Showing posts with label संस्कृती. Show all posts
Showing posts with label संस्कृती. Show all posts

Sunday, May 12, 2019

मातृदिन

बारा तेरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा युरोपात आलो. येथील काही स्थानिक लोकांशी मैत्री झाली आणि ऑफिसमध्येही स्थानिकांशी ओळखी झाल्या. मग एक एक करत भारतीय आणि युरोपियन सांस्कृतिक जवळीक दिसू लागली. भाषा ही एक गोष्ट तर आहेच पण त्याशिवाय सण आणि त्यातील साम्यस्थळे सहज दिसू लागली.

उदाहरण द्यायचे झाले तर इथे गुड फ्रायडे पेक्षा अधिक महत्व ईस्टर मंडेचे असते. हा वसंतातला पहिला सण. पक्षी अंडी देतात आणि पिले बाहेर पडतात तो काळ. त्यामुळे इथे एकमेकांना अंडी/चॉकलेटची अंडी देण्याची परंपरा आहे. ती अजूनही सुरू आहे. शाळेच्या सुट्ट्या या सणांशी आणि सण शेतीशी निगडीत आहेत, म्हणजे पेरण्यांच्या सुट्ट्या, सुगीच्या सुट्ट्या. आपलेही सण हे शेतीशी जोडलेले आहेत. ईस्टर मंडेच्या आगे मागे आपला नववर्षाचा काळ असतो.

इथे हॅलोविन साजरा होत नाही, नीट पितृपक्ष असतो आणि शेवटचा दिवस, १ नोव्हेंबर, all saint day सर्वपित्री (पितृ) अमावस्या... १५ ते ३१ ऑक्टोबरच्या पंधरवड्यात लोक आपल्या सुहृदांना घरी जेवायला बोलावतात. आपल्या पूर्वजांच्या थडग्याला भेट देतात. आपला पक्ष पंधरवडा आणि हे दिवस साधारण सोबत येतात. पण काही मोठ्या शहरात हॅलोविन साजरा होतो त्याला स्थानिक लोक संस्कृतीवर होणारे पाश्चिमात्य आक्रमण म्हणतात.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे कालचा मातृदिन. इथे १५ ऑगस्टला युरोपियन मातृदिनाची सुट्टी असते. इथला एक कलीग, क्रिस, त्याच्यासोबत गप्पा मारताना भारतात पण सुट्टी आणि इथे पण... मग त्याला स्वातंत्र्यदिन सांगितला. नंतर त्याला आपल्या भारतीय मातृदिनाबद्दल सांगितलं. खुश झाला गडी. युरोपियन आणि भारतीय साम्यस्थळे त्यालाही आवडतात. आपला मातृदिन सुद्धा याच दरम्यान, साधारण ऑगस्टमध्ये येतो - श्रावण अमावस्या!

कालचा मातृदिन साजरा करायला काहीच हरकत नाही. फक्त व्हॅलेंटाईन डे किंवा १ जानेवारीला विरोध आणि कालचा मातृदिन साजरा करायचा असं व्हायला नको. आपला मातृदिन सुद्धा साजरा झाला पाहिजे. आई लोकांनी पण फक्त मुलाला "सर्वातीत कोण?" न विचारता मुलीला पण विचारले पाहिजे.

इथे युरोपियन लोक त्यांचा मातृदिन उत्साहात साजरा करतात. आपण करतोय की विसरलो?

Tuesday, March 20, 2018

प्राचीन भारतीय ज्ञान

भारतात मारुती शेपटीने उडायचा, नारदाची वीणा म्हणजे रॉकेट होतं, गणपती हा क्लोन आणि प्लास्टिक सर्जरीने डोकं बसवलेला होता ही निव्वळ मिथकं आहेत. पण लोकांनी मिथकाला विज्ञान म्हणायला सुरुवात केल्याने सध्या गोंधळ झालाय आणि त्यामुळे अनेक लोक म्हणतात की भारतात विज्ञान नव्हतंच. भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, कालमापन, गणित हे उच्च स्तरावर होते, त्यातील काही नमुने खाली दिले आहेत.
1. वस्त्रोद्योग - हा भारत आणि चीन शिवाय अन्य कुठेच नव्हता. भारत सुती आणि चीन रेशमी कापड विकत असे.
2. धातुकला - कथिल मिळवणे ही अत्यंत अवघड कला आहे. 3℃ चा फरक पडला तर कथिलाच्या पाण्याची वाफ होते. त्यामुळे त्याचे ऊर्ध्वपातन अत्यंत कौशल्याने करावे लागते जे केवळ भारतात होते. लोखंडावर सुद्धा आपले प्रभुत्व होते. अशोकस्तंभासारखे स्तंभ आपल्याकडेच उभे राहिलेत. सुवर्णालांकर ही गोष्ट अन्य फारशी परिचयाची नव्हती आणि आपण त्यात कलाकुसर करायचो
3. प्रगत शेती - यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. ईच्छा असेल तर ऋषी कृषी हा मोहन देशपांडेंचा (ज्ञानेश नाही 😉) ग्रंथ वाच. शिवाय पराशर मुनींचे शेतीवरील काही ग्रंथ आजही उपलब्ध आहेत.
4. मानवी जीवनाच्या 'काम' या पुरुषार्थाकडे भारतीयांचा बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भ होता. कामसूत्र हा ग्रंथ आणि अनेक लेण्या व मंदिरे आजही त्याची साक्ष देतात.
5. मूर्तिकला - भारतात आजही 3000 वर्षांपूर्वीची मंदिरे/लेण्या आहेत.
6. स्थापत्यशास्त्र - दक्षिणेतील मंदिरे काही इंग्रजांनी येऊन बांधलेली नाहीत. 2 हजार वर्षे आणि त्याहून अधिक टिकू शकतील अशी मंदिरे इथेच बांधली गेलीत.
7. आयुर्वेद - औषधशास्त्रात भारत अत्यंत पारंगत होता आणि आहे. त्या काळी जे रोग होते त्यावर (क्षय सोडून) भारतात उपचार उपलब्ध होते. आजही जे surgical instruments वापरले जातात त्यांचे designs सुश्रुत संहितेतून घेतलेले आढळते.
8. खगोल - आकाशाचे 27 भागांत विभागणी आणि त्याद्वारे केलेले कालमापन, चंद्र व सूर्याची गती वेगळी असल्याने होत असलेल्या चंद्राच्या कलांचा वापर करून महिना मोजणी आणि दर 3 वर्षांनी अधिक मास टाकून त्यांची केलेली बरोबरी. नक्षत्रानुरूप वार्षिक नियोजन. 12 राशी व त्यावरून केलेले कालमापन. ग्रह तारे गोल असण्याचा सिद्धांत, अनेक ग्रह ताऱ्यांविषयी माहिती. उदाहरण म्हणून सांगतो, सप्तर्षींमध्ये वसिष्ठ-अरुंधती ही ताऱ्यांची जोडी आहे आणि दोघेही एकमेकांभेवती फिरतात. ही गोष्ट आज निरीक्षण करायला खूप सोपी आहे कारण आज दुर्बिणी उपलब्ध आहेत. पण आधी त्या नव्हत्या आणि तरीही भारताला हे माहीत होतं की हे दोन तारे एकमेकांभेवती फिरतात. म्हणून नवीन लग्न झालेल्याना त्याला नामस्कार करायला सांगायचे की तुम्ही बरोबरीचे आहात एक मोठा एक छोटा नाही म्हणून एकमेकांभेवती फिरा. एक स्थिर आणि दुसरा फिरतोय असं नको. आणि बरंच काही
9. गणित - दशमान पद्धती. ही जर नसती तर आजचे कोणतेच विज्ञान उभे राहू शकले नसते. गणितातील पायथागोरसचा सिद्धांत, पायचे मूल्य आणि त्याचा वापर करून काढलेले वर्तुळाचे क्षेत्रफळ, गुणाकार भागाकराच्या असंख्य पद्धती, फिबोनासी सिरीज सारख्या एकेक सिरीज आणि वैदिक गणितातील quick answer पद्धती या इथेच विकसित झाल्या.
10. संगीत - वेदकाळापासून राग, वेळ वा ऋतू नुसार असलेले राग हे आहेत. हे अन्यत्र कोणत्याही ठिकाणी नाही. गायनाशिवाय अनेक वाद्ये विकसित झाली.
11. नौका विज्ञान - भारतातील स्थानिक नौका विज्ञान प्रगत होते ते शिवाजी महाराजांनी सुद्धा कान्होजी आंग्रे यांच्या करवी वापरले होते.
अशा अनेक गोष्टी आहेत.
हे सर्व असताना पुढील वैज्ञानिक प्रगती का होऊ शकली नाही? याचे मानसशास्त्रीय आणि दोन कालखंडात उत्तर देता येईल. पहिला इस्लामी आक्रमणपूर्व आणि इस्लामी आक्रमणापश्चात. मानसशास्त्रीय यामुळे की समाज म्हणूनही एक मन असतं.
भारतात एक विशिष्ट स्तरापर्यंत ज्ञान विज्ञान वाढलं पण ते पुढे थांबलं. असं का घडलं असावं याबद्दल हे माझं मत. एक गोष्ट आधीच स्पष्ट करू इच्छितो की मी या विषयातील तज्ञ नाही. जे काही थोरांकडून ऐकले, वाचले, त्यावरून हे मांडले आहे.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. भारतात साधारण 8 महिने व्यवस्थित ऊन, 4 महिने पुरेसा पाऊस, उत्तम खनिज संपत्ती, शास्त्रीय शेती होती. या बळावर भारत सुजलाम सुफलाम होता. त्यामुळे मॉस्लोच्या सिद्धांतानुसार अन्न, वस्त्र, निवारा, विश्रांती आणि त्यानंतर सुरक्षा या प्राथमिक गरजा भारतात सर्वांना सहज उपलब्ध होत्या. संपत्ती निर्माण या जोरावर केव्हाच सुरू झाले होते. प्रेम आणि मैत्र असणं ही गरज त्यापुढची असते आणि ती पूर्ण करायला कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. त्यापुढे जाऊन आयुष्याची परिपूर्णता शोधणे हे सुरू होते आणि इथेच नवनवीन गोष्टी शास्त्रज्ञ (कोणतेही शास्त्र असो) शोधायला सुरुवात करतात आणि पुढच्या टप्प्यात तो शोध पूर्ण होतो. यात पुढे काय तर स्वरूप दर्शन, "तुझे तुज ध्यान कळो आले", याचा प्रवास.
हा सगळा प्रवास का होतो तर आधीच्या गरजा पूर्ण होत जातात आणि मानवी मन पुढील गोष्टी शोधत राहतं. तसंच समाजमन सुद्धा या प्रवासाला प्रोत्साहन देत राहतं आणि मदत करतं. आहे तिथे संपन्नता मिळाल्याने भारताने दुसऱ्यावर आक्रमण कधीच केले नाही. उलट अनेक निर्वासितांना भारताने आनंदाने आश्रय दिला. यामुळे संहारक शस्त्रे, वेगवान प्रवास याची गरज भासली नाही आणि त्याची निर्मितीही झाली नाही.
इस्लामी आक्रमणाआधी हा प्रवास इथवर झाला होता आणि शेवटच्या पातळीवर (काही लोक याला अध्यात्मिक पातळी म्हणतात, काही परिपूर्णता म्हणतात) होता. जे शोध लागले ते जशा गरजा होत्या तसेच लागले. त्यामुळे त्या काळासाठी ते परिपूर्ण होते. कदाचित अजून पुढे शोध लागले असते पण हा प्रवास पुन्हा प्राथमिक गरजेवर आला तो इस्लामी आक्रमणामुळे. ती गरज म्हणजे सुरक्षितता. आणि त्याच गरजेत तो अडकून बसला. पहिली काही वर्षे तर केवळ लूट झाली. ही लूट केवळ भौतिक संपत्तीची नव्हती तर ज्ञानाची होती. खरं तर ज्ञानाची लूट म्हणता येणार नाही, ज्ञानाचा अंत म्हणावे लागेल, कारण भारतातील विद्यापीठे जाळली गेली (https://en.m.wikipedia.org/wiki/Muhammad_bin_Bakhtiyar_Khilji?wprov=sfla1). सोबतच त्यातील ज्ञानी शिक्षकांना मारले गेले. इथे कळतं की भारतीय ज्ञान documented का नाही. कारण जे documentation होतं ते पूर्ण नष्ट केलं गेलं. Documented ज्ञान जाळले गेले तरी परंपरागत आणि गावठी शाळांच्या मार्फत अनेक जमातींनी हे ज्ञान जातं करून ठेवले. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी एकतर इस्लामी राज्य आले किंवा भारतीय राजे मंडलिक बनले. पण यामुळे सुरक्षितता आली असं झालं नाही.
याच दरम्यान युरोपात गरजही वाढत होती आणि शोधासाठी असलेले वातावरण सुद्धा होते. या बळावर तेथे नवीन विज्ञान सिद्ध झाले आणि मग युरोपने जग पादाक्रांत करायला सुरुवात केली.
इस्लामी आक्रमणापासून सुरू झालेली असुरक्षिततेची भावना आजही कायम आहे.
भारतीय ज्ञान परंपरेवर शेवटचा आणि निर्णायक घाव घातला तो इंग्रजांनी. इंग्रजांनी कशा पद्धतीने भारतीय ज्ञान आणि शिक्षण परंपरा मारली यावर गिरीशजी प्रभुणे यांच्याशी बऱ्याचदा बोलणे झाले. त्यावर त्यांची एक लेखमाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची "गुरुकुलम्" किल्लीही आहे. (कमेंट 3 पहा).
भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी नवीन शोधांच्या बाबतीत आपण मागेच आहोत. मागील 1000 वर्षांची असुरक्षितता आता नाही. तरीही मॉस्लोची पुढची पायरी, एक समज म्हणून आपण गाठू शकली नाही. याचे एक कारण आपण भारतीय मिथकांमध्ये विज्ञान शोधत बसलो. आणि दुसरे, जे मिथकाला मिथक मनात होते त्याचे brain washing असे झाले होते की सर्व ज्ञान हे युरोपातूनच जन्मले असे त्यांना वाटते. त्यामुळे नवीन शोधांच्या बाबतीत भारत जागतिक पटलावर नाही.
त्यामुळे सर्वांनी आपली ज्ञान महान परंपरा ध्यानी ठेऊन पुन्हा ती स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी संशोधन करावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पौराणिक कथांना विज्ञान मानले नाही तरच हे होऊ शकेल.

दि. ५ मे २०१७

मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो

लहानपणी मला अरे अरे ज्ञाना झालासी पागल... असं चिडवायचे. मग मुद्दाम हा अभंग लक्ष देऊन ऐकला - 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले'. स्वतः कोण आहोत हे कळले की माणूस पावन होतो. मग या आशयाच्या अभंग, गाणी यांच्याकडे लक्ष जाऊ लागले ते अगदी 'होता है आदमी को अपना ग्यान, कहेलाए वो शक्तिमान' सुद्धा याच अर्थाने ऐकलं.
मग पुढे बायकोमुळे मोस्लॉचा त्रिकोण कळाला. त्यातील self actualization आणि 'तुझे तुज ध्यान कळो आले' यातील समानता कळू लागली ती डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पुस्तकांमुळे.
त्यातच आधी वाचलेली काही पुस्तके परत वाचली गेली. त्यातील एक गोनीदांचे मृण्मयी. तिचा संघर्ष, कोकणात रमणं आणि शेवटी 'जे व्हायचे ते या झाडावेलींच्या साक्षीने होऊ दे' असं म्हणणं... हा सगळा तिचा 'स्व'च्या शोधाचा प्रवास वाटला. ध्रुव भट्टांच्या तत्त्वमसि, अकुपार मधील नायकांचाही शोध हा 'स्व'चा शोध होता. त्यांचा संघर्ष सुंदर होता, तितकाच त्या त्या व्यक्तीला आतून उन्मळून टाकून पुन्हा उभा करणारा होता.
संतांचाही असा प्रवास अनेक अभंगांमधून दिसतो. ज्ञानेश्वरांची 'दिन तैसी रजनी' ही विरहिणी ही कदाचित पहिली पायरी, मग 'कानडा ओ विठ्ठलू' मधील पाया पडू गेले, तर पाऊल दिसत नाही. सामोरा की पाठमोरा ते कळत नाही. क्षेम (आलिंगन) देऊ गेले तर मी ची मी एकली हा अनुभव. हे सगळं त्यांच्यासाठी किती त्रासाचं असेल. पण या सोबत त्यांना जी जाणीव झाली ती एकत्वाची, अद्वैताची. मग यातून 'ध्यान कळो आले'. अद्वैतात परमेश्वर आणि भक्त हे एकरूप झाले म्हणतात पण ज्ञानेश्वरांनी त्याही पुढे 'तुझा तूचि देव, तुझा तूचि भाव' हे सांगितलंय आणि देवाच्या एकत्वासोबत भावाचेही एकत्व सांगितले.
हा प्रवास सगळ्याच संतांच्या वाट्याला आला असणार. त्याचे अत्यंत भिडणारे शब्दरूप तुकोबांनी उभे केले आहे.
'चुकलिया माये बाळ हुरुहुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी'. किती अनिवार इच्छा प्रकट केलीये. पुढे वृक्षवल्लींच्या सानिध्यात 'अपुलाची वाद आपणासी' झाला असेल. स्वतः कसे आहोत हेही अगदी मोकळ्या मनाने स्वीकारले ते 'मन माझे चपळ, न राहे निश्चळ' या अभंगात. आणि अखेरीस 'आनंदाचे डोही आनंद तरंग'. पण या साखळीत कुठेतरी आपण हुकतोय असं वाटायचं. कारण स्व सापडतानाची जी वेदना असेल ती असलेला अभंग ऐकण्यात आला नव्हता (माझी कमतरता)
अशात एक चित्रपट पाहिला, वाय झेड. नाव ऐकून आधी बघितलाच नाही. नंतर सहज म्हणून पहिला आणि त्यात गजानन कुलकर्णी जो बदलत गेला ते भारी वाटलं. जेव्हा सगळं सोडून गजानन सुटतो तेव्हा backgroundला अभंग सुरू होतो
सावलीची आस ना, कोवळसे ऊन मी
सूर नाही संगती, एक तरीही धून मी
यात एक ओळ आली
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो
हे ऐकून ती साखळी पूर्ण झाली. स्वतःच स्वतःला व्यालो यापेक्षा कोणती वेदना मोठी असेल? आणि जन्मल्यावरच्या आनंदापेक्षा कोणता आनंद मोठा असेल? Just amazing!!!
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो


दि. २६ ऑगस्ट २०१७

मराठी/हिंदू/भारतीय कालगणनेची थोडी माहिती

१. महिन्यांची नावे - आपल्या महिन्यांची नावे नक्षत्रांवरून दिलेली आहेत. जेव्हा चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रात (किंवा जवळ) असतो त्या नक्षत्राच्या नावावरून महिन्याचे नाव असते.
उदा: चित्रा - चैत्र, विशाखा - वैशाख, ज्येष्ठा - ज्येष्ठ, मृग - मार्गशीर्ष
२. अधिक मास - आपले महिने हे चंद्रकलेवर अवलंबून असतात. सौर आणि चांद्र मासात साधारण ०.९ दिवसाचे अंतर एका महिन्यात पडते. त्यामुळे दर ३ वर्षांनी हे अंतर match करण्यासाठी अधिक मास असतो. अधिक मास केवळ पहिल्या सात महिन्यातच असतो, म्हणजे चैत्र ते अश्विन हे महिने अधिक मास म्हणून येतात त्यापुढील नाही.
हिजरी कालगणना (मो. पैगंबरांनी जेव्हा मक्केतून मदिनेत पलायन - हिजरात केलं त्या दिवसापासूनची कालगणना) ही सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. पण त्यात अधिक मास नसतो. म्हणून दर ३ वर्षांनी एकत्र येणारे हिंदू व मुस्लिम सण बदलतात. मात्र चिनी कालगणना चांद्र असूनही त्यात अधिक मासासारखी व्यवस्था असल्याने ग्रेगोरियन कालगणनेनुसार ते पुन्हा जुळते.
३. तिथी निश्चिती - आपले काही सण हे चंद्र उगवताना त्याची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात तर काही सूर्य उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात. जसे संकष्टी चतुर्थी ही चंद्र उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे सकाळी तृतीया आणि त्याच दिवशी संकष्टी असं बऱ्याचदा होतं. कोजागिरी पौर्णिमा ही रात्री चंद्राची कला कोणती आहे यावर अवलंबून असते तर ज्येष्ठ पुत्र/पुत्रीला ओवळण्याची अश्विन पौर्णिमा ही सकाळी कोणती चंद्रकला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे आपण दूध एका रात्री पितो तर ओवाळण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होतो.
४. तिथी क्षय - काही वेळा एका तिथी नंतर एक skip करून त्या पुढची तिथी येते. त्याला तिथी क्षय म्हणतात. सूर्य उगवताना चंद्राची कला जी असेल ती त्या दिवशीची तिथी असते. पृथ्वीची परिवलन गती आणि चंद्राची परिभ्रमण गती वेगवेगळी असल्याने हे होते.
उदा: द्वितीयेनंतर चतुर्थी आली. या वेळी द्वितीया ही अगदीच सूर्य उगवण्याच्या नंतर संपली, तृतीया सुरू होऊन ती दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याआधी संपली आणि सूर्योदयाला चतुर्थी लागलेली होती. या उदाहरणात तृतीयेचा क्षय झाला.
५. सौर सण - भारतीय सणांमध्ये एकमेव संक्रांत हा सण आहे जो सौर स्थितीवर अवलंबून असतो. संक्रांत ही १४ जानेवारीला येत नाही तर ती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा येते. शिवकाळात संक्रांत १२ जानेवारीला यायची. आता १४ किंवा १५ जानेवारीला येते. याचे कारण गेल्या ३०० वर्षात पृथ्वीच्या गतीत झालेला बदल हे आहे. लोकमान्यांच्या अभ्यासानुसार मकर संक्रांत महाभारत काळात नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये येत असे.
दैनंदिन व्यावहारिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

दि. १ जानेवारी २०१८

Monday, March 19, 2018

नीती आणि नियम

साधारण बोलताना नीतीनियम असा शब्द बऱ्याचदा वापरतात. केवळ नीतीने वागून गोष्टी पूर्ण होत नाहीत आणि केवळ नियमांना बांधूनही. म्हणून नीतीनियम ही जोडी आहे.
रामायणाच्या काळात नियम बनत असावेत आणि नीतिमत्ता निश्चित झाली होती. राम वागणुकीतून नीतीला नियमात बसवत होते. रावण हा नियमापासून दूर होताच नीतीशीही त्याचा संबंध नव्हता. तर राम म्हणजे नीती आणि नियम दोन्ही उत्तमपणाने पाळणारे होते.
महाभारताच्या काळात नियम घट्ट बनलेले होते. आपण दुर्योधनाने केलेली प्रत्येक कृती बघितली तर ती नियमांना धरून आहे. मग लक्षागृह ते द्यूत ते अंतिम लढाई. कुठेही त्याने नियम मोडला नाही. पण नीती, ती मात्र नियमांमध्ये हरवली. तर दुसऱ्या बाजूला कृष्ण. लहानपणी लोण्याची चोरी करण्यापासून ते द्रौपदीस्वयंवरात कर्णाला उतरू न देणे, जारासंधाचा भिमाकरवी वध, जयद्रथाला मारण्यासाठी सूर्यग्रहण, कर्णाला निःशस्त्र असताना मारावयास सांगणे, भीमाला गदायुद्धात दुर्योधनाच्या कमरेखाली वार करायला सांगणे अश्या अनेक गोष्टी ज्या नियमबाह्य होत्या त्या केल्या. पण या सर्वांत नीती सोडली नाही.
नियम हे नीतीला पूर्णत्व देण्यासाठी, सर्वसामान्यांना सहज नीतीवान होता यावे म्हणून असतात. त्यात नीती हरवली नाही पाहिजे.
जय श्रीराम, जय श्रीकृष्ण!!!

दि. १५ एप्रिल २०१६

कृष्ण, इंद्र आणि गोवर्धन

एक नुकताच टीनएज मध्ये आलेला मुलगा असतो. खोडकर, बंडखोर. गावात पावसापाण्यासाठी दर वर्षी पूजा घातली जात असते. त्याला काही हे पटत नसतं. तो असतो गावाच्या सरपंचाचा मुलगा. एका वर्षी तो पूजा घालू देत नाही. ना पूजा, ना बळी... नेमकं त्याच वर्षी दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात होते. लोक घाबरतात. सरपंचाला म्हणतात आपण पूजा केली नाही, म्हणून हे होतंय. दोन दिवसांत नदीला जोरात पूर येतो. आता मात्र सरपंचपण घाबरतात. पण मुलगा हट्टी असतो. तो म्हणतो, “पाऊस देव धाडत नाही, पूजेमुळे पण पडत नाही. डोंगर, झाडे, जंगले यामुळे पडतो.” वडील म्हणतात, “मग आता तो डोंगर वाचवेल का आपल्याला?” मुलगा चॅलेंज घेतो. व्रात्य असतोच त्यामुळे डोंगरवाटा, कपारी, गुहा यांची इत्यंभूत माहिती असते. तो सगळ्या गावकर्‍यांना, गायी-गुरांना घेऊन डोंगरातल्या मोठ्या गुहेत घेऊन जातो आणि पाऊस पूर कमी झाला की सगळे परत येतात. शेवटी गावकर्‍यांना मुलाचं विज्ञानवादी, तर्कशुद्ध म्हणणं पटतं.
पुढे या मुलाचा मित्र ऐन युद्धाच्या वेळी हातपाय गळतो. त्याला बरंच काही सांगून, शिकवून हा त्याला युद्ध करायला लावतो, मदत करतो. पण त्या सांगण्यात आणि आधीच्या टीनएज वाल्या मुलाच्या सांगण्यात विसंगती आहे.
अन्नापासूनि ही भूते पर्जन्यातुनि अन्न ते |
यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे || गीताई ३ – १४ ||
मग काही प्रश्न पडतात
१. आधीचा मुलगा आणि नंतरचा मोठा माणूस एकच की वेगवेगळे?
२. मोठं झाल्यावर लोकानुनयी सांगावं असं काही असतं का?
३. काहीही करून याला युद्धाला उभं करणं आवश्यक आहे. म्हणून त्याला जसं पटू शकेल तसं सांगायचं होतं का?
४. हे गीतेमध्ये नंतर कुणीतरी घातले का?
५. की आणखी काही...


दि. १७ जानेवारी २०१६