Friday, July 23, 2021
माझा प्रवास माझा वेग
Wednesday, June 9, 2021
स्वयंभू भीम
महाभारताची नायिका कोण? असा प्रश्न विचारला की विनाविलंब उत्तर येते - द्रौपदी! पण महाभारताचा नायक कोण? या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येते. कुणी म्हणतात कृष्ण, कुणी भीष्म, कुणी अर्जुन तर केवळ मृत्युंजय वाचून महाभारत कळलेले म्हणतात कर्ण.
संघाच्या एकात्मता स्तोत्रात "भीष्मो धर्मस्तथार्जुन:" असा उल्लेख आहे. त्यात भीमाचा उल्लेख नाही. मी मागे जेव्हा एकात्मता स्तोत्रावर असलेल्या पुस्तकाची मालिका केली होती तेव्हा याबद्दल बोललो होतो की यात भीम असायलाच पाहिजे. कारण माझ्या मते महाभारताचा नायक जर कुणी असेल तर तो आहे भीम! कधीही कर्तव्यात चुकला नाही, कधीही संभ्रमात अडकला नाही, कधीही स्वतःच्या गरजा, इच्छा यांच्यासाठी कोणतीही चूक केली नाही, सगळ्या कठीण प्रसंगात सर्वात पुढे उभा राहून संकट पूर्ण परतवून लावलं आणि युद्धात सगळ्या धृतराष्ट्र पुत्रांचा एकट्याने वध केला. याहून अधिक काय लागतं नायक होण्यासाठी. तरीही नायक म्हणून भीमाचे नाव लगेच कुणाला आठवत नाही...
तो जेव्हा लहान होता तेव्हाच शकुनी, दुर्योधन आणि भावंडांना कळालं होतं की हाच खरा शत्रू आहे. हा गेला की बाकीच्यांना सहज लोळवू. त्यामुळे बालपणात ज्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असा पांडव भीमच. त्याला लाडूतून विष देऊन, बांधून नदीत टाकलं. हा नाग लोकात पोहोचला, तिथे त्यांचा विश्वास संपादन करून अधिक बलशाली होऊन पुन्हा परतला. इथून पुढे प्रत्येक संकटात भीमाने पुढे जाऊन सर्वांना वाचवलं, सावरलं.
असं असूनही भीमाला महाभारताचा नायक म्हणण्यात येत नाही हा मोठा अन्याय आहे. स्वयंभू या पुस्तकातून हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न प वि वर्तकांनी केला होता. महाभारत समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी स्वयंभू नक्की वाचावे.
Monday, October 5, 2020
पुस्तक परिचय - उत्तरकांड

Friday, September 4, 2020
पुस्तक परिचय : या सम हा

Saturday, August 15, 2020
अखंड भारत संकल्प दिन
Thursday, July 30, 2020
वेगळाच "दोन मी"
Saturday, July 25, 2020
पराभूतांचा इतिहास?
ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात अलक्षेन्द्राने भारतावर हल्ला केला. त्याने मध्यआशिया पूर्ण जिंकला होता. पुरूराजाशी झालेल्या लढाईत त्याची प्रचंड हानी झाली. तरीही पुढे जाण्याची त्याची इच्छा होती. पण त्याची सेना मगध सेनेची संख्या (दोन लाख पायदळ, ऐंशी हजार घोडदळ, आठ हजार रथ आणि सहा हजार हत्तीदळ) ऐकूनच गर्भगळीत झाली आणि सेनेने पुढे कूच करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला तक्षशिलेच्या पुढे भारतात येता आले नाही. परत जाताना तो मेला. शकांनी ख्रिस्तपूर्व ८० ते इस १५० या सव्वादोनशे वर्षात उत्तरपश्चिम (आजचा पाकिस्तान) भागात राज्य केलं. पण गौतमीपुत्र सातकर्णीने शकांना संपूर्ण हरवले. सोबतच जवळपास संपूर्ण भारत राजकीयदृष्ट्या एका राज्यात आणला. इस चौथ्या शतकापर्यंत जवळपास साडेतीनशे वर्ष कुशाणांनी उत्तर आणि पश्चिम भारतावर राज्य केलं. पण पुढे कुशाणांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली. गुप्त साम्राज्याने कुशाण साम्राज्य संपवले. पाचव्या शतकाच्या मध्यावर भारतावर हूणांनी हल्ला केला होता. हे मध्य आशियातील लोक होते. यांना काही वर्षातच स्कंदगुप्ताने हरवले. हूणसुद्धा पंजाब पार करू शकले नाहीत. म्हणजे या आक्रमकांपैकी कुणीही पंजाब पार करून भारतात येऊ शकला नाही.
इस्लाम स्थापन झाल्यानंतर भारतावर आक्रमणे वाढली. बाराव्या शतकात पहिल्यांदा कुणा इस्लामी राज्यकर्त्याला भारतात प्रवेश करता आला. तोवर राजस्थान मधील बाप्पा रावळ, सिंध मधील राजा दाहीर, काश्मिरातील ललितादित्य, कन्नौज येथील यशोवर्मन यांनी सातव्या शतकापासून सुरु असलेले हल्ले नुसते थोपवले नाहीत तर पुढे दोन शतके कुणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही असा हग्या मार दिला. पुढे गझनीने हल्ला केला. पण गझनीच्या लागोपाठच्या हल्ल्यानंतर पुन्हा १०० वर्ष भारतावर इस्लामी हल्ला झाला नाही. पुढे घौरीने हल्ला केला. तिथून भारतावर इस्लामी आक्रमण जास्त होत गेलं. बख्तियार खिलजीच्या आक्रमणाने नालंदा विद्यापीठ जाळले गेले. तिथून पुढे भारतीय राजांची सत्ता कमकुवत होत गेली. पण तरीही भारतीयांची परकीय आक्रमकांना विरोध करण्याची वृत्ती कुठेही कमी झाली नाही. चौदाव्या शतकात तैमूरने आक्रमण केलं. रामप्यारी चौहान आणि तिच्या साथीदारांनी गनिमीकाव्याने लढा देऊन तैमूरला आत्यंतिक जखमी करून माघार घ्यायला लावली. अखेरीस त्याच जखमांनी तैमूर मेला.
या इसपूर्व चौथं शतक ते इस बारावं शतक या दीड हजार पेक्षा अधिक वर्षांत भारताने काय काय केलं...राज्यव्यवस्थेत: इस पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत कम्बु, कौंडिण्य, चोल आणि शैलेंद्र राजांनी दक्षिण भारत आणि आग्नेय आशियावर आपले प्रभुत्व गाजवले. पण आग्नेय आशियात राज्य असं केलं की तेथील स्थानिक जनता त्यांना आजही आक्रमक मानत नाही, चंद्रगुप्ताने ग्रीकांना पराभूत केले, समुद्रगुप्ताने हे राज्य वाढवले आणि पुढे अशोकाचे मौर्य साम्राज्य हे संपूर्ण भारतभर होते, मौर्य वंशानंतर शृंग वंशाचे राज्य पुष्यमित्राने स्थापन केले. तेही संपूर्ण भारतभर होते. खारवेल आणि पुष्यमित्र यांनी एकत्र येऊन दिमित्रीस पराभूत केले, शालिवाहनाने सुटे झालेली भारतीय राज्ये पुन्हा एका अमलाखाली आणली, पुढे हर्षवर्धनाने पुन्हा विस्कळीत झालेली राज्ये एकत्र आणून मोठं साम्राज्य उभं केलं, पूर्वांचलातील भास्कर वर्मा यांनी हर्षवर्धनाशी विशेष मैत्री ठेऊन अनेक युद्धे एकत्रित जिंकली, यशोधर्माने हूणांचे राज्य संपवले, कृष्णदेवराय यांनी विजयनगरचे साम्राज्य वाढवले, प्रोलय आणि कप्पय या दोघा मसुनूरी नायकांनी आंध्रातील इस्लामी राज्य संपवले
ही सगळी आक्रमणे आणि त्याला विरोध सुरु असताना कला, संस्कृती आणि तत्वज्ञान यात: तिरुवल्लुवर यांनी जीवनविषयक तत्वज्ञान स्थानिक भाषेत सहज सांगितले, शंकराचार्यांनी भारत पुन्हा एकदा एका सूत्रात बांधला, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, रामानुजाचार्य यांनी वेदान्तावर नवीन भाष्ये करून लोकांना जीवन सुलभ करून सांगितले, सिंध मध्ये झुलेलाल यांनी इस्लामी आक्रमकांना न जुमानता हिंदू धर्म तेवत ठेवला, चैतन्य महाप्रभूंनी भक्तीच्या सीमा प्रचंड विस्तारल्या, नायन्मार या शैव आणि अलवार या वैष्णव संतांनी दक्षिणेत जातीभेद उच्चाटनाचे महत्वाचे कार्य केले, बसवेश्वरांनी वीरशैव पंथ स्थापन केला. यातही जातिभेदाला कोणताही थारा नव्हता, गुरु नानक देव यांनी शीख पंथ स्थापन केला, हरिहर आणि बुक्कराय यांना प्रेरणा देऊन त्यांचे राज्य स्थापन होण्यात सायनाचार्य आणि माधवाचार्य यांनी महत्वाची भूमिका निभावली आणि विजयनगरचे हिंदू साम्राज्य उभे राहिले, ज्ञानेश्वरांनी गीतेचे ज्ञान प्राकृतात सांगितले, कालिदासांनी अनेक काव्ये लिहिली, अनेक मंदिरे, लेण्या तयार झाल्या.
विज्ञानात: भास्कराचार्यांनी अनेक गणिती सिद्धांत मांडले, सोबतच गुरुत्वाकर्षणाबद्दलही सांगितले (न्यूटनच्या आधी सुमारे ६०० वर्ष), नागार्जुनाने अनेक रासायनिक प्रयोग करून धातुविज्ञान सिद्ध केले, आर्यभट्टांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत इस ५व्या शतकात सांगितला (आणि त्यांना कुणी शिक्षाही केली नाही!!!)
याचा अर्थ हा की आक्रमणं होत होती परंतु भारतात ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती आणि तत्वज्ञान यात काम होत राहिलं. म्हणजे ही केवळ आक्रमणे होती. आक्रमणे झाली कारण आपण समृद्ध होतो. आपण आक्रमणे केली नाहीत कारण आपण सुसंकृत होतो. आपण पराभूत नव्हतो आणि आपण पारतंत्र्यातही नव्हतो.
मोगल आल्यानंतर तर आपल्याला अकबर द ग्रेट पासून ते औरंगजेब कशा टोप्या विकायचा तिथवर सांगितलं जातं. पण अकबराने केलेले अत्याचार त्याच्या वलयात सांगितले सुद्धा जात नाहीत. महाराणा प्रतापांनी अकबराने जिंकलेला ८०%पेक्षा अधिक भाग पुन्हा जिंकला होता हे आपल्याला माहीतच नसते. औरंगजेबाने पूर्वांचलावर केलेला हल्ला लाचिद बडफुकन यांनी असा परतवून लावला की पुन्हा औरंगजेबाने पूर्वांचलाकडे स्वारी केलीच नाही. शिवाजी महाराजांनी याच काळात स्वराज्य उभं केलं. औरंगजेबाच्या नाकाखाली बुंदेलखंडात छत्रसालांना स्वराज्य उभं करण्यास प्रवृत्त केलं. महाराज गेल्यावरही संभाजी महाराजांनी लढा सुरू ठेवला. औरंगजेबाने संभाजी राजांना अत्यंत क्रूरपणे मारल्यानंतरही राजाराम महाराज आणि नंतर ताराराणी यांनी त्याला स्वराज्याचा घास घेऊ दिला नाही. उलट औरंगजेब अखेरीस याच मराठी मातीत गाडला गेला.
पुढे शाहू छत्रपती परतून आल्यावर बाळाजी विश्वनाथ यांच्यासह त्यांनी स्वराज्याची घडी पुन्हा बसवली. त्यावर कळस चढवला तो थोरल्या बाजीरावांनी. बाजीरावांच्या काळातच भारतात बहुतेक मोठ्या भूभागावर पुन्हा स्वराज्य आलं होतं. कारण नाव जरी मोगलांचं असलं तरी राज्य मराठेच करत होते. पुढे अटकेपार झेंडे आणि नंतर पानिपत झालं. पण पानिपतानंतर केवळ १० वर्षात पुन्हा ते वैभव मराठा साम्रज्याने पाहिले. शिवाय पंजाबात महाराज रणजितसिंहांचे राज्य सुरू झाले. या राज्याने अब्दाली आणि त्याच्या राज्याला मोठा शह दिला आणि पुन्हा त्या बाजूने पंजाबच्या पुढे कोणतेही आक्रमण येऊ शकले नाही. म्हणजे उणेपुरे ३०० वर्ष मोगलांनी भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. पण तेही कधी संपूर्ण भारत त्यांच्या ताब्यात घेऊ शकले नाहीत. मात्र या वर्षांत ज्ञान-विज्ञानात असलेली भारताची प्रगती थांबली.
इंग्रजांनी भारत हा मराठ्यांकडून ताब्यात घेतला. ही अत्यंत स्पष्ट बाब आपल्याला इतिहासात शिकवलीच जात नाही. १८१८ मध्ये जेव्हा दुसरा बाजीराव हरला तेव्हाही इंग्रजांना भीती मराठ्यांकडूनच होती. त्यामुळेच या कमी घातक असलेल्या बाजीरावाला इंग्रजांनी पार उत्तर हिंदुस्थानात नेऊन ठेवले. तरीही इंग्रजांची भीती खरी ठरली आणि १८५७ च्या युद्धाची सूत्रे मराठ्यांकडे (राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे) आली. तिथून पुढे ९० वर्षे आपण पूर्ण पारतंत्र्यात होतो. असे असले तरी स्वातंत्र्याची आस मात्र कायम होती आणि त्यासाठी प्राणपणाने अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले.
आपली लूट झाली, पण आपण केवळ लुटले गेलो नाहीत तर लुटारूंना आपण पळवून लावलं आहे. आपला इतिहास पराभूतांचा इतिहास नाहीये तर दैदिप्यमान असा स्वातंत्र्येच्छू, पराक्रमी, ज्ञानी आणि सहिष्णू लोकांचा इतिहास आहे.
