Thursday, September 19, 2019

सूर्यास्त

जेव्हा एखादा सूर्य भर मध्यान्ही
अस्तंगत होतो, पुन्हा न उगवण्यासाठी
तेव्हा त्याच सूर्याचा एखादा ग्रह
अश्रुंचे इंधन करतो,
मनातील आक्रोशाचे रूपांतर आगीत करून
उष्णता-प्रकाश देतो,
सूर्यमालेला विस्कटण्यापासून वाचवण्यासाठी!
त्याचाच पुढे नवा सूर्य होतो...

भाषा पंचायतन

सध्या हिंदी भाषेवरून बराच वाद सुरू झालाय. तो दर वर्षी सामान्यपणे हिंदी दिनाच्या निमित्ताने होतंच असतो. हिंदी दिवसाच्या निमित्ताने पी चिदंबरम सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषा / एक सामायिक भाषा करण्याबद्दल गृहमंत्री असताना बोलले होते. तेव्हा फार वाद झाला नव्हता. कारण बोलणे आणि करणे या बाबतीत चिदंबरमची पत नाहीये. पण अमित शहा यांची बोलणे आणि करणे यात पत खूपच जास्त आहे. विशेषतः ३७० रद्द केल्यापासून ती अधिक वाढली आहे. त्यामुळे लोकांना मातृभाषा प्रेम / हिंदी भाषिक अन्य भाषांकडे जे दुर्लक्ष करतात आणि शिकण्याबद्दल त्यांची अनास्था यावर बरंच बोलणं झालं. भारतासारख्या प्रचंड मोठ्या आणि अतिप्रचंड विविधता असलेल्या देशात एक भाषा लागू होणे अशक्य आहे. पण म्हणून सामायिक भाषा नसणे हेही त्रासदायकच नाही तर हानीकारकही आहे. कारण केरळ वगळता अन्य दक्षिणी राज्यांमध्ये सरसगट सर्वांना इंग्रजी येत नाही. त्यांना हिंदीही येत नाही. तेव्हा केवळ पर्यटनाला गेलेल्यांची नक्कीच पंचाईत होते. त्यामुळे सामायिक भाषा असावी हे नक्की.

सध्याचे भाजप सरकार अर्थातच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी नक्कीच अभ्यासल्या असतील. मी मागे एक पोस्ट टाकली होती, त्यात वाद संपवण्याच्या भारतीय आणि अरबी पद्धतीबद्दल लिहिले होते -
विविध आराध्य देवता (शिव, देवी, गणपती, विष्णू, सूर्य) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा अद्वैतवादी - मूर्तिपूजेची गरज नाही, असं मानणाऱ्या - शंकराचार्यांनी पंचायतन व्यवस्था तयार करून तो वाद संपवला...
विविध आराध्य देवता (अल लात, मनात, अल उज्जा...) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा एकेश्वरवादी मुहम्मद पैगंबर (स) यांनी त्या सर्व (३६०) मूर्त्या तोडून तो वाद संपवला...

आज भाषिक वाद सुरू आहे. तो अरबी पद्धतीने न मिटवता, आदी शंकराचार्यांच्या मार्गाने जाऊन भाषा पंचायतन सुरू करावे. (महाराष्ट्रात अनेक मुलं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत शिकतातच. इथे बेल्जियम मध्ये माध्यमिक पासून मुलांना डच, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन आणि स्पॅनिश या भाषा शिकता येऊ शकतात आणि मुलं किमान ४ भाषा शिकतात. त्यामुळे ४-५ भाषा शिकणं खूप अवघड नक्कीच नाही). पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागातील एक-एक भाषा आणि मातृभाषा अशी सांगड घालून भाषा पंचायतन सुरू करता येईल. या भाषा प्राथमिक पासून सुरू केल्या पाहिजेत असं अजिबात नाही. या चार भाषा कोणत्या निवडायच्या असा विषय लोकमत घेऊन, लोकसभा-राज्यसभेत मतदान घेऊन किंवा जिथे शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले तिथल्या भाषा घेऊन ठरवता येईल. म्हणजे जर शंकराचार्यांचे चार मठ यावरून भाषा ठरवायच्या असतील तर - बद्रीनाथ येथील हिंदी, द्वारकेतील गुजराती, रामेश्वरम येथील तामिळ आणि पुरी येथील उडिया या चार भाषा आणि आपण ज्या राज्यात राहतो तेथील राज्यभाषा. याशिवाय इंग्रजी आहेच. यातून हिंदी भाषिक अन्य भाषा शिकतील. त्यांची मुजोरी कमी होईल आणि भारत भारतीय भाषांनी एकत्र केला जाईल.

Tuesday, July 16, 2019

गंगा माँ मंडल

आपल्याकडे महाराष्ट्रात श्री. अ. दाभोलकर यांनी १० गुंठे शेतीप्रकल्पावर खूप यशस्वी प्रयोग केले आहेत. त्याबद्दल त्यांची अनेक पुस्तकेही आहेत. "विपुलाच सृष्टी" हे त्यापैकी एक. याच प्रकारे अन्य राज्यांमध्येही प्रयोगशील लोक आहेत. मालपाणी ट्रस्ट, मध्यप्रदेश यांनी "गंगा माँ मंडल" नावाचा एक गुंठ्यातील प्रयोग केला आहे. त्याची माहिती देत आहे.

या प्रयोगात मुख्यत्वे लक्षात घेतलेली बाब म्हणजे कोणत्याही साधारण कुटुंबात (४ ते ५ व्यक्ती) सामान्यतः जो पोषक आहार हवा असतो तो सहज भाज्या आणि फळांद्वारा मिळू शकतो. त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी यातून मिळतील. यासाठी १००० चौरस फूट एवढीच जागा लागेल. "गंगा माँ मंडल"मुळे एक कुटुंब विषमुक्त फळ-भाजी आणि घरगुती औषधे यासाठी स्वयंपूर्ण होईल.

याची रचना गोलाकार आहे. यात जाण्यासाठी ७ रस्ते असतील. जेव्हा मंडल पूर्ण होईल तेव्हा रोज सकाळी एका रस्त्याने केंद्रापर्यंत जात पाणी घालायचे (अर्थात कुणाला ठिबक सिंचन करायचे असेल तरी चालेलच). याची रचना अशी असेल की ते पाणी सगळ्या भागात पोहोचेल. पाणी देत असतानाच आपल्याला आवश्यक त्या भाज्या आणि फळे तोडून आणायची. दुसऱ्या दिवशी दुसरा रास्ता आणि नव्या, ताज्या भाज्या फळे तुमच्या जवळ! असं करत सात दिवस सात भाज्या फळे तुम्हाला मिळतील आणि आठव्या दिवशी पुन्हा पहिल्या रस्त्यावरील भाज्या तोडणीयोग्य झालेल्या असतील. हा क्रम अनेक दिवस चालेल. जेव्हा रोपे जुनी होतील तेव्हा ती काढून पुन्हा नवीन लावायची.

गंगा माँ मंडलाच्या केंद्राकडे जातानाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेल असलेल्या फळभाज्या लावतात. बाहेरील सात वाफ्यांमध्ये कांदा, लसूण, मुळा, रताळी आणि बटाट्यासारखी कंदमुळे तसेच टमाटे, भेंडी अश्या फळभाज्या तसेच विशेष म्हणजे अनेक औषधी वनस्पती सुद्धा लावल्या जातात. आतील सात वाफ्यांमध्ये मेथी, मिरची, कोथिंबीर असे मसाले, मूग, तूर, उडीद असे प्रोटिनयुक्त धान्ये लावली जातात. सर्वात आतील गोलात आर्द्रता जास्त असल्याने केळी, पपई लावता येते.

गंगा माँ मंडल बनवण्याची कृती खालीलप्रमाणे (आराखडा चित्रात दिला आहे)
१. जिथे हे करायचे आहे त्या १०००  चौरस फूट जागेच्या केंद्रबिंदूवर खुंटी ठोका. तिथून १५ फूट त्रिज्येचे गोल आखून घ्या. त्यावर राख/चुना घाला म्हणजे ते दिसत राहील.
२. आता दोरीची लांबी हळूहळू कमी करत क्रमाने एक एक गोल आखून घ्या १०.५, ९, ६, ४.५, ३. याही गोलांवर राख घाला.
३. सर्वात बाहेरील गोलांवर १३.५ फुटांवर खुणा करा, सात समान भाग होतील. त्यावरही राख टाकून खुणा स्पष्ट करा.
४. या खुणांपासून केंद्रबिंदूपर्यंत दोरी लावून ४.५ फुटांच्या गोलापर्यंत रेष आखून घ्या. त्या रेषेच्या दोन्ही बाजूंना ९-९ इंच मोजून दीड फुटाची जागा रस्त्यासाठी तयार करा. हा रस्ता बाहेरून आतील ४.५ फूट त्रिज्येच्या गोलापर्यंत जाईल. रस्त्यावर हवे असल्यास दगड/फरशी लावता येईल.
५. असेच सात रस्ते करा.
६. सर्वात आतील ३ फूट गोलात एक दोन फूट खोल खड्डा करा. या खड्ड्यात विघटित व्हायला किमान सहा महिने लागतील (उदा - नारळाच्या काथ्या, तुराट्या, झाडांच्या फांद्या, उसाच्या चिवट्या) असे पदार्थ टाका. त्याच्या वर लवकर विघटित होणारे पदार्थ टाका (उदा: वाळलेली पाने, गवत, कापलेले तण). दर एक दीड महिन्यानंतर यातील खत काढून वाफ्यांमध्ये टाकता येईल.
७. सर्वात आतील खड्डा पूर्ण भरल्यावर त्यावर एक मोठा दगड ठेवता येईल. अंघोळ, कपडे किंवा भांडे धुणे यासाठी तो वापरता येऊ शकेल. याद्वारे ते पाणी वापरात येईल.
८. सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी बांबूचा मंडप करून त्यावर काथ्याची जाळी तयार करून, त्यावर वेल सोडा.
९. रस्ते सोडून जी जागा आहे त्यात खड्डे करून, माती, लवकर विघटित होईल असा कचरा, शक्य असल्यास तांदळाचा किंवा डाळींचा भुसा, शेणखत/गांडूळखत वापरून भुसभुशीत वाफे तयार करा. त्यावर जीवामृत टाका ज्याद्वारे जमिनीतील जीवाणू वाढतील. सर्व वाफे एकमेकांना जोडा, म्हणजे पाणी सगळीकडे जाऊ शकेल.

गंगा माँ मंडल तयार करताना खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
१. वेल वर्गीय भाज्यांना खूप जास्त वारं सहन होत नाही. त्यामुळे गंगा माँ मंडल वेगवान वारं नसेल तिथे तयार करावं.
२. इथे जास्तीत जास्त वेळ ऊन असले पाहिजे.
३. प्राण्यांपासून योग्य संरक्षण झाले पाहिजे. त्यामुळे शक्यतो याच्या भोवती कंपाउंड असावे.
४. घरगुती वापरातील खराब पाणी (अंघोळ, कपडे-भांडी धुणे) सहजपणे यात जाऊ शकले पाहिजे. या पाण्यात शक्यतो रसायने जाऊ नयेत. यासाठी साबण वापरावर जरा बंधन येईल.
५. वेलभाज्या या मंडपावरच वाढवाव्यात. रस्त्यात अथवा वाफ्यात नको. म्हणजे भाजीचा दर्जा चांगला राखला जाईल.
६.  गंगा माँ मंडल स्वयंपाकघराजवळ केल्यास तेथील पाणी, जैविक कचरा सहजपणे गंगा माँ मंडलात टाकणे सोपे जाईल.


चित्रातील आराखड्यात दिल्याप्रमाणे तुम्ही भाज्या आणि अन्य वनस्पती लावू शकता. पण तुम्ही ज्या भागात राहता किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार यात बदलही करता येईल. या १००० चौरस फुटात सुमारे ४० ते ५० प्रकारच्या वनस्पती लावल्या जात आहेत. या नवीन प्रयोगासाठी शुभेच्छा!

ही सर्व माहिती येथून घेतली आहे
तयारीचा फोटो फेसबुकवरील पोस्ट मधून घेतले आहेत

यातील औषधी वनस्पतींची माहिती खालील दुव्यांवर मिळेल -

Monday, July 8, 2019

मशीन लर्निंग आणि समाजमन

बऱ्याचदा त्र आणि ञ मध्ये खूप लोक गडबड करतात. छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला जातो. यावर बऱ्याचदा गमतीदार टीका होते, विनोद होतात पण एकदा वापर करायला सुरुवात झाली की अनेकांनी त्र च्या जागी "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" लोकांनी छत्रपती हा शब्द छञपती असा लिहिला. त्याने झालं असं की गूगल इंडिक की-बोर्ड वर जेव्हा आपण छत्रपती हा शब्द लिहितो, तेव्हा छञपती हा शब्द देखील सुचवला जातो. याचं कारण गूगल इंडिक की-बोर्ड हा मशीन लर्निंग इनेबल्ड आहे. म्हणजे जे शब्द टाईप केले जातात ते शब्द तो लक्षात ठेवतो आणि नंतर सुचवतो. अजून तरी जास्त लोक छत्रपती वापरतात. जेव्हा जास्त लोक छञपती वापरतील तेव्हा डिफॉल्ट आपल्याला छञपती शब्द दिसेल.

अगदी असंच समाजमन काम करत असतं. कुणीतरी एखादी चूक करतो. त्याला एकूणच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" या नावाखाली फारसा विरोध होत नाही. मग तीच, तशीच चूक अजून काही लोक "कधी चुकून, कधी माहित नाही म्हणून, कधी प्रस्थापिताला विरोध म्हणून आणि कधी मुद्दाम मजा म्हणून" करतात. हळूहळू समाजमन त्याला मान्यता द्यायला लागतं. मग मान्यतेनंतर त्याचा गौरव केला जातो, नंतर तेच करणारे श्रेष्ठ असाही प्रचार होतो आणि मग योग्य करणारे लोक हे प्रतिगामी वगैरे होत जातात. त्यामुळे जर चूक असेल तर ती चूक आहे हे दाखवून दिलं पाहिजे आणि ती चूक ग्लोरिफाय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. उगाच "व्यक्तिगत मत" किंवा "व्यक्तिगत निर्णय" वगैरे नावाखाली मान्यता देणे हे समाजमनाचे मशीन लर्निंग असते हे लक्षात ठेवले पाहिजे!

Tuesday, June 25, 2019

भारतीय जल वन संवर्धन ६ - समारोप

काही वर्षांपूर्वी व्हिएतनामला गेलो होतो. तिथे एका शेतकऱ्याच्या कृषी पर्यटन केंद्रावर राहिलो होतो. मग साहजिक त्या शेतकऱ्याशी गप्पा झाल्या. तेथील पाऊस हा आपल्यासारखाच ४ महिने पडतो. त्यातही जुलै ऑगस्ट मध्ये जास्त असतो. बाकी वर्षभर पाऊस पडत नाही. तरीही ते लोक वर्षभर झऱ्याचं पाणी पितात. सोबत त्या गावाच्या जवळ असलेल्या धबधब्याचा मे महिन्यातला फोटो दिलेला आहे. कारण त्या धबधब्यांच्या आणि झऱ्यांच्या भोवताली दाट जंगल टिकून आहे.



मागच्या वर्षी मे महिन्यात आमचे मित्र विशाल आणि मीनाक्षी व्यास यांच्या शेतावर गेलो होतो. शेत साताऱ्याच्या जवळ आहे. तिथे असलेल्या पांदीजवळ एक झरा भर उन्हाळ्यात वाहता होता. स्वच्छ पाण्याचा खळखळ आवाज सुखावत होता. तेथील पांदीचा (झऱ्याचा मिळाला नाही) फोटो सोबत आहे. त्यात सहज दिसेल कि भोवताली छान झाडं आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात, खुलताबादहून म्हैसमाळकडे जायला निघालो कि घाट सुरु होण्याआधी उजवीकडे लंबेश्वर नावाचे शंकराचे मंदिर (गुहा) आहे. त्या गुहेच्या बाजूला साधारण २० वर्षांपूर्वी वर्षभर वाहणारा झरा/धबधबा होता. आज दिवाळीच्या आधीच तो कोरडा असतो. कारण त्या डोंगरावर आता जे पावसाळी गवत यायचं ते आता येत नाही आणि मोठी झाडं केव्हाच तोडली गेली आहेत.

आमच्या गावाची नदी/ओढा पावसाळ्यात एवढा जोरदार वाहायचा की माझी मावशी तिच्या लहानपणी त्यात वाहून जाणार होती. नंतर मार्च/एप्रिल पर्यंत त्यातून पाणी वाहत असायचं. नंतरही वाळूत एखाद्या फुटाचा खड्डा केला तर पिण्यायोग्य पाणीसहज मिळायचे. मे महिन्यात असा खड्डा करून पाणी पिल्याचे मलाही आठवते. आईच्या लहानपणी या ओढ्याच्या आजूबाजूला एवढी झाडी होती कि तिथे दिवसाही लोक सोबत असेल तरच जायचे. बिबट्या सहजच दर्शन देऊन जायचा. आता तुकड्या तुकड्यात झाडं आहेत पण सलग झाडी कुठेच नाही. त्यामुळे आज सप्टेंबर मध्येच कोरड्या झालेल्या ओढ्यातून एखादा लहान गुराखी गुरं घेऊन फिरतो...

दुष्काळ निवारणासाठी आपण नदीजोड प्रकल्पाबद्दल बोलत आहोत. आज युरोपात सगळीकडे नद्या जोडलेल्या आहेत आणि तरीही मागील काही वर्षांत इथे सतत दुष्काळ पडतोय. गेल्या वर्षीपासून आम्ही बेल्जियम मध्ये आहोत. इथे उन्हाळ्यात पाणी वापरावर निर्बंध असतात. पूर्वीची इथे जी जंगले होती ती तोडून फायद्यासाठी वेगात वाढणारे सूचिपर्णी वृक्ष इथे लावले गेले. त्यातून उत्पन्नही मिळायचं. पण त्याचा दुष्परिणाम मोठा झाला. या भागात मोठ्या प्रमाणात पानगळीचे वृक्ष असायचे. ती पाने जमिनीवर लवकर कुजायची आणि त्यात पाणी थांबून थांबून वाहायचं आणि जमिनीत मुरायचं. सूचिपर्णी वृक्षांची पाने जमिनीवर पडली तर ती लवकर कुजत नाहीत आणि पाणी त्यावरून वाहून जातं. इथल्या जमिनीला ते नकोय... आता येथील सरकारने नवीन वृक्ष लावताना केवळ स्थानिक पानगळीचे वृक्ष लावण्याची सक्ती केली आहे.

सोबत चित्रलेखा वैद्य यांची आकाशवाणीवरील मुलाखत आणि माहितीचा व्हिडीओ दिला आहे. त्यात त्यांनी सांगितलेली चिंताजनक बाब ही आहे की भारत हा सर्वाधिक भूजल उपसा करणारा देश आहे. इस्रायल मध्ये भूजलावर सरकारचा हक्क असतो. कुणीही विहिरीतून/बोअर मधून हवे तेवढे पाणी उपसू शकत नाही. युरोपात माझ्या एका मित्राला गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या प्लॉटवर बोअर करायचा आहे. त्याला ती परवानगी मिळत नाहीये. भारतात भूजल उपशावर नियंत्रण तर नाहीच, पण जमिनीला भोकं पाडण्यावर सुद्धा कोणते बंधन नाही. एका सोसायटीत आपण १० बोअर केलेले असतात. आपल्याकडे विहिरी ५० ते ७० फुटाच्या असतात. तेथील भूजल हे दर वर्षी पुन्हा भरते. बोअर २००-२५० फुटापेक्षा जास्त खोल असतात आणि काही भागात तर ३००-४०० फूट खोल असतात. ते पाणी गेल्या ५००-१००० वर्षात जमा झालेले आहे. ते आपण उपसून निसर्गाची नेमकी काय हानी करत आहोत हे अजून कळायचे आहे. त्या पाण्यामुळे कदाचित भूकंप होत नसतील... किंवा काहीही असू शकतं. पण आपण एवढे करंटे आहोत की याचा कोणताही विचार न करता जो बोअर वाला ५०० फूट खोल जाईल त्याला काम देतो. शिवाय बऱ्याच कंपन्या बोअर करून त्यांचे दूषित पाणी सरळ बोअरमधून टाकून देतात आणि भूजल मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतात.

भारतात किंवा महाराष्ट्रात नेमकं झालंय काय... पाऊस फार कमी नाही, पण अनियमित झाला हे नक्की. जेवढा पाऊस ४ महिन्यात पडायचा तो आता दोन महिन्यात, त्यातही काही दिवसांत पडतो. म्हणजे पावसाचे प्रमाण तेवढेच आहे, पण तरीही नदी/झरा/ओढ्यातील पाणी दिवाळीच्या आधीच संपून जाते. त्याचं साधं कारण म्हणजे आपण पाण्याला वेगात जाऊ देऊन मोठ्या जलाशयात अडवत बसलो. पाणी थांबवायचं नसतं तर त्याची केवळ गती कमी करायची असते. हा साधा निसर्गनियम आपण विसरून गेलो. पाणी सावकाश वाहिलं तर ते जमिनीची तहान भागवून पुढे जातं. पाण्याची गती कमी करण्यासाठी आणि त्याचं बाष्पीभवन होऊ नये, म्हणून वृक्षलागवड केली पाहिजे. फक्त खड्डे करून काहीच होणार नाही. एकूण वृक्षतोड इतकी प्रचंड आहे की यावर आता मोठी जन चळवळ करूनच मोठी वृक्षलागवड करावी लागेल. सरकारी पातळीवरून काही होईल याची वाट बघत बसण्यात काहीही अर्थ नाहीये.

मग करायचं काय...
१. आपल्या आजूबाजूला जी नदी, ओढा, झरा किंवा पाणंद असेल तिच्या भोवती स्थानिक झाडे लावली टिकवली गेली पाहिजेत.
२. जे काही बंधाऱ्याचे कामं झाले असतील त्या बंधाऱ्याजवळ झाडं आणि अगदी पाण्याजवळ गवतवर्गीय वनस्पती लावल्या पाहिजेत. परिणिता दांडेकर यांची पोस्ट बघा.
३. आपल्या गावात, शेतात, कॉलनीत जिथे जागा मिळेल तिथे, अगदी काही गुंठे असेल तरीही, सोप्या पद्धतीने निसर्गबेट निर्माण केले पाहिजे.


काय आहे निसर्गबेट?
सध्या शब्दात - वटवृक्ष, फळझाडे, संरक्षक झाडे, फुलझाडे आणि गवतवर्ग असे पाच वनस्पती प्रकारांचे आदर्श मिश्रण. यात एकरी प्रमाण: वटवृक्ष (५), फळझाडे (२००), संरक्षक झाडे (१००), फुलझाडे (१० गुंठे) आणि गवतवर्गीय (५ गुंठे). प्रमाण एकरी दिलं असलं तरी १० गुंठ्यांपासून निसर्गबेट बनवता येतं. पाण्याची उपलब्धता आणि निसर्गबेटाच्या आकारानुसार पाणी-गरजेचा ताळेबंद ठरवून उपाययोजना जसे की, तलाव/कुंड, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, समतल चर आणि बांधबंदिस्तीने जलसंधारण. हे निसर्गबेट वैयक्तिक, सामूहिक/सहकारी, भांडवली अथवा सरकारी स्तरावर सहज करता येऊ शकेल. निसर्गबेटाचे थेट आणि अप्रत्यक्ष अनेक फायदे आहेत. थेट फायद्यांमध्ये फळे, फुले भाजीपाला व्यवसाय करता येईल. अप्रत्यक्ष फायद्यांमध्ये कीड नियंत्रण, उंदीर/घूस नियंत्रण, मित्र कीटक वाढणे, जमिनीतील ह्युमस वाढणे, जमिनीची जलधारण क्षमता वाढणे असे अनेक फायदे आहेत. निसर्गबेटाचा ढोबळ आराखडा सोबत दिला आहे. त्यात आपापल्या गरजा आणि परिसर अभ्यास करून बदल करता येऊ शकतात. तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी उपेंद्र दादा, डॉ उमेश मुंडल्ये किंवा अशा अभ्यासू मंडळींशी संपर्क साधावा.

हा पावसाळा खूप उशीरा सुरू होत आहे. पुढचा अजून किती वाईट असेल सांगता येत नाही. त्यामुळे ही सगळी कामे आजच सुरू केली पाहिजेत. "पुढच्या पावसाळ्यात करू" असा विचार हा अविचारच असेल.

या लेखमालेचा शेवट नलेश पाटलांच्या कवितेने करतोय... विचार तर कराच पण कृतीही लवकर करा... धन्यवाद!

माझ्या झाडांची हिरवी किती सांगू मी थोरवी
तुम्हा देऊन सावली ऊन माथ्यास मिरवी

असा निमूट सोसला ताप दिसभर जरी
सांज होताच मायेने घेती पाखरांना उरी

पाय मातीचेच तरी आकाशाला गवसणी
झाडांमुळेच ह्या माझ्या मिळे पावसाचे पाणी

ऊन पाऊस वादळ धरी भोवताली फेर
फक्त झाडांनाच नाही त्यांचे स्वतःचे घर

नाही स्वतःहून कधी त्यांनी मागितले पाणी
कधी कळलीच नाही त्यांची सळसळ वाणी

वर्षभरात एकदा फक्त ढाळतात पाने
त्या पिवळ्या आसवाने तेव्हा जळतात राने

दुःख गिळोनिया पुन्हा फुलतात फळतात
घाव कुऱ्हाडीचे तरी जन्मभर छळतात

त्यांची करुनी कत्तल तुम्ही थाटली शहरे
सुकुमार भुईवरी त्यांचे बकाल शहारे

काय पाप त्यांनी केले तुम्हा सावली देउनी 
अर्धी लाकडे त्यांचीही गेली सरण होऊनी

पुढे लागणार नाही एक थेंबसुद्धा ओठी
खेळ सरतेशेवटी मांडा वाळवंटी काठी... 

Monday, June 24, 2019

भारतीय जल वन संवर्धन ५ - बारव

समाजभान, धार्मिकता, तंत्रशुद्धता, जलव्यवस्थापन आणि अप्रतिम स्थापत्यशास्त्र याचा सर्वोत्तम मिलाफ म्हणजे बारव. बारव बांधून देणे हे सामाजिक - धार्मिक काम असायचे. ती बांधताना भूजल किती आणि कुठे असेल याचा अचूक अंदाज बांधला जायचा. ते भूजल कसे टिकून राहील यासाठी नियम असायचे आणि स्थापत्यशात्राने ती बारव नयनरम्य, शांत आणि भर उन्हात प्रसन्न थंडावा असायच्या.

परमार राजा भोजाने ‘समरांगण सूत्रधार’ या इ.स. १००० मधील ग्रंथात बारवांची उपयुक्तता, त्यातील पाण्याची शाश्वतता आणि बारव-रचना याबाबत नियम लिहून ठेवले आहेत. वराहमिहिराच्या बृहत्संहितेत बारवांना कायमस्वरूपी पाणी राहण्यासाठी भूजलस्रोतांचे संशोधन आणि पुनर्भरण कसे करावे याबाबत चांगले मार्गदशर्न केले आहे. त्यावर काटेकोर अंमलबजावणी केल्याने बारवा या अखंड-जल-सौभाग्यवती राहत होत्या. महाराष्ट्रातील बारवांची निर्मिती ही मुख्यत्वे यादवकाळात झाली होती.





मराठवाड्यात अत्यंत जुन्या आणि सुंदर बारवा या कंधार (राष्ट्रकूट राजांची उपराजधानी), येरगी, धर्मपुरी, गणेशवाडी (चालुक्य सामंतांनी विकसित केलेली नगरे) अंबाजोगाई, चारठाणा, अंबड यांसारखी यादवकालीन जुन्या गावांमधून दिसतात.

त्या आजही वापरण्यायोग्य आहेत. यादव काळानंतर महाराष्ट्राला एका नवीन सांस्कृतिक आक्रमणाला तोंड द्यावे लागले. येथे संपूर्ण विध्वंसाची लाट आली. तेव्हा अशा स्थानांचे महत्त्व लोप पावले. मंदिरे, मूर्ती नष्ट केल्या गेल्या, पण उपयुक्ततेचे शाश्वत मूल्य असलेल्या बारवा मात्र काहीशा उपेक्षेने का होईना जतन केल्या गेल्या. त्यांचे पावित्र्य संपवले गेले, पण बारवनिर्मितीचा मूळ हेतू व नगररचनेतील त्यांचे स्थान कायम राहिले. बारवेजवळ किंवा आत मातृदेवता असतात - उदा: आसरा, चौसष्ट योगिनी. संस्कृतीच्या संदर्भात बारव स्थापत्याचे विशेष महत्त्व आहे. या बारवांच्या जवळ कुठेतरी ओढा असतो, कधी फार जुना तलाव असतो, एखादा डोंगर आणि त्यातून वाहणारा झरा असतो. हे स्रोत बारवेला जलसंपन्न करतात.

इस्लामी राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणानंतर जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झाले त्यानंतर पुन्हा बारवांचे महत्त्व राज्यकर्त्यांना उमगले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करताना त्यासोबत बारव बनवली. शिवाय अनेक गावांमध्ये बारव उभ्या केल्या. महाराष्ट्रातून काशीकडे जाणाऱ्या रस्त्यात प्रत्येक गावात लोकांना राहता येईल अशी मंदिरे/धर्मशाळा आणि सोबत पाणीव्यवस्था म्हणून बारव बनविण्यात आली. आजही या बारवा आपल्याला उत्तमरित्या पाणी पुरवठा करू शकतात. पण आपण त्यांना केवळ उपेक्षा देत आहोत.

बहुतेक सगळ्या गावांमधून आता नळाने पाणी घरापर्यंत येते. ते टाकीत जाते कोणत्यातरी धरणातून किंवा जवळच्या तलावातून. मग उन्हाळ्यात शहराची तहान भागवायची असल्याने पाणी शहराकडे जाते आणि गावांमध्ये टँकर्सने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ज्या जुन्या बारवा आहेत त्या आपण गावकऱ्यांनी कचराकुंडीसारख्या वापरायला सुरुवात केली आहे. जी बारव कुप्रसिद्ध ७२च्या दुष्काळात सुद्धा आटली नाही ती आज कचरा, प्लास्टिक आणि माती/दगड ढासळून वापरण्यासारखी राहिली नाही. ज्या ज्या गावांमध्ये बारव आहेत, त्यांनी ठरवले आणि ती बारव पुन्हा स्वच्छ केली तर निश्चित तेथील पाणी प्रश्न संपुष्टात येईल.

आम्ही पूर्वी औरंगाबाद मध्ये सिडको एन ६ मध्ये राहत असू. तेथे सिद्धार्थ चौकातून महाराणा प्रताप चौकाकडे जाताना एक बारव होती उजव्या हाताला. तिची कचराकुंडी झालेली होती. आमच्या गावात देखील जुनी बारव आणि खोल आड आहे. पण आज दोन्ही वापरात नाहीत आणि बारवेची पडझड झालेली आहे. सर्व गावकऱ्यांनी मनावर घेतले तर बारव आणि आड दोन्ही नीट करता येतील.

औरंगाबाद येथे श्री किशोर शितोळे यांची जलदूत नावाची संस्था आहे. त्यांनी तेथील सातारा आणि मुकुंदवाडी येथील बारवांचे पुनरुज्जीवन घडवून आणले (खाली लिंक्स दिल्या आहेत). आज त्या बारवा भर दुष्काळात पाणी देत आहेत. गरज आहे केवळ प्रेमाने आपल्या भारतीय परंपरेला सांभाळण्याची. गरज म्हणून तरी याकडे आपण बघितले पाहिजे.

बारवांवर लोकप्रभामध्ये उत्तम लेख आले होते. त्याच्या लिंक्स
१. पुरातन जलस्रोत बारवांची धूळधाण!
२. बारव नव्हे, परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण
३. आजही वापरता येतील मराठवाडय़ातील बारव

औरंगाबाद येथील जलदूतच्या काही बातम्या
१. ऐतिहासिक बारव पाण्याने ओसंडणार
२. साताऱ्यातील बारवेचे पाणी पिण्यायोग्य

Tuesday, June 18, 2019

राजांच्या सभेला जाऊ या

झुकूझुकू झुकूझुकू आगीनगाडी
तोंडाच्या वाफा हवेत सोडी
पडती काँग्रेस पाहूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।धृ।।

राजांच्या सभा मोठ्या
'लाव रे व्हिडीओ'चा खाक्या
भाषण एन्जॉय करू या
राजांच्या सभेला जाऊ या ।।१।।

राजांचे इंजिन धुरकट
वास येतो जळकट
चिकन सूप पिऊया
राजांच्या सभेला जाऊ या ।।२।।

सभांना नुसतीच गर्दी
नाही मतांची वर्दी
कार्यकर्ते शोधूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।३।।

काका होता तालेवार
त्याचा नुसताच मिजास फार
बारामतीत नाचूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।४।।

- ज्ञानेश