Tuesday, March 20, 2018

प्रतिवाद - व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो

लोकसत्तामध्ये एक पुस्तक (व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो) परिचय वाचला. त्यावरील माझे मत.
राष्ट्रवादाची मांडणी काय आहे, कशी असावी हे मुद्दे चर्चेचे असू शकतात पण राष्ट्रवादच नाकारणे के चुकीचे आहे. राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी काही प्रतीके लागतात आणि तेव्हाच देश एकत्र राहू शकतो. ही प्रतीके राष्ट्रगीत, ध्वज, महापुरुष अशी असतात, आणखीही असू शकतात.
भारत माता की जय अशा घोषणा देणाऱ्यांना नेहरूंनी विचारलं होतं की भारत माता म्हणजे काय, कोण? त्याचं उत्तर त्यांनीच दिलं की, भारत माता म्हणजे ही जमीन, झाडं, नद्या आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व भारतात राहणारे. हे सगळं मिळून भारत माता होते. म्हणजे नेहरूंनासुद्धा भारत एक देश ही संकल्पना मान्य होती. इथे सांगण्याचं कारण म्हणजे चौधरींना नेहरू आवडतात.
जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि सरदार पटेल सर्व संस्थानिकांना भेटत होते तेव्हा पहिल्याच सभेत त्यांनी सांगितले की 'भारतीयांपैकी काही जण (ब्रिटिश) प्रांतात तर काही जण संस्थानात राहतात. हा केवळ एक अपघात आहे. आपणा सर्वाची संस्कृती एकच आहे. आपण सर्व जण रक्ताने व हृदयाने एकसंध आहोत. ..तेव्हा आपणाला बंधुत्वाच्या व मित्रत्वाच्या नात्याने एकत्र बसून कायदे बनवायचे आहेत.. मातृभूमीवरील प्रेम व निष्ठेने प्रेरित होऊन आपल्याला एकत्र यावयाचे आहे.. आज आपण इतिहासाच्या निर्णायक ठिकाणी उभे आहोत.. एकत्र न येण्याच्या कारणाने पूर्वी आपण अनेकवेळा परकीयांचे गुलाम झालो होतो.. तेव्हा, बंधूंनो सहकार्य न करून.. ही सुवर्णसंधी वाया घालवून भावी पिढय़ांचा शाप घेऊ नका.' यात सरदारांनी भारतीय ही एक संस्कृती आपल्या सर्वांची आहे हे उद्धृत करून एकत्र येण्याबद्दल सांगितले. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.
ब्रिटिशांपूर्वी जर भारत एक नव्हता तर पानिपतावर लाखो मराठ्यांनी आत्मबालिदान का केलं? महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला अब्दालीला कित्येक वर्षे लागली असती किंवा तो आलाही नसता. मग तरुण भावी पेशवा आणि पेशव्यांचा भाऊ तिथे जाऊन का लढले? कारण अब्दाली परकीय होता. दिल्लीचे तख्त जरी मुस्लिम असले तरी ते भारतीय होते. आणि ते वाचवणे मराठ्यांना कर्तव्य वाटले.
त्याआधी अकबराला संपूर्ण भारतावर एकछत्री अमल असावा असं का वाटलं? संपूर्ण भारत म्हणजे काय? तेव्हा तर ब्रिटिश कुठेच नव्हते. मग त्याला केवळ भूभाग त्याला ताब्यात घ्यायचा होते का? नाही, अकबराला संपूर्ण भारत जी आधीपासूनची संकल्पना होती ती एका अमलाखाली आणायची होती.
त्याही आधी चाणक्याने अलेक्झांडरला पराभूत करण्यासाठी सीमेवरील राज्यांची मोट बांधली आणि चाणक्य त्यात यशस्वी झाले. ही मोट का बांधली गेली? आणि सीमेवरील म्हणजे काय? तर भारतीय सीमेवरील. पण इंग्रजांच्या आधी तर भारत नव्हता ना... मग हे कसे झाले. चाणक्याने नंतर मगध हस्तगत करून चंद्रगुप्ताला राजा बनवले आणि अधिक समर्थ साम्राज्य निर्माण केले.
त्याही आधी, वेदात
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति
भारत एक राष्ट्र आहे याचा उच्चार आहे.
अर्थात हे कितीही तर्कशुद्ध पटवण्याचा प्रयत्न केला तरीही विचारवंत केवळ आणि केवळ डावे असतात असं समाजणार्यांना ते कळणार नाही. पण ज्यांना कळेल त्यांनी ते समजून घ्यावं म्हणून हे लेखन.


दि. ४ मार्च २०१७

शिवाजी महाराजांचे मुस्लीम सरदार

सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही. ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले. संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
चूक - सिद्दी हिलाल हा एक सरदार होता पण घोडदळाचा प्रमुख नव्हता
शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?
"नूर खान"…. !
चूक - पहिले सरसेनापती नेताजी पालकर होते. अन्य प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि खंडेराव कदम होते.
शिवाजी महाराजांबरोबरआग्र्याला गेलेला---
"मदारी मेहतर"
बरोबर. सोबत हिरोजी सुद्धा होता. मदारी होता की नाही यावर मत मतांतरे आहेत. अधिक माहितीसाठी पहा - https://m.facebook.com/dasabodh/posts/446234875521176:0
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
''काझी हैदर"
बरोबर. पण एकमेव नव्हता.
शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव ''मीर मोहम्मद"
चूक - महाराजांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत पण ती पॅरिस, पोर्तुगाल मध्ये आणि एक रशियात आहे
आणि
शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा… "रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान..!!!
बरोबर. पण वाघनख्या पाठवणारा नाही तर शस्त्र तयार करणारा एक कारागीर होता तो. त्याने केवळ अफझलखानाला मारायचे म्हणून वाघनखं बनवून दिली नव्हती
आता प्रश्न हा आहे की महाराजांच्या नावाने त्यांना बळेच मुस्लिम विरोधक नाही असं दाखवण्याचा प्रयत्न का केला जातो? कारण सोपं आहे, मूळ इतिहासापासून लोकांना दूर नेलं, की स्वत्व विसरायला लावणे सोपे असते. महाराज धर्म निरपेक्ष होते पण त्यांनी मशिदी पडल्या नाहीत असं मुळीच नाही. जी मशीद मंदिर तोडून बांधली गेली ती मशीद महाराजांनी पाडली आहे. हा इतिहास जाणीवपूर्वक लपवला जातो.
WhatsApp वर आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. स्वतः आधी पडताळून पहा आणि मगच forward करा. आपण महाराजांचा इतिहास विकृत तर करत नाही ना याचा विचार करा. देशातील अनेक ठिकाणच्या इतिहासाचं आधी इंग्रजांनी नंतर काँग्रेस आणि डाव्यांनी भरपूर वाटोळं केलं आहे. त्या पापात आपण सहभागी होऊ नका

दि. ७ मार्च २०१७

नाना फडणीस

नाना फडणीस... नाव ऐकलं की आधी प्रतिमा येते ती स्त्रीलंपट, लढाईतून पळून जाणारा वगैरे वगैरे... का?
गेल्या काही दिवसांत पेशवाईवरील बरीच पुस्तके वाचली. नाना फडणीसांना पानिपतला सदाशिवरावांसोबत कारभारी म्हणून पाठवले होते. तिथे रणात अन्य लोक (पाळणाऱ्यात होळकर, विंचूरकर, महादजी शिंदे सुद्धा होते) पळाले, त्यांच्याबरोबर हे सुद्धा पळून आले. पण पळपुटा म्हटले गेले फक्त नाना फडणीसाला. असो, पळाले हे खरं...
पुढे माधवरावांच्या सोबत फड सांभाळला तो यांनीच. पानिपतवरील लढाई एक प्रचंड धक्का होता आणि त्यापाठोपाठ नानासाहेब पेशवे निवर्तले. पेशव्यांचे थोरले चिरंजीव विश्वासराव पानिपतात मारले गेले. इथे राघोबादादाला पेशवे बनण्याची संधी होती पण संपूर्ण जबाबदारी घेणं राघोबाने नेहमीच टाळलं. माधवराव 'पेशवे' झाले. हा तरुण पेशवा मात्र अनेक घरातल्या आणि बाहेरच्या झुंजी देत अतिशय लवकर निवर्तला. पण या अवधीत त्यांनी पानिपत वरील जखमा बुजवल्या आणि नाना फडणीस सारखे लोक पेशवाईच्या आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्याच्या कामी लावले. पुढे नारायणराव पेशवे झाले आणि त्यांना राघोबा + आनंदीबाई यांनी मारले. रात्री गुपचूप सगळे विधीही आटोपले. सर्व पुणे झोपलेले असताना नाना फडणीस यांनी अन्य 3 कारभाऱ्यासोबत राघोबाला पेशवेपद मिळू नये अशी शपथ घेतली. तरी राघोबा पेशवे झाले. 5 महिन्यात जेव्हा नारायणरावांची पत्नी बाळांत झाली तेव्हा या कारभाऱ्यांनी राघोबा बाहेर असताना चिमुकल्या सवाई माधवराव च्या नावे पेशवाई घेतली आणि बारभाईची लढाई सुरू झाली. याला कारस्थान का म्हटले? वास्तविक व्यसनी राघोबाला पेशवाई दिली हीच चूक होती ती सुधारणे याला कारस्थान म्हटले गेले.
मग राघोबा इंग्रजांना मिळाले आणि इंग्रजांकडून हिंदवी स्वराज्यावर हल्ला करवला. इथे नाना फडणीसांनी अतिशय धूर्तपणे हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. अर्थात या कामी होळकर आणि शिंदे यांची मदत झालीच. पण लढाई सुरू होण्याआधीच वडगावला इंग्रजांनी शस्त्रे म्यान केली आणि राघोबाला नानांच्या हवाली करून, मोठी खंडणी देऊन ते चालते झाले. ही प्रचंड हार इंग्रजांना किमान 50 वर्ष मागे घेऊन गेली. स्वराज्याच्या या विजयाचे शिल्पकार होते नाना फडणीस.
सवाई माधवराव वयाच्या 14-15 वर्षी वारले आणि त्याजागी दुसरा बाजीराव म्हणजे राघोबाचा मुलगा आला. याने आधी नाना फडणीसांना कैदेत टाकलं आणि नंतर जेव्हा कारभार पेलला नाही तेव्हा पुन्हा फडणीस केलं. हे सगळं होऊनही नाना कायम हिंदवी स्वराज्यासाठी झटले आणि ते असेपर्यंत इंग्रजांना आपले हात पाय पसरता आले नाहीत. 13 मार्च 1800 साली नाना फडणीस वारले आणि पुढे केवळ 18 वर्षांत शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला.
मला वाटते की नाना फडणीसांत दोष असतील पण त्याचे विकृतीकरण इंग्रजांनी केले असावे. कारण नाना फडणीसांमुळे त्यांना मराठा साम्राज्य जिंकता आलं नव्हतं. मोर नाचताना इंग्रजांनी मागून फोटो काढला आणि आपल्या साहित्यिकांनी तोच मोराचा फोटो आहे असं मानून लेखन केलं आणि नानावर निव्वळ बाईलवेडा आणि विकृत असा शिक्का मारला. धोरणी आणि मुत्सद्दी नाना त्यात लोप पावले.


दि. १३ मार्च २०१७

शुगर कोटेड टीका

माधव "आपटे"... डोंबिवली फास्ट मधला एक सामान्य माणूस. व्यवस्थेवर आणि ती राबवणाऱ्यांवर चिडून कायदा हातात घेतो. तेव्हा इन्स्पेक्टर सुभाष अनासपुरे म्हणतो, "माधव 'आपटे' नावाचा कुणीही असं काही करू शकतो का?"
सगळे लोक डोंबिवली फास्ट काय भारी चित्रपट आहे म्हणतात. यात ब्राह्मण सुद्धा आहेत छान चित्रपट म्हणणारे
संदीप खरे एक गाणं लिहितो, त्याला सलील कुलकर्णी चाल लावतो. गाणं आहे, मी मोर्चा नेला नाही. यात या मोर्चा न नेणाऱ्या, संप न करणाऱ्या माणसाला जेव्हा तो दगड होऊनी पडलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारायला देखील कुणी उचललेले नसते. हा माणूस कोण, याच्या "टकलावर अजून रुळत असते एक अदृश्य लांबशी शेंडी". म्हणजे कोण ते कळालं असेलच. तर या गाण्याला आणि अल्बमला देखील सर्व लै भारी म्हणतात. यात ब्राह्मणही आले.
मग एक मंत्री असलं शुगर कोटेड न बोलता म्हणतो की घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का... झालं सगळे ब्राह्मण त्याच्यावर चिडून बोलतात. तुझा बाप जो मुख्यमंत्री आहे तो ब्राह्मण आहे याची जाणीव करून देतात. का, कारण तो मंत्री डायरेक्ट बोलला म्हणून?
निशिकांत कामतने डोंबिवली फास्ट मध्ये घेतलेला संवाद, संदीप खरेने घेतलेला कवितेतला भित्रा आणि कांबळे बोलले यात अर्थात्मक काही फरक नाहीये. फरक एकच आहे तो म्हणजे कांबळे थेट बोलले. म्हणजे ब्राह्मणांना शुगर कोटेड काहीही बोललं तरी चालतं पण थेट बोललेलं खपत नाही... बरोबर ना...

दि. १७ मार्च २०१७

माझी कथा - भैरवसिंग (चित्रपट - उडान)

मी भैरवसिंग. उडान मधल्या रोहनचा बाप. मला त्यात उगाचच व्हिलन दाखवलं आहे.
माझ्याकडे वडिलोपार्जित काहीच नव्हते. माझा कारखाना मी सुरू केला. त्यात मेहेनतीने पैसा कमावला. माझा भाऊ, जिमी, त्याला शिकवलं. लग्न झाले. रोहन झाला पण त्याची आई लगेच वारली. काही दिवस रोहनला एकटं सांभाळायचा प्रयत्न केला. पण जमलं नाही आणि खरं तर बायकोशिवाय मी राहणं मला अवघड होतं. त्याच्यावर सावत्रआईचा त्रास नको आणि त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून त्याला बोर्डिंगला पाठवलं. त्यानंतर लग्न केलं. दुर्दैवाने अर्जुन 5 वर्षांचा असताना त्याची आईही वारली. माझ्या दोन्ही बायका गेल्या पण माझं कुणी ना सांत्वन केलं ना मदत. बायकोच्या माहेरहून कोणी माझ्यावर कसलेही आरोप केले नाहीत हे माझं नशीबच म्हणावं लागेल.
रोहनला भेटायला मी काही वेळा बोर्डिंगला गेलो होतो. पण त्याला भेटण्याची हिम्मत झाली नाही. आणि तोही त्याच्या मित्रांमध्ये खुश दिसला. फुटबॉल छान खेळत होता. चांगलं वाटलं. परत आलो. म्हटलं मुलगा मोठा होतोय, शिकेल आणि आपल्या मेहेनतीवर कमावेल.
पण अचानक त्याने दारू पिऊन धिंगाणा केला, मास्तरांच्या खोड्या काढल्या आणि बरंच काही होऊन त्याला बोर्डिंग मधून काढून टाकल्याचं कळालं. पण तरीही त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून मी त्याला इथल्या कॉलेजात ऍडमिशन मिळवून दिली. कठोर मेहेनत आणि करडी शिस्त त्याला पुन्हा रुळावर आणेल याची खात्री होती मला. कारण मी स्वतः तेच करून इथवर आलोय. पण हा कॉलेज मध्ये न जाता भटकत होता. माझ्या व्यायामाच्या शिस्तीला, अभ्यासाला तो त्याच्यावरचा अन्याय समजत होता. त्याला म्हणे लेखक व्हायचे होते. बेशिस्त, व्यायाम न करणारा, रात्री वडिलांचे पैसे चोरून, गाडी चोरून मित्रांबरोबर दारू पिणारा, सिगारेटी फुंकणारा हा तुम्हा प्रेक्षकांनापण अन्यायग्रस्त वाटला हे माझं दुर्दैव.
माझ्या चुका आहेत, मला मान्यही आहेत. दारू ही प्रमुख चूक. नशा जास्त झाला तर माझा कंट्रोल राहत नाही. अर्जुनला त्या दिवशी चुकून मारलं गेलं. मोठी चूक झाली. दुसऱ्या दिवशी बिझनेससाठी दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते. रोहन त्याचा मोठा भाऊ आहे. त्याच्यावर सोपवून गेलो. ते जाणे हे जबाबदारीतून पळणे नव्हतेे तर पुढील जबाबदाऱ्या घेण्यासाठी होते. पण रोहनने ही घटना फारच विचित्र पद्धतीने घेतली. मी पुन्हा एकटा पडू लागलो. जिमीला तर माझी शिस्त कधीच आवडली नव्हती. त्याने रोहनला समजावणे तर दूर पण उलट भडकावले. माझे एकटेपण दूर करण्यासाठी मी तिसऱ्या लग्नाचं ठरवलं. या सर्वांचा परिणाम म्हणजे रोहन खूप दूर गेला. त्याने लेखक बनण्यात मला काही अडचण नव्हती. पण शिक्षण पूर्ण करून, स्वतःच्या पायावर आधी उभं राहावं आणि मग काय वाटेल ते करावं एवढंच माझं म्हणणं होतं.
पण कठोर मेहेनत आणि करडी शिस्त म्हणजे वाईट असं मानणाऱ्या या पिढीला हा भैरवसिंग कळाला नाही.
एका गोष्टीचं बरं वाटलं ते म्हणजे माझ्या व्यायामाच्या बळजबरीमुळे रोहन माझ्यापेक्षा वेगात पळू शकला.
पोलिसात तक्रार केल्याने मला अर्जुन पुन्हा मिळू शकला नाही. I hope both are doing good...
मी दुसरीकडे नेहमी म्हणतो, "अक्सर जो दिखता हैं वो होता नही और जो होता है वो दिखता नही"
कधीतरी अर्जुन आणि रोहनला त्यांचा बाप कळेल या अपेक्षेत आणि प्रतीक्षेत

https://g.co/kgs/SSr4Pj

दि. २९ मार्च २०१७

जो जे वांछील तो ते 'न' लाभो

महाभारताच्या शांतीपर्वात खलील श्लोक आला आहे.
न राज्यं न च राजासीत न दण्डो न च दाण्डिकः।
स्वयमेव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम ॥
म्हणजे एका खऱ्या प्रजाराज्याचं हे एक स्वप्न आहे. राजा नाही, राज्य नाही, दंड नाही आणि त्यामुळे दंडव्यवस्थासुद्धा नाही. राज्य आणि दंडव्यवस्था नाही, म्हणून राजकारणीही नाहीत! पण हे केव्हा होऊ शकते? जेव्हा स्वतः प्रजा ही परस्परांचे रक्षण करेल तेव्हा... आज जेव्हा आपण राजकारण आणि राजकारणी नको, किंवा राजकारण हा चिखल आहे वगैरे तेव्हा प्रजा काही परस्परांचे आणि परस्पर हिताचे रक्षण करण्यासाठी सज्ज झालेली नसताना म्हणतो. जर राजकारणी या देशातून जगातून नष्ट झाले तर प्रजाहितरक्षण कोण करेल? हे नक्की मान्य की राजकारण अत्यंत गढूळ आहे, पण आजवर त्याद्वारेच अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. त्यामुळे जर राजकारण आणि राजकारणी यांना समाजजीवनातून हद्दपार करायचे असेल तर त्याआधी परस्परांचे रक्षण करणारी प्रजा तयार झाली पाहिजे. तोवर राजकारणी हद्दपार होऊ नयेत.
म्हणूनच समर्थांनी हरिकथेनंतर (धर्मानंतर) राजकारणाला महत्व दिले आहे.
पहिले ते हरिकथा निरूपण |
दुसरे ते राजकारण |
तिसरे सावधपण । सर्वांविषयी ।
म्हणजे 'आझादी'वाल्यांना सुद्धा हेच तर पाहिजे? नाही...
इथे 'गॉड तुस्सी ग्रेट हो' या चित्रपटाचा एक फोटो आहे आणि दुसरा फोटो आहे ज्ञानेश्वरांचा. काय संबंध या दोघांचा??? आहे!

'गॉड तुस्सी ग्रेट हो' मध्ये सलमान देवाच्या भूमिकेत जातो आणि मग एकामागे एक लोकांच्या मागण्या त्याच्याकडे येऊ लागतात. हा काही वेळातच परेशान होतो आणि म्हणतो, ज्याला जे हवे असेल ते मिळू दे. त्यानंतर गोंधळ सुरू होतो. लूटमार, कैदी तुरुंगातून सुटणे आणि बरेच काही... शेवटी तो देवाला म्हणतो बाबारे तू ग्रेट आहेस. आता हे तूच निस्तर.
पसायदानात ज्ञानेश्वरांनी पण ज्याला जे हवे ते मिळो असंच म्हटलंय ना, जो जे वांछील तो ते लाहो... म्हणजे जे सलमानने मागितले तेच... पण
ज्ञानेश्वरांनी अनेक *अटी व शर्ती लागू या प्रमाणे हे मागणे केले आहे
पहिली अट
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
दुष्टांचा दुष्टपणा नष्ट झाला पाहिजे आणि सत्कर्मात त्यांची गोडी वाढली पाहिजे
दुसरी अट
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
सर्व प्राणिमात्रांचे, केवळ मानवांचे नाही, एकमेकांशी मैत्र झाले पाहिजे
तिसरी अट
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
वाईटाची अंधारकाजळी नष्ट होऊन, स्वधर्म सूर्य अखिल विश्वात जागृत झाला पाहिजे. इथे धर्म म्हणजे religion नाही तर धर्म म्हणजे विहित कर्त्यव्य. ते प्रत्येकाने पूर्ण केले पाहिजे.
हे सर्व झालं तरच
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
'आझादी'वाल्यांचे मागणे हे 'गॉड तुस्सी...'च्या मालिकेतील आहे. अविचारी आणि अविवेकी. पण ही चूक 'आझादी'वालेच करतात असं नाही तर आपणापैकी बरेच असे असतात जे संपूर्ण राजकारणच नाकारतात, त्याद्वारे ते राज्यव्यवस्था नाकारत आहेत याचे कदाचित त्यांना भान नसते. यातून ज्ञानेश्वरांचे 'जो जे वांछील...' साध्य होणार नसून 'गॉड तुस्सी...' मधील अराजक येईल हे समजून घेतले पाहिजे.
'रक्षन्ति स्म परस्परम्' चा नेमका अर्थ आणि कृती ही ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे. ते देखील अधिक व्यापक करून. तेव्हा जोवर या अटी व शर्ती लागू होत नाहीत तोवर जो जे वांछील तो ते 'न' लाभो!
दि. ४ एप्रिल २०१७

प्राचीन भारतीय ज्ञान

भारतात मारुती शेपटीने उडायचा, नारदाची वीणा म्हणजे रॉकेट होतं, गणपती हा क्लोन आणि प्लास्टिक सर्जरीने डोकं बसवलेला होता ही निव्वळ मिथकं आहेत. पण लोकांनी मिथकाला विज्ञान म्हणायला सुरुवात केल्याने सध्या गोंधळ झालाय आणि त्यामुळे अनेक लोक म्हणतात की भारतात विज्ञान नव्हतंच. भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, कालमापन, गणित हे उच्च स्तरावर होते, त्यातील काही नमुने खाली दिले आहेत.
1. वस्त्रोद्योग - हा भारत आणि चीन शिवाय अन्य कुठेच नव्हता. भारत सुती आणि चीन रेशमी कापड विकत असे.
2. धातुकला - कथिल मिळवणे ही अत्यंत अवघड कला आहे. 3℃ चा फरक पडला तर कथिलाच्या पाण्याची वाफ होते. त्यामुळे त्याचे ऊर्ध्वपातन अत्यंत कौशल्याने करावे लागते जे केवळ भारतात होते. लोखंडावर सुद्धा आपले प्रभुत्व होते. अशोकस्तंभासारखे स्तंभ आपल्याकडेच उभे राहिलेत. सुवर्णालांकर ही गोष्ट अन्य फारशी परिचयाची नव्हती आणि आपण त्यात कलाकुसर करायचो
3. प्रगत शेती - यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. ईच्छा असेल तर ऋषी कृषी हा मोहन देशपांडेंचा (ज्ञानेश नाही 😉) ग्रंथ वाच. शिवाय पराशर मुनींचे शेतीवरील काही ग्रंथ आजही उपलब्ध आहेत.
4. मानवी जीवनाच्या 'काम' या पुरुषार्थाकडे भारतीयांचा बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भ होता. कामसूत्र हा ग्रंथ आणि अनेक लेण्या व मंदिरे आजही त्याची साक्ष देतात.
5. मूर्तिकला - भारतात आजही 3000 वर्षांपूर्वीची मंदिरे/लेण्या आहेत.
6. स्थापत्यशास्त्र - दक्षिणेतील मंदिरे काही इंग्रजांनी येऊन बांधलेली नाहीत. 2 हजार वर्षे आणि त्याहून अधिक टिकू शकतील अशी मंदिरे इथेच बांधली गेलीत.
7. आयुर्वेद - औषधशास्त्रात भारत अत्यंत पारंगत होता आणि आहे. त्या काळी जे रोग होते त्यावर (क्षय सोडून) भारतात उपचार उपलब्ध होते. आजही जे surgical instruments वापरले जातात त्यांचे designs सुश्रुत संहितेतून घेतलेले आढळते.
8. खगोल - आकाशाचे 27 भागांत विभागणी आणि त्याद्वारे केलेले कालमापन, चंद्र व सूर्याची गती वेगळी असल्याने होत असलेल्या चंद्राच्या कलांचा वापर करून महिना मोजणी आणि दर 3 वर्षांनी अधिक मास टाकून त्यांची केलेली बरोबरी. नक्षत्रानुरूप वार्षिक नियोजन. 12 राशी व त्यावरून केलेले कालमापन. ग्रह तारे गोल असण्याचा सिद्धांत, अनेक ग्रह ताऱ्यांविषयी माहिती. उदाहरण म्हणून सांगतो, सप्तर्षींमध्ये वसिष्ठ-अरुंधती ही ताऱ्यांची जोडी आहे आणि दोघेही एकमेकांभेवती फिरतात. ही गोष्ट आज निरीक्षण करायला खूप सोपी आहे कारण आज दुर्बिणी उपलब्ध आहेत. पण आधी त्या नव्हत्या आणि तरीही भारताला हे माहीत होतं की हे दोन तारे एकमेकांभेवती फिरतात. म्हणून नवीन लग्न झालेल्याना त्याला नामस्कार करायला सांगायचे की तुम्ही बरोबरीचे आहात एक मोठा एक छोटा नाही म्हणून एकमेकांभेवती फिरा. एक स्थिर आणि दुसरा फिरतोय असं नको. आणि बरंच काही
9. गणित - दशमान पद्धती. ही जर नसती तर आजचे कोणतेच विज्ञान उभे राहू शकले नसते. गणितातील पायथागोरसचा सिद्धांत, पायचे मूल्य आणि त्याचा वापर करून काढलेले वर्तुळाचे क्षेत्रफळ, गुणाकार भागाकराच्या असंख्य पद्धती, फिबोनासी सिरीज सारख्या एकेक सिरीज आणि वैदिक गणितातील quick answer पद्धती या इथेच विकसित झाल्या.
10. संगीत - वेदकाळापासून राग, वेळ वा ऋतू नुसार असलेले राग हे आहेत. हे अन्यत्र कोणत्याही ठिकाणी नाही. गायनाशिवाय अनेक वाद्ये विकसित झाली.
11. नौका विज्ञान - भारतातील स्थानिक नौका विज्ञान प्रगत होते ते शिवाजी महाराजांनी सुद्धा कान्होजी आंग्रे यांच्या करवी वापरले होते.
अशा अनेक गोष्टी आहेत.
हे सर्व असताना पुढील वैज्ञानिक प्रगती का होऊ शकली नाही? याचे मानसशास्त्रीय आणि दोन कालखंडात उत्तर देता येईल. पहिला इस्लामी आक्रमणपूर्व आणि इस्लामी आक्रमणापश्चात. मानसशास्त्रीय यामुळे की समाज म्हणूनही एक मन असतं.
भारतात एक विशिष्ट स्तरापर्यंत ज्ञान विज्ञान वाढलं पण ते पुढे थांबलं. असं का घडलं असावं याबद्दल हे माझं मत. एक गोष्ट आधीच स्पष्ट करू इच्छितो की मी या विषयातील तज्ञ नाही. जे काही थोरांकडून ऐकले, वाचले, त्यावरून हे मांडले आहे.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. भारतात साधारण 8 महिने व्यवस्थित ऊन, 4 महिने पुरेसा पाऊस, उत्तम खनिज संपत्ती, शास्त्रीय शेती होती. या बळावर भारत सुजलाम सुफलाम होता. त्यामुळे मॉस्लोच्या सिद्धांतानुसार अन्न, वस्त्र, निवारा, विश्रांती आणि त्यानंतर सुरक्षा या प्राथमिक गरजा भारतात सर्वांना सहज उपलब्ध होत्या. संपत्ती निर्माण या जोरावर केव्हाच सुरू झाले होते. प्रेम आणि मैत्र असणं ही गरज त्यापुढची असते आणि ती पूर्ण करायला कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. त्यापुढे जाऊन आयुष्याची परिपूर्णता शोधणे हे सुरू होते आणि इथेच नवनवीन गोष्टी शास्त्रज्ञ (कोणतेही शास्त्र असो) शोधायला सुरुवात करतात आणि पुढच्या टप्प्यात तो शोध पूर्ण होतो. यात पुढे काय तर स्वरूप दर्शन, "तुझे तुज ध्यान कळो आले", याचा प्रवास.
हा सगळा प्रवास का होतो तर आधीच्या गरजा पूर्ण होत जातात आणि मानवी मन पुढील गोष्टी शोधत राहतं. तसंच समाजमन सुद्धा या प्रवासाला प्रोत्साहन देत राहतं आणि मदत करतं. आहे तिथे संपन्नता मिळाल्याने भारताने दुसऱ्यावर आक्रमण कधीच केले नाही. उलट अनेक निर्वासितांना भारताने आनंदाने आश्रय दिला. यामुळे संहारक शस्त्रे, वेगवान प्रवास याची गरज भासली नाही आणि त्याची निर्मितीही झाली नाही.
इस्लामी आक्रमणाआधी हा प्रवास इथवर झाला होता आणि शेवटच्या पातळीवर (काही लोक याला अध्यात्मिक पातळी म्हणतात, काही परिपूर्णता म्हणतात) होता. जे शोध लागले ते जशा गरजा होत्या तसेच लागले. त्यामुळे त्या काळासाठी ते परिपूर्ण होते. कदाचित अजून पुढे शोध लागले असते पण हा प्रवास पुन्हा प्राथमिक गरजेवर आला तो इस्लामी आक्रमणामुळे. ती गरज म्हणजे सुरक्षितता. आणि त्याच गरजेत तो अडकून बसला. पहिली काही वर्षे तर केवळ लूट झाली. ही लूट केवळ भौतिक संपत्तीची नव्हती तर ज्ञानाची होती. खरं तर ज्ञानाची लूट म्हणता येणार नाही, ज्ञानाचा अंत म्हणावे लागेल, कारण भारतातील विद्यापीठे जाळली गेली (https://en.m.wikipedia.org/wiki/Muhammad_bin_Bakhtiyar_Khilji?wprov=sfla1). सोबतच त्यातील ज्ञानी शिक्षकांना मारले गेले. इथे कळतं की भारतीय ज्ञान documented का नाही. कारण जे documentation होतं ते पूर्ण नष्ट केलं गेलं. Documented ज्ञान जाळले गेले तरी परंपरागत आणि गावठी शाळांच्या मार्फत अनेक जमातींनी हे ज्ञान जातं करून ठेवले. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी एकतर इस्लामी राज्य आले किंवा भारतीय राजे मंडलिक बनले. पण यामुळे सुरक्षितता आली असं झालं नाही.
याच दरम्यान युरोपात गरजही वाढत होती आणि शोधासाठी असलेले वातावरण सुद्धा होते. या बळावर तेथे नवीन विज्ञान सिद्ध झाले आणि मग युरोपने जग पादाक्रांत करायला सुरुवात केली.
इस्लामी आक्रमणापासून सुरू झालेली असुरक्षिततेची भावना आजही कायम आहे.
भारतीय ज्ञान परंपरेवर शेवटचा आणि निर्णायक घाव घातला तो इंग्रजांनी. इंग्रजांनी कशा पद्धतीने भारतीय ज्ञान आणि शिक्षण परंपरा मारली यावर गिरीशजी प्रभुणे यांच्याशी बऱ्याचदा बोलणे झाले. त्यावर त्यांची एक लेखमाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची "गुरुकुलम्" किल्लीही आहे. (कमेंट 3 पहा).
भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी नवीन शोधांच्या बाबतीत आपण मागेच आहोत. मागील 1000 वर्षांची असुरक्षितता आता नाही. तरीही मॉस्लोची पुढची पायरी, एक समज म्हणून आपण गाठू शकली नाही. याचे एक कारण आपण भारतीय मिथकांमध्ये विज्ञान शोधत बसलो. आणि दुसरे, जे मिथकाला मिथक मनात होते त्याचे brain washing असे झाले होते की सर्व ज्ञान हे युरोपातूनच जन्मले असे त्यांना वाटते. त्यामुळे नवीन शोधांच्या बाबतीत भारत जागतिक पटलावर नाही.
त्यामुळे सर्वांनी आपली ज्ञान महान परंपरा ध्यानी ठेऊन पुन्हा ती स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी संशोधन करावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पौराणिक कथांना विज्ञान मानले नाही तरच हे होऊ शकेल.

दि. ५ मे २०१७