Showing posts with label राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. Show all posts
Showing posts with label राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. Show all posts

Tuesday, December 24, 2024

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

नोव्हेंबर महिन्यात आम्ही अयोध्येत गेलो होतो. प्रभू श्रीरामाचे दर्शन झाले. तिथे कारसेवक पुरम मध्ये योजना चमू (managment team) कडून मंदिराची अचंबित करणारी माहिती मिळाली. ती माहिती आपणा सर्वांसाठी देत आहे 
- ज्ञानेश

।।श्रीराम मंदिर, अयोध्या।।

थोडक्यात पूर्वइतिहास
राम मंदिरासाठी हिंदू समाज गेली ५०० वर्षे लढत होता. पण निर्णायक चळवळ १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाली. १९९०च्या दशका मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बैठकी झाल्या, ज्यामध्ये चळवळ ही केवळ राजकीय नसून सामाजिक असावी असे ठरविण्यात आले. कारण ही जनसामान्यांना आपली चळवळ वाटली पाहिजे. त्यानुसार विश्व हिंदू परिषदेला चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी निवडले गेले.

यात १९८७ ला गंगा यात्रा आयोजित करण्यात आली, त्यानंतर १९८९ ला रामशिला पूजन झाले. लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपापल्या गावांतून राममंदिरासाठी भक्तिभावाने विटा पाठवल्या. १९९० ची अडवाणींची रथ यात्रा एक गेमचेंजर म्हणावी अशी घटना होती. त्याची परिणिती १९९२ ला बाबरी ढाचा पाडण्यात झाली. एक मोठा कलंक हिंदू समाजाने मिटवला. ढाचा पडल्यानंतर, त्याच ढिगावर पूजेसाठी एक तात्पुरता मंच,कापडी तंबू तयार करण्यात आला.

अलाहाबाद न्यायालय २०१० व नंतर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हिंदू समाजासाठी जमीन निश्चित केली. श्री रामजन्मभूमी न्यास निर्माण केला गेला (फेब्रू २०२०). मंदिराच्या बांधकामाची औपचारिक सुरुवात झाली ती ५ ऑगस्ट २०२० रोजी. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं.

अभियांत्रिकी
इथून पुढे श्रीराम मंदिराचे बांधकाम आणि त्यातील रोचक अभियांत्रिकी गोष्टी आहेत...

अशोकजी सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची रचना दोन मजली केली होती. पण आता जागा पुरेशी मिळाली. २०२१ जानेवारी ते मार्च, रामभक्तांनी भरभरून निधीही जमा केला. त्यामुळे मूळ २ मजली ऐवजी मंदिर ३ मजली, त्यावर शिखर करावे असा प्रस्ताव आला. तो मान्यही झाला.

मंदिराच्या भरभक्कम पायासाठी भारतातील अनेक अभियांत्रिकी संस्था, आयआयटी, NGRI  ह्यांनी मदत केली आहे. बांधकामासाठी तज्ञ संस्था L&T, TCE, Architects आहेत.

मंदिर नागर शैलीतील आर्किटेक्चरमध्ये डिझाइन केले आहे. यात परकोटा महाद्वार, मंदिर सिंहद्वार, नृत्य मंडप, रंग मंडप, कीर्तन मंडप, प्रार्थना मंडप आणि गर्भगृह यांसारख्या अनेक मंडपांचा समावेश आहे. प्रत्येक मंडपातील स्तंभांवर दशावतार, शिवपुराण, भागवत पुराण इ कथांतील मूर्ती चितारल्या आहेत.

तळमजला आणि श्रीरामाची मूर्ती २२ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण झाली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत झाली. त्यानंतर पहिला मजला गेल्या दिवाळी २४ मध्ये पूर्ण झाला. दुसऱ्या मजल्याचं काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजित आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत कधीही प्रोजेक्ट प्लॅनमध्ये कमी अधिक बदल अथवा उशीर झालेला नाहीये !!! 

सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष
श्रीराम मंदिराच्या बांधकामाच्या सुरुवातीला पायासाठी सुमारे ५५-६० फूट खोल खोदकाम केले. या खोदकामात प्राचीन काळातील अनेक मंदिरांचे अवशेष सापडले, ज्यांचा इतिहास इसवी सन पूर्व १३०० पर्यंतचा आहे. याचं कार्बन डेटिंग केलेलं आहे आणि मंदिर कार्यालयात त्याचे सर्व पुरावेही उपलब्ध आहेत. खोदकामादरम्यान, विविध काळातील मंदिरांचे अवशेष पुरातत्व विभाग व रामजन्मभूमी न्यास यांना सापडले आहेत. यामध्ये बाराव्या, सातव्या शतकातील व तत्पूर्वी विक्रमादित्य, तसेच मौर्याच्या काळातील मंदिराचा समावेश आहे. तसेच, याबद्दलचे विविध शिलालेख आणि पुरावे सापडले, ज्यामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख होते.

या शिलालेखांमध्ये त्या काळातील राजे आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख आहे. या सर्वांचे एक पुरातत्त्वीय महत्त्व आहे. या शोधामुळे अयोध्येत आजपासून सुमारे ३४०० वर्षांपासून श्रीरामाची पूजा होत होती. अतिशय नीटनेटकी मंदिरेही होती. म्हणजे पुरुषोत्तम श्रीराम आणि त्यांचा इतिहास, म्हणजेच भारतवर्षाचा इतिहास हा किती पुरातन आहे याची कल्पना येऊ शकेल. त्यामुळेच हे अवशेष भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे आहेत.

अर्थात हे पुरावे जगासमोर येतीलच. त्यासाठी जरा वाट बघावी लागेल. कारण आधी मंदिर पूर्ण व्हायचे आहे. या प्राचीन अवशेषांचे जतन आणि प्रदर्शन करण्यासाठी संग्रहालयाची योजना आहे. हे संग्रहालय भविष्यातील पिढ्यांसाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शिक्षणाचे साधन ठरतील.

श्रीराम मंदिराचे तंत्रज्ञान
५५-६० फूट खोल खोदल्यानंतर हा सगळा खड्डा भरला. त्यावर ३ मजली दगडी मंदिर (३७०' लांब, २७०' रुंद, १६१' उंच) उभं राहणार, ते किमान १००० वर्षे टिकलं पाहिजे. त्यामुळे पायाभरणीमध्ये ग्रॅनाइट आणि विशेष काँक्रीटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. मंदिराच्या दीर्घायुष्यासाठी दगडांना इंटरलॉक करण्यासारख्या विशेष तंत्रांचा वापर करण्यात आला. त्यावर ग्रॅनाइटचे दगड ठेवले आहेत. पायाभरणीसाठी एकूण १७,५०० ग्रॅनाइट दगड वापरण्यात आले. यावरून पायाच्या वजनाचा आणि मजबुतीचा अंदाज येऊ शकेल. 

तांबडे दगड स्थिर राहावेत आणि अनेक वर्षे टिकावेत म्हणून तांब्याच्या क्लिप्सचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. त्यानंतर काँक्रीटचे ४८ थर आहेत. प्रत्येकी १ फूट जाड, त्यांना २० टन रोलरने कॉम्पॅक्ट केले गेले. यानंतर १० फूट जाड विशेष काँक्रीटचा दुसरा थर टाकण्यात आला. यावर ३५ फूट जाड काँक्रीटचा तिसरा थर टाकण्यात आला. ग्रॅनाइट दगड पिन-लॉक प्रणालीचा वापर करून इंटरलॉक केले आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरलं गेलं. बांधकामात वापरलेल्या प्रत्येक दगडाला टॅग केले जाते. यामुळे दगडांचे अचूक ट्रॅकिंग आणि व्यवस्थापन शक्य होते, ज्यामुळे प्रत्येक तुकडा योग्यरित्या ठेवला जातो.

पुरातन नागर शैली, अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा अनोखा संगम या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतो ❤️

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर यापुढील काळात श्री वाल्मिकी रामायणातील प्रसंग व मूर्ती, तसेच ब्राँझ म्युरल्स होतील.

हे मंदिर आपला सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. हे लाखो भक्त आणि पर्यटक आजही इथे येतात. रोज जवळपास १ लाख भक्त मंदिराला भेट देतात. दैनंदिन सुगम दर्शन पास आणि आरतीचे पास वेबसाईट वर उपलब्ध आहेत. फक्त वेळेत बुकिंग केलं गेलं पाहिजे. 

आपण आश्चर्यचकित व्हावं अशा अजूनही अनेक गोष्टी आहेत. श्रीरामाची कृपा आपणा सर्वांवर व्हावी आणि लवकरात लवकर सर्वांना दर्शन व्हावे अशी प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना 🙏

।। जय श्रीराम ।।

Friday, April 29, 2022

निजाम, इंद्रेशजी आणि संघ

 साधारण तीन चार दिवसांपूर्वी इंद्रेशजींना भाग्यनगर (हैद्राबाद)ला बोलावले होते. उस्मानिया विद्यापीठात निजामाच्या मुलासोबत त्यांचं भाषण होतं. कार्यक्रमात साहजिकच स्थानिक मुसलमान होते. पेपरमध्ये बातमी आली की इंद्रेशजींनी निजामाची स्तुती केली. निजाम हा आधुनिक शिक्षणाला महत्व देणारा होता, सेक्युलर होता वगैरे वगैरे... हे वाचून मला आश्चर्य आणि वाईट वाटलं. मग नेहमी मी जे करतो ते केलं. काही स्वयंसेवक मित्रांना ती बातमी पाठवली आणि मूळ व्हिडीओ शोधला. साधारण तासाभराचं भाषण होतं.

भाषणात कुठेही निजामाला आधुनिक शिक्षणप्रेमी वगैरे म्हटलं नव्हतं. त्याला सेक्युलर म्हणण्याचा तर प्रश्नच नव्हता. मात्र उस्मानिया विद्यापीठ स्थापन करताना निजामाने जागा आणि त्याकाळी पाच हजार रुपये दिले होते. त्यामुळे निजामाच्या उस्मानिया विद्यापीठात आलोय हा एक आणि दान दिल्याचा दुसरा एक उल्लेख सोडला तर निजामाबद्दल ते काहीही बोलले नाही. ते खरंही आहे. त्यामुळे त्यावर माझा तरी काही आक्षेप नव्हता, नाही!

मग पूर्ण भाषण कशावर होतं, तर आपली ओळख ही राष्ट्र म्हणून आहे. धर्म म्हणून नाही. यावर एकूण सगळा भर होता. कुणी जपान मधून आलाय तर जपानी आला असं म्हणतात, बौद्ध आला असं म्हणत नाहीत. अरेबियातून आला तर अरबी आला असं म्हणतात, मुसलमान आला असं म्हणत नाहीत. त्यामुळे जी काही ओळख आहे ती धर्माधिष्ठित नसून राष्ट्राधिष्ठित आहे. तीच ओळख सर्वांनी जपली पाहिजे आणि मिरवली पाहिजे यावर संपूर्ण भाषणात जोर होता. हे करताना त्यांनी कुठेही कुराणातले दाखले दिले नाहीत मात्र आपल्याला ओळख "मालिक ने दियी हैं" हे सांगत राहिले.

याशिवाय दुसरा मुद्दा होता तो म्हणजे भगवान एक आहे त्याची उपासना अनेक मार्गांनी होऊ शकते. एकं सत् विप्रा: बहुदा वदन्ति| या भारतीय / हिंदू वाक्यानुरूप त्यांनी बरंच काय सांगितलं. एकूण श्रोतेही त्यांना बऱ्यापैकी सहमत आहेत असं दिसत होतं.

यापुढे त्यांनी एक गोष्ट केली ति म्हणजे घोषणा. सुरुवात केली मादरे वतन हिंदुस्थान जिंदाबाद जिंदाबाद. मग इंग्रजी Mother India Long Live. मग हिंदी भारत माता की जय आणि शेवटी संस्कृत वंदे मातरम्. सर्व उपस्थितांनी या घोषणांमध्ये सहभाग घेतला. कुणीही काहीही आरडाओरडा केला नाही. यामुळे कुणाचं इमान दुखावलं गेलं का असा प्रश्नही त्यांनी विचारला. हा सगळा भाग छानच झाला.

अर्थात खटकणाऱ्या बाबी होत्याच -
१. त्यांनी अयोध्येत दुसरा नबी झाला असं म्हणाले. रोख प्रभू रामाकडे होता की नाही ते काही कळालं नाही. पण याची काय गरज ते समजलं नाही.
२. पैगंबर जेव्हा पुन्हा मक्केत आले तेव्हा त्यांनी समोपचाराने मक्केत जाऊ म्हटल्याचा दाखला दिला. हा संदर्भ नक्कीच चुकीचा होता
३. कोणत्याही नबीने (पैगंबराने) त्या काळातील रीतीप्रमाणे लग्ने कितीही केली असतील पण तलाक कधीच दिला नव्हता. त्यांनी आपल्या बायकांना कधी सोडलं नाही. म्हणूनच ते नबी पदाला पोहोचू शकले. त्यामुळे तुम्हीही तलाक देऊ नका वगैरे... हे असले लॉजिक का देतात काही समजत नाही
४. मुहम्मद पैगंबराचं भारतावर प्रेम होतं म्हणे. ते स्वतः कधी भारतात आले नाहीत पण भारताच्या दिशेने सुकून वाले वारे वाहतात असं कायतर बोलले

अर्थात खटकणाऱ्या गोष्टी असल्या तरी संघाचे प्रयत्न भारतीय कोणत्याही धर्माचा असो त्याची पहिली ओळख ही भारतीय हीच असावी. धर्मनिष्ठा या राष्ट्रानिष्ठेनंतर याव्यात. धर्माचं मूळ कुठेही असलं तरी आपण सर्व हे भरतीय मूळ असलेलो आहोत हेच सर्वांनी ध्यानात ठेवावं. आणि अखेरीस मक्का किंवा व्हॅटिकन हे भारतीयांचे धार्मिक मुख्यालय न राहता ते भारतातील व्हावे या दृष्टीने प्रयत्न दिसतात. कट्टरता कमी करण्याचा हाही एक मार्ग असू शकतो. तोही संघ अजमावून बघतोय. मुळात हिंदू माणसाला कोण कशी वैयक्तिक उपासना करतोय याबद्दल आक्षेप नसतो तसा संघालाही नाही. मात्र माझाच मार्ग तो योग्य आणि बाकीचे चूक यावर आक्षेप आहे. तेच या सगळ्या प्रयत्नाचे मूळ आहे.

सर्वात आधी मी सांगितलं की, मी काही स्वयंसेवक मित्रांशी बोललो. त्यात एका मित्राचं उत्तर हे अप्रतिम उत्तर होतं. "जोवर संघाच्या दैनंदिन कामावर याचा प्रभाव पडत नाही तोवर या बातम्यांकडे लक्षही द्यावं असं मला वाटत नाही". संघटना शंभरीकडे जातानाही संघकाम वाढत आहे याचं हे प्रमुख कारण असावं!!!

आज परम पूजनीय आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांची जयंती आहे. त्यांनी चार - पाच लहान मुलं सोबत घेऊन सुरू केलेली शाखा, संघ असाच वाढला आहे. तो वर्धिष्णू राहिलंच आणि बलशाली भारताचं स्वप्न साकार होईल याची खात्री आहे.

भारतीय नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!

इंद्रेशजींचं भाषण - https://m.youtube.com/watch?v=-k_3C2kp3gc

बातमीची लिंक - https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/rss-leader-all-praise-for-nizam-vii-rule/articleshow/90505480.cms

Sunday, May 24, 2020

संघातले शिक्षण

संघाच्या संचलनात (संघाचे ४०-४५ मिनिटांचे मार्चिंग) घोषही (संघाचा बँड) असतो. त्याच्या तालावर सगळं संचलन होत असतं. घोषात सर्वात पुढे घोषदंड घेऊन घोषप्रमुख असतो. त्यानंतर आनक (ड्रम) पथक, मग ढोल, झांझ पथक, वंशी (बासरी) पथक आणि शेवटी शंख (बिगुल) पथक असते. आनक, वंशी आणि शंख पथकात एक एक प्रमुख असतो.

सगळे एका तालात चालत असतात. घोषाची एक रचना (ट्यून) सुरू असते. तिचं शेवटचं चरण सुरू असतं. सगळे पथक प्रमुख सतर्क असतात. शेवटच्या चारणाच्या शेवटच्या समेच्या आधी घोषप्रमुख हातातल्या घोषदंडाने पुढची रचना कोणत्या पथकाची आहे याची सूचना करतात. रचना संपल्यावर तीन पावलांसाठी (दीड सेकंड) आनक वाजतो, एका पावलासाठी (अर्धा सेकंद) शांतता असते. त्या शांततेत ज्या पथकाला पुढची रचना वाजवायची आहे त्या पथकाचा प्रमुख पुढील रचनेचं नाव सांगतो. आनक पुन्हा एकदा तीन पावलांसाठी वाजतो. लगेच ती रचना ते पथक, आनक पथक आणि ढोल पथक वाजवू लागते.

१. घोषप्रमुखाला रचना केव्हा संपते त्या वेळी सतर्क राहून बदलाची सूचना द्यायची असते.
२. कोणत्या पथकाची पुढची रचना आहे हे कळाल्यावर त्या पथकातील सर्वांनी तयार राहायचे असते.
३. त्या पथकातील प्रमुखाला विचार करून रचनेचे नाव सांगायला सगळा मिळून काही सेकंद वेळ मिळतो.
४. आपल्या पथकातील सर्वांना कोणत्या रचना येतात हे पथकप्रमुखाला माहीत असावे लागते.
५. रचनेचे नाव कळाल्यावर त्या पथकाला आणि आनक पथकाला रचना सुरू करण्यासाठी दीड सेकंद वेळ मिळतो.
६. दीड सेकंदानंतर नवीन रचना सुरू होते.
७. हे सगळं घडत असताना संपूर्ण घोषपथकाची पावले एक-दोच्या ठोक्यावर डावा-उजवा बरोबर सुरू असतात.
८. या सगळ्या तालावर संपूर्ण संचलन सुरू असतं.

सतर्कता, पथकातील सर्वांची माहिती, वेगवान निर्णयक्षमता, नियमांचे पालन, आदेशाची अंमलबजावणी, पावलासोबत जोडलेली मने... हे सगळं आम्ही सहज शिकतो, केव्हा शिकलो ते कळतही नाही...

आज जेव्हा कोविड१९ च्या साथीत संघाचं योजनाबद्ध काम बघितलं तेव्हा माझे मामा प्रकाश कुळकर्णी यांच्याशी सुमारे २२ वर्षांपूर्वी झालेला वरील संवाद आठवला!

Sunday, February 23, 2020

प्रभावी कौंतेय

काल कौंतेयने ज्या दिवसांची आठवण करून दिली त्या दिवसांतील कौंतेय आठवला. आम्हाला आता प्रत्यक्ष भेटून १५ वर्षे (किंवा जास्तच) झाली असतील. पण तो कौंतेय अजूनही जसाच्या तसा आठवतो.

आम्ही संभाजीनगर (देवगिरी जिल्हा) मधील स्वयंसेवक. त्याच्या आधी शहर प्रचारक होते अप्पा (दत्तात्रय गर्गे). कौंतेय शहर प्रचारक म्हणूनच आला, पण अर्ध्याच शहराचा. आमचा भाग त्याच्या कार्यक्षेत्रात नव्हता. तरी शहराच्या एकत्रीकरणात आमच्या भेटी होत होत्या. तेव्हा माझं वय १८-१९ असेल तर कौंतेय फार तर २२-२३. इतकं वयातील अंतर कमी असल्याने आमची मैत्री छान झाली. कौंतेयचा आमच्यावर खरं सांगायचं तर खूप प्रभाव पडला होता. कारण त्याने सांगितलेलंच - गाणी, कविता, उतारे संपूर्ण पाठ. याशिवाय अजून भारी म्हणजे तो स्वतः कविता करायचा आणि त्या छंदबद्ध, तालात म्हणायचा.

तो प्रचारक निघताना मनाची होत नसलेली तयारी आणि आश्वासक हात पाठीवर पडल्यावर झालेली तयारी -
घेतली भरारी तरीही
बळ येई ना पंखात
संशयो मनीचा घडवी
हृदयात एक आकांत
या कवितेतून अप्रतीम सांगितली होती.

अशीच एक कविता म्हणजे शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंहांना पाठवलेले पत्र - मिर्झास
मग सडा गुलामीत वा मुक्तिस्तव गर्जा।
आवाहन अथवा समज इशारा मिर्झा।।
आलमगीर चर्येवर चिंतेचे घन सावट पडले
शिवरौद्र तांडवामध्ये रथी अन् महारथी सापडले...

याच कवितेत एका कडव्यात, महाराज स्पष्ट सांगताहेत
ती माय भवानी समर्थ तारायाला
हे राज्य श्रींचे पूर्णत्वी नेण्याला
तुज माझ्या वाचुन कार्य तिचे का अडते
पण खचित खुणावी आपुल्या कर्तव्याला

गीतेतील कर्मयोग आणि स्वधर्म (कर्तव्य) पालन किती सहज सोपं करून सांगितलं होतं याने. आणि हा माझ्यापेक्षा केवळ २-४ वर्षे मोठा असेल. सुंदर शद्ब, एक नाद आणि कौंतेयची कविता म्हणण्याची विशिष्ट पद्धत. आम्ही सगळेच त्याच्या प्रभावात, खरं सांगायचं तर प्रेमात.

कौंतेयची कवितांची वही उतरवून घेतली होती. पण त्याची खरंतर गरज नव्हतीच. आत्ताही वरील ओळी लिहिताना वेगळ्या आठवाव्या लागल्याच नाहीत, एवढ्या त्या लक्षात राहिल्यात.

हे सगळं कालपासून आठवत होतं. आज जरा शब्दबद्ध केलं. असे प्रचारक संघाने आम्हाला दिले म्हणून आम्ही घडलो.

Friday, December 20, 2019

संघाचं हिंदुत्व (माझ्या आकलनानुसार)

संघाच्या हिंदुत्वात कुणी त्याज्य नाहीये. त्यात व्यापकता आहे, सर्वसमावेशकता आहे. संघाची विचारसरणी अनेक पद्यांमधून सहज व्यक्त होत असते. त्यामुळे यावर लिहिण्याचा विचार करताना आपोआप एक पद्य मनात उमटलं.

विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू हैं।
संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों मे हिंदु हैं।।धृ।।

राम कृष्ण गौतम की धरती, महावीर का ज्ञान यहां
वाणी खंडन मंडन करती, शंकर चारों धाम यहां
जितने दर्शन राहें उतनी, चिंतन का चैतन्य भरा
पंथ खालसा गुरू पुत्रों की बलिदानी यह पुण्य धरा
अक्षय वट अगणित शखाऐं, जड में जीवन हिंदु हैं ।।१।।

कोटी हृदय हैं भाव एक हैं, इसी भूमि पर जन्म लिए
मातृभूमि यह कर्मभूमि यह, पुण्यभूमि हित मरे जिये
हारे - जीते संघर्षों में, साथ लढे बलिदान हुए
कालचक्र की मजबूरी में रिश्ते नाते बिखर गये
एक बडा परिवार हमारा, पुरखे सब के हिंदु हैं ।।२।।

सबकी रक्षा धर्म करेगा, उसकी रक्षा आज करें
वर्ण - भेद मत - भेद मिटा कर नव रचना निर्माण करें
धर्म हमारा जग में अभिनव, अक्षय है अविनाशी हैं
इसी कडी से जुडे हुए, युग युग से भारतवासी हैं
थाय अथाह जहां की महिमा, गहरा जैसे सिंधु हैं ।।३।।

हरिजन गिरिजनवासी बन के, नगर ग्राम सब साध चलें
उंच नीच का भाव घटा कर, समता के सद्‌भाव बढें
ऊपर दिखते भेद भले हों, जैसे वनमें में फूल खिले
रंग बिरंगी मुस्कानों से, जीवन रस पर एक मिले
संजीवनी रस अमृत पीकर, मृत्युंजय हम हिंदु है ।।४।।

यात कुठेही भारतीय भूमीत जन्मलेल्या उपसनापद्धतीबद्दल अनादर, आक्षेप नाही तर जेवढी दर्शने आहेत तेवढे रस्ते आहेत हा भारतीयत्वाचा आत्मा अधोरेखित केलाय. या वटवृक्षाच्या कित्येक फांद्या आहेत, पण मूळ जीवनरस हिंदू (म्हणजेच भारतीय) आहे हे अधोरेखित केलंय. या भारतभूमीला मातृभू, पुण्यभू मानणारे सगळेच आपले आहेत. संघर्षाच्या काळात हार जित झाली आणि नाते तुटले (धर्मांतरे झाली) तरीही सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्यामुळे आपण सर्व भारतीय एक परिवार आहोत हीच संघाची धारणा आहे. मतभेद आणि वर्णभेद मिटवून नवरचना निर्माण करताना जुन्या गैर गोष्टी अर्थातच टाकाव्या लागणार याची सार्थ कल्पना संघाला आहे. शेवटच्या कडव्यात पुन्हा एकदा विविध जाती, पंथ, निवास यामुळे भिन्न असलेल्या हिंदूंमध्ये कोणताही भेद असू नये हे सांगितलंय. त्याचं वर्णन करताना वनात जसे अनेक फुलं असतात तसेच हेही, परंतु पुन्हा या विविध रंगात जीवनरस एकच आहे हे सांगितलंय. संघाचं हिंदुत्व हे असं सर्वसमावेशक आहे.

याच आशयाची संघाची अनेक पद्ये आहेत. ज्या सर्वांत कायम सामाजिक समरसतेबद्दल सांगितले आहे. कुठेच कुणी भारतीय आपला शत्रू आहे आणि त्याला मारले पाहिजे हे संघ शिकवत नाही.
१ - हिन्दु जगे तो विश्व जगेगा
२ - जनसेवा ही ईश्वरभक्ति
३ - हिन्दु हिन्दु एक रहे
४ - हिंदू सारा एक मंत्र हा

आता प्रश्न येतो अभारतीय उपासना पद्धतीचं काय? त्याचं उत्तर भारतीय पद्धतीनेच देता येईल. ज्याला जी उपासनापद्धत योग्य वाटते त्याने ती अनुसरावी. पण ते करताना इस्लाम वा ख्रिश्चन धर्मात जसं सांगितलं जातं की "हाच एकमेव मार्ग आहे" हे असू नये. "हाही एक मार्ग आहे" या तत्वानुसार भारतात तर चार्वाकासारखे शतप्रतिशत नास्तिक सुद्धा आहेत आणि त्यांची गणना हिंदू दर्शनातच होते. त्यामुळे केवळ अभारतीय उपासना पद्धत आहे म्हणून इस्लाम किंवा ख्रिश्चनांचा संघ विरोध करत नाही. विरोध सुरू होतो फसवणुकीतून किंवा जबरदस्तीने धर्मांतर आणि "हाच एकमेव मार्ग" या मानसिकतेमुळे. तेहतीस कोटी देवांमध्ये अल्ला आणि येशू सामावून घेणं भारतीयांना कठीण नाही. "केवळ तेच" हा मुद्दा मात्र नक्कीच विरोधाचा आहे.

हिंदू धर्म हा एक पुस्तक, एक प्रेषित, एक मार्ग असा बनलेला नाही. अनेक मार्ग, अनेक विद्वान, अनेक पुस्तकं या मंथनातून बनलेला आहे. शिवाय आज सहा आस्तिक आणि तीन नास्तिक दर्शने समजून घेऊन, त्यापैकी एकानुसार आचरण कुणी करत नाही. कारण याच्या पुढे पुराणं आली, रामायण महाभारतासारखी महाकाव्ये आली, नवीन देवता आल्या. शीख पंथ उदयास आला आणि तेही सर्व इथे गुण्यागोविंदाने नांदू लागले. अजूनही नवे पंथ, संप्रदाय तयार होऊ शकतात - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज अशी उदाहरणे आहेतच. या सर्वांना सामावून घेणारं हिंदुत्व, संघाचं हिंदुत्व आहे.

आज बरेच पुरोगामी विद्वान असं म्हणतात की इतकी विविधता असलेल्या प्रदेशांचा देश होऊ शकतो, पण हे एक राष्ट्र आधी कधीच अस्तित्वात नव्हते. त्यांना असं वाटतं कारण या राष्ट्राचा आत्मा - हिंदुत्व - त्यांना मान्यच नसतं. जेव्हा सरदार पटेलांनी सर्व संस्थानांना भारतात सामावून घेतलं तेव्हा त्यांनी "एक संस्कृती" यावरच भर दिला होता. केवळ त्या आवाहनावर पाचशेच्या वर संस्थाने भारतात विलीन झाली. भारतात राज्ये अनेक होती पण त्यातील संस्कृती एक होती आणि आहे. अन्यथा दाक्षिणात्य माणसाचे नाव शिवरामकृष्ण का असतं? एका केरळी माणसाने भारताच्या चार भागात मठ का स्थापन केले? मूर्तिपूजक, निसर्गपूजक, विविध दैवतांना मानणारे, वेद नाकारणारे आणि देव/मोक्ष या सगळ्याच संकल्पना नाकारणारे भारतात सुखेनैव राहत होते आणि राहताहेत, त्याचं कारण हिंदुत्वच आहे. या विविधतेत जी एकता आहे ते हिंदुत्व आहे. किंवा मी असं म्हणेन की संघ याच एकतेला हिंदुत्व मानतो. यावर अधिक वाचायचं असेल तर संघाचं एकात्मता स्तोत्र बघावं.

संघ कधीही पुन्हा सतीप्रथा सुरू करा म्हणणार नाही, धर्मातील योग्य सुधारणांना संघाचा कायमच सक्रीय पाठिंबा राहिला आहे (उदा - देवदासी प्रथेविरुद्ध संघाचं/संघ स्वयंसेवकांचं काम बघावं). शबरीमला सारख्या गोष्टी या "धर्म सुधारणा"पेक्षा "पुरातन वारसा" या अशयातून बघव्यात असं संघाचं मत आहे. पण जर बहुसंख्य महिलांनी शबरीमला येथे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली तर संघ त्याला विरोध करणार नाही.

जशी पूर्वी अनेक विद्वानांकडून अनेक पुस्तके, नीती नियम लिहिले गेले आणि भारतात ते सामाजिक धार्मिक नियम म्हणून पळाले गेले, तसेच स्वतंत्र भारतात अनेक विद्वानांच्या विचारमंथनातून नवीन पुस्तक उदयाला आलं - संविधान. त्यामुळे संविधान (बहुमताने नित्य नूतन होणारं) जे सांगतं ते सामाजिक नीती-नियम हा आजचा धर्म आहे. उपसनापद्धती वेगळी असू शकते आणि ती वैयक्तिक/घरापुरती मर्यादित असावी. संविधानापुढे कोणताही धर्मग्रंथ अधिक प्रधान्याचा असणार नाही. हिंदूंमध्येच "वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्" हे गीत प्रसिद्ध होऊ शकलं आहे. हेच हिंदुत्व आहे. ज्यात काळाबरोबर बदलण्याची क्षमता आहे.

संघाचं हिंदुत्व हे
- सर्वसमावेशक, सर्वव्यापी
- सुधारणेला कायम वाव असलेलं
- नित्य नूतन (काळाबरोबर, काळानुसार नवीन बाबी मान्य करणारं)
- भारतीय वारसा जपणारं
- आक्रमकांशी झुंज देणारं
- राष्ट्रप्रथम मानणारं
असं आहे!

१.
हिन्दु जगे तो विश्व जगेगा मानव का विश्वास जगेगा
भेद भावना तमस हटेगा समरसता अमृत बरसेगा
हिन्दु जगेगा विश्व जगेगा ।।धृ।।

हिन्दु सदा से विश्व बन्धु है जड चेतन अपना माना है
मानव पशु तरु गीरी सरीता में एक ब्रम्ह को पहचाना है
जो चाहे जिस पथ से आये साधक केन्द्र बिंदु पहुचेगा ॥१॥

इसी सत्य को विविध पक्ष से वेदों में हमने गाया था
निकट बिठा कर इसी तत्व को उपनिषदो में समझाया था
मन्दिर मठ गुरुद्वारे जाकर यही ज्ञान सत्संग मिलेगा ॥२॥

हिन्दु धर्म वह सिंधु अटल है जिसमें सब धारा मिलती है
धर्म अर्थ ओर काम मोक्ष की किरणे लहर लहर खिलती है
इसी पूर्ण में पूर्ण जगत का जीवन मधु संपूर्ण फलेगा ॥३॥

इस पावन हिन्दुत्व सुधा की रक्षा प्राणों से करनी है
जग को आर्यशील की शिक्षा निज जीवन से सिखलानी है
द्वेष त्वेष भय सभी हटाने पाञ्चजन्य फिर से गूंजेगा ॥४॥

२.
जनसेवा ही ईश्वरभक्ति बोध यातला उमजुया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥

कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जातीपतींच्या
अनेक जाती पंथ-गटानी धरिल्या वाटा भेदांच्या
भेद भेदुनि भिंती पाडुनि समरसता ती आणूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥१॥

ग्रामवासी वा नगरनिवासी असोत कोणी वनवासी
एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी
कालगतीच्या चक्रावरती पर्व नवे ते कोरूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥२॥

कुणी न राहो दुबळा येथे मनी असा निर्धार जागवु
कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवु
उत्कर्षाची पहाट आणुन प्रकाश किरणे होऊया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥३॥

३.
हिन्दु हिन्दु एक रहे भेद भाव को नही सहे
संघर्षो से दुखी जगत को मानवता की शिक्षा दे ॥धृ॥

एक ब्रह्म कुछ और नही हरिहर दुर्गा मात वही
देव देविया रूप उसीका देश काल अनुसार सही
सब पन्थों का मान करे सब ग्रंथो से ग्यान गहे
सद्गुरूओं की सीख समझकर जीवन को जीना सीखे ॥१॥

जो भाई भटके बिछडे हाथ पकड ले साथ चले
भोजन कपडा घर की सुविधा शिक्षा सबको सुलभ रहे
उंच-नीच लवलेश न हो छुवा-छूत अवशेष न हो
एक लहू सब की नस-नस मे अपनेपन की रीत गहे ॥२॥

धर्म प्रेम अमृत पीये गीता गंगा गौ पूजे
वेद विहीत जीवन रचना हो राम कृष्ण शिव भक्ति करे
धर्म सनातन अनुगामी बुद्धम्-शरणम्-गच्छामि
अर्हंतोंको नमन करे नित वाहे गुरु अकाल कहे ॥३॥

४.
हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवू या
धरती-नभ-पातळहि भारु प्राण पणाला लावूया ॥धृ॥

उच्चनीचता तण जाळावे धगधगत्या कर्तृत्वाने
समाज रसरसता अर्वाचिन पुनः निर्मुया यत्नाने
खचलेला अभिमान जागवू पिचली हृदये सांधूया ॥१॥

कोणी नाही शत्रू आपूला प्रेमाने अवकाश भरु
चारित्र्याच्या आधारावर हिंदूराष्ट्र हे नव उभवू
समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमवूया ॥२॥

सामाजिक सन्मान निवारा समान सर्वा लाभावा
अन्न-वस्त्र-संस्कार लाभही सहजपणे सर्वा लाभावा
हीच एकता, समता, ममता, पथ ऐक्याचा चालूया ॥३॥

निज सत्वाची जाणिव नसता राष्ट्रजीवनी अर्थ नसे
परंपरा, इतिहास, पराक्रम आठव नुसाता व्यर्थ असे
कोटी मनांना सवे घेऊनी वैभव सारे मिळवू या ॥४॥

समाजभक्ति हीच प्रेरणा राष्ट्रभक्ति हे रुप तिचे
देशद्रोही निष्प्रभ होतील, दर्शन घडता शक्तिचे
विचार येतील अमरत्वाचे सर्व जगाला देऊया ॥५॥

आज कसोटी पुरुषार्थाची, व्यक्तित्वाच्या समर्पणाची
माय भूमीच्या पायी वाहू ओंजळ निज कर्तृत्वाची
अग्निपरिक्षा कोणी घेता सुवर्ण तेजे तळपुया ॥६॥

Tuesday, March 20, 2018

राज्जुभैय्यांची आठवण

आमच्या वर्गात एक चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. आम्ही दहावीला असताना शाळेत एकदा त्यावेळी मा. सरकार्यवाह असलेले रज्जूभैय्या आले होते. बहुदा डिसें'९३ किंवा जाने'९४ असावा. मग चुणचुणीत मुलगा त्यांना भेटला आणि त्याने त्यांची सही घेतली. तेव्हा ते व्यस्त असल्याने मला काही सही मिळाली नाही. पण मी एक शाखेचा गणशिक्षक होतो त्यामुळे त्याच दिवशी निवासी वर्गात माझी रज्जूभैयांशी भेट होणार होती. वर्ग सुरू झाला. मी भोजनानंतर त्यांच्याकडे गेलो आणि मला सही द्या अशी विनंती केली. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, "कभी कोई अपने नानाजी या दादाजी की स्वाक्षरी लेता है भला"
या वाक्यांनी खूप छान वाटलं, पण एक हुरहूर लागून राहिलीच की आपल्याकडे सही नाही. मार्च'९४ मध्ये रज्जूभैय्या प. पू. सरसंघचालक झाले आणि चुणचुणीत मुलाने मला जरा चिडवलेच...
पुढे २ वर्षांनी १२वीची परीक्षा झाल्यावर ३ एप्रिल ९६ ला रज्जूभैयांच्या हस्ते रायगडावर रोप वे चे उद्घाटन होणार होते. आमच्या शहरातील आमच्यासारख्या माकडांचा एक वानरयुथमुख्य होता रवींद्र पूर्णपात्रे. तो घरी आला आणि माझ्या आई वडिलांची या सहलीला जाण्याची परवानगी मिळाली. तेव्हाची अशा सहलींसाठी बेष्ट गाडी म्हणजे ट्रॅक्स. आम्ही ९ स्वयंसेवक आणि एक चालक असे निघालो.
जाताना दुपारी शिवथरघळ येथे गेलो. समर्थांचं दर्शन घेतलं. संध्याकाळपर्यंत थांबून साधारण ७ च्या सुमारास तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती होती. त्यामुळे वाटेवर लख्ख चंद्रप्रकाश. झाडं अक्षरशः चांदणं पीत आहेत असं वाटत होतं. वळणं घेत गाडी रायगडाकडे निघाली. रात्री १० ला आम्ही पाचाडला पोहोचलो. एका घरी जेवण व निवासाची सोया झाली. भरपेट खाऊन झोपलो.
पहाटे ३:३० ला रवीच्या हाका सुरू झाल्या. आणि त्याने आम्हाला सर्वांना ४ ला गडाच्या वाटेवर आणलं. मग सर्वांचाच उत्साह वाढला. संघाच्या कोणत्याही शिबिरात सकाळी एकात्मता स्तोत्राने सुरुवात होते. मग "ॐ नम: सच्चिदानंद..." ची सुरुवात झाली आणि रवी सोबत मी आणि मागून सर्व असं स्तोत्र म्हणत आम्ही गड चढायला लागलो.
हनुमान जयंती असल्याने पूर्णाकृती चंद्र पश्चिमेला होता आणि रायगडाची चढण सगळी पश्चिमेकडून असल्याने आम्हाला सहजच रस्ता दाखवत होता. आमची वानरसेना पटापट गड चढली आणि पहाटेच्या प्रकाशात गडावरील बाजारापर्यंत आम्ही पोहोचलो. जर लगेच समाधीच्या मागच्या बाजूला गेलो तर सूर्योदय दिसेल याची खात्री असल्याने धावत तिकडे पोहोचलो.
जोर-बैठका आणि तळ्यात पोहून झाले तोवर सूर्यनारायणाने दर्शन द्यायला सुरुवात केली होती. भव्य सह्यकडे, तिथून दिसणारे किल्ले, त्यामागे सृष्टीला जागा करणारा भगवंत आणि गडावरील भारावलेलं वातावरण. आम्ही नि:शब्द होऊन तसेच उभे राहिलो.
मग जाणीवेच्या पातळीवर आल्यावर पहिली जाणीव झाली ती भुकेची. तिथल्या हॉटेलात, "प्लेटचे भाव नाही किलोचे सांगा भाऊ", असं सांगत किलोंनी पोहे खाल्ले. गड फिरलो. आणि कार्यक्रमाच्या जागी येऊन पोहोचलो.
तेवढ्यात कळाले की रज्जूभैय्या अतिथीकक्षात आलेले आहेत. सुरक्षरक्षकाला विनंती करून मी आत गेलो. त्यांना नमस्कार करून परिचय सांगितला. "स्वाक्षरी मांगने वाले तुम ही थे ना?", रज्जूभैय्यांचा प्रश्न! मी अवाक झालो, हो सांगितलं. फोटो काढू का विचारलं आणि त्यांनी हसून होकार दिला. मी फोटो काढून पुन्हा नमस्कार करून बाहेर पडलो.
मग उद्घाटन झालं. एक वारकरी महाराज आले होते. त्यांनी सांगितलं की, शिक्षणासाठी वार लावून जेवणारे, वारीला जाणारे आणि शत्रूवर वार करणारे हे सगळेच वारकरी. एक ज्ञानासाठी, एक देवासाठी आणि एक राष्ट्रासाठी! हे सगळेच वारकरी थोर काम करत असतात.
रज्जूभैया भाषणाला उभे राहिले. "आज रोप वे का उद्घाटन है। हिंदी में रोप वे को रज्जूमार्ग कहेते हैं। ये रज्जूमार्ग खाई एवं शिखर को जोडता हैं। संयोग से मेरा नाम भी रज्जू है। संघ का स्वयंसेवक हूं, और संघ का भी यही काम है की खाई और शिखर जोडनां।" अगदी सहजतेने त्यांनी संघकामाचे फलित सांगितले, कितीही अंतर असते तरी समाज जोडणे.
कार्यक्रम संपला, अन्य जिल्ह्यातील स्वयंसेवकांना भेटून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 
डोक्यात विचार घुमत होते...
एका सामान्य स्वयंसेवकाच्या घरातील दादाजी किंवा नानाजी होणं, तो स्वयंसेवक 2 वर्षांनी लक्षात राहणं आणि Physics Gold Medalist राजेंद्र सिंह यांचा रज्जू होणं... सगळंच विलक्षण!!!



दि. ३१ मे २०१७

सैनिक, सर्वसामान्य आणि संघ स्वयंसेवक

मागील काही दिवसांत प. पू. सरसंघाचालकांच्या सैनिक, सर्वसामान्य आणि संघ स्वयंसेवक भारतीय यावर बरीच चर्चा झाली. काहींनी प्रश्न विचारले, काहींनी विनोद तयार केले, तर ज्यांनी तयार संघटना मोडून आपली संघटना उभी केली, पण ती धड नऊ वर्षे सांभाळता आली नाही त्यांनी नव्वद वर्षांहून अधिक वय असलेल्या संघटनेवर व्यंगचित्र काढून आपली भडास काढली. या सगळ्यातून विरोध न दिसता द्वेष दिसून आला.
संघ तीन दिवसांत युद्धजन्य परिस्थितीत स्वयंसेवकांना युद्धसज्ज कसे करू शकतो? हा यातील मुख्य प्रश्न. युद्धसज्ज असणे म्हणजे बंदुका घेऊन थेट सीमेवर जाणे असे नसते. सैन्याची अनेक अन्य कामे असतात. ती हलकी केली तरी सैन्याला प्रचंड मदत होऊ शकते. सैन्यासाठी जेवण बनवण्यापासून ते सैनिक रुग्णसेवा करेपर्यंत. पण त्यात आत्मीयता आणि शिस्त असावी लागते जी स्वयंसेवकांमध्ये असते, याची मोहनजींना खात्री आहे.
अनेकांनी स्वयंसेवकांनी युद्धजन्य परिस्थितीत कुठे, कसं आणि काय काम केलं याचे अनेक दाखले दिले. पण युद्धजन्य परिस्थिती नसताना तयारी कशी होते याचं मी अनुभवलेलं उदाहरण देतो. सुमारे वीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. पहाटे सव्वा चार वाजता दार वाजलं. "साडेपाचला शहरसंघचालकांच्या घराजवळील संघस्थानावर अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांचे एकत्रीकरण आहे" हा निरोप मिळाला. मी एका शाखेचा कार्यवाह होतो. सर्व तरुण गटनायकांना निरोप दिला. त्यांनी आपापल्या गटात निरोप दिले आणि साडेपाचला पाचशेहून अधिक तरूण संघस्थानावर आले. शाखा लागली. संघचालकांनी आपण केवळ दीड तासात पाचशे+ स्वयंसेवक एकत्र येऊ शकलो त्याबद्दल समाधान व्यक्त केले. कधीही जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर आपण असेच लवकर एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करू असे सांगितले. प्रार्थना झाली आणि सर्व घरी पोहोचले.
वीस वर्षांपूर्वी मोबाईल काय, प्रत्येकाकडे घरी फोन सुद्धा नव्हते. पण खालील गोष्टी स्वयंसेवकांत होत्या
१. निरोप कसा पोहोचवायचा याची शिस्त. संघचालक - दोन भाग कार्यवाह - प्रत्येकी पाच नगर कार्यवाह - प्रत्येकी सुमारे ३, ४ तरूण शाखांचे कार्यवाह - प्रत्येकी ५, ६ तरूण गटनायक - प्रत्येकी ८, १० तरूण स्वयंसेवक. या प्रकारे एका तासात निरोप प्रत्यक्ष भेटून दिला गेला.
२. नेतृत्वावर विश्वास - कुणीही, का बोलावले, ही काय वेळ आहे का... विचारले नाही. संघचालकांनी बोलावले ते काहीतरी काम असेल म्हणून बोलावले असेल. तिथे गेलं की कळेलच. घरच्यांनाही सहज जाऊ दिले कारण त्यांनी संघ पेपरातून, टीव्हीवरून समजावून घेतला नव्हता तर अनुभवला होता.
३. निरोप नेमका पोहोचवणे - या एकत्रीकरणात कुणीही बाल किंवा ४५+ स्वयंसेवक आले नव्हते.
हे स्वयंसेवकांत का असते याचे उत्तर देणे खूप अवघड आहे. ती प्रत्यक्ष संघस्थानावर जाऊन अनुभव घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे शाखामे आओ, सब जान जाओ।
माझे जे मित्र संघद्वेषी आहेत त्यांना माझे एकच सांगणे आहे. तुम्ही द्वेषी होऊ नका. तुम्हाला संघ आवडत नाही तर विरोधी रहा. तुमच्या मते संघ द्वेष पसरवतो, मग तुम्ही प्रेम पसरवा. कारण तुम्ही स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणवता. द्वेष केल्याने द्वेषच वाढेल. एवढं केलंत तरी आनंद होईल. स्वयंसेवक तुमचा द्वेष नक्की करणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही निश्चितच एक भावी स्वयंसेवक आहात

दि. १७ फेब्रुवारी २०१८