Showing posts with label तत्त्वज्ञान. Show all posts
Showing posts with label तत्त्वज्ञान. Show all posts

Friday, April 24, 2026

२२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा हा भारतीय समाजाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा होता. या प्रतिज्ञांनी नवबौध्द समाजाला "हिंदू" अस्मितेपासून दूर नेलं. आणि आता तर बाकी प्रतिज्ञा न आठवता so called डॉ आंबेडकर अनुयायी केवळ ४-५ प्रतिज्ञा लक्षात ठेवतात. या प्रतिज्ञांमधील मानसिक, नैतिक आणि सामाजिक पुनर्जन्म कुणी लक्षात ठेवत नाही आणि लक्षात घेतही नाही.

या प्रतिज्ञांमध्ये, बुद्धांच्या शिकवणीतील तीन महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणजे पंचशील, अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता, यांचा थेट समावेश आहे. 

१. पंचशील म्हणजे पाच नैतिक नियम. हे नियम कोणत्याही धर्मापुरते मर्यादित नाहीत; ते सार्वत्रिक मानवी मूल्ये आहेत. अहिंसा, सत्य, संयम, प्रामाणिकपणा आणि व्यसनमुक्ती—ही पाच तत्त्वे व्यक्तीला स्थिर करतात आणि समाजाला सुरक्षित करतात.
- अहिंसा मनातील क्रूरता कमी करते. हिंसा कमी झाली की समाजात भीती कमी होते आणि विश्वास वाढतो.  
- चोरी न करणे म्हणजे इतरांच्या हक्कांचा आदर. यामुळे परस्परांमध्ये सुरक्षितता निर्माण होते.  
- कामवासनेचा दुरुपयोग न करणे हे कुटुंबव्यवस्थेला स्थिर ठेवते.  
- खोटे न बोलणे समाजातील संवादाला पारदर्शकता देते.  
- मद्य व व्यसनांपासून दूर राहणे व्यक्तीचे आरोग्य, विवेक आणि कुटुंबातील शांतता टिकवते.
पंचशील म्हणजे स्वत:वर नियंत्रण ठेवून इतरांच्या कल्याणाचा विचार करणारे जीवन.

२. अष्टांग मार्ग हा बुद्धांनी मानवी जीवनाला दिलेला मार्ग आहे. यात विचार, वाणी, कृती, उपजीविका आणि मनाची शिस्त या सर्वांचा समतोल साधला जातो.
- सम्यक दृष्टि: व्यक्तीला अंधश्रद्धा आणि भीतीपासून मुक्त करते.  
- सम्यक संकल्प: करुणा आणि अहिंसेवर आधारित विचार निर्माण करतो.  
- सम्यक वाणी: कटू, खोटे किंवा हिंसक बोलणे टाळते.  
- सम्यक कर्म: म्हणजे नैतिक आणि समाजहिताचे आचरण.  
- सम्यक उपजीविका: इतरांना हानी न पोहोचवणारा व्यवसाय निवडण्याची प्रेरणा देते.  
- सम्यक प्रयत्न वाईट प्रवृत्ती कमी करून चांगल्या प्रवृत्ती वाढवतो.  
- सम्यक स्मृती: सजगता आणि आत्मपरीक्षण वाढवते.  
- सम्यक समाधी: मनाला स्थिरता आणि शांतता देते.
अष्टांग मार्ग म्हणजे मानसिक आरोग्य, सामाजिक सौहार्द आणि वैयक्तिक प्रगतीचा मार्ग.  

३. दहा पारमिता म्हणजे मानवी गुणांचे सर्वोच्च रूप. या गुणांचा विकास म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला उन्नत करण्याचा मार्ग.
- दान स्वार्थ कमी करते आणि सहकार्य वाढवते.  
- शील नैतिकता आणि विश्वासार्हता वाढवते.  
- नेक्कम्म/नैष्कर्म (त्याग) लोभ कमी करतो.  
- प्रज्ञा विवेक आणि तर्कशक्ती वाढवते.  
- वीर्य सकारात्मक कृती करण्याची ऊर्जा देते.  
- क्षांती/शांती क्षमाशीलता वाढवते.  
- सत्य नातेसंबंधातील विश्वास टिकवते.  
- अधिष्ठान ध्येयपूर्तीची ताकद देते.  
- मेत्ता (मैत्री) सर्व जीवांप्रती मैत्रीभाव निर्माण करते.  
- उपेक्षा (स्थितप्रज्ञता) समत्व आणि मानसिक स्थैर्य देते.
या पारमिता म्हणजे मानवतेचा सर्वोच्च नैतिक आराखडा आहेत.

आज या बौद्ध शिकवणी सोडून विद्रोही प्रतिज्ञांचा वापर केवळ विद्वेषासाठी केला जातोय. त्यामुळे जर कुणी विद्रोही प्रतिज्ञांबद्दल बोलायला लागला की, तिरंगा मधील नाना पाटेकर सारखं म्हणायचं - अगर भगवान बुद्ध की तीन शिक्षाओं का पालन किया हैं तो ही बाकी उन्नीस को हाथ लगाना।

पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता या प्रतिज्ञांतील सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि मानवी मूल्यांचा सार आहेत. त्यांचा अधिकाधिक प्रसार व्हावा.

सर्वांना डॉ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

Monday, August 30, 2021

कर्ण

हॅरी - आपण आत्ता कुठे आहोत?

प्रोफ. डम्बलडोर - तुला काय वाटतंय?

हॅरी - मला वाटतंय की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. फक्त इथे गर्दी नाहीये, स्वच्छता जास्त आहे...

प्रोफ. डम्बलडोर - अच्छा...

हॅरी - आता मला परत जावे लागेल ना?

प्रोफ. डम्बलडोर - ते तुझ्या निवडीवर अवलंबून आहे.

हॅरी - म्हणजे मला ठरवता येईल?

प्रोफ. डम्बलडोर - मी तुला खूप आधी सांगितलं होतं की तू किंवा कुणीही जे काही आहात ते निवडीवर अवलंबून आहे. कुणाचीही निवड ही क्षमतेहून अधिक महत्वाची असते. यासाठी तुला एक गोष्ट सांगतो.

तुला महाभारत माहित आहे. तुझ्या अभ्यासक्रमात होतं... त्यात एक पात्र होतं - कर्ण! तो कुंतीचा पुत्र होता. विवाहाच्या आधी झालेला होता. त्यामुळे कुंतीने त्याला त्यागले होते. त्याला वाढवले एका सारथी कुटुंबाने. राधेने त्याचा स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे सांभाळ केला. त्याची दुर्योधनाशी मैत्री झाली. जेव्हा तू, रॉन आणि हर्मायनी यांच्यातील कुणी चूक करत असेल तर अन्य दोघे, किमान एकजण ते थांबवण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर ना? यालाच निवड म्हणतात. मैत्री अशीच असली पाहिजे. पण कर्णाने कधीही दुर्योधनाला वाईट वागण्यापासून थांबवले नाही. दुर्योधनाने जेव्हा भीमाला विष दिले, तेव्हा तर कर्ण आणि अर्जुन यांच्यातील तीव्र स्पर्धा सुरू व्हायची होती. भीमावर केलेल्या विषप्रयोगाला त्याने थांबवले नाही. पांडवांना जाळून मारावे म्हणून लाक्षागृहात पाठवले, चुकीच्या पद्धतीने द्यूत खेळले, द्रौपदीची विटंबना केली, विराट राजाच्या लहानश्या राज्यावर आक्रमण केलं, पांडवांकडून पाच गावांचा प्रस्ताव कृष्णाने आणला तोही नाकारला. युद्धात अभिमन्यूला अनेकांनी मारलं. तो निःशस्त्र झाला होता तरीही कर्णाने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तोच कर्ण, जेव्हा अर्जुन त्याला निःशस्त्र असताना मारत होता तेव्हा नियमांची ग्वाही देत होता. जेव्हा मैत्री करता तेव्हा ती निभावता आली पाहिजे. निभावणे म्हणजे प्रत्येक बाबतीत सोबत असणे नव्हे, तर मित्राला योग्य मार्गावर ठेवणे म्हणजे मैत्री. हीच ती निवड.

हॅरी - बरोबर. पण किमान तो मैत्री निभावताना दुर्योधनाच्या सोबत तर राहिला ना?

प्रोफ. डम्बलडोर - नाही ना... त्याचा अहंकार मैत्रीच्या वर होता... जेव्हा रॉन जखमी होता तेव्हा त्याला तू आणि हर्मायनी सगळे निर्णय घेत आहात आणि त्याला साईडलाईन केलं जातंय असं वाटलं. त्याचा अहंकार, मैत्री आणि प्रेम दुखावलं गेलं. तो निघून गेला. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की हीच वेळ आहे. तेव्हा तुमचा काहीही पत्ता नसताना रानोमाळ तो तुम्हाला शोधत फिरला आणि जेव्हा ते लॉकेट फोडायचे होते तेव्हा तो तुझ्यासोबत होता. पण कर्णाने काय केलं... दुर्योधनाच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई तो पहिले १० दिवस लढलाच नाही. कारण त्याला भीष्म म्हणाले की तू अर्धरथी आहेस. हा त्याला अपमान वाटला. त्यामुळे जोवर भीष्म सेनापती आहेत तोवर त्याने लढाईत भागच घेतला नाही.

हॅरी - पण त्याच्यावर लहानपणापासून अन्याय झाला. त्याला आयुष्याच्या सर्वात मोठ्या लढाईच्या वेळी वाटणारच ना, की त्याला महारथी म्हणावे...

प्रोफ. डम्बलडोर - अन्याय कुणावर झाले नाहीत... माझं आयुष्य तुला आता बरंच कळालं आहे. मी, माझा भाऊ, बहीण, आई... कितीतरी कठीण गोष्टी होत्या. त्या सर्व मागे ठेऊन योग्य मार्ग निवडता आला पाहिजे. नियतीने तुझ्यावरही किती अन्याय केलाय. तू वर्षाचा होतास तेव्हा आईबाप गेले. मावशीने सांभाळ केला, तोही नाईलाजाने. शाळेत तुला काही चांगले, प्रेम करणारे शिक्षक भेटले तर काही सदैव भीती घालणारे, तुझा अत्यंत द्वेष करणारे भेटले. मित्र भेटले, सोबतच वैरीही भेटले. माझ्यासारखा तुला निव्वळ एक शस्त्र म्हणून तयार करणारा हेडमास्तर भेटला... हे होऊनही तू आज माझ्याशी अत्यंत प्रेमाने, आदराने बोलत आहेस. ज्याने तुझ्याशी सदैव वैर पत्करलं, जो माझ्या मृत्यूला एका अर्थाने कारणीभूत झाला, त्या ड्रेकोला तू काही तासांपूर्वी मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढलंस... या सगळ्या तुझ्या निवडी होत्या आणि त्यातूनच तुझं चारित्र्य दिसून येतं. कर्णाला तर उदाहरण म्हणून कृष्ण होता. त्याच्यावरही नियतीने कितीतरी प्रकारे अन्याय केला आणि तरीही तो न्यायाच्या, नीतीच्या बाजूने ठाम उभा राहिला. त्यामुळे हॅरी, हे कायम लक्षात ठेव की एखाद्या व्यक्तीची क्षमता तिचं चारित्र्य ठरवत नाही तर त्या व्यक्तीची निवड तिचं चारित्र्य ठरवते. त्यामुळे तुला निवड करायची आहे. तू आता काय करणार?

हॅरी - मला ठरवावे लागेल...?

प्रोफ. डम्बलडोर - हो

हॅरी - माझ्यापुढे पर्याय काय आहेत?

प्रोफ. डम्बलडोर - तू आत्ताच म्हणाला होतास ना की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. त्यामुळे परत जाण्याचं ठरवलंस तर परत जाऊ शकशील, किंवा तू जर ठरवलं इथे थांबायचं तर असं समज की एक ट्रेन येईल आणि तुला घेऊन जाईल

हॅरी - कुठे?

प्रोफ. डम्बलडोर - पुढे...




Wednesday, April 11, 2018

चत्वार वाचा

लहानपणी मनाचे श्लोक पाठ करताना “नमूं शारदा मूळ चत्वार वाचा” ऐकलं होतं. मग मनाच्या श्लोकातच “पुढे वैखरी राम आधी वदावा” असंही ऐकलं, पाठ केलं. जेव्हा अथर्वशीर्ष पाठ केलं तेव्हा “त्वं चत्वारि वाक् पदानि” हे कानावर पडलं आणि कदाचित “चत्वार वाचा” आणि “चत्वारि वाक्” याचा संबंध असेल असं वाटलं. एकनाथांचा अभंग “गुरू परमात्मा परेशु” यातील जो परेश आहे तो पर+ईश आहे की काय आहे हा प्रश्न पडला आणि ज्ञानेश्वरीत सुरूवातीला जेव्हा शारदेला नमन आहे त्यात “आतां अभिनव वाग्विलासिनी” याने सुरूवात होऊन ते नमन आहे.
याचं उत्तर बऱ्याच वर्षांनी मिळालं. कधीतरी वाणीचे स्तर असं वाचनात आलं. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी.
वैखरी हा वाणीचा चौथा स्तर. जी भाषा आपण बोलतो ती म्हणजे वैखरी. म्हणून वाणीशुद्धीसाठी रामदास सांगतात “पुढे वैखरी राम आधी वदावा”. तिसरा स्तर आहे मध्यमा. याला आपण self talk म्हणू शकतो. आपण बोलण्याआधी जो विचार करतो, ती वाणी म्हणजे मध्यमा. दुसरा स्तर येतो पश्यन्ति. केवळ जाणीवेने कळणारी वाणी म्हणजे पश्यन्ति. Conscious मनाला जाणवणारी वाणी. आणि सर्वात पहिली म्हणजे परा. ही sub-conscious अबोध मनाची वाणी आहे. परा पासून सुरूवात होऊन वैखारीला वाणी अभिव्यक्त होते. त्यामुळे शुद्धीकरण करत करत परा अत्यंत शुद्ध असणे हे योग्याचं लक्षण. म्हणून एकनाथ गुरूला परेश म्हणतात.
या चारही वाणींचा अधिपती म्हणून गणपती हा चत्वारि वाक् पदानि तर वाग्विलासिनी शारदा ही चारही वाणींची मूळ म्हणून नमूं शारदा मूळ चत्वार वाचा.

ता. क. आधुनिक मानसशास्त्र म्हणतं ते cognition, belief, self-talk, communication... - माया

Monday, March 19, 2018

बुद्ध, शंकरचार्य, वैदिक धर्म वगैरे


बुद्ध, शंकरचार्य, वैदिक धर्म वगैरे

बुद्ध धर्म, उदय आणि पूर्व आशियात पूर्ण प्रभाव.

बुद्धांनी त्या काळातील वैदिक धर्मातील चालीरीती
१.      यज्ञ, यज्ञातील प्राणिहिंसा, त्यामुळे येणार्‍या अंधश्रद्धा
२.      चातुर्वर्ण्य
३.      देवाचे अनावश्यक महत्व, त्यामुळे येणार्‍या अंधश्रद्धा
या सर्वांना नाकारले. आणि धर्म सोपा केला.

सामान्य जनांसाठी त्यांनी पंचशील संगितले.

पाणाति पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि - अहिंसा
अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि - चोरी न करणे
कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि - व्याभिचार न करणे
मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि - सत्य

सुरा मेरयमज्जपमादठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि - नशा न करणे

एवढे करा, बाकी काही केले नाही तरी चालेल. तुम्हाला मोक्ष मिळेल.

ज्यांना यापुढे, पारमार्थिक ज्ञान हवे आहे त्यांच्यासाठी त्यांनी विपश्यना मार्ग आणि त्यातून निर्वाणप्राप्ती सांगितली. अर्थात प्रपंचात राहून सुद्धा विपश्यना करता येते. पण सर्वात आधी पंचशील अनुसरणे महत्वाचे.

बुद्ध चार्वाकाप्रमाणे देवाला, मोक्षाला direct नाकारू शकले नाहीत. कदाचित चांगले वागून काय मिळणार? याचे सोपे आणि भारतीय परंपरेला शोभेल असे उत्तर मोक्षअसल्याने त्यांनी ते दिले असावे.

बुद्धांनी कधीही कोणते चमत्कार केले नाहीत आणि त्यांच्या अनुयायांनीसुद्धा खोट्या गोष्टी (भिंत चालवणे, मेलेल्या माणसाला जिवंत करणे, विमानातून वैकुंठला जाणे) पसरवल्या नाहीत.

बुद्धांच्या या सोप्या धर्मामुळे केवळ चांगले वागणे आणि कौशल्याधारीत पोटापाण्याची व्यवस्था करणे हेच महत्वाचे ठरले. शिवाय बुद्धाने धर्म हा प्रचलित भाषेतून सांगितला आणि संस्कृत, जी केवळ अभिजनांची भाषा झाली होती, तिला बाजूला ठेवले व धर्मज्ञान सामान्य माणसांसाठी खुले केले. त्यामुळे यज्ञ करणारे, पूजा घालणारे, पोथ्या-पुरणांचा चुकीचा अर्थ लावून सामान्यांना गंडवणारे, कर्मकांडत देवत्व शोधणारे यांचे अच्छे दिनगायब झाले.

कृष्णाने कर्मयोग सांगितला. बुद्धाने तेच, चांगले वागाया पद्धतीने संगितले. कृष्णाने या जन्मात आत्म्यावर कर्मसंस्कार न होऊ देता कसे जगावे हे संगितले, बुद्धाने मागील जन्मातील कर्मसंस्कार सुद्धा कसे दूर करावे ते सांगितले. माझ्या मते, बुद्धाने हिंदू धर्म हा कर्मकांडातून काढून खर्‍या कर्मयोगाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वीही झाले.

बुद्धांचा कालखंड हा ई.पू. ५०० च्या सुमारास आहे. त्यानंतर चाणक्य आणि मौर्य यांचा कालखंड आहे ई.पू. ३५० च्या सुमारास. नंतर सम्राट अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला तो ई.पू. २७० च्या आसपास. इथून पुढे बुद्ध धर्म हा पूर्व आशियात पसरत गेला तो जपान पर्यंत. तेव्हापासून ते आदिशंकराचार्य यांचा उदय होईपर्यंत, म्हणजे ई.नं. ८०० पर्यंत, सुमारे १००० वर्ष बुद्ध धर्म हा अफगाणिस्तान पासून जपान पर्यंत सर्वत्र पोहोचला होता.

पण कोणताही संप्रदाय असो, त्यात चांगले वाईट लोक येतातच. शिवाय शिकवणुकीचा अर्थ काढणारेही खूप लोक असतात आणि ते आपल्या बुद्धिप्रमाणे किंवा स्वत:च्या फायद्याचे अर्थ काढतात. असेच अर्थ बुद्ध धर्मात देखील काढले गेले.
१.      चीन व जपान मध्ये बुद्ध धर्माचे विकृत रूप तेथील राज्यकर्त्यांनी तयार केले. ज्यात शत्रूचे किती लोक मारले यावरून ती व्यक्ती निर्वाणपदाच्या किती जवळ गेली ते ठरवले जात असे. यावर एक सविस्तर पुस्तक आहे. इच्छुकांनी शोधून वाचावे.
२.      भारतात, जे लोक संसार सोडून धर्मकार्यात, साधनेत वेळ व्यतीत करतात ते महान, त्यांनाच मोक्ष मिळणार, इतर लोक जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटणार नाहीतवगैरे गोष्टी पुढे आल्या आणि जास्त लोक सान्यासी आणि कमी लोक गृहस्थाश्रमी असा असंतुलित समाज निर्माण होईल की काय असे वाटू लागले.

हिंदू धर्मातील दर्शने

बुद्धांनी इतकी वर्षे मूर्तिपूजा आणि कर्मकांडांना विरोध केला. पण आज जगात सर्वात जास्त बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि सर्व धार्मिक विधी हे बुद्ध भिख्खू करतात. म्हणजे पुन्हा बुद्ध धर्मात मूर्तिपूजा व कर्मकांड आलेच. This is irony! असो.

शंकराचार्याँनी पुनरुज्जीवित केलेला हिंदू धर्म बघण्याआधी एकूण हिंदू दर्शने कोणती आणि ती काय सांगतात ते बघणे सयुक्तिक राहील. हिंदू धर्मांतर्गत ६ आस्तिक आणि ३ नास्तिक दर्शने मनाली गेली आहेत.
आस्तिक दर्शने:
१.      सांख्य
२.      योग
३.      न्याय
४.      वैशेषिक
५.      मीमांसा
६.      वेदान्त

नास्तिक दर्शने:
१.      बुद्ध
२.      जैन
३.      चार्वाक (यात आजीवक हे आणखी एक उपदर्शन आहे)

आस्तिक दर्शने
सांख्य:
सांख्य दर्शन कपिल मुनींनी मांडले. यात द्वैत तत्वज्ञान संगीतलेले आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष* हे वेगवेगळे आहेत. गीतेच्या अध्याय २ मध्ये सांख्य दर्शन विस्ताराने सांगितलेले आहे. प्रकृती तीन गुणांनी बनलेली आहे. सत्व, रज तम जोवर यांचे प्रमाण बरोबर आहे, तोवर no issues – balance गेला की गडबड. सांख्यांच्या मते, अविद्या हे सर्व दु:खांचे कारण आहे. विद्या, म्हणजेच विवेकबुद्धी ही मोक्षाप्रत घेऊन जाते. हा विवेक तीन गुणांना प्रमाणात ठेवतो. अविद्येमुळे अहंकार निर्माण होतो. अहंकारातून दु:ख निर्माण होतात.
विवेकबुद्धीने प्रकृती आणि पुरुष यातील द्वैत कळते. आणि ते कळले की कैवल्यस्थिती येते. ही कैवल्यस्थिती म्हणजे मोक्ष!
इथे कुठेही typical देवांचा उल्लेख नाही. तरीही हे दर्शन आस्तिक मानतात कारण आत्म्याचे अस्तित्व यांनी मान्य केले आहे. तसेच पुरुष हा केवळ चैतन्य स्वरुपात मानला गेला आहे.

योग:
योग दर्शन पतंजलि मुनींनी मांडले. यात आठ पायर्‍या सांगितल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. योगसूत्रात पुरुषाला देव मानले आहे. समाधी म्हणजे मोक्ष.
योग म्हणजे चित्तवृत्तींना स्थिर ठेवणारे mechanism. योगांमध्ये या आठ पायर्‍यांचा राजयोग हा उत्तम मनाला गेला आहे.
इथेही typical देवांचा उल्लेख नाही.

गमतीची गोष्ट: ११ व्या शतकात एक पर्शियन विद्यार्थी अल बिरुनी भारतात आला होता. त्याने योगाचा खूप अभ्यास केला. पतंजलींचे योगसूत्र त्याने पर्शियन आणि अरबी भाषेत नेले. भारतीय साधूंशिवाय सूफी संत योग करायचे. सूफी संत देवाला प्रियकर अथवा प्रेयसीच्या रूपात बघतात. कदाचित त्यामुळेच इश्क के सात मुकाम दिलकशी, उंस, मोहोब्बत, अकीदत, ईबादत, जुनून, मौत त्यांनी मांडले असावेत... This is only my theory. There is no evidence of it.

*पुरुष म्हणजे स्त्री पुरुष मधला नाही!!! पुरात (नगरात) वास्तव्य करतो (किंवा खरे तर झोपतो) तो पुरुष. नगर म्हणजे ५ ज्ञानेंद्रीये, ५ कर्मेन्द्रीये आणि १ मन. अशा ११ गोष्टींचे नगर.

सांख्य आणि योग ही दर्शंनांची पहिली जोडी आहे. दुसरी जोडी न्याय आणि वैशेषिक. न्याय दर्शन हे अधिभौतिक आणि तर्कबुद्धीचे दर्शन आहे तर वैशेषिक दर्शन हे पदार्थ विज्ञानाचे दर्शन आहे.

न्याय:
तर्कबुद्धी वापरुन देवाचे अस्तित्व सिद्ध करणारे दर्शन. हे दर्शन कोणी मांडले हे स्पष्ट नाही. तुम्हाला भारत एक खोजमालिकेतील शीर्षकगीत आठवत असेल
सृष्टि से पहले सत नहीं था
असत भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं
आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ
किसने ढका था
उस पल तो
अगम अतल जल भी कहां था
हे शब्द ऋग्वेदातील ऋचा आहेत. आणि यापासूनच न्याय दर्शन सुरू होते.
हेतुविद्या, अन्वेक्षण, प्रमाणशास्त्र, तत्त्वशास्त्र, तर्कशास्त्र, वादार्थ, फक्किकशास्त्र या सहा विद्या/शस्त्रांद्वारे न्याय दर्शन या जगाचा कुणीतरी अज्ञात कर्ता आहे हे दाखवून देते. पण हा कर्ता म्हणजेच चैतन्यतत्व आहे आणि त्याद्वारेच सर्व जगाचे व्यवहार चालत असतात. हा देव इंद्र, वरुण, ई., किंवा ब्रह्मा-विष्णु-महेश या रूपात नाही.

वैशेषिक:
न्याय दर्शनापासून पुढे अधिक प्रगल्भ होत वैशेषिक दर्शन बनले. कणाद मुनी या दर्शनाचे कर्ते आहेत. या दर्शनात जगत पहिल्यांदा अणू हे concept मांडली गेली. जगातील सर्व पदार्थ हे परमाणु पासून बनले आहेत हे कणादांनी सांगितले. प्रत्येक पदार्थ हा द्रव्यापासून बनला असून त्यात अणू हा लघुत्तम भाग आहे. प्रत्येक पदार्थाचे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय असे गुणधर्म असतात.
वैशेषिक हे तर पूर्णपणे पदार्थविज्ञान आहे. Again, इथेही typical देवांचा उल्लेख नाही

वरील चारही दर्शनांनी देव ही concept मान्य केलेली आहे. त्यांनी देवाचे आणि वेदांचे अस्तित्व मान्य केलेले आहे. वेदांतील ऋचांचा अभ्यास करून त्यावर अधिक संशोधन करून ही दर्शने सिद्ध झालेली आहेत. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे यातील योग आणि वैशेषिक दर्शनांची formal निर्मिती म्हणजे योगसूत्रे आणि वैशेषिक सूत्रे हे बुद्ध धर्माचा उदय झाल्यानंतर मांडले गेले आहेत. त्यामुळे हिंदू आणि बुद्ध धर्मात भांडणे होती वगैरे या गोष्टी केवळ बुद्धिभेद करण्यासाठी इंग्रजांनी मांडल्या असाव्यात.

मीमांसा किंवा पूर्वमीमांसा:
या दर्शंनांमध्ये वेदांमध्ये असलेले यज्ञविधी कसे करावेत, कोणत्या पूजा असाव्यात basically मीमांसा हे दर्शन कर्म-कांड आहे. तर वेदान्त किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन ज्ञान-कांड आहे. हे दर्शन जैमिनी या ऋषींनी लिहिले. मीमांसा मधील सूत्रे ई. पू. ३ र्‍या ते ई. पू. १ ल्या शतकापर्यन्त लिहिली गेली. पुढे त्याचा विस्तार कुमारिला भट्ट आणि प्रभाकर यांनी ई.स. ७ व्या शतकात केला. त्याहीपुढे अनेक ऋषींनी मीमांसेवर काम केले. हे सर्व काम सुद्धा बुद्ध धर्माच्या प्रभाव काळातीलच आहे.

वेदान्त किंवा उत्तरमीमांसा:
उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, अरण्यके आणि भगवद्गीता यापासून वेदान्त किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन बनले. उपनिषदांमध्ये जीवनाचे ध्येय, कार्य, साधन, साध्य यावर विविध गोष्टींमधून प्रकाश टाकला आहे. भगवद्गीता सुद्धा एक उपनिषदच आहे.
उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता यांना शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयी म्हटले आहे. आणि या प्रस्थानत्रयी वेदान्ताच्या basic foundation आहेत. केवळ वेद हे प्रमाण न मानता त्याशिवाय ज्या नवीन गोष्टी पुढील काळात मांडण्यात आल्या आहेत, जसे, सांख्य, योग आणि पुढील काळातील उपनिषदे आणि गीता या सर्व गोष्टींना एकत्र करून वेदान्त मांडला गेला.
वेदांताचे अनेक उप-प्रकार आहेत. ते खलील प्रमाणे
१.      अद्वैत वेदान्त गौडपाद
२.      विशिष्टाद्वैत रामानुजाचार्य
३.      द्वैत मध्वाचार्य
४.      द्वैताद्वैत निंबार्काचार्य
५.      अचिन्त्यभेदाभेद चैतन्य महाप्रभू
६.      भेदाभेद
यातील गौडपाद हे शंकराचार्यांचे गुरु होते.

चार्वाक:
चार्वाक दर्शन हे आधी लोकायत किंवा बृहस्पत्य म्हणून ओळखले जायचे. बृहस्पत्य सूत्रे हे ई. पू. ६०० वर्षांपूर्वी लिहिले गेले पण ते आता मूळ स्वरुपात उपलब्ध नाही. चार्वाक दर्शनाचे मूळ हे ऋग्वेदापर्यंत जाते. चार्वाक दर्शन असे मानते की जे प्रत्यक्ष दिसते, अनुभवता येते तेच सत्य आहे. जैन व बुद्ध वाङ्मयात लोकायतामधील सूत्रांचा वापर केलेला आहे. चार्वाकांच्या मते स्वर्ग, नर्क, पुनर्जन्म या निव्वळ कल्पना आहेत. त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. जे जग पृथ्वीवर आहे तेच सत्य आहे कारण ते शोध घेत राहिला तर त्यातील गुंतागुंत ही स्पष्ट होईल. पण कोणत्याच गोष्टी दैवावर ढकलू नयेत. चार्वाकांनी स्वर्ग, नर्क या संकल्पना खूप सोप्या करून सांगितल्या होत्या स्वर्ग म्हणजे असे ठिकाण जे मनुष्य स्वत: निवडतो आणि स्वतंत्रपणे जगतो, तर नर्क म्हणजे पारतंत्र्य. पण चार्वाकांना केवळ ऋणम् कृत्वा घृतम् पिबेतएवढेच मानून अत्यंत त्याज्य ठरविण्यात आले.

शंकराचार्यांनी जे काम केले आहे त्याचे ढोबळमानाने खलील भाग होतात
१.      लेखन:
शंकराचार्यांनी वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, धर्मसूत्रे, योगसूत्रे आणि गीतेवर भाष्य (विवरण) केले. त्याचे अर्थ त्यांनी नव्याने तर्काधारित संगितले.
२.      अद्वैत वेदान्ताला देशभरात मान्यता:
शंकराचार्य अद्वैत वेदान्त सांगत आणि कित्येक लोकांशी चर्चा वादविवाद करून सर्वांना पटवून देत देशभर फिरले. त्यांचा मंडणमिश्र यांच्याशी असलेला वादविवाद प्रसिद्ध आहे.
३.      चार धामांची उभारणी:
या धामांची उभारणी करताना वेदांचे महत्व देशभरात कायम राहील याची काळजी घेतली. सर्व देशाला एका विचारधारेत बांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशभरातील लोक हे एकमेकांशी जोडलेले राहू लागले.
४.      पंचक, वैष्णव आणि शैव यातील दुरावा कमी करणे:
देशभरात अनेक लोक विविध देवांचे भक्त होते. बौद्ध धर्माचा प्रभाव असूनही देव ही संकल्पना लोकांनी त्यागलेली नव्हती. पण एका देवाचे उपासक दुसर्‍याला कनिष्ठ मानीत. हे थांबवण्यासाठी पंचक ही संकल्पना पुढे आली. देवी, शंकर, विष्णू, सूर्य, गणेश यांना पूजणारे लोक विभक्त होते. पण शंकराचार्यांनी सर्व देवांना एका देवघरात आणले. उदा. जर मी देवीचा पूजक असेल तर मध्यभागी देवी आणि चार दिशांना अन्य देव अशी पंचकाची मांडणी केली.
५.      आश्रमाधारित समाजरचना:
बुद्ध धर्माच्या प्रभावामुळे आश्रम व्यवस्था मागे पडत होती. तिची पुनर्स्थापना करून गृहस्थाश्रमाचे महत्व अधोरेखित केले.

हे सगळे त्यांनी केवळ ३२ वर्षे (काही लोक ३९ वर्षे म्हणतात) एवढ्याच आयुष्यात केले. Great! Simply great!!!

शंकराचार्यांच्या काही गोष्टी मला पटत नाहीत. (मी खूप क्षूद्र मनुष्यप्राणी आहे, हे मला माहीत आहे)
१.      भगवद्गीता ही निवृत्तीपर आहे असे सांगणे:
कृष्णाने गीतेमध्ये अगदी स्पष्टपणे हे संगितले आहे की अर्जुना युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. त्यामुळे तू त्यापासून दूर जाऊ नको. ऊठ आणि युद्ध कर.म्हणजेच तू कर्मापसून निवृत्त होऊ नकोस, तर कर्म करत रहा. कर्मफलापासून निवृत्त हो. पण म्हणजे फळ घेऊ नको असे नाही, तर त्याच्या लोभात राहू नको. कर्म करण्याच्या आधीच फळाचा विचार करू नको. यात कुठेच निवृत्ती सांगितलेली नाही. शिवाय ज्ञान हे कर्माशिवाय पंगू आणि कर्म हे ज्ञानाशिवाय आंधळे आहेअसे संगितले आहे. आणि म्हणून ज्ञानवान होणे अत्यंत आवश्यक आहेच. पण ज्ञानवान झाल्यावर कार्य थांबवणे म्हणजे पांगळे होणे, असेही सांगितले आहे. असे असूनही शंकराचार्यांनी निवृत्ती* ही ज्ञानाची पहिली पायरी सांगितली...
हे मत २०व्या शतकात लोकमान्यांनी बदलले आणि गीतारहस्य लिहून गीता ही प्रवृत्तीपर आहे असे ठाम प्रतिपादन केले. पण मधल्या १० शतकात, आणि त्याही आधी बुद्धधर्माच्या प्रभावकाळात निवृत्ती शिवाय मुक्ती नाही असे असल्याने भारतावर इस्लामी आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी ७०० वर्षे राज्य केले. कारण लोक निवृत्तीला अधिक प्राधान्य देत होते.

२.      बुद्धाला देवत्व देऊन त्यांना अवलंबणे टाळणे
पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे बुद्धांनी हिंदू धर्म हा कृष्णाच्या एक पाऊल पुढे नेला होता. पण कालपरत्वे त्यात चुकीच्या गोष्टी शिरल्या. या गोष्टी दूर करून बुद्ध शिकवण योग्य रीतीने पुढे आणता आली असती. (कदाचित त्यावेळची सामाजिक, राजकीय गरज वेगळी असेल, पण माझे मत हे आहे.) त्याऐवजी बुद्धांना विष्णूचा अवतार ठरविले. एकदा एखाद्या माणसाला देव ठरविले की त्याच्याप्रमाणे किंवा त्याच्या शिकवणी प्रमाणे वागण्याची गरज उरत नाही. इथून पुढे बुद्धमार्ग मागे पडत गेला व भक्ती, निवृत्ती, कर्मकांड, पूजा-अर्चना, यज्ञ** यांना पुन्हा महत्व मिळत गेले.

३.      जगन्मिथ्या म्हणणे
जे धडधडीत समोर दिसते आहे त्याला मिथ्या म्हणून सांगितले. जेव्हा लोकांनी अनेक सभांमध्ये विरोधी मुद्दे मांडले त्यांना ज्ञान नाही असे सांगून हरवले. योग्य ज्ञान मिळाले तर हे पटेल असे सांगितले. जग हे परब्रहमावरचे आवरण आहे आणि ते खोटे आहे, त्यापलिकडे जाऊन तोच बघू शकतो जो ज्ञानवान आहे असे सांगितले. प्रभावी व्यक्तिमत्व, तारुण्य, वक्तृत्व या जोरावर अनेक logical गोष्टींना illogical ठरवून त्यांनी जगन्मिथ्याला भारतभर मान्यता मिळवून दिली. ती आजतागायत आहे.

न पटणार्‍या गोष्टी असूनही मला शंकराचार्यांनी केलेल्या कार्याचा आदर आहे आणि माझ्यामते हेच हिंदुधर्माचे वैशिष्ट्य आहे.

* विठ्ठलपंत कुलकर्णींनी मुलांची नावे निवृत्ती, ज्ञानदेव (ज्ञान मिळवणे), सोपान (मोक्ष मार्ग), मुक्ता (मुक्त होणे, मोक्ष प्राप्ती) अशी ठेवली आहेत.
** कृष्णाने सुद्धा यज्ञाने पाऊस पडत नाही तर पाऊस हा डोंगर आणि झाडे आहेत म्हणून पडतो हे सांगितले होते. त्यामुळे त्याने इंद्राला यज्ञ करून प्रसन्न करण्याची गरज नाही तर गोवर्धन पर्वताची पूजा करा असे सांगितले. अवृष्टी, अल्पवृष्टी वा अतिवृष्टी यापैकी केव्हाही पर्वतच मदत करेल असेही सांगितले. पण त्या गोष्टीला आपण चमत्कार करून टाकले आणि लहानग्या कृष्णाला अख्खा पर्वत उचलायला लावला. विज्ञानावर मात करण्यासाठी माणसाला देवत्व दिले.

पुन्हा एकदा सांगतो की या विषयाचा मी काही अभ्यासक नाही. पण जे काही आजवर वाचन केले आहे त्यावरून जे माझे निष्कर्ष आहेत ते सर्वांसमोर मांडावे वाटले. म्हणून थोडेथोडे वेळ मिळेल तसे लिहीत गेलो.

धन्यवाद!!!