Showing posts with label राजकीय. Show all posts
Showing posts with label राजकीय. Show all posts

Wednesday, July 27, 2022

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

जाणाऱ्यांचा वाटा साऱ्या मोजताना दिसं सारा
रिती अशी मातोश्री उते
अदू कसा हसू हसू राऊताला कसे पिसू
खोल खोल मी आता रुते
तरी नाही अळिमिळी
तुझीमाझी निष्ठा काळी
कुंथताना दुखावून रडशील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कुणी नाही भवनातून सगळीकडे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा
अजून काही जातीलच आणि "पुन्हा येईन"च
तिकडून नाथा आणि देवा
वाझियाचे कोटी शत
थैल्यांचे लाखो थाट
रोज रोज आठवत राहतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

इथे वांद्र्याशी माझ्या वेड्या राऊताच्या पाशी
रोजरोज गप्पा झाडा
माझं माझं माझ्या माझ्या माझी माझी माझे माझे
सारा सारा माझा-माझा राडा
पडे माझ्या वाटेतून
आणि मग फुलांतून
जातानाही पायभर चिख्खल ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

आता फक्त बोलायाचे टोमणेच मारायाचे
धरूनिया माईकाचा दांडू
सामन्यात येऊ देत बाकी कॉपी करतात
राऊताच्या ष्टायलीत भांडू
जरा कोर्ट खुलू दे ना
धनुष्यही जाऊ दे ना
मग सेना बंद करून झोपूया ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

Saturday, January 4, 2020

हम देखेंगे या कवितेचा भावानुवाद

टीप - CAA चा विरोध करणारे आंदोलक खरे धर्मनिरपेक्ष असतील तर त्यांनी हा भावानुवाद वापरावा, कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. खुलं आव्हान ;-)

फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या हम देखेंगे या कवितेचा भावानुवाद. मूळ कविता शेवटी दिली आहे.

जनहो चला बघाया, निश्चित असे घडाया
विधिलिखित अजेय आहे, हृदयस्थ सत्य जाणूया

दिन तो समीप आहे, त्याचीच ही प्रतीक्षा
शासीत, वंचितांची, संपे आता तितिक्षा

भूमि ही कंप पावे, आमुच्या पदरवाने
पर्वत पहाड होती, येथेच दीनवाणे

विद्युल्लता पडे ही, सत्तेच्या शिरीमुकुटी
असत्य प्रतिकांची, होऊन जाय भुकटी

वंचित असू तरीही, सत्य हे असे सोबती
शासन जाई आता, जन गणाच्याच हाती

उध्वस्त सिंहासने, उध्वस्त होती मुकुटे
सगुण निर्गुणाचा ओंकार ध्वनी प्रकटे

असे अगोचर तरीही, अंतरी राहतो तोच
नट, नाटक नि प्रेक्षक, सारे असतोचि तोच

जन गणात असेल आता, नाद अहम् ब्रह्मास्मि
सामान्य असेल शासक, जो आहे तू अन मी

- ज्ञानेश

मूळ कविता -

हम देखेंगे / फ़ैज़ अहमद फ़ैज़
 फ़ैज़ अहमद फ़ैज़ »
हम देखेंगे
लाज़िम है कि हम भी देखेंगे
वो दिन कि जिसका वादा है
जो लोह-ए-अज़ल[1] में लिखा है
जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां [2]
रुई की तरह उड़ जाएँगे
हम महकूमों[3] के पाँव तले
ये धरती धड़-धड़ धड़केगी
और अहल-ए-हकम[4] के सर ऊपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी
जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से
सब बुत[5] उठवाए जाएँगे
हम अहल-ए-सफ़ा[6], मरदूद-ए-हरम[7]
मसनद पे बिठाए जाएँगे
सब ताज उछाले जाएँगे
सब तख़्त गिराए जाएँगे

बस नाम रहेगा अल्लाह[8] का
जो ग़ायब भी है हाज़िर भी
जो मंज़र[9] भी है नाज़िर[10] भी
उट्ठेगा अन-अल-हक़[11] का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा[12]
जो मैं भी हूँ और तुम भी हो

शब्दार्थ
 विधि के विधान
 घने पहाड़
 रियाया या शासित
 सताधीश
 सत्ताधारियों के प्रतीक पुतले
 साफ़ सुथरे लोग
 धर्मस्थल में प्रवेश से वंचित लोग
 ईश्वर
 दृश्य
 देखने वाला
 मैं ही सत्य हूँ या अहम् ब्रह्मास्मि
 आम जनता

Thursday, September 19, 2019

भाषा पंचायतन

सध्या हिंदी भाषेवरून बराच वाद सुरू झालाय. तो दर वर्षी सामान्यपणे हिंदी दिनाच्या निमित्ताने होतंच असतो. हिंदी दिवसाच्या निमित्ताने पी चिदंबरम सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषा / एक सामायिक भाषा करण्याबद्दल गृहमंत्री असताना बोलले होते. तेव्हा फार वाद झाला नव्हता. कारण बोलणे आणि करणे या बाबतीत चिदंबरमची पत नाहीये. पण अमित शहा यांची बोलणे आणि करणे यात पत खूपच जास्त आहे. विशेषतः ३७० रद्द केल्यापासून ती अधिक वाढली आहे. त्यामुळे लोकांना मातृभाषा प्रेम / हिंदी भाषिक अन्य भाषांकडे जे दुर्लक्ष करतात आणि शिकण्याबद्दल त्यांची अनास्था यावर बरंच बोलणं झालं. भारतासारख्या प्रचंड मोठ्या आणि अतिप्रचंड विविधता असलेल्या देशात एक भाषा लागू होणे अशक्य आहे. पण म्हणून सामायिक भाषा नसणे हेही त्रासदायकच नाही तर हानीकारकही आहे. कारण केरळ वगळता अन्य दक्षिणी राज्यांमध्ये सरसगट सर्वांना इंग्रजी येत नाही. त्यांना हिंदीही येत नाही. तेव्हा केवळ पर्यटनाला गेलेल्यांची नक्कीच पंचाईत होते. त्यामुळे सामायिक भाषा असावी हे नक्की.

सध्याचे भाजप सरकार अर्थातच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी नक्कीच अभ्यासल्या असतील. मी मागे एक पोस्ट टाकली होती, त्यात वाद संपवण्याच्या भारतीय आणि अरबी पद्धतीबद्दल लिहिले होते -
विविध आराध्य देवता (शिव, देवी, गणपती, विष्णू, सूर्य) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा अद्वैतवादी - मूर्तिपूजेची गरज नाही, असं मानणाऱ्या - शंकराचार्यांनी पंचायतन व्यवस्था तयार करून तो वाद संपवला...
विविध आराध्य देवता (अल लात, मनात, अल उज्जा...) असल्याने जेव्हा भांडणं व्हायला लागली तेव्हा एकेश्वरवादी मुहम्मद पैगंबर (स) यांनी त्या सर्व (३६०) मूर्त्या तोडून तो वाद संपवला...

आज भाषिक वाद सुरू आहे. तो अरबी पद्धतीने न मिटवता, आदी शंकराचार्यांच्या मार्गाने जाऊन भाषा पंचायतन सुरू करावे. (महाराष्ट्रात अनेक मुलं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत शिकतातच. इथे बेल्जियम मध्ये माध्यमिक पासून मुलांना डच, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन आणि स्पॅनिश या भाषा शिकता येऊ शकतात आणि मुलं किमान ४ भाषा शिकतात. त्यामुळे ४-५ भाषा शिकणं खूप अवघड नक्कीच नाही). पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागातील एक-एक भाषा आणि मातृभाषा अशी सांगड घालून भाषा पंचायतन सुरू करता येईल. या भाषा प्राथमिक पासून सुरू केल्या पाहिजेत असं अजिबात नाही. या चार भाषा कोणत्या निवडायच्या असा विषय लोकमत घेऊन, लोकसभा-राज्यसभेत मतदान घेऊन किंवा जिथे शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले तिथल्या भाषा घेऊन ठरवता येईल. म्हणजे जर शंकराचार्यांचे चार मठ यावरून भाषा ठरवायच्या असतील तर - बद्रीनाथ येथील हिंदी, द्वारकेतील गुजराती, रामेश्वरम येथील तामिळ आणि पुरी येथील उडिया या चार भाषा आणि आपण ज्या राज्यात राहतो तेथील राज्यभाषा. याशिवाय इंग्रजी आहेच. यातून हिंदी भाषिक अन्य भाषा शिकतील. त्यांची मुजोरी कमी होईल आणि भारत भारतीय भाषांनी एकत्र केला जाईल.

Tuesday, June 18, 2019

राजांच्या सभेला जाऊ या

झुकूझुकू झुकूझुकू आगीनगाडी
तोंडाच्या वाफा हवेत सोडी
पडती काँग्रेस पाहूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।धृ।।

राजांच्या सभा मोठ्या
'लाव रे व्हिडीओ'चा खाक्या
भाषण एन्जॉय करू या
राजांच्या सभेला जाऊ या ।।१।।

राजांचे इंजिन धुरकट
वास येतो जळकट
चिकन सूप पिऊया
राजांच्या सभेला जाऊ या ।।२।।

सभांना नुसतीच गर्दी
नाही मतांची वर्दी
कार्यकर्ते शोधूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।३।।

काका होता तालेवार
त्याचा नुसताच मिजास फार
बारामतीत नाचूया
राजांच्या सभेला जाऊ या ।।४।।

- ज्ञानेश

Sunday, March 17, 2019

नेहरू, चीन आणि सुरक्षा परिषद

सध्याच्या घडीला काँग्रेस आणि भाजपमध्ये नेहरू, चीन आणि सुरक्षा परिषद यावरून जुंपली आहे. भाजपवाले म्हणताहेत की नेहरूंनी सुरक्षा परिषदेतील स्थान नाकारले तर काँग्रेसवासी म्हणताहेत की, जर सुरक्षा परिषद १९४५ ला बनली आणि चीन तेव्हाच त्यात सामील झाला होता तर नेहरूंनी भारताची संधी गमावली असं म्हणता येत नाही. कारण भारत तेव्हा स्वतंत्र नव्हता आणि नेहरू प्रधानमंत्री नव्हते.

माझ्या मते, एकूणच हे प्रकरण सरळ साधे नाही.

भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व १९४५ नाही, तर १९५५ साली मिळण्याची शक्यता होती. २ ऑगस्ट १९५५ रोजी मुख्यमंत्रांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे खूप स्पष्टपणे लिहिलं होतं. नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑनलाइन वाचनालयात उपलब्ध आहे (ही माहिती दिल्याबद्दल ओंकार डंकेचे आभार) सुरक्षा परिषदेच्या बाबतीतला उल्लेख पान क्र २३७ वर आहे. (पात्रांची लिंक https://ia801606.us.archive.org/20/items/in.ernet.dli.2015.54646/2015.54646.Letters-To-Chief-Ministers-1947-1964-Vol-4_text.pdf. पानांचा क्रम जरा हललेला आहे, त्यामुळे ज्या पानावर २३७ हा क्रमांक आहे ते पान बघावे. त्याचा फोटो या पोस्ट सोबत जोडला आहे.)

त्या पत्रातील जशीच्या तशी वाक्ये -
Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Council, and that India should take her place in the Security Council. We cannot of course accept this as it means falling out with Chına and it would be very unfair for a great country like China not to be in the Securıty Council. We have, therefore, made it clear to those who suggested this that we cannot agree to this suggestion. We have even gone a little further and said that India is not anxious to enter the Security Counal at this stage, even though as a great country she ought to be there. The first step to be taken is for China to take her rightful place and then the question of India might be considered separately.

त्याचा साधारण अनुवाद -
अमेरिकेतर्फे अनौपचारिकरित्या हे सुचवण्यात आले की, चीनला संयुक्त राष्ट्राचे सदस्य कायम करू, परंतु सुरक्षा परिषदेत चीन असण्याची गरज नाही. त्याऐवजी भारताला सुरक्षा परिषदेत स्थान पाहिजे. मला वाटते की, चीनसारख्या महान देशाला सुरक्षा परिषदेत निश्चित स्थान असले पाहिजे म्हणून, हे आम्ही निश्चितपणे स्वीकारू शकत नाही. आम्ही त्यांना स्पष्ट केले आहे की आम्ही या कल्पनेशी सहमत होऊ शकत नाही. आम्ही अजून थोडं पुढे जाऊन असेही म्हटले आहे की, चीनला सुरक्षा परिषदेत असावं असं वाटत नसलं, तरीही त्या देशाला तेथे असलं पाहिजे. चीनने आपली योग्य जागा घेण्याची ही पहिली पायरी आहे आणि मग भारताच्या जागेचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ शकतो.

पण जेव्हा नेहरूंना या बाबतीत डॉ. जे. एन. पारेख यांनी संसदेत प्रश्न विचारला, तेव्हा ते २६ किंवा २७ सप्टेंबर १९५५ रोजी म्हणाले (The Hindu च्या बातमीचा फोटो सोबत आहे)

मूळ वाक्ये -
There has been no offer formal or informal, of this kind. Some vague references have appeared in the press about it which have no foundation infact. The composition of the Security Council is prescribed by the UN Charter, according to which certain specified nations have permanent seats. No change or addition can be made to this without an amendment of the Charter. There is, therefore, no question of a seat being offered and India declining it. Our declared policy is to support the admission of all nations qualified for UN membership.

अनुवाद -
अशा प्रकारचा कोणताही औपचारिक किंवा अनौपचारिक प्रस्ताव केला गेला नाही. त्याबद्दल काही अस्पष्ट संदर्भ प्रकाशित झाले आहेत ज्याचा कोणताही आधार नाही. सुरक्षा परिषदेची रचना संयुक्त राष्ट्राच्या घोषणपत्रात आधीच ठरविली आहे, त्यानुसार विशिष्ट राष्ट्रांच्या कायम जागा आहेत. घोषणपत्राच्या दुरुस्तीशिवाय त्यात कोणतेही बदल किंवा जोडणी केली जाऊ शकत नाही. म्हणून, सुरक्षा परिषदेत भारताला नवी जागा देऊ केली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे भारताने ती नाकारण्याचा प्रश्नच नाही. आमचे घोषित धोरण संयुक्त राष्ट्राच्या सदस्यतेसाठी पात्र असलेल्या सर्व राष्ट्रांच्या प्रवेशास समर्थन देणे आहे.

कालानुक्रमे शेवटचे नेहरूंनी जे सांगितलं ते म्हणजे असा कोणताही प्रस्ताव नव्हता. मग ते गृहीत धरावे लागेल. "माझ्या मतात काही विसंगती आढळल्यास कालानुक्रमे शेवटचे मत ग्राह्य धरावे" असं गांधीजी मताच्या बाबतीत म्हटले होते. नेहरूंनी ते घटनेबद्दल वापरलं. आता हे गृहीत धरू की असा कोणताही प्रस्ताव नव्हता. मग त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना असं का लिहिलं की प्रस्ताव होता. २ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर १९५५ मध्ये असं काय घडलं की अमेरिकेने दिलेला अनौपचारिक प्रस्ताव आधी भारताने नाकारला आणि मग प्रस्ताव असल्याचेच नाकारले. या सगळ्या घटना कुठेतरी अधिक गुढतेकडे नेणाऱ्या आहेत.

पण सर्व प्रकाशित दस्तऐवजावरून आपण असा तर्क काढू शकतो की सुरक्षा परिषदेत भारत यावा असा अनौपचारिक प्रस्ताव होता, पण काही कारणास्तव तो नेहरूंना नाकारावा लागला, किंवा त्यांनी नाकारला. नेहरूंच्या या "नकाराधिकारा"मागे काय कारणं होती, ते आता कधीच कळू शकणार नाही.

Tuesday, February 26, 2019

मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद

शस्त्रात ताकद नसते, ताकद असते ते शस्त्र धारण करणाऱ्या हातात. पण खरंतर हातातही ताकद नसते, ती असते कणखर मनात. जेव्हा मन कणखर नसते तेव्हा संत तुकारामांनी सांगितलेल्या रडक्या माणसाप्रमाणे हाल होतात.

ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी जुंझार कैसा झुंजो ।।
पोटी पडदाळे सिले टोप ओझे । हे तो झाले दुजे मरणमूळ ।।
बैसविले मला येथे अश्वावरी । धावू पळू तरी कैसे आता ।।
असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हाय हाय काय करू ।।
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ।।

माझे हात ढाल आणि तलवार यांना धरण्यात गुतंले आहेत, मी लढू कसा असा त्याला प्रश्न पडतो. पायाला पोटीस बांधलंय आणि डोक्यावर सिले टोप आहे, त्याचं मला ओझंच होतंय. मला घोड्यावर बसवलेलं असल्याने मला पळणेही शक्य नाहीये. असा विचार करणारा जे उपाय आहेत त्यालाच अपाय समजतोय आणि हाय हाय करत काहीही करू शकत नाही.

२६-११ ला जेव्हा मुंबईवर हल्ला झाला किंवा त्या दरम्यान जेवढे घातपाती हल्ले झाले तेव्हाही आपली सेना हीच होती, एवढीच सक्षम होती. म्हणजे ढाल-तलवार-पोटी-पडदाळे आणि घोडा होताच. म्हणजे शस्त्रे होती, विमाने होती. ती धरणारा हात म्हणजे प्रत्यक्ष सैनिक सुद्धा होते. ते आज जेवढे सक्षम आहेत तेवढेच सक्षम होते. पण "कडी निंदा" करण्यापलीकडे काहीच झालं नाही. कारण या शस्त्रामागे - हातामागे जे मन होतं ते कमकुवत होतं. उरी नंतरचा सर्जिकल स्ट्राईक असो की आज झालेला एअर स्ट्राईक यात सेनादलाचे श्रेय आहेच. ते असलंच पाहिजे. पण त्या बलदंड सेनेमागे जे कणखर मन आहे ते सध्याच्या सरकारचे आहे.

मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद ।
या ओळीचा अर्थ आज पुन्हा एकदा भारतीय वायुसेनेने आणि भारतीय सरकारने दाखवून दिला!!!

शतशः नमन _/\_

#SurgicalStrike2

Monday, July 9, 2018

मन्वंतर

सीता स्वयंवरात राम जेव्हा शिवधनुष्याला प्रत्यंचा लावायला गेले तेव्हा जुने झालेले शिवधनुष्य कडकडाट करत मोडले. जेव्हा परशुरामांना हे कळालं तेव्हा ते क्रुद्ध झाले. साहजिक आहे, जे धनुष्य परशुरामांना शिवशंकरांनी दिले, जे धनुष्य अनेक लढायांत वापरले गेले आणि ज्याद्वारे अनेक युद्धे जिंकली गेली ते धनुष्य मोडल्यावर परशुरामांना राग येणे स्वाभाविक होते.

मग रीतसर राम परशुरामांना भेटायला गेले. तिथे आता परशुराम रामांशी युद्ध करतील किंवा शाप देतील अशी शक्यता बऱ्याच जणांना वाटत होती. पण रामांना बघितल्यावर परशुरामांना आपला अवतार संपला हे लक्षात आले, नवा अवतार राम आहेत हेही लक्षात आले आणि त्यांनी शर आणि शाप यापैकी काहीही न वापरता रामांना आशीर्वाद दिले आणि ते पुढे मार्गस्थ झाले.

१९२७ मध्ये आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. त्या मनुस्मृतीच्या जोरावर अनेक वर्षे भारतात कारभार चालला. बऱ्याच अंशी चांगलाही चालला असेल, पण कुठेतरी त्यातून अन्यायही झाला. म्हणून आंबेडकरांनी ती जाळली. पुढे जेव्हा त्यांनी राज्यघटना लिहिली तेव्हा त्याच मनुस्मृतीतील योग्य गोष्टी राज्यघटनेत घेतल्या. जर मनू जिवंत असते तर त्यांनी आपली स्मृती आता जुनी झाली/मोडली हे मान्य केलं असतं आणि नवा मनू जन्मला हे बघून, आनंद व्यक्त करून, आशीर्वाद देऊन ते मार्गस्थ झाले असते. दुर्दैवाने मनू परशुरामांसारखे चिरंजीव नाहीत, म्हणून हे होऊ शकले नाही.

पण ज्यांना परशुराम आणि मनू, दोघेही आपले वाटतात त्यांनी परशुरामांची कथा समजावून घेऊन मनुस्मृती आता डोक्यातून पूर्ण काढून राज्यघटना आत्मसात करावी ही अपेक्षा!

Friday, June 8, 2018

सशक्त विरोधीपक्ष

अशक्त विरोधीपक्ष असेल तर सशक्त लोकशाही उभी राहू शकत नाही. "आग को पानी से डर बने रहेना चाहीये" हा नियम आहे. पण सध्यातरी तशी परिस्थिती पोटनिवडणूका सोडल्या तर दिसत नाही.

सध्या मोदींसमोर/भाजपासमोर कुणी एक सशक्त विरोधी नेता नाहीये. जे आहेत ते मोदींना कुठल्याही थराला जाऊन, प्रसंगी पाकिस्तानची मदत मागून हरवायला बघत आहेत. देशात राजकीय विरोधक असूच नये असा प्रयत्न काँग्रेसमुक्त भारत या घोषणेत आहे. पण विरोधक असूच नये असे झाले तर ते लोकशाहीला आणि पर्यायाने भारताला घातक असेल. मोहनजींनी यामुळेच काँग्रेसमुक्त भारत या घोषणेला विरोध प्रदर्शित केला होता. (https://m.timesofindia.com/city/pune/congress-mukt-bharat-merely-a-political-slogan-rss-chief/articleshow/63576543.cms)

विरोधक हवेत, सशक्त हवेत आणि राष्ट्रवादी हवेत. जर सध्याचे विरोधी नेते असे विरोधक बनू शकत नसतील तर एक जगातील सर्वात मोठी असलेली संघटना म्हणून संघालाच हे काम करावे लागेल.

मी मागच्या वर्षी लिहिलं होतं की
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तीन सर्वोच्च राजकीय पदांवर स्वयंसेवक विराजमान झाले आहेत. त्यामुळे सर्व संघ संबंधितांना आनंद होणे स्वाभाविक आहे. अर्थात संघाचे सत्ता हे साध्य कधी नव्हते आणि असणारही नाही. पण राजकीय उद्दिष्ट म्हणून विचार केला तरीही आणखी एक महत्वाच्या पदावरही स्वयंसेवक/सेविका असायला पाहिजे, ते पद म्हणजे विरोधी पक्ष नेता!

बहुदा संघाने आता हे काम हातात घेतले असं वाटतंय. प्रणवदांचं भाषण एका राष्ट्रवादी नेत्याचं भाषण होतं.
भाषणातील प्रमुख मुद्दे:
१. २५०० वर्षांची राजकीय उथलपुथल ५००० वर्षांच्या संस्कृतीला संपवू शकली नाही.
२. लोकशाहीची व्याख्या अमेरिकेच्या "ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल"च्या कित्येक शतके आधी चाणक्याने जगाला दिली.
३. जगाचा ज्ञानाशी संबंधही नव्हता तेव्हा आमच्याकडे ७ मोठी विद्यापीठं होती.
४. आम्ही इतरांसारखे आक्रमक वा हिंसक नाही आम्ही वसुधैव कुटुंबकम्, सर्वेपि सुखिन: सन्तु या विचारांचे आहोत. भारतात सहिष्णुता आणि वैविध्यतेचा सन्मान होतो.
५. या भारतमातेसाठी त्याग करणाऱ्या आणि या भारताला वैभवशाली बनवू इच्छिणाऱ्या सर्वांचे मिळून हे राष्ट्र आहे.
६.  बुद्धाचा प्रचार हिंदू प्रभावातूनच झाला आणि या देशाला मौर्य, गुप्त, अशोक अशा थोर घराण्याचा वारसा आहे.
७. या देशात आलेल्या विदेशी विचारवंतांनीही या देशाच्या संस्कृतीचे गोडवे गायले.
८. पाश्चात्यांची राष्ट्र संकल्पना एक भूभाग, एक धर्म, एक शत्रू यावर आधारित आहे आणि ती योग्य नाही, आपली सर्वसमावेशक संस्कृती खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राष्ट्र आहे. प्रत्येक देशाचा राष्ट्रवाद हा त्या देशाची खरी ओळख असते.

हे भाषण इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्याचं भाषण होतं, इंदिरा काँग्रेस किंवा इटालियन काँग्रेसच्या नेत्याचं नव्हतं. अशा नेत्यांना बळ देऊन सशक्त राष्ट्रवादी विरोधी पक्ष तयार होणे आवश्यक आहे.

जय हिंद!

Thursday, April 19, 2018

सिम्प्लव कुमारांचे पॉटरायण

युगाब्द १०११८ मधील एका प्रसिद्ध वर्तमानपत्रातील बातमी :-

आपल्यात एक प्रसिद्ध इतिहास संशोधक सिम्प्लव कुमार आहेत. (ते सिम्पल आहेत आणि कुमार आहेत म्हणून त्यांना सिम्प्लव कुमार असे नामाभिदान दिले आहे.) त्यांनी नुकताच पूर्वीच्या काळी, सुमारे ५००० वर्षांपूर्वी, ज्याला ग्रेट ब्रिटन म्हटले जात होते त्या भागाचा अभ्यास दौरा केला. त्यांना या भागात राहत असलेल्या जे. के. रोलिंग या प्रसिद्ध इतिहासकाराने लिहिलेले खंडप्राय पुस्तक एका उत्खननात सापडले होते. त्यातील जुन्या काळाच्या लिपीचा आणि भाषेचा अभ्यास केल्यावर त्यांना ग्रेट ब्रिटन येथे जाऊन पुढील संशोधन करावे वाटले.

या अभ्यासदौऱ्यात त्यांनी काढलेले काही निष्कर्ष पुढील प्रमाणे
१. पूर्वी दोन फलाटांच्या मध्ये अजून ३ फलाट असायचे. म्हणजे फलाट क्र ९ आणि १० यांच्या मध्ये ९ पूर्णांक १/४, ९ पूर्णांक १/२ आणि ९ पूर्णांक ३/४ असायचे. त्या फलाटांवर जाण्यासाठी भिंतीच्या मधून एक न दिसणारे दार असायचे.
२. त्या काळी माणूस प्राणी होऊ शकायचा आणि पुन्हा माणूस होऊ शकायचा. उदा. सिरीयस ब्लॅक हा कुत्रा होऊ शकायचा, पेटीग्र्यू हा उंदीर, प्रोफेसर मॅक्गोनागल ह्या मांजर आणि प्रोफेसर लुपिन हे केवळ पौर्णिमेच्या रात्री लांडगा व्हायचे.
३. तेव्हा प्रचंड मोठ्या वाड्यात किंवा लहान किल्ल्यात जादूगारांची शाळा असायची. त्यातील एक विद्यार्थी हॅरी हा सापांची भाषा बोलू शकत होता.
४. त्याकाळी काही माणसे ६०० वर्षांपर्यंत जगत असत. उदा. डंबलडोर.
५. हार्मायानी नावाच्या एका मुलीकडे एक लहान पिशवी होती ज्यात तंबूसुद्धा मावायचे.
६. मृत माणसाची हाडे, त्याच्याच वडिलांची काही हाडे, त्याच्या विश्वासू माणसाचा हात आणि वैऱ्याचे थोडे रक्त एकत्र करून एका भांड्यात उकळले तर मृत माणूस पुन्हा जिवंत होऊ शकत असे.

हे आणि असे बरेच निष्कर्ष सिम्प्लव कुमार यांनी काढले. त्यांचे हे संशोधन आपल्याला नक्कीच ५००० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे अधिक ज्ञान देईल ही आम्हाला खात्री आहे.

ता. क.:
१. आमच्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यावर टीका केलेली चालते. यावरून मला कोणी संघातून बाहेर काढणार नाही. आम्ही सहिष्णू आहोत.
२. केवळ या पोस्टवरून फुरोगाम्यांनी मी फुरोगामी आहे असा निष्कर्ष काढू नये.

Monday, April 16, 2018

I Am Not Ashamed To Be Hindu

#IAmNotAshamedToBeHindu

नेहरूप्राणित मानसिकता भारतीयांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटावी म्हणून सतत प्रयत्नशील असते. ते स्वतः म्हणायचे की ते अपघाताने हिंदू आहेत, किंवा मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. याच मानसिकतेचा नवीन अंक या लोकांनी आशिफाच्या नावाने सुरू केला आहे.

मला याची खात्री आहे की जर संजीरामला न्यायालयाने दोषी मानले आणि त्याला फाशी झाली तर कुणीही हिंदू संजीरामला फाशी होऊ नये म्हणून मध्यरात्री न्यायालय उघडायला लावणार नाही. तो मेल्यावर त्याच्या अंत्ययात्रेला हिंदूंची गर्दी होणार नाही. जशी याकूबच्या अंत्ययात्रेला झाली किंवा काश्मीरमध्ये मुस्लिम अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेला होते.

आजवर कोणत्याही न्यायालयाने दोषी मानलेल्या गुन्हेगाराला हिंदूंनी हिंदू म्हणून पाठीशी घातलेले नाही किंवा त्याचा उदो उदो केलेला नाही (अपवाद - नथुराम. गांधीहत्या ही राजकीय हत्या होती, तो दहशतवाद नव्हता. कारण त्या आधी वा नंतर गांधीवाद्यांवर कोणतेही हल्ले झाले नाहीत. शिवाय नथुरामचा उदो उदो बहुसंख्य हिंदूंना आवडत नाही)

हिंदू धर्माला परिवर्तनाची/विद्रोहाची मोठी परंपरा आहे. या सर्व विद्रोहींना संतत्व किंवा देवत्व या धर्मातील लोकांनी दिले आहे. हा धर्म एकमेव पोथीवर विश्वास ठेवणारा नाही. इतकी सामावून घेण्याची क्षमता असलेला, विविध पूजापद्धती (आस्तिक, नास्तिक, मूर्तिपूजक, सुर्यपूजक, निसर्गपूजक, गुरुपूजक आणि खूप) आणि परिवर्तनवादी धर्म अन्य कुठलाही नाही. त्यामुळे आधुनिक विचारांनुसार जे चांगलं ते धर्मात वाढवणारा, वाईट ते धर्मातून हद्दपार व्हावे यासाठी प्रयत्न करणारा आणि जे धर्मात आहे, त्याची उपयोगिता माहीत नाही पण अपायसुद्धा नाही अशा गोष्टी भाबडेपणाने टिकवून ठेवणारा धर्म हा हिंदू धर्म आहे. आपण राहतो त्या देशाच्या संवैधानिक चौकटीत, इतरांच्या पूजापद्धतीवर आक्षेप न घेता, स्वतःची पूजापद्धती इतरांना त्रास न होऊ देता जो पाळतो, तो हिंदू.

लाज वाटायची असेल तर आज भारतात दर तासाला ४ बलात्कार होतात याची वाटावी. ते लाज वाटणं सिलेक्टिव्ह असू नये. बलात्कार कुणावर झाला आणि कुणी केला - मुस्लिम मुलीवर आणि हिंदू माणसाने केला. (वा. छान केस मिळाली पुढे?) बलात्कार मंदिराच्या आवारात झाला. (अतिउत्तम आता हिंदूंना आपण हिंदू आहोत याची लाज वाटेल असं लिहू/बोलू)

हेच जर हिंदू मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर सगळी मेणबत्ती गँग गप्प. आणि मुलगा हिंदू असेल तर त्याची जात, पोटजात काढायची. थोडक्यात काय तर हिंदू असल्याची लाज वाटावी किंवा जाती पोटजातीत हिंदूंना वाटून टाकावं.

आशिफाच्या बलात्काऱ्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि ती जेवढी जास्त शक्य असेल तेवढी व्हावी. सत्य लवकरच बाहेर येईल. आणि ते लवकर यायचे असेल तर केस लवकरात लवकर CBI कडे दिली गेली पाहिजे. त्यात होणारी टाळाटाळ अगम्य आहे.

आशिफा केसच्या निमित्ताने काही लोक हिंदूंना बलात्कारी म्हणत खालील विधाने करत आहेत
१. गर्व से कहो हम रेपिस्ट है। (गर्व से काहो हम हिंदू है च्या चालीवर)
२. आम्हाला हिंदू असल्याची लाज वाटते. (यात सेलिब्रेटी आघाडीवर. उदा : सोनम कपूर)
३. मी हिंदू आहे, पण मला मुलगा नाही याचा मला आनंद आहे. (जसं काही सगळे हिंदू मुलगे बलात्कारी असतात)
४. तुम्ही म्हणता ते इतरांचं दिसत नाही का. दिसतं. पण आधी माझं घर मी बघणार. त्याची मला लाज वाटते. (घरातला एक कोपरा घाण आहे. तो स्वच्छ करण्यासाठी मी काहीच करणार नाही. पण मी माझ्या घराकडे लक्ष देणार म्हणजे त्या कोपऱ्याचे फोटो काढणार आणि माझं घर किती घाण आहे हे फेसबुकवर पोस्ट करणार. आणि म्हणणार मला माझ्या घराची लाज वाटते)
५. एक कार्टुनिस्ट राम आणि सीतेचं चित्र काढतो आणि त्यात सीता रामाला म्हणते, बरं झालं रावण तुमचा अनुयायी नव्हता. (म्हणजे रामाचे सगळे अनुयायी बलात्कारी?)

एका केसमधून सगळ्या हिंदू पुरुषांना बलात्कारी म्हणून सरसकटीकरण (generalization) करायचं. हे राजकीय दृष्ट्या यांना सोयीचं वाटतं. हे सगळं करण्याची काँग्रेस अँड कंपनीला गरज वाटते. यातून हिंदू मते फुटतील आणि मग आपण निवडणूका जिंकू असे त्यांना वाटत असेल. पण एक गोष्ट यांनी लक्षात ठेवावी. जेव्हा जेव्हा हिंदूंवर हिंदू म्हणून आरोप होतात तेव्हा जातीपातीत विखुरलेला हिंदू एकत्र येतो. गेल्या तीस वर्षातला हा इतिहास आहे. त्यामुळे या लोकांची "गढूळाचं पाणी का रं ढवळीलं, नागाच्या पिल्ल्याला का रं खवळीलं" अशी अवस्था होईल याची शतप्रतिशत खात्री आहे.

#गर्व_से_कहो_हम_हिंदू_है।

Tuesday, March 20, 2018

प्रतिवाद - व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो

लोकसत्तामध्ये एक पुस्तक (व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो) परिचय वाचला. त्यावरील माझे मत.
राष्ट्रवादाची मांडणी काय आहे, कशी असावी हे मुद्दे चर्चेचे असू शकतात पण राष्ट्रवादच नाकारणे के चुकीचे आहे. राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी काही प्रतीके लागतात आणि तेव्हाच देश एकत्र राहू शकतो. ही प्रतीके राष्ट्रगीत, ध्वज, महापुरुष अशी असतात, आणखीही असू शकतात.
भारत माता की जय अशा घोषणा देणाऱ्यांना नेहरूंनी विचारलं होतं की भारत माता म्हणजे काय, कोण? त्याचं उत्तर त्यांनीच दिलं की, भारत माता म्हणजे ही जमीन, झाडं, नद्या आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व भारतात राहणारे. हे सगळं मिळून भारत माता होते. म्हणजे नेहरूंनासुद्धा भारत एक देश ही संकल्पना मान्य होती. इथे सांगण्याचं कारण म्हणजे चौधरींना नेहरू आवडतात.
जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि सरदार पटेल सर्व संस्थानिकांना भेटत होते तेव्हा पहिल्याच सभेत त्यांनी सांगितले की 'भारतीयांपैकी काही जण (ब्रिटिश) प्रांतात तर काही जण संस्थानात राहतात. हा केवळ एक अपघात आहे. आपणा सर्वाची संस्कृती एकच आहे. आपण सर्व जण रक्ताने व हृदयाने एकसंध आहोत. ..तेव्हा आपणाला बंधुत्वाच्या व मित्रत्वाच्या नात्याने एकत्र बसून कायदे बनवायचे आहेत.. मातृभूमीवरील प्रेम व निष्ठेने प्रेरित होऊन आपल्याला एकत्र यावयाचे आहे.. आज आपण इतिहासाच्या निर्णायक ठिकाणी उभे आहोत.. एकत्र न येण्याच्या कारणाने पूर्वी आपण अनेकवेळा परकीयांचे गुलाम झालो होतो.. तेव्हा, बंधूंनो सहकार्य न करून.. ही सुवर्णसंधी वाया घालवून भावी पिढय़ांचा शाप घेऊ नका.' यात सरदारांनी भारतीय ही एक संस्कृती आपल्या सर्वांची आहे हे उद्धृत करून एकत्र येण्याबद्दल सांगितले. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.
ब्रिटिशांपूर्वी जर भारत एक नव्हता तर पानिपतावर लाखो मराठ्यांनी आत्मबालिदान का केलं? महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला अब्दालीला कित्येक वर्षे लागली असती किंवा तो आलाही नसता. मग तरुण भावी पेशवा आणि पेशव्यांचा भाऊ तिथे जाऊन का लढले? कारण अब्दाली परकीय होता. दिल्लीचे तख्त जरी मुस्लिम असले तरी ते भारतीय होते. आणि ते वाचवणे मराठ्यांना कर्तव्य वाटले.
त्याआधी अकबराला संपूर्ण भारतावर एकछत्री अमल असावा असं का वाटलं? संपूर्ण भारत म्हणजे काय? तेव्हा तर ब्रिटिश कुठेच नव्हते. मग त्याला केवळ भूभाग त्याला ताब्यात घ्यायचा होते का? नाही, अकबराला संपूर्ण भारत जी आधीपासूनची संकल्पना होती ती एका अमलाखाली आणायची होती.
त्याही आधी चाणक्याने अलेक्झांडरला पराभूत करण्यासाठी सीमेवरील राज्यांची मोट बांधली आणि चाणक्य त्यात यशस्वी झाले. ही मोट का बांधली गेली? आणि सीमेवरील म्हणजे काय? तर भारतीय सीमेवरील. पण इंग्रजांच्या आधी तर भारत नव्हता ना... मग हे कसे झाले. चाणक्याने नंतर मगध हस्तगत करून चंद्रगुप्ताला राजा बनवले आणि अधिक समर्थ साम्राज्य निर्माण केले.
त्याही आधी, वेदात
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति
भारत एक राष्ट्र आहे याचा उच्चार आहे.
अर्थात हे कितीही तर्कशुद्ध पटवण्याचा प्रयत्न केला तरीही विचारवंत केवळ आणि केवळ डावे असतात असं समाजणार्यांना ते कळणार नाही. पण ज्यांना कळेल त्यांनी ते समजून घ्यावं म्हणून हे लेखन.


दि. ४ मार्च २०१७

जो जे वांछील तो ते 'न' लाभो

महाभारताच्या शांतीपर्वात खलील श्लोक आला आहे.
न राज्यं न च राजासीत न दण्डो न च दाण्डिकः।
स्वयमेव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम ॥
म्हणजे एका खऱ्या प्रजाराज्याचं हे एक स्वप्न आहे. राजा नाही, राज्य नाही, दंड नाही आणि त्यामुळे दंडव्यवस्थासुद्धा नाही. राज्य आणि दंडव्यवस्था नाही, म्हणून राजकारणीही नाहीत! पण हे केव्हा होऊ शकते? जेव्हा स्वतः प्रजा ही परस्परांचे रक्षण करेल तेव्हा... आज जेव्हा आपण राजकारण आणि राजकारणी नको, किंवा राजकारण हा चिखल आहे वगैरे तेव्हा प्रजा काही परस्परांचे आणि परस्पर हिताचे रक्षण करण्यासाठी सज्ज झालेली नसताना म्हणतो. जर राजकारणी या देशातून जगातून नष्ट झाले तर प्रजाहितरक्षण कोण करेल? हे नक्की मान्य की राजकारण अत्यंत गढूळ आहे, पण आजवर त्याद्वारेच अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. त्यामुळे जर राजकारण आणि राजकारणी यांना समाजजीवनातून हद्दपार करायचे असेल तर त्याआधी परस्परांचे रक्षण करणारी प्रजा तयार झाली पाहिजे. तोवर राजकारणी हद्दपार होऊ नयेत.
म्हणूनच समर्थांनी हरिकथेनंतर (धर्मानंतर) राजकारणाला महत्व दिले आहे.
पहिले ते हरिकथा निरूपण |
दुसरे ते राजकारण |
तिसरे सावधपण । सर्वांविषयी ।
म्हणजे 'आझादी'वाल्यांना सुद्धा हेच तर पाहिजे? नाही...
इथे 'गॉड तुस्सी ग्रेट हो' या चित्रपटाचा एक फोटो आहे आणि दुसरा फोटो आहे ज्ञानेश्वरांचा. काय संबंध या दोघांचा??? आहे!

'गॉड तुस्सी ग्रेट हो' मध्ये सलमान देवाच्या भूमिकेत जातो आणि मग एकामागे एक लोकांच्या मागण्या त्याच्याकडे येऊ लागतात. हा काही वेळातच परेशान होतो आणि म्हणतो, ज्याला जे हवे असेल ते मिळू दे. त्यानंतर गोंधळ सुरू होतो. लूटमार, कैदी तुरुंगातून सुटणे आणि बरेच काही... शेवटी तो देवाला म्हणतो बाबारे तू ग्रेट आहेस. आता हे तूच निस्तर.
पसायदानात ज्ञानेश्वरांनी पण ज्याला जे हवे ते मिळो असंच म्हटलंय ना, जो जे वांछील तो ते लाहो... म्हणजे जे सलमानने मागितले तेच... पण
ज्ञानेश्वरांनी अनेक *अटी व शर्ती लागू या प्रमाणे हे मागणे केले आहे
पहिली अट
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
दुष्टांचा दुष्टपणा नष्ट झाला पाहिजे आणि सत्कर्मात त्यांची गोडी वाढली पाहिजे
दुसरी अट
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
सर्व प्राणिमात्रांचे, केवळ मानवांचे नाही, एकमेकांशी मैत्र झाले पाहिजे
तिसरी अट
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
वाईटाची अंधारकाजळी नष्ट होऊन, स्वधर्म सूर्य अखिल विश्वात जागृत झाला पाहिजे. इथे धर्म म्हणजे religion नाही तर धर्म म्हणजे विहित कर्त्यव्य. ते प्रत्येकाने पूर्ण केले पाहिजे.
हे सर्व झालं तरच
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
'आझादी'वाल्यांचे मागणे हे 'गॉड तुस्सी...'च्या मालिकेतील आहे. अविचारी आणि अविवेकी. पण ही चूक 'आझादी'वालेच करतात असं नाही तर आपणापैकी बरेच असे असतात जे संपूर्ण राजकारणच नाकारतात, त्याद्वारे ते राज्यव्यवस्था नाकारत आहेत याचे कदाचित त्यांना भान नसते. यातून ज्ञानेश्वरांचे 'जो जे वांछील...' साध्य होणार नसून 'गॉड तुस्सी...' मधील अराजक येईल हे समजून घेतले पाहिजे.
'रक्षन्ति स्म परस्परम्' चा नेमका अर्थ आणि कृती ही ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे. ते देखील अधिक व्यापक करून. तेव्हा जोवर या अटी व शर्ती लागू होत नाहीत तोवर जो जे वांछील तो ते 'न' लाभो!
दि. ४ एप्रिल २०१७

अब तक छप्पन (मंदिरांना भेटी)

शिवजी: मेरा पूरा लाईफ ही चेंज हो गया रे.. 
राहुलजी: लाईफ चेंज होता है तो होने दो। मैंने हमेशा ऐसाहीच किया। लाईफ के साथ कभी इंटरफियर नहीं।
शिवजी: दूसरों के लाईफ के साथ इंटरफियर करता है वो चलता है? 
राहुलजी: क्या करें? अपना कामही ऐसा है। लेकिन मैंने अपने लाईफ के साथ कभी दखलअंदाजी नहीं किया। जो हुआ, होने दिया। कसम से... अभी आप ही सोचो, जो आदमी कुछ भी नहीं था, ज्यादा पढ़ा नहीं, आज उसके पास... ये....
शिवजी: क्या, ये क्या?
राहुलजी: स्ट्रेंथ
शिवजी: इसको स्ट्रेंथ नहीं, न्यूसन्स व्हॅल्यू बोलते है।
राहुलजी: बोले तो?
शिवजी: देख, स्ट्रेंथ का मतलब है, ताकत। मैंने कभी पॉलिटिक्स किया नहीं। हिमालय से लेकर रामेश्वरम् तक भारतीय मुझे पूजते है। लेकिन तू ने और तेरी पार्टी ने हमेशा मुझे इग्नोअर किया। जिन्होने मेरी मूर्तीयो को मंदिरो को तोडा उनसे तुम्हारी पार्टी के कई लोगों को हमदर्दी है। शायद तुझे भी होगी। फिर भी तू मेरा नाम लेता है। मेरे मंदिर मे आकर मेरी पूजा करता है। खुद को जनेऊ धारी हिंदू कहेलाता है। तेरे पार्टीवाले भी आपस में मेरी बजाते है लेकिन सबके सामने मेरे आगे झुकते है। इसको बोलते है स्ट्रेंथ। तू गुजरात मे हिंदू बोल के मेरी पूजा करता है और उसी दौरान कर्नाटक मे मेरे नाम से लिंगायत/वीरशैव का प्रयोग कर के हिंदुओ मे अलगाव फैलाता है। अब तू ने मेरी पूजा शुरू की। अब तेरे दिमाग में चल रहा है की इसका फायदा कैसे उठाऊँ? इसको ऐसे इस्तेमाल करूँ की वैसे इस्तेमाल करूँ... भाजपा को गुजरात मे छोटा झटका दिया। अब आगे इसको कैसे वापरू मैं? कहा हिंदू बना के पेश करू, कहा अलग धर्म की मग करके वोटो को बटेरू? ये सब जो सोच रहा है ना, उसको बोलते है न्यूसन्स व्हॅल्यू। क्या हँस रहा है, मै तो कब से यही हू। इतिहास जानता है की तेरे परनाना ने मेरा मंदिर बनाने को सरदार पटेल को विरोध किया था। वो तो सोमनाथ मे राजेंद्र बाबू आने से भी परेशान थे। फिर भी मंदिर बना और तू यहा आया मुझे प्रणाम करने.....स्ट्रेंथ।
(मूळ संवाद - संदीप श्रीवास्तव. चित्रपट - अब तक छप्पन. मूळ विडंबन (गांधीजी/मोदीजी) Utpal VB. हलकेच घेणे ही विनंती. राहुल गांधींचा मानभंग हा हेतू नाही. तरी मानभंग वाटल्यास क्षमस्व.)

दि. ३० जानेवारी २०१८

अलिप्त आणि निर्लिप्त

दोन दिवसांपूर्वी लिहिताना सहजच दोन शब्द लिहिले गेले. एक नेहरूंच्या परराष्ट्रनीतीसाठी होता - अलिप्ततावादी आणि दुसरा मोदींच्या परराष्ट्रनीतीसाठी होता निर्लिप्ततावादी. गेले दोन दिवस डोक्यात एक धागा या दोन शब्दांभोवती फिरतोय. त्यात जो काही विचार मनात आला तो शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतोय.
आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की नेहरूंनी त्यांच्या परराष्ट्रनीतीबद्दल शद्ब इंग्रजी वापरला होता - non aligned. त्याचं भाषांतर करताना कदाचित वेगळा शब्द योजता आला असता.
अलिप्तता/निर्लिप्तता यावर पुन्हा परत येतोय. यासाठी सर्वात आधी एक उदाहरण देतो. अर्थात महाभारतातील. बलरामाला युद्ध व्हावे असं वाटत नव्हतं. केवळ राज्यासाठी होणारं प्रचंड मोठं युद्ध त्याला नकोसं वाटत होतं. त्यामुळे बलराम युद्धाआधी वनवासात गेला आणि युद्धाच्या शेवटच्या दिवशी परतला. कृष्णालाही युद्ध व्हावं असं वाटत नव्हतं. पण त्याने शिष्टाई केली. जेव्हा युद्ध थांबवण्याचे सगळे प्रयत्न अपुरे पडणार याची खात्री झाली तेव्हा जो पक्ष खरा वाटला, त्याच्या बाजूने युद्धात नि:शस्त्र गेला. पांडवांना नैतिक मदत आणि मार्गदर्शन दिले.
माझ्या मते या उदाहरणात बलराम अलिप्त राहिला तर कृष्ण निर्लिप्त!
तुकारामांच्या एका अभंगात ते म्हणतात,
अणूरेणूया थोडका। तुका आकाशाएवढा।
गिळुनि सांडिले कळीवर। भवभ्रमाचा आकार।।
सांडिली त्रिपुटी। दीप उजळला घटी।
तुका म्हणे आता। उरलो उपकारापुरता।।
यात तुकाराम ज्ञानप्राप्तीनंतर संन्यास सांगत नाहीत, तर कोणत्याही अपेक्षेशिवाय उपकार करायचे सांगतात. म्हणजेच निर्लिप्तपणे काम करायचे सांगतात. अलिप्तपणे कर्मसंन्यास घेण्याचे सांगत नाहीत. भगवद्गीतेची हीच शिकवण लोकमान्यांनी गीतारहस्यात सांगितली आहे.
कदाचित अलिप्त व निर्लिप्त या शब्दांच्या अर्थामध्ये कुणाला फरक आहे असे वाटणार नाही. पण मला जो वाटला तो मी सांगितला.
निर्लिप्तता काय असते हे सांगणारी सुरेश भटांची कविता देऊन थांबतो.
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
सांगती ’तातपर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

दि. १३ फेब्रुवारी २०१८