Monday, October 5, 2020

पुस्तक परिचय - उत्तरकांड

पुस्तक परिचय - उत्तरकांड

अगदी खरं सांगतो, आधी हे पुस्तक वाचायची इच्छा नव्हती. कारण हे पुस्तक जेव्हा कळालं तेव्हा, अनुवादाचा प्रकाशन सोहळा आणि त्यावेळी भैरप्पांनी केलेलं मोदीस्तुतीगान हे कळालं होतं. त्यामुळे या पुस्तकात आजच्या संदर्भाने अनावश्यक ओढाताण असेल असं वाटलं होतं. ओढाताण आहे, रामायणातील अनेक प्रसंग गाळले आहेत, किंवा बदलले आहेत. पण ती ओढाताण मोदींना महान ठरवण्यासाठी नक्कीच नाहीये.

एक तर "पर्व" प्रमाणे भैरप्पांनी सर्व व्यक्तिरेखा मानवी पातळीवर आणल्या आहेत. त्यामुळे कोणेतेही चमत्कार नाहीत. असं वाचायला खरंच चांगलं वाटतं. दुसरं म्हणजे सगळी कथा सीता सांगत आहे. त्यामुळे सीतेला झालेले त्रास अगदी थेट दाखवून दिलेले आहेत.

ओढाताण केलेले अथवा बदललेले प्रसंग
- दशरथावर आणि राण्यांवर उपचार केले असं सांगितलेलं आहे. यज्ञही नाही किंवा नियोगही नाही
- सीतेचं स्वयंवर न दाखवता, "ज्यांना पण जिंकायचा त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन यावे आणि धनुष्य उचलावा", असं दाखवलं आहे
- कैकयीला दिलेली वचने ही, तिच्या वडिलांना दिलेली आहेत असं दाखवलेलं आहे
- रामाला वनवासासाठी लागणारे एकही हस्तकौशल्य येत नाही ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे. एवढी की जर लक्ष्मण सोबत नसता तर राम आणि सीता जिवंतच राहू शकले नसते
- जटायू आणि रावण युद्ध पूर्णपणे गाळून टाकलंय. मुळात रावणाने सीताहरण न करता त्याच्या सैनिकांनी ते केलंय असाच प्रसंग घेतला आहे
- तारा, वाली, सुग्रीव यांची कथा वेगळीच वाटते
- हनुमान रामापेक्षा सुमारे १५ वर्ष मोठा दाखवलाय ("पर्व" लिहिताना प्रमुख प्रसंग आणि प्रमुख पात्रे यांचे कोष्टक करून त्यांची वये काय असतील त्याचा अभ्यास भैरप्पांनी केला होता. इथे हनुमान १५ वर्षे मोठा दाखवल्याने अचानक भैरप्पांनी हे काय केलंय असं वाटून जातं)
- रावण सीतेवर बळजबरी न करता तिची मनधरणी का करतो, याचे कोणतेही कारण मिळत नाही
- राम सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावतो याचे कारण, सीतेने "हरणाची मागणी केल्याने हे सगळं घडलं" असा विचार करतो, चिडतो हे दाखवलं आहे
- राम अयोध्येला परत येताना अयोध्या कशी दरिद्री झाली ते दाखवलंय. राम येतोय म्हणून गुढ्या-तोरणे उभारली वगैरे काहीच नाही
- जंबुक हत्या ही रामायणातही प्रक्षिप्त असलेली कथा यात येते (यानंतर तर पुस्तक पुढे वाचूच नये असं वाटत होतं. निव्वळ भैरप्पा या नावामुळे पुढे वाचत राहिलो)
- शेवटी राम लव-कुशांची जबाबदारी लक्ष्मणाच्या खांद्यावर टाकून जलप्रवेश करतो. वास्तविक लक्ष्मण हा रामाच्या आधी जलप्रवेश करतो असं मी वाचलेलं आहे

एवढे बदल, एवढी ओढाताण असली तरी पुस्तक का वाचायचे...
१. सीतेच्या तोंडून आलेलं हे रामायण आहे. संपूर्ण मानवीकरण आणि स्त्रीमनाच्या गाभ्यातून आलेलं रामायण नक्कीच वेगळं वाटतं
२. रामाच्या दृष्टीने त्याने शेवटी दिलेली उत्तरे पूर्णपणे पटत नाहीत, तरीही प्रामाणिक वाटतात. त्यातून राजा आणि त्याची कर्तव्ये, त्याही पुढे कर्तव्यांशिवाय काहीच नाही... हे दिसतं आणि त्याचा अर्थातच त्रासही होतो
३. कथेच्या शेवटी बृहदारण्यक उपनिषद आणि त्यातील तत्त्वांवर भाष्य आहे. मुळात माणूस प्रत्येक गोष्ट स्वतःसाठीच करत असतो. साहित्य, कला तर स्वानंदासाठीच असते असं म्हणतात. मी धर्माचरण केलं तर मला स्वर्ग मिळेल, म्हणून मी धर्माचरण करतो. इतकंच नाही तर, मी प्रेम केल्याने मला समाधान मिळतं, म्हणून मी प्रेम करतो. प्रेम, भक्ती, त्याग, समर्पण या सगळ्या बाबी या केवळ 'आत्म'च्या आनंदाशी जोडल्या गेल्या आहेत. तो आनंद मिळतो, म्हणून लोक हे सगळं करतात. बृहदारण्यक उपनिषदात कोणतीही गोष्ट, "स्व" अथवा "आत्म"साठी प्रत्येकजण करत असतो हे सांगितलं आहे. त्यावर पुस्तकातील काही भाग - "तुझा आनंद तूच शोधला पाहिजेस, असं याज्ञवल्क्य महर्षींनी आपल्या पत्नीला थेटच सांगितलं होतं. संसाराचा त्याग करून परिव्राजकाच्या जीवनाला प्रारंभ करताना त्यांनी सांगितलेला 'आनंद' कोणता? आत्मतत्त्व हेच सगळ्याचं अंतिम सत्य आहे आणि त्यामुळे लौकिक गोष्टी, पुत्र-पौत्र यांच्यापेक्षा प्रिय असतं. त्यामुळे ‘आत्म’च प्रिय असतं हे जाणून त्या ‘आत्म’चीच उपासना केली पाहिजे. ‘आत्म’ हेच आनंदाचं मूळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे! पती-पत्नी-मुलं हे संबंध मर्यादित आहेत, असं सांगतात."
शेवटच्या प्रकरणातील उपनिषदावरील भाष्य या पुस्तकाला प्रचंड मूल्य प्रदान करतं.
४. याशिवाय रामाचा आणि सीतेचा शेवट अतिशय भावपूर्ण रेखाटलेला आहे. वनवासाच्या मध्यापर्यंत एकतानता असलेली राम-सीतेची जोडी वनवासाच्या अखेरच्या पर्वापासून एकमेकांना समांतर चालत जाते. तिचा शेवटही समांतर होतो. अगदी शेवटी महर्षी वाल्मिकी म्हणतात - ‘‘तारका, काय सांगू? पक्ष्यांच्या जोडीतल्या एकाला मारून त्यांच्यामध्ये विरह निर्माण झाल्यानंतर मनात निर्माण झालेली वेदना व्यक्त करण्यासाठी मी राम-सीतेच्या जीवनाचा आधार घेतला. निदान हे काव्य तरी सुखान्त करायची माझी आस होती; पण ते शक्य झालं नाही. कवीला काहीही शक्य आहे, हे खरं नाही बघ! याचंच वैफल्य मनाला ग्रासून टाकत आहे.’’

असा दुःखांत असलेलं हे पुस्तक... "उत्तरकांड"

पुस्तक - उत्तरकांड
लेखक - एस् एल् भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने - ३०४
मूल्य - ₹३९५

Friday, September 4, 2020

पुस्तक परिचय : या सम हा

बाजीराव पेशवे म्हटलं की सोबतच मस्तानी म्हणणं हे कर्तव्य असल्यासारखे लोक बाजीरावांना केवळ मस्तानीसोबत जोडतात. हे आजचं आहे असं नाही. नव्वदच्या दशकात राऊ कादंबरीवर आधारित राऊ याच नावाची मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू झाली होती. त्यात बाजीराव मनोज जोशी होते आणि मस्तानी अश्विनी भावे! साहजिकच अश्विनी भाव्यांना भाव देण्यासाठी असेल पण त्याही मालिकेत मस्तानीचा प्रभाव वाढला होता आणि पराक्रमी बाजीराव झाकोळले गेले होते. संजय भन्साळीच्या सिनेमामुळे "मस्तानीचे प्रेमी" बाजीराव हे "पराक्रमी" बाजीरावापेक्षा मोठे ठरले. बाजीरावांवरील एका कार्यक्रमात मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे सर गेले होते. त्यात पराक्रमी बाजीराव कुठेच न दिसल्याने ते अस्वस्थ झाले. शांतपणे कार्यक्रम सोडून बाहेर आले. पण याच अस्वस्थतेतून "या सम हा" हे प्रचंड अभ्यासपूर्ण पुस्तक तयार झाले.

विसाव्या शतकाच्या आरंभी म्हणजे बाजीरावांनंतर सुमारे २०० वर्षांनी, युद्धतत्त्वांची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली. या युद्धतत्त्वांवर आणि युद्धशात्र शिकवताना जे महान जागतिक युद्धविषयक तत्त्वज्ञ आहेत, त्यांच्या युद्धनीतीवर बाजीरावांची प्रमुख युद्धे पित्रे सरांनी तोलून दाखवली आहेत. या सर्व युद्धात ज्याला जागतिक मापदंड म्हणता येतील अशा पद्धतीने बाजीरावांनी सर्व युद्धे लढली आणि जिंकली आहेत. या युद्धांमध्ये खांडवा - बाळापूरची लढाई, गुजरात आणि कर्नाटक मधील मोहिमा या सुरुवातीला आहेत. या पुस्तकात सर्वाधिक चर्चा असलेली पालखेडची लढाई आहे. नंतर अमझेरा आणि बुंदेलखंड या लढाया आहेत. स्वराज्यातील आपसातील कलहाचे पर्यावसान म्हणजे दाभाड्यांच्या विरुद्ध केलेली डभईची लढाई आहे. शिवाजी महाराजांपासून सर्वांनी प्रयत्न करूनही हाती न आलेल्या जंजिऱ्याची मोहीम आहे. बाजीरावांनाही जंजिरा जिंकता आला नाहीच पण किमान सिद्दीने मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. ही आर्धी जिंकलेली लढाई सुद्धा आहे. त्यांनंतर बाजीराव दिल्लीच्या दारात जाऊन परत आले त्याची संपूर्ण व्यूहात्मक चर्चा आहे. निजामाला भोपाळच्या किल्ल्यात वेढून पुन्हा गुडघ्यावर आणलं ते आहे. वसईच्या लढाईत चिमाजी अप्पांनी केलेली शर्थ आहे आणि शेवटची लढाईत निजामाच्या मुलाला - नासिरजंगला - हरवले ते आहे. या सर्व लढाया/युद्धे याबद्दल लिहिताना पित्रे सर कुठेही बाजीरावांना "आपल्या कादंबरीचा हीरो" म्हणून कोणतीही सवलत देत नाहीत. जी आधुनिक युद्धतत्त्वे मानली गेली आहेत, त्या प्रत्येक कसोटीवर घासून बघतात आणि अखेरीस एक अजिंक्य सेनापती म्हणून बाजीरावांचं सोनं झळाळून उठतं.

ज्या १० आधुनिक युद्धतत्त्वांवर बाजीरावांच्या लढाया तोलून बघितल्या ती तत्त्वे आहेत -
१. उद्दिष्टाची निवड आणि पाठपुरावा
२. सुरक्षितता
३. गतिक्षमता
४. आक्रमक चाल
५. बळाचा मितव्यय
६. बळाचे केंद्रीकरण
७. विस्मयकारकता
८. मनोधैर्य
९. सहकार्य
१०. युद्धव्यवस्थापन
पालखेडच्या लढाईवर या पुस्तकात ३ प्रकरणे आहेत. वरील प्रत्येक पैलू त्यात तोलून बघितला आहे. उदा: निजामाला पूर्ण मात हे उद्दिष्ट होतं, त्याचाच पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी शाहूंनी माघारी बोलावल्यावरही त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करून, बाजीराव माघारी आले नव्हते. सहा महिने बाजीराव निजामाला आपल्या मागे लागण्यासाठी उद्युक्त करत होते. निजाम त्यांना गाठण्याआधीच पुढील टप्प्यावर पोहोचत होते. जेव्हा निजामाने बाजीराव आपल्या पकडण्याच्या बाहेर गेले आहेत असं वाटून माघारीची वाट धरली तेव्हाच बाजीरावांनी औरंगाबादवर चढाई केली आणि निजामाला पुन्हा बाजीरावांच्या मागे जावं लागलं. बाजीरावांकडे मुख्यतः घोडदळ असायचे. त्यामुळे गती, कमीत कमी बळाचा वापर आणि व्यवस्थापनात बुणग्यांची कोणतीही सोय करावी लागत नसे. पालखेडच्याच लढाईत निजामाचा तोफखाना हा युद्धक्षेत्रापासून काही किलोमीटर दूर अडवून ठेवला आणि बिना दात/पंजे असल्याप्रमाणे निजामाचे मनोधैर्य खच्ची केले. बाजीराव हे बारगिरांचे सेनापती होते. ते कायम आपल्या सैन्यात एका सैनिकासारखे वावरत. यामुळे त्यांच्या सैन्याचे मनोधैर्य कायम उच्च असे. अनेक लढायांमध्ये वेगवेगळ्या तुकड्यांचे निर्णय हे शिंदे, होळकर, पवार, चिमाजी आणि अन्य सरदार घेत. मात्र मूळ आराखडा बाजीरावांचा असे. त्यामुळे सैन्य विखुरलेले असताना केव्हा एकत्र करायचे आणि एकत्रित हल्ला करायचा याचे गणित पक्के असायचे.

या युद्धतत्त्वांशिवाय सुन्त्झू या चिनी युद्ध तत्त्वज्ञाने अडीच हजार वर्षांपूर्वी "द आर्ट ऑफ वॉर" नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यातील तत्त्वे आजही जगन्मान्य आहेत. याही कसोटीवर बाजीरावांची युद्धे तपासून पाहिली आहेत. यातील मुख्य बाबी -
१. न लढताच जिंकणे सर्वात उत्तम - निजामाची सगळीकडून कोंडी केली, त्याचा तोफखाना त्याच्याजवळ येऊ शकला नाही आणि पालखेडला प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढाई न होता निजाम शरण आला
२. जे अवघड आहे त्याची योजना ते सहज असतानाच आखावी, जे प्रचंड आहे, ते लहान असतानाच हाताळावे - निजामाने साताऱ्यावर चढाईचा विचार करताच बाजीराव वेगाने त्याच्या भागात घुसले आणि निजामाला त्याचा बेत बदलावा लागला. इथे जर निजाम साताऱ्यावर चालून गेला असता तर एकूण युद्ध खूप मोठं झालं असतं.
३. विजयाचा उन्माद साजरा करू नये, जे करतात ते रक्ततृषार्त असतात - बाजीरावांनी कधीही विजय साजरा केला नाही. दाभाड्यांना डभईला हरवल्यावर तर त्यांच्या आईंना भेटायला स्वतः गेले होते.
४. तुम्ही स्वतःला अजेय बनवा आणि शत्रू जेव्हा असुरक्षित असेल तेव्हाच त्याच्यावर हल्ला करा. आपण हरणार नाही अशाच ठिकाणी मुरब्बी लढवैये मोर्चेबंदी करतात आणि पराभवाला कारणीभूत ठरेल अशा कोणत्याही निमित्ताकडे दुर्लक्ष करत नाहीत - डभईच्या लढाईत बाजीरावांनी आधी दाभाड्यांना बाकी सैन्यापासून दूर नेले आणि नंतर नदीच्या चंद्रकोरीत अडकवले. इथे बाजीराव हरण्याच्या सगळ्याच शक्यता दूर झाल्या.
याच तत्त्वज्ञानातील दुसरा एक तत्त्वज्ञ, चुंग हो ची, म्हणतो की - गोंधळ होण्यापूर्वी गोंधळाची जाणीव असणे, संकट येण्यापूर्वी संकटाची जाणीव असणे, विध्वंसापूर्वी विध्वंसाची जाणीव असणे आणि आपदेपूर्वी आपदेची कल्पना असणे हे गहन ज्ञान आहे... या आणि अशा सर्व बाबी या बाजीरावांच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरतात.

कार्ल फॉन क्लाऊजवित्स हा बाजीरावांनंतर ८० वर्षांनी जन्मला. त्याने "ऑन वॉर" या ग्रंथात हालचालप्रधान युद्धांबद्दल लिहिले आहे. त्याने खालील मुद्दे मांडले होते -
१. शत्रूचा अन्नपुरवठा तोडणे/कमी करणे - भोपाळच्या किल्ल्यात निजामाला जेवण मिळणे मुश्किल झाले होते 
२. शत्रूच्या तुकड्या विलग राखणे - पालखेड आणि डभई या दोन्ही ठिकाणी मुख्य तुकडीला विलग केले गेले होते
३. शत्रूला माघार अधिक धोकादायक करणे - प्रत्येक लढाईतच शत्रूला परतीच्या वाटा पूर्ण बंद केल्या होत्या 
४. शत्रूची स्वतंत्र ठाणी मोडणे - दिल्लीच्या चढाईच्या आधी बाजीरावांनी आपल्या लहान लहान तुकड्यांच्या मार्फत अनेक ठिकाणी शत्रूला मात दिली होती (अपवाद - होळकरांचा पराभव)
५. शारीरिक आणि नैतिक परिश्रमाची तयारी - जे अंतर सामान्य घोडदळ ५ दिवसात पूर्ण करे, तेच अंतर बाजीरावांचे सैन्य २ दिवसात पूर्ण करत असे. घोड्यावर बसल्याबसल्याच शेतातील दोन कणसं घेऊन जेवण पूर्ण होत असे.
६. नेमकेपणा आणि शिस्त - बाजीरावांच्या सैन्याने कधीही लुटालूट केली नाही, कधीही कोणत्याही स्त्रीवर हात टाकला नाही 
याही प्रत्येक मुद्यांमध्ये बाजीरावांचे युद्धकौशल्य वादातीतपणे सिद्ध होते.

बेसिल हेन्री लिडेल हार्ट हा हालचालप्रधान युद्धावरील मोठा भाष्यकार आहे. त्याच्या मांडणीत
- उद्दिष्ट आणि क्षमता या जुळल्या पाहिजेत - बाजीराव दिल्लीच्या दारी जाऊन हल्ला न करता परतले
- बदलत्या परिस्थितीत लवचिकता असली पाहिजे - होळकरांची तुकडी पराभूत झाल्यावर आग्र्याला शत्रुसैन्याची पार्टी सुरू होती. ते बघून बाजीरावांनी आग्र्याला वळसा घालून थेट दिल्ली गाठली
- शत्रूला अनपेक्षित बाजूने हल्ला केला पाहिजे - बंगश जेव्हा बुंदेलखंडात होता तेव्हा ५ दिवसांचे अंतर २ दिवसात कापून त्याच्यावर अनपेक्षित हल्ला केला होता
- शत्रूच्या क्षमता ओळखून, घाई न करता निर्णय घेतले पाहिजेत - निजामाला पालखेड आणि भोपाळ या दोन्ही ठिकाणी त्याचा तोफखाना वापरता आला नाही
- शत्रू सावध असताना हल्ला न करणे - बाजीरावांनी आग्र्याला हल्ला न करता थेट दिल्लीला धडक मारली
- जिथे विजय झाला तिथेच पुन्हा हल्ला न करणे आणि जिथे पराजय होतोय तिथेच अधिक वेळ न घालवणे - थोडक्यात लवचिकता असली पाहिजे - प्लॅन बी कायम तयार असले पाहिजेत

अशा विविध युद्धतत्वज्ञांच्या मुद्द्यांवर बाजीराव हे अद्वितीय योद्धे ठरतात.

अर्थात काही चुकीच्या म्हणता येतील अशा बाबीही होत्याच. त्याही पित्रे सरांनी व्यवस्थित मांडल्या आहेत.
१. त्यातील पहिली म्हणजे अति सौजन्यशीलता - सद्गुणविकृती. चाणक्यनीतीतील
अग्नि: शेषं ऋण: शेषं, शत्रु: शेषं तथैव च ।
पुन: पुन: प्रवर्धेत, तस्मात् शेषं न कारयेत् ।।
ही बाब बाजीरावांनी अमलात आणली नाही आणि निजामाला दोन वेळा मारता येत असतानाही सोडलं. वसईला सगळ्या धर्मांध पोर्तुगीजांना जिवंत जाऊ दिलं...
२. वसुलीच्या पद्धतीत कोणत्याही सुधारणा त्यांनी केल्या नाहीत. त्यात त्यांना स्वारस्य नव्हते, किंवा तेवढा वेळ मिळाला नाही
३. आधुनिक शस्त्रे, तोफा या आपल्या सैन्यात असाव्यात असा प्रयत्न केला नाही. त्यांचा भर वेगावर असल्याने दुर्लक्ष केले असेल, पण दुर्लक्ष केले हे खरे...
४. समुद्र केवळ आंग्ऱ्यांवर सोडला, त्यात कोणतेही नवीन प्रयोग केले नाहीत.
या उणिवा या गालावर लावलेल्या तीटासारख्या आहेत. 

बाजीरावांनी शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हयातीत मोगल साम्राज्य नावापुरते शिल्लक राहिले. हिंदूपदपातशाही निर्माण होऊ शकेल हा विश्वास आला. मराठा सरदार हे गुजरात, माळवा आणि उत्तरेत स्थायिक झाले. या भागात सतत सुलतानी कराच्या ओझ्याखाली पिचलेल्या जनतेने मराठ्यांना मनापासून स्वीकारले आणि मराठ्यांनीही त्यांना सांभाळले. छोट्या स्वराज्याचे रूपांतर बाजीरावांनी आपल्या शौर्याने मराठा साम्राज्यात केले. छत्रपतींच्या या सेवकाला शतशः नमन 🙏🙏

पुस्तकाचे नाव - या सम हा
लेखक - मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे 
प्रकाशक - राजहंस प्रकाशन 
पृष्ठे - ३३५
किंमत - ₹४००

Saturday, August 15, 2020

अखंड भारत संकल्प दिन

काल अनेकांनी अखंड भारत संकल्प दिनाच्या पोस्ट टाकल्या, लेख लिहिले. तर काही पक्क्या हिंदुत्ववाद्यांनी अखंड भारत ही संकल्पना १९४७ला आणि आताही कशी अव्यवहार्य आहे यावर लिहिलं. दोन्ही बाजू वाचल्यावर मला काय वाटतंय ते लिहिण्याचा हा प्रयत्न.

"गांधीजी व काँग्रेसने अखंड भारत का नाकारला?" या शेषराव मोरेंच्या पुस्तकात अखंड भारत असणं किती त्रासदायक झालं असतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे. तेव्हाही आणि आताही एकूण मुस्लिम लोकसंख्या ही ४०% च्या आसपास असली असती. सावरकरांनी जे सुचवलं होतं, त्यानुसार तर तेवढं प्रतिनिधित्व मुस्लिमांना मिळालं असतं. ते नाही तरी एकूण मुस्लिमबहुल मतदारसंघ हे ३०%-३५% नक्कीच राहिले असते. आज खंडित भारतात जिथे २०% मुस्लिम लोकसंख्या आहे, तिथेही कट्टरतावादी सामान्य मुस्लिमाला फितवतात आणि जिहादी कारवाया, अशांत काश्मीर, अन्य भारतात बॉम्बस्फोट ते आझाद मैदान, बेंगळुरू मधील झुंडशाही हे घडत आहे. जर हीच लोकसंख्या ४०% असती तर किती नुकसान होऊ शकतं. या तर्कावर पुन्हा अखंड भारत होणं हे अव्यवहार्य आहे हे या मंडळींचं म्हणणं आहे. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य उद्धृत केलं जातं, "आज भारताला लागलेला मोठा रोग संपला". हे सगळं तर्कनिष्ठ आहे यात वाद नाहीच. पण तर्काच्या पुढे गेलं तरच इतिहास घडत असतो.

भारतीयांनी रामजन्मभूमीचं स्वप्न गेली ५०० वर्षे पाहिलं. दोन पिढ्यांनंतर जर ते स्वप्न हे अव्यवहार्य आहे या तर्कावर सोडून दिलं असतं तर आज ते पूर्ण झालं नसतं.
बलाढ्य मोगल आणि अनेक शाह्या आजूबाजूला असताना, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहणं हे अतार्किकच होतं.
प्रचंड तोफखाना असलेल्या निजामाला केवळ घोडदळाच्या जोरावर बाजीरावांनी पालखेडला गुढग्यावर आणलं, अडीच लाखांच्या मोगल सैन्याला पंचवीस हजारांच्या मराठ्यांच्या सैन्याने शिंदे होळकर पवार यांच्या नेतृत्वात पाणी पाजलं आणि त्यामागोमाग बाजीराव थेट दिल्लीच्या दारात जाऊन आले हे सगळंच अतार्किक आणि अव्यवहार्य होतं.
गांधीजींनी मीठ उचलणं, अनेक क्रांतिकारकांनी जीवनाची आहुती देणं, सावरकरांनी जहाजातून उडी मारणं आणि नेताजींनी भारताबाहेर सैन्य उभारून भारत स्वतंत्र करण्यासाठी युद्ध करणं हे सगळंच अतार्किक होतं
हजार वर्षांहून अधिक काळ आपल्या मायभूमीपासून दूर राहून ज्यू लोक स्वतंत्र इस्राएलचं स्वप्न पाहत राहिले. ते अतार्किक, अव्यवहार्य आणि अशक्यप्राय होतं.
दोन शहरं पूर्ण बेचिराख झालेली असताना जपानने केलेली प्रगती तर्काच्या कुठल्याही कसोटीवर बसत नाही, पण ते झालंय.
प्रत्येक वेळी तर्क, व्यवहार यावरच मदार ठेवली असती तर वरील कुठलाच इतिहास घडला नसता. 

ध्रुव भट्टांच्या तत्त्वमसीमध्ये नायक पुजाऱ्यांना विचारतो की, "या सगळ्या पूजा, व्रत यामागील तर्क, ज्ञान तुम्हाला माहीत आहे का?" 
पुजारी सांगतात, "नाही"
नायक पुन्हा विचारतो, "जर हे सगळं का करायचं माहीत नाही, तर का करता?"
पुजारी सांगतात, "मला कळालं नाही म्हणजे पुढील पिढ्यांनाही कळणार नाही असं नाही. पण जर मी हे थांबवलं तर पुढील पिढ्यांना "हे असतं" हेच माहीत असणार नाही. त्यामुळे यामागील तर्क कळण्याची शक्यताच मावळून जाईल. ते व्हायचं नसेल तर मला कळो अथवा न कळो, या गोष्टी मला पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे."

अखंड भारत हे असंच एक १९४७ला अव्यवहार्य असणारं, आज कदाचित अतार्किक असणारं स्वप्न किंवा व्रत आहे. ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आपल्या पिढीचं काम आहे. ते पोहोचवत राहिलं तर कदाचित १००, २००, ५०० वर्षांनी ते साकार होईल. पण जर त्याला अव्यवहार्य ठरवून सोडून दिलं तर पुढील पिढी यावर काम करणारच नाही.

कोणतंही मोठं काम एकाच टप्प्यात होत नसतं. त्याप्रमाणे अखंड भारत हा काही पाकिस्तानशी एक युद्ध करून सगळा पाकिस्तान भारतात विलीन करून घेणं असं असू शकत नाही. मग हे टप्पे कोणते असू शकतात -
०. भारत मजबूत बनवणं
१. गिलगिट बाल्टिस्तान, अक्षय चीन भारतात विलीन करणे
२. पाकिस्तानची अजून शकले होऊन सिंधदेश, पंजाब, पश्तुनीस्तान, बलुचिस्तान हे नवीन देश तयार होणे
३. तिबेट स्वतंत्र होणे
४. युरोपियन युनियनच्या धर्तीवर अफगाणिस्तान पासून ते इंडोनेशिया पर्यंत आर्थिक एकता साधणे
५. इथून पुढे कदाचित एक राष्ट्र ही संकल्पना मांडता येईल...

हे सगळं घडणं सहजसाध्य असणार नाहीच. हे असंच घडेल असंही नाही. पण स्वप्न अतार्किक, अव्यवहार्य आहे म्हणून सोडून देणं अयोग्य होईल. कारण त्यामुळे स्वप्नाचे अस्तित्वच संपून जाईल.

त्यामुळे दर वर्षी १४ ऑगस्ट रोजी "अखंड भारत संकल्प दिन" हा झालाच पाहिजे.

🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

Thursday, July 30, 2020

वेगळाच "दोन मी"

सामान्यपणे "दोन मी" असलेल्या कवितांमध्ये "पहिला मी" म्हणजे आपण नेहमीचे, नोकरी-धंदा करणारे, "रोजमर्राह की जिंदगी जिने वाले" वगैरे असतो. आणि "दुसरा मी" सामान्यपणे चिंता न करणारा, आहे तो क्षण जगणारा, वाईटातून चांगलं शोधणारा/घडवणारा वगैरे असतो. पण कधीतरी हा "दुसरा मी" फार वाईट असू शकतो. जो आपल्यात असतो, पण आपण त्याला प्रयत्नपूर्वक दूर ठेवलेलं असतं. माझा एक मित्र त्याला दारू ऑफर केली की नाकारताना एकच गोष्ट सांगतो, "मी सुरू केली, तर थांबायचं भान राहणार नाही, म्हणून मी दारू पीत नाही." हे जसं आहे तसंच हा "दुसरा मी" सगळ्या षड्रिपूंना अगदी जवळ बाळगून असतो. जरा जागा मिळाली की वर येतो. आपण कुठे थांबायचं याचा विवेक काढून घेतो.

संदीपच्या एका कवितेतला हा वाईट्ट "दुसरा मी" काहीसा असा आहे - हा मनाच्या कोपऱ्यात लांब दूर कुठेतरी असतो. पण तिथूनही तो एकप्रकारे दबा धरून बसलेला असतो. नेहमी हा कधी बाहेर दिसत नाही. कुठेतरी अंतरंगात लपून असतो. त्याला "पहिला मी" कधी हटकायला जात नाही. पण अचानकच एखाद्या अनामिक वेळी याची सावली आपल्यावर पडू शकते. ती सावली जर पडली तर आपलंच एक विकृत मन समोर येतं. त्याला साध्या सुंदर गोष्टी विकृत वाटू लागतात. त्याची हाव सुटते. अशा वेळी जर "दुसऱ्या मी"ला उठू दिलं, तर या विकृतींची एक चटकच लागते. ही जर चटक लागली तर जी पंचेंद्रिये आपल्याला आनंद देतात, एक नवी अनुभूती देतात, ज्याद्वारे आपण एक प्रकारे तरल होऊन विहार करू शकतो त्याऐवजी केवळ सुरू होतं ओरबाडणं. आस्वाद घेणं बंद करतो आणि विचार, कृती मधून फक्त ओरबाडतच राहतो, शोषण करतो. याची सुरुवात फार सहज होऊ शकते. आपण कधीतरी काहीतरी चुकीचं करतो. ती चूक पकडली जात नाही. त्यातून आपल्याला काहीतरी फायदा मिळतो. मनाला एक प्रकारे आपण हेही करून यश मिळवू शकतो असं वाटतं. मग त्या चुका वाढत जातात. चुका थांबून अपराध सुरू होतात आणि त्यातूनच हा "दुसरा मी" मोठा होत जातो. मुळातला "पहिला मी" नंतर कुणाला दिसत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच चूक केली/झाली तर थांबा. नाहीतर हा शतकानुशतके असलेला "दुसरा मी" तुमचा कधी ताबा घेईल सांगता येणार नाही.

आता संदीपची या "दुसऱ्या मी"ची कविता -

आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून
पडका वाडा बसला आहे दबा धरून
त्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर
दिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर
परंतु तेथे जावयास ना कोणा धीर
कारण आहे पक्के ठाऊक आम्हाला
त्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा

कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी
उच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी
दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ
काठावरती येऊन बसते संध्याकाळ
पाण्यावरती पडता छाया सांजेची
दिवसावर हो काळी जादू रात्रीची
घुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे
विरून जाती रूप धारती घुबडांचे
घुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या
तरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या
भीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला
आळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा

हिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस
नाकाजागी केवळ भोके अठ्ठावीस
उडता येते परी आवडे सरपटणे
गाळ चोपडे अंगाला जैसे उटणे
उठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक
पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप
अन्य न काही चाले या बुंबुंबाला
भूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला
जे जे दिसते त्याची चटणी जोडीला
खा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा

खोडी काढी खोटे जर बोले कोणी
आणेल कोणी आईच्या डोळा पाणी
चोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी
बुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी
जवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे
त्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे
बुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा
खापरखापरपणजोबांहून पूर्वीचा
तयास न भितो असा जगातून कोण भला
बुंबुंबाही घाबरतो बुंबुंबाला
करण्याआधी वाईट काही रे थांबा
दिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा

गम्मत वाटली ना!

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात सलीलने शुभंकर सोबत काही युट्युब व्हिडीओ केले होते. त्यात अग्गोबाई... चे काही एपिसोड होते. या छान गप्पांमध्ये सलीलने आणि संदीपने खूप गमतीदार गोष्टी सांगितल्या. शेवटच्या कडव्यात "दिसेल अथवा आरशातूनी" मुळे बुंबुंबा हे आपलंच रूप आहे हे जाणवलं होतं, पण आख्खी कविताच "दोन मी"ची आहे हे संदीपने एका एपिसोडमध्ये सांगितलं. वर म्हणाला की आता पुन्हा नीट ऐका... अमोहामुळे अग्गोबाई... घरात सुरूच असतं. मग संदीपने सांगितल्याप्रमाणे पुन्हा या दृष्टिकोनातून (श्रुतिकोनातून) ऐकलं. ही "दोन मी"ची वेगळीच संकल्पना जाणवली. तुम्हीही ऐकून बघा...

Saturday, July 25, 2020

पराभूतांचा इतिहास?

साध्वी ऋतुंभरा यांच्या भाषणात "सोमनाथ का मंदिर टूटा फिर भी तुम खामोश रहे, जिसने चाहा तुम को लूटा फिर भी तुम खामोश रहे..." अशा ओळी यायच्या. त्याचा शेवट "कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्थान हमारा है|" ने होत होता. त्या काळात (वय वर्ष १५-१६) भयंकर जोश यायचा. पण नंतर आपण खरंच खामोश राहिलो का? आपल्याला कुणीही लुटले आणि आपण काहीच करू शकलो नाही का? आपला इतिहास हा पराभूतांचाच आहे का? असे प्रश्न पडले. त्याचं उत्तर आहे - नाही! आपल्यावरील ज्ञात हल्ले अलक्षेन्द्रापासून सुरू झाले आणि इंग्रजांपर्यंत येऊन संपले. या कालखंडात काय काय झालं हे थोडक्यात बघितलं तर "नाही!"चा अर्थ कळेल.

ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात अलक्षेन्द्राने भारतावर हल्ला केला. त्याने मध्यआशिया पूर्ण जिंकला होता. पुरूराजाशी झालेल्या लढाईत त्याची प्रचंड हानी झाली. तरीही पुढे जाण्याची त्याची इच्छा होती. पण त्याची सेना मगध सेनेची संख्या (दोन लाख पायदळ, ऐंशी हजार घोडदळ, आठ हजार रथ आणि सहा हजार हत्तीदळ) ऐकूनच गर्भगळीत झाली आणि सेनेने पुढे कूच करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला तक्षशिलेच्या पुढे भारतात येता आले नाही. परत जाताना तो मेला. शकांनी ख्रिस्तपूर्व ८० ते इस १५० या सव्वादोनशे वर्षात उत्तरपश्चिम (आजचा पाकिस्तान) भागात राज्य केलं. पण गौतमीपुत्र सातकर्णीने शकांना संपूर्ण हरवले. सोबतच जवळपास संपूर्ण भारत राजकीयदृष्ट्या एका राज्यात आणला. इस चौथ्या शतकापर्यंत जवळपास साडेतीनशे वर्ष कुशाणांनी उत्तर आणि पश्चिम भारतावर राज्य केलं. पण पुढे कुशाणांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली. गुप्त साम्राज्याने कुशाण साम्राज्य संपवले. पाचव्या शतकाच्या मध्यावर भारतावर हूणांनी हल्ला केला होता. हे मध्य आशियातील लोक होते. यांना काही वर्षातच स्कंदगुप्ताने हरवले. हूणसुद्धा पंजाब पार करू शकले नाहीत. म्हणजे या आक्रमकांपैकी कुणीही पंजाब पार करून भारतात येऊ शकला नाही.

इस्लाम स्थापन झाल्यानंतर भारतावर आक्रमणे वाढली. बाराव्या शतकात पहिल्यांदा कुणा इस्लामी राज्यकर्त्याला भारतात प्रवेश करता आला. तोवर राजस्थान मधील बाप्पा रावळ, सिंध मधील राजा दाहीर, काश्मिरातील ललितादित्य, कन्नौज येथील यशोवर्मन यांनी सातव्या शतकापासून सुरु असलेले हल्ले नुसते थोपवले नाहीत तर पुढे दोन शतके कुणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही असा हग्या मार दिला. पुढे गझनीने हल्ला केला. पण गझनीच्या लागोपाठच्या हल्ल्यानंतर पुन्हा १०० वर्ष भारतावर इस्लामी हल्ला झाला नाही. पुढे घौरीने हल्ला केला. तिथून भारतावर इस्लामी आक्रमण जास्त होत गेलं. बख्तियार खिलजीच्या आक्रमणाने नालंदा विद्यापीठ जाळले गेले. तिथून पुढे भारतीय राजांची सत्ता कमकुवत होत गेली. पण तरीही भारतीयांची परकीय आक्रमकांना विरोध करण्याची वृत्ती कुठेही कमी झाली नाही. चौदाव्या शतकात तैमूरने आक्रमण केलं. रामप्यारी चौहान आणि तिच्या साथीदारांनी गनिमीकाव्याने लढा देऊन तैमूरला आत्यंतिक जखमी करून माघार घ्यायला लावली. अखेरीस त्याच जखमांनी तैमूर मेला.

या इसपूर्व चौथं शतक ते इस बारावं शतक या दीड हजार पेक्षा अधिक वर्षांत भारताने काय काय केलं...राज्यव्यवस्थेत: इस पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत कम्बु, कौंडिण्य, चोल आणि शैलेंद्र राजांनी दक्षिण भारत आणि आग्नेय आशियावर आपले प्रभुत्व गाजवले. पण आग्नेय आशियात राज्य असं केलं की तेथील स्थानिक जनता त्यांना आजही आक्रमक मानत नाही, चंद्रगुप्ताने ग्रीकांना पराभूत केले, समुद्रगुप्ताने हे राज्य वाढवले आणि पुढे अशोकाचे मौर्य साम्राज्य हे संपूर्ण भारतभर होते, मौर्य वंशानंतर शृंग वंशाचे राज्य पुष्यमित्राने स्थापन केले. तेही संपूर्ण भारतभर होते. खारवेल आणि पुष्यमित्र यांनी एकत्र येऊन दिमित्रीस पराभूत केले, शालिवाहनाने सुटे झालेली भारतीय राज्ये पुन्हा एका अमलाखाली आणली, पुढे हर्षवर्धनाने पुन्हा विस्कळीत झालेली राज्ये एकत्र आणून मोठं साम्राज्य उभं केलं, पूर्वांचलातील भास्कर वर्मा यांनी हर्षवर्धनाशी विशेष मैत्री ठेऊन अनेक युद्धे एकत्रित जिंकली, यशोधर्माने हूणांचे राज्य संपवले, कृष्णदेवराय यांनी विजयनगरचे साम्राज्य वाढवले, प्रोलय आणि कप्पय या दोघा मसुनूरी नायकांनी आंध्रातील इस्लामी राज्य संपवले

ही सगळी आक्रमणे आणि त्याला विरोध सुरु असताना कला, संस्कृती आणि तत्वज्ञान यात: तिरुवल्लुवर यांनी जीवनविषयक तत्वज्ञान स्थानिक भाषेत सहज सांगितले, शंकराचार्यांनी भारत पुन्हा एकदा एका सूत्रात बांधला, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, रामानुजाचार्य यांनी वेदान्तावर नवीन भाष्ये करून लोकांना जीवन सुलभ करून सांगितले, सिंध मध्ये झुलेलाल यांनी इस्लामी आक्रमकांना न जुमानता हिंदू धर्म तेवत ठेवला, चैतन्य महाप्रभूंनी भक्तीच्या सीमा प्रचंड विस्तारल्या, नायन्मार या शैव आणि अलवार या वैष्णव संतांनी दक्षिणेत जातीभेद उच्चाटनाचे महत्वाचे कार्य केले, बसवेश्वरांनी वीरशैव पंथ स्थापन केला. यातही जातिभेदाला कोणताही थारा नव्हता, गुरु नानक देव यांनी शीख पंथ स्थापन केला, हरिहर आणि बुक्कराय यांना प्रेरणा देऊन त्यांचे राज्य स्थापन होण्यात सायनाचार्य आणि माधवाचार्य यांनी महत्वाची भूमिका निभावली आणि विजयनगरचे हिंदू साम्राज्य उभे राहिले, ज्ञानेश्वरांनी गीतेचे ज्ञान प्राकृतात सांगितले, कालिदासांनी अनेक काव्ये लिहिली, अनेक मंदिरे, लेण्या तयार झाल्या.

विज्ञानात: भास्कराचार्यांनी अनेक गणिती सिद्धांत मांडले, सोबतच गुरुत्वाकर्षणाबद्दलही सांगितले (न्यूटनच्या आधी सुमारे ६०० वर्ष), नागार्जुनाने अनेक रासायनिक प्रयोग करून धातुविज्ञान सिद्ध केले, आर्यभट्टांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत इस ५व्या शतकात सांगितला (आणि त्यांना कुणी शिक्षाही केली नाही!!!)

याचा अर्थ हा की आक्रमणं होत होती परंतु भारतात ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती आणि तत्वज्ञान यात काम होत राहिलं. म्हणजे ही केवळ आक्रमणे होती. आक्रमणे झाली कारण आपण समृद्ध होतो. आपण आक्रमणे केली नाहीत कारण आपण सुसंकृत होतो. आपण पराभूत नव्हतो आणि आपण पारतंत्र्यातही नव्हतो.

मोगल आल्यानंतर तर आपल्याला अकबर द ग्रेट पासून ते औरंगजेब कशा टोप्या विकायचा तिथवर सांगितलं जातं. पण अकबराने केलेले अत्याचार त्याच्या वलयात सांगितले सुद्धा जात नाहीत. महाराणा प्रतापांनी अकबराने जिंकलेला ८०%पेक्षा अधिक भाग पुन्हा जिंकला होता हे आपल्याला माहीतच नसते. औरंगजेबाने पूर्वांचलावर केलेला हल्ला लाचिद बडफुकन यांनी असा परतवून लावला की पुन्हा औरंगजेबाने पूर्वांचलाकडे स्वारी केलीच नाही. शिवाजी महाराजांनी याच काळात स्वराज्य उभं केलं. औरंगजेबाच्या नाकाखाली बुंदेलखंडात छत्रसालांना स्वराज्य उभं करण्यास प्रवृत्त केलं. महाराज गेल्यावरही संभाजी महाराजांनी लढा सुरू ठेवला. औरंगजेबाने संभाजी राजांना अत्यंत क्रूरपणे मारल्यानंतरही राजाराम महाराज आणि नंतर ताराराणी यांनी त्याला स्वराज्याचा घास घेऊ दिला नाही. उलट औरंगजेब अखेरीस याच मराठी मातीत गाडला गेला.

पुढे शाहू छत्रपती परतून आल्यावर बाळाजी विश्वनाथ यांच्यासह त्यांनी स्वराज्याची घडी पुन्हा बसवली. त्यावर कळस चढवला तो थोरल्या बाजीरावांनी. बाजीरावांच्या काळातच भारतात बहुतेक मोठ्या भूभागावर पुन्हा स्वराज्य आलं होतं. कारण नाव जरी मोगलांचं असलं तरी राज्य मराठेच करत होते. पुढे अटकेपार झेंडे आणि नंतर पानिपत झालं. पण पानिपतानंतर केवळ १० वर्षात पुन्हा ते वैभव मराठा साम्रज्याने पाहिले. शिवाय पंजाबात महाराज रणजितसिंहांचे राज्य सुरू झाले. या राज्याने अब्दाली आणि त्याच्या राज्याला मोठा शह दिला आणि पुन्हा त्या बाजूने पंजाबच्या पुढे कोणतेही आक्रमण येऊ शकले नाही. म्हणजे उणेपुरे ३०० वर्ष मोगलांनी भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. पण तेही कधी संपूर्ण भारत त्यांच्या ताब्यात घेऊ शकले नाहीत. मात्र या वर्षांत ज्ञान-विज्ञानात असलेली भारताची प्रगती थांबली.

इंग्रजांनी भारत हा मराठ्यांकडून ताब्यात घेतला. ही अत्यंत स्पष्ट बाब आपल्याला इतिहासात शिकवलीच जात नाही. १८१८ मध्ये जेव्हा दुसरा बाजीराव हरला तेव्हाही इंग्रजांना भीती मराठ्यांकडूनच होती. त्यामुळेच या कमी घातक असलेल्या बाजीरावाला इंग्रजांनी पार उत्तर हिंदुस्थानात नेऊन ठेवले. तरीही इंग्रजांची भीती खरी ठरली आणि १८५७ च्या युद्धाची सूत्रे मराठ्यांकडे (राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे) आली. तिथून पुढे ९० वर्षे आपण पूर्ण पारतंत्र्यात होतो. असे असले तरी स्वातंत्र्याची आस मात्र कायम होती आणि त्यासाठी प्राणपणाने अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले.

आपली लूट झाली, पण आपण केवळ लुटले गेलो नाहीत तर लुटारूंना आपण पळवून लावलं आहे. आपला इतिहास पराभूतांचा इतिहास नाहीये तर दैदिप्यमान असा स्वातंत्र्येच्छू, पराक्रमी, ज्ञानी आणि सहिष्णू लोकांचा इतिहास आहे.

Wednesday, July 22, 2020

सिक्रेट सेव्हनच्या सूरपारंब्या आणि फास्टर फेणे

जसा भा रा भागवतांचा फास्टर फेणे लाडका तसाच एनिड ब्लॉयटन यांचा सिक्रेट सेव्हनचा नायक पीटरसुद्धा लाडका. हे दोघे जर भेटले तर काय धमाल करतील ना! मग त्यांना भेटवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील... असाच एक प्रयत्न - सिक्रेट सेव्हनच्या सूरपारंब्या आणि फास्टर फेणे

१. पीटर आणि फास्टर

"ट्टॉक".

हा आवाज आला म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं असणार! तर मित्रांनो झालं असं की बन्याच्या हातात एक इंग्रजीतील पत्र पडलं. पत्ता स्पष्ट होता
Banesh Fene (Faster Fene)
Village Fursungi, District Pune
State Maharashtra, India

कुठून आलं हे मागच्या बाजूला लिहिलेलं होतं
Peter Blyton, USA

थेट अमेरिकेतून पत्र आल्यामुळे बन्याने ट्टॉक केला होता.

आता आपण थोडा वेळ अमेरिकेत जाऊ या. म्हणजे नेमकं झालं काय ते आपल्याला कळेल.
पीटरच्या वडिलांना आशियाई बातम्या वाचायला आवडायचं. त्यामुळे त्यांच्याकडे काही आशियाई देशांमधील वर्तमानपत्रे येत होती. त्यापैकी हॉंगकॉंग टाइम्स हे एक. बन्याने जे हॉंगकॉंगमध्ये दोन पराक्रम केले, ते अचाटच होते. एक परदेशी मुलगा एका स्थानिक बाळाला वाचवतो (धनेश आणि बनेश) आणि लगेच काही दिवसांच्या अंतराने एक सोन्याची तस्करी करणारी टोळी पकडून देतो (फास्टर फेणे आणि ओशनपार्कमधील तस्करी) हे काम बातमी पेपरमध्ये यावी असंच होतं. त्यामुळे त्याची सविस्तर बातमी हॉंगकॉंग टाइम्स मध्ये आलेली होती. ती बातमी वाचून पीटरच्या बाबांनी पीटरला हाक मारून सांगितलं की तुझा एक भारतीय भाऊबंद सध्या हॉंगकॉंगमध्ये धुमाकूळ घालतोय. नंतर पुढील माहितीत बनेश उर्फ फास्टर फेणेचा मूळ पत्ता दिलेला होता. पीटर बाबांच्या मागे लागला की त्याला या फास्टर फेणेला भेटायचं आहेच. त्यानंतर पीटरने फास्टर फेणेला पत्र लिहिलं. ते यथावकाश फुरसुंगीला पोहोचलं आणि त्यावरच बन्याने ट्टॉक केलं.

त्या पत्रात पीटरने बन्याशी मैत्री व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती आणि आपला सविस्तर पत्ता देखील दिला होता. मग बन्याने पीटरची काही माहिती मिळते का हे शोधायला सुरुवात केली. त्याच्या लाडक्या सुर्वे सरांना त्याने विचारले. सुर्वे सरांनी त्याला पुण्यातील ब्रिटिश लायब्ररीत न्यू यॉर्क टाइम्सचे अंक बघ म्हणून सांगितले आणि बन्याला ब्रिटिश लायब्ररीचे सदस्यत्वसुद्धा मिळवून दिले. त्यानंतर बन्या अक्षरश: त्यात घुसला आणि रोज जेवढा वेळ लायब्ररी उघडी असते तेवढा वेळ त्यात बसून पीटरच्या सिक्रेट सेव्हनने केलेले अनेक पराक्रम वाचले. आठवड्याने आता आपल्याला पीटर माहित आहे या विश्वासाने बाहेर आला. त्यानंतर त्याने पीटरला पत्र लिहायला घेतले. त्यात मामाच्या घरचा फोन नंबरसुद्धा दिला.

काही दिवसांनी पीटरचा मामांच्या घरी थेट फोन आला. योगायोगाने बन्या तेव्हा मामांकडेच होता. दोघांनी छान गप्पा मारल्या आणि त्यात पीटरने बन्याला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले. सोबतच तुझ्या पत्त्यावर रीतसर आमंत्रण पत्र आणि अमेरिकेच्या दूतावासाला आवश्यक असणारे सगळे कागदपत्र सुद्धा पाठवले आहेत हे सांगितलं. आता चेंडू बन्याच्या कोर्टात होता. बन्याने भाईंशी बोलून सांगतो असं सांगितलं आणि फोन ठेऊन दिला.

काही दिवसांतच बन्याच्या घरी पीटरने सांगितल्याप्रमाणे पत्र पोहोचलं. त्यात सर्व गोष्टी होत्याच. आता केवळ तिकीट काढून व्हिसासाठी दूतावासात विनंती करणे एवढेच बाकी होते. नेमकं त्याच दिवशी मृदुल ताई आणि मयूर भाऊजी (वाचा: फास्टर फेणे आणि शुभमंगल सावधान) घरी आले होते. भाई आणि वाहिनी काळजीत होते. पोराला आधी जेव्हा हॉंगकॉंगला पाठवलं तेव्हा मामा मामी सोबत होते. आता सोबत कुणी नाही आणि देश तर खूप दूर. काय करावे... पण ताई आणि भाऊजींनी बन्याच्या अमेरिकावारीला पाठिंबा दिला आणि खर्चाचा वाटाही उचलला.

यानंतर अमेरिकी दूतावासात विनंतीपत्र देणे, तिकिटं काढणे आणि बाकी तयारी यात महिना गेला. तोवर पीटरला कळवून ठेवले होतेच. उड्डाणाचा दिवस ठरला. मामा आणि भाई बन्याला मुंबई विमानतळावर सोडायला गेले. त्याचं विमान मुंबई - जर्मनीतील फ्रँकफर्ट - न्यू यॉर्क असं जाणार होतं. न्यू यॉर्कला पीटर आणि त्याचे बाबा बन्याला न्यायला येणार होते. बन्याला आता विमानप्रवास नवा नव्हता. पण ५-६ तासांचा हॉंगकॉंग प्रवास आणि एकूण २४ तासापेक्षा अधिक असलेला हा प्रवास यात खूपच अंतर होतं. पण बन्याला कुठली गोष्ट अवघड असते का... तो निवांत होता. याच निवांतपणाने तो न्यू यॉर्कला पोहोचला सुद्धा. पीटर आणि त्याचे बाबा भेटले. तिथून त्यांना रेल्वेने पीटरच्या गावी जायचे होते. रेल्वे पोहोचली आणि रेल्वे स्टेशनहून बाहेर पडत असतानाच बन्याने ट्टॉक केले आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून पीटरने जे पहिले त्यावरच बन्याची ही प्रतिक्रिया असणार याची खात्री असल्याने पीटर मनातून हसला. या दोघांकडे पाहून बाबांना मात्र काळजी वाटू लागली.

२. मैत्री

घरी जाताना पीटर आणि बन्या गप्पा मारत होते. बन्याने पीटर आणि सिक्रेट सेव्हनच्या बातम्या वाचलेल्या असल्याने आणि बरीच पत्रे एकमेकांना पाठवलेली असल्याने त्याला जेनेट आणि अन्य गॅंग आणि विशेष म्हणजे स्कॅम्परला भेटण्याची खूप उत्सुकता होती. पीटरला मात्र ती एक भीती वाटत होती. स्कॅम्पर हा पीटर आणि त्याच्या गँगचा मित्र असला तरी अनोळखी लोकांसाठी तो दैत्यापेक्षा कमी नव्हता. बन्या पहिल्यांदाच घरी येतोय आणि त्याला स्कॅम्पर कसा सामोरा जाईल याची भीती पीटरला होती. जर स्कॅम्परने बन्याला मित्र मानला नाही, तर बन्या किंवा स्कॅम्पर यांच्यापैकी एकालाच सोबत घेऊन फिरत येईल. ते पीटरला कधीच व्हायला नको होते.

पण पीटरची ही भीती अनाठायी ठरली. बन्यासह ते घरी पोहोचले तेव्हा स्कॅम्परला दाराजवळच बांधलेले होते. पीटरने बन्याला स्कॅम्परच्या स्वभावाबद्दल सांगितलेले होतेच. शिवाय बन्यालाही कुत्र्यांचा खूप लळा होता. बन्या सावकाश त्याच्याजवळ गेला. अजिबात न घाबरता त्याने आपला हात पुढे केला. स्कॅम्परने आधी बन्याकडे पाहिलं. नंतर आपल्या मालकाकडे, पीटरकडे बघितलं. बन्याच्या हाताचा वास घेतला. बन्याच्या भोवती पायाचा वास घेत एक चक्कर मारली. तेवढा वेळ बन्या शांतपणे हात पुढे ठेऊन उभा होता. चक्कर मारून झाल्यावर स्कॅम्परने प्रेमाने बन्याचा हात चाटायला सुरुवात केली. ट्टॉक! पीटरचा जीव भांड्यात पडला. स्कॅम्परचे लाड करून बन्या आणि पीटर घरात गेले. 

घरात गेल्यावर बन्या आपल्या भारतीय पद्धतीने पीटरच्या बाबांच्या आणि आईच्या पाया पडला. त्यांना जरा विचित्र वाटलं, पण सगळे एकमेकांना समजावून घेत होते. तेव्हाच जेनेट तिच्या खोलीतून बाहेर आली. त्यांच्या सर्वांच्या गप्पा सुरू होणार एवढ्यात पीटरच्या आईने सर्वांना जेवायला बोलावले. अमेरिकी पद्धतीचे जेवण बन्या पहिल्यांदाच खात होता. अर्थात ब्रेड त्याला माहित होता. पण घरी केलेला ताजा ब्रेड, सूप आणि तिखट नसलेली वाफवलेली भाजी हा मेळ छानच जमून आलेला होता. शिवाय सलग ३० तासांच्या प्रवासाने बन्या जाम दमून गेला होता. पोटभर जेवण झाल्यावर बाबांनी बन्याच्या मामांकडे फोन करून बन्या सुखरूप पोहोचल्याचे सांगितले आणि भारतात सर्वांना हायसं वाटलं. पीटरने बन्याला त्याच्या खोलीत नेले. नंतर बन्या पुढचे १५ तास झोपून होता.

बन्या झोपेतून उठला तेव्हा पहाटेचे साडेपाचच वाजले होते. पीटर सहाला उठला. सर्वांनी एकत्र कॉफी घेतली आणि पीटर बन्याला त्याची खास खोली, सिक्रेट सेव्हनचा खलबतखाना दाखवायला घेऊन गेला. आज नाष्ट्यानंतर सगळेजण बन्याला भेटायला येणार होते. आजचा परवलीचा शब्द होता "फास्टर". नाष्टा झाल्यावर बन्या आणि पीटर खलबतखान्यात गेले आणि दार बंद केलं. पाठोपाठ जेनेट आली. परवलीचा शब्द सांगूनच तिला त्यांनी आत घेतलं. पाठोपाठ जॅक, पाम आणि बार्बरा आले. तोवर स्कॅम्पर बाहेरच बसला होता. त्यानंतर मात्र त्याला आत येऊन बसावे वाटले. तरीही त्याचे तीक्ष्ण कान दाराबाहेरची प्रत्येक हालचाल टिपत होते. कोलिन आणि जॉर्ज आल्याची चाहूल लागताच त्याने बारीक गुरगुरण्याचा आवाज केला. पाठोपाठ "फास्टर" हे शब्द कानी पडले आणि त्या दोघांना आत घेऊन दार पुन्हा बंद केले.

बन्याला सगळे जण अनेक प्रश्न विचारत होते आणि बन्या त्याने केलेले अनेक पराक्रम सांगत होता. प्रतापगडाच्या भुयारात अडकलेला बन्या, थेट नेफा आघाडीवर जाऊन चिन्यांना मात देणारा बन्या अशा अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या आणि सोबतच त्यांच्याही डोलकाठीवरून चोराला पकडणे, सुझीच्या विमानामुळे बंगल्यात घुसावे लागणे आणि त्यातून एका मोठ्या कारस्थानाचा केलेला पर्दाफाश अशा अनेक कथा सांगितल्या. गप्पांमध्ये बराच वेळ गेल्यावर सर्वांनी शेताच्या मागे असलेल्या खास गुहेत जाऊन जेवण करायचे ठरवले. या गुहेत घुसलेला चोर आणि त्याला पकडण्यासाठी केलेली करामत याची आठवण सांगत कोलिन बन्याला घेऊन पुढे जात होता. सर्वजण त्यांच्या मागेच होते. सर्वात मागे पीटर आणि स्कॅम्पर होते.

जेवणानंतर पीटरचे शेत बन्याने बघितले. विस्तीर्ण शेत, त्याच्या जवळ मोठे कुरण, कुरणात संथपणे चरणाऱ्या गायी बघत बन्याला फुरसुंगीची आठवण आली. तोवर संध्याकाळ सुद्धा झाली आणि सर्वजण आपापल्या घरी परतले. रात्रीचे जेवण झाल्यावर बन्याने आपल्या आजच्या दिवसाची डायरी लिहिली. त्याच्या सुर्वे सरांनी हे सगळे अनुभव लिहून ठेवायला सांगितले होते. तुम्हाला तर माहित आहेच, सुर्वे सरांचा कोणताही शब्द बन्या खाली पडू देत नाही...

याच रात्री काल रेल्वे स्टेशनवर उतरलेले तीन प्रवासी पीटरचा शेतामागे असलेल्या वृक्षराईत भेटत होते. त्यांचे पुढचे बेत तयार होत होते...

३. शोध

दुसऱ्या दिवशीपासून सकाळी एकत्र भेटणे, त्यानंतर दिवसभर वेगवेगळे खेळ आणि संध्याकाळी सायकलवर एक लांब चक्कर असा सर्वांचा कार्यक्रम सुरू झाला. सायकलवर फिरताना आणि शर्यती लावताना बन्याला "फास्टर फेणे" का म्हणतात ते सर्वांना कळाले. त्या खेळांमध्ये बन्याने या अमेरिकन पोरांना कबड्डी, खोखो असे खेळही शिकवले. वेगवेगळे खेळ एकमेकांना शिकवताना बन्याने सूरपारंब्या हा खेळ सांगितला. या खेळाने सर्वांची उत्सुकता ताणली. जॉर्ज आणि जॅक यांना झाडावरच राहायला मिळालं तर बरं असं वाटायचं आणि कोलिनला तर झाडावर बसून हेरगिरी करायचाही सराव होता. पण मुख्य अडचण होती ती म्हणजे अमेरिकेतील झाडांना पारंब्या कशा आणणार. ही अडचण पीटरच्या बाबांनी सोडवली. त्यांनी त्यांच्या शेतात वापरण्याचे मोठे दोर मुलांना दिले आणि झाडांना पारंब्या फुटल्या.

बन्याने खेळाचे नियम सांगितले. दोर पकडून सरसर त्यावर चढून दाखवले. बार्बरा आणि जेनेटने दोरावरून चढणे लवकर आत्मसात केले. तर पीटरने झाडावरून दोर पकडून थेट खाली सूर मारायचा सराव केला. बन्या तर या सर्वात पारंगत होताच. आता नवीन खेळ मिळाल्याने सर्वजण संध्याकाळपर्यंत शेताच्या मागे असलेल्या वृक्षराईत थांबू लागले.

एक दिवस बाकी सगळे घरी गेले तरी बन्या, पीटर आणि कोलिन झाडावर तसेच थांबले. त्यांच्या गप्पा सुरू असताना त्यांना तीन सावल्या या झाडीत येताना दिसल्या. त्याबरोबर तिघेही सावध झाले. ते बसले होते त्या झाडाच्या बाजूच्या झाडाखाली तिघे जमले. त्यातील एक बहुदा इतरांचा म्होरक्या असावा. बाकी दोघांपैकी एक बुटका तर एक लंबू होता. त्या म्होरक्याने दोघांना काही लहान पुडे दिले आणि त्यांच्याकडून पैसे घेतले. हे तिघेही शांतपणे कोणताही आवाज न होऊ देता काय चालले आहे ते पाहत होते. बन्या आणि पीटरला हे तिघे म्हणजे रेल्वे स्टेशनला दिसलेलेच आहेत याची खात्री पटली. ते तिघे पुन्हा तीन दिशांना निघून गेले. पीटरने डोळ्यांनीच खूण केली तसे आपले तीन माकडं या तिघांच्या मागे सावकाश जाऊ लागले.

त्या तीनही बदमाशांना कोणतीही जाणीव न होऊ देता त्यांची घरे कुठे आहेत हे पाहण्याचे त्यांनी ठरवले होते. त्याप्रमाणे पीटर म्होरक्याच्या, कोलिन बुटक्याच्या आणि बन्या लंबूच्या मागे गेले. तिघांनीही रेल्वे स्टेशनपासून तीन दिशांना पण साधारण सारख्या अंतरावर घरे घेतली होती. त्या घराजवळच्या खुणा नीट बघून सगळे घरी गेले. पीटरने सर्वांना फोन केला आणि उद्याचा परवलीचा शब्द सांगितला.

एवढ्या रात्री फोन करून परवलीचा शब्द सांगितल्याने सर्वांना हे लक्षात आले होते की काहीतरी खास घडले आहे. हा परवलीचा शब्द बन्याने सांगितलेला होता. दुसऱ्या दिवशी सगळ्यात आधी कोलिन पोहोचला. त्याने परवलीचा शब्द सांगितला - माली! ही नवी मोहीम सुरू झाली आणि बन्याला त्याच्या बऱ्याच साहसांमध्ये सक्रीय सहभागी होणाऱ्या त्याच्या मामेबहिणीची आठवण आली. आता ती तर येऊ शकणार नव्हती, म्हणून परवलीचा शब्द म्हणून बन्याने "माली" सांगितला. एक एक करून सर्वजण आले. सर्वजण जमल्याबरोबर दार नीट बंद केले गेले. त्यानंतर आपल्या नेहमीच्या मोहीम मुख्याधिकाऱ्याच्या आवेशात पीटरने काल घडलेली सगळी घटना सांगितली. म्होरक्याचा पत्ताही सांगितला. त्यानंतर कोलिन आणि बन्याने बुटक्याचा आणि लंबूचा पत्ता सांगितला. कोलिन आणि जॉर्ज, बन्या आणि बार्बरा, पीटर आणि पाम अशा जोड्या ठरल्या. या जोड्यांनी पुढील एक आठवडा या तिघांवर बारीक नजर ठेवायची असं ठरलं. जॅक आणि जेनेटला अजून कोणतेच काम सांगितलेले नव्हते.

साधारण दोन दिवसांनी म्होरक्या स्टेशनवरून बाहेरगावी गेला आणि संध्याकाळी परत आला. बुटक्या आणि लंबू त्यांच्या लहानखुऱ्या मोटारसायकल घेऊन ३-४ तास बाहेर जाऊन येत. पण अन्य पूर्ण दिवस हे लोक घरातच थांबत. दर एक दिवसाआड त्या झाडांमध्ये ते भेटत. पुड्यांची आणि पैशांची अदलाबदल होई. त्यानंतर ते पुन्हा आपापल्या कामाला लागत. पण खूप शोध घेऊनही म्होरक्या बाहेरगावी जाऊन नेमकं काय करतो, किंवा पुड्यातून बाकी दोघांना काय देतो याचा खुलासा होत नव्हता. मात्र एकूण व्यवहार हा संशयास्पद होता या निर्णयाला ते येऊन पोहोचले.

आठव्या दिवशी पुन्हा एकदा बन्या, पीटर, जेनेट झाडावर आणि स्कॅम्पर झाडीत असे लपून बसले. ते तिघेही दूर गेल्यावर पीटरने स्कॅम्परला त्या तिघांचे नीट वास घेऊन ठेवायला सांगितलं. घरी जाऊन दुसऱ्या दिवशीचा परवलीचा शद्ब सर्वांना कळवला गेला - शोध!

४. सूरपारंब्या

सकाळीच एक एक जण परवलीचा शब्द "शोध" सांगून आले. स्कॅम्पर सुद्धा नव्या कामगिरीच्या आवेशात त्याच्या नेहमीच्या स्टुलावर बसला होता. पीटर जरासा विचारमग्न होता. बन्या शांतपणे बसला होता. आज पीटरने सुरुवात करण्यासाठी बन्याला सांगितले.

बन्या म्हणाला, "आपण जेवढा शोध घ्यायचा होता तो तर घेतला आहे. ही माणसं नक्कीच काहीतरी चोरटं काम करत आहेत. काय करतात ते अजूनही आपल्याला माहित नाही. पण मला असं वाटतंय की येत्या एक दोन दिवसात नक्कीच काहीतरी घडेल. त्यामुळे आपण तयारीने उद्या झाडांवर थांबायचं आहे."

पीटरने पुढे बोलायला सुरूवात केली, "आतापर्यंत जेनेट आणि जॅकला या मोहिमेत फार काही करता आलं नाही. पण यापुढे त्यांच्याकडे मोठं काम असेल. आपल्याला जी तयारी करायची आहे त्यात आपण ६ झाडं निवडायची आहेत. त्या झाडांवर प्रत्येकी २ पारंब्या - नीट घट्ट बांधलेल्या असायला हव्या. शिवाय एक एक बांधण्याची दोरीसुद्धा हवी. म्होरक्या ज्या बाजूने येतो त्याच्या बरोब्बर विरुद्ध बाजूला स्कॅम्परसाठी लपण्याच्या एक जागा हवी आहे. घराच्या दिशेला असलेलं एक झुडूप शोधून त्यात दोघांना लपता येईल अशी जागा करायची आहे. या सगळ्याची व्यवस्था जेनेट आणि जॅकने करायची आहे. ही सगळी व्यवस्था करून आपण आज जागा नीट बघून आणि दोरीवरून चढण्याचा आणि सूर मारण्याच्या सराव करू. फास्टर फेणे प्रमाणे मलाही असं वाटतंय की येत्या एक दोन दिवसात आपल्याला हा शोध पूर्ण लागेल. उद्या परत भेटू. उद्याचा परवलीचा शब्द संध्याकाळी सांगेन"

एवढं बोलून सगळे आपापल्या कामाला लागले. सहा मोठी झाडं निवडली. त्यांना क्रमांक दिले. त्यावर दोन दोन पारंब्या चांगल्या मजबूत फांदीला बांधल्या. त्याच्या बाजूलाच एक एक दोरी गुंडाळून ठेवली. म्होरक्या येतो त्याच्या विरुद्ध बाजूला एक झुडूप बघितले आणि त्याच्या झाडोऱ्यात एक खड्डा करून त्यात स्कॅम्पर कुणालाही न दिसता बसू शकतो ते बघितले. घराच्या दिशेने अजून एक झुडूप बघितलं आणि त्याच्या खाली एक जरासा खोल खड्डा करून त्यात दोन जणांना लपता येईल अशी जागा केली. एवढी सगळी कामं जेनेट आणि जॅकच्या नेतृत्वाखाली करून सगळ्यांनी पारंब्यांवर चढण्याचा, सूर मारण्याचा सराव केला. बन्या सगळ्यांना काही सूचना असेल तर करत होता. सगळे खूप आवेशात होते. या सर्वांना बघून बन्याला माली, शरद, सुभाष, तात्या, रखमा हे तर आठवलेच शिवाय रंग्या आणि सायबा सुद्धा आठवले. त्यांच्यासोबत केलेली मस्ती आणि साहसे आठवली. सुर्वे सरांचं नेतृत्व आठवलं. क्षणार्धात या आठवणी येऊन गेल्या आणि बन्या पुन्हा कामात मग्न झाला. सर्वांचे निरीक्षण बन्या आणि पीटर करत होते.

रात्री उशिरा पीटरने सर्वांना फोन करून परवलीचा शब्द सांगितला - सूरपारंब्या!

दुसऱ्या दिवशी सगळे जमले. प्रत्येक जण नव्या साहसाचा प्रतीक्षेत होता. आदल्या दिवशी जशी बन्याने सुरुवात केली होती तशीच पुन्हा सुरुवात केली. त्याने प्रत्येकाचे सूरपारंब्यातील कौशल्य आणि कोणत्या झाडावर कोण बसू शकेल हे सांगितले. त्यानंतर पीटरने सहा झाडे अनुक्रमे कोलिन, बार्बरा, बन्या, पाम, पीटर आणि जॉर्ज अशी वाटून दिली. जॅक आणि जेनेट हे घराच्या दिशेने असलेल्या झुडुपात लपून बसणार होते. जर काही दगाफटका झाला तर जॅक आणि जेनेट यांनी लगेच त्यांनी पीटरच्या घरी जाऊन बाबांना सांगायचं ठरलं. स्कॅम्परची जागा आधीच ठरलेली होती. पुन्हा संध्याकाळी बरोबर पाच वाजता शेताच्या मागे असलेल्या गुहेत भेटायचं ठरलं. तिथून ते झाडांमध्ये जाणार होते.

साधारण साडेपाचच्या सुमारास प्रत्येकाने आपापली जागा घेतली. जरा अंधार पडू लागल्यावर नेहमीप्रमाणे तिघेही तीन दिशांनी आले. पण आज त्यांचे काहीतरी बिनसले असावे. म्होरक्याच्या हातात आज पुडके नव्हते. लंबू आणि बुटक्याने त्याला पैसे देणार नाही म्हणून सांगितले. त्यावर त्यांची जरा बाचाबाची झाली. अखेरीस म्होरक्याने आपल्या कमरेत खोचलेले पिस्तूल काढले आणि लंबूवर त्याने नेम धरला. तो गोळी मारणार तोच पामने एवढा वेळ आवरून धरलेली किंकाळी फोडलीच. पण त्यामुळे म्होरक्याचा नेम हुकला. गोळी लंबूच्या छातीत घुसण्याऐवजी खांद्यावर लागली आणि तो खाली कोसळला. आता म्होरक्याने नेम पामकडे धरला होता. यापुढे वेळ दवडण्यात काहीच अर्थ नव्हता.

ट्टॉक!

बन्याने एका हातात पारंबी धरून सूर मारला आणि म्होरक्याची बंदूक उडवून लावली. पीटरने दुसरा सूर मारत म्होरक्याच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. या अनपेक्षित हल्ल्याने म्होरक्या हेलपांडला. क्षणार्धात स्कॅम्परने उडी मारून पिस्तूल तोंडात घेतले आणि तो वेगात जेनेट असलेल्या झुडुपाकडे गेला. तिथे तिच्याजवळ पिस्तूल टाकले आणि परत येऊन म्होरक्यावर हल्ला केला. या वेळात जॉर्जने सूर मारून आपल्याजवळील दोर खाली आणला. त्याने आणि बन्याने बुटक्याला जेरबंद केले. म्होरक्यावर स्कॅम्पर आणि पीटर तुटून पडले होते. त्यांना मदत करायला आपापले दोर घेऊन कोलिन, बार्बरा आणि पाम आले. तीनही जणांना त्यांनी दोरीने नीट बांधलं.

जेनेट आणि जॅक ही लढाई पाहण्यासाठी किंवा भाग घेण्यासाठी थांबले नाहीत. त्यांनी बंदूक रुमालात बांधून घेऊन थेट घर गाठलं. बाबांनी क्षणही न दवडता पोलीस स्टेशनला फोन केला आणि ते दोघांसोबत झाडांकडे धावले. इन्स्पेक्टर आपला ताफा घेऊन झाडांकडे रवाना झाले. हे सर्व तिथे पोहोचेपर्यंत तिन्ही तस्करांची गाठोडी वळून ठेवलेली होती. अधिक माहिती त्यांनीच दिली. म्होरक्या एका बंदरावरून अमली पदार्थांची तस्करी करत होता. लंबू आणि बुटक्या आजूबाजूच्या गावात त्याची विक्री करत होते. यातून त्यांनी बराच पैसा कमावला होता. पण अखेरीस पैश्यांवरून त्यांच्यात वाद झाला आणि ही मारामारी झाली. सर्व गोष्टी स्पष्ट होत्या. पुरावे होते, पिस्तूल होतं, त्यावर म्होरक्याचे ठसे होते. त्यामुळे केस लगेच निकाली निघेल याची इन्स्पेक्टरला खात्री होती. तस्करांना बेड्या ठोकून त्यांना पोलीस स्टेशनला पाठवले.

सिक्रेट सेव्हनला घेऊन बाबा आणि इन्स्पेक्टर पीटरच्या घरी गेले. तिथे गेल्यावर सर्वांना शाबासकी देताना, इन्स्पेक्टरला बन्या दिसला आणि त्यांनी आश्चर्याने विचारले, "सिक्रेट सेव्हन मध्ये हा आठवा कोण आहे?". पीटरने अभिमानाने सांगितले हा आमचा भारतीय मित्र - फास्टर फेणे!

Monday, July 13, 2020

फास्टर फेणे आणि ओशनपार्कमधील तस्करी

मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की मागच्या हाँग काँग साहसात बन्याने हाँग काँग पार्कमधील पळालेल्या पक्ष्याला पकडून दिले होते. अधिकाऱ्यांनी खुश होऊन बन्याला ओशन पार्कची मोफत तिकिटे दिली होती. पण मामींप्रमाणे तुम्हालाही शंका आली असेलच की एखादं संकट त्याचा पिच्छा पुरवत येणार. हो! तुमची शंका खरी ठरली! कारण संकट ज्याच्या मागे मागे करणार नाही तो फास्टर फेणे कसला?

बन्या आणि माली वाट पहात असलेला रविवार अखेर उजाडला. दोघांनाही उठवण्यासाठी मामीला कोणतेच कष्ट पडले नाहीत. सहाच्या ठोक्याला दोघेही उठून आवरू लागले होते. साडेसातला चौघेही घराबाहेर पडले आणि बस-मेट्रो-बस करत ओशन पार्क येथे पोहोचले.

ओशन पार्कच्या बाहेरच 'आजचे आकर्षण' असा बोर्ड होता. जुन्या काळी हाँग काँग मध्ये सोन्याच्या तस्करीचा मोठा व्यवसाय चालायचा. पार्कमध्ये एक जुन्या काळातील वाटावी अशी गल्ली बनवली आहे. तिथे बरोबर दुपारी बाराला तस्करीचे नाटक रंगणार होते. बोर्ड बघून बन्याने टॉक्क केले. मामीने बन्याला दटावले, "बन्या, ते नाटक आहे. गप गुमान नाटक बघायचं. त्यात काम करायचं नाही" हे ऐकून मामा व माली हसले आणि सर्व पुढे निघाले.

आत गेल्यावर सुरुवातीला मोठे ऍक्वेवेरीयम होते. त्यात माशांचे असंख्य प्रकार होते. घोडामासा, तारामासा, लंबुळके आणि चमकदार मासे. मालीला पाखट खूप आवडला कारण तो पाण्यात पोहत असतो तेव्हा तो उडतोय असंच वाटतं. ऑक्टोपस बघितल्यावर बन्याने टॉक्क केलं. त्याला ऑक्टोपस सर्वात जास्त आवडला. कारण काय तर म्हणे ऑक्टोपस जेव्हा एखाद्या भक्ष्याला पकडतो तेव्हा ते भक्ष्य सुटूच शकत नाही. तसंच बन्यासुद्धा चोरांना पकडतो. हे ऐकून मामीने पुन्हा डोळे वटारलेच. मग शार्क मासे बघून सगळे पुढच्या सेक्शनला वळाले.

तिथे पांडा आणि माकडे होती. सगळे पांडे निव्वळ आळशी होते. बन्या बघायला आला असूनही उठले नाहीत. पण माकडे मात्र त्याच्या अगदी जवळची. झाडावर चढणारी आणि हुंदडणारी. हे बघताना पावणेबारा झाले आणि मामाने जुन्या हाँग काँग लेनकडे सर्वांना जाऊया सांगितले. नाटक सुरू होण्याच्या सुमारास सगळे तिथे पोहोचले. रस्त्यावर दुतर्फा गर्दी होती. जुन्या प्रकारचे पोस्टर्स लागले होते. नाटकात तस्करीचा प्रसंग दाखवणार होते आणि त्यात खरे सोने वापरणार होते. नाटकाची माहिती लोकांना आधीच असल्याने बऱ्याच जणांनी जुन्या स्टाईलचे कपडे घातलेले होते. त्यामुळे नाटकातले कलाकार कोण आणि प्रेक्षक कोणते असाच प्रश्न पडला.

तेवढ्यात घोषणा झाली की नाटक सुरू होणार आहे. सर्व प्रेक्षक रस्त्याच्या बाजूला गेले आणि एका इंग्रज गोऱ्या माणसाने आपल्या चिनी नोकरांकरवी एक पेटी आणली. ती उघडून बघितली. हातातल्या पाईपचे दोन झुरके मारून एक गाल उडवून तो हसला आणि ते पुढे जाऊ लागले. तेवढ्यात मागून दोन चिनी चोर आले. त्यांनी गोळीबार केला. दोन्ही नोकर आणि इंग्रज माणूस खाली पडले. तिसऱ्या साथीदाराने पेटी उचलली आणि तो पुढे पळाला. जुन्या लेनच्या शेवटी गेला. लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. नाटक अगदी रंगात आले होते.

पण शंका घेणार नाही तो फास्टर फेणे कसला. तो त्या तिसऱ्या साथीदाराच्या मागे पळालाच. आणि..."टॉक्क"... खरोखरीच तो खरा चोर होता. तो तेवढ्या वेळात केबल कारमध्ये बसला आणि आकाशात लटकला. त्याच्या मागच्याच कारमध्ये आपला हडकुळा बन्या घुसला आणि पाठलाग सुरू झाला.

बन्या केबल कार थांबवावी म्हणून, "चोर चोर" ओरडला पण तिथल्या ऑपरेटर्सना तो काय बोलतोय हे न कळाल्याने त्यांनी काहीच केले नाही.

बन्या पळाल्यावर मालीही त्याच्या मागे धावली. बन्याने ओरडून सांगितले की तो खरा चोर आहे आणि तो त्याच्या मागे जातोय. माली मामाकडे अली आणि तिने मामाला सगळे सांगितले. मामा पोलिसांना शोधायला पळाला.

ओशन पार्कचे दोन भाग आहेत. एक खाली तर दुसरा डोंगरावर. डोंगरावर जाण्यासाठी केबल कार आहे. एका कारमध्ये चोर होता तर मागच्याच कारमध्ये बन्या. एका विशिष्ट ठिकाणी केबल कार एका डोंगरउताराच्या अगदी जवळून जाते. तिथे चोराने पेटी टाकली आणि पाठोपाठ उडी मारली. तिथेच बन्यानेही उडी ठोकली. उतारावरून चोर पुढे पळत होता आणि बन्या त्याच्या मागे. अखेर दोघेही पायथ्याला पोहोचले. तिथे डोंगराला लागूनच समुद्र होता. चोराची साथीदार तिथे फुग्याची मोटरबोट घेऊन हजर होतीच.

बन्या एका खडकाआड लपला. दोघा चोरांनी पेटी उघडली. त्यांच्या लक्षात आले की या धावपळीत काही सोन्याची बिस्किटे उतारावर पडली आहेत. शिवाय पाठलाग करणारा काडीपैलवानही कुठे दिसत नाहीये. त्यांनी वर बघितले तर अजून केबल कार हालत होत्या म्हणजे अजून पोलीस आले नसणार असं गृहीत धरून त्या पोराला धडा शिकवण्यासाठी आणि पडलेली बिस्किटे शोधण्यासाठी पटकन चक्कर मारावी असा दोघांनी विचार केला.

ते थोडे वर जाताच बन्या खडकांच्या बोगद्यातून बाहेर आला. त्याने त्वरित आपला पट्टा काढला. बक्कलचे टोक जमेल तेवढी शक्ती लावून मोटरबोटीवर मारले.
"टॉक्क"
बोटीतून 'फुस्स...' असा आवाज आला. त्या आवाजाने चोर परत फिरले. बन्या त्यांच्या तावडीत एकटाच सापडला होता.

इकडे मामानी पोलिसांना शोधले. त्यांनी एक प्लॅन केला. त्यानुसार पोलिसांनी केबल कारने न जाता पायी जावे म्हणजे चोराला शंका येणार नाही तसेच समुद्री पोलिसांनी मोटर बोटी तयार ठेवून किनाऱ्यालगत यावे आणि तिसऱ्या तुकडीने डोंगरावरील पार्कात तयार राहावे असे ठरले.

डोंगरावरून पोलिसांना असे दिसले की तो पाठलाग करणारा हडकुळा पोर दोन चोरांच्या तावडीत सापडलाय. त्यांनी किनाऱ्यावरील पोलिसांना संदेश पाठवला. पोलिसांच्या बोटी येताना दिसत असूनही चोर पळू शकले नाहीत कारण बोट पंक्चर झाली होती. मग मात्र त्यांनी बन्याला बेदम मारायला सुरुवात केली. पण पोलीस अगदी लवकर तिथे पोहोचले आणि चोरांना जेरबंद केले.

बन्या जखमी अवस्थेत खाली पडला होता. पोलिसांनी त्याला उचलून ओशन पार्क 2 च्या डोंगरावर नेले व प्रथमोपचार केले. सुदैवाने बन्याला फार लागले नव्हते. तेवढ्यात मामा - मामी व माली तिथे पोहोचले.

या सगळ्या धावपळीत त्यांचा डॉल्फिन शो बुडाला होता. पण ओशन पार्कच्या अधिकाऱ्यांनी बन्या आणि कंपनीसाठी एक स्पेशल शो ठेवला. त्यात माली आणि बन्याला डॉल्फिनला जवळून बघता आले आणि स्पर्शही करता आला.

सर्व पोलीस आणि पार्कच्या अधिकाऱ्यांनी बन्या, माली आणि मामा - मामींना "शे श्ये" म्हटले आणि त्यांची विशेष गाडीने तुंग चुंगला रवानगी केली.

-- सगुणा माया ज्ञानेश