिक राजांना ते आपल्या धाकात ठेवत होते. मार्तंड वर्मा यांनी या परकीय शक्तीला आव्हान दिले.  

१७४१ मध्ये कोलाचेलची लढाई झाली – भारतीय तसेच जागतिक इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा. मार्तंड वर्मा यांच्या सैन्याने डचांना पूर्ण पराभूत केले. ही लढाई विशेष होती कारण युरोपीय शक्तींना भारतीय भूमीवर स्थानिक राजाने निर्णायक पराभव दिला.  

मार्तंड वर्मांच्या या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड मोडली. मसाल्याच्या व्यापारावर असलेला अग्रहक्क मोडला. डच कमांडर डेलनॉय याला कैद केलं. पण मार्तंड वर्मा त्यांची गुणग्राहकता खूप चांगली होती. या कामंडरला मार्तंड वर्मा यांनी आपल्या सैन्यात सामील केले. डेलनॉयने पुढे त्रावणकोरच्या सैन्याला युरोपीय तंत्रज्ञान दिले आणि किल्ले बांधण्यात मदत केली.  

मार्तंड वर्मा यांनी सैन्याची पुनर्रचना केली. त्यांनी नायर सैनिकांना संघटित केले, युरोपीय शस्त्रास्त्रांचा वापर सुरू केला, आणि किनाऱ्यावर मजबूत किल्ले बांधले.  

- उदयगिरी किल्ला – युरोपीय तंत्रज्ञानाने बांधलेला, तोफखान्याने सज्ज.  

- विझिंजम (विळींझम) बंदर – व्यापार आणि नौदलासाठी महत्त्वाचे केंद्र.  

- पद्मनाभपुरम किल्ला – राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र.  

या किल्ल्यांमुळे त्रावणकोर दक्षिण भारतातील सर्वात सुरक्षित राज्य बनले.  

मार्तंड वर्मा यांचे दुसरे महान कार्य म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण राज्य भगवान श्री पद्मनाभस्वामींना अर्पण केले. १७५० मध्ये त्यांनी औपचारिकपणे घोषणा केली की त्रावणकोर हे देवाचे राज्य आहे, आणि ते स्वतः व त्यांच्या पुढील पिढ्या केवळ विश्वस्त (पद्मनाभदास) म्हणून राज्य करतील.  यामुळेच केरळला आजही Gods Own Country असं म्हटलं जातं.

ही घटना भारतीय राजकारणात अद्वितीय होती. राजा स्वतःला देवाचा सेवक मानून राज्यकारभार चालवतो, अशी संकल्पना त्रावणकोरमध्ये रुजली. यामुळे राज्याला धार्मिक अधिष्ठान मिळाले आणि लोकांमध्ये एकात्मता निर्माण झाली.  

मार्तंड वर्मा यांनी करव्यवस्था सुधारली, व्यापाराला चालना दिली, आणि शिस्तबद्ध प्रशासन उभारले. त्यांनी जमिनीचे पुनर्वाटप केले, भ्रष्ट सरदारांना रोखले, आणि राज्यात स्थैर्य आणले. त्यांच्या कारकिर्दीत त्रावणकोर हे दक्षिण भारतातील सर्वात स्थिर आणि समृद्ध राज्य बनले. मसाल्यांचा व्यापार सुरक्षित झाला, आणि परकीय शक्तींना त्रावणकोरशी करार करावा लागला.  

१७५८ मध्ये मार्तंड वर्मा यांचे निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली परंपरा आजही जिवंत आहे. त्रावणकोरचे वंशज आजही स्वतःला "पद्मनाभदास" म्हणवतात आणि केरळ स्वतःला Gods Own Country म्हणवते.

त्यांच्या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड संपली. त्यांच्या धार्मिक अर्पणामुळे त्रावणकोरला अद्वितीय ओळख मिळाली. 

म्हणूनच मार्तंड वर्मा यांना आपण भारतीय इतिहासातील एक अद्वितीय राजा म्हणून स्मरले पाहिजे "कोलाचेलचा विजेता आणि पद्मनाभदास."

(संदर्भ : ब्रेव्हहार्टस ऑफ भारत - विक्रम संपत)

Wednesday, December 3, 2025

भाग्यचंद्र: स भूपति:

मणिपूरच्या इतिहासात राजर्षी भाग्यचंद्र हे एक विलक्षण राजे होऊन गेले (संघाचे प्रातःस्मरण - भाग्यचंद्र: स भूपति:). त्यांचा जन्म 1748 मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव जयसिंह होते. त्या काळी मणिपूरच्या राजघराण्यात एक क्रूर परंपरा होती - राज्याची गादी मिळवण्यासाठी पुढे भावाभावांत भांडणे होऊ नये म्हणून, मोठ्या राणीचा मोठा मुलगा वाचवला जाई, बाकी सर्व मुलांना मारून टाकले जाई. या निर्दयी परंपरेतून भाग्यचंद्र कसे वाचले याची कथा थरारक आहे. ते मोठ्या राणीचे अपत्य नव्हते, त्यामुळे नियमानुसार त्यांचा जीव धोक्यात होता. पण आईने त्यांना दूर पाठवून दिले. ते डोंगरात राहिले आणि त्यांना नवीन नाव मिळाले - चिंग-थांग खोम्बा. त्यांच्याच वडिलांना पुढे जेव्हा ते एका प्रवासात दिसले तेव्हा वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दत्तक घेतले आणि राजवंशात त्यांचे स्थान सुरक्षित केले. या दत्तकत्वामुळेच पुढे ते गादीवर बसू शकले आणि मणिपूरच्या इतिहासात अमर झाले.  

राज्यारोहणानंतरही त्यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. 1759 मध्ये ते गादीवर आले. त्या काळात ब्रह्मदेशातून या भागावर कायम आक्रमणे होत असत. त्यात त्यांच्या एका भावासोबत गादी दोघांनी मिळून चालवावी असं ठरलेलं होतं. ते व्यवस्थित पार पडलं नाही. यामुळे राज्य कमकुवत झालं आणि ब्रह्मदेशाच्या आक्रमणामुळे त्यांना राज्य सोडावे लागले. ते असामच्या अहोम राजेश्वर सिंहाकडे आश्रयाला गेले. या राजाचे ते खास होते, पण लोकांनी राजाचे कान भरले आणि तिथे त्यांची अतिशय अवघड अशी परीक्षा झाली. राजेश्वर सिंहाने त्यांना एका जंगली हत्तीला निःशस्त्र पकडण्याची अट घातली. भाग्यचंद्रांनी भगवान गोविंदाची प्रार्थना केली आणि अद्भुत धैर्याने हत्तीला वश केले. या घटनेनंतर त्यांनी गोविंदजीची मूर्ती स्थापण्याचा संकल्प केला. पुढे त्यांना स्वप्नात कृष्णाने राज्यात परतायला सांगितलं. त्यानंतर ते माणिपुरात पोहोचले. त्यांचे भाग्य त्यांना कायम पुढे नेत गेले म्हणून त्यांना भाग्यचंद्र हे नाव मिळाले.

मणिपुरात परतल्यावर त्यांनी रासलीला नृत्याची परंपरा सुरू केली, जी आज मणिपुरी शास्त्रीय नृत्याचा आत्मा मानली जाते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वारसा म्हणजे सांस्कृतिक पुनरुत्थान. त्यांनी हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेला राजधर्म मानले आणि भक्तीभावाचा प्रसार केला. कृष्ण-राधेच्या प्रेमलीलेवर आधारित रासलीला त्यांनी सुरू केली, ज्यामुळे मणिपुरी समाजाला एक नवी सांस्कृतिक ओळख मिळाली. गोविंदजी मंदिर हे त्यांच्या काळात बांधले गेले आणि आजही ते मणिपुरातील धार्मिक जीवनाचे केंद्र आहे.  

राजकीय दृष्ट्या त्यांनी ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड दिले, अहोमांशी मैत्री केली आणि ब्रिटिशांशीही संबंध ठेवले. त्यांच्या राज्यकाळात मणिपुरने आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. पण त्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकारणासोबत अध्यात्माला आणि कलांना समान महत्त्व दिले. म्हणूनच त्यांना राजर्षी म्हटले जाते.  

विक्रम संपत यांनी Bravehearts of Bharat मध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. विक्रम संपत म्हणतात की भाग्यचंद्र हे केवळ राजा नव्हते, तर संस्कृतीचे रक्षक होते. ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड देताना त्यांनी धैर्य दाखवले, त्याचबरोबर मणिपुरी समाजाला सांस्कृतिक ओळख दिली.  

1799 मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. मणिपुरी नृत्याची जागतिक ओळख, गोविंदजी मंदिराचे महत्त्व आणि वैष्णव भक्तीची परंपरा हे सर्व त्यांच्या योगदानामुळे आहे. त्यांचा एका निर्दयी परंपरेतून जीव वाचला, दत्तकत्वामुळे गादी मिळाली, संघर्षातून राज्य टिकवले आणि संस्कृतीला नवा आकार दिला. म्हणूनच राजर्षी भाग्यचंद्र हे मणिपुरच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरतात.  

- ज्ञानेश