Friday, July 29, 2022

धुरंधर - नानासाहेब पेशवे!

 आपल्या पाठ्यपुस्तकांनी मोगल इतिहास भरभरून सांगितला. शिवरायांचा इतिहास मोडून सांगितला. पुढे संभाजी महाराज ते दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांपुढे हार मानली हा कालखंड पूर्ण वगळला. मग हा इतिहास आपल्यापुढे अनेक इतिहासकारांनी तर मांडलाच पण कादंबरी रूपात लेखकांनी तो सोपा करून आपल्यापुढे आणला. त्यात छावा, राऊ, पानिपत आणि स्वामी ही पुस्तके विशेष गाजली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अंगार चेतवला, त्याचा वणवा केला बाजीरावांनी. त्यात मोगल पूर्ण भरडले गेले. पण दुर्दैवाने बाजीराव वयाच्या चाळीसाव्या वर्षी निवर्तले. नंतर नानासाहेबांनी पेशवाई सांभाळली, पण त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दोन वर्षात पानिपत झालं. तरीही पुढे माधवरावांच्या कारकिर्दीत केवळ दहा वर्षांत संबंध भारतभर मराठेशाही नांदू लागली. आजोबा बाजीराव आणि नातू माधवराव यांचं कार्य अतुलनीय होतं. त्या कार्याला सामान्यांच्या मनात पोहोचवलं राऊ आणि स्वामी या दोन कादंबऱ्यांनी. पण या दोघांच्या मधला वीस वर्षांचा कालखंड कुणी कादंबरी रूपात कधी मांडला नव्हता. ते काम तरूण इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे याने केलं आहे.
कौस्तुभचं हे पुस्तक जाहीर झालं आणि लगेच मागवलं. पण माझ्या हाती येऊन वाचून पूर्ण व्हायला जरा वेळ लागला.
अगदी खरं सांगतो - मला नानासाहेब हे याआधी केवळ पानिपत पुरते ठाऊक होते. त्यातही त्यांनी पानिपतच्या धामधुमीत केवळ ९ वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आणि गोविंदपंत बुंदेल्यांना नाटकशाळा पाठवा म्हणून पत्र पाठवलं (दोन्ही गोष्टी पानिपत कादंबरीत वाचल्या) एवढं माहित होतं. याशिवाय त्यांनी कसं मराठा आरमार बुडवलं वगैरे गोष्टी ऐकीव माहित होत्या. पण त्यांच्यावर खूपच कमी लेखन झालं आहे आणि जे झालंय ते त्यांच्यावर अन्याय करणारं आहे... वाईट गोष्ट अशी की ज्या राघोबाने पानिपतची जबाबदारी टाळली, कोवळ्या माधवरावांना पेशवाई मिळाल्यापासून त्रासच दिला, नारायणरावांना मारेकरी घालून मारलं, अश्या माणसावर "राघोभरारी" ही ऐतिहासिक कादंबरी अनेक वर्षांपूर्वीच निघाली. पण नानासाहेबांवर एकही कादंबरी निघू नये हा त्यांच्यावर मोठा अन्याय होता. 
मागच्या वर्षी नानासाहेबांच्या कार्यावर श्री उदय कुलकर्णी यांचा इंग्रजीतून शोधग्रंथ आला आहे, त्याचं मराठी भाषांतरही अशात आलं आहे. खाली मध्ये दोन्ही पुस्तकांच्या लिंक्स आहेत.
असं असलं तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांना ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा कादंबरीतून लवकर कळतं. हे काम कौस्तुभने केलं आहे. 

नानासाहेबांना पेशवे म्हणून काम करताना सुरुवातीपासून अनेक प्रकारची संकटे/आव्हाने आली. त्यांनी ती आपल्या अतुल्य राजकीय आणि सामरिक बुद्धीने लीलया पेलली आणि परतवली. सुरुवातीला बाजीरावांना पेशवाई मिळताना जी राजकारणं झाली ती नानासाहेबांनाही चुकली नाहीत. उत्तरेत मोठी स्वारी झाली. ज्या माळव्याच्या सनदा बाजीरावांच्या वेळेपासून मिळायच्या बाकी होत्या त्या नानासाहेबांनी मिळवल्या. त्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ मुलुखगिरी केली. त्यातही रघुजींच्या विरोधात सेना उतरवली म्हणून अनेक प्रवाद निर्माण झाले. ते सगळे छत्रपती शाहूंच्या समोर खासगीत संपुष्टातही आणले. पुढे राजपुतांच्या गादीवरून शिंदे आणि होळकर यांच्यात सुद्धा काही काळ वितुष्ट आले. तेही राजपूत आणि शिंदे-होळकर यांना समजुतीत घेऊन संपवले. शाहू महाराजांनी अचानक पेशवाई काढून घेतली तेव्हा काही महिने नानासाहेब सातारच्या बाहेर राहुट्यांमध्ये राहिले. जोवर महाराजांचा पूर्ण विश्वास पूर्ववत होत नाही तोवर शांतपणे वाट पहिली आणि शाहूंनी घेतलेली परीक्षा उत्तीर्ण झाले. कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या न राहता एकच गादी असावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाहीत. कोल्हापूरचे संभाजी राजे बाजीरावांच्या काळात निजामाला जाऊन मिळाले होते. तरीही तो राग न धरता या दोन गाद्या एकत्र होऊन एक मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी शाहू महाराजांनी दत्तक विधान करताना संभाजी महाराजांना दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. पण ते झालं नाही. नंतर सदाशिवरावांना कोल्हापूरची पेशवाई देऊन किमान या दोन गाद्यांमध्ये कोणतेही वितुष्ट येणार नाही ही तजवीज करून ठेवली. आपण छत्रपतींचे सेवक आहोत आणि थोरल्या शिवप्रभूंचे अनुयायी आहोत हे सतत दाखवून दिलं. त्यासाठी काशी, मथुरा आणि अयोध्या ही क्षेत्रे सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काही प्रयत्न आपल्याच लोकांच्या घाबरण्यामुळे मागे पडले तर काही वेळा तेवढा वेळ देता आला नाही. मात्र "काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्तसिंधू मुक्त करा" हे महाराजांचे शब्द कधीच विसरले नाहीत. 
राज्यकारभारात आणि एकूण महसूल, मोजणी या सगळ्यात सुसूत्रता आणली. जे करायला बाजीरावांना कधी वेळ मिळाला नाही अश्या अनेक गोष्टी केल्या. शनिवारवाडा बिना तटबंदीचा होता. त्याची तटबंदी पूर्ण केली. दरवाजा मुद्दाम उत्तरेला ठेऊन दिल्लीवर आमची नजर आणि सत्ता दोन्ही आहे हे दाखवून दिले. कात्रजच्या तलावातून पुण्यात सर्व मोठ्या घरांमध्ये पाणी फिरतं ठेवलं. आजही तो नळ सुरु आहे.
कुटुंबात सदाशिवरावभाऊंना राज्यशिक्षणासाठी सातारला ठेवलं. गुरूंना सतत सन्मान दिला. बाजीराव आणि मस्तानी बाईसाहेबांचा मुलगा कृष्णा - समशेर बहाद्दर - याला कधीच अंतर दिलं नाही. त्याची वाढ आणि शिक्षण याकडेही लक्ष पुरवलं. विक्षिप्त राघोबांना सांभाळलं. विश्वासराव आणि माधवरावांवरही सतत लक्ष ठेऊन त्यांचंही शिक्षण सुरू राहील हे बघितलं. 

एक ना अनेक कित्येक गोष्टींनी त्यांचं आयुष्य भरलेलं आहे. अब्दाली पहिल्यांदा आला तेव्हा मराठा सैन्य तिथे पोहोचण्याच्या आधीच तो परत फिरला होता. दुसऱ्यांदा आल्यावर मात्र तो पुन्हा जिवंत जाऊ नये यासाठी पेशव्यांच्या घरातून कुणी जबाबदारी घ्यावी यावर ते ठाम राहिले. त्यांची स्वतःची तब्येत साथ देती तर तेच रणांगणावर असते. परंतु ते व्हायचे नव्हते. त्यांच्या जागी राघोबा जावेत म्हणून प्रयत्न झाला. मात्र राघोबा गेले नाहीत. ती जबाबदारी घेतली त्याच्या लाडक्या सदोबाने. पानिपत हारूनही अब्दालीने हिंदुस्थान मराठ्यांच्या हवाली केला. ही मराठ्यांची ताकद होती. ती कमावली बाजीरावांनी तर वाढवली नानासाहेबांनी. भाऊ आणि नाना ही जोडी अगदी चिमाजी आणि बाजीरावांचीच असावी अशी होती. त्यामुळे विश्वासराव गेले त्याहूनही अधिक दुःख त्यांना भाऊ गेल्याचं झालं. स्वतः विश्वासरावसुद्धा पत्रात म्हणाले होते की, "आमच्या सारखे पुत्र तुम्हाला पुन्हा मिळतील पण भाऊंसारखा भाऊ मिळणार नाही" भाऊ गेल्याने नानासाहेब खचले आणि त्यातच त्याची अखेर झाली.

कादंबरी रसाळ आहे. भाषा ओघवती आहे. त्यात सनावळ्या नाहीयेत. मात्र कौस्तुभ "पुराव्यानिशी शाबीत" करण्याजोगे नसेल तर लिहीत नाही. ही कादंबरीही त्याला अपवाद नाही. कित्येक ऐतिहासिक कागदपत्रे वाचून, समजून घेऊन, त्यांची संगती लावून ही कादंबरी लिहिली गेली आहे. केवळ तिशीत असताना कौस्तुभ ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहितो त्याला तोड नाही. त्याच्या अनेक कादंबऱ्या याव्यात, पुस्तके यावीत आणि आम्हाला वाचायला मिळावीत ही प्रार्थना. 

आज बाबासाहेब पुरंदरेंची जयंती! कौस्तुभला त्यांचे आशीर्वाद सतत मिळाले आहेत. बाबासाहेबांचं बोट धरून तो त्यांच्या वाटेवरून चालतोय. खूप शुभेच्छा!

- ज्ञानेश 

धुरंधर - पेशवा नानासाहेब
लेखक - कौस्तुभ कस्तुरे 
प्रकाशक - कौस्तुभ कस्तुरे बुक्स 
पाने - ४४०
किंमत - र ४५०

धुरंधर: https://www.amazon.in/Dhurandhar-Peshwa-Nanasaheb-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/dp/9355932235/ref=sr_1_4?qid=1659104818&refinements=p_27%3AKaustubh+Kasture&s=books&sr=1-4

The Extraordinary Epoch of Nanasaheb Peshwa - https://www.amazon.com/Extraordinary-Epoch-Nanasaheb-Peshwa/dp/8192108058
भाषांतर - https://www.amazon.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1-Nanasaheb/dp/8192076911/ref=sr_1_1?qid=1659097948&refinements=p_27%3AUday+S.+Kulkarni&s=books&sr=1-1

Wednesday, July 27, 2022

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

जाणाऱ्यांचा वाटा साऱ्या मोजताना दिसं सारा
रिती अशी मातोश्री उते
अदू कसा हसू हसू राऊताला कसे पिसू
खोल खोल मी आता रुते
तरी नाही अळिमिळी
तुझीमाझी निष्ठा काळी
कुंथताना दुखावून रडशील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कुणी नाही भवनातून सगळीकडे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा
अजून काही जातीलच आणि "पुन्हा येईन"च
तिकडून नाथा आणि देवा
वाझियाचे कोटी शत
थैल्यांचे लाखो थाट
रोज रोज आठवत राहतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

इथे वांद्र्याशी माझ्या वेड्या राऊताच्या पाशी
रोजरोज गप्पा झाडा
माझं माझं माझ्या माझ्या माझी माझी माझे माझे
सारा सारा माझा-माझा राडा
पडे माझ्या वाटेतून
आणि मग फुलांतून
जातानाही पायभर चिख्खल ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

आता फक्त बोलायाचे टोमणेच मारायाचे
धरूनिया माईकाचा दांडू
सामन्यात येऊ देत बाकी कॉपी करतात
राऊताच्या ष्टायलीत भांडू
जरा कोर्ट खुलू दे ना
धनुष्यही जाऊ दे ना
मग सेना बंद करून झोपूया ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

Thursday, July 7, 2022

जमिनीखालील अद्भुत नेटवर्क

आम्ही ४ वर्षांपूर्वी आमचं पाहिलं मियावाकी जंगल लावलं. तेव्हा संभाजीनगर मधील सर्वात जुन्या नर्सरीचे तरुण संचालक सागर साकला यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. ते म्हणाले होते की, "झाडांना कळतं!". त्यावर अर्थातच आम्ही विश्वास ठेवला आणि तीनच वर्षात स्वयंपूर्ण असं छोटंसं जंगल तयार झालं. पण झाडांना कळतं कसं? एकमेकांना काय हवं, नको ते समजून कसं घेतात? जंगलातील एखाद्या झाडावर रोग पडला तर तो जंगलभर न पसरता कसा थांबतो? एका झाडाला काय हवं आहे हे त्याच्या शेजाऱ्याला कसं कळतं? त्याच्यातील संवाद कसा चालतो?

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचण्यात आला. जमिनीखालील अद्भुत नेटवर्क! मग त्यावरील अजून काही लेख बघितले. झाडांना एकमेकांची सुखदुःखे कशी कळतात ते उलगडण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. हे आहे झाडांचं www म्हणजे Woodwide Web. हे माती, जमिनीवर पडलेली पाने, झाडाच्या काटक्या आणि मोठ्या प्रमाणातील कार्बन मॉसच्या खाली विकसित होत राहतं. जंगलाच्या वर दिसणाऱ्या मातीच्या थराखाली, झाडांच्या मुळांशी गुंफलेले, विविध बुरशीचे हे एक जाळे आहे. याद्वारे झाडं एकमेकांशी बोलतात. आपल्या अडीअडचणी एकमेकांना सांगतात. 

आपण जेव्हा बुरशी म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त मशरूम दिसतात. पण मशरूम म्हणजे बुरशीचे "फळ" आहे. बुरशीजन्य मायसेलियमचे (Mycelium) एक विशाल नेटवर्क झाडांच्या मुळांशी मातीत असतं. मायसेलियम म्हणजे बुरशीजन्य अतिशय लहान "धागे" असतात जे झाडाच्या मुळांभोवती गुंडाळलेले असतात. हे धागे एकमेकांना जोडलेले असतात. या मायसेलियमने विणलेल्या जाळ्याला "मायकोरायझल (Mycorrhizal) नेटवर्क" म्हणतात. या नेटवर्क मधून कोणत्या झाडाला पाणी, नायट्रोजन, कार्बन आणि इतर खनिजे हवी आहेत ते अन्य झाडांना कळतं आणि ते एकमेकांना मदत करतात. जर्मन वनमाळी (फॉरेस्टर) पीटर वोहलेबेन (Peter Wohlleben) यांनी या विशाल जाळ्याला "वुडवाईड वेब" असे नाव दिले. पीटर वोहलेबेन यांनी आपल्या "The Hidden Life of Trees" पुस्तकात या संशोधनाबद्दल लिहिलेलं आहे. एकूणच झाडांच्या सहजीवनाबद्दल आपल्याला जे काही ज्ञान आहे त्यात ही मोठी क्रांती आहे. झाडं सजीव असतात ही अशीच एक क्रांती जगदीश चंद्र बसूंनी केली होती. त्याच क्रांतीची ही बहुदा पुढची पावलं आहेत. वोहलेबेन यांनी झाडे आपल्याला वाटतात त्याहून कितीतरी अधिक सतर्क, सामाजिक, अत्याधुनिक आणि अतिशय हुशार असतात हे दाखवून दिलं आहे. लवकरच पुस्तक वाचेन तेव्हा कदाचित अजून माहिती लिहू शकेन.

निरोगी जंगलांमध्ये, प्रत्येक झाड या नेटवर्कद्वारे इतरांशी जोडलेले असते, ज्यामुळे झाडांना पाणी आणि पोषक तत्वे वाटून घेता येतात. विशेषतः सावलीच्या भागात वाढणाऱ्या रोपांपर्यंत प्रकाश संश्लेषण करण्यासाठी थेट सूर्यप्रकाश पोहोचत नाही. पण महाजन सर सांगतात त्याप्रमाणे हे "सूर्यप्रकाश संश्लेषण" नसून, "प्रकाश संश्लेषण" आहे. तरीही जर प्रकाश कमी पडला तर जगण्यासाठी, रोपटे मायकोरायझल नेटवर्कद्वारे आपली गरज उंच झाडांना सांगतात आणि उंच झाडांनी पाठवलेल्या पोषक द्रव्यांवर अवलंबून असतात. याशिवाय झाडे त्यांच्या नातेवाईकांची, म्हणजे आपल्या प्रजातीची, मुळं ओळखतात आणि बुरशीजन्य नेटवर्कद्वारे कार्बन आणि पोषक द्रव्ये पाठवताना ती आपल्या नातेवाईकांना जास्त अनुकूल कशी राहतील हेही बघतात.

अर्थात यात बुरशीचाही फायदा असतोच. या संदेशांचा देवाणघेवाणीत बुरशी पोषक द्रव्यातील ३०% कर्ब (साखर) स्वतः ठेवून घेते. फॉस्फरस आणि इतर खनिज पोषक द्रव्ये मायसेलियममध्ये जमा होतात, जी नंतर झाडांकडे सुपूर्द केली जातात आणि वापरली जातात. या नेटवर्कमध्ये अर्थातच जुनी-जाणती वृक्ष मंडळी जास्त मदत करतात. यांना mother-tree, मातृवृक्ष म्हटले जाते. अगदी आई बाळांना दूध पाजते, सांभाळते तशी ही मोठी झाडं रोपट्यांची काळजी घेतात. या अनुभवी झाडांची मुळं मातीत अतिशय खोल जातात. तेथील पाण्याचे स्रोत शोधतात आणि ते पाणी वर घेऊन येतात. त्यातीलच काही पाणी पोषकद्रव्यांसह जमिनीच्या वरच्या भागात पाठवतात. उंबराच्या मुळांतून पाणी येतं हे आपल्याला माहित आहेच. ते औषधी असतं. पण ते येतं कारण उंबरासारख्या भरपूर आयुष्य असलेल्या झाडाला अन्य झाडांना मदत करायची असते. झाडांच्या या मायकोरायझल नेटवर्कद्वारे, ही झाडे त्यांच्या शेजाऱ्यांना आजार झाला असेल तर ते संकेतांद्वारे ओळखतात आणि त्यांना औषधेही पाठवतात. आपण कधी पूर्ण तोडलेला वृक्ष बघतो. त्याचा बुंधाच उरलेला असतो. त्यावर प्रकाशसंश्लेषण करणारी पानं नसतात. पण तरीही तो जिवंत असतो, कारण त्या भागातील अन्य झाडं त्याला पोषक द्रव्य पुरवत राहतात. मग मधूनच त्याच्या वठलेल्या बुंध्यावर एक नाजूक गाठ येते आणि नवीन फांदी तयार होते. 

बऱ्याचदा ही झाडं एकमेकांवर खूप अवलंबून असतात. जर दोन झाडं एकमेकांसोबत वाढलेली असतील तर प्रकाश, पोषक द्रव्य हे एकमेकांचा विचार करत वाटून घेतात. त्यात जर दोघांपैकी एक झाड गेलं, तर बहुतेक वेळा दुसरं झाडसुद्धा काही काळात मरण पावतं असं निरीक्षण वोहलेबेन यांनी केलं आहे. डार्विनच्या काळापासून, आपल्याला असंच सांगितलं गेलंय की प्रत्येक सजीव प्रजातीमध्ये आणि म्हणूनच झाडांमध्येही स्पर्धा असते. झाडं पाणी, पोषक द्रव्य आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणारे असतात. मग त्यात जे जिंकतात ते उंच होत जातात. हरलेले बिचारे सावलीत जातात आणि मरतात. आता त्या कल्पनेचे खंडन करणारे वैज्ञानिक पुरावे समोर येत आहेत. यातून हेच दिसून येतं की समान प्रजातींची झाडे तर एकमेकांना मदत करतातच शिवाय बहुतेकदा इतर प्रजातींच्या झाडांशी युती करतात. जंगलातील झाडं सहकार्य करत, परस्परावलंबी नातेसंबंधात राहण्यासाठी विकसित झाली आहेत. कीटकांच्या वसाहतीप्रमाणे एकत्रित बुद्धिमत्ता राखून आहेत. उंचच उंच झाडांच्या शेंड्याकडे आपली नजर खेचली जाते, पण खरं काम सुरु आहे ते जमिनीखाली, आपल्या पायाच्या काही इंच खाली.

झाडे पोषक द्रव्य वाटून घेतात. इतर प्रजातींच्या झाडांशी युती करतात. मग डार्विनचा नियम त्यांनी स्पर्धा करावी असे सुचवत नाही का? खरं तर त्या नियमाप्रमाणे, झाडांनी सगळी संसाधने स्वतः वा आपल्याच प्रजातींना मिळतील असा प्रयत्न केला पाहिजे. पण ते तसं करत नाहीत. खरंतर म्हणूनच जास्त काळ जगतात, शेजाऱ्यांना मदत करत निरोगी स्थिर जंगल जिवंत ठेवतात. शेजारची झाडं मरत राहिल्यास जंगल उघडं पडतं. वाढलेल्या सूर्यप्रकाशामुळे, उरलेली झाडं अधिक प्रकाशसंश्लेषण करू शकतात आणि वेगात वाढू शकतात. परंतु ते असुरक्षित आणि अल्पायुषी ठरतं. कारण उन्हाळ्यात, अधिक सूर्यप्रकाश जमिनीवर येईल आणि जमीन कोरडी करेल. जमिनीवर थेट सूर्यप्रकाश पडत गेला तर मायकोरायझल नेटवर्क कमकुवत होते. शिवाय वादळवाऱ्यामुळे जंगलाचा विध्वंस होईल. यातील काहीच होऊ नये म्हणून जंगलात झाडं केवळ स्पर्धा करत नाहीत तर सहजीवन जगतात.

रासायनिक आणि हार्मोनल संपर्कयंत्रणेशिवाय झाडं इलेट्रीकल सिग्नल, high frequency चा आवाज सुद्धा काढतात आणि त्याद्वारे संभाषण करतात. अर्थात यावरील संशोधन अजून सुरू आहे. हळूहळू झाडांचं हे संभाषण मानवाला कळेलही... त्याचा वापर माणूस कसा करेल हे मात्र सांगता येणार नाही... :( 

"एका काडातील क्रांती" मध्ये फुकुओका म्हणतात की पाश्चिमात्य संशोधक एका वेळी एक प्रक्रिया घेऊन अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना जे ज्ञान मिळतं ते पृथक असतं. अगदी तेच या संशोधनांमधून पुढे येत आहे. हे संशोधन करणारे संशोधक म्हणतात की या प्रक्रिया एकेकट्या होत नाहीत. जेव्हा ते जंगलात फिरतात, तेव्हा त्यांना संपूर्ण गोष्टीचा एक आत्मा जाणवतो, सर्वकाही एकसंधपणे कार्य करते, परंतु त्यांच्याकडे हे मोजण्याचा कोणताही मार्ग नाही. ते मायकोरायझल नेटवर्क देखील मोजू शकत नाहीत. कारण समृद्ध जंगलातील एक चमचा मातीमध्ये अनेक किलोमीटर लांब बुरशीजन्य तंतू असतात.

झाडांनी त्यांच्यासाठी अतिशय सुंदर, समृद्ध असं सहजीवन विकसित केले आहे. मायकोरायझल नेटवर्क हा या सहजीवनाचा अविभाज्य भाग आहे. बुरशी आपल्या स्वतःच्या हितासाठी तर काम करतेच, ते करत असताना, लहान रोपट्यांपासून ते अगदी मोठ्या झाडांचे आरोग्य आणि जगण्याचीही सोय करते. माणसांमध्ये जशी संपर्कातून एकमेकांच्या गरजा पूर्ण करणारी, आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी काम करणारी यंत्रणा आहे तशीच, किंबहुना त्याहून अधिक सक्षम आणि परोपकारी यंत्रणा जंगलात झाडांनी आणि बुरशीने एकत्र येऊन, मायकोरायझल नेटवर्कने तयार केलेली आहे. ही यंत्रणा पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी महत्वाची आहे त्याद्वारेच जंगल निरोगी राहते. आता तुम्ही पुन्हा जेव्हा जंगलात जाल तेव्हा झाडांमधून फिरत असताना, तुम्ही चालताय त्या जमिनीखालच्या विकसित संपर्क यंत्रणेचा विचार नक्की करा. 

- ज्ञानेश

संदर्भ:
https://www.nationalforests.org/blog/underground-mycorrhizal-network
https://www.smithsonianmag.com/science-nature/the-whispering-trees-180968084/

Friday, April 29, 2022

निजाम, इंद्रेशजी आणि संघ

 साधारण तीन चार दिवसांपूर्वी इंद्रेशजींना भाग्यनगर (हैद्राबाद)ला बोलावले होते. उस्मानिया विद्यापीठात निजामाच्या मुलासोबत त्यांचं भाषण होतं. कार्यक्रमात साहजिकच स्थानिक मुसलमान होते. पेपरमध्ये बातमी आली की इंद्रेशजींनी निजामाची स्तुती केली. निजाम हा आधुनिक शिक्षणाला महत्व देणारा होता, सेक्युलर होता वगैरे वगैरे... हे वाचून मला आश्चर्य आणि वाईट वाटलं. मग नेहमी मी जे करतो ते केलं. काही स्वयंसेवक मित्रांना ती बातमी पाठवली आणि मूळ व्हिडीओ शोधला. साधारण तासाभराचं भाषण होतं.

भाषणात कुठेही निजामाला आधुनिक शिक्षणप्रेमी वगैरे म्हटलं नव्हतं. त्याला सेक्युलर म्हणण्याचा तर प्रश्नच नव्हता. मात्र उस्मानिया विद्यापीठ स्थापन करताना निजामाने जागा आणि त्याकाळी पाच हजार रुपये दिले होते. त्यामुळे निजामाच्या उस्मानिया विद्यापीठात आलोय हा एक आणि दान दिल्याचा दुसरा एक उल्लेख सोडला तर निजामाबद्दल ते काहीही बोलले नाही. ते खरंही आहे. त्यामुळे त्यावर माझा तरी काही आक्षेप नव्हता, नाही!

मग पूर्ण भाषण कशावर होतं, तर आपली ओळख ही राष्ट्र म्हणून आहे. धर्म म्हणून नाही. यावर एकूण सगळा भर होता. कुणी जपान मधून आलाय तर जपानी आला असं म्हणतात, बौद्ध आला असं म्हणत नाहीत. अरेबियातून आला तर अरबी आला असं म्हणतात, मुसलमान आला असं म्हणत नाहीत. त्यामुळे जी काही ओळख आहे ती धर्माधिष्ठित नसून राष्ट्राधिष्ठित आहे. तीच ओळख सर्वांनी जपली पाहिजे आणि मिरवली पाहिजे यावर संपूर्ण भाषणात जोर होता. हे करताना त्यांनी कुठेही कुराणातले दाखले दिले नाहीत मात्र आपल्याला ओळख "मालिक ने दियी हैं" हे सांगत राहिले.

याशिवाय दुसरा मुद्दा होता तो म्हणजे भगवान एक आहे त्याची उपासना अनेक मार्गांनी होऊ शकते. एकं सत् विप्रा: बहुदा वदन्ति| या भारतीय / हिंदू वाक्यानुरूप त्यांनी बरंच काय सांगितलं. एकूण श्रोतेही त्यांना बऱ्यापैकी सहमत आहेत असं दिसत होतं.

यापुढे त्यांनी एक गोष्ट केली ति म्हणजे घोषणा. सुरुवात केली मादरे वतन हिंदुस्थान जिंदाबाद जिंदाबाद. मग इंग्रजी Mother India Long Live. मग हिंदी भारत माता की जय आणि शेवटी संस्कृत वंदे मातरम्. सर्व उपस्थितांनी या घोषणांमध्ये सहभाग घेतला. कुणीही काहीही आरडाओरडा केला नाही. यामुळे कुणाचं इमान दुखावलं गेलं का असा प्रश्नही त्यांनी विचारला. हा सगळा भाग छानच झाला.

अर्थात खटकणाऱ्या बाबी होत्याच -
१. त्यांनी अयोध्येत दुसरा नबी झाला असं म्हणाले. रोख प्रभू रामाकडे होता की नाही ते काही कळालं नाही. पण याची काय गरज ते समजलं नाही.
२. पैगंबर जेव्हा पुन्हा मक्केत आले तेव्हा त्यांनी समोपचाराने मक्केत जाऊ म्हटल्याचा दाखला दिला. हा संदर्भ नक्कीच चुकीचा होता
३. कोणत्याही नबीने (पैगंबराने) त्या काळातील रीतीप्रमाणे लग्ने कितीही केली असतील पण तलाक कधीच दिला नव्हता. त्यांनी आपल्या बायकांना कधी सोडलं नाही. म्हणूनच ते नबी पदाला पोहोचू शकले. त्यामुळे तुम्हीही तलाक देऊ नका वगैरे... हे असले लॉजिक का देतात काही समजत नाही
४. मुहम्मद पैगंबराचं भारतावर प्रेम होतं म्हणे. ते स्वतः कधी भारतात आले नाहीत पण भारताच्या दिशेने सुकून वाले वारे वाहतात असं कायतर बोलले

अर्थात खटकणाऱ्या गोष्टी असल्या तरी संघाचे प्रयत्न भारतीय कोणत्याही धर्माचा असो त्याची पहिली ओळख ही भारतीय हीच असावी. धर्मनिष्ठा या राष्ट्रानिष्ठेनंतर याव्यात. धर्माचं मूळ कुठेही असलं तरी आपण सर्व हे भरतीय मूळ असलेलो आहोत हेच सर्वांनी ध्यानात ठेवावं. आणि अखेरीस मक्का किंवा व्हॅटिकन हे भारतीयांचे धार्मिक मुख्यालय न राहता ते भारतातील व्हावे या दृष्टीने प्रयत्न दिसतात. कट्टरता कमी करण्याचा हाही एक मार्ग असू शकतो. तोही संघ अजमावून बघतोय. मुळात हिंदू माणसाला कोण कशी वैयक्तिक उपासना करतोय याबद्दल आक्षेप नसतो तसा संघालाही नाही. मात्र माझाच मार्ग तो योग्य आणि बाकीचे चूक यावर आक्षेप आहे. तेच या सगळ्या प्रयत्नाचे मूळ आहे.

सर्वात आधी मी सांगितलं की, मी काही स्वयंसेवक मित्रांशी बोललो. त्यात एका मित्राचं उत्तर हे अप्रतिम उत्तर होतं. "जोवर संघाच्या दैनंदिन कामावर याचा प्रभाव पडत नाही तोवर या बातम्यांकडे लक्षही द्यावं असं मला वाटत नाही". संघटना शंभरीकडे जातानाही संघकाम वाढत आहे याचं हे प्रमुख कारण असावं!!!

आज परम पूजनीय आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांची जयंती आहे. त्यांनी चार - पाच लहान मुलं सोबत घेऊन सुरू केलेली शाखा, संघ असाच वाढला आहे. तो वर्धिष्णू राहिलंच आणि बलशाली भारताचं स्वप्न साकार होईल याची खात्री आहे.

भारतीय नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!

इंद्रेशजींचं भाषण - https://m.youtube.com/watch?v=-k_3C2kp3gc

बातमीची लिंक - https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/rss-leader-all-praise-for-nizam-vii-rule/articleshow/90505480.cms

ब्रेनड्रेन की भारतदूत

 शीर्षटीप : आमचा सध्या परदेशात स्थायिक होण्याचा कोणताही विचार नाही!

आम्ही पहिल्यांदा जेव्हा परदेशात राहायला आलो त्याला आता १५ वर्षे होऊन गेली. त्यानंतर कधी भारतात कधी परदेशात असं करत एकूण जवळपास ८ वर्षे भारताबाहेर आहोत. पहिल्यांदा आलो तेव्हा एकूणच मित्रांमध्येही "इकडेच स्थायिक होऊ या" म्हणणारे फार कमी होते. तेव्हा एका भारतीयाने बेल्जियन नागरिकत्व घेतलं तेव्हा फार विचित्र वाटलं होतं. या माणसाला भारतीय नागरिकत्व सोडावंच कसं वाटलं याबद्दल त्याचा थोडा रागही आला होता. त्याला आता बराच काळ लोटला. गेल्या काही वर्षात इकडे स्थायिक होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. आत्ताच्या घडीला दक्षिण अमेरिका सोडली तर उरलेल्या सगळ्या खंडांमध्ये प्रत्यक्ष ओळखीचे लोक स्थायिक झालेले, नागरिकत्व घेतलेले आहेत. त्यांचा आता अजिबात म्हणजे अजिबातच राग येत नाही. उलट ही सगळी मंडळी भारताबाहेर राहून छान काम तर करत आहेतच शिवाय भारतीय संस्कृती तिथे घेऊन जात आहेत याबद्दल आनंदच आहे.

साधारण दीड वर्षांपूर्वी माझ्या एका भारतीय, नेदरलँड्समध्ये स्थायिक होत असलेल्या सहकाऱ्याने मला विचारलं, बेल्जियन नागरिकत्व केव्हा घेणार? कारण आम्ही येऊन-जाऊन असलो तरी साधारण सहा वर्षे बेल्जियममध्ये होतो. माझ्या तोंडून अगदी सहजपणे निघालं - I would die as an Indian not of any other nationality! यात काही राग नव्हता, पण एक प्रकारची अभिमानाची भावना होती. त्याला वाईट वाटलं की नाही माहित नाही. तो पुढे ही घटना विसरूनही गेला. त्यानंतर साधारण ३-४ महिन्यांनी माझ्या एका जवळच्या मित्राने बेल्जियन नागरिकत्व घेतलं. छान कुटुंब आहे. तिथे जाणाऱ्या भारतीयांना मदत करतात. शेजारच्या बेल्जियन लोकांना त्यांचा आधार वाटतो. सगळे सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम छान करतात. लेकरांना एक दोन भारतीय भाषा येतात. तिथे राहूनही ते भारत आपल्या सोबत घेऊन फिरताहेत. सोबतच आणखी काही मित्रांशी गप्पा झाल्या आणि त्यापैकी काहींना युरोपात स्थायिक व्हायचे होते. एकूणच मी ज्या तोऱ्यात "die as an Indian" म्हणालो त्याबद्दल माझं मलाच वाईट वाटू लागलं. गेल्या महिन्यात त्याला फोन करून दिलखुलास माफी मागितली आणि माफी मागण्याचं कारणही सांगितलं. तो तर विसरला होता, पण त्याला बरं वाटलं.

इकडे स्थायिक होण्यात व्यावहारिक अनेक फायदे असतील पण सोबत काही जोखिमासुद्धा आहेतच. मित्रांसोबत बोलताना त्यातील बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. त्यातील काही मुद्दे - 
- लहानपणापासून आपण काही स्वप्न पाहिलेलं असतं. बहुतेक वेळा ते भारतातील बाबी ध्यानात घेऊन पाहिलेलं असतं. ते स्वप्न परदेशात कितपत साकारता येईल ते सांगता येत नाही. काही Bucket list असेल, कायमस्वरूपी परदेशात राहून त्या list मधील किती गोष्टी सोडण्यासारख्या आहेत, किती बदलण्यासारख्या आणि किती पूर्ण करण्यासारख्या आहेत हे कधी कळतं, कधी नाही. एकूणच बरीच स्वप्नं रीसेट होतात.
- एक मोठा मुद्दा येतो तो म्हणजे किती वर्षे अर्थार्जनाचं काम करत राहायचं. उदा: बेल्जियममध्ये ६७ वर्षांचं होइपर्यंत किंवा एकूण ४४ वर्षे काम केलं तरच पेन्शन मिळते. नाहीतर मिळत नाही. म्हणजे तुम्ही एवढी वर्षं पे-रोलवर पाहिजेत किंवा तुमचा व्यवसाय सुरू असला पाहिजे. भारतात माझ्या वर्तुळातील अनेक जण आज ज्या परिस्थितीत आहेत त्यानुसार पन्नासाव्या वर्षी निव्वळ अर्थार्जनासाठी काम करण्याची कदाचित गरज राहणार नाही. म्हणजे भारतापेक्षा जवळपास १७ वर्षे अधिक काम करावे लागणार आहे.
- कधीच होऊ नये, पण चुकून झालंच तर असा मुद्दा - साथीदाराचा (पती वा पत्नी) अकाल मृत्यू. शुद्ध व्यावहारिक मुद्दा आहे. भारतात सावरायला अनेक जण सोबतीला असू शकतात. इथेही चांगलं सर्कल होऊ शकतं, नाही असं नाही. तरीही काहीवेळा "जवळची नाती" अधिक मदत करू शकतात.
- मुलांच्या मनात भारताबद्दल प्रेम, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर आपोआप जय तोंडावर येणं या गोष्टी तुम्ही भारतात किंवा अन्यत्र, कुठेही असलात तरी होतीलच. पण भारतात इतक्या कमी वेळा जाणं होईल कि भारत म्हणजे केवळ ४ नातेवाईक आणि १० मित्र हा समज मुलांचा व्हायला नको यासाठी वेगळा वेळ काढून भारत त्यांना दाखवावा लागेल.

हे असं असलं तरी परदेशात भारतीय गेल्यामुळे होणारे भारताचे फायदे भरपूरच आहेत. सावरकरांनी ज्या शृंखला सांगितल्या होत्या त्यात एक "समुद्रगमन न करणे" ही होती. इस्लाम वा ख्रिस्ती धर्म हे जगभर पसरले कारण ते बाहेर पडले. युरोपीय लोकांनी जगावर काही काळ राज्य केले कारण ते आपल्या देशातून बाहेर पडले. भारतीय कित्येक वर्षं भारतातून बाहेर न पडल्याने हिंदू धर्म, संस्कृती अडकून पडली ही खरी गोष्ट आहे. जेव्हा भारत समर्थ होता तेव्हा भारतीय संस्कृती जगभर पसरली होती. त्याच्या अनेक खुणा आजही सगळीकडे दिसतात. आज हिंदू स्वयंसेवक संघ - सेवा इंटरनॅशनल, इस्कॉन अशा अनेक संस्था कुठेही आणीबाणीची परिस्थिती आली की मदतीला तत्पर असतात. कारण या संघटनांचं काम करणारे मूळ भारतीय जगभर आहेत. संघाच्या ४० पेक्षा अधिक देशात शाखा आहेत. हजारो कार्यकर्ते आहेत. आज कित्येक कंपन्यांच्या उच्च पदावर, संशोधनात, अगदी CEO सुद्धा मूळचे भारतीय आहेत. या CEOs मध्ये एक माझा भाऊ आहे याचा मला अभिमान आहे. जर भारतातून कुणी बाहेरच गेलं नसतं तर हे शक्य झालं नसतं. 

बऱ्याचदा भारतातील पालक त्यांच्या मुलांनी परदेशी जाऊ नये/स्थायिक होऊ नये या मताची असतात. त्यांना माझा एक "वात्रट" मित्र अशा पालकांना प्रश्न विचारतो. तुम्ही स्वतः तुमच्या गावातून बाहेर पडलाच ना? पुण्यात, मुंबईत स्थायिक झालातच ना? की तिथेच गावात राहिलात? मग मुलांनी परदेशात जाण्यात काय त्रास आहे? म्हणजे माझे वडील बुलडाण्यातील चांडोळ नावाच्या गावातून शिक्षणासाठी जालना / संभाजीनगरला आहे. नंतर नोकरीच्या निमित्ताने संभाजीनगरलाच राहिले. तेव्हाचा प्रवास गृहीत धरला तर त्यांना चांडोळला जायला किमान ६-७ तास लागायचे. त्यांच्या वडिलांनी त्यांनी संभाजीनगरला स्थायिक व्हायला नकार दिला असता तर चाललं असतं का? अर्थातच नाही ! मग माझ्या वडिलांनी मला बाहेर जायला नकार देऊ नये.

मी जेव्हा पहिल्यांदा परदेशी जायला निघालो तेव्हा एक मेडिकल टेस्ट मुंबईतच करावी लागायची. त्या डॉक्टरांनी काहीतरी विचारलं आणि मी "yes/no/हो/नाही" असं उत्तर न देता "हं" म्हणालो. खरंतर छोटी गोष्ट होती. डॉ एकदम "बुड्ढा पारशी"! डॉ म्हणाले की, "तू परदेशात जातोयस हे चांगलं आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तू परदेशात 'एक व्यक्ती' नसतोस तर 'भारतीय राजदूत' असतोस. तुझ्याकडे बघून भारतातील लोक कसे असतील याचा परदेशी लोक अंदाज बांधतील. त्यामुळे कधीही एक भारतीय म्हणून चुकीची प्रतिमा तयार होऊ देऊ नकोस!" आजवर ही गोष्ट बऱ्यापैकी पाळत आलोय. 

सांगायचं मुद्दा हा की जर कुणी नव्याने भारतातून बाहेर येणार असेल, आपली संस्कृती घेऊन येणार असेल, भारताचा राजदूत बनून राहणार असेल तर परदेशात जाणे, स्थायिक होणे हे चांगलंच आहे. स्थलांतरं कायमच होत आली आहेत. होत राहणार आहेत. ती चांगल्या दृष्टीने वापरता येणं आवश्यक आहे. त्यातील धोके आणि जबाबदारी याची जाणीव या घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांना करून दिली की त्यांच्यावर विश्वास टाकावा. तो विश्वास ते नक्कीच सार्थ करतील.

स्वशोध

 बाहेरचे दिवे घालवले आणि आतले दिवे लावले
की मधल्या काचेत
आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं!

हृषीकेश कानिटकर

 ९०च्या दशकाने आम्हाला खूप काही भरभरून दिलं. नरसिंह राव / मनमोहन सिंह यांची खुली अर्थव्यवस्था, हर्षद मेहताने बिग बुल बनून चालवलेलं शेअर मार्केट, ए आर रेहमानचं वेगळंच संगीत, सचिन-सौरभ-राहुल-कुंबळे-लक्ष्मण सारखे क्रिकेटमधील हिरे, रगरग हिंदू मेरा परिचय म्हणणारे पंतप्रधान - अटलजी... यात एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे जुन्या जोखडाला फेकून देण्याची वृत्ती, इतिहासाचं ओझं न बाळगण्याची वृत्ती.

असंच एक फार जुनं नसलेलं जोखड १९८६ पासून क्रिकेटप्रेमींच्या मनावर होतं. श्रीकांत, गावस्कर, वेंगसरकर यांच्या अर्धशतकांसह भारताने पन्नास षटकात २४५ धावा केल्या होत्या. त्या काळात एवढ्या धावा म्हणजे जवळपास जिंकण्याची खात्रीच. गोलंदाजांनी देखील कमाल करत पाकिस्तानच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. मात्र जावेद मियाँदादच्या मनात वेगळंच चालू होतं. शेवटचं षटक टाकायला चेतन शर्मा आला. एक बळी घेत त्यानेही सुरुवात चांगली केली. नऊ गडी बाद, शेवटच्या चेंडूवर ४ धावांची आवश्यकता होती. आता केवळ चेंडू सीमापार जाणार नाही हे पाहायचं. आपलीच मॅच! पण समोर जावेद होता. त्याने चेतन शर्माचं मन वाचलं, पण चेतनला त्याचं मन वाचता आलं नाही. जावेदने चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला! हे जोखड जे क्रिकेटपटूंच्या आणि शौकिनांच्या डोक्यावर होतं ते काही लवकर खाली उतरलं नाही. 

शारजामध्ये सामना म्हणजे हरणार, पाकिस्तान विरुद्ध आणि तोही शुक्रवारी... नक्कीच हरणार. पुढे '९२च्या विश्वचषकात जावेदने माकडउड्या मारल्या तरीही आपण जिंकलो. मात्र तो विश्वचषक पाकिस्तानने जिंकल्याने जोखड काही उतरलं नव्हतं. नंतर जडेजाने '९६च्या विश्वचषकात २५ चेंडूत ४५ धावा करून, वेंकटेश प्रसादने आमीर सोहेलला येडा बनवून आपण तीही मॅच जिंकलो... तरीही जोखड कायम होतं. हे जोखड कशाने उतरेल? साधारण तसाच सामना व्हावा, भारताची दुसरी फलंदाजी असावी, समोर पाकिस्तानचा खास गोलंदाज असावा आणि त्यावेळी भारतीय फलंदाजाने नेटाने चेंडू सीमापार धाडावा. हे झालं तर जोखड नक्की उतरेल!

ती संधी मिळाली '९८ला. इंडिपेडन्स कप! भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तिरंगी स्पर्धा. अपेक्षेप्रमाणे बांगलादेश अंतिम सामन्यात आला नाही. यावेळी अंतिम सामना पण तीन सामान्यांचा. पहिला अंतिम सामना भारताने तर दुसरा पाकिस्तानने एकतर्फी जिंकला. शेवटच्या सामन्यात सईद अन्वर आणि इजाज अहमदने शतकं ठोकली. त्यातही अन्वरने १४० धावा कुटल्या. ४८ षटकांत तब्बल ३१४! भारतासमोर ३१५ धावांचं लक्ष्य. सचिनने वेगवान सलामी देत ४१ धावा केल्या आणि तो बाद झाला. नंतर रॉबिन सिंगला बढती दिली. अझरची ही खेळी चांगलीच ठरली. गांगुली आणि रॉबिनने धावफलक २५० पर्यंत नेला. आता १० षटकांत केवळ ६५ धावा बाकी होत्या. अझर, जडेजा, सिद्धू सारखे कसलेले फलंदाज बाकी होते. पण या सर्वांनी एकामागे एक नंबर लावले. तरी मोंगियाने धावबाद होण्याआधी चौकार मारून शेवटच्या षटकात ९ धावा इथवर आणून ठेवलं. आता ३०६ वर ७ बाद. ६ चेंडूत ९ धावा हे समीकरण बाकी होतं. समीकरण सोडवण्यासाठी उरले होते, तुलनेने नवखा हृषीकेश कानिटकर आणि लढवैय्या श्रीनाथ. समोर पाकिस्तानचा खास गोलंदाज सकलेन मुश्ताक. पहिला चेंडू कानिटकरने लेग साईडला जोरात मारला खरा पण मिळाली केवळ एक धाव. दुसऱ्या फ्लाईटेड डिलिव्हरीवर श्रीनाथने दोन धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूला श्रीनाथ मारायला गेला खरा, पण टॉप एज लागून चेंडू उंच उडाला. पण दैव भारताच्या बाजूने होतं. चेंडू चक्क तीन क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधे पडला आणि त्यांच्या गोंधळात श्रीनाथने अजून दोन धावा काढल्या. आता तीन चेंडूत चार धावा असं समीकरण उरलं. चौथ्या चेंडूवर मात्र श्रीनाथ केवळ एक धाव घेऊ शकला. आता दोन चेंडूत तीन धावा शिल्लक होत्या. पाचवा चेंडू कानिटकरने बरोब्बर ओळखला आणि लेग साईडला मस्त गॅपमध्ये मारला - चौकार!!! भारत जिंकला आणि बारा वर्षांपासून असलेलं जोखड उतरलं!

हे आठवण्याचं कारण म्हणजे सध्या आपल्या U19 चा मुख्य प्रशिक्षक हृषीकेश कानिटकर आहे. याच संघाने परवा विश्वचषक जिंकला!