Sunday, February 23, 2020

प्रभावी कौंतेय

काल कौंतेयने ज्या दिवसांची आठवण करून दिली त्या दिवसांतील कौंतेय आठवला. आम्हाला आता प्रत्यक्ष भेटून १५ वर्षे (किंवा जास्तच) झाली असतील. पण तो कौंतेय अजूनही जसाच्या तसा आठवतो.

आम्ही संभाजीनगर (देवगिरी जिल्हा) मधील स्वयंसेवक. त्याच्या आधी शहर प्रचारक होते अप्पा (दत्तात्रय गर्गे). कौंतेय शहर प्रचारक म्हणूनच आला, पण अर्ध्याच शहराचा. आमचा भाग त्याच्या कार्यक्षेत्रात नव्हता. तरी शहराच्या एकत्रीकरणात आमच्या भेटी होत होत्या. तेव्हा माझं वय १८-१९ असेल तर कौंतेय फार तर २२-२३. इतकं वयातील अंतर कमी असल्याने आमची मैत्री छान झाली. कौंतेयचा आमच्यावर खरं सांगायचं तर खूप प्रभाव पडला होता. कारण त्याने सांगितलेलंच - गाणी, कविता, उतारे संपूर्ण पाठ. याशिवाय अजून भारी म्हणजे तो स्वतः कविता करायचा आणि त्या छंदबद्ध, तालात म्हणायचा.

तो प्रचारक निघताना मनाची होत नसलेली तयारी आणि आश्वासक हात पाठीवर पडल्यावर झालेली तयारी -
घेतली भरारी तरीही
बळ येई ना पंखात
संशयो मनीचा घडवी
हृदयात एक आकांत
या कवितेतून अप्रतीम सांगितली होती.

अशीच एक कविता म्हणजे शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंहांना पाठवलेले पत्र - मिर्झास
मग सडा गुलामीत वा मुक्तिस्तव गर्जा।
आवाहन अथवा समज इशारा मिर्झा।।
आलमगीर चर्येवर चिंतेचे घन सावट पडले
शिवरौद्र तांडवामध्ये रथी अन् महारथी सापडले...

याच कवितेत एका कडव्यात, महाराज स्पष्ट सांगताहेत
ती माय भवानी समर्थ तारायाला
हे राज्य श्रींचे पूर्णत्वी नेण्याला
तुज माझ्या वाचुन कार्य तिचे का अडते
पण खचित खुणावी आपुल्या कर्तव्याला

गीतेतील कर्मयोग आणि स्वधर्म (कर्तव्य) पालन किती सहज सोपं करून सांगितलं होतं याने. आणि हा माझ्यापेक्षा केवळ २-४ वर्षे मोठा असेल. सुंदर शद्ब, एक नाद आणि कौंतेयची कविता म्हणण्याची विशिष्ट पद्धत. आम्ही सगळेच त्याच्या प्रभावात, खरं सांगायचं तर प्रेमात.

कौंतेयची कवितांची वही उतरवून घेतली होती. पण त्याची खरंतर गरज नव्हतीच. आत्ताही वरील ओळी लिहिताना वेगळ्या आठवाव्या लागल्याच नाहीत, एवढ्या त्या लक्षात राहिल्यात.

हे सगळं कालपासून आठवत होतं. आज जरा शब्दबद्ध केलं. असे प्रचारक संघाने आम्हाला दिले म्हणून आम्ही घडलो.

Thursday, February 13, 2020

पहिले उड्डाण

१७ जून २००६ रोजी आयुष्यातला पहिला विमान प्रवास केला होता. स्विस एअरने परवा त्याच रूटने येताना त्या विमान प्रवासाचे तेव्हा लिहिलेलं बाळबोध वर्णन आठवले. आता वाटते आपण किती बावळट होतो... ("आताही आहेस" असं जे लोक म्हणताहेत तेच बावळट :-) ) बावळट आणि बाळबोध असं वर्णन असलं तरी खूप innocent आहे हे नक्की...

नमस्कार,
पहिले उड्डाण. मजा आली.

आत्ता झुरिक विमानतळावर आहे. मकर रास आहे ना ठरलेले फ्लाईट कॅन्सल :-) . ९:४० ला पुढचे आहे. तुम्ही लोक म्हणताल, याने सुरूवातच काय रडून केली. सवय, दुसरे काय...

काल मुंबईत माया आणि अमोलला टाटा केला आणि (खरं सांगतो) थोडे घाबरतच आत गेलो. थोडे समोर गेलो की लगेच x-ray मशीन होते. अभिने सांगितले होते की हँड बॅग त्यात टाकायची नसते. पण टाकली. दोन्ही बॅग पॅक. आता काय करायचे असा विचार करत स्विसच्या काउंटरवर गेलो. मोठी बॅग धडपडत उचलून त्यच्यासमोर टाकली. २९.५ kg. जीव भांड्यात पडला. पण त्या माणसाचे लक्ष गेले छोट्या बॅगवर. तिचे वजन किती? ही बॅग न धडपडता काट्यावर टाकली. ७.५ kg. you have to check-in this bag, sir... डोक्यात पहिला प्रश्‍न, किती पैसे लागतील. लगेच विचारले. तं म्हंतो कसा, फुकट. दुसरा प्रश्‍न, जवळ काहीच कपडे नाहीत. काय करावे? विचारले. त्याने आश्‍वासन दिले आहे की अडचण येणार नाही. बघू काय होते ते.

मग इमिग्रेशन. फॉर्म भरला आणि मोठ्ठ्या माणसांसाठीच्या काउंटरवर जाऊ लागलो. तिथल्या माणसाने सामान्य माणसांच्या रांगेत लावले. लागलो. ते सोपस्कार झाले. मग गेट नं. ५ च्या जवळ जाऊन थांबलो. इथे पाट्या चांगल्या नाहीत म्हणून सांगितले होते. पण मस्त पाट्या होत्या. कोणाला विचारायला लागले नाही. ड्यूटी फ्री दुकाने (आणि किमती) बघितल्या. नंतर टाईम पास म्हणून दीक्षा बघायला सुरुवात केली. अस्वस्थ पिक्चर आहे. त्यानंतर मायाला फोन केला. घरी दोनदा लावण्याचा प्रयत्न केला. १७ रू झाले असताना एस्टीडी वाल्याने २५ मागितले. मग त्याच्याशी भांडण. तोवर १२:३० झाले. मग सेक्युरिटीच्या रांगेत लागलो. ते संपले २० मिनिटात. तोवर विमान लागले होते.

बोर्डिंग पास दाखवून विमानात गेलो... थोडी भिती आणि खूप कुतुहल. विंडोसीट नाही मिळाली. जरा अँडजस्ट व्हायला १० मि लागली. सीट बेल्ट लावून काढून बघणे, पांघरूण, उशी, हेडफोन, टीव्हीचा रिमोट सगळे खेळून झाले. मग घोषणा, उड्डाणाची. (आठवले “आवळा गं...” - वऱ्हाड) अंगदने फारच भीती घातली होती. हँडल पक्के पकडले. पाय रोवले. कधी बाहेर कधी आत बघत राहिलो. आणि विमान रिवर्स मध्ये सुरू झाले. ते धावपट्टीवर यायला १० मि आणखी गेली. तोवर मी रिलॅक्स झालो होतो. हळू हळू वेग पकडायला सुरुवात झाली. पुन्हा हात पाय टाईट :-) . पण कळायच्या आतच आम्ही फ्लाय झालो होतो.

मग बघितली ती मुंबापुरी. खुप दिवे. वळनदार रस्ते. त्यावरील धावणारे दिवे. मरीन ड्राईव्ह, वराळी सी फेस, समुद्र... भारत सोडून निघल्याची पहिली जाणीव. आत्ता पुन्हा डोळे भरले. ते डोळे भरून पहात राहिलो. तुम्हा सर्वाची आठवण काढत.

अंगद हृषी स्वानंद साठी: अरे एअर होस्टेस फार वयस्क होत्या. जवळपास सगळ्याच. . . बॅडलक ना?

आता बाकी नंतर. ८:४५ झालेत. बोर्डिंगला जातो.

बेल्जियमला पोहोचलो. या फ्लाईट मधली एअर होस्टेस तरूण आणि वेंधळी होती. आख्खा ट्रे पाडणार होती ती. हॉटेल चांगले मिळाले. छान सकाळ आहे.

मुंबई सोडल्यावर भोवताली, म्हणजे बाहेर अंधारच होता. काहीच दिसत नव्हते. मग बाहेर बघणे सोडून दिले. जेवणही आले होते. जेवण करून टीव्ही पहात बसलो. नंतर झोप लागली. साधारण ३ तास झोपलो होतो. जाग आली तेव्हा बाहेर लख्ख उजेड होता. सूर्य उगवला होता. स्थनिक वेळेनुसार ५ वाजले असावेत. हे काय अप्रुप म्हणून बघत राहिलो. खाली ढग दिसत होते. त्यावर सूर्याची किरणे पडून चमकत होते. नेहमी खालून वर चमकणारे ढग बघणारा मी वरून बघताना... नाही सांगता येत. एकदा फक्त कळसूबाईवरून पाहिले होते खाली ढग.

मग घोषणा झाली की आता विमान खाली उतरणार आहे. आणि लक्षात आले की कळसूबाईची तुलना नाही करता येणार. पहिला ढगांचा लेअर सोडून खाली आलो. आणि आणखी एक लेअर दिसला. त्यात मधे मधे बर्फाचे डोंगर दिसू लागले. फ्लाईटइन्फो मध्ये जाऊन नाव बघितले. आल्प्स. मग ढगांचे आणखी दोन लेअर झाल्यावर मधून मधून स्विस जमीन आणि झाडे दिसू लागली.

स्विस... नेहमी आपण पहातो पिक्चरमध्ये. तिथली वनराई, स्वच्छ रस्ते, भोवताली बर्फाचे डोंगर. वरून छान दिसत होते. जवळून पहाता नाही आले. विमान उतरायला ४० मिनिटे लागली. बाहेर आलो. एक गोरी युनिफॉर्ममधली दिसली. तिला बोर्डिंग पास दाखवला. तिने फ्लाईट नक्की कॅन्सल झाली असे सांगितले. ट्रान्सफर डेस्कवर जायला सांगितले. त्यासाठी आधी ई टर्मिनलवरून ए टर्मिनलला जायचे होते. अभि, अमोलने सांगितल्याप्रमाणे पाट्या व्यवस्थित होत्या. रेल्वेत उभा राहिलो. आपली लोकल असते तशीच. ट्राम सारखी म्हणता येईल. ए ला जाऊन ट्रान्सफर डेस्कवर गेलो. तिथे आर्धा तास रांगेत उभा राहिलो. मग नवीन बोर्डिंग पास मिळाला. सगळा एअरपोर्ट फिरून आलो.

त्यानंतर गाणारे व्हायोलीन ऐकत तुम्हाला पत्र लिहायला घेतले. खूपच छान वेळ गेला.

बोर्डिंगची वेळ झाल्यावर तिथे गेलो. एक बस आलेली होती. त्यातून विमानाजवळ गेलो. कसले भंगार विमान. छोटेसे. ३ बाय ३ सीट. त्यात मला मधली सीट मिळाली. भूक खूप लागलेली होती. स्विसमध्ये स्विसफ्रँक चालतात. त्यामुळे ट्रॅव्हलर चेक वठवले नाहीत. पाणीपण मिळाले नाही. आणि ही तरूण सुंदर बया खायला काही लवकर आणेना. आणले ते पण वेंधळेपणा करत. दोनतीन जणांना अभिषेक केला. अखेरीस खायला मिळाले. पाणीपण मिळाले.

११:१५ ला ब्रुसेल्सला उतरलो. बॅगेज कुठे आहे याचा पत्ता नाही. भिती वाटली. पण सापडले. त्याआधी पोलीसांना पासपोर्ट दाखवून बेल्जियम प्रवेश केला. त्या बॅगा घेऊन बाहेर पडायचा रस्ता शोधत राहिलो. सापडेच ना. पप्याची आठवण आली. मग कॉलिंग कार्ड घेतले. तर फोनच सापडला नाही. शेवटी बाहेर आलो. मर्सिडीज टॅक्सी... बसलो. त्या हीरोला हॉटेल काय मॅक्लीन पण कळाले नाही. त्याच्या एका मित्राने सांगितले. मग त्याने GPRS नकाशावरून मला मॅक्लीनला आणले. पण हॉटेल कुठे माहिती. माझे लक्ष मिटर कडे. त्याच्या लक्षात आले असावे. त्याने मिटर बंद करून हॉटेल शोधून दिले.

असा झाला प्रवास

Friday, February 7, 2020

प्रतिशोध पानिपतचा

कौस्तुभ कस्तुरेचं पुस्तक येणार ही बातमी कळाली - पुस्तकाचा विषय आणि नाव प्रतिशोध पानिपतचा. पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा मी बेल्जियममध्ये होतो. मित्रांकडून पुस्तक मागवण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही. मग भारतात पोहोचण्याआधी पुस्तक घरी पोहोचेल अशी व्यवस्था केली आणि आल्या आल्या हातात घेऊन पूर्ण केलं.

याआधी हा कालखंड स्वामी या कादंबरीत वाचलाय. पण स्वामी केवळ माधवरावांच्या पुण्यातील/थेऊर मधील वास्तव्याभोवती फिरते. त्याच काळात दिल्लीवर फडकलेला भगवा, नजीबाचा मृत्यू, त्याच्या मुलाची केलेली लांडगेतोड आणि नजीबाची फोडलेली कबर हा भाग त्यात येतच नाही. बाकी पाठ्यपुस्तकात हे कधीच येणार नाही. इंग्रजांनी भारत मोगलांकडून ताब्यात घेतला असं शिकवायचं असल्याने मोगल मराठ्यांच्या ताब्यात होते हे कसं शिकवता येईल. पण कौस्तुभने हा सगळा कालखंड पानिपतचा मराठ्यांनी कसा प्रतिशोध घेतला या परिप्रेक्षात मांडला आहे.

नारबा ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा यात आहे. हा नारबा एक सामान्य मराठी माणूस आहे. याचा भाऊ आणि वडील पानिपतात कामी येतात. हा फडावर काम सुरू करतो आणि अखेरीस उत्तरहिंदच्या स्वारीवर युद्ध जिंकून येतो. असे अनेक नारबा माधवराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आणि उत्तरहिंद पुन्हा ताब्यात घेतला. हा नारबा त्या सगळ्यांचं प्रतीक आहे.

आपण कायम एक म्हण ऐकत आलो आहोत - मराठी माणसाचा विश्वास पानिपतात गेला. पण ही वस्तुस्थिती नाहीये. मराठी माणसाचा विश्वास गेला नाही. तो कायम राहिला आणि एकामागोमाग एक उत्तरेतील राज्ये मराठ्यांच्या ताब्यात आली. तीही केवळ १० वर्षात.

हे सर्व घडले ते महादजी शिंदे, विसाजी कृष्ण बिनीवाले आणि तुकोजी होळकर यांच्या हातांनी आणि त्यामागे खंबीर नेतृत्व होते माधवरावांचे. माधवरावांना रमाबाईंची साथ होती आणि नाना फडणवीसांचे आणि रामशास्त्र्यांचे सल्ले होते. अर्थातच पाय खेचणारे लोकही होतेच. राघोबासारखा घरभेदीही होता. सदाशिवरावांचा तोतया हेही एक प्रकरण होते. पण या सर्व लोकांना साम-दाम-दंड-भेदाने माधवरावांनी सरळ केलं.

हा सगळा तपशील या पुस्तकात आहे. तोही अतिशय सहज भाषेत. अस्सल ऐतिहासिक पुरावे वापरून अत्यंत सुंदर, रसाळ कादंबरी कौस्तुभने लीलया तयार केलीये.

मला खटकलेल्या काही गोष्टी आहेत. विशेषतः, रमाबाईंनी सती जावं ही इच्छा माधवराव जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्याचं कारण रमाबाईंना राघोबा वापरून राजकारण करतील हे सांगितलं आहे. वास्तविक विश्वासरावांच्या पत्नीमार्फत सुद्धा राघोबांना ते करता आलं असतं, पण ते झालं नाही. त्यामुळे हा तर्क योग्य वाटत नाही. पण याकडे कानाडोळा करून हा कालखंड सर्वांनी अनुभवावा असाच आहे.

या पुस्तकातील काही प्रसंग डोळ्यात पाणी आणतात. ते दुःखाचे अश्रू नाहीत तर ते आहेत आनंदाचे, प्रतिशोधाच्या कल्पनेचे आणि प्रतिशोधाच्या पूर्णत्वाचे. त्यातील तीन विशेष उल्लेखनीय
- नारबा दिल्लीस्वारीला जाताना आईला पत्र लिहितो, ते पत्र आणि पुढचा काही भाग
- दिल्लीवर भगवा फडकतो
- नजीबाच्या थडग्याला महादजी फोडतात

कौस्तुभ, या कादंबरीसाठी खूप धन्यवाद. तुझ्याकडून अजूनही खूप काम होवो या शुभेच्छा!

Saturday, January 4, 2020

हम देखेंगे या कवितेचा भावानुवाद

टीप - CAA चा विरोध करणारे आंदोलक खरे धर्मनिरपेक्ष असतील तर त्यांनी हा भावानुवाद वापरावा, कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. खुलं आव्हान ;-)

फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या हम देखेंगे या कवितेचा भावानुवाद. मूळ कविता शेवटी दिली आहे.

जनहो चला बघाया, निश्चित असे घडाया
विधिलिखित अजेय आहे, हृदयस्थ सत्य जाणूया

दिन तो समीप आहे, त्याचीच ही प्रतीक्षा
शासीत, वंचितांची, संपे आता तितिक्षा

भूमि ही कंप पावे, आमुच्या पदरवाने
पर्वत पहाड होती, येथेच दीनवाणे

विद्युल्लता पडे ही, सत्तेच्या शिरीमुकुटी
असत्य प्रतिकांची, होऊन जाय भुकटी

वंचित असू तरीही, सत्य हे असे सोबती
शासन जाई आता, जन गणाच्याच हाती

उध्वस्त सिंहासने, उध्वस्त होती मुकुटे
सगुण निर्गुणाचा ओंकार ध्वनी प्रकटे

असे अगोचर तरीही, अंतरी राहतो तोच
नट, नाटक नि प्रेक्षक, सारे असतोचि तोच

जन गणात असेल आता, नाद अहम् ब्रह्मास्मि
सामान्य असेल शासक, जो आहे तू अन मी

- ज्ञानेश

मूळ कविता -

हम देखेंगे / फ़ैज़ अहमद फ़ैज़
 फ़ैज़ अहमद फ़ैज़ »
हम देखेंगे
लाज़िम है कि हम भी देखेंगे
वो दिन कि जिसका वादा है
जो लोह-ए-अज़ल[1] में लिखा है
जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां [2]
रुई की तरह उड़ जाएँगे
हम महकूमों[3] के पाँव तले
ये धरती धड़-धड़ धड़केगी
और अहल-ए-हकम[4] के सर ऊपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी
जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से
सब बुत[5] उठवाए जाएँगे
हम अहल-ए-सफ़ा[6], मरदूद-ए-हरम[7]
मसनद पे बिठाए जाएँगे
सब ताज उछाले जाएँगे
सब तख़्त गिराए जाएँगे

बस नाम रहेगा अल्लाह[8] का
जो ग़ायब भी है हाज़िर भी
जो मंज़र[9] भी है नाज़िर[10] भी
उट्ठेगा अन-अल-हक़[11] का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा[12]
जो मैं भी हूँ और तुम भी हो

शब्दार्थ
 विधि के विधान
 घने पहाड़
 रियाया या शासित
 सताधीश
 सत्ताधारियों के प्रतीक पुतले
 साफ़ सुथरे लोग
 धर्मस्थल में प्रवेश से वंचित लोग
 ईश्वर
 दृश्य
 देखने वाला
 मैं ही सत्य हूँ या अहम् ब्रह्मास्मि
 आम जनता

Friday, December 20, 2019

संघाचं हिंदुत्व (माझ्या आकलनानुसार)

संघाच्या हिंदुत्वात कुणी त्याज्य नाहीये. त्यात व्यापकता आहे, सर्वसमावेशकता आहे. संघाची विचारसरणी अनेक पद्यांमधून सहज व्यक्त होत असते. त्यामुळे यावर लिहिण्याचा विचार करताना आपोआप एक पद्य मनात उमटलं.

विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू हैं।
संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों मे हिंदु हैं।।धृ।।

राम कृष्ण गौतम की धरती, महावीर का ज्ञान यहां
वाणी खंडन मंडन करती, शंकर चारों धाम यहां
जितने दर्शन राहें उतनी, चिंतन का चैतन्य भरा
पंथ खालसा गुरू पुत्रों की बलिदानी यह पुण्य धरा
अक्षय वट अगणित शखाऐं, जड में जीवन हिंदु हैं ।।१।।

कोटी हृदय हैं भाव एक हैं, इसी भूमि पर जन्म लिए
मातृभूमि यह कर्मभूमि यह, पुण्यभूमि हित मरे जिये
हारे - जीते संघर्षों में, साथ लढे बलिदान हुए
कालचक्र की मजबूरी में रिश्ते नाते बिखर गये
एक बडा परिवार हमारा, पुरखे सब के हिंदु हैं ।।२।।

सबकी रक्षा धर्म करेगा, उसकी रक्षा आज करें
वर्ण - भेद मत - भेद मिटा कर नव रचना निर्माण करें
धर्म हमारा जग में अभिनव, अक्षय है अविनाशी हैं
इसी कडी से जुडे हुए, युग युग से भारतवासी हैं
थाय अथाह जहां की महिमा, गहरा जैसे सिंधु हैं ।।३।।

हरिजन गिरिजनवासी बन के, नगर ग्राम सब साध चलें
उंच नीच का भाव घटा कर, समता के सद्‌भाव बढें
ऊपर दिखते भेद भले हों, जैसे वनमें में फूल खिले
रंग बिरंगी मुस्कानों से, जीवन रस पर एक मिले
संजीवनी रस अमृत पीकर, मृत्युंजय हम हिंदु है ।।४।।

यात कुठेही भारतीय भूमीत जन्मलेल्या उपसनापद्धतीबद्दल अनादर, आक्षेप नाही तर जेवढी दर्शने आहेत तेवढे रस्ते आहेत हा भारतीयत्वाचा आत्मा अधोरेखित केलाय. या वटवृक्षाच्या कित्येक फांद्या आहेत, पण मूळ जीवनरस हिंदू (म्हणजेच भारतीय) आहे हे अधोरेखित केलंय. या भारतभूमीला मातृभू, पुण्यभू मानणारे सगळेच आपले आहेत. संघर्षाच्या काळात हार जित झाली आणि नाते तुटले (धर्मांतरे झाली) तरीही सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्यामुळे आपण सर्व भारतीय एक परिवार आहोत हीच संघाची धारणा आहे. मतभेद आणि वर्णभेद मिटवून नवरचना निर्माण करताना जुन्या गैर गोष्टी अर्थातच टाकाव्या लागणार याची सार्थ कल्पना संघाला आहे. शेवटच्या कडव्यात पुन्हा एकदा विविध जाती, पंथ, निवास यामुळे भिन्न असलेल्या हिंदूंमध्ये कोणताही भेद असू नये हे सांगितलंय. त्याचं वर्णन करताना वनात जसे अनेक फुलं असतात तसेच हेही, परंतु पुन्हा या विविध रंगात जीवनरस एकच आहे हे सांगितलंय. संघाचं हिंदुत्व हे असं सर्वसमावेशक आहे.

याच आशयाची संघाची अनेक पद्ये आहेत. ज्या सर्वांत कायम सामाजिक समरसतेबद्दल सांगितले आहे. कुठेच कुणी भारतीय आपला शत्रू आहे आणि त्याला मारले पाहिजे हे संघ शिकवत नाही.
१ - हिन्दु जगे तो विश्व जगेगा
२ - जनसेवा ही ईश्वरभक्ति
३ - हिन्दु हिन्दु एक रहे
४ - हिंदू सारा एक मंत्र हा

आता प्रश्न येतो अभारतीय उपासना पद्धतीचं काय? त्याचं उत्तर भारतीय पद्धतीनेच देता येईल. ज्याला जी उपासनापद्धत योग्य वाटते त्याने ती अनुसरावी. पण ते करताना इस्लाम वा ख्रिश्चन धर्मात जसं सांगितलं जातं की "हाच एकमेव मार्ग आहे" हे असू नये. "हाही एक मार्ग आहे" या तत्वानुसार भारतात तर चार्वाकासारखे शतप्रतिशत नास्तिक सुद्धा आहेत आणि त्यांची गणना हिंदू दर्शनातच होते. त्यामुळे केवळ अभारतीय उपासना पद्धत आहे म्हणून इस्लाम किंवा ख्रिश्चनांचा संघ विरोध करत नाही. विरोध सुरू होतो फसवणुकीतून किंवा जबरदस्तीने धर्मांतर आणि "हाच एकमेव मार्ग" या मानसिकतेमुळे. तेहतीस कोटी देवांमध्ये अल्ला आणि येशू सामावून घेणं भारतीयांना कठीण नाही. "केवळ तेच" हा मुद्दा मात्र नक्कीच विरोधाचा आहे.

हिंदू धर्म हा एक पुस्तक, एक प्रेषित, एक मार्ग असा बनलेला नाही. अनेक मार्ग, अनेक विद्वान, अनेक पुस्तकं या मंथनातून बनलेला आहे. शिवाय आज सहा आस्तिक आणि तीन नास्तिक दर्शने समजून घेऊन, त्यापैकी एकानुसार आचरण कुणी करत नाही. कारण याच्या पुढे पुराणं आली, रामायण महाभारतासारखी महाकाव्ये आली, नवीन देवता आल्या. शीख पंथ उदयास आला आणि तेही सर्व इथे गुण्यागोविंदाने नांदू लागले. अजूनही नवे पंथ, संप्रदाय तयार होऊ शकतात - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज अशी उदाहरणे आहेतच. या सर्वांना सामावून घेणारं हिंदुत्व, संघाचं हिंदुत्व आहे.

आज बरेच पुरोगामी विद्वान असं म्हणतात की इतकी विविधता असलेल्या प्रदेशांचा देश होऊ शकतो, पण हे एक राष्ट्र आधी कधीच अस्तित्वात नव्हते. त्यांना असं वाटतं कारण या राष्ट्राचा आत्मा - हिंदुत्व - त्यांना मान्यच नसतं. जेव्हा सरदार पटेलांनी सर्व संस्थानांना भारतात सामावून घेतलं तेव्हा त्यांनी "एक संस्कृती" यावरच भर दिला होता. केवळ त्या आवाहनावर पाचशेच्या वर संस्थाने भारतात विलीन झाली. भारतात राज्ये अनेक होती पण त्यातील संस्कृती एक होती आणि आहे. अन्यथा दाक्षिणात्य माणसाचे नाव शिवरामकृष्ण का असतं? एका केरळी माणसाने भारताच्या चार भागात मठ का स्थापन केले? मूर्तिपूजक, निसर्गपूजक, विविध दैवतांना मानणारे, वेद नाकारणारे आणि देव/मोक्ष या सगळ्याच संकल्पना नाकारणारे भारतात सुखेनैव राहत होते आणि राहताहेत, त्याचं कारण हिंदुत्वच आहे. या विविधतेत जी एकता आहे ते हिंदुत्व आहे. किंवा मी असं म्हणेन की संघ याच एकतेला हिंदुत्व मानतो. यावर अधिक वाचायचं असेल तर संघाचं एकात्मता स्तोत्र बघावं.

संघ कधीही पुन्हा सतीप्रथा सुरू करा म्हणणार नाही, धर्मातील योग्य सुधारणांना संघाचा कायमच सक्रीय पाठिंबा राहिला आहे (उदा - देवदासी प्रथेविरुद्ध संघाचं/संघ स्वयंसेवकांचं काम बघावं). शबरीमला सारख्या गोष्टी या "धर्म सुधारणा"पेक्षा "पुरातन वारसा" या अशयातून बघव्यात असं संघाचं मत आहे. पण जर बहुसंख्य महिलांनी शबरीमला येथे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली तर संघ त्याला विरोध करणार नाही.

जशी पूर्वी अनेक विद्वानांकडून अनेक पुस्तके, नीती नियम लिहिले गेले आणि भारतात ते सामाजिक धार्मिक नियम म्हणून पळाले गेले, तसेच स्वतंत्र भारतात अनेक विद्वानांच्या विचारमंथनातून नवीन पुस्तक उदयाला आलं - संविधान. त्यामुळे संविधान (बहुमताने नित्य नूतन होणारं) जे सांगतं ते सामाजिक नीती-नियम हा आजचा धर्म आहे. उपसनापद्धती वेगळी असू शकते आणि ती वैयक्तिक/घरापुरती मर्यादित असावी. संविधानापुढे कोणताही धर्मग्रंथ अधिक प्रधान्याचा असणार नाही. हिंदूंमध्येच "वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्" हे गीत प्रसिद्ध होऊ शकलं आहे. हेच हिंदुत्व आहे. ज्यात काळाबरोबर बदलण्याची क्षमता आहे.

संघाचं हिंदुत्व हे
- सर्वसमावेशक, सर्वव्यापी
- सुधारणेला कायम वाव असलेलं
- नित्य नूतन (काळाबरोबर, काळानुसार नवीन बाबी मान्य करणारं)
- भारतीय वारसा जपणारं
- आक्रमकांशी झुंज देणारं
- राष्ट्रप्रथम मानणारं
असं आहे!

१.
हिन्दु जगे तो विश्व जगेगा मानव का विश्वास जगेगा
भेद भावना तमस हटेगा समरसता अमृत बरसेगा
हिन्दु जगेगा विश्व जगेगा ।।धृ।।

हिन्दु सदा से विश्व बन्धु है जड चेतन अपना माना है
मानव पशु तरु गीरी सरीता में एक ब्रम्ह को पहचाना है
जो चाहे जिस पथ से आये साधक केन्द्र बिंदु पहुचेगा ॥१॥

इसी सत्य को विविध पक्ष से वेदों में हमने गाया था
निकट बिठा कर इसी तत्व को उपनिषदो में समझाया था
मन्दिर मठ गुरुद्वारे जाकर यही ज्ञान सत्संग मिलेगा ॥२॥

हिन्दु धर्म वह सिंधु अटल है जिसमें सब धारा मिलती है
धर्म अर्थ ओर काम मोक्ष की किरणे लहर लहर खिलती है
इसी पूर्ण में पूर्ण जगत का जीवन मधु संपूर्ण फलेगा ॥३॥

इस पावन हिन्दुत्व सुधा की रक्षा प्राणों से करनी है
जग को आर्यशील की शिक्षा निज जीवन से सिखलानी है
द्वेष त्वेष भय सभी हटाने पाञ्चजन्य फिर से गूंजेगा ॥४॥

२.
जनसेवा ही ईश्वरभक्ति बोध यातला उमजुया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥

कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जातीपतींच्या
अनेक जाती पंथ-गटानी धरिल्या वाटा भेदांच्या
भेद भेदुनि भिंती पाडुनि समरसता ती आणूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥१॥

ग्रामवासी वा नगरनिवासी असोत कोणी वनवासी
एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी
कालगतीच्या चक्रावरती पर्व नवे ते कोरूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥२॥

कुणी न राहो दुबळा येथे मनी असा निर्धार जागवु
कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवु
उत्कर्षाची पहाट आणुन प्रकाश किरणे होऊया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥३॥

३.
हिन्दु हिन्दु एक रहे भेद भाव को नही सहे
संघर्षो से दुखी जगत को मानवता की शिक्षा दे ॥धृ॥

एक ब्रह्म कुछ और नही हरिहर दुर्गा मात वही
देव देविया रूप उसीका देश काल अनुसार सही
सब पन्थों का मान करे सब ग्रंथो से ग्यान गहे
सद्गुरूओं की सीख समझकर जीवन को जीना सीखे ॥१॥

जो भाई भटके बिछडे हाथ पकड ले साथ चले
भोजन कपडा घर की सुविधा शिक्षा सबको सुलभ रहे
उंच-नीच लवलेश न हो छुवा-छूत अवशेष न हो
एक लहू सब की नस-नस मे अपनेपन की रीत गहे ॥२॥

धर्म प्रेम अमृत पीये गीता गंगा गौ पूजे
वेद विहीत जीवन रचना हो राम कृष्ण शिव भक्ति करे
धर्म सनातन अनुगामी बुद्धम्-शरणम्-गच्छामि
अर्हंतोंको नमन करे नित वाहे गुरु अकाल कहे ॥३॥

४.
हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवू या
धरती-नभ-पातळहि भारु प्राण पणाला लावूया ॥धृ॥

उच्चनीचता तण जाळावे धगधगत्या कर्तृत्वाने
समाज रसरसता अर्वाचिन पुनः निर्मुया यत्नाने
खचलेला अभिमान जागवू पिचली हृदये सांधूया ॥१॥

कोणी नाही शत्रू आपूला प्रेमाने अवकाश भरु
चारित्र्याच्या आधारावर हिंदूराष्ट्र हे नव उभवू
समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमवूया ॥२॥

सामाजिक सन्मान निवारा समान सर्वा लाभावा
अन्न-वस्त्र-संस्कार लाभही सहजपणे सर्वा लाभावा
हीच एकता, समता, ममता, पथ ऐक्याचा चालूया ॥३॥

निज सत्वाची जाणिव नसता राष्ट्रजीवनी अर्थ नसे
परंपरा, इतिहास, पराक्रम आठव नुसाता व्यर्थ असे
कोटी मनांना सवे घेऊनी वैभव सारे मिळवू या ॥४॥

समाजभक्ति हीच प्रेरणा राष्ट्रभक्ति हे रुप तिचे
देशद्रोही निष्प्रभ होतील, दर्शन घडता शक्तिचे
विचार येतील अमरत्वाचे सर्व जगाला देऊया ॥५॥

आज कसोटी पुरुषार्थाची, व्यक्तित्वाच्या समर्पणाची
माय भूमीच्या पायी वाहू ओंजळ निज कर्तृत्वाची
अग्निपरिक्षा कोणी घेता सुवर्ण तेजे तळपुया ॥६॥

Tuesday, December 10, 2019

भीती कायद्याची की पोलिसांची

शीर्षटीप - बलात्काऱ्यांना कायद्यात असलेली सर्वात मोठी शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. शक्य असेल तर कायद्यात बदल करून गुन्हेगाराला लिंग कापून, चौरंगा करावं असं माझं मत आहे.

हैदराबाद येथील घटनेने मन सुन्न झालं होतं. अशा घटना घडल्या की त्रास होतोच. या केसमध्ये आरोपी लवकर पकडले गेले आणि ते पोलिसांवर हल्ला करून पळून जात असताना पोलिसांना नाईलाजाने त्यांना मारावं लागलं.

घटना घडल्यानंतर आणि आज एन्काऊंटर ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या आपण सगळे एक समाज म्हणून किती खालच्या इयत्तेत आहोत हे अधोरेखित करतात. सुरुवात आजच्या एन्काऊंटरवरून करूया.

मुद्दा १:
कायदा भारतात नाहीच अशा पद्धतीने कित्येक लोक (ह्यात अनेक मोठे नेते, कलाकार, खेळाडू - एकूण जनमानसावर प्रभाव टाकणारे सुद्धा आहेत) व्यक्त होत आहेत. वास्तविक अशा माणसांमुळे आधीच व्यवस्थेवर कमी विश्वास असलेल्या आपल्या समाजाला व्यवस्थेपासून आपण दूर नेत आहोत हे यांच्या लक्षात येत नाहीये. सरकार, GOD FATHER, अब तक छप्पन सारखी समांतर व्यवस्था आपल्याला उभी करायची नसून मूळ व्यवस्थेला सक्षम करायचे आहे. व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी नक्षलवादी आहेच. जर असा न्याय आपण स्वीकारत असू तर नक्षलवादही स्वीकारू. आपली निवड सक्षम व्यवस्था असली पाहिजे, सक्षम अधिकारी आपोआप तयार होतील. पण जर व्यवस्थेपेक्षा अधिकारी मोठे ठरत असतील तर व्यवस्था कधीच सक्षम होणार नाही.

या एन्काऊंटरच्या अनेक शक्यता असू शकतात.
१. खरंच आरोपी हल्ला करून पळणार होते, त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला.
२. मृतदेह जाळल्यामुळे न्यायवैद्यक चाचणीत बलात्काराचा पुरावा मिळणार नाही. त्यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचलले असू शकते.
३. आरोपींमधील बहुदा दोन आरोपी स्वतःला "बाल" म्हणवून घेत असावेत. दिल्लीतील आरोपीप्रमाणे हेही सुटतील असं वाटल्याने पोलिसांनी त्यांना मारलं असावं.
४. कुणीतरी वेगळीच माणसे या केस मध्ये गुंतलेली असावीत. (एका ऐकीव माहितीनुसार पीडित स्वतः पशुवैद्य असल्याने अवैध कत्तलखान्याविरोधात होती. त्यामुळे तिची सुपारी दिलेली असू शकते) अशी नावं बाहेर येतील आणि ते पोलिसांना आणि प्रशासनाला परवडणारे नसेल. यांना मारलं तर सगळी केसच बंद करता येईल.
यापैकी यापुढे केवळ पहिली शक्यता गृहीत धरण्यात येईल आणि फाईल बंद होईल...


 आपल्याला या एन्काऊंटरचा आनंद का होतो -
दिल्लीतील केसमध्ये येत्या काही दिवसात फाशीचा दिवस ठरेल पण तिथे शिक्षा द्यायला जल्लाद उपलब्ध नाही. कठुआ केस अजूनही तपासातच आहे. उन्नाव केस मध्ये आरोपींनी पीडितेसह तिचे कुटुंबच मारून टाकले आहे. कोपर्डी केसमध्ये शिक्षा जाहीर झाली पण अजून त्यापुढील कोणतीच कारवाई नाहीये. केरळमधील ननची तर केस पुढेच गेलेली नाही. तो बिशप सुखेनैव धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतोय. या फक्त माहित असलेल्या केसेस आहेत. माहित नसलेल्या हजारो केसेस असतील आणि न नोंदलेल्या तर त्याच्या कित्येक पट...! न्याय देण्यात आणि त्याची अंमलबजावणी होण्यात कित्येक वर्षं निघून जातात. यामुळे अशी एखादी घटना घडली कि त्याचा आनंद होतो.
पण हे लक्षात येत नाही की यातून आपली आधीच कमकुवत असलेली व्यवस्था अधिक कमकुवत होत जाते. गुन्हेगाराला न्यायव्यवस्थेची भीती वाटली पाहिजे, पोलिसांची नाही.





मुद्दा २:
आपण एक समाज म्हणून खरंच चांगले आहोत का? कारण हैदराबाद पीडितेवर केवळ याच चार नराधमांनी बलात्कार केला नाही. त्यांच्याशिवाय अजून ८० लाख लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. ८० लाख लोकांनी तिचं नाव पॉर्न साईटवर शोधलं. हे सगळे आपल्याच समाजातील लोक आहेत. अजून किती अधःपतन व्हायचं आहे. जर एन्काऊंटर करणे हाच न्याय असेल तर या ८० लाखांनासुद्धा मारले पाहिजे. एखादीवर बलात्कार होतोय आणि तो पाहावा वाटतो ही कसली विकृती आहे. हे लोक संधी मिळत नाही म्हणून प्रत्यक्ष कृती करत नाहीयेत. यांनाही जर संधी मिळाली तर ते नक्कीच बलात्कार करतील.
मुळात बलात्कार हा रोग (disease) नाहीये, ते लक्षण (symptom) आहे. रोग वेगळाच आहे. अजूनही रोग काय आहे ते कळालं नाहीये. काही लोक जेव्हा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना त्यापासून रोखलं जातं. या गुन्हेगारांना भेटून ही मानसिकता आली कुठून हा शोध घेतला गेला पाहिजे. पण प्रशासन भेटच होऊ देत नाहीत असे अनुभव आहेत.

मुद्दा ३:
सरसकटीकरण आणि धार्मिक/जातीय विभाजन - कठुआ केसच्या वेळी अनेकांनी सरसकट हिंदूंना, देवालयांना आणि देवतांना पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्याबद्दल लिहिताना मी लिहिलं होतं ( http://dnyanamhane.blogspot.com/…/i-am-not-ashamed-to-be-hi… )

- लाज वाटायची असेल तर आज भारतात दर तासाला ४ बलात्कार होतात याची वाटावी. ते लाज वाटणं सिलेक्टिव्ह असू नये. बलात्कार कुणावर झाला आणि कुणी केला - मुस्लिम मुलीवर आणि हिंदू माणसाने केला. (वा. छान केस मिळाली पुढे?) बलात्कार मंदिराच्या आवारात झाला. (अतिउत्तम आता हिंदूंना आपण हिंदू आहोत याची लाज वाटेल असं लिहू/बोलू)
हेच जर हिंदू मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर सगळी मेणबत्ती गँग गप्प. आणि मुलगा हिंदू असेल तर त्याची जात, पोटजात काढायची. थोडक्यात काय तर हिंदू असल्याची लाज वाटावी किंवा जाती पोटजातीत हिंदूंना वाटून टाकावं.

हे टिपिकल फुर्रोगामी लोकांबद्दल होतं. ते असतात सिलेक्टिव्ह. पण त्यांना सिलेक्टिव्ह म्हणणारे स्वतःच किती सिलेक्टिव्ह होताहेत हे गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं आणि त्याचं वाईट वाटलंय.

Quint सारख्या नाठाळ मीडियावीर त्या पाशाची गरिबी दाखवतात आणि मग विरोधी सूर अधिक भेसूरपणे असा न्याय मागतो.

दिल्ली केस मध्ये मोहम्मद अफरोज "नाबालिक" असल्याने ३ वर्षात सुटला त्याबद्दल हिरीरीने लिहिलं जातं. पण उर्वरित ३ गुन्हेगार अजूनही जिवंत आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं जात नाही. उन्नाव केसमध्ये कुणी फार बोलत नाही. आत्ताही चार पैकी दोन आरोपी हिंदू आणि दोन मुस्लिम होते. त्यातील फक्त मोहम्मद पाशा बद्दल बोललं जात होतं. पण जे "नाबालिक" म्हणून सुटण्याची शक्यता होती, त्यातील एक हिंदू होता. त्याचं नावही कोणत्या "पोष्टी"त दिसलं नाही. शिवाय "त्यांच्यात" हे "जायज" असतं अशाही पोस्ट्स दिसल्या / whatsapp वर फिरल्या. हा दुतोंडीपणा फुर्रोगाम्यांचा आहे, तो आता या स्वघोषित हिंदुत्ववाद्यांमध्येही येत आहे ही वाईट बाब आहे.

आज संविधानकर्त्या डॉ आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ आंबेडकर म्हणाले होते की एखाद्या देशाचे संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे व्यक्ती असक्षम असतील तर लोकशाही अपयशी ठरते. पोलिसांनी खरंच नाईलाज म्हणून गोळीबार केला असेल तरी दुर्दैवाने आज ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून समाज म्हणून आपण अपयशी होत आहोत हेच अधोरेखित होत आहे.

आपल्या देशाच्या व्यवस्था सक्षम होणं आणि त्यावर सर्व समाजाचा विश्वास असणं हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल.

Friday, November 22, 2019

अस्पर्शित निसर्ग

क्वेरीन नावाची माझी बेल्जियम मध्ये सहकारी आहे. नेदरलँड्सची नागरिक. ती भारतात, विशेषतः दक्षिण भारतात कामानिमित्त काही वेळा जाऊन आलेली आहे. शिवाय भारतीय कंपनीत काम करते म्हटल्यावर तिने भारताची बऱ्यापैकी माहिती मिळवलेली आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिच्याशी गप्पा चालल्या होत्या. त्यात ती म्हणाली की, "दक्षिणेत प्रचंड मोठी मंदिरं आहेत, भारतात इथल्या ब्रुसेल्स किंवा आम्सटरडॅम सारखी मोठी शहरं आहेत आणि शिवाय हत्ती, वाघ, सिंह सुद्धा आहेत. या बहुविधतेचं मला खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं."

खरंच या भागात कोणतेच वन्यजीव अस्तित्वात नाहीत. मुळात वनेच अस्तित्वात नाहीत. नेदरलँड्स, बेल्जियम आणि कदाचित अजून अनेक देश असे असतील जिथे नैसर्गिक वनराई शिल्लकच नसेल आणि अर्थातच वन्यजीव सुद्धा.

इथे जवळच मोठं प्राणी संग्रहालय आहे. त्यात हत्ती, वाघ, सिंह, गेंडे, जिराफ... खूप प्राणी आहेत. त्यांची प्रचंड काळजी घेण्यात येते. एखाद्या हत्तीणीला बाळ झालं की टीव्हीवर कौतुकाच्या बातम्या येतात. पण हे सगळं होतं मानवाच्या देखरेखीत, नियंत्रणात!

आमची टीना नावाची वयस्क मैत्रीण आहे. तिलाही भारताबद्दल कोण कौतुक. तिच्याशी एकदा अशाच गप्पा चालू होत्या. जवळच एक खूप मोठं उद्यान आहे - व्रैब्रूक पार्क. छान रांगेत लावलेली झाडं, मध्ये तयार केलेलं तळं, लहान मोठी खेळण्यासाठीची मैदानं, पळायला मातीचा उत्तम रस्ता, फक्त गुलाबाचं उद्यान आणि भरपूर गर्दीवाली झाडं. असं सगळं काही त्या उद्यानात आहे. मला तिथे फिरायला, सायकल चालवायला आवडतं. मी त्याचं कौतुक करत होतो. त्यावर टीनाने एका वाक्यात बोळा फिरवला. ती म्हणाली, "कितीही सुंदर असलं ना तरी ते मानवनिर्मित आहे." पुढे म्हणाली, "भारतात जशी जंगलं मानवी हस्तक्षेपाशिवाय आहेत तशी इथे नाहीतच. एकूणच आम्हा युरोपियनांना आहे ते नष्ट करून, मग आमच्या देखरेखीत, नियंत्रणात निसर्ग असलेला आवडतो."


खूप वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंचं "दुस्तर हा घाट" वाचलं होतं. युरोपात पहिल्यांदा येण्याआधी. त्यात नमू आणि वनमाळी लग्न होऊन आम्सटरडॅमला येतात आणि तिथला वनमाळीचा मित्र अलिस्टरशी नमूचीही छान मैत्री होते. वनमाळी पुढे कुठे कुठे फिरत राहतो पण नमू भारतात परतते. तिला भेटायला अलिस्टर येतो. मग ते शेताजवळच्या एका टेकडीवर जातात. तिथे एका दगडावर बसून अलिस्टर भोवताली बघत नमूला म्हणतो, "तुमच्या भारतात मानवी स्पर्शाशिवाय असलेला निसर्ग आहे. आमच्याकडे नाही." जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा, या वाक्यातील भावना १००% कळाली नव्हती. आज कळतीये.

पण भारतात खरोखरीच असा निसर्ग मानव नावाच्या अत्यंत हीन, स्वार्थी, जैवसाखळीत कुठेच नसलेल्या प्राण्याकडून अस्पर्शित राहील? आपला स्वार्थ, आपल्याला जंगलं, नद्या, वन्यजीव यांना आहे तसे - किमान काही भागात राहू द्यायला तयार होईल. याचे उत्तर आत्तातरी नकारार्थी आहे. काही वर्षांनी भारतातला एखादा अलिस्टर, टीना, क्वेरीन परग्रहावरच्या एखाद्याला सांगेल की, "तुमच्याकडे जसा अस्पर्शीत निसर्ग आहे तसा आमच्या पृथ्वीवर नाही..."

असं होऊ नये ही प्रार्थना 🙏🏼