Friday, April 29, 2022
ब्रेनड्रेन की भारतदूत
स्वशोध
Monday, August 30, 2021
बिनाखर्चाचे खेळ
मी लहान असताना, म्हणजे माझ्या दुसरीपर्यंत, फुलंब्रीला राहत होतो. माझे पट्टमित्र म्हणजे स्वाती पुराणिक आणि प्रदीप निंबाळकर. मी आणि स्वाती, भराडकरांच्या वाड्यात राहायचो. प्रदीपचा वेगळा वाडा होता. आमची कुटुंबमैत्री असलेलं आणखी एक कुटुंब म्हणजे गोलटगावकर. प्रदीपच्या वाड्याच्या समोरून उजवीकडे वळालो की फर्लांगभर अंतरावर ते राहायचे. त्यांची मुलं केदार आणि योगिता. केदार माझ्यापेक्षा मोठा आणि योगिता छोटी. आमचा खेळ काय तर भराडकर वाड्यावरून निघायचं. मध्येच एखादी काडी शोधायची. प्रदीपला हाक मारायची. तिथून ते गोलटगावकरांच्या घरापर्यंत जेवढं म्हणून गाजरगवत दिसेल ते झोडपून काढायचं. एकूण अंतर फार तर १० मिनिटं. पण आम्ही किमान अर्धा पाऊण तास बाजीप्रभू आणि तानाजी आणि मुरारबाजी आणि काय काय होऊन गनिमांना झोडपत गोलटगावकरांच्या घरी पोहोचायचो.
केदार आणि प्रदीप, मी आणि स्वातीपेक्षा शूर होते. ते भिंगोटे पकडायचे. त्याला हलका दोरा बांधायचे. मग भिंगोटे सोडून, दोऱ्याचं दुसरं टोक पकडून त्या भिंगोट्यामागे पाळायचे. मी आणि स्वाती त्या दोघांच्या मागे.
कधीतरी दोन तीन कुटुंबांची एकत्र सहल म्हैसमाळला जायची. तिथे आम्ही सगळे पोरं कधी करवंदाच्या जाळीत करवंद शोधायचो, कधी वाहता ओढा असेल तर त्या पाण्याच्या गिरक्या बघत बसायचो. देवीच्या मंदिराच्या मागे आंब्याचं मोठं झाड होतं, त्यावर चढायचो. मंदिरापासून ते वरच्या गेस्टहाऊस पर्यंत पळत जायचो आणि परत यायचो. यात स्पर्धा नसायची, उगाच पळत जायचं आणि यायचं. आमचा दिवस दिवस हे खेळ खेळण्यात जायचा.
उन्हाळ्यात २ चिंचोके घ्यायचे, ते उभे फोडायचे. मग एक पाट घ्यायचा. उलटा करून त्यावर खडूने चंफुलचे चौकोन करायचे. मग चार आकारांचे दगड किंवा काहीही घ्यायचं आणि खेळ सुरू. आख्खी दुपार या चंफुलमध्ये सहज जायची. तेवढ्या वेळात कधी पापडाच्या लाट्या तयार व्हायच्या, कधी लोणच्याचा खार तर कधी कुरडायांचा चीक व्हायचा. मग तोच खाऊ आम्हाला मिळायचा.
नंतर आम्ही संभाजीनगरला राहायला आलो. तिथे सिडकोत एन ९ - एल ५१ मध्ये राहत होतो. ५१ क्रमांकाचं घर रांगेत पाहिलं. याच्या पलीकडे एक झरा होता. तेव्हा पावसाळ्यात वाहायचा. त्यात डिंभक, लहान मासे सुळूसुळू पोहायचे. आम्ही ओंजळीत माश्यांसह पाणी घ्यायचो आणि परत सोडून द्यायचो. कधीतरी चतुरांचा मोठा थवा यायचा. त्याच्याकडे बघत बसायचो. पाण्यावर तरंगणारे कीटक असतात. ते या झऱ्याच्या डोहात (घरापासून थोडं पुढे, बळीराम पाटील शाळेकडे जाताना हा डोह होता) असायचे. त्यांच्या हालचाली, त्यामुळे पाण्यावर उठणारे तरंग आम्ही बघत असू. ते कसे तरंगतात याचं फार फार अप्रूप वाटे.
हे आणि असे कितीतरी बिनाखर्चाचे खेळ आम्ही खेळत असू. आज याची आठवण झाली कारण मी आणि अमोहा घरातून खाली सोसायटीत गेलो. साधारण १०-१५ मिनिटं शोधल्यावर आम्हाला २-३ छान पीसं सापडले. त्यातलं एक खेळायला उत्तम होतं. ते घेऊन पुढे एक तास आम्ही खेळत होतो. मज्जा आली👨👧
Monday, August 2, 2021
शुद्ध वाण (?)
एकदा एका वयस्क व्यक्तीशी गप्पा सुरू होत्या. आंतरजातीय विवाह आणि वर्णसंकर. त्यातून येणारी नवी पिढी... वगैरे वगैरे... हे बोलताना काका म्हणाले की, अरे तुम्ही लोक गायी, घोडे, कुत्रे यांच्या जाती बघता. त्या बघताना शुद्ध वाण ठेवण्याचा प्रयत्न करता. जेवढे अधिक शुद्ध वाण तेवढा जास्त भाव देऊन तो प्राणी विकत घेता. त्याच तुम्हाला जातीत लग्न करून शुद्ध वाण ही संकल्पना पटत कशी नाही...
काय परफेक्ट आर्ग्युमेण्ट वाटतं नाही...
आता पुढची गम्मत वाचा...
माणूस जेव्हा पृथ्वीवर तयार झाला तेव्हा माणसाचे सात वाण होते. Homo habilis (“handy” man), Homo erectus (“upright man”), Homo neanderthalensis (the Neanderthal), The Denisovans, Homo floresiensis (the “hobbit”), Homo naledi (“star man”) आणि Homo sapiens (“wise man”, or “modern humans”). यातील शेवटचं वाण म्हणजे होमो सेपियन्स, म्हणजे आपण उरलेले माणसं.
आपण होमो सेपियन्सने बाकीच्या सहा जाती - वाण (बहुदा) मारून टाकल्या आणि केवळ आपण एकच वाण (बेणं) पृथ्वीवर शिल्लक राहिलो.
जर कदाचित आपल्यासह हे सहा वाण पृथ्वीवर असले असते तर वरच्या काकांचे म्हणणे खरे ठरले असते. क्रॉस ब्रीड / वर्णसंकर नको रे बाबा. सेपियन्सनी फक्त सेपियन्स सोबतच लग्न वगैरे करावे. त्यांनी होमो इरेक्टस बरोबर संबंध ठेऊन त्यापासून अशुद्ध वाण तयार करू नये. आता एकच वाण शिल्लक असल्याने असला काही प्रकारच अस्तिवात असू शकत नाही ना!
युवान हरारी काकांचा विजय असो!
Friday, July 23, 2021
माझा प्रवास माझा वेग
Saturday, August 15, 2020
अखंड भारत संकल्प दिन
Sunday, February 23, 2020
प्रभावी कौंतेय
आम्ही संभाजीनगर (देवगिरी जिल्हा) मधील स्वयंसेवक. त्याच्या आधी शहर प्रचारक होते अप्पा (दत्तात्रय गर्गे). कौंतेय शहर प्रचारक म्हणूनच आला, पण अर्ध्याच शहराचा. आमचा भाग त्याच्या कार्यक्षेत्रात नव्हता. तरी शहराच्या एकत्रीकरणात आमच्या भेटी होत होत्या. तेव्हा माझं वय १८-१९ असेल तर कौंतेय फार तर २२-२३. इतकं वयातील अंतर कमी असल्याने आमची मैत्री छान झाली. कौंतेयचा आमच्यावर खरं सांगायचं तर खूप प्रभाव पडला होता. कारण त्याने सांगितलेलंच - गाणी, कविता, उतारे संपूर्ण पाठ. याशिवाय अजून भारी म्हणजे तो स्वतः कविता करायचा आणि त्या छंदबद्ध, तालात म्हणायचा.
तो प्रचारक निघताना मनाची होत नसलेली तयारी आणि आश्वासक हात पाठीवर पडल्यावर झालेली तयारी -
घेतली भरारी तरीही
बळ येई ना पंखात
संशयो मनीचा घडवी
हृदयात एक आकांत
या कवितेतून अप्रतीम सांगितली होती.
अशीच एक कविता म्हणजे शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंहांना पाठवलेले पत्र - मिर्झास
मग सडा गुलामीत वा मुक्तिस्तव गर्जा।
आवाहन अथवा समज इशारा मिर्झा।।
आलमगीर चर्येवर चिंतेचे घन सावट पडले
शिवरौद्र तांडवामध्ये रथी अन् महारथी सापडले...
याच कवितेत एका कडव्यात, महाराज स्पष्ट सांगताहेत
ती माय भवानी समर्थ तारायाला
हे राज्य श्रींचे पूर्णत्वी नेण्याला
तुज माझ्या वाचुन कार्य तिचे का अडते
पण खचित खुणावी आपुल्या कर्तव्याला
गीतेतील कर्मयोग आणि स्वधर्म (कर्तव्य) पालन किती सहज सोपं करून सांगितलं होतं याने. आणि हा माझ्यापेक्षा केवळ २-४ वर्षे मोठा असेल. सुंदर शद्ब, एक नाद आणि कौंतेयची कविता म्हणण्याची विशिष्ट पद्धत. आम्ही सगळेच त्याच्या प्रभावात, खरं सांगायचं तर प्रेमात.
कौंतेयची कवितांची वही उतरवून घेतली होती. पण त्याची खरंतर गरज नव्हतीच. आत्ताही वरील ओळी लिहिताना वेगळ्या आठवाव्या लागल्याच नाहीत, एवढ्या त्या लक्षात राहिल्यात.
हे सगळं कालपासून आठवत होतं. आज जरा शब्दबद्ध केलं. असे प्रचारक संघाने आम्हाला दिले म्हणून आम्ही घडलो.
Thursday, February 13, 2020
पहिले उड्डाण
नमस्कार,
पहिले उड्डाण. मजा आली.
आत्ता झुरिक विमानतळावर आहे. मकर रास आहे ना ठरलेले फ्लाईट कॅन्सल :-) . ९:४० ला पुढचे आहे. तुम्ही लोक म्हणताल, याने सुरूवातच काय रडून केली. सवय, दुसरे काय...
काल मुंबईत माया आणि अमोलला टाटा केला आणि (खरं सांगतो) थोडे घाबरतच आत गेलो. थोडे समोर गेलो की लगेच x-ray मशीन होते. अभिने सांगितले होते की हँड बॅग त्यात टाकायची नसते. पण टाकली. दोन्ही बॅग पॅक. आता काय करायचे असा विचार करत स्विसच्या काउंटरवर गेलो. मोठी बॅग धडपडत उचलून त्यच्यासमोर टाकली. २९.५ kg. जीव भांड्यात पडला. पण त्या माणसाचे लक्ष गेले छोट्या बॅगवर. तिचे वजन किती? ही बॅग न धडपडता काट्यावर टाकली. ७.५ kg. you have to check-in this bag, sir... डोक्यात पहिला प्रश्न, किती पैसे लागतील. लगेच विचारले. तं म्हंतो कसा, फुकट. दुसरा प्रश्न, जवळ काहीच कपडे नाहीत. काय करावे? विचारले. त्याने आश्वासन दिले आहे की अडचण येणार नाही. बघू काय होते ते.
मग इमिग्रेशन. फॉर्म भरला आणि मोठ्ठ्या माणसांसाठीच्या काउंटरवर जाऊ लागलो. तिथल्या माणसाने सामान्य माणसांच्या रांगेत लावले. लागलो. ते सोपस्कार झाले. मग गेट नं. ५ च्या जवळ जाऊन थांबलो. इथे पाट्या चांगल्या नाहीत म्हणून सांगितले होते. पण मस्त पाट्या होत्या. कोणाला विचारायला लागले नाही. ड्यूटी फ्री दुकाने (आणि किमती) बघितल्या. नंतर टाईम पास म्हणून दीक्षा बघायला सुरुवात केली. अस्वस्थ पिक्चर आहे. त्यानंतर मायाला फोन केला. घरी दोनदा लावण्याचा प्रयत्न केला. १७ रू झाले असताना एस्टीडी वाल्याने २५ मागितले. मग त्याच्याशी भांडण. तोवर १२:३० झाले. मग सेक्युरिटीच्या रांगेत लागलो. ते संपले २० मिनिटात. तोवर विमान लागले होते.
बोर्डिंग पास दाखवून विमानात गेलो... थोडी भिती आणि खूप कुतुहल. विंडोसीट नाही मिळाली. जरा अँडजस्ट व्हायला १० मि लागली. सीट बेल्ट लावून काढून बघणे, पांघरूण, उशी, हेडफोन, टीव्हीचा रिमोट सगळे खेळून झाले. मग घोषणा, उड्डाणाची. (आठवले “आवळा गं...” - वऱ्हाड) अंगदने फारच भीती घातली होती. हँडल पक्के पकडले. पाय रोवले. कधी बाहेर कधी आत बघत राहिलो. आणि विमान रिवर्स मध्ये सुरू झाले. ते धावपट्टीवर यायला १० मि आणखी गेली. तोवर मी रिलॅक्स झालो होतो. हळू हळू वेग पकडायला सुरुवात झाली. पुन्हा हात पाय टाईट :-) . पण कळायच्या आतच आम्ही फ्लाय झालो होतो.
मग बघितली ती मुंबापुरी. खुप दिवे. वळनदार रस्ते. त्यावरील धावणारे दिवे. मरीन ड्राईव्ह, वराळी सी फेस, समुद्र... भारत सोडून निघल्याची पहिली जाणीव. आत्ता पुन्हा डोळे भरले. ते डोळे भरून पहात राहिलो. तुम्हा सर्वाची आठवण काढत.
अंगद हृषी स्वानंद साठी: अरे एअर होस्टेस फार वयस्क होत्या. जवळपास सगळ्याच. . . बॅडलक ना?
आता बाकी नंतर. ८:४५ झालेत. बोर्डिंगला जातो.
बेल्जियमला पोहोचलो. या फ्लाईट मधली एअर होस्टेस तरूण आणि वेंधळी होती. आख्खा ट्रे पाडणार होती ती. हॉटेल चांगले मिळाले. छान सकाळ आहे.
मुंबई सोडल्यावर भोवताली, म्हणजे बाहेर अंधारच होता. काहीच दिसत नव्हते. मग बाहेर बघणे सोडून दिले. जेवणही आले होते. जेवण करून टीव्ही पहात बसलो. नंतर झोप लागली. साधारण ३ तास झोपलो होतो. जाग आली तेव्हा बाहेर लख्ख उजेड होता. सूर्य उगवला होता. स्थनिक वेळेनुसार ५ वाजले असावेत. हे काय अप्रुप म्हणून बघत राहिलो. खाली ढग दिसत होते. त्यावर सूर्याची किरणे पडून चमकत होते. नेहमी खालून वर चमकणारे ढग बघणारा मी वरून बघताना... नाही सांगता येत. एकदा फक्त कळसूबाईवरून पाहिले होते खाली ढग.
मग घोषणा झाली की आता विमान खाली उतरणार आहे. आणि लक्षात आले की कळसूबाईची तुलना नाही करता येणार. पहिला ढगांचा लेअर सोडून खाली आलो. आणि आणखी एक लेअर दिसला. त्यात मधे मधे बर्फाचे डोंगर दिसू लागले. फ्लाईटइन्फो मध्ये जाऊन नाव बघितले. आल्प्स. मग ढगांचे आणखी दोन लेअर झाल्यावर मधून मधून स्विस जमीन आणि झाडे दिसू लागली.
स्विस... नेहमी आपण पहातो पिक्चरमध्ये. तिथली वनराई, स्वच्छ रस्ते, भोवताली बर्फाचे डोंगर. वरून छान दिसत होते. जवळून पहाता नाही आले. विमान उतरायला ४० मिनिटे लागली. बाहेर आलो. एक गोरी युनिफॉर्ममधली दिसली. तिला बोर्डिंग पास दाखवला. तिने फ्लाईट नक्की कॅन्सल झाली असे सांगितले. ट्रान्सफर डेस्कवर जायला सांगितले. त्यासाठी आधी ई टर्मिनलवरून ए टर्मिनलला जायचे होते. अभि, अमोलने सांगितल्याप्रमाणे पाट्या व्यवस्थित होत्या. रेल्वेत उभा राहिलो. आपली लोकल असते तशीच. ट्राम सारखी म्हणता येईल. ए ला जाऊन ट्रान्सफर डेस्कवर गेलो. तिथे आर्धा तास रांगेत उभा राहिलो. मग नवीन बोर्डिंग पास मिळाला. सगळा एअरपोर्ट फिरून आलो.
त्यानंतर गाणारे व्हायोलीन ऐकत तुम्हाला पत्र लिहायला घेतले. खूपच छान वेळ गेला.
बोर्डिंगची वेळ झाल्यावर तिथे गेलो. एक बस आलेली होती. त्यातून विमानाजवळ गेलो. कसले भंगार विमान. छोटेसे. ३ बाय ३ सीट. त्यात मला मधली सीट मिळाली. भूक खूप लागलेली होती. स्विसमध्ये स्विसफ्रँक चालतात. त्यामुळे ट्रॅव्हलर चेक वठवले नाहीत. पाणीपण मिळाले नाही. आणि ही तरूण सुंदर बया खायला काही लवकर आणेना. आणले ते पण वेंधळेपणा करत. दोनतीन जणांना अभिषेक केला. अखेरीस खायला मिळाले. पाणीपण मिळाले.
११:१५ ला ब्रुसेल्सला उतरलो. बॅगेज कुठे आहे याचा पत्ता नाही. भिती वाटली. पण सापडले. त्याआधी पोलीसांना पासपोर्ट दाखवून बेल्जियम प्रवेश केला. त्या बॅगा घेऊन बाहेर पडायचा रस्ता शोधत राहिलो. सापडेच ना. पप्याची आठवण आली. मग कॉलिंग कार्ड घेतले. तर फोनच सापडला नाही. शेवटी बाहेर आलो. मर्सिडीज टॅक्सी... बसलो. त्या हीरोला हॉटेल काय मॅक्लीन पण कळाले नाही. त्याच्या एका मित्राने सांगितले. मग त्याने GPRS नकाशावरून मला मॅक्लीनला आणले. पण हॉटेल कुठे माहिती. माझे लक्ष मिटर कडे. त्याच्या लक्षात आले असावे. त्याने मिटर बंद करून हॉटेल शोधून दिले.
असा झाला प्रवास
Tuesday, October 8, 2019
सहज संवाद
ही गोष्ट लहानपणी "श्यामची आई" पुस्तकात वाचल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला होता की, भाजीत मीठ नाहीये हे सांगायला श्यामच्या वडिलांना अडचण काय होती. सर्वांच्या ताटात एक एक चिमूट मीठ पडलं असतं आणि सर्वांना सहज चवीचं खायला मिळालं असतं. पण एकूणच यात अनावश्यक त्यागाचे उदात्तीकरण केलंय.
याचे आईवर होणारे परिणाम किती भयानक असू शकतात याचा विचारच केलेला नाहीये. जर आई निगरगट्ट असेल तर काही अडचण नाही. पण ती तशी नाहीये कारण तिनेसुद्धा भाजी बिना मिठाची खाल्ली. आपण जर चूक केली तर तिची शिक्षा असणार नाही पण कुणी काही न बोलता ते सहन करेल आणि चूक सुधारायला आपल्याला जागाच नसेल ही भावना किती भयंकर आहे. मी आपल्या घरात आपल्याच माणसात एक छोटीही चूक करू शकत नाही हे दडपण तिच्यावर पुढे जन्मभर असेल.
आपल्या माणसांत असताना आपण सहज असलो पाहिजे. आपल्यावर "माझ्याकडून एखादी चूक तर होत नाहीये ना" याचं दडपण असू नये. यासाठी सर्वांनी सहज संवाद ठेवला पाहिजे. कुणी एखादी छोटी-मोठी चूक केली तर त्यावर सोपा उपाय शोधला पाहिजे. न बोलता सहन करणंही नको आणि फाडफाड बोलून शिक्षा करणंही नको.
आजच्या दसऱ्याला अबोलतेकडून सहज संवादाकडे आपल्या सर्वांचे सीमोल्लंघन व्हावे या शुभेच्छा!!!
Thursday, September 19, 2019
सूर्यास्त
अस्तंगत होतो, पुन्हा न उगवण्यासाठी
तेव्हा त्याच सूर्याचा एखादा ग्रह
अश्रुंचे इंधन करतो,
मनातील आक्रोशाचे रूपांतर आगीत करून
उष्णता-प्रकाश देतो,
सूर्यमालेला विस्कटण्यापासून वाचवण्यासाठी!
त्याचाच पुढे नवा सूर्य होतो...
