Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Wednesday, July 27, 2022

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

जाणाऱ्यांचा वाटा साऱ्या मोजताना दिसं सारा
रिती अशी मातोश्री उते
अदू कसा हसू हसू राऊताला कसे पिसू
खोल खोल मी आता रुते
तरी नाही अळिमिळी
तुझीमाझी निष्ठा काळी
कुंथताना दुखावून रडशील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कुणी नाही भवनातून सगळीकडे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा
अजून काही जातीलच आणि "पुन्हा येईन"च
तिकडून नाथा आणि देवा
वाझियाचे कोटी शत
थैल्यांचे लाखो थाट
रोज रोज आठवत राहतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

इथे वांद्र्याशी माझ्या वेड्या राऊताच्या पाशी
रोजरोज गप्पा झाडा
माझं माझं माझ्या माझ्या माझी माझी माझे माझे
सारा सारा माझा-माझा राडा
पडे माझ्या वाटेतून
आणि मग फुलांतून
जातानाही पायभर चिख्खल ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

आता फक्त बोलायाचे टोमणेच मारायाचे
धरूनिया माईकाचा दांडू
सामन्यात येऊ देत बाकी कॉपी करतात
राऊताच्या ष्टायलीत भांडू
जरा कोर्ट खुलू दे ना
धनुष्यही जाऊ दे ना
मग सेना बंद करून झोपूया ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

कसे सरतील उठा खुर्चीविना दिसं तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
कमळाची फुले दोन रोज राती अंगावर
टुचू टुचू तुला सांग टोचतील ना टोचतील ना

Friday, April 29, 2022

फडणवीसांची पुरणपोळी

त्याने पोळ्या खाल्ल्या किंवा तिने पोळ्या केल्या
खाऊ दे की !
मला सांगा त्यात तुमच्या कॅलऱ्या का जळाल्या ?

तो तिला एकदा पोळ्या कर म्हणाला
एक एक करता करता पस्तीस पोळ्या खाल्ल्या
मॉडेलिंग करून नंतर मुख्यमंत्रीही झाला
खाल्ल्या तर खाऊ दे की, झाला तर होऊ दे की
तुमच्या पोटाला इंगळ्या काऊन डसल्या ?

त्याने पोळ्या खाल्ल्या किंवा तिने पोळ्या केल्या
खाऊ दे की !
मला सांगा त्यात तुमच्या कॅलऱ्या का जळाल्या ?

एकदा तिच्या घरची कामवाली नाही आली
हा मुख्यमंत्री होता तरी
त्याला सैपाक कर म्हणाली
डोशाचं पीठ तयार होतं
म्हणून त्याचं फावलं
मस्त गरम तव्यावर
त्याने डोशाला भाजलं
भाजलं तर भाजू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्याकडे कधी पुरुषाने पोळ्या नाय का भाजल्या ?

त्याने पोळ्या खाल्ल्या किंवा तिने पोळ्या केल्या
खाऊ दे की !
मला सांगा त्यात तुमच्या कॅलऱ्या का जळाल्या ?

घराबाहेरही चालतात गप्पा
त्या टीव्हीवर येणारच
तशी सेलेब्रिटी आहे ती
ती थोडीच बसणार घरातच
टिपिकल मामी नसल्याचे परिणाम हे होणारच
कुणीतरी गॉसिप कुणीतरी ट्रोल करणारच
ती गायली तर गाऊ दे की, टीव्हीवर आली तर येऊ दे की
तुम्हाला गाण्याच्या सीड्या बळजबरीने नाही ना ऐकवल्या

त्याने पोळ्या खाल्ल्या किंवा तिने पोळ्या केल्या
खाऊ दे की !
मला सांगा त्यात तुमच्या कॅलऱ्या का जळाल्या ?

सच्च्या शिवसैनिकाचं भांडण असं, चाले त्याच्याच मनात

मित्र प्रशांत आवले ने दोन ओळी दिल्या आणि विडंबन पाडायला सांगितलं. 
दर वर्षी दसरा येतो, दर वर्षी असं होतं
मेळाव्यात काढलेल्या ओकाऱ्यांनी, एका माणसाचं हसं होतं

या मूळ कवितेत "तो" आणि "ती" आहेत. पण मला यात एक मूळ सच्चा शिवसैनिक आणि सध्या "कदाचित" त्याच्या मनात चालू असलेलं द्वंद्व घ्यावं वाटलं. बाळासाहेबांच्या अनेक भूमिकांबद्दल कितीही वाद असले तरी जेव्हा शिवसेना ८०% समाजकारण आणि २०% राजकारण "म्हणत" होती, तेव्हा स्थानिक शिवसेना शाखा ही त्या वस्तीतल्या लोकांना हक्काचं व्यासपीठ असायची. अनेक स्थानिक प्रश्न तिथे चुटकीसरशी सुटायचे. त्यांच्या ऍम्ब्युलन्स असायच्या, रक्तदान शिबिरं व्हायची... आणि बरंच काही. हा शिवसैनिक जेव्हा आज दसरा मेळाव्याला जातो आणि भाषण ऐकतो तेव्हा त्याला काय वाटत असावं हे या विडंबनात बसवण्याचा प्रयत्न केला आहे. हसा, टिंगल करा, मजा करा... कारण विडंबनं मला होतात, कविता वगैरे होत नाहीत 😜😜😜

त्याला मेळावा आवडतो, पण भाषण आवडत नाही 
भाषण ऐकवल्याशिवाय, साहेब त्याला सोडत नाही 

मेळावा त्याला आवडतो, पण भाषण आवडत नाही 
असलं त्याचं गणित, साहेबाला कळत नाही

भाषण म्हणजे टाईमपास नुसता, भाषण म्हणजे कोथळा 
मेळावा म्हणजे संघटन, शिवसैनिकांचा मेळा 

भाषण कान किट्ट करतं, भाषण रिमेकचं गाणं  
मेळावा उत्साही मनं, मेळावा विचारांचं सोनं 

भाषण नुसतीच तोंडाची वाफ, काम नाहीच मुळी 
मेळावा तयार करत असतो, कार्यकर्त्यांची फळी  

दर वर्षी दसरा येतो, दर वर्षी असं होतं
दर वर्षी दसरा येतो, दर वर्षी असं होतं
मेळाव्यात काढलेल्या ओकाऱ्यांनी , एका माणसाचं हसं होतं

भाषण आवडत नसलं तरी, मेळावा त्याला आवडतो 
भाषण आवडत नसलं तरी, मेळावा त्याला आवडतो 
मेळावाही आवडू नये, म्हणून साहेब झगडतो 

बाळासाहेबांच्या स्मृती घेऊन, तो जातो मेळाव्यात 
सच्च्या शिवसैनिकाचं भांडण असं, चाले त्याच्याच मनात 

भार व्हा (गारवा विडंबन)

कुणाचीही माफी बिफी न मागता विडंबन सादर आहे

वजन जरा जास्त आहे
दर वेळी वाटतं
भर झोपेत ट्रॅकसूट घालून स्वप्न मनात दाटतं
स्वप्नात मन चालत राहतं
स्वप्नात मन चालत राहतं
पावलं चालत नाहीत
मनाने व्यायाम केल्याने शरीराला काहीच होत नाही

तितक्यात कुठूनसा दरवळ नाकाजवळ येतो
तितक्यात कुठूनसा दरवळ नाकाजवळ येतो
निश्चयाच्या खिडकीला थोडंसं उघडतो
मी विशीतल्या मुलासारखा पिझ्झा पास्ता खातो
फरसाण लाडू चिवडा सगळंच फस्त करतो

दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ
लंच मागून चालत येते डिनरची मस्त वेळ
चक्क डोळ्यांसमोर हँगरचा सिलेंडर होतो
अनोळखी पोट्ट्यांचा मी कुठून काका होतो
(किंवा - 
चक्क डोळ्यांसमोर बाटलीची बरणी होते
अनोळखी पोरांची मी कुठून आंटी होते)

Thursday, July 30, 2020

वेगळाच "दोन मी"

सामान्यपणे "दोन मी" असलेल्या कवितांमध्ये "पहिला मी" म्हणजे आपण नेहमीचे, नोकरी-धंदा करणारे, "रोजमर्राह की जिंदगी जिने वाले" वगैरे असतो. आणि "दुसरा मी" सामान्यपणे चिंता न करणारा, आहे तो क्षण जगणारा, वाईटातून चांगलं शोधणारा/घडवणारा वगैरे असतो. पण कधीतरी हा "दुसरा मी" फार वाईट असू शकतो. जो आपल्यात असतो, पण आपण त्याला प्रयत्नपूर्वक दूर ठेवलेलं असतं. माझा एक मित्र त्याला दारू ऑफर केली की नाकारताना एकच गोष्ट सांगतो, "मी सुरू केली, तर थांबायचं भान राहणार नाही, म्हणून मी दारू पीत नाही." हे जसं आहे तसंच हा "दुसरा मी" सगळ्या षड्रिपूंना अगदी जवळ बाळगून असतो. जरा जागा मिळाली की वर येतो. आपण कुठे थांबायचं याचा विवेक काढून घेतो.

संदीपच्या एका कवितेतला हा वाईट्ट "दुसरा मी" काहीसा असा आहे - हा मनाच्या कोपऱ्यात लांब दूर कुठेतरी असतो. पण तिथूनही तो एकप्रकारे दबा धरून बसलेला असतो. नेहमी हा कधी बाहेर दिसत नाही. कुठेतरी अंतरंगात लपून असतो. त्याला "पहिला मी" कधी हटकायला जात नाही. पण अचानकच एखाद्या अनामिक वेळी याची सावली आपल्यावर पडू शकते. ती सावली जर पडली तर आपलंच एक विकृत मन समोर येतं. त्याला साध्या सुंदर गोष्टी विकृत वाटू लागतात. त्याची हाव सुटते. अशा वेळी जर "दुसऱ्या मी"ला उठू दिलं, तर या विकृतींची एक चटकच लागते. ही जर चटक लागली तर जी पंचेंद्रिये आपल्याला आनंद देतात, एक नवी अनुभूती देतात, ज्याद्वारे आपण एक प्रकारे तरल होऊन विहार करू शकतो त्याऐवजी केवळ सुरू होतं ओरबाडणं. आस्वाद घेणं बंद करतो आणि विचार, कृती मधून फक्त ओरबाडतच राहतो, शोषण करतो. याची सुरुवात फार सहज होऊ शकते. आपण कधीतरी काहीतरी चुकीचं करतो. ती चूक पकडली जात नाही. त्यातून आपल्याला काहीतरी फायदा मिळतो. मनाला एक प्रकारे आपण हेही करून यश मिळवू शकतो असं वाटतं. मग त्या चुका वाढत जातात. चुका थांबून अपराध सुरू होतात आणि त्यातूनच हा "दुसरा मी" मोठा होत जातो. मुळातला "पहिला मी" नंतर कुणाला दिसत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच चूक केली/झाली तर थांबा. नाहीतर हा शतकानुशतके असलेला "दुसरा मी" तुमचा कधी ताबा घेईल सांगता येणार नाही.

आता संदीपची या "दुसऱ्या मी"ची कविता -

आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून
पडका वाडा बसला आहे दबा धरून
त्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर
दिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर
परंतु तेथे जावयास ना कोणा धीर
कारण आहे पक्के ठाऊक आम्हाला
त्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा

कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी
उच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी
दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ
काठावरती येऊन बसते संध्याकाळ
पाण्यावरती पडता छाया सांजेची
दिवसावर हो काळी जादू रात्रीची
घुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे
विरून जाती रूप धारती घुबडांचे
घुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या
तरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या
भीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला
आळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा

हिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस
नाकाजागी केवळ भोके अठ्ठावीस
उडता येते परी आवडे सरपटणे
गाळ चोपडे अंगाला जैसे उटणे
उठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक
पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप
अन्य न काही चाले या बुंबुंबाला
भूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला
जे जे दिसते त्याची चटणी जोडीला
खा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा

खोडी काढी खोटे जर बोले कोणी
आणेल कोणी आईच्या डोळा पाणी
चोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी
बुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी
जवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे
त्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे
बुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा
खापरखापरपणजोबांहून पूर्वीचा
तयास न भितो असा जगातून कोण भला
बुंबुंबाही घाबरतो बुंबुंबाला
करण्याआधी वाईट काही रे थांबा
दिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा

गम्मत वाटली ना!

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात सलीलने शुभंकर सोबत काही युट्युब व्हिडीओ केले होते. त्यात अग्गोबाई... चे काही एपिसोड होते. या छान गप्पांमध्ये सलीलने आणि संदीपने खूप गमतीदार गोष्टी सांगितल्या. शेवटच्या कडव्यात "दिसेल अथवा आरशातूनी" मुळे बुंबुंबा हे आपलंच रूप आहे हे जाणवलं होतं, पण आख्खी कविताच "दोन मी"ची आहे हे संदीपने एका एपिसोडमध्ये सांगितलं. वर म्हणाला की आता पुन्हा नीट ऐका... अमोहामुळे अग्गोबाई... घरात सुरूच असतं. मग संदीपने सांगितल्याप्रमाणे पुन्हा या दृष्टिकोनातून (श्रुतिकोनातून) ऐकलं. ही "दोन मी"ची वेगळीच संकल्पना जाणवली. तुम्हीही ऐकून बघा...

Wednesday, March 4, 2020

दोन मी

थ्री इडियट्स मधलं "बहती हवा सा था वो" गाणं आठवतंय?
हम को तो राहें थी चलती
वो खुद अपनी राह बनता,
गिरता संभालता
मस्ती में चलता था वो
हमको कल की फिकर सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हें को खुल के जीता था वो
स्वानंद किरकिरेने सहज शब्दात तो आणि मी याबद्दल सांगितलंय. वास्तविक हे गाणं त्या चित्रपटात "दोन मीं"चं नाहीये. पण एकूणच असे "दोन मी" आपल्यात असतात. कधी ते दुसऱ्यात दिसतात तर कधी आपल्यातच.

ही "दोन मी"ची संकल्पना असलेल्या मराठीतल्या सुंदर कविता आहेत. पहिल्यांदा माझ्या पिढीतील संदीपची कविता -
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मला खूपदा माझा मित्र, संदीप सरदेसाई, हा दुसऱ्या मी सारखा वाटायचा. म्हणून एकदा त्याला ही कविता ऐकवली. त्यावर त्याचं म्हणणं असं की, हा कट्ट्यावर बसलेला अगदी तुझ्यासारखा आहे आणि हजार चिंतांनी डोके खाजवणारा माझ्यासारखा :-). आता हे grass is always greener at other side सारखं असू शकतं. पण खरंच हे दोन्ही मी आपल्यातच असतात. त्यातील कुणाला आपण जास्त वाव देतो, ते आपल्या हातात असतं.

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

कुसुमाग्रजांनी तर हा दुसरा मी भेटायला आलेला दाखवला. त्याच्याशी गप्पा, भांडण, जुन्या आठवणी असं सगळं बोलून झालं. मग तो गेला... पण जो गेला तो कोण "मूळचा मी" की "भेटायला आलेला मी" यावर प्रश्नचिन्ह टाकून ठेवलं. वास्तविक दोघेही पुन्हा आपल्यातच आहेत, या दोघांचा संवाद व्हावा आणि त्यातून त्या-त्या वेळी आवश्यक तो "मी" समोर असावा...

बसलो असता निवांत रात्री
टक टक झाली दारावरती
दार उघडता आत सरकली
कोणी एक व्यक्ती

बारीकतेने बघता कळले
हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती
घाबरलो मी,चाचरलो मी
पुसले तयाला ,कोण कशाला

स्मित संभावित करुनी म्हणे तो,
पिशाच्च मी तव
गत काळाच्या थडग्या मधला
निवास कोंदट असह्य झाला
म्हणुनी आलो

पिशाच्च पण ते माझे होते
आपुलकीने स्वागत केले
गप्पा झाल्या,दूर पणाचे अंतर सरले
आठवणींचे पर्व साधता काळीज कढले

वाद बखेडे कधी पेटता,क्रुद्ध शार्दुलासम गुरगुरलो
प्रेम,द्वेष ,हास्यात रंगता स्वरही चढले

अखेर होता पहाट,गेला एक आमुच्यातला निघुनी

गेला कोण अन कोण राहिला
हे मज जन्म भराचे कोडे पडले...!

आरती प्रभू यांची "दोन मी" कविता. यातील दुसरा मी हा अग्निज्वाळेसारखा नग्न आहे कारण त्याचेच कपडे विकून मी माझा चरितार्थ चालवतोय... स्वत्व विकून त्यावर गुजराण करणारे अनेक "मी" यात दिसत राहतात...
दोन मी
तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो
तरिही मी कां चालतो ? तो बोलतो ना थांबतो.
वाकल्याला अन् मला पाहुनीयां मोडतो,
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखितो.
अग्निजाळेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन् अजुन आहे ती खरी.
कोणते पोषाख त्याचे चोरिले मी भर्जरी,
विकित बसलो येथ हाटीं, आणि खातो भाकरी.
तो उपाशी तरिहि पोटीं लाज माझी राखतो,
राख होतांनाहि ओठीं गीतगाणी ठेवितो.
मैफ़लीला तो नि मी दोघेही जातो धावुनी;
ऐकितो मी सूर, तो अन् दूरचे घंटाध्वनी.
तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो.

आरतीप्रभूंची आणखी एक याच विषयावरची कविता आहे -
कधी तो कधी मी 
कधी माझी कधी त्याचीही सावुली
रेंगाळे माझिया चोरट्या पावुली
कधी त्याच्या पायीं उमाटे माझा ठसा
कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा
चारी डोळ्यातून दोघेही जगतो
दारीं तोही कधी पणत लावतो
ऊन मीठपाणी काळजाच्या मागे
भिजे माझा पीळ; त्याचे धागे धागे
वाळू घातलेले माझे पांघरून
कैसे ओढू? त्याचे मावळेल ऊन
एकाच घनाच्या दोन आम्ही सरी
प्राणावर एक, दुजी अंगावरी
गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यांतले राखितो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू उडू पाहे

इंदिरा संतांची "कात" ही अजून एक. चैतन्य दीक्षितच्या निरुपणासह -
आपल्या प्रत्येकात स्वतःचीच दोन रूपं असतात. कधी हे द्वंद्व अगदी असून नसल्यासारखे कोपऱ्यात बसलेले असते तर कधी ते अगदी प्रखरपणे पुढे येते. त्या दोन रूपांतला खरा मी कोण? याचा थांग लागणे स्वतःलाच अशक्य होऊन जाते. त्रयस्थ नजरेने पाहता, हा म्हणजे आपल्याच दोन्ही रूपांत जणू अटीतटीचा सामना असल्यासारखा! आपलं एक रूप सोशिक, इतरांना कमीत कमी दुखावणारं (त्यासाठीच सोशिक, स्वतः कष्ट सहन करणारं) तर दुसरं रूप स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण करणारं आणि म्हणूनच कणभरही अन्याय्य गोष्ट सहन न करणारं. या दोन रूपांतला हा सामना मात्र आपल्याला एका नव्याच 'मी' कडे नेत असतो. हीच आपली वाढ!
सोशिकपणा जात्याच काकणभर अधिक असलेल्या स्त्रियांच्याबाबतीत हे द्वंद्व कसे असेल? याचं चित्र इंदिराबाई 'कात' या कवितेत उभं करतात.
कात
येथे मी स्तब्ध अशी
स्तब्ध तशी तेथे मी ।
स्वच्छ उभी काच मधें
दाखविते मजला 'मी' !
नजरेला नजर तिच्या
भिडवाया मी न धजे
कंपित निःश्वास तिचा
काचेवर गूढ़ थिजे ।
विलगावे ओठ ज़रा
बोलावे काही तर
गिळलेल्या शब्दांची
लिपी तिच्या ओठांवर ।
स्वतःचं सोशिक रूप इतकं आंगवळणी पडलेलं असतं की त्यातून आपल्याला कुणी बाहेर काढू पाहत असेल तर तीच व्यक्ती आपल्याला दुष्ट वाटू लागते. आपल्याला त्या कोशातून बाहेर यायचंच नसतं.
"दुष्ट, अशी मजपुढती
मुळिच उभी राहु नको;
निजलेली मी कधीच:
जाग मला आणु नको.
स्वप्नांच्या भस्माचा
थर अगदी ढळवु नको."
"काय असे वेडेपण?
मी न दुजी, तूहि मीच."
----पण समोर धुकट धूर
आणि चूर चूर काच ।
स्तब्ध अशी येथे मी
नाही कुणि पण समोर
सोलिव ही कात इथे
नागिण अदृश्य दूर...

शिवाय पाडगांवकरांची "जिप्सी" काही अंशी मला अशीच "दोन मीं"ची कविता वाटते.

या दोन्ही "मीं"चा वाद-संवाद होत राहिला पाहिजे. तुकोबा म्हणतात तसा
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाची वाद आपणासी...
आणि अखेरीस आपल्यातला रसिक, सृजनशील, तरल मी हा सहज आपल्याला गवसला पाहिजे...

Saturday, January 4, 2020

हम देखेंगे या कवितेचा भावानुवाद

टीप - CAA चा विरोध करणारे आंदोलक खरे धर्मनिरपेक्ष असतील तर त्यांनी हा भावानुवाद वापरावा, कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. खुलं आव्हान ;-)

फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या हम देखेंगे या कवितेचा भावानुवाद. मूळ कविता शेवटी दिली आहे.

जनहो चला बघाया, निश्चित असे घडाया
विधिलिखित अजेय आहे, हृदयस्थ सत्य जाणूया

दिन तो समीप आहे, त्याचीच ही प्रतीक्षा
शासीत, वंचितांची, संपे आता तितिक्षा

भूमि ही कंप पावे, आमुच्या पदरवाने
पर्वत पहाड होती, येथेच दीनवाणे

विद्युल्लता पडे ही, सत्तेच्या शिरीमुकुटी
असत्य प्रतिकांची, होऊन जाय भुकटी

वंचित असू तरीही, सत्य हे असे सोबती
शासन जाई आता, जन गणाच्याच हाती

उध्वस्त सिंहासने, उध्वस्त होती मुकुटे
सगुण निर्गुणाचा ओंकार ध्वनी प्रकटे

असे अगोचर तरीही, अंतरी राहतो तोच
नट, नाटक नि प्रेक्षक, सारे असतोचि तोच

जन गणात असेल आता, नाद अहम् ब्रह्मास्मि
सामान्य असेल शासक, जो आहे तू अन मी

- ज्ञानेश

मूळ कविता -

हम देखेंगे / फ़ैज़ अहमद फ़ैज़
 फ़ैज़ अहमद फ़ैज़ »
हम देखेंगे
लाज़िम है कि हम भी देखेंगे
वो दिन कि जिसका वादा है
जो लोह-ए-अज़ल[1] में लिखा है
जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां [2]
रुई की तरह उड़ जाएँगे
हम महकूमों[3] के पाँव तले
ये धरती धड़-धड़ धड़केगी
और अहल-ए-हकम[4] के सर ऊपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी
जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से
सब बुत[5] उठवाए जाएँगे
हम अहल-ए-सफ़ा[6], मरदूद-ए-हरम[7]
मसनद पे बिठाए जाएँगे
सब ताज उछाले जाएँगे
सब तख़्त गिराए जाएँगे

बस नाम रहेगा अल्लाह[8] का
जो ग़ायब भी है हाज़िर भी
जो मंज़र[9] भी है नाज़िर[10] भी
उट्ठेगा अन-अल-हक़[11] का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा[12]
जो मैं भी हूँ और तुम भी हो

शब्दार्थ
 विधि के विधान
 घने पहाड़
 रियाया या शासित
 सताधीश
 सत्ताधारियों के प्रतीक पुतले
 साफ़ सुथरे लोग
 धर्मस्थल में प्रवेश से वंचित लोग
 ईश्वर
 दृश्य
 देखने वाला
 मैं ही सत्य हूँ या अहम् ब्रह्मास्मि
 आम जनता

Thursday, September 19, 2019

सूर्यास्त

जेव्हा एखादा सूर्य भर मध्यान्ही
अस्तंगत होतो, पुन्हा न उगवण्यासाठी
तेव्हा त्याच सूर्याचा एखादा ग्रह
अश्रुंचे इंधन करतो,
मनातील आक्रोशाचे रूपांतर आगीत करून
उष्णता-प्रकाश देतो,
सूर्यमालेला विस्कटण्यापासून वाचवण्यासाठी!
त्याचाच पुढे नवा सूर्य होतो...