Friday, April 24, 2026

१७७१ : चिंकुर्लीची (मोती तलाव) लढाई - मराठा सामर्थ्य आणि पळपुटे हैदर व टिपू

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण भारताचे राजकारण तापले होते. एकीकडे मराठा साम्राज्याने पानिपतच्या जखमा भरून काढत पुन्हा उभारी घेतली होती, तर दुसरीकडे मैसूरचा हैदर अली आपल्या महत्त्वाकांक्षेच्या बळावर दक्षिणेत झपाट्याने विस्तार करत होता. यात ६ मार्च १७७१ रोजी झालेली चिंकुर्लीची लढाई हा एक निर्णायक टप्पा ठरला. इतिहासात फारसा चर्चिला न जाणारा, पण मराठा सामर्थ्याची खरी ओळख दाखवणारा.

माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीने मराठा साम्राज्याला नवजीवन दिले होते. त्यांच्या नेतृत्वात सैन्य पुन्हा संघटित झाले, सरदारांमध्ये शिस्त निर्माण झाली आणि मराठा साम्राज्याचा आत्मविश्वास परत आला. हैदर अलीने मराठ्यांशी केलेल्या करारांचे उल्लंघन करून उत्तरेकडील प्रदेशात घुसखोरी सुरू केली तेव्हा माधवरावांनी हे आव्हान स्वीकारले. दक्षिणेकडे मोर्चा वळवताना त्यांचा उद्देश फक्त बदला नव्हता; तो होता मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करणे.

मैसूरच्या सीमेजवळील चिंकुर्ली हे गाव त्या काळी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. आसपासचा प्रदेश सपाट, पण काही ठिकाणी दगडी टेकड्यांनी भरलेला होता. जिथे सैन्य लपवता येऊ शकत होते, अचानक हल्ले करता येऊ शकत होते. हैदर अलीने याच भौगोलिक फायद्याचा उपयोग करून मराठ्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत टिपूही होता. यावेळी टिपू २० वर्षांचा होता.

मराठा सैन्य चिंकुर्लीच्या दिशेने सरकत असताना हैदर अलीने आपल्या फौजा रचल्या, पण त्याला मराठ्यांच्या वेगाचा आणि शिस्तीचा अंदाज आला नव्हता. माधवरावांनी सैन्याची मांडणी इतक्या अचूकतेने केली होती की मैसूरच्या फौजांना प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. मराठ्यांच्या घोडदळाने केलेल्या झंझावाती हल्ल्याने हैदरची पहिली फळी अक्षरशः उडून गेली. तोल सावरायच्या आत दुसरी फळीही ढासळली. लढाई काही तासांतच निर्णायक वळणावर पोहोचली.

हैदर अलीला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाली. त्याने तातडीने माघार घेण्याचा निर्णय घेतला. टिपू त्याच्यासोबत होता. दोघांनीही रणांगण सोडून अक्षरशः पळ काढला. ही माघार नियोजनबद्ध नव्हती, तर जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड होती. मराठा सैन्याच्या वेगवान धडाक्यामुळे मैसूरच्या छावणीत गोंधळ माजला. अनेक सैनिक पळाले, काहींनी शस्त्रे टाकली, तर काहींना मराठ्यांनी बंदी बनवले.

याच गोंधळात हैदर कसा वाचला तेही मजेदार आहे. हैदर अलीच्या सैन्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला मराठ्यांनी पकडले. त्याचे रूप, पोशाख आणि त्याच्या आसपास असलेली गडबड पाहून मराठ्यांना क्षणभर वाटले की हा माणूसच हैदर अली असावा. या चुकीच्या ओळखीमुळे मराठ्यांचा पाठलाग काही काळ थांबला. आणि हा काही मिनिटांचा विलंबच हैदर अलीसाठी वरदान ठरला. तो आणि टिपू या दोघांना श्रीरंगपट्टणपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला वेळ मिळाला.

लढाई संपली तेव्हा रणांगणावर मराठ्यांचा संपूर्ण विजय उभा होता. हैदर अलीची फौज तुटली होती, त्याचे मनोबल खच्ची झाले होते आणि त्याच्या खजिन्यावर प्रचंड ताण आला होता. मराठ्यांनी त्याला शांतता करारासाठी भाग पाडले. या करारात हैदर अलीला तुंगभद्रेच्या उत्तरेतील सर्व प्रदेश परत करावे लागले, तसेच मोठी खंडणी भरावी लागली. इतकी की त्याचा खजिना जवळजवळ रिकामा झाला. हा पराभव हैदरसाठी अत्यंत अपमानास्पद होता.

चिंकुर्लीची लढाई फक्त एक सैनिकी विजय नव्हता; तो मराठा साम्राज्याच्या पुनरुत्थानाचा अजून एक निर्णायक पुरावा होता. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांची शक्ती संपली असे अनेकांना वाटत होते, पण माधवराव पेशव्यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि नेतृत्वगुणांनी हे सिद्ध केले की मराठा साम्राज्य अजूनही भारतीय उपखंडातील सर्वात प्रभावी शक्ती आहे. हैदरला राघोबादादाने चूक करून जी थोडी मोकळीक दिली होती ती माधवरावांनी दुरुस्त केली. चिंकुर्लीच्या विजयाने दक्षिणेत मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले आणि हैदर अलीसारख्या महत्त्वाकांक्षी शासकाला मर्यादा ओलांडण्याची किंमत काय असते हे दाखवून दिले.

आज या लढाईचा उल्लेख इतिहासाच्या मुख्य प्रवाहात फारसा आढळत नाही. पण ज्यांनी त्या काळातील मराठा–मैसूर संघर्षाचा अभ्यास केला आहे, त्यांना माहीत आहे की चिंकुर्ली हा एक टर्निंग पॉइंट होता. एक अशी लढाई ज्याने मराठ्यांच्या सामर्थ्याला नवा आत्मविश्वास दिला आणि दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलून टाकली. या लढाईत रणांगणावर उभा राहून माधवरावांनी दाखवलेली रणनीती, मराठा घोडदळाचा वेग अप्रतिम होता. चिंकुर्लीची लढाई मराठा इतिहासातील एक तेजस्वी अध्याय आहे.

संदर्भ : Tipu Sultan: The Saga of Mysore's Interregnum by Vikram Sampath

२२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा हा भारतीय समाजाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा होता. या प्रतिज्ञांनी नवबौध्द समाजाला "हिंदू" अस्मितेपासून दूर नेलं. आणि आता तर बाकी प्रतिज्ञा न आठवता so called डॉ आंबेडकर अनुयायी केवळ ४-५ प्रतिज्ञा लक्षात ठेवतात. या प्रतिज्ञांमधील मानसिक, नैतिक आणि सामाजिक पुनर्जन्म कुणी लक्षात ठेवत नाही आणि लक्षात घेतही नाही.

या प्रतिज्ञांमध्ये, बुद्धांच्या शिकवणीतील तीन महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणजे पंचशील, अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता, यांचा थेट समावेश आहे. 

१. पंचशील म्हणजे पाच नैतिक नियम. हे नियम कोणत्याही धर्मापुरते मर्यादित नाहीत; ते सार्वत्रिक मानवी मूल्ये आहेत. अहिंसा, सत्य, संयम, प्रामाणिकपणा आणि व्यसनमुक्ती—ही पाच तत्त्वे व्यक्तीला स्थिर करतात आणि समाजाला सुरक्षित करतात.
- अहिंसा मनातील क्रूरता कमी करते. हिंसा कमी झाली की समाजात भीती कमी होते आणि विश्वास वाढतो.  
- चोरी न करणे म्हणजे इतरांच्या हक्कांचा आदर. यामुळे परस्परांमध्ये सुरक्षितता निर्माण होते.  
- कामवासनेचा दुरुपयोग न करणे हे कुटुंबव्यवस्थेला स्थिर ठेवते.  
- खोटे न बोलणे समाजातील संवादाला पारदर्शकता देते.  
- मद्य व व्यसनांपासून दूर राहणे व्यक्तीचे आरोग्य, विवेक आणि कुटुंबातील शांतता टिकवते.
पंचशील म्हणजे स्वत:वर नियंत्रण ठेवून इतरांच्या कल्याणाचा विचार करणारे जीवन.

२. अष्टांग मार्ग हा बुद्धांनी मानवी जीवनाला दिलेला मार्ग आहे. यात विचार, वाणी, कृती, उपजीविका आणि मनाची शिस्त या सर्वांचा समतोल साधला जातो.
- सम्यक दृष्टि: व्यक्तीला अंधश्रद्धा आणि भीतीपासून मुक्त करते.  
- सम्यक संकल्प: करुणा आणि अहिंसेवर आधारित विचार निर्माण करतो.  
- सम्यक वाणी: कटू, खोटे किंवा हिंसक बोलणे टाळते.  
- सम्यक कर्म: म्हणजे नैतिक आणि समाजहिताचे आचरण.  
- सम्यक उपजीविका: इतरांना हानी न पोहोचवणारा व्यवसाय निवडण्याची प्रेरणा देते.  
- सम्यक प्रयत्न वाईट प्रवृत्ती कमी करून चांगल्या प्रवृत्ती वाढवतो.  
- सम्यक स्मृती: सजगता आणि आत्मपरीक्षण वाढवते.  
- सम्यक समाधी: मनाला स्थिरता आणि शांतता देते.
अष्टांग मार्ग म्हणजे मानसिक आरोग्य, सामाजिक सौहार्द आणि वैयक्तिक प्रगतीचा मार्ग.  

३. दहा पारमिता म्हणजे मानवी गुणांचे सर्वोच्च रूप. या गुणांचा विकास म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला उन्नत करण्याचा मार्ग.
- दान स्वार्थ कमी करते आणि सहकार्य वाढवते.  
- शील नैतिकता आणि विश्वासार्हता वाढवते.  
- नेक्कम्म/नैष्कर्म (त्याग) लोभ कमी करतो.  
- प्रज्ञा विवेक आणि तर्कशक्ती वाढवते.  
- वीर्य सकारात्मक कृती करण्याची ऊर्जा देते.  
- क्षांती/शांती क्षमाशीलता वाढवते.  
- सत्य नातेसंबंधातील विश्वास टिकवते.  
- अधिष्ठान ध्येयपूर्तीची ताकद देते.  
- मेत्ता (मैत्री) सर्व जीवांप्रती मैत्रीभाव निर्माण करते.  
- उपेक्षा (स्थितप्रज्ञता) समत्व आणि मानसिक स्थैर्य देते.
या पारमिता म्हणजे मानवतेचा सर्वोच्च नैतिक आराखडा आहेत.

आज या बौद्ध शिकवणी सोडून विद्रोही प्रतिज्ञांचा वापर केवळ विद्वेषासाठी केला जातोय. त्यामुळे जर कुणी विद्रोही प्रतिज्ञांबद्दल बोलायला लागला की, तिरंगा मधील नाना पाटेकर सारखं म्हणायचं - अगर भगवान बुद्ध की तीन शिक्षाओं का पालन किया हैं तो ही बाकी उन्नीस को हाथ लगाना।

पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता या प्रतिज्ञांतील सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि मानवी मूल्यांचा सार आहेत. त्यांचा अधिकाधिक प्रसार व्हावा.

सर्वांना डॉ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

Tuesday, January 13, 2026

पानिपतचे परिणाम

१७६०च्या अखेरीस दक्षिण भारतात एक विचित्र आणि निर्णायक घडामोड आकार घेत होती. मैसूरच्या सत्तेवर प्रत्यक्ष ताबा मिळवण्याची हैदर अलीची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस उघड होत होती. दरबारातील राजकारण आणि हैदरची वाढती सत्ता यामुळे मैसूरचे राजे, त्यांची आई आणि खंडेराव हे पूर्णपणे असहाय्य झाले होते. अखेर त्यांनी मराठ्यांकडे धाव घेतली. दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव प्रचंड होता आणि पेशव्यांच्या सरदारांकडे हैदरला रोखण्याची ताकदही होती. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांकडे मदतीची विनंती केली.

पेशव्यांच्या दरबारातून विसाजी पंत बिनीवाले, मुरारराव घोरपडे आणि इतर सरदारांची एक सक्षम मोहीम दक्षिणेकडे निघाली. या मोहिमेचा वेग, शिस्त आणि रणनीती इतकी प्रभावी होती की काही दिवसांतच हैदर अली अक्षरशः एका जागी कोंडला गेला. त्याच्या हालचालींवर पूर्ण बंदी आली. त्याच्याकडे सैन्य होते, पण त्याला वापरण्याची संधीच मिळत नव्हती. मराठ्यांच्या वेढ्यातून सुटण्याचा मार्गच उरला नव्हता. परिस्थिती अशी होती की जास्तीत जास्त एक महिना हैदर टिकू शकला असता. त्यानंतर त्याचा पराभव निश्चित होता.

पण इतिहासाला कधी कोणाची प्रतीक्षा नसते. दक्षिणेत मराठ्यांनी विजयाची दारे उघडली असतानाच, उत्तरेत एक प्रचंड वादळ उठले होते ते अहमदशहा अब्दालीचे. अब्दालीच्या आक्रमणाने संपूर्ण हिंदुस्थान हादरले. त्याचा सामना करण्यासाठी मराठ्यांची सर्वात बलाढ्य सेना उत्तर दिशेला निघाली. भाऊसाहेब, विश्वासराव, होळकर, शिंदे… मराठ्यांच्या सामर्थ्याचे हे सर्व आधारस्तंभ उत्तरेत गेले. दक्षिणेतील मोहीम यशाच्या उंबरठ्यावर असताना, उत्तरेतील संकटाने संपूर्ण समीकरण बदलले.

आणि मग उजाडला इतिहासाला मोठी कलाटणी दिवस १४ जानेवारी १७६१. मराठा साम्राज्यावरील संक्रांत. पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा दाखवली, पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच पान लिहिले होते.
दो मोती गिरे, दस-बीस अशरफ़ी गंवाई, पैसे का तो कोई हिसाब ही नहीं...
भाऊसाहेब, विश्वासराव, समशेर बहाद्दूर असे अनेक थोर योद्धे त्या दिवशी रणांगणावर कोसळले. पराभव हा शब्द त्या दिवशी किती मोठा असू शकतो, याची जाणीव संपूर्ण देशाला झाली.

या भीषण बातमीने नानासाहेब पेशवे हादरून गेले. त्यांनी तातडीने सर्व मराठा सैन्यांना परतण्याचा आदेश दिला. दक्षिणेकडील मोहीमही त्याला अपवाद नव्हती. बिनीवाले आणि इतर सरदारांना हैदरवरील अंतिम टप्प्यातील कारवाई सोडून परत फिरावे लागले. पराजयाच्या दारात उभा असलेला हैदर अली अचानक मुक्त झाला. मराठ्यांच्या परतीने त्याचा जीव वाचला.

हैदर अलीने या संधीचा फायदा घेतला. खंडेरावला त्याने उघड्या तुरुंगात मरण येईपर्यंत खितपत ठेवले. मैसूरच्या वडियार राजाचे सर्वाधिकार स्वतःकडे घेतले. प्रत्यक्ष राजा नसला तरी सत्तेचा संपूर्ण ताबा त्याच्याकडे गेला. पुढे त्याचा मुलगा टिपू सुलतानही याच सत्तेच्या वारशातून पुढे आला. दक्षिण भारताच्या राजकारणात हैदर आणि टिपू यांनी निर्माण केलेली सत्ता, संघर्ष आणि दडपशाही यांची बीजे याच काळात रोवली गेली.

पानिपतची लढाई ही केवळ उत्तर भारतातील पराभव नव्हती. तिचा परिणाम संपूर्ण देशभर उमटला. मराठेशाही काही वर्षे मागे ढकलली गेलीच, पण त्याचबरोबर दक्षिणेत एक हिंदू राज्यही अप्रत्यक्षपणे संपुष्टात आले. जर पानिपतचा पराभव झाला नसता, तर हैदर अलीचा अंत निश्चित होता. मैसूरच्या राजघराण्याला पुन्हा सत्ता मिळाली असती. दक्षिणेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे वेगळी असती. पण इतिहासाने वेगळा मार्ग निवडला.

या एका लढाईने मराठ्यांच्या सामर्थ्याला तात्पुरती खीळ बसवली, पण त्याहून मोठा परिणाम म्हणजे हैदर अली आणि पुढे टिपू सुलतान यांना मिळालेली संधी. मराठ्यांच्या परतीने वाचलेला हैदर पुढे दक्षिणेतील सर्वात प्रभावी आणि आक्रमक शासकांपैकी एक बनला. आणि हे सर्व घडले एका अशा क्षणी, जेव्हा मराठे विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होते.

इतिहासातील या घटना वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, कधी कधी एका रणांगणावरील पराभवाचा परिणाम हजारो किलोमीटर दूर घडणाऱ्या राजकारणावर होतो. पानिपतच्या संक्रांतीने उत्तर भारतात मराठ्यांचे काही काळ सामर्थ्य कमी केलेच, पण दक्षिणेतही एका हिंदू राज्याचा अंत घडवून आणला.

संदर्भ - Tipu Sultan: The Saga of Mysore's Interregnum (1760–1799) by Vikram Sampath


Friday, December 5, 2025

मार्तंड वर्मा (पद्मनाभदास) - त्रावणकोर Gods Own Country

भारतातील व्यापारामुळे युरोपीय सत्ता मोठ्या झाल्या आणि भारताशी संबंध बदलल्याने लयाला गेल्या. पोर्तुगीज आणि विजयनगरचे संबंध अतिशय उत्तम होते, त्यामुळे विजयनगरच्या भरभराटीच्या काळात पोर्तुगीजांची भरभराट झाली. पण विजयनगर साम्राज्य बुडाल्यावर पोर्तुगीज सुद्धा मागे पडले. त्याचप्रमाणे अजून एक युरोपीय सत्तेने आधी भरभराट आणि नंतर उतरती कळा पहिली, ती म्हणजे डच! डचांना उतरती कळा लागल्यानेच इंग्रजांना ती पोकळी मिळाली. त्या पोकळीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.

आपल्याला सागरी सत्ता म्हणून चोल राजा राजेंद्र माहीत असतात. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं आणि कान्होजी आंग्र्यांनी ज्याचा दबदबा निर्माण केला ते मराठा आरमार माहीत असतं. पण ज्या सागरी आणि जमिनीवरील सत्तेने एक परकीय सत्ता केवळ भारतातून नाही तर जगाच्या क्रमवारीत तिला मागे टाकले अश्या त्रावणकोरच्या मार्तंड वर्मांचे नाव क्वचितच माहीत असते...

१८व्या शतकाच्या सुरुवातीला केरळच्या इतिहासात एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व उदयास आले – मार्तंड वर्मा, त्रावणकोरचा राजा. त्यांचा जीवनपट भारतीय किनारपट्टीवरील परकीय वर्चस्व मोडून काढणारा आणि राज्याला धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान देणारा ठरला.  

मार्तंड वर्मा यांचा जन्म १७०६ मध्ये झाला. ते त्रावणकोरच्या राजघराण्यातील होते, पण बालपणातच त्यांना राजकीय संघर्षांचा सामना करावा लागला. स्थानिक सरदार, नायर प्रमुख, आणि परकीय व्यापारी यांच्यातील सत्तास्पर्धा तीव्र होती. या संघर्षातूनच मार्तंड वर्मा यांनी आपली राजकीय बुद्धिमत्ता आणि लढाऊ वृत्ती विकसित केली.  

१७२९ मध्ये ते त्रावणकोरच्या गादीवर बसले. गादीवर बसताच त्यांनी राज्य एकत्र करण्याचे आणि परकीय शक्तींना आव्हान देण्याचे ठरवले. 

त्या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने मलबार किनाऱ्यावर आपली पकड मजबूत केली होती. मसाल्यांच्या व्यापारावर त्यांचे नियंत्रण होते आणि स्थानिक राजांना ते आपल्या धाकात ठेवत होते. मार्तंड वर्मा यांनी या परकीय शक्तीला आव्हान दिले.  

१७४१ मध्ये कोलाचेलची लढाई झाली – भारतीय तसेच जागतिक इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा. मार्तंड वर्मा यांच्या सैन्याने डचांना पूर्ण पराभूत केले. ही लढाई विशेष होती कारण युरोपीय शक्तींना भारतीय भूमीवर स्थानिक राजाने निर्णायक पराभव दिला.  

मार्तंड वर्मांच्या या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड मोडली. मसाल्याच्या व्यापारावर असलेला अग्रहक्क मोडला. डच कमांडर डेलनॉय याला कैद केलं. पण मार्तंड वर्मा त्यांची गुणग्राहकता खूप चांगली होती. या कामंडरला मार्तंड वर्मा यांनी आपल्या सैन्यात सामील केले. डेलनॉयने पुढे त्रावणकोरच्या सैन्याला युरोपीय तंत्रज्ञान दिले आणि किल्ले बांधण्यात मदत केली.  

मार्तंड वर्मा यांनी सैन्याची पुनर्रचना केली. त्यांनी नायर सैनिकांना संघटित केले, युरोपीय शस्त्रास्त्रांचा वापर सुरू केला, आणि किनाऱ्यावर मजबूत किल्ले बांधले.  

- उदयगिरी किल्ला – युरोपीय तंत्रज्ञानाने बांधलेला, तोफखान्याने सज्ज.  

- विझिंजम (विळींझम) बंदर – व्यापार आणि नौदलासाठी महत्त्वाचे केंद्र.  

- पद्मनाभपुरम किल्ला – राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र.  

या किल्ल्यांमुळे त्रावणकोर दक्षिण भारतातील सर्वात सुरक्षित राज्य बनले.  

मार्तंड वर्मा यांचे दुसरे महान कार्य म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण राज्य भगवान श्री पद्मनाभस्वामींना अर्पण केले. १७५० मध्ये त्यांनी औपचारिकपणे घोषणा केली की त्रावणकोर हे देवाचे राज्य आहे, आणि ते स्वतः व त्यांच्या पुढील पिढ्या केवळ विश्वस्त (पद्मनाभदास) म्हणून राज्य करतील.  यामुळेच केरळला आजही Gods Own Country असं म्हटलं जातं.

ही घटना भारतीय राजकारणात अद्वितीय होती. राजा स्वतःला देवाचा सेवक मानून राज्यकारभार चालवतो, अशी संकल्पना त्रावणकोरमध्ये रुजली. यामुळे राज्याला धार्मिक अधिष्ठान मिळाले आणि लोकांमध्ये एकात्मता निर्माण झाली.  

मार्तंड वर्मा यांनी करव्यवस्था सुधारली, व्यापाराला चालना दिली, आणि शिस्तबद्ध प्रशासन उभारले. त्यांनी जमिनीचे पुनर्वाटप केले, भ्रष्ट सरदारांना रोखले, आणि राज्यात स्थैर्य आणले. त्यांच्या कारकिर्दीत त्रावणकोर हे दक्षिण भारतातील सर्वात स्थिर आणि समृद्ध राज्य बनले. मसाल्यांचा व्यापार सुरक्षित झाला, आणि परकीय शक्तींना त्रावणकोरशी करार करावा लागला.  

१७५८ मध्ये मार्तंड वर्मा यांचे निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली परंपरा आजही जिवंत आहे. त्रावणकोरचे वंशज आजही स्वतःला "पद्मनाभदास" म्हणवतात आणि केरळ स्वतःला Gods Own Country म्हणवते.

त्यांच्या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड संपली. त्यांच्या धार्मिक अर्पणामुळे त्रावणकोरला अद्वितीय ओळख मिळाली. 

म्हणूनच मार्तंड वर्मा यांना आपण भारतीय इतिहासातील एक अद्वितीय राजा म्हणून स्मरले पाहिजे "कोलाचेलचा विजेता आणि पद्मनाभदास."

(संदर्भ : ब्रेव्हहार्टस ऑफ भारत - विक्रम संपत)

Wednesday, December 3, 2025

भाग्यचंद्र: स भूपति:

मणिपूरच्या इतिहासात राजर्षी भाग्यचंद्र हे एक विलक्षण राजे होऊन गेले (संघाचे प्रातःस्मरण - भाग्यचंद्र: स भूपति:). त्यांचा जन्म 1748 मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव जयसिंह होते. त्या काळी मणिपूरच्या राजघराण्यात एक क्रूर परंपरा होती - राज्याची गादी मिळवण्यासाठी पुढे भावाभावांत भांडणे होऊ नये म्हणून, मोठ्या राणीचा मोठा मुलगा वाचवला जाई, बाकी सर्व मुलांना मारून टाकले जाई. या निर्दयी परंपरेतून भाग्यचंद्र कसे वाचले याची कथा थरारक आहे. ते मोठ्या राणीचे अपत्य नव्हते, त्यामुळे नियमानुसार त्यांचा जीव धोक्यात होता. पण आईने त्यांना दूर पाठवून दिले. ते डोंगरात राहिले आणि त्यांना नवीन नाव मिळाले - चिंग-थांग खोम्बा. त्यांच्याच वडिलांना पुढे जेव्हा ते एका प्रवासात दिसले तेव्हा वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दत्तक घेतले आणि राजवंशात त्यांचे स्थान सुरक्षित केले. या दत्तकत्वामुळेच पुढे ते गादीवर बसू शकले आणि मणिपूरच्या इतिहासात अमर झाले.  

राज्यारोहणानंतरही त्यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. 1759 मध्ये ते गादीवर आले. त्या काळात ब्रह्मदेशातून या भागावर कायम आक्रमणे होत असत. त्यात त्यांच्या एका भावासोबत गादी दोघांनी मिळून चालवावी असं ठरलेलं होतं. ते व्यवस्थित पार पडलं नाही. यामुळे राज्य कमकुवत झालं आणि ब्रह्मदेशाच्या आक्रमणामुळे त्यांना राज्य सोडावे लागले. ते असामच्या अहोम राजेश्वर सिंहाकडे आश्रयाला गेले. या राजाचे ते खास होते, पण लोकांनी राजाचे कान भरले आणि तिथे त्यांची अतिशय अवघड अशी परीक्षा झाली. राजेश्वर सिंहाने त्यांना एका जंगली हत्तीला निःशस्त्र पकडण्याची अट घातली. भाग्यचंद्रांनी भगवान गोविंदाची प्रार्थना केली आणि अद्भुत धैर्याने हत्तीला वश केले. या घटनेनंतर त्यांनी गोविंदजीची मूर्ती स्थापण्याचा संकल्प केला. पुढे त्यांना स्वप्नात कृष्णाने राज्यात परतायला सांगितलं. त्यानंतर ते माणिपुरात पोहोचले. त्यांचे भाग्य त्यांना कायम पुढे नेत गेले म्हणून त्यांना भाग्यचंद्र हे नाव मिळाले.

मणिपुरात परतल्यावर त्यांनी रासलीला नृत्याची परंपरा सुरू केली, जी आज मणिपुरी शास्त्रीय नृत्याचा आत्मा मानली जाते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वारसा म्हणजे सांस्कृतिक पुनरुत्थान. त्यांनी हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेला राजधर्म मानले आणि भक्तीभावाचा प्रसार केला. कृष्ण-राधेच्या प्रेमलीलेवर आधारित रासलीला त्यांनी सुरू केली, ज्यामुळे मणिपुरी समाजाला एक नवी सांस्कृतिक ओळख मिळाली. गोविंदजी मंदिर हे त्यांच्या काळात बांधले गेले आणि आजही ते मणिपुरातील धार्मिक जीवनाचे केंद्र आहे.  

राजकीय दृष्ट्या त्यांनी ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड दिले, अहोमांशी मैत्री केली आणि ब्रिटिशांशीही संबंध ठेवले. त्यांच्या राज्यकाळात मणिपुरने आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. पण त्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकारणासोबत अध्यात्माला आणि कलांना समान महत्त्व दिले. म्हणूनच त्यांना राजर्षी म्हटले जाते.  

विक्रम संपत यांनी Bravehearts of Bharat मध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. विक्रम संपत म्हणतात की भाग्यचंद्र हे केवळ राजा नव्हते, तर संस्कृतीचे रक्षक होते. ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड देताना त्यांनी धैर्य दाखवले, त्याचबरोबर मणिपुरी समाजाला सांस्कृतिक ओळख दिली.  

1799 मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. मणिपुरी नृत्याची जागतिक ओळख, गोविंदजी मंदिराचे महत्त्व आणि वैष्णव भक्तीची परंपरा हे सर्व त्यांच्या योगदानामुळे आहे. त्यांचा एका निर्दयी परंपरेतून जीव वाचला, दत्तकत्वामुळे गादी मिळाली, संघर्षातून राज्य टिकवले आणि संस्कृतीला नवा आकार दिला. म्हणूनच राजर्षी भाग्यचंद्र हे मणिपुरच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरतात.  

- ज्ञानेश

Thursday, July 17, 2025

अरण्यानीपासून देवराईपर्यंत — निसर्गसंवर्धनाची भारतीय परंपरा

देवराई भारतात कधीपासून आहे असं शोधताना मला ऋग्वेदातील काही ऋचा इंटरनेटवर सापडल्या. अरण्यानी सूक्तातील या ऋचा आहेत. ते वाचताना आपल्याकडे किती पूर्वीपासून या गोष्टींचा विचार केला आहे याबद्दल खूप अभिमान वाटला : अरण्यानीपासून देवराईपर्यंत — निसर्गसंवर्धनाची भारतीय परंपरा

"अरण्यानीं देव युवतीं नमोभिः पाद्भ्यां न ऊर्णोषि यद्वसानाम्।"  
(ऋग्वेद १०.१४६.१)
— हे अरण्यांची देवी, तुझ्या चरणांना आम्ही वंदन करतो, तू स्वतः जंगलातून फक्त झाडांच्या सावलीनेच वस्त्र परिधान करतेस.

हजारो वर्षांपूर्वी, आपल्या ऋषींनी निसर्गाला दैवत्त्व दिलं. त्यांच्या दृष्टीने जंगल म्हणजे केवळ लाकूड, फळं आणि औषधं देणारा प्रदेश नव्हता—तर तो एक सजीव अस्तित्व होता, ज्यामध्ये सौंदर्य, भय, गूढता आणि करुणा यांचा संगम होता.

अरण्यानी सूक्त: जंगलाची देवता
ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील अरण्यानी सूक्त हे जंगलाच्या देवतेस उद्देशून रचलेलं एक सुंदर स्तवन आहे. यात अरण्यानी ही एक देवी आहे—गावापासून दूर, शांत पण आत्मसंपन्न. तिच्या चालण्याचा सौम्य आवाजही ऋषींना मंत्रमुग्ध करतो.
"क्व स्विदासी कथं न्वस्याऽरं चरन्त्युपरि क्षमाया।"  
ती कुठे असते? कशी फिरते? कोणत्या दिशेने चालते? जंगल तिचं घर आहे, पण तरीही ती अप्राप्य भासत राहते.

या प्रश्नांतून एक गोष्ट स्पष्ट होते—ऋषींना जंगल केवळ उपयोगासाठी नव्हे, तर त्याच्या अस्सल स्वभावासाठी आदरणीय वाटतं. ते त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतात, जिंकायचा नाही.

देवराई हा निसर्गसंवर्धनाचा एक सांस्कृतिक करारच आहे असं वाटतं. वेदकालीन दृष्टिकोनाची प्रात्यक्षिक परिणती आपल्याला दिसते देवराईच्या परंपरेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, ओडिशा, झारखंड यांसारख्या राज्यांमध्ये देवाच्या नावाने राखलेलं वन म्हणजे देवराई.

कोणत्याही गावी, एखादी विशिष्ट जागा जिथं कोणतीही झाडं तोडली जात नाहीत, शिकार केली जात नाही, किंवा शेती केली जात नाही—ती पवित्र मानली जाते. याठिकाणी देव, गावजत्रा, नवस आणि श्रद्धा यांचा प्रभाव असतो, पण मूळ हेतू असतो जैवविविधतेचं रक्षण.

भारतीय निसर्गदर्शन — वेद-उपनिषदांपासून लोकसाहित्यापर्यंत निसर्ग सजीव मानला जातो. झाडांच्या देवता, नदीच्या पूजाआरती, अग्नी, वायू, पृथ्वी यांचं देवता रूप—all speak of a worldview that doesn’t conquer nature, but converses with it.

पण आज आपण कुठे आहोत? आजच्या काळात ती संवेदना का हरवलेली?
आज जेव्हा जंगलं कारखान्यांच्या नावाखाली साफ केली जातात, आणि देवराईच्या जागी काँक्रीटची घरे किंवा त्यात मंदिरे उभी राहतात, तेव्हा आपण केवळ झाडं तोडत नाही, तर आपल्या मूळांपासून स्वतःची तोड करत असतो.

अनेक जागांवर देवराई उरली आहे, पण तिचं पालन निष्ठेने होत नाही. नव्या पिढ्यांना या परंपरेची माहितीच नाही. CSR प्रकल्प, शालेय अभ्यासक्रम, कौटुंबिक सहली — या सगळ्यांत देवराईचं स्थान पुन्हा निर्माण करणं आज काळाची गरज आहे.

आपण काय करू शकतो?
१. जागरूकता निर्माण:  आपापल्या गावाजवळ, तालुक्यातील देवराईचा इतिहास, भूगोल, परंपरा जाणून घ्या. ज्येष्ठांच्या आठवणी लिहून ठेवून त्याचं जतन करूया.
२. अनुभवाधारित शिक्षण:  लहान मुलांना या पवित्र जागांमध्ये नेऊन “निसर्गशाळा” चालवा. त्यांना वनस्पती, पक्षी, कीटक ओळखू द्या. श्रद्धा आणि विज्ञान एकत्र वापरा.
३. सांस्कृतिक पुनर्बांधणी: देवराईतील झाडाखाली छोटं देऊळ, वार्षिक पूजा, स्थानिक यज्ञ — हे सगळं "निसर्ग परंपरेचं साक्षात्कार" म्हणून साजरं करा. अर्थात त्यातील निसर्गाला धक्का न लावता
४. सहभागी पद्धतीने संरक्षण: स्थानिक स्वराज संस्था, शाळा, NGO यांच्या सहकार्याने देवराईंचं पुनरुज्जीवन करा. "Joint Custodianship Model" वापरून गावकऱ्यांच्या सहभागाने व्यवस्थापन करा.
५. शाश्वत निती निर्धारणात देवराईचा उल्लेख: गाव विकास योजनांमध्ये देवराईसाठी राखीव निधी ठेवा. “Green Audit” आणि “Ecological Heritage” यांचा भाग म्हणून नोंद घ्या.

अरण्यानी सूक्ताचा संदेश आजही तेवढाच उपयोगी, आवश्यक आहे
"शुभं यदस्यै तन्वे तनूष्वा वा, न तद्याच्छा मृगयन्ति स्म धीरा:।"  
जे काही तिचं शुभ आहे ते तिच्या अस्तित्वातच आहे—ज्ञानी लोक त्यामध्येच सौंदर्य शोधतात.
जंगलात चालणाऱ्या अरण्यानीचं सौंदर्य तिच्या अस्तित्वात आहे, तिच्या निर्लोभी उपस्थितीत आहे. तिला जिंकलं जात नाही, तिला समजून घेतलं जातं.

निसर्ग ही केवळ संपत्ती नाही, ती आपली ओळख आहे. देवराई केवळ एक जागा नाही, ती एक मानसिकता आहे. जंगलाच्या शांततेला जेव्हा श्रद्धेचा स्वर जोडला जातो, तेव्हा ती केवळ जैवविविधता राखत नाही, तर माणसाला माणूसपणाकडे परत नेत असते.
आज जेव्हा हवामान बदल, प्रदूषण, जंगलविकासाचे प्रश्न आपल्यासमोर आहेत—तेव्हा अरण्यानीचं स्मरण आणि देवराईची पुनःस्थापना ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे.

शुभम् भवतु 🙏

Saturday, July 12, 2025

हिंदू महासभा घटना आणि भारतीय राज्यघटना

विक्रम संपत यांचं सावरकर (भाग दोन) वाचताना मला अनेक गोष्टी नव्याने दिसल्या/समजल्या. त्यातील एक म्हणजे राज्यघटना! त्यात हिंदू महासभेच्या १९४४ च्या घटनाप्रस्तावावर सविस्तर लिहिलं आहे. त्यातील अनेक मुद्दे भारतीय राज्यघटनेत सामावलेले आहेत

- हिंदू महासभेचा घटनाप्रस्तावात लोकशाही मूल्ये आणि प्रगत विचार होते.
- एक व्यक्ती, एक मत, विचारस्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठा, समान नागरी संकल्पना भारतीय राज्यघटनेत पूर्णतः किंवा अंशतः समाविष्ट झाल्या.
- भारतीय राज्यघटनेने हे विचार अधिक समावेशक चौकटीत स्वीकारले.

काही साम्यस्थळे (पूर्ण यादी कदाचित खूप मोठी होईल)
१. एक व्यक्ती, एक मत
- हिंदू महासभेचा कलम: कलम ८  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ३२६  
सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा स्वीकार दोन्ही घटनांमध्ये स्पष्ट आहे. हे तत्त्व भारतीय लोकशाहीचा पाया ठरले.

२. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
- हिंदू महासभा: कलम १२  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद १९(१)(अ)  
दोन्ही घटनांमध्ये नागरिकांना मुक्तपणे बोलण्याचा आणि विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे.

३. धर्मस्वातंत्र्य (मर्यादांसह)
- हिंदू महासभा: कलम १५  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद २५–२८  
हिंदू महासभेने धर्मांतरावर काही निर्बंध सुचवले होते, तर भारतीय राज्यघटनेत कोणतेही निर्बंध नाहीत. पण धर्मस्वातंत्र्य दोन्हीत मांडलेले आहे. 

४. हिंदी राष्ट्रभाषा म्हणून
- हिंदू महासभा: कलम २०  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ३४३  
हिंदी ही अधिकृत भाषा असावी, हा विचार दोन्ही ठिकाणी आहे. शिवाय दोन्ही ठिकाणी प्रादेशिक भाषांचा सन्मानही राखावा हे म्हटलं आहे.

५. गोरक्षण
- हिंदू महासभा: कलम २८  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ४८ (राज्य धोरणाची तत्वे)  
गोवंश संरक्षणाचा मुद्दा दोन्ही ठिकाणी आहे. भारतीय राज्यघटनेत तो केवळ मार्गदर्शक तत्व म्हणून मांडला आहे.

६. विज्ञाननिष्ठा आणि शिक्षण
- हिंदू महासभा: कलम ३३  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ५१(अ)(ह)  
विज्ञाननिष्ठा आणि विवेकाचा पुरस्कार करण्याचा विचार हिंदू महासभेने १९४६ मध्येच मांडला होता. भारतीय राज्यघटनेत तो १९७६ मध्ये मूलभूत कर्तव्य म्हणून समाविष्ट झाला.

७. वेगळ्या मतदारसंघांना विरोध
- हिंदू महासभा: कलम ४०  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ३२५  
सर्व नागरिकांसाठी एकच मतदार यादी असावी, हा लोकशाहीचा मूलभूत विचार दोन्ही ठिकाणी आहे.

८. समान नागरी कायदा
- हिंदू महासभा: कलम ५५  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ४४ (राज्य धोरणाची तत्वे)  
सर्व नागरिकांसाठी समान कायदा असावा, हा विचार दोन्ही ठिकाणी आहे. दुर्दैवाने भारतीय राज्यघटनेत तो अजूनही केवळ मार्गदर्शक तत्व म्हणून आहे.

९. केंद्रित कार्यकारी सत्ताकेंद्र
- हिंदू महासभा: कलम ७०  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद ७४–७५  
केंद्रीय सत्तेला बळकटी देण्याचा विचार दोन्ही घटनांमध्ये आहे.

१०. देशी संस्थानांचा विलीनीकरण
- हिंदू महासभा: कलम ९०  
- भारतीय राज्यघटना: अनुच्छेद १(३)(क)  
संस्थानांना स्वतंत्र दर्जा न देता त्यांचे भारतात विलीनीकरण करणे, हा विचार दोन्ही ठिकाणी स्पष्ट आहे.

हिंदू महासभेचा १९४४ चा घटनाप्रस्तावात लोकशाही मूल्यांचा स्वीकार होता. भारतीय राज्यघटनेने या मूल्यांना अधिक व्यापक, समावेशक चौकटीत स्वीकारले. त्यामुळे या दोन घटनांमधील साम्यस्थळांचा बघितल्यास आपल्याला भारताच्या घटनात्मक विचारांची जडणघडण स्पष्टपणे समजते. (काहींना ती कधीच समजणार नाही)