Showing posts with label रसग्रहण. Show all posts
Showing posts with label रसग्रहण. Show all posts

Thursday, July 30, 2020

वेगळाच "दोन मी"

सामान्यपणे "दोन मी" असलेल्या कवितांमध्ये "पहिला मी" म्हणजे आपण नेहमीचे, नोकरी-धंदा करणारे, "रोजमर्राह की जिंदगी जिने वाले" वगैरे असतो. आणि "दुसरा मी" सामान्यपणे चिंता न करणारा, आहे तो क्षण जगणारा, वाईटातून चांगलं शोधणारा/घडवणारा वगैरे असतो. पण कधीतरी हा "दुसरा मी" फार वाईट असू शकतो. जो आपल्यात असतो, पण आपण त्याला प्रयत्नपूर्वक दूर ठेवलेलं असतं. माझा एक मित्र त्याला दारू ऑफर केली की नाकारताना एकच गोष्ट सांगतो, "मी सुरू केली, तर थांबायचं भान राहणार नाही, म्हणून मी दारू पीत नाही." हे जसं आहे तसंच हा "दुसरा मी" सगळ्या षड्रिपूंना अगदी जवळ बाळगून असतो. जरा जागा मिळाली की वर येतो. आपण कुठे थांबायचं याचा विवेक काढून घेतो.

संदीपच्या एका कवितेतला हा वाईट्ट "दुसरा मी" काहीसा असा आहे - हा मनाच्या कोपऱ्यात लांब दूर कुठेतरी असतो. पण तिथूनही तो एकप्रकारे दबा धरून बसलेला असतो. नेहमी हा कधी बाहेर दिसत नाही. कुठेतरी अंतरंगात लपून असतो. त्याला "पहिला मी" कधी हटकायला जात नाही. पण अचानकच एखाद्या अनामिक वेळी याची सावली आपल्यावर पडू शकते. ती सावली जर पडली तर आपलंच एक विकृत मन समोर येतं. त्याला साध्या सुंदर गोष्टी विकृत वाटू लागतात. त्याची हाव सुटते. अशा वेळी जर "दुसऱ्या मी"ला उठू दिलं, तर या विकृतींची एक चटकच लागते. ही जर चटक लागली तर जी पंचेंद्रिये आपल्याला आनंद देतात, एक नवी अनुभूती देतात, ज्याद्वारे आपण एक प्रकारे तरल होऊन विहार करू शकतो त्याऐवजी केवळ सुरू होतं ओरबाडणं. आस्वाद घेणं बंद करतो आणि विचार, कृती मधून फक्त ओरबाडतच राहतो, शोषण करतो. याची सुरुवात फार सहज होऊ शकते. आपण कधीतरी काहीतरी चुकीचं करतो. ती चूक पकडली जात नाही. त्यातून आपल्याला काहीतरी फायदा मिळतो. मनाला एक प्रकारे आपण हेही करून यश मिळवू शकतो असं वाटतं. मग त्या चुका वाढत जातात. चुका थांबून अपराध सुरू होतात आणि त्यातूनच हा "दुसरा मी" मोठा होत जातो. मुळातला "पहिला मी" नंतर कुणाला दिसत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच चूक केली/झाली तर थांबा. नाहीतर हा शतकानुशतके असलेला "दुसरा मी" तुमचा कधी ताबा घेईल सांगता येणार नाही.

आता संदीपची या "दुसऱ्या मी"ची कविता -

आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून
पडका वाडा बसला आहे दबा धरून
त्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर
दिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर
परंतु तेथे जावयास ना कोणा धीर
कारण आहे पक्के ठाऊक आम्हाला
त्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा

कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी
उच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी
दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ
काठावरती येऊन बसते संध्याकाळ
पाण्यावरती पडता छाया सांजेची
दिवसावर हो काळी जादू रात्रीची
घुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे
विरून जाती रूप धारती घुबडांचे
घुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या
तरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या
भीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला
आळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा

हिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस
नाकाजागी केवळ भोके अठ्ठावीस
उडता येते परी आवडे सरपटणे
गाळ चोपडे अंगाला जैसे उटणे
उठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक
पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप
अन्य न काही चाले या बुंबुंबाला
भूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला
जे जे दिसते त्याची चटणी जोडीला
खा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा

खोडी काढी खोटे जर बोले कोणी
आणेल कोणी आईच्या डोळा पाणी
चोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी
बुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी
जवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे
त्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे
बुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा
खापरखापरपणजोबांहून पूर्वीचा
तयास न भितो असा जगातून कोण भला
बुंबुंबाही घाबरतो बुंबुंबाला
करण्याआधी वाईट काही रे थांबा
दिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा

गम्मत वाटली ना!

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात सलीलने शुभंकर सोबत काही युट्युब व्हिडीओ केले होते. त्यात अग्गोबाई... चे काही एपिसोड होते. या छान गप्पांमध्ये सलीलने आणि संदीपने खूप गमतीदार गोष्टी सांगितल्या. शेवटच्या कडव्यात "दिसेल अथवा आरशातूनी" मुळे बुंबुंबा हे आपलंच रूप आहे हे जाणवलं होतं, पण आख्खी कविताच "दोन मी"ची आहे हे संदीपने एका एपिसोडमध्ये सांगितलं. वर म्हणाला की आता पुन्हा नीट ऐका... अमोहामुळे अग्गोबाई... घरात सुरूच असतं. मग संदीपने सांगितल्याप्रमाणे पुन्हा या दृष्टिकोनातून (श्रुतिकोनातून) ऐकलं. ही "दोन मी"ची वेगळीच संकल्पना जाणवली. तुम्हीही ऐकून बघा...

Wednesday, March 4, 2020

दोन मी

थ्री इडियट्स मधलं "बहती हवा सा था वो" गाणं आठवतंय?
हम को तो राहें थी चलती
वो खुद अपनी राह बनता,
गिरता संभालता
मस्ती में चलता था वो
हमको कल की फिकर सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हें को खुल के जीता था वो
स्वानंद किरकिरेने सहज शब्दात तो आणि मी याबद्दल सांगितलंय. वास्तविक हे गाणं त्या चित्रपटात "दोन मीं"चं नाहीये. पण एकूणच असे "दोन मी" आपल्यात असतात. कधी ते दुसऱ्यात दिसतात तर कधी आपल्यातच.

ही "दोन मी"ची संकल्पना असलेल्या मराठीतल्या सुंदर कविता आहेत. पहिल्यांदा माझ्या पिढीतील संदीपची कविता -
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मला खूपदा माझा मित्र, संदीप सरदेसाई, हा दुसऱ्या मी सारखा वाटायचा. म्हणून एकदा त्याला ही कविता ऐकवली. त्यावर त्याचं म्हणणं असं की, हा कट्ट्यावर बसलेला अगदी तुझ्यासारखा आहे आणि हजार चिंतांनी डोके खाजवणारा माझ्यासारखा :-). आता हे grass is always greener at other side सारखं असू शकतं. पण खरंच हे दोन्ही मी आपल्यातच असतात. त्यातील कुणाला आपण जास्त वाव देतो, ते आपल्या हातात असतं.

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

कुसुमाग्रजांनी तर हा दुसरा मी भेटायला आलेला दाखवला. त्याच्याशी गप्पा, भांडण, जुन्या आठवणी असं सगळं बोलून झालं. मग तो गेला... पण जो गेला तो कोण "मूळचा मी" की "भेटायला आलेला मी" यावर प्रश्नचिन्ह टाकून ठेवलं. वास्तविक दोघेही पुन्हा आपल्यातच आहेत, या दोघांचा संवाद व्हावा आणि त्यातून त्या-त्या वेळी आवश्यक तो "मी" समोर असावा...

बसलो असता निवांत रात्री
टक टक झाली दारावरती
दार उघडता आत सरकली
कोणी एक व्यक्ती

बारीकतेने बघता कळले
हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती
घाबरलो मी,चाचरलो मी
पुसले तयाला ,कोण कशाला

स्मित संभावित करुनी म्हणे तो,
पिशाच्च मी तव
गत काळाच्या थडग्या मधला
निवास कोंदट असह्य झाला
म्हणुनी आलो

पिशाच्च पण ते माझे होते
आपुलकीने स्वागत केले
गप्पा झाल्या,दूर पणाचे अंतर सरले
आठवणींचे पर्व साधता काळीज कढले

वाद बखेडे कधी पेटता,क्रुद्ध शार्दुलासम गुरगुरलो
प्रेम,द्वेष ,हास्यात रंगता स्वरही चढले

अखेर होता पहाट,गेला एक आमुच्यातला निघुनी

गेला कोण अन कोण राहिला
हे मज जन्म भराचे कोडे पडले...!

आरती प्रभू यांची "दोन मी" कविता. यातील दुसरा मी हा अग्निज्वाळेसारखा नग्न आहे कारण त्याचेच कपडे विकून मी माझा चरितार्थ चालवतोय... स्वत्व विकून त्यावर गुजराण करणारे अनेक "मी" यात दिसत राहतात...
दोन मी
तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो
तरिही मी कां चालतो ? तो बोलतो ना थांबतो.
वाकल्याला अन् मला पाहुनीयां मोडतो,
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखितो.
अग्निजाळेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन् अजुन आहे ती खरी.
कोणते पोषाख त्याचे चोरिले मी भर्जरी,
विकित बसलो येथ हाटीं, आणि खातो भाकरी.
तो उपाशी तरिहि पोटीं लाज माझी राखतो,
राख होतांनाहि ओठीं गीतगाणी ठेवितो.
मैफ़लीला तो नि मी दोघेही जातो धावुनी;
ऐकितो मी सूर, तो अन् दूरचे घंटाध्वनी.
तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो.

आरतीप्रभूंची आणखी एक याच विषयावरची कविता आहे -
कधी तो कधी मी 
कधी माझी कधी त्याचीही सावुली
रेंगाळे माझिया चोरट्या पावुली
कधी त्याच्या पायीं उमाटे माझा ठसा
कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा
चारी डोळ्यातून दोघेही जगतो
दारीं तोही कधी पणत लावतो
ऊन मीठपाणी काळजाच्या मागे
भिजे माझा पीळ; त्याचे धागे धागे
वाळू घातलेले माझे पांघरून
कैसे ओढू? त्याचे मावळेल ऊन
एकाच घनाच्या दोन आम्ही सरी
प्राणावर एक, दुजी अंगावरी
गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यांतले राखितो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू उडू पाहे

इंदिरा संतांची "कात" ही अजून एक. चैतन्य दीक्षितच्या निरुपणासह -
आपल्या प्रत्येकात स्वतःचीच दोन रूपं असतात. कधी हे द्वंद्व अगदी असून नसल्यासारखे कोपऱ्यात बसलेले असते तर कधी ते अगदी प्रखरपणे पुढे येते. त्या दोन रूपांतला खरा मी कोण? याचा थांग लागणे स्वतःलाच अशक्य होऊन जाते. त्रयस्थ नजरेने पाहता, हा म्हणजे आपल्याच दोन्ही रूपांत जणू अटीतटीचा सामना असल्यासारखा! आपलं एक रूप सोशिक, इतरांना कमीत कमी दुखावणारं (त्यासाठीच सोशिक, स्वतः कष्ट सहन करणारं) तर दुसरं रूप स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण करणारं आणि म्हणूनच कणभरही अन्याय्य गोष्ट सहन न करणारं. या दोन रूपांतला हा सामना मात्र आपल्याला एका नव्याच 'मी' कडे नेत असतो. हीच आपली वाढ!
सोशिकपणा जात्याच काकणभर अधिक असलेल्या स्त्रियांच्याबाबतीत हे द्वंद्व कसे असेल? याचं चित्र इंदिराबाई 'कात' या कवितेत उभं करतात.
कात
येथे मी स्तब्ध अशी
स्तब्ध तशी तेथे मी ।
स्वच्छ उभी काच मधें
दाखविते मजला 'मी' !
नजरेला नजर तिच्या
भिडवाया मी न धजे
कंपित निःश्वास तिचा
काचेवर गूढ़ थिजे ।
विलगावे ओठ ज़रा
बोलावे काही तर
गिळलेल्या शब्दांची
लिपी तिच्या ओठांवर ।
स्वतःचं सोशिक रूप इतकं आंगवळणी पडलेलं असतं की त्यातून आपल्याला कुणी बाहेर काढू पाहत असेल तर तीच व्यक्ती आपल्याला दुष्ट वाटू लागते. आपल्याला त्या कोशातून बाहेर यायचंच नसतं.
"दुष्ट, अशी मजपुढती
मुळिच उभी राहु नको;
निजलेली मी कधीच:
जाग मला आणु नको.
स्वप्नांच्या भस्माचा
थर अगदी ढळवु नको."
"काय असे वेडेपण?
मी न दुजी, तूहि मीच."
----पण समोर धुकट धूर
आणि चूर चूर काच ।
स्तब्ध अशी येथे मी
नाही कुणि पण समोर
सोलिव ही कात इथे
नागिण अदृश्य दूर...

शिवाय पाडगांवकरांची "जिप्सी" काही अंशी मला अशीच "दोन मीं"ची कविता वाटते.

या दोन्ही "मीं"चा वाद-संवाद होत राहिला पाहिजे. तुकोबा म्हणतात तसा
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाची वाद आपणासी...
आणि अखेरीस आपल्यातला रसिक, सृजनशील, तरल मी हा सहज आपल्याला गवसला पाहिजे...

Tuesday, March 20, 2018

रंग दे बसंती

उडत्या चाली त्या गाण्याला योग्य असल्या तरी काही वेळा अर्थ झाकून टाकतात. पण कधीतरी तो गीतकार त्या गाण्याबद्दल, त्या गाण्याच्या जन्माबद्दल बोलतो आणि ते गाणं पुन्हा ऐकलं की शब्दरचना संगीतापेक्षा जास्त आवडायला लागते. असंच एक गाणं “रंग दे बसंती” चित्रपटाचं शीर्षक गीत.
राकेश मेहरा प्रसून जोशीकडे रंग दे बसंतीचे शीर्षक गीत मागण्यासाठी आला. प्रसून जोशीने काही दिवस घेतले आणि राकेश मेहराला फोन केला. त्यात सांगितले की मी देशप्रेमाची रेसिपी लिहिणार आहे, चालेल का? राकेशचा प्रसूनवर विश्वास होता. आणि सुरू झाला एका सुंदर गाण्याच्या निर्मितीचा प्रवास. त्या शब्दांना अस्सल पंजाबी मातीची चाल संगीताच्या जादूगाराने लावली... ए आर रेहमान. त्यावर चित्रा आणि होम पीच वर खेळत असलेल्या दलेर मेहंदीने कहर केला आणि अप्रतिम गाणं बनलं!!!
या देशाची थोडी धूळ माती, थोडा सुगंधित, मुक्त, मनस्वी - मोकाट वारा, तो श्वास आणि ज्यात जुनून (प्रेमासाठी हौतात्म्य पत्करायला तयार) आहे असं रक्त. हे सगळं एकत्र कर. यातून जो रंग प्रकट होईल त्या बसंती रंगाने मला रंगवून टाक!
थोडीसी धूल मेरी धरती की मेरे वतन की
थोडीसी खुशबु बौराई से मस्त पवन की
थोडीसी ढूंढने वाली धक् धक् धक् धक् धक् धक् साँसें
जिन में हो जूनून जूनून वो बूंदे लाल लहू की
यह सब तू मिला मिला ले फिर रंग तू खिला खिला ले
और मोहे तू रंग दे बसंती यारा मोहे तू रंग दे बसंती
या रंगाने माझी स्वप्ने, माझा आनंद, माझी शेते आणि माझ्या सगळ्या पिढ्या, माझी गाणी आणि मनाचा ठाव रंगव.
सपनें रंग दे अपने रंग दे खुशियाँ रंग दे गम भी रंग दे
नस्लें रंग दे फ़सलें रंग दे रंग दे धड़कन रंग दे सरगम
और मोहे तू रंग दे बसंती यारा मोहे तू रंग दे बसंती
आता पुन्हा रेसिपी...
मध्यम आचेवर थोडं प्रेम ठेव, त्यात थोडे ओढे, नद्या, समुद्र घे आणि हे सगळं एका घड्यात एकत्र करून हलव. ('गागर में सागर' अशी म्हण सुद्धा इथे वापरली आहे, साठा उत्तराची कहाणी सारखी. हे सगळं प्रचंड आहे पण ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय.) त्यातून एक बसंती रंग तयार होईल, त्याने मला रंगवून टाक!
धीमी आंच पे तू ज़रा इश्क़ चढ़ा
थोड़े झरने ला थोड़ी नदी मिला थोड़े सागर ला थोड़ी गागर ला
थोड़ा छिडक छिड़क थोड़ा हिला हिला फिर एक रंग तू खिला खिला
मोहे मोहे तू रंग दे बसंती यारा
या रंगाने माझं गाव, माझी वस्ती, माझी ओळख – माझं स्वत्व, माझ्या शरीराची एकून एक नस, माझं बालपण – तारुण्य सगळं सगळं रंगवून टाक. आज आत्ता ताबडतोप रंगव... आता उशीर नको.
बस्ती रंग दे हस्ति रंग दे हंस हंस रंग दे नस नस रंग दे
बचपन रंग दे जोबन रंग दे अब देर न कर सचमुच रंग दे
रंग रेज़ मेरे सब कुछ रंग दे मोहे मोहे तू रंग दे बसंती यारा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दि. २६ जानेवारी २०१८