Saturday, January 4, 2020

हम देखेंगे या कवितेचा भावानुवाद

टीप - CAA चा विरोध करणारे आंदोलक खरे धर्मनिरपेक्ष असतील तर त्यांनी हा भावानुवाद वापरावा, कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. खुलं आव्हान ;-)

फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या हम देखेंगे या कवितेचा भावानुवाद. मूळ कविता शेवटी दिली आहे.

जनहो चला बघाया, निश्चित असे घडाया
विधिलिखित अजेय आहे, हृदयस्थ सत्य जाणूया

दिन तो समीप आहे, त्याचीच ही प्रतीक्षा
शासीत, वंचितांची, संपे आता तितिक्षा

भूमि ही कंप पावे, आमुच्या पदरवाने
पर्वत पहाड होती, येथेच दीनवाणे

विद्युल्लता पडे ही, सत्तेच्या शिरीमुकुटी
असत्य प्रतिकांची, होऊन जाय भुकटी

वंचित असू तरीही, सत्य हे असे सोबती
शासन जाई आता, जन गणाच्याच हाती

उध्वस्त सिंहासने, उध्वस्त होती मुकुटे
सगुण निर्गुणाचा ओंकार ध्वनी प्रकटे

असे अगोचर तरीही, अंतरी राहतो तोच
नट, नाटक नि प्रेक्षक, सारे असतोचि तोच

जन गणात असेल आता, नाद अहम् ब्रह्मास्मि
सामान्य असेल शासक, जो आहे तू अन मी

- ज्ञानेश

मूळ कविता -

हम देखेंगे / फ़ैज़ अहमद फ़ैज़
 फ़ैज़ अहमद फ़ैज़ »
हम देखेंगे
लाज़िम है कि हम भी देखेंगे
वो दिन कि जिसका वादा है
जो लोह-ए-अज़ल[1] में लिखा है
जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां [2]
रुई की तरह उड़ जाएँगे
हम महकूमों[3] के पाँव तले
ये धरती धड़-धड़ धड़केगी
और अहल-ए-हकम[4] के सर ऊपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी
जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से
सब बुत[5] उठवाए जाएँगे
हम अहल-ए-सफ़ा[6], मरदूद-ए-हरम[7]
मसनद पे बिठाए जाएँगे
सब ताज उछाले जाएँगे
सब तख़्त गिराए जाएँगे

बस नाम रहेगा अल्लाह[8] का
जो ग़ायब भी है हाज़िर भी
जो मंज़र[9] भी है नाज़िर[10] भी
उट्ठेगा अन-अल-हक़[11] का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा[12]
जो मैं भी हूँ और तुम भी हो

शब्दार्थ
 विधि के विधान
 घने पहाड़
 रियाया या शासित
 सताधीश
 सत्ताधारियों के प्रतीक पुतले
 साफ़ सुथरे लोग
 धर्मस्थल में प्रवेश से वंचित लोग
 ईश्वर
 दृश्य
 देखने वाला
 मैं ही सत्य हूँ या अहम् ब्रह्मास्मि
 आम जनता

Friday, December 20, 2019

संघाचं हिंदुत्व (माझ्या आकलनानुसार)

संघाच्या हिंदुत्वात कुणी त्याज्य नाहीये. त्यात व्यापकता आहे, सर्वसमावेशकता आहे. संघाची विचारसरणी अनेक पद्यांमधून सहज व्यक्त होत असते. त्यामुळे यावर लिहिण्याचा विचार करताना आपोआप एक पद्य मनात उमटलं.

विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू हैं।
संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों मे हिंदु हैं।।धृ।।

राम कृष्ण गौतम की धरती, महावीर का ज्ञान यहां
वाणी खंडन मंडन करती, शंकर चारों धाम यहां
जितने दर्शन राहें उतनी, चिंतन का चैतन्य भरा
पंथ खालसा गुरू पुत्रों की बलिदानी यह पुण्य धरा
अक्षय वट अगणित शखाऐं, जड में जीवन हिंदु हैं ।।१।।

कोटी हृदय हैं भाव एक हैं, इसी भूमि पर जन्म लिए
मातृभूमि यह कर्मभूमि यह, पुण्यभूमि हित मरे जिये
हारे - जीते संघर्षों में, साथ लढे बलिदान हुए
कालचक्र की मजबूरी में रिश्ते नाते बिखर गये
एक बडा परिवार हमारा, पुरखे सब के हिंदु हैं ।।२।।

सबकी रक्षा धर्म करेगा, उसकी रक्षा आज करें
वर्ण - भेद मत - भेद मिटा कर नव रचना निर्माण करें
धर्म हमारा जग में अभिनव, अक्षय है अविनाशी हैं
इसी कडी से जुडे हुए, युग युग से भारतवासी हैं
थाय अथाह जहां की महिमा, गहरा जैसे सिंधु हैं ।।३।।

हरिजन गिरिजनवासी बन के, नगर ग्राम सब साध चलें
उंच नीच का भाव घटा कर, समता के सद्‌भाव बढें
ऊपर दिखते भेद भले हों, जैसे वनमें में फूल खिले
रंग बिरंगी मुस्कानों से, जीवन रस पर एक मिले
संजीवनी रस अमृत पीकर, मृत्युंजय हम हिंदु है ।।४।।

यात कुठेही भारतीय भूमीत जन्मलेल्या उपसनापद्धतीबद्दल अनादर, आक्षेप नाही तर जेवढी दर्शने आहेत तेवढे रस्ते आहेत हा भारतीयत्वाचा आत्मा अधोरेखित केलाय. या वटवृक्षाच्या कित्येक फांद्या आहेत, पण मूळ जीवनरस हिंदू (म्हणजेच भारतीय) आहे हे अधोरेखित केलंय. या भारतभूमीला मातृभू, पुण्यभू मानणारे सगळेच आपले आहेत. संघर्षाच्या काळात हार जित झाली आणि नाते तुटले (धर्मांतरे झाली) तरीही सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्यामुळे आपण सर्व भारतीय एक परिवार आहोत हीच संघाची धारणा आहे. मतभेद आणि वर्णभेद मिटवून नवरचना निर्माण करताना जुन्या गैर गोष्टी अर्थातच टाकाव्या लागणार याची सार्थ कल्पना संघाला आहे. शेवटच्या कडव्यात पुन्हा एकदा विविध जाती, पंथ, निवास यामुळे भिन्न असलेल्या हिंदूंमध्ये कोणताही भेद असू नये हे सांगितलंय. त्याचं वर्णन करताना वनात जसे अनेक फुलं असतात तसेच हेही, परंतु पुन्हा या विविध रंगात जीवनरस एकच आहे हे सांगितलंय. संघाचं हिंदुत्व हे असं सर्वसमावेशक आहे.

याच आशयाची संघाची अनेक पद्ये आहेत. ज्या सर्वांत कायम सामाजिक समरसतेबद्दल सांगितले आहे. कुठेच कुणी भारतीय आपला शत्रू आहे आणि त्याला मारले पाहिजे हे संघ शिकवत नाही.
१ - हिन्दु जगे तो विश्व जगेगा
२ - जनसेवा ही ईश्वरभक्ति
३ - हिन्दु हिन्दु एक रहे
४ - हिंदू सारा एक मंत्र हा

आता प्रश्न येतो अभारतीय उपासना पद्धतीचं काय? त्याचं उत्तर भारतीय पद्धतीनेच देता येईल. ज्याला जी उपासनापद्धत योग्य वाटते त्याने ती अनुसरावी. पण ते करताना इस्लाम वा ख्रिश्चन धर्मात जसं सांगितलं जातं की "हाच एकमेव मार्ग आहे" हे असू नये. "हाही एक मार्ग आहे" या तत्वानुसार भारतात तर चार्वाकासारखे शतप्रतिशत नास्तिक सुद्धा आहेत आणि त्यांची गणना हिंदू दर्शनातच होते. त्यामुळे केवळ अभारतीय उपासना पद्धत आहे म्हणून इस्लाम किंवा ख्रिश्चनांचा संघ विरोध करत नाही. विरोध सुरू होतो फसवणुकीतून किंवा जबरदस्तीने धर्मांतर आणि "हाच एकमेव मार्ग" या मानसिकतेमुळे. तेहतीस कोटी देवांमध्ये अल्ला आणि येशू सामावून घेणं भारतीयांना कठीण नाही. "केवळ तेच" हा मुद्दा मात्र नक्कीच विरोधाचा आहे.

हिंदू धर्म हा एक पुस्तक, एक प्रेषित, एक मार्ग असा बनलेला नाही. अनेक मार्ग, अनेक विद्वान, अनेक पुस्तकं या मंथनातून बनलेला आहे. शिवाय आज सहा आस्तिक आणि तीन नास्तिक दर्शने समजून घेऊन, त्यापैकी एकानुसार आचरण कुणी करत नाही. कारण याच्या पुढे पुराणं आली, रामायण महाभारतासारखी महाकाव्ये आली, नवीन देवता आल्या. शीख पंथ उदयास आला आणि तेही सर्व इथे गुण्यागोविंदाने नांदू लागले. अजूनही नवे पंथ, संप्रदाय तयार होऊ शकतात - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज अशी उदाहरणे आहेतच. या सर्वांना सामावून घेणारं हिंदुत्व, संघाचं हिंदुत्व आहे.

आज बरेच पुरोगामी विद्वान असं म्हणतात की इतकी विविधता असलेल्या प्रदेशांचा देश होऊ शकतो, पण हे एक राष्ट्र आधी कधीच अस्तित्वात नव्हते. त्यांना असं वाटतं कारण या राष्ट्राचा आत्मा - हिंदुत्व - त्यांना मान्यच नसतं. जेव्हा सरदार पटेलांनी सर्व संस्थानांना भारतात सामावून घेतलं तेव्हा त्यांनी "एक संस्कृती" यावरच भर दिला होता. केवळ त्या आवाहनावर पाचशेच्या वर संस्थाने भारतात विलीन झाली. भारतात राज्ये अनेक होती पण त्यातील संस्कृती एक होती आणि आहे. अन्यथा दाक्षिणात्य माणसाचे नाव शिवरामकृष्ण का असतं? एका केरळी माणसाने भारताच्या चार भागात मठ का स्थापन केले? मूर्तिपूजक, निसर्गपूजक, विविध दैवतांना मानणारे, वेद नाकारणारे आणि देव/मोक्ष या सगळ्याच संकल्पना नाकारणारे भारतात सुखेनैव राहत होते आणि राहताहेत, त्याचं कारण हिंदुत्वच आहे. या विविधतेत जी एकता आहे ते हिंदुत्व आहे. किंवा मी असं म्हणेन की संघ याच एकतेला हिंदुत्व मानतो. यावर अधिक वाचायचं असेल तर संघाचं एकात्मता स्तोत्र बघावं.

संघ कधीही पुन्हा सतीप्रथा सुरू करा म्हणणार नाही, धर्मातील योग्य सुधारणांना संघाचा कायमच सक्रीय पाठिंबा राहिला आहे (उदा - देवदासी प्रथेविरुद्ध संघाचं/संघ स्वयंसेवकांचं काम बघावं). शबरीमला सारख्या गोष्टी या "धर्म सुधारणा"पेक्षा "पुरातन वारसा" या अशयातून बघव्यात असं संघाचं मत आहे. पण जर बहुसंख्य महिलांनी शबरीमला येथे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली तर संघ त्याला विरोध करणार नाही.

जशी पूर्वी अनेक विद्वानांकडून अनेक पुस्तके, नीती नियम लिहिले गेले आणि भारतात ते सामाजिक धार्मिक नियम म्हणून पळाले गेले, तसेच स्वतंत्र भारतात अनेक विद्वानांच्या विचारमंथनातून नवीन पुस्तक उदयाला आलं - संविधान. त्यामुळे संविधान (बहुमताने नित्य नूतन होणारं) जे सांगतं ते सामाजिक नीती-नियम हा आजचा धर्म आहे. उपसनापद्धती वेगळी असू शकते आणि ती वैयक्तिक/घरापुरती मर्यादित असावी. संविधानापुढे कोणताही धर्मग्रंथ अधिक प्रधान्याचा असणार नाही. हिंदूंमध्येच "वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्" हे गीत प्रसिद्ध होऊ शकलं आहे. हेच हिंदुत्व आहे. ज्यात काळाबरोबर बदलण्याची क्षमता आहे.

संघाचं हिंदुत्व हे
- सर्वसमावेशक, सर्वव्यापी
- सुधारणेला कायम वाव असलेलं
- नित्य नूतन (काळाबरोबर, काळानुसार नवीन बाबी मान्य करणारं)
- भारतीय वारसा जपणारं
- आक्रमकांशी झुंज देणारं
- राष्ट्रप्रथम मानणारं
असं आहे!

१.
हिन्दु जगे तो विश्व जगेगा मानव का विश्वास जगेगा
भेद भावना तमस हटेगा समरसता अमृत बरसेगा
हिन्दु जगेगा विश्व जगेगा ।।धृ।।

हिन्दु सदा से विश्व बन्धु है जड चेतन अपना माना है
मानव पशु तरु गीरी सरीता में एक ब्रम्ह को पहचाना है
जो चाहे जिस पथ से आये साधक केन्द्र बिंदु पहुचेगा ॥१॥

इसी सत्य को विविध पक्ष से वेदों में हमने गाया था
निकट बिठा कर इसी तत्व को उपनिषदो में समझाया था
मन्दिर मठ गुरुद्वारे जाकर यही ज्ञान सत्संग मिलेगा ॥२॥

हिन्दु धर्म वह सिंधु अटल है जिसमें सब धारा मिलती है
धर्म अर्थ ओर काम मोक्ष की किरणे लहर लहर खिलती है
इसी पूर्ण में पूर्ण जगत का जीवन मधु संपूर्ण फलेगा ॥३॥

इस पावन हिन्दुत्व सुधा की रक्षा प्राणों से करनी है
जग को आर्यशील की शिक्षा निज जीवन से सिखलानी है
द्वेष त्वेष भय सभी हटाने पाञ्चजन्य फिर से गूंजेगा ॥४॥

२.
जनसेवा ही ईश्वरभक्ति बोध यातला उमजुया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥

कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जातीपतींच्या
अनेक जाती पंथ-गटानी धरिल्या वाटा भेदांच्या
भेद भेदुनि भिंती पाडुनि समरसता ती आणूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥१॥

ग्रामवासी वा नगरनिवासी असोत कोणी वनवासी
एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी
कालगतीच्या चक्रावरती पर्व नवे ते कोरूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥२॥

कुणी न राहो दुबळा येथे मनी असा निर्धार जागवु
कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवु
उत्कर्षाची पहाट आणुन प्रकाश किरणे होऊया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥३॥

३.
हिन्दु हिन्दु एक रहे भेद भाव को नही सहे
संघर्षो से दुखी जगत को मानवता की शिक्षा दे ॥धृ॥

एक ब्रह्म कुछ और नही हरिहर दुर्गा मात वही
देव देविया रूप उसीका देश काल अनुसार सही
सब पन्थों का मान करे सब ग्रंथो से ग्यान गहे
सद्गुरूओं की सीख समझकर जीवन को जीना सीखे ॥१॥

जो भाई भटके बिछडे हाथ पकड ले साथ चले
भोजन कपडा घर की सुविधा शिक्षा सबको सुलभ रहे
उंच-नीच लवलेश न हो छुवा-छूत अवशेष न हो
एक लहू सब की नस-नस मे अपनेपन की रीत गहे ॥२॥

धर्म प्रेम अमृत पीये गीता गंगा गौ पूजे
वेद विहीत जीवन रचना हो राम कृष्ण शिव भक्ति करे
धर्म सनातन अनुगामी बुद्धम्-शरणम्-गच्छामि
अर्हंतोंको नमन करे नित वाहे गुरु अकाल कहे ॥३॥

४.
हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवू या
धरती-नभ-पातळहि भारु प्राण पणाला लावूया ॥धृ॥

उच्चनीचता तण जाळावे धगधगत्या कर्तृत्वाने
समाज रसरसता अर्वाचिन पुनः निर्मुया यत्नाने
खचलेला अभिमान जागवू पिचली हृदये सांधूया ॥१॥

कोणी नाही शत्रू आपूला प्रेमाने अवकाश भरु
चारित्र्याच्या आधारावर हिंदूराष्ट्र हे नव उभवू
समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमवूया ॥२॥

सामाजिक सन्मान निवारा समान सर्वा लाभावा
अन्न-वस्त्र-संस्कार लाभही सहजपणे सर्वा लाभावा
हीच एकता, समता, ममता, पथ ऐक्याचा चालूया ॥३॥

निज सत्वाची जाणिव नसता राष्ट्रजीवनी अर्थ नसे
परंपरा, इतिहास, पराक्रम आठव नुसाता व्यर्थ असे
कोटी मनांना सवे घेऊनी वैभव सारे मिळवू या ॥४॥

समाजभक्ति हीच प्रेरणा राष्ट्रभक्ति हे रुप तिचे
देशद्रोही निष्प्रभ होतील, दर्शन घडता शक्तिचे
विचार येतील अमरत्वाचे सर्व जगाला देऊया ॥५॥

आज कसोटी पुरुषार्थाची, व्यक्तित्वाच्या समर्पणाची
माय भूमीच्या पायी वाहू ओंजळ निज कर्तृत्वाची
अग्निपरिक्षा कोणी घेता सुवर्ण तेजे तळपुया ॥६॥

Tuesday, December 10, 2019

भीती कायद्याची की पोलिसांची

शीर्षटीप - बलात्काऱ्यांना कायद्यात असलेली सर्वात मोठी शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. शक्य असेल तर कायद्यात बदल करून गुन्हेगाराला लिंग कापून, चौरंगा करावं असं माझं मत आहे.

हैदराबाद येथील घटनेने मन सुन्न झालं होतं. अशा घटना घडल्या की त्रास होतोच. या केसमध्ये आरोपी लवकर पकडले गेले आणि ते पोलिसांवर हल्ला करून पळून जात असताना पोलिसांना नाईलाजाने त्यांना मारावं लागलं.

घटना घडल्यानंतर आणि आज एन्काऊंटर ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या आपण सगळे एक समाज म्हणून किती खालच्या इयत्तेत आहोत हे अधोरेखित करतात. सुरुवात आजच्या एन्काऊंटरवरून करूया.

मुद्दा १:
कायदा भारतात नाहीच अशा पद्धतीने कित्येक लोक (ह्यात अनेक मोठे नेते, कलाकार, खेळाडू - एकूण जनमानसावर प्रभाव टाकणारे सुद्धा आहेत) व्यक्त होत आहेत. वास्तविक अशा माणसांमुळे आधीच व्यवस्थेवर कमी विश्वास असलेल्या आपल्या समाजाला व्यवस्थेपासून आपण दूर नेत आहोत हे यांच्या लक्षात येत नाहीये. सरकार, GOD FATHER, अब तक छप्पन सारखी समांतर व्यवस्था आपल्याला उभी करायची नसून मूळ व्यवस्थेला सक्षम करायचे आहे. व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी नक्षलवादी आहेच. जर असा न्याय आपण स्वीकारत असू तर नक्षलवादही स्वीकारू. आपली निवड सक्षम व्यवस्था असली पाहिजे, सक्षम अधिकारी आपोआप तयार होतील. पण जर व्यवस्थेपेक्षा अधिकारी मोठे ठरत असतील तर व्यवस्था कधीच सक्षम होणार नाही.

या एन्काऊंटरच्या अनेक शक्यता असू शकतात.
१. खरंच आरोपी हल्ला करून पळणार होते, त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला.
२. मृतदेह जाळल्यामुळे न्यायवैद्यक चाचणीत बलात्काराचा पुरावा मिळणार नाही. त्यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचलले असू शकते.
३. आरोपींमधील बहुदा दोन आरोपी स्वतःला "बाल" म्हणवून घेत असावेत. दिल्लीतील आरोपीप्रमाणे हेही सुटतील असं वाटल्याने पोलिसांनी त्यांना मारलं असावं.
४. कुणीतरी वेगळीच माणसे या केस मध्ये गुंतलेली असावीत. (एका ऐकीव माहितीनुसार पीडित स्वतः पशुवैद्य असल्याने अवैध कत्तलखान्याविरोधात होती. त्यामुळे तिची सुपारी दिलेली असू शकते) अशी नावं बाहेर येतील आणि ते पोलिसांना आणि प्रशासनाला परवडणारे नसेल. यांना मारलं तर सगळी केसच बंद करता येईल.
यापैकी यापुढे केवळ पहिली शक्यता गृहीत धरण्यात येईल आणि फाईल बंद होईल...


 आपल्याला या एन्काऊंटरचा आनंद का होतो -
दिल्लीतील केसमध्ये येत्या काही दिवसात फाशीचा दिवस ठरेल पण तिथे शिक्षा द्यायला जल्लाद उपलब्ध नाही. कठुआ केस अजूनही तपासातच आहे. उन्नाव केस मध्ये आरोपींनी पीडितेसह तिचे कुटुंबच मारून टाकले आहे. कोपर्डी केसमध्ये शिक्षा जाहीर झाली पण अजून त्यापुढील कोणतीच कारवाई नाहीये. केरळमधील ननची तर केस पुढेच गेलेली नाही. तो बिशप सुखेनैव धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतोय. या फक्त माहित असलेल्या केसेस आहेत. माहित नसलेल्या हजारो केसेस असतील आणि न नोंदलेल्या तर त्याच्या कित्येक पट...! न्याय देण्यात आणि त्याची अंमलबजावणी होण्यात कित्येक वर्षं निघून जातात. यामुळे अशी एखादी घटना घडली कि त्याचा आनंद होतो.
पण हे लक्षात येत नाही की यातून आपली आधीच कमकुवत असलेली व्यवस्था अधिक कमकुवत होत जाते. गुन्हेगाराला न्यायव्यवस्थेची भीती वाटली पाहिजे, पोलिसांची नाही.





मुद्दा २:
आपण एक समाज म्हणून खरंच चांगले आहोत का? कारण हैदराबाद पीडितेवर केवळ याच चार नराधमांनी बलात्कार केला नाही. त्यांच्याशिवाय अजून ८० लाख लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. ८० लाख लोकांनी तिचं नाव पॉर्न साईटवर शोधलं. हे सगळे आपल्याच समाजातील लोक आहेत. अजून किती अधःपतन व्हायचं आहे. जर एन्काऊंटर करणे हाच न्याय असेल तर या ८० लाखांनासुद्धा मारले पाहिजे. एखादीवर बलात्कार होतोय आणि तो पाहावा वाटतो ही कसली विकृती आहे. हे लोक संधी मिळत नाही म्हणून प्रत्यक्ष कृती करत नाहीयेत. यांनाही जर संधी मिळाली तर ते नक्कीच बलात्कार करतील.
मुळात बलात्कार हा रोग (disease) नाहीये, ते लक्षण (symptom) आहे. रोग वेगळाच आहे. अजूनही रोग काय आहे ते कळालं नाहीये. काही लोक जेव्हा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना त्यापासून रोखलं जातं. या गुन्हेगारांना भेटून ही मानसिकता आली कुठून हा शोध घेतला गेला पाहिजे. पण प्रशासन भेटच होऊ देत नाहीत असे अनुभव आहेत.

मुद्दा ३:
सरसकटीकरण आणि धार्मिक/जातीय विभाजन - कठुआ केसच्या वेळी अनेकांनी सरसकट हिंदूंना, देवालयांना आणि देवतांना पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्याबद्दल लिहिताना मी लिहिलं होतं ( http://dnyanamhane.blogspot.com/…/i-am-not-ashamed-to-be-hi… )

- लाज वाटायची असेल तर आज भारतात दर तासाला ४ बलात्कार होतात याची वाटावी. ते लाज वाटणं सिलेक्टिव्ह असू नये. बलात्कार कुणावर झाला आणि कुणी केला - मुस्लिम मुलीवर आणि हिंदू माणसाने केला. (वा. छान केस मिळाली पुढे?) बलात्कार मंदिराच्या आवारात झाला. (अतिउत्तम आता हिंदूंना आपण हिंदू आहोत याची लाज वाटेल असं लिहू/बोलू)
हेच जर हिंदू मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर सगळी मेणबत्ती गँग गप्प. आणि मुलगा हिंदू असेल तर त्याची जात, पोटजात काढायची. थोडक्यात काय तर हिंदू असल्याची लाज वाटावी किंवा जाती पोटजातीत हिंदूंना वाटून टाकावं.

हे टिपिकल फुर्रोगामी लोकांबद्दल होतं. ते असतात सिलेक्टिव्ह. पण त्यांना सिलेक्टिव्ह म्हणणारे स्वतःच किती सिलेक्टिव्ह होताहेत हे गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं आणि त्याचं वाईट वाटलंय.

Quint सारख्या नाठाळ मीडियावीर त्या पाशाची गरिबी दाखवतात आणि मग विरोधी सूर अधिक भेसूरपणे असा न्याय मागतो.

दिल्ली केस मध्ये मोहम्मद अफरोज "नाबालिक" असल्याने ३ वर्षात सुटला त्याबद्दल हिरीरीने लिहिलं जातं. पण उर्वरित ३ गुन्हेगार अजूनही जिवंत आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं जात नाही. उन्नाव केसमध्ये कुणी फार बोलत नाही. आत्ताही चार पैकी दोन आरोपी हिंदू आणि दोन मुस्लिम होते. त्यातील फक्त मोहम्मद पाशा बद्दल बोललं जात होतं. पण जे "नाबालिक" म्हणून सुटण्याची शक्यता होती, त्यातील एक हिंदू होता. त्याचं नावही कोणत्या "पोष्टी"त दिसलं नाही. शिवाय "त्यांच्यात" हे "जायज" असतं अशाही पोस्ट्स दिसल्या / whatsapp वर फिरल्या. हा दुतोंडीपणा फुर्रोगाम्यांचा आहे, तो आता या स्वघोषित हिंदुत्ववाद्यांमध्येही येत आहे ही वाईट बाब आहे.

आज संविधानकर्त्या डॉ आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ आंबेडकर म्हणाले होते की एखाद्या देशाचे संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे व्यक्ती असक्षम असतील तर लोकशाही अपयशी ठरते. पोलिसांनी खरंच नाईलाज म्हणून गोळीबार केला असेल तरी दुर्दैवाने आज ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून समाज म्हणून आपण अपयशी होत आहोत हेच अधोरेखित होत आहे.

आपल्या देशाच्या व्यवस्था सक्षम होणं आणि त्यावर सर्व समाजाचा विश्वास असणं हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल.

Friday, November 22, 2019

अस्पर्शित निसर्ग

क्वेरीन नावाची माझी बेल्जियम मध्ये सहकारी आहे. नेदरलँड्सची नागरिक. ती भारतात, विशेषतः दक्षिण भारतात कामानिमित्त काही वेळा जाऊन आलेली आहे. शिवाय भारतीय कंपनीत काम करते म्हटल्यावर तिने भारताची बऱ्यापैकी माहिती मिळवलेली आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिच्याशी गप्पा चालल्या होत्या. त्यात ती म्हणाली की, "दक्षिणेत प्रचंड मोठी मंदिरं आहेत, भारतात इथल्या ब्रुसेल्स किंवा आम्सटरडॅम सारखी मोठी शहरं आहेत आणि शिवाय हत्ती, वाघ, सिंह सुद्धा आहेत. या बहुविधतेचं मला खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं."

खरंच या भागात कोणतेच वन्यजीव अस्तित्वात नाहीत. मुळात वनेच अस्तित्वात नाहीत. नेदरलँड्स, बेल्जियम आणि कदाचित अजून अनेक देश असे असतील जिथे नैसर्गिक वनराई शिल्लकच नसेल आणि अर्थातच वन्यजीव सुद्धा.

इथे जवळच मोठं प्राणी संग्रहालय आहे. त्यात हत्ती, वाघ, सिंह, गेंडे, जिराफ... खूप प्राणी आहेत. त्यांची प्रचंड काळजी घेण्यात येते. एखाद्या हत्तीणीला बाळ झालं की टीव्हीवर कौतुकाच्या बातम्या येतात. पण हे सगळं होतं मानवाच्या देखरेखीत, नियंत्रणात!

आमची टीना नावाची वयस्क मैत्रीण आहे. तिलाही भारताबद्दल कोण कौतुक. तिच्याशी एकदा अशाच गप्पा चालू होत्या. जवळच एक खूप मोठं उद्यान आहे - व्रैब्रूक पार्क. छान रांगेत लावलेली झाडं, मध्ये तयार केलेलं तळं, लहान मोठी खेळण्यासाठीची मैदानं, पळायला मातीचा उत्तम रस्ता, फक्त गुलाबाचं उद्यान आणि भरपूर गर्दीवाली झाडं. असं सगळं काही त्या उद्यानात आहे. मला तिथे फिरायला, सायकल चालवायला आवडतं. मी त्याचं कौतुक करत होतो. त्यावर टीनाने एका वाक्यात बोळा फिरवला. ती म्हणाली, "कितीही सुंदर असलं ना तरी ते मानवनिर्मित आहे." पुढे म्हणाली, "भारतात जशी जंगलं मानवी हस्तक्षेपाशिवाय आहेत तशी इथे नाहीतच. एकूणच आम्हा युरोपियनांना आहे ते नष्ट करून, मग आमच्या देखरेखीत, नियंत्रणात निसर्ग असलेला आवडतो."


खूप वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंचं "दुस्तर हा घाट" वाचलं होतं. युरोपात पहिल्यांदा येण्याआधी. त्यात नमू आणि वनमाळी लग्न होऊन आम्सटरडॅमला येतात आणि तिथला वनमाळीचा मित्र अलिस्टरशी नमूचीही छान मैत्री होते. वनमाळी पुढे कुठे कुठे फिरत राहतो पण नमू भारतात परतते. तिला भेटायला अलिस्टर येतो. मग ते शेताजवळच्या एका टेकडीवर जातात. तिथे एका दगडावर बसून अलिस्टर भोवताली बघत नमूला म्हणतो, "तुमच्या भारतात मानवी स्पर्शाशिवाय असलेला निसर्ग आहे. आमच्याकडे नाही." जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा, या वाक्यातील भावना १००% कळाली नव्हती. आज कळतीये.

पण भारतात खरोखरीच असा निसर्ग मानव नावाच्या अत्यंत हीन, स्वार्थी, जैवसाखळीत कुठेच नसलेल्या प्राण्याकडून अस्पर्शित राहील? आपला स्वार्थ, आपल्याला जंगलं, नद्या, वन्यजीव यांना आहे तसे - किमान काही भागात राहू द्यायला तयार होईल. याचे उत्तर आत्तातरी नकारार्थी आहे. काही वर्षांनी भारतातला एखादा अलिस्टर, टीना, क्वेरीन परग्रहावरच्या एखाद्याला सांगेल की, "तुमच्याकडे जसा अस्पर्शीत निसर्ग आहे तसा आमच्या पृथ्वीवर नाही..."

असं होऊ नये ही प्रार्थना 🙏🏼

Tuesday, November 12, 2019

परिशोध - एस् एल् भैरप्पा

भैरप्पांच्या ज्या कादंबऱ्या वाचल्या त्यात त्यांना काहीतरी ऐतिहासिक सामाजिक संदेश द्यायचा आहे असं नेहमीच वाटलं. परिशोध ही कादंबरी मात्र याला अपवाद आहे. एका अनाथ मुलाची, विश्वनाथची, वय वर्ष ९-१० पासून ते २७-२८ पर्यंतची गोष्ट यात येते. काळ साधारण १९४८ ते १९६४ आहे.

विश्वनाथ अरसीकेरे हा ९-१० वर्षांचा असताना त्याची आई आणि बहीण प्लेगने मरण पावतात. त्याची आजी (आईची आई) सुद्धा त्याच साथीत मरण पावते. वडील दुसरं लग्न करतात आणि विश्वनाथ "अनाथ" बनतो. त्याला जवळच्या गावातील एक जंगम सांभाळतो. त्याला त्या गावात समदुःखी मित्रही मिळतो. शाळा चांगली सुरू असते, पण विश्वनाथ टुरिंग टॉकीजकडे ओढला जातो आणि त्या गावातून बाहेर पडतो. त्याचे आजोबा (आईचे वडील) त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना तो सापडत नाही.

पुढे विश्वनाथ जीव देण्याचा प्रयत्न करतो पण एका अपघाताने त्यातून वाचतो. मग पुन्हा भिक्षा मागून आणि वाराने जेऊन शिक्षण सुरू होतं. पुन्हा त्यात अडचण येऊन तो एका हॉटेलात काम सुरू करतो. तिथे मिळणारी वागणूक आणि तुटपुंजा पगार याविरुद्ध आवाज उठवण्याच्या प्रयत्न करतो. हॉटेल चालक पोलिसांच्या मदतीने त्याला थर्ड डिग्री देतात पण एका नावाजलेल्या देशपांडे वकिलांची अनपेक्षित मदत मिळते आणि तो सुटतो. पुढे वकिलांकडे काही काळ काम करतो पण तिथेही एक प्रसंग असा घडतो की तो कुणालाही न सांगता तिथून बाहेर पडतो.

त्यानंतर एका संगीत नाटक कंपनीत डेप्युटी मॅनेजरचे काम सुरू करतो. अचानकच त्याला अभिनयाची संधी मिळते आणि ती तो साधतो. चांगला गायक नट म्हणून नावाजला जाऊ लागतो. तेथील अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. ती वयाने याच्यापेक्षा बरीच मोठी असल्याने ती लग्नाला नकार देते आणि त्याच रागात तो नाटक कंपनी सोडून देतो आणि मुंबईला निघतो.

मुंबईत आधी हमाल म्हणून, नंतर व्हिक्टोरिया (घोडागाडी) चालक म्हणून काम करत राहतो. हे करताना अनेक बरेवाईट अनुभव येतात. शेवटी केवळ पोटापुरतं कमवायचं असं ठरवून आचाऱ्याचं काम करतो आणि उरलेल्या वेळात एका वाचनालयात पुस्तकं वाचतो. त्या वाचनात अनेक प्रश्न पडतात. विशेषतः तत्त्वज्ञान आणि अध्यात्मात त्याला गोडी आहे असं वाचनालयाच्या मालकाला वाटतं. त्यातून त्याची ओळख रंगनाथ स्वामींशी होते आणि तो चिकमंगळूर जवळच्या त्यांच्या आश्रमात येतो. तिथेही त्याला सर्वांचे पाय मातीचे हा अनुभव येतो आणि ती जागा सोडून तो पुन्हा त्याच्या बालमित्राच्या गावी पोहोचतो.

मित्र त्याला मदत करतो. शिक्षण पुन्हा सुरू होतं. लग्नही होतं पण शिक्षणाला सासरे मदत करतील या बोलीवर. सासऱ्यांच्या स्वतःचाच संसार नीट सुरू नसतो. त्यामुळे महिन्याभरात विश्वनाथ बायकोला सोडून मैसूरला जातो. याच दरम्यान त्याची बायको गरोदर राहिलेली असते. बाळाचा जन्म होतो. तरीही विश्वनाथ परतून येत नाही. संध्याकाळी काम आणि दिवसा शिक्षण सुरू ठेवतो. बायको अखेरीस जीव देण्याचा प्रयत्न करते पण त्यात ती वाचते आणि बाळ दगावतं. याचा तिच्यावर आणि जेव्हा विश्वनाथला बातमी कळते तेव्हा त्याच्यावरही खूप खोल परिणाम होतो आणि विश्वनाथ तिला भेटायला येतो. बायको भेट नाकारते आणि आयुष्य पुढे शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून जगायचं ठरवते.

विश्वनाथला शिक्षणासाठी मदत करणारे मुख्याध्यापकांना विश्वनाथचा मित्र मध्यस्ती करायला सांगतो. विश्वनाथ देशपांडे वकिलांकडून निघाल्यावर त्यांच्यासारखी डायरी लिहायला सुरूवात करतो. ती डायरी विश्वनाथ बायकोला देतो आणि तीच पुढे मुख्याध्यापकांकडे येते. त्यातून ते विश्वनाथची पूर्ण कथा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्यालाच भेटून मग पुढे मध्यस्ती करायचं ठरवतात.

इथे कथा संपते. पुढे काय होतं ते भैरप्पा वाचकावर सोडून देतात.

सगळी कथा ही एक एक पात्र विश्वनाथला शोधत आहेत अशी सांगितलेली आहे. सुरूवातीला कंठीजोईस (विश्वनाथाचे आजोबा) शोध घेतात. मग देशपांडे वकील, नाटकाचे दिग्दर्शक मास्टर, रंगनाथ स्वामी आणि शेवटी मित्र गंगण्णा या पात्रांमधून कथा पुढे सरकते. या शोधामुळे किंवा विश्वनाथला स्वतःला काय करायचं आहे याच्या शोधामुळे कादंबरीचं नाव "परिशोध" असावं...

विश्वनाथ लिहीत असलेल्या डायरीतील एका विचाराचा सारांश - "आयुष्य रेल्वेसारखं नसलं पाहिजे. रेल्वेत आपण जरी चालक असलो तरी कुणी दुसऱ्याने ट्रॅक बदलला तर आपली दिशा बदलते. आपण फक्त वेग नियंत्रित करू शकतो पण दिशा आपल्या हातात नसते. आयुष्य बस सारखं असलं पाहिजे. दिशा आणि वेग या दोन्हीवर आपलं नियंत्रण असतं. आपल्या आयुष्याची दिशा आपल्याला पाहिजे तिकडे वळवता आलं पाहिजे." हे बहुदा या पुस्तकाचा सार असावं...

Sunday, October 27, 2019

निसर्ग समर्थ आहे

Salt Fat Acid Heat नावाची एक Web Series बघत होतो. त्यात Salt या भागात जपान मधील मिठाचे अनेक प्रकार दाखवत होते. सोया सॉस हा खारट असतो आणि म्हणूनच एक प्रकारचं तेही मीठच. एक जपानी माणूस पारंपरिक पद्धतीने सोया सॉस बनवतो. त्याच्याकडे सुमारे १०० वर्षांपूर्वीची लाकडी भांडी आहेत त्यात तो किण्वन पद्धतीने सोया सॉस मुरू देत तयार करतो. या पद्धतीमध्ये वेळ जास्त लागतो आणि श्रमही जास्त लागतात. या Web Series ची host समीन नुसरत त्याला विचारते की तू हे केवढं काम करतोस... त्यावर तो जपानी हसत म्हणतो - मी फक्त योग्य वातावरण तयार करून देतो. सोया सॉस तर हे सूक्ष्म जिवाणू तयार करतात.

जपानी वननिर्मिती "मियावाकी" पद्धतीत साधारण असेच तत्त्व पाळले जाते. No management is best management. त्या झाडांना त्यांचं त्यांचं वाढू द्या. तुम्ही फक्त पाणी देत रहा. २-३ वर्षांनी त्याचीही गरज नाही. ती झाडं काय ते आपलं आपलं बघतील आणि तुम्हालाही जपतील.

जपान मधील नैसर्गिक शेतीचे प्रणेते फुकुओका सांगतात की तुम्ही जमिनीची मशागत करता वगैरे सगळं झूठ आहे. तुम्ही उगाच जमिनीला त्रास देत असता. नैसर्गिकरित्या जेव्हा बिया जमिनीवर पडतात तेव्हाच तुम्ही त्या जमिनीवर टाका. म्हणजे बाजरी ऑक्टोबर महिन्यात काढणीला येते तर ऑक्टोबरमध्येच त्या बिया पसरून द्या आणि त्यावर त्याच बाजरीचे धांडे पसरून द्या. जून मध्ये त्या बिया आपोआप उगवतील. थोडक्यात निसर्ग त्याचं बघून घेईल आणि तुम्हालाही मिळेल. त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका.

भारतात नैसर्गिक शेती करणारे भास्करराव सावे. त्यांच्याबद्दल मिलिंद बोकिलांच्या 'समुद्रापारचे समाज' मध्ये एक प्रकरण आहे. त्यात बोकील लिहितात -
'नैसर्गिक शेती म्हणजे शेवटी काय आहे? तिचा संदेश अगदी साधा आहे. तो म्हणजे निसर्गाचे ऐका, डोळे उघडे ठेऊन बघा. आपल्याकडे जे अनेक ऋषितुल्य संशोधक या विषयात काम करत आहेत, त्यातलेच एक आहेत डहाणूशेजारच्या उंबरगाव तालुक्यातले भास्करराव सावे. त्याची शेती बघायला गेलो असताना त्यांनी मला एकदम विचारले, "नारळाला म्हणजे शहळ्याला एवढे जाड कवच का असते?" मला त्याचे उत्तर आले नाही. (माणसांचेच वागणे जिथे समजत नाही, तिथे निसर्गाचे गूढ काय समजणार?) सावे म्हणाले, "उत्तर सोपं आहे. कारण नारळाला उंचावरून पडायचे असते. तसा तो पडूनही फुटू नये म्हणून निसर्गाने तशी व्यवस्था केली आहे. तो तुमच्या हातात अलगद पडेल. पण आपण काय करतो? आपण झाडावर चढण्याचा अट्टाहास करतो. त्यात हात, पाय मोडून घेतो. मुख्य म्हणजे स्वत:ला हवे तेव्हा नारळ काढून झाडाचे उत्पादनचक्र बिघडवून टाकतो." साव्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे , की झाडावर चढून जर नारळ काढले नाहीत, तर ते झाड पाच ते सहा पट जास्त उत्पन्न देते. आपण झाडाच्या शेंड्यापर्यंत सरसर चढून नारळ काढून घेऊ शकतो, ही माणसाला आलेली मस्ती आहे. निसर्गाचे सांगणे आहे, की तू खालीच थांब, मी तुला भरभरून देतो. हे समजून घेणे म्हणजेच नैसर्गिक शेती.'

मुळात माणसाला सगळ्या गोष्टींवर नियंत्रण हवे असते. शिवाय "सर्वात आधी मला पाहिजे" ही हाव असते. मग जो हापूस मे अखेरीस किंवा जून मध्ये नैसर्गिकरित्या मिळणार असतो त्यावर केमिकल्स टाकून आम्ही एप्रिलमध्ये खातो. जो कापूस ऑक्टोबर हिट मध्ये चांगला आपोआप फुटणार असतो तो आम्हला सप्टेंबरमध्ये पाहिजे असतो आणि मग त्यावर बोंड अळी येते आणि आम्ही फवारण्या करत उत्पादन खर्च वारेमाप वाढवून ठेवतो. ही नियंत्रणाची आणि "मला आधी पाहिजे"ची हाव संपो आणि बळीचे राज्य येवो!

बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा!!!

Monday, October 21, 2019

अहंकार

अहंकार ही अशी गोष्ट आहे जी, ज्याला शोभून दिसू शकते तो बाळगत नाही, ज्याची कुवत नसते तो सगळीकडे घेऊन फिरतो