Showing posts with label निसर्ग. Show all posts
Showing posts with label निसर्ग. Show all posts

Thursday, July 7, 2022

जमिनीखालील अद्भुत नेटवर्क

आम्ही ४ वर्षांपूर्वी आमचं पाहिलं मियावाकी जंगल लावलं. तेव्हा संभाजीनगर मधील सर्वात जुन्या नर्सरीचे तरुण संचालक सागर साकला यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. ते म्हणाले होते की, "झाडांना कळतं!". त्यावर अर्थातच आम्ही विश्वास ठेवला आणि तीनच वर्षात स्वयंपूर्ण असं छोटंसं जंगल तयार झालं. पण झाडांना कळतं कसं? एकमेकांना काय हवं, नको ते समजून कसं घेतात? जंगलातील एखाद्या झाडावर रोग पडला तर तो जंगलभर न पसरता कसा थांबतो? एका झाडाला काय हवं आहे हे त्याच्या शेजाऱ्याला कसं कळतं? त्याच्यातील संवाद कसा चालतो?

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचण्यात आला. जमिनीखालील अद्भुत नेटवर्क! मग त्यावरील अजून काही लेख बघितले. झाडांना एकमेकांची सुखदुःखे कशी कळतात ते उलगडण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. हे आहे झाडांचं www म्हणजे Woodwide Web. हे माती, जमिनीवर पडलेली पाने, झाडाच्या काटक्या आणि मोठ्या प्रमाणातील कार्बन मॉसच्या खाली विकसित होत राहतं. जंगलाच्या वर दिसणाऱ्या मातीच्या थराखाली, झाडांच्या मुळांशी गुंफलेले, विविध बुरशीचे हे एक जाळे आहे. याद्वारे झाडं एकमेकांशी बोलतात. आपल्या अडीअडचणी एकमेकांना सांगतात. 

आपण जेव्हा बुरशी म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त मशरूम दिसतात. पण मशरूम म्हणजे बुरशीचे "फळ" आहे. बुरशीजन्य मायसेलियमचे (Mycelium) एक विशाल नेटवर्क झाडांच्या मुळांशी मातीत असतं. मायसेलियम म्हणजे बुरशीजन्य अतिशय लहान "धागे" असतात जे झाडाच्या मुळांभोवती गुंडाळलेले असतात. हे धागे एकमेकांना जोडलेले असतात. या मायसेलियमने विणलेल्या जाळ्याला "मायकोरायझल (Mycorrhizal) नेटवर्क" म्हणतात. या नेटवर्क मधून कोणत्या झाडाला पाणी, नायट्रोजन, कार्बन आणि इतर खनिजे हवी आहेत ते अन्य झाडांना कळतं आणि ते एकमेकांना मदत करतात. जर्मन वनमाळी (फॉरेस्टर) पीटर वोहलेबेन (Peter Wohlleben) यांनी या विशाल जाळ्याला "वुडवाईड वेब" असे नाव दिले. पीटर वोहलेबेन यांनी आपल्या "The Hidden Life of Trees" पुस्तकात या संशोधनाबद्दल लिहिलेलं आहे. एकूणच झाडांच्या सहजीवनाबद्दल आपल्याला जे काही ज्ञान आहे त्यात ही मोठी क्रांती आहे. झाडं सजीव असतात ही अशीच एक क्रांती जगदीश चंद्र बसूंनी केली होती. त्याच क्रांतीची ही बहुदा पुढची पावलं आहेत. वोहलेबेन यांनी झाडे आपल्याला वाटतात त्याहून कितीतरी अधिक सतर्क, सामाजिक, अत्याधुनिक आणि अतिशय हुशार असतात हे दाखवून दिलं आहे. लवकरच पुस्तक वाचेन तेव्हा कदाचित अजून माहिती लिहू शकेन.

निरोगी जंगलांमध्ये, प्रत्येक झाड या नेटवर्कद्वारे इतरांशी जोडलेले असते, ज्यामुळे झाडांना पाणी आणि पोषक तत्वे वाटून घेता येतात. विशेषतः सावलीच्या भागात वाढणाऱ्या रोपांपर्यंत प्रकाश संश्लेषण करण्यासाठी थेट सूर्यप्रकाश पोहोचत नाही. पण महाजन सर सांगतात त्याप्रमाणे हे "सूर्यप्रकाश संश्लेषण" नसून, "प्रकाश संश्लेषण" आहे. तरीही जर प्रकाश कमी पडला तर जगण्यासाठी, रोपटे मायकोरायझल नेटवर्कद्वारे आपली गरज उंच झाडांना सांगतात आणि उंच झाडांनी पाठवलेल्या पोषक द्रव्यांवर अवलंबून असतात. याशिवाय झाडे त्यांच्या नातेवाईकांची, म्हणजे आपल्या प्रजातीची, मुळं ओळखतात आणि बुरशीजन्य नेटवर्कद्वारे कार्बन आणि पोषक द्रव्ये पाठवताना ती आपल्या नातेवाईकांना जास्त अनुकूल कशी राहतील हेही बघतात.

अर्थात यात बुरशीचाही फायदा असतोच. या संदेशांचा देवाणघेवाणीत बुरशी पोषक द्रव्यातील ३०% कर्ब (साखर) स्वतः ठेवून घेते. फॉस्फरस आणि इतर खनिज पोषक द्रव्ये मायसेलियममध्ये जमा होतात, जी नंतर झाडांकडे सुपूर्द केली जातात आणि वापरली जातात. या नेटवर्कमध्ये अर्थातच जुनी-जाणती वृक्ष मंडळी जास्त मदत करतात. यांना mother-tree, मातृवृक्ष म्हटले जाते. अगदी आई बाळांना दूध पाजते, सांभाळते तशी ही मोठी झाडं रोपट्यांची काळजी घेतात. या अनुभवी झाडांची मुळं मातीत अतिशय खोल जातात. तेथील पाण्याचे स्रोत शोधतात आणि ते पाणी वर घेऊन येतात. त्यातीलच काही पाणी पोषकद्रव्यांसह जमिनीच्या वरच्या भागात पाठवतात. उंबराच्या मुळांतून पाणी येतं हे आपल्याला माहित आहेच. ते औषधी असतं. पण ते येतं कारण उंबरासारख्या भरपूर आयुष्य असलेल्या झाडाला अन्य झाडांना मदत करायची असते. झाडांच्या या मायकोरायझल नेटवर्कद्वारे, ही झाडे त्यांच्या शेजाऱ्यांना आजार झाला असेल तर ते संकेतांद्वारे ओळखतात आणि त्यांना औषधेही पाठवतात. आपण कधी पूर्ण तोडलेला वृक्ष बघतो. त्याचा बुंधाच उरलेला असतो. त्यावर प्रकाशसंश्लेषण करणारी पानं नसतात. पण तरीही तो जिवंत असतो, कारण त्या भागातील अन्य झाडं त्याला पोषक द्रव्य पुरवत राहतात. मग मधूनच त्याच्या वठलेल्या बुंध्यावर एक नाजूक गाठ येते आणि नवीन फांदी तयार होते. 

बऱ्याचदा ही झाडं एकमेकांवर खूप अवलंबून असतात. जर दोन झाडं एकमेकांसोबत वाढलेली असतील तर प्रकाश, पोषक द्रव्य हे एकमेकांचा विचार करत वाटून घेतात. त्यात जर दोघांपैकी एक झाड गेलं, तर बहुतेक वेळा दुसरं झाडसुद्धा काही काळात मरण पावतं असं निरीक्षण वोहलेबेन यांनी केलं आहे. डार्विनच्या काळापासून, आपल्याला असंच सांगितलं गेलंय की प्रत्येक सजीव प्रजातीमध्ये आणि म्हणूनच झाडांमध्येही स्पर्धा असते. झाडं पाणी, पोषक द्रव्य आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणारे असतात. मग त्यात जे जिंकतात ते उंच होत जातात. हरलेले बिचारे सावलीत जातात आणि मरतात. आता त्या कल्पनेचे खंडन करणारे वैज्ञानिक पुरावे समोर येत आहेत. यातून हेच दिसून येतं की समान प्रजातींची झाडे तर एकमेकांना मदत करतातच शिवाय बहुतेकदा इतर प्रजातींच्या झाडांशी युती करतात. जंगलातील झाडं सहकार्य करत, परस्परावलंबी नातेसंबंधात राहण्यासाठी विकसित झाली आहेत. कीटकांच्या वसाहतीप्रमाणे एकत्रित बुद्धिमत्ता राखून आहेत. उंचच उंच झाडांच्या शेंड्याकडे आपली नजर खेचली जाते, पण खरं काम सुरु आहे ते जमिनीखाली, आपल्या पायाच्या काही इंच खाली.

झाडे पोषक द्रव्य वाटून घेतात. इतर प्रजातींच्या झाडांशी युती करतात. मग डार्विनचा नियम त्यांनी स्पर्धा करावी असे सुचवत नाही का? खरं तर त्या नियमाप्रमाणे, झाडांनी सगळी संसाधने स्वतः वा आपल्याच प्रजातींना मिळतील असा प्रयत्न केला पाहिजे. पण ते तसं करत नाहीत. खरंतर म्हणूनच जास्त काळ जगतात, शेजाऱ्यांना मदत करत निरोगी स्थिर जंगल जिवंत ठेवतात. शेजारची झाडं मरत राहिल्यास जंगल उघडं पडतं. वाढलेल्या सूर्यप्रकाशामुळे, उरलेली झाडं अधिक प्रकाशसंश्लेषण करू शकतात आणि वेगात वाढू शकतात. परंतु ते असुरक्षित आणि अल्पायुषी ठरतं. कारण उन्हाळ्यात, अधिक सूर्यप्रकाश जमिनीवर येईल आणि जमीन कोरडी करेल. जमिनीवर थेट सूर्यप्रकाश पडत गेला तर मायकोरायझल नेटवर्क कमकुवत होते. शिवाय वादळवाऱ्यामुळे जंगलाचा विध्वंस होईल. यातील काहीच होऊ नये म्हणून जंगलात झाडं केवळ स्पर्धा करत नाहीत तर सहजीवन जगतात.

रासायनिक आणि हार्मोनल संपर्कयंत्रणेशिवाय झाडं इलेट्रीकल सिग्नल, high frequency चा आवाज सुद्धा काढतात आणि त्याद्वारे संभाषण करतात. अर्थात यावरील संशोधन अजून सुरू आहे. हळूहळू झाडांचं हे संभाषण मानवाला कळेलही... त्याचा वापर माणूस कसा करेल हे मात्र सांगता येणार नाही... :( 

"एका काडातील क्रांती" मध्ये फुकुओका म्हणतात की पाश्चिमात्य संशोधक एका वेळी एक प्रक्रिया घेऊन अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना जे ज्ञान मिळतं ते पृथक असतं. अगदी तेच या संशोधनांमधून पुढे येत आहे. हे संशोधन करणारे संशोधक म्हणतात की या प्रक्रिया एकेकट्या होत नाहीत. जेव्हा ते जंगलात फिरतात, तेव्हा त्यांना संपूर्ण गोष्टीचा एक आत्मा जाणवतो, सर्वकाही एकसंधपणे कार्य करते, परंतु त्यांच्याकडे हे मोजण्याचा कोणताही मार्ग नाही. ते मायकोरायझल नेटवर्क देखील मोजू शकत नाहीत. कारण समृद्ध जंगलातील एक चमचा मातीमध्ये अनेक किलोमीटर लांब बुरशीजन्य तंतू असतात.

झाडांनी त्यांच्यासाठी अतिशय सुंदर, समृद्ध असं सहजीवन विकसित केले आहे. मायकोरायझल नेटवर्क हा या सहजीवनाचा अविभाज्य भाग आहे. बुरशी आपल्या स्वतःच्या हितासाठी तर काम करतेच, ते करत असताना, लहान रोपट्यांपासून ते अगदी मोठ्या झाडांचे आरोग्य आणि जगण्याचीही सोय करते. माणसांमध्ये जशी संपर्कातून एकमेकांच्या गरजा पूर्ण करणारी, आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी काम करणारी यंत्रणा आहे तशीच, किंबहुना त्याहून अधिक सक्षम आणि परोपकारी यंत्रणा जंगलात झाडांनी आणि बुरशीने एकत्र येऊन, मायकोरायझल नेटवर्कने तयार केलेली आहे. ही यंत्रणा पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी महत्वाची आहे त्याद्वारेच जंगल निरोगी राहते. आता तुम्ही पुन्हा जेव्हा जंगलात जाल तेव्हा झाडांमधून फिरत असताना, तुम्ही चालताय त्या जमिनीखालच्या विकसित संपर्क यंत्रणेचा विचार नक्की करा. 

- ज्ञानेश

संदर्भ:
https://www.nationalforests.org/blog/underground-mycorrhizal-network
https://www.smithsonianmag.com/science-nature/the-whispering-trees-180968084/

Friday, April 29, 2022

हिमवर्षा

 फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा हिमवर्षाव नसायचा तर थेट गारपीटच असायची. हिवाळ्यातील तीन चार महिन्यात जर पाऊस असेल तर तो गारांचाच पाऊस. जमीन या गारांचा मार खाऊन थकून जायची...
अशीच एकदा गारपीट झाली. जमीन थकून थिजली. तिला होणाऱ्या त्रासाने गारांनाही वाईट वाटत होतं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. जमिनीला जिथे जिथे लागलं होतं, तिथे तिथे ते अश्रू हळूहळू वाहू लागले. जमिनीला पाण्याचं प्रेम कळत होतं. तिने सावकाश बोलायला सुरुवात केली.

जमीन म्हणाली, "एवढं वाईट वाटतंय, तर का रे? का अशी गारपीट करतोस? तुला दिसतंय ना, कळतंय ना मला त्रास होतोय ते?"

पाण्याने केवळ हुंकार भरला. तशी जमीन पुढे म्हणाली, "अरे आपण जिथे कुठे एकत्र असतो तिथे तिथे सृष्टी फुलते रे. तुझ्या ढगांच्या रूपात माझे डोंगर झाकून जातात आणि अचानक हलक्या वाऱ्याने पुन्हा दिसतात तेव्हा सगळे जण आवाक होऊन बघत राहतात. धुक्याच्या रूपात तू जेव्हा येतोस तेव्हा दुलई पांघरून झोपल्यासारखं वाटतं. माझ्या उंच डोंगरांवरून तू जेव्हा स्वतःला झोकून देतोस त्यातून निर्माण होणारं सौंदर्य बघत लोक कित्येक तास बसून राहतात. नदीची आणि ओढ्याची वळणं तर अनेक कलांना जन्म देतात. समुद्र तर किती रूपं दाखवतो. माझ्या पोटातून तुझ्या वाहण्याचं गूढ अजूनही कुणालाच कळलेलं नाहीये. या सगळ्यातून झाडं, वेली, पशू, पक्षी, जलचर असा केवढा मोठा सुंदर पसारा आहे. हे सगळं असताना ही गरपीट का रे? तुझा एखादा आवेग मी नक्कीच सहन करू शकते, पण सलग तीन चार महिने??? आणि यात तुलाही आनंद नाहीच! काहीतरी कर रे."

जमिनीचं बोलणं ऐकून अखेरीस पाण्यानेही बोलायला सुरुवात केली, "काय करू गं? मीही नियमात बांधलोय ना? गरम झालो की वाफ होऊन ढग व्हायचं. गारवा लागला की पाऊस होऊन बरसायचं. अजून थंड झालो की गोठायचं, गारा व्हायचं आणि पुन्हा बरसायचं. कितीही नाही म्हटलं तरी गुरुत्वाकर्षण हा तुझा नियम मला पाळावाच लागतो. मी तरी काय करू?"

जमीन म्हणाली, "अरे नियम असले तरी अपवाद असतातच. तू पौर्णिमेला मला सोडून चंद्राकडे झेप घ्यायचा प्रयत्न करतोच ना? ते कधीही शक्य नाही हे माहीत असूनही त्यात कधी खंड पडलाय का?"

पाणी म्हणालं, "अगं, तोही नियमच ना!"

जमीन पुढे म्हणाली, "काही वेळा आपल्या प्रेमाच्या लोकांसाठी काही अपवाद करावे लागतात. उष्णतेने वस्तू प्रसरण पावतात आणि थंडीने आकुंचन. पण तरीही कडक उन्हाळ्यात मी आकुंचन पावते. का माहितीये?"

पाणी म्हणालं, "सांग, ऐकतोय"

जमीन पुढे बोलू लागली, "अरे, झाडावर, जंगलात, गुहेत, थोडक्यात निवऱ्यात राहणारे जे प्राणी पक्षी आहेत त्यांना फार काही अडचण नसते. पण मुंग्या, गोगलगायी, साप, सरडे, घोरपडी कुठे जातील. कडक उन्हाळ्यात मी आकुंचन पावते, भेगाळते आणि या सगळ्यांना माझ्या पोटात जागा करून देते. तुझा गूढ प्रवाह असतोच यांना मदत करायला. मग पुन्हा तू येतोस. तेव्हा खरंतर तापमान कमी झालेलं असतं, पण मी प्रसरण पावते. अन्यांच्या अंगाची उन्हाळ्यात लाही लाही होते, पण माझी मात्र पहिल्या पावसात खुदकन लाही फुटते!"

पाणी ऐकत होतं, विचार करत होतं. गारव्यात मोठा ढग होता. विचारांमध्ये त्याचे थेंब जरा लवकरच पूर्ण आकुंचन पावले. अचानकच त्या बारीक थेंबांची लाही फुटली. थेंबाचं गारीत रूपांतर न होता, हिमकणात रूपांतर झालं. अलगद तरंगत हिमकण जमिनीवर पडू लागले. जमीन शहारली. तिने सावकाश ते पांघरूण घ्यायला सुरुवात केली. पाणी आनंदलं, जमीन आनंदली आणि नवीन रूपात दोघांनी सर्वांना पुन्हा भुरळ पाडली!!!

Monday, September 20, 2021

Resilience

 Resilience हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. Flexibility, Plasticity, Elasticity असे त्याचे बरेच अर्थ सांगितले जातात. मराठीत लवचिकता वगैरे याचे अर्थ होतात. पण या पर्यायी शब्दांतून Resilience चा नेमका अर्थ लागत नाही. मला या शब्दाची लागलेली व्याख्या म्हणजे "एखाद्याची कितीही प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा सामान्य होण्याची जी असामान्य क्षमता असते" तिला Resilience म्हणतात.

डेव्हिड ऍटनबरो आजोबांच्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये हा शब्द आला.. आणि साक्षात्कारासारखा कळाला, त्याची ही गोष्ट!

२६ एप्रिल १९८६ ला चेर्नोबिल येथे जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात झाला. चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान भयानक स्फोट झाला आणि अण्विक गळती सुरू झाली. आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये हे प्रदूषण पसरलं. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. याशिवाय किरणोत्सर्गाच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगामुळे चार हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले असावेत.

यानंतर हा पूर्ण परिसर कायमचा प्रदुषित घोषित केला गेला. एकूण साडेतीन लाख नागरिकांचे स्थलांतर केलं गेलं. या सगळ्या घटनेमुळे सुमारे ६८ अब्ज डॉलरचा खर्च झाला. या दुर्घटनेनंतर काही तासांतच तिथून आणि आजूबाजूच्या परिसरातून कर्मचारी, नागरिक यांना सुरक्षित जागेवर हलवलं. स्फोट आणि त्यानंतरचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात रशिया, युक्रेन आणि बेलारूस या देशांमध्ये पसरले. त्याहून कमी प्रमाणात प्रदूषण हे अन्य १० देशांमध्येही पसरले. एकूण १ लाख ९१ हजार वर्ग किलोमीटर्स एवढ्या भागात हे प्रदूषण पसरलं. यातील १० हजार वर्ग किलोमीटर्स एवढा भाग हा मानवी वस्तीसाठी अयोग्य ठरवला गेला. पुढील चार वर्षात या भागात जे प्राणी जन्मले त्यांच्यात जन्मतःच अनेक व्यंगे होती आणि ते लगेच मृत्यू पावले. या सर्व घटनेमुळे या मोठ्या भागातून माणूस नावाचा प्राणी दूर गेला आणि मग निसर्गाने आपलं काम सुरू केलं... Resilience!!!

या प्रदूषित जागेपैकी १० वर्ग किलोमीटर्स जागा पूर्ण जळाली होती. तेथील मोठमोठाले वृक्ष जळून सर्व भागातील जंगल संपलं होतं. त्यामुळे या जागेला रेड फॉरेस्ट असं नाव पडलं. पहिल्या २-४ वर्षांनंतर या भागातील जैवविविधता कित्येक पटींनी वाढली. १९८६ नंतर पहिल्यांदा १९९६ मध्ये BBCने इथे एक डॉक्युमेंट्री (Inside Chernobyl's Sarcophagus) तयार केली. त्यात अणुभट्टीतून लहान मोठे पक्षी आत बाहेर जाताना दिसले. तरीही हा भाग मानवी वस्तीसाठी योग्य नव्हताच. त्यामुळे माणूस या भागापासून दूरच राहिला आणि निसर्गने आपलं काम सोडलं नाही.

२०१६ला म्हणजे या अपघातानंतर ३० वर्षांनी मरीना शक्विरिया नावाची अभ्यासक आपल्या टीमसह या भागात गेली. तिथे निसर्गाने केलेल्या किमयेने आश्चर्यचकित झाली. इतक्या भयंकर अपघाताचे ठिकाण हे कित्येक वन्यजीवांच्या हक्काचे आश्रयस्थान बनले होते. हरणं, अस्वलं, बीव्हर, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे, घोडे, गाढवं... असे कित्येक प्राणी तिथे आहेत. तिथे त्यांची पूर्ण परिसंस्था निर्माण झाली आहे. त्यात मानवाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याने ती बहरत गेली. या भागात कॅमेरा ट्रॅप्स बसवले आहेत. त्यात दिसणारी या सर्व प्राण्यांची संख्या वन्यजीव अभ्यासकांना अक्षरशः थक्क करून सोडते. येथील किरणोत्सारी पाण्यात हंस सहज विहार करत असलेले दिसतात. येथील किरणोत्सर्गाचा वन्यजीवांच्या संख्येवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. उलट माणूस नसण्याचा मात्र अत्यंत अनुकूल परिणाम झाला आहे. Przewalski नावाची घोड्यांची एक लुप्त होत चाललेली प्रजाती आहे. या भागात ही प्रजाती व्यवस्थित वाढत आहे. अन्य कुठेही न दिसणारी यांची उपप्रजाती केवळ याच भागात बघायला मिळते. अशीच एक बीव्हरचीही प्रजाती इथे आनंदाने बहरत आहे. येथील बीव्हरचे महत्व हे आफ्रिकेतील हत्तींच्याएवढेच आहे. येथील प्राण्याच्या आणि वनस्पतींच्या सहचर्याने जमीनही बदलत आहे. मोठमोठाली झाडं जेव्हा पडतात तेव्हा त्यांचं होणारं विघटन हे जमिनीला अधिक सुपीक करत आहे. अभ्यासकांच्या मते १०० वर्षांपूर्वी येथील जल-जमीन-जंगल जसं होतं, तसंच ते काही वर्षात पुन्हा होईल. युक्रेन आणि बेलारुसमधील १६०० वर्ग किलोमीटर्स परिसर हा आता अभयारण्य बनला आहे. गम्मत म्हणजे युरोपातील ते सर्वात मोठे अभयारण्य आहे.

हेच ते Resilient असणं... "कितीही प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा सामान्य होण्याची जी असामान्य क्षमता"

हे सर्व बघता मानवी वावर हा आण्विक प्रदूषण / किरणोत्सर्जन यापेक्षा निसर्गाला अधिक घातक आहे. कधीतरी माणूसही यातून शिकेल, नाहीच शिकला तर निसर्ग समर्थ आहे. तो नक्कीच धडा शिकवेल. एखादा मोठा धक्का बसण्याआधी माणसाने जागं होऊन निसर्गात लुडबूड कमी करावी, हेच यातून शिकावे...

संदर्भ:

https://en.wikipedia.org/wiki/Chernobyl_disaster

https://www.nationalgeographic.com/.../060418-chernobyl...

https://en.wikipedia.org/wiki/Red_Forest

Few other documentaries

Saturday, June 13, 2020

पुस्तक परिचय - कॉर्पोरेटला रामराम, शेतीला सलाम

सहज किंडलवर पुस्तकं बघत होतो. अचानक विचित्र नावाचं पुस्तक दिसलं. सहज म्हणून वाचायला सुरुवात केली आणि वाचतच गेलो.

वेंकट अय्यर, एक केरळी पण मुंबईकर तरुण. IBM मध्ये, सन २००४ मध्ये, सहा आकडी पगाराची नोकरी. तिशीत शेती करायची ठरवतो आणि मग सुरू होतो एक विलक्षण प्रवास. त्या प्रवासाची गोष्ट म्हणजे "कॉर्पोरेटला रामराम, शेतीला सलाम"

वेंकट IBM मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होते. पत्नी मीना, वर्तमान पत्रात काम करणारी. गुजरात व अन्य काही भागातील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यावर तिचे काम सुरू असते. यातून वेंकटची सेंद्रीय शेतीशी ओळख होते. मग आपण शेती करावी हा विचार डोक्यात घट्ट होत जातो. नवीन मोठ्या प्रोजेक्टची संधी की शेती हा निर्णय घेणे भाग पडते आणि वेंकट मधला शेतकरी नवा प्रोजेक्ट नाकारतो.

जवळ शेतजमीन नाही, ती कुठे घ्यायची ठरलेलं नाही. अशा अवस्थेत नोकरी सोडलेली. शेत घेताना कुटुंबातील कुणाच्यातरी नावावर शेती असली पाहिजे हा नवा शोध. सोबत शासकीय अधिकाऱ्यांच्या पैसेवाल्या IBM मधल्या मॅनेजर कडून असलेल्या "अपेक्षा". या सगळ्याला पुरून उरत आणि एकही पैची लाच न देता सरळ मार्गाने वेंकट शेतजमीन विकत घेतो.

मीनाला त्याच काळात द हिंदू मध्ये मोठी नोकरी लागते, काही वर्षे मुंबई मग पाकिस्तान आणि अखेरीस दिल्ली अशा बदल्या होत जातात. त्यामुळे मीना एकीकडे आणि वेंकट शेतावर असा प्रवास नऊ वर्षे सुरू राहतो. त्यानंतर मात्र मीनाही शेतावर येते.

शेती करताना रासायनिक शेती करायची नाही यावर वेंकट ठाम असतो. मग सुरू होतं शेतीतील शिक्षण. वेंकटचं शेत निसर्गकृषक भास्कर सावे यांच्या शेताच्या जवळच असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत वेंकटचं शिक्षण सुरू होतं. सोबत गावातील लोक, शासकीय अधिकारीही अनेक प्रकारचं "शिक्षण" देत असतातच. स्थानिक वाणांची दुर्दशा आपल्याला कळते जेव्हा वेंकटला तांदूळ लावायचा असतो. तो तांदळाचा शोध आणि त्यातील अपयश बरंच काही सांगून जातं.

वेंकट शहरी असला तरी गावात पूर्ण समरस झालाय. गावातील प्रत्येक प्रसंगात तो जातो. वेळोवेळी मदतही करतो. पण आपली काही तत्त्व सोडत नाही आणि तरीही गावाला तो आपलंसं करतो. हे सगळं करताना शेती रसायनमुक्त, पण अन्य गावकाऱ्यांसारखीच करतो. मग त्यात शासनाकडून बियाणं घेणं, वादळ, अतिवृष्टी वगैरे काळात मदत मिळावी म्हणून प्रयत्न करणं हे सगळं करतो. शासकीय यंत्रणा शेतकऱ्याला मदत करण्यासाठी असतात पण अधिकारी अनेक प्रकारे शेतकऱ्याला नाडतात. हे सगळे अनुभव स्वतः घेतो आणि त्यावर मातही करतो.

शेतातील घराचे तर असंख्य अनुभव आहेत. घरात आलेला नाग ते शेतातील घोरपडी, बेडूक खाणारे साप, घोणसाचं मैथुननृत्य प्रत्यक्ष पाहणं, घरात कोंबडीपालन, मांजरी, कुत्रा आणि बरंच काही... या सगळ्या गोष्टी बघताना, करताना, वेंकट सतत विद्यार्थी राहून कुतूहल कमी न पडू देता पुढे जात राहतो.

बँक या गोष्टीशी गावातील लोकांचं सख्य कमी असतं. त्यातील अनेक अनुभव त्याला येतात. नोटाबंदीच्या काळात झालेला त्रास कोणताही राजकीय अभिनिवेश न आणता वेंकट सांगतो.

गावातील काही लग्ने, अनेकांच्या घरातील भानगडी, एक खून, जवळच्या मित्राची बायको जाणे व काही दिवसांनी तो मित्र जाणे या गोष्टी, दवाखाना ही बाब गावाला किती जड आहे, मुंबईपासून केवळ १०० किमी अंतर असताना, याची खंत... असं बरंच काय यातून कळतं.

सेंद्रीय शेतीचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करण्याचा प्रयत्न. पहिल्या हंगामातील अपयश आणि पुढील यश. तरीही त्यातून घेतलेली माघार. शेतकऱ्याला पैसे मिळायचे असतील तर काय केले पाहिजे याचे वेंकटने केलेले एकोत्तरी नाही तर दीर्घ चिंतन आपल्याला दिसते.

शेवटी वेंकट "मी सुखी आहे ना?" याचा शोध घेतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर -
आम्हाला सुख वेगळ्याच ठिकाणी भेटलं. मोकळं आकाश‚ निखळ निसर्गसौंदर्य‚ ताजा टवटवीत भाजीपाला‚ झाडावरून नुकतीच खुडलेली फळं आणि आपण पिकवलेलं अन्न खाणं‚ यातून आम्हाला खरा आनंद मिळतो. आपणच जमिनीत पेरलेल्या बियांमधून एक छोटा कोंब उगवतो आणि हळूहळू त्याचं रूपांतर एका महाकाय वृक्षात होतं. हा चमत्कार पाहण्याचं सुख तुम्हाला शहरातील मॉलमध्ये मिळू शकत नाही. तुमच्या समोर बेडूक पकडून फस्त करणारा पिवळसर पट्ट्यांचा नानेटी‚ तुमच्यापासून काही फुटांवर वेटोळं घालून फूत्कारणारा नाग किंवा स्वतःच्याच कैफात डोलत मैथुननृत्य करणारी घोणसाच्या नर-मादीची जोडी पाहताना जो थरारक आनंद तुम्ही अनुभवता‚ त्याची सर नॅशनल जिओग्राफी चॅनलवरून दाखवलेल्या दृश्यांना कधीच येऊ शकणार नाही.

मागे मी माझ्यासह अनेकांच्या मनातील "राजू रस्तोगी" बद्दल लिहिलं होतं. वेंकट एक यशस्वी राजू रस्तोगी आहे. त्याने अनेक राजूंना वाट दाखवावी ही इच्छा!!!

Thursday, March 12, 2020

देवराई

लेखक डॉ उमेश मुंडल्ये (DrUmesh Mundlye)
प्रकाशक हिंदुस्थान प्रकाशन संस्था
मूल्य ₹१७५

डॉ उमेश मुंडल्येंचा परिचय फेसबुकवरचा. त्यांची कामं, त्यातून होणारं जल, मृद संवर्धन, त्यांच्या कामामुळे सुखावणारे अनेक लोक, गावं हे वाचनात येत होतंच. त्यांच्या अभ्यासाचा, डॉक्टरीचा, मूळ विषय देवराई. त्यावर त्यांचं पुस्तक येत आहे कळाल्यावर लगेच बुक केलं, पण हाती पडायला बरेच महिने गेले.

उमेशजींचा मूळ अभ्यासाचा विषय देवराई असल्याने, त्यांनी या पुस्तकात देवराई आणि त्यांची ओळख कशी झाली इथपासून ते देवराई कशी असते, तिचे संवर्धन धार्मिक आधारावर लोक कसे करतात, देवराईतील जैववैविध्य, काही प्रजाती केवळ देवराईतच का सापडतात, देवरायांपुढील समस्या आणि आव्हाने तसेच ही आव्हाने आपण परतवून कसे लावू शकतो या सर्वांबाबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे विषय अभ्यासाचा असला तरी अजिबात कंटाळवाणा न होता सहजपणे समजावून सांगितला आहे.

पुस्तकाची सुरुवात होते ती देवराईच्या अभ्यास कसा सुरु झाला इथपासून. जेव्हा हा अभ्यास सुरु झाला तेव्हा महाराष्ट्रातील नोंदणी झालेल्या देवरायांची संख्या होती साधारण ४५०. पण जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा केवळ सावंतवाडी या एका तालुक्यात ४०० पेक्षा अधिक देवराया आहेत हे कळालं. त्यानंतर उमेशजींनी १६०० पेक्षा अधिक देवरायांना प्रत्यक्ष भेट दिली आहे आणि ३७६८ देवरायांची नोंद त्यांच्या PhDच्या अभ्यासात आहे.

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं जंगल. ही संकल्पना भारतभर सगळीकडे आहेच, शिवाय भारताबाहेरही अनेक देवराया आहेत. संकल्पना तीच - हे वन देवाचं आहे. इथून कोणताही आर्थिक लाभ मिळवायचा नाही. इतकंच काय कित्येक ठिकाणी देवराईत चप्पल घालून जायलाही बंदी आहे. या देवराया केवळ आदिवासी भागात आहेत असं नाही. आदिवासी भागात, खेड्यात, गावाच्या अगदी जवळ ते गावापासून दूर अंतरावर अशा सगळीकडे देवराया आजही उभ्या आहेत आणि आपल्या या परंपरेची साक्ष देत आहेत. या देवरायांमुळे अनेक गोष्टी साधल्या जातात - पर्यावरण समतोल, जैवविविधतेचे संरक्षण, गावाचं मिळून एक सांस्कृतिक केंद्र, औषधी आणि पर्यटनातून होणारा आर्थिक विकास. पण यासाठी देवराया वाचल्या पाहिजेत आणि वाढल्या पाहिजेत.

या देवराईत विविध दैवतं असतात. ती कोपिष्टही असतात. त्या श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या भीतीने सुद्धा देवराया सुरक्षित राहतात. या देवरायांचे वय मोजण्याच्याही अनेक पद्धती असतात. नगर जिल्ह्यातील एका देवराईत दर ३० वर्षांनी एक वाघ्या देवाचा दगड बसवतात. तिथे असे १७ दगड दिसून आले, म्हणजे ती देवराई सुमारे ५०० वर्षे जुनी असावी. एका देवराईत एक प्राचीन मंदिर आहे, एका साधूने बनवून घेतलेलं. ते ४०० वर्षे जुनं आहे, म्हणजे देवराई त्याहून जुनी असणार. इतकं हे जुनं वैभव आपल्याकडे आहे. त्याची पुसटशीही ओळख आपल्यापैकी अनेकांना नसते. या पुस्तकातून ही ओळख करून दिली आहे.

देवराई जर गावाजवळील डोंगरावर किंवा उंच भागात असेल तर गावाच्या पाण्याचा प्रश्न ती सोडवते. दापोलीतील कुडावळे गावातील देवराईतून वर्षभर गावाला पाणीपुरवठा होतो. त्या पाण्याला जर नळाने बंद केलं तर पाईप/नळ फुटतात इतका त्या पाण्याला प्रवाह असतो. देवराईच्या अशा पाण्यावर आजूबाजूच्या गावात बागाईत फुलली आहे. यामुळेही लोक देवराई जपतात.

देवराईतील जैववैविध्य प्रचंड असते. अगदी छोट्या देवराईत शंभर सव्वाशे प्रकारची झाडे दिसून येतात. एका देवराईतील आंब्याच्या झाडाची पहिली फांदी चाळीस फुटांवर आहे. ते झाड आंब्याचं आहे हे लवकर ओळखूही येत नाही. देवराईतील जुने वेल इतके मोठे असतात की वेलीच्या खोडाचा व्यास एक मीटर एवढा असू शकतो. शिवाय अनेक पक्षी, दुर्मिळ होत चाललेले प्राणी (साळींदर, खवले मांजर) यात सुरक्षित वास करतात.

हे पुस्तक वाचताना वाईट वाटलेली गोष्ट म्हणजे आमच्या मराठवाड्यात एकही देवराई नाही... :-( मराठवाड्याशिवाय दुष्काळी जिल्हे सोलापूर, अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि नागपूर - यातही एकाही देवराईची नोंद नाही. पाऊस कमी असल्याने देवराई नाही की देवराई नाही म्हणून पाऊस नाही... काहीही असले तरी देवराई ही असलीच पाहिजे हे नक्की.

या सगळ्या आणि याहूनही खूप जास्त गोष्टी हे पुस्तक वाचताना आपल्याला कळतात.

आम्ही आमच्या शेतात (जिल्हा औरंगाबाद) मियावाकी घनवन पद्धतीने देवराई तयार करत आहोत. एकूण अर्धा एकर करायचा विचार आहे. आतापर्यंत एक गुंठ्याचे दोन टप्पे लावून झाले आहेत. यात १५० स्थानिक प्रजातींची ६३० पेक्षा अधिक रोपे लावलेली आहेत. पहिल्या टप्प्यातील झाडं आता जास्तीत जास्त २० फूट तर सरासरी ८ फूट आहेत. यात आता मुंगूस येऊन राहू लागले आहेत, अनेक पक्षी येत आहेत, घोरपडी येत आहेत. उन्हाळ्यात हरणांचे कळप सहजच वस्तीला येतात. आमच्या भागातून १० वर्षांपूर्वी गायब झालेले मोर अधून मधून इथे हजेरी लावून जातात. हे सगळं केवळ दीड वर्षांच्या जंगलात होतंय. सोबत लागवडीच्या आधीचा आणि नंतरचा गुगल मॅप वरील फोटोही आहे.







आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं, देवराई समजावून घ्यावी आणि झाडं लावावीत, जगवावीत.

या परिचयावर प्रत्यक्ष लेखकाने प्रतिक्रिया दिली होती - 
पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Dnyaneshजी.
देवराई ही एक समृद्ध परंपरा आहे. यामधे माणसाचा हस्तक्षेप नसतो किंवा नसेल याची काळजी घेऊन ठेवली गेली आहे. चांगल्या जंगलात जसे जमिनीवर असणाऱ्या गवतापासून लहान झुडूपं, मोठी झुडुपं, लहान वृक्ष, मध्यम वृक्ष, मोठे वृक्ष आणि या सर्वांवर असलेल्या विविध आकाराच्या वेली यांचं उत्तम सहजीवन असतं, त्याची लहान प्रतिकृती म्हणजे देवराई असते. नवीन देवराई तयार करणं हे एका पिढीचं काम नाही. सुरूवात आपण करावी आणि दोन पिढ्यांनी ते हस्तक्षेप न करता जपावं तेव्हा देवराई काही आकाराला येईल.
मियावाकी आणि देवराई यात मात्र काहीच साम्य नाही. मुंबईच्या संदर्भात उपमा द्यायची तर मियावाकी म्हणजे सकाळच्या गर्दीच्या वेळातील मुंबईकडे जाणारी आणि डोंबिवलीला आलेली जलद लोकल आहे. प्रचंड संख्येने लावलेली झाडं म्हणजे देवराई नाही. झाडं लावताना आपण आपला हेतू साध्य करण्यासाठीच लावतो बरेचदा. त्याचे इतर परिणाम लक्षात घेत नाही आणि नंतर ते परिणाम निस्तरण्यासाठी परिश्रम करावे लागतात पुढच्या पिढ्यांना. हरितक्रांती हे एक उत्तम उदाहरण आहे याचं.
देवराई ही लोकसहभागातून चालवली जाणारी जैवविविधता, पाणी, मृदा यांचं संरक्षण आणि संवर्धन करणारी परंपरा आहे. यात माणसाचा सहभाग फक्त जपण्यासाठी आहे. मियावाकीचं तसं नाहीये. कमीतकमी जागेत जास्तीत जास्त झाडं ही केवळ गर्दी झाली. त्यासाठी येणारा खर्च याबद्दल मी बोलत नाही. तो स्वतंत्र विषय होईल.
त्यामुळे कृपया मियावाकी म्हणजे देवराईचं एक वेगळं रूप असलेयासारखं आहे असा गैरसमज ठेवू नका ही विनंती.

या प्रतिक्रियेला मी दिलेले उत्तर -
उमेशजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपला देवराई विषयातील अभ्यास आहे. मी कोणत्याही प्रकारे प्रतिवाद करत नाहीये, कारण माझा अभ्यास अथवा अनुभव तुमच्यासारखा अजिबातच नाहीये. मी देवराईची तुलना मियावाकी घनवनाशी करत नाहीये. माझ्या पोस्टमधील वाक्यांमधून तसा अर्थ निघत असेल तर ती माझी चूक आहे.
मला देवराई म्हणजे काय हे कळलंय ते खालीलप्रमाणे -
१. देवराई हे मिश्रवन असलं पाहिजे
२. त्यात माणसांचा वावर शून्य ते मर्यादित असावा
३. ते परंपरेने आणि समाजाने जपलेलं जंगल असावं
४. हे संवर्धन, संगोपन श्रद्धेने केलेलं असावं
दुर्दैवाने आमचं शेत जिथे आहे त्याच्या आजूबाजूला कुठेही अशी देवराई नाहीये. संपूर्ण गावाला सोबत घेऊन गायरानावर वा कोणत्या सामायिक जमिनीवर देवराई तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि संयम आमच्याकडे नाहीये. त्यामुळे आमच्याच शेतात (एकूण साडेतीन एकर) मध्ये साधारण अर्धा एकर आपणच देवराई करावी असा विचार केला. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी हा विचार करता सर्वात आधी मियावाकी पद्धतीची माहिती मिळाली आणि त्यावर आतापर्यंत दोन गुंठे लागवड केली आहे. पहिला टप्पा साधारण दीड वर्षांपूर्वी केला, दुसरा टप्पा मागील महिन्यात केला
मागे उपेंद्र दादांशी यावर बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलेला देवराईचा किंवा निसर्गबेटाचा आराखडा बघितला. त्यात उणीव काहीच नाहीये, पण एक अडचण आहे - ती म्हणजे त्यात मानवी वावर शून्य होणार नाही. त्यामुळे घनवन करणे सुरु ठेवले. आजच्या घडीला यात आतमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळे मानवी वावर हा शून्य होईल आणि आज नाही पण कदाचित शंभर वर्षांनी ही जागा जंगल म्हणून असेल.
आम्ही हे तयार करताना मिश्रवन असावे याचे भान ठेवतोय - १५० प्रजातींमध्ये झुडूप, छोटे वृक्ष, स्थानिक बांबू/वेत, मोठे वृक्ष, वड/पिंपळ/नांद्रुक सारखे पसरट वृक्ष लावत आहोत. बाकी परोपजीवी (आर्किड सारखी) यात आणण्याचं काम इथे येणारे प्राणी/पक्षी करतील अशी आमची अपेक्षा आहे. श्रद्धा तर आमची यावर आहेच. हा सामाजिक उपक्रम मात्र होत नाहीये.
असलेल्या जंगलाच्या जागी, असलेल्या देवराईला पर्याय म्हणून अथवा आहेत ती वृक्षराजी तोडून मियावकीने जंगल लावणे अयोग्य आहे. किंवा हजारो वर्षांच्या जंगलाची तुलना मियावाकीशी होऊच शकत नाही. पण जिथे झाडं, जंगल, देवराई नाही अशा ठिकाणी वन उभारणी आम्ही करत आहोत. हे वन लगेच देवराई होणार नाही. कदाचित १०० वर्षांनी तिला देवराई म्हणता येईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठीची ही पहिली पायरी असू शकेल.
काही चुकीचं बोललो असल्यास क्षमस्व...
🙏🏼🙏🏼

या उत्तरावर उमेशजींनी दिलेले उत्तर आणि सल्ला - 
चूक किंवा बरोबर असं नाही. देवराई मधे नैसर्गिक जंगल असतं. प्रत्येक जीव त्याची जागा घेत असतो. आपण मियावाकीच नव्हे तर इतर कोणत्याही पद्धतीने संवर्धन करताना हे विसरतो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे (खरंतर आवडीप्रमाणे) प्रजातींची निवड करतो. स्थानिक प्रजाती असतील तर हेही ठीक. पण दोन वृक्षांमधील अंतर किती असावं आणि ते तेव्हढेच का असावं, त्यामुळे नैसर्गिक वाढीवर काही परिणाम होणार का, अशा गच्च लावलेल्या (नैसर्गिकरित्या झालेल्या नव्हे) वनस्पतींमुळे त्यातल्याच काही प्रजातींवर काय परिणाम होणार, इतर जैवविविधतेबद्दल आपण काही विचार करतोय का, जर हे मानवी वस्तीजवळ असेल तर एवढ्या गर्दीने लावलेल्या जंगलामुळे सुरक्षिततेचे काही प्रश्न उपस्थित होतात त्याचं काय, असे असंख्य प्रश्न उभे राहतात.
एक करता येईल तुम्हाला. जर तुम्ही आधीच झाडं लावली असतील तर जी झाडं स्पर्धेत नाहीशी होतील त्याजागी लगेच नवीन लावू नका. म्हणजे नैसर्गिक जंगल तयार व्हायला मदत होईल.

Friday, November 22, 2019

अस्पर्शित निसर्ग

क्वेरीन नावाची माझी बेल्जियम मध्ये सहकारी आहे. नेदरलँड्सची नागरिक. ती भारतात, विशेषतः दक्षिण भारतात कामानिमित्त काही वेळा जाऊन आलेली आहे. शिवाय भारतीय कंपनीत काम करते म्हटल्यावर तिने भारताची बऱ्यापैकी माहिती मिळवलेली आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिच्याशी गप्पा चालल्या होत्या. त्यात ती म्हणाली की, "दक्षिणेत प्रचंड मोठी मंदिरं आहेत, भारतात इथल्या ब्रुसेल्स किंवा आम्सटरडॅम सारखी मोठी शहरं आहेत आणि शिवाय हत्ती, वाघ, सिंह सुद्धा आहेत. या बहुविधतेचं मला खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं."

खरंच या भागात कोणतेच वन्यजीव अस्तित्वात नाहीत. मुळात वनेच अस्तित्वात नाहीत. नेदरलँड्स, बेल्जियम आणि कदाचित अजून अनेक देश असे असतील जिथे नैसर्गिक वनराई शिल्लकच नसेल आणि अर्थातच वन्यजीव सुद्धा.

इथे जवळच मोठं प्राणी संग्रहालय आहे. त्यात हत्ती, वाघ, सिंह, गेंडे, जिराफ... खूप प्राणी आहेत. त्यांची प्रचंड काळजी घेण्यात येते. एखाद्या हत्तीणीला बाळ झालं की टीव्हीवर कौतुकाच्या बातम्या येतात. पण हे सगळं होतं मानवाच्या देखरेखीत, नियंत्रणात!

आमची टीना नावाची वयस्क मैत्रीण आहे. तिलाही भारताबद्दल कोण कौतुक. तिच्याशी एकदा अशाच गप्पा चालू होत्या. जवळच एक खूप मोठं उद्यान आहे - व्रैब्रूक पार्क. छान रांगेत लावलेली झाडं, मध्ये तयार केलेलं तळं, लहान मोठी खेळण्यासाठीची मैदानं, पळायला मातीचा उत्तम रस्ता, फक्त गुलाबाचं उद्यान आणि भरपूर गर्दीवाली झाडं. असं सगळं काही त्या उद्यानात आहे. मला तिथे फिरायला, सायकल चालवायला आवडतं. मी त्याचं कौतुक करत होतो. त्यावर टीनाने एका वाक्यात बोळा फिरवला. ती म्हणाली, "कितीही सुंदर असलं ना तरी ते मानवनिर्मित आहे." पुढे म्हणाली, "भारतात जशी जंगलं मानवी हस्तक्षेपाशिवाय आहेत तशी इथे नाहीतच. एकूणच आम्हा युरोपियनांना आहे ते नष्ट करून, मग आमच्या देखरेखीत, नियंत्रणात निसर्ग असलेला आवडतो."


खूप वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंचं "दुस्तर हा घाट" वाचलं होतं. युरोपात पहिल्यांदा येण्याआधी. त्यात नमू आणि वनमाळी लग्न होऊन आम्सटरडॅमला येतात आणि तिथला वनमाळीचा मित्र अलिस्टरशी नमूचीही छान मैत्री होते. वनमाळी पुढे कुठे कुठे फिरत राहतो पण नमू भारतात परतते. तिला भेटायला अलिस्टर येतो. मग ते शेताजवळच्या एका टेकडीवर जातात. तिथे एका दगडावर बसून अलिस्टर भोवताली बघत नमूला म्हणतो, "तुमच्या भारतात मानवी स्पर्शाशिवाय असलेला निसर्ग आहे. आमच्याकडे नाही." जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा, या वाक्यातील भावना १००% कळाली नव्हती. आज कळतीये.

पण भारतात खरोखरीच असा निसर्ग मानव नावाच्या अत्यंत हीन, स्वार्थी, जैवसाखळीत कुठेच नसलेल्या प्राण्याकडून अस्पर्शित राहील? आपला स्वार्थ, आपल्याला जंगलं, नद्या, वन्यजीव यांना आहे तसे - किमान काही भागात राहू द्यायला तयार होईल. याचे उत्तर आत्तातरी नकारार्थी आहे. काही वर्षांनी भारतातला एखादा अलिस्टर, टीना, क्वेरीन परग्रहावरच्या एखाद्याला सांगेल की, "तुमच्याकडे जसा अस्पर्शीत निसर्ग आहे तसा आमच्या पृथ्वीवर नाही..."

असं होऊ नये ही प्रार्थना 🙏🏼

Sunday, October 27, 2019

निसर्ग समर्थ आहे

Salt Fat Acid Heat नावाची एक Web Series बघत होतो. त्यात Salt या भागात जपान मधील मिठाचे अनेक प्रकार दाखवत होते. सोया सॉस हा खारट असतो आणि म्हणूनच एक प्रकारचं तेही मीठच. एक जपानी माणूस पारंपरिक पद्धतीने सोया सॉस बनवतो. त्याच्याकडे सुमारे १०० वर्षांपूर्वीची लाकडी भांडी आहेत त्यात तो किण्वन पद्धतीने सोया सॉस मुरू देत तयार करतो. या पद्धतीमध्ये वेळ जास्त लागतो आणि श्रमही जास्त लागतात. या Web Series ची host समीन नुसरत त्याला विचारते की तू हे केवढं काम करतोस... त्यावर तो जपानी हसत म्हणतो - मी फक्त योग्य वातावरण तयार करून देतो. सोया सॉस तर हे सूक्ष्म जिवाणू तयार करतात.

जपानी वननिर्मिती "मियावाकी" पद्धतीत साधारण असेच तत्त्व पाळले जाते. No management is best management. त्या झाडांना त्यांचं त्यांचं वाढू द्या. तुम्ही फक्त पाणी देत रहा. २-३ वर्षांनी त्याचीही गरज नाही. ती झाडं काय ते आपलं आपलं बघतील आणि तुम्हालाही जपतील.

जपान मधील नैसर्गिक शेतीचे प्रणेते फुकुओका सांगतात की तुम्ही जमिनीची मशागत करता वगैरे सगळं झूठ आहे. तुम्ही उगाच जमिनीला त्रास देत असता. नैसर्गिकरित्या जेव्हा बिया जमिनीवर पडतात तेव्हाच तुम्ही त्या जमिनीवर टाका. म्हणजे बाजरी ऑक्टोबर महिन्यात काढणीला येते तर ऑक्टोबरमध्येच त्या बिया पसरून द्या आणि त्यावर त्याच बाजरीचे धांडे पसरून द्या. जून मध्ये त्या बिया आपोआप उगवतील. थोडक्यात निसर्ग त्याचं बघून घेईल आणि तुम्हालाही मिळेल. त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका.

भारतात नैसर्गिक शेती करणारे भास्करराव सावे. त्यांच्याबद्दल मिलिंद बोकिलांच्या 'समुद्रापारचे समाज' मध्ये एक प्रकरण आहे. त्यात बोकील लिहितात -
'नैसर्गिक शेती म्हणजे शेवटी काय आहे? तिचा संदेश अगदी साधा आहे. तो म्हणजे निसर्गाचे ऐका, डोळे उघडे ठेऊन बघा. आपल्याकडे जे अनेक ऋषितुल्य संशोधक या विषयात काम करत आहेत, त्यातलेच एक आहेत डहाणूशेजारच्या उंबरगाव तालुक्यातले भास्करराव सावे. त्याची शेती बघायला गेलो असताना त्यांनी मला एकदम विचारले, "नारळाला म्हणजे शहळ्याला एवढे जाड कवच का असते?" मला त्याचे उत्तर आले नाही. (माणसांचेच वागणे जिथे समजत नाही, तिथे निसर्गाचे गूढ काय समजणार?) सावे म्हणाले, "उत्तर सोपं आहे. कारण नारळाला उंचावरून पडायचे असते. तसा तो पडूनही फुटू नये म्हणून निसर्गाने तशी व्यवस्था केली आहे. तो तुमच्या हातात अलगद पडेल. पण आपण काय करतो? आपण झाडावर चढण्याचा अट्टाहास करतो. त्यात हात, पाय मोडून घेतो. मुख्य म्हणजे स्वत:ला हवे तेव्हा नारळ काढून झाडाचे उत्पादनचक्र बिघडवून टाकतो." साव्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे , की झाडावर चढून जर नारळ काढले नाहीत, तर ते झाड पाच ते सहा पट जास्त उत्पन्न देते. आपण झाडाच्या शेंड्यापर्यंत सरसर चढून नारळ काढून घेऊ शकतो, ही माणसाला आलेली मस्ती आहे. निसर्गाचे सांगणे आहे, की तू खालीच थांब, मी तुला भरभरून देतो. हे समजून घेणे म्हणजेच नैसर्गिक शेती.'

मुळात माणसाला सगळ्या गोष्टींवर नियंत्रण हवे असते. शिवाय "सर्वात आधी मला पाहिजे" ही हाव असते. मग जो हापूस मे अखेरीस किंवा जून मध्ये नैसर्गिकरित्या मिळणार असतो त्यावर केमिकल्स टाकून आम्ही एप्रिलमध्ये खातो. जो कापूस ऑक्टोबर हिट मध्ये चांगला आपोआप फुटणार असतो तो आम्हला सप्टेंबरमध्ये पाहिजे असतो आणि मग त्यावर बोंड अळी येते आणि आम्ही फवारण्या करत उत्पादन खर्च वारेमाप वाढवून ठेवतो. ही नियंत्रणाची आणि "मला आधी पाहिजे"ची हाव संपो आणि बळीचे राज्य येवो!

बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा!!!

Tuesday, July 16, 2019

गंगा माँ मंडल

आपल्याकडे महाराष्ट्रात श्री. अ. दाभोलकर यांनी १० गुंठे शेतीप्रकल्पावर खूप यशस्वी प्रयोग केले आहेत. त्याबद्दल त्यांची अनेक पुस्तकेही आहेत. "विपुलाच सृष्टी" हे त्यापैकी एक. याच प्रकारे अन्य राज्यांमध्येही प्रयोगशील लोक आहेत. मालपाणी ट्रस्ट, मध्यप्रदेश यांनी "गंगा माँ मंडल" नावाचा एक गुंठ्यातील प्रयोग केला आहे. त्याची माहिती देत आहे.

या प्रयोगात मुख्यत्वे लक्षात घेतलेली बाब म्हणजे कोणत्याही साधारण कुटुंबात (४ ते ५ व्यक्ती) सामान्यतः जो पोषक आहार हवा असतो तो सहज भाज्या आणि फळांद्वारा मिळू शकतो. त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी यातून मिळतील. यासाठी १००० चौरस फूट एवढीच जागा लागेल. "गंगा माँ मंडल"मुळे एक कुटुंब विषमुक्त फळ-भाजी आणि घरगुती औषधे यासाठी स्वयंपूर्ण होईल.

याची रचना गोलाकार आहे. यात जाण्यासाठी ७ रस्ते असतील. जेव्हा मंडल पूर्ण होईल तेव्हा रोज सकाळी एका रस्त्याने केंद्रापर्यंत जात पाणी घालायचे (अर्थात कुणाला ठिबक सिंचन करायचे असेल तरी चालेलच). याची रचना अशी असेल की ते पाणी सगळ्या भागात पोहोचेल. पाणी देत असतानाच आपल्याला आवश्यक त्या भाज्या आणि फळे तोडून आणायची. दुसऱ्या दिवशी दुसरा रास्ता आणि नव्या, ताज्या भाज्या फळे तुमच्या जवळ! असं करत सात दिवस सात भाज्या फळे तुम्हाला मिळतील आणि आठव्या दिवशी पुन्हा पहिल्या रस्त्यावरील भाज्या तोडणीयोग्य झालेल्या असतील. हा क्रम अनेक दिवस चालेल. जेव्हा रोपे जुनी होतील तेव्हा ती काढून पुन्हा नवीन लावायची.

गंगा माँ मंडलाच्या केंद्राकडे जातानाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेल असलेल्या फळभाज्या लावतात. बाहेरील सात वाफ्यांमध्ये कांदा, लसूण, मुळा, रताळी आणि बटाट्यासारखी कंदमुळे तसेच टमाटे, भेंडी अश्या फळभाज्या तसेच विशेष म्हणजे अनेक औषधी वनस्पती सुद्धा लावल्या जातात. आतील सात वाफ्यांमध्ये मेथी, मिरची, कोथिंबीर असे मसाले, मूग, तूर, उडीद असे प्रोटिनयुक्त धान्ये लावली जातात. सर्वात आतील गोलात आर्द्रता जास्त असल्याने केळी, पपई लावता येते.

गंगा माँ मंडल बनवण्याची कृती खालीलप्रमाणे (आराखडा चित्रात दिला आहे)
१. जिथे हे करायचे आहे त्या १०००  चौरस फूट जागेच्या केंद्रबिंदूवर खुंटी ठोका. तिथून १५ फूट त्रिज्येचे गोल आखून घ्या. त्यावर राख/चुना घाला म्हणजे ते दिसत राहील.
२. आता दोरीची लांबी हळूहळू कमी करत क्रमाने एक एक गोल आखून घ्या १०.५, ९, ६, ४.५, ३. याही गोलांवर राख घाला.
३. सर्वात बाहेरील गोलांवर १३.५ फुटांवर खुणा करा, सात समान भाग होतील. त्यावरही राख टाकून खुणा स्पष्ट करा.
४. या खुणांपासून केंद्रबिंदूपर्यंत दोरी लावून ४.५ फुटांच्या गोलापर्यंत रेष आखून घ्या. त्या रेषेच्या दोन्ही बाजूंना ९-९ इंच मोजून दीड फुटाची जागा रस्त्यासाठी तयार करा. हा रस्ता बाहेरून आतील ४.५ फूट त्रिज्येच्या गोलापर्यंत जाईल. रस्त्यावर हवे असल्यास दगड/फरशी लावता येईल.
५. असेच सात रस्ते करा.
६. सर्वात आतील ३ फूट गोलात एक दोन फूट खोल खड्डा करा. या खड्ड्यात विघटित व्हायला किमान सहा महिने लागतील (उदा - नारळाच्या काथ्या, तुराट्या, झाडांच्या फांद्या, उसाच्या चिवट्या) असे पदार्थ टाका. त्याच्या वर लवकर विघटित होणारे पदार्थ टाका (उदा: वाळलेली पाने, गवत, कापलेले तण). दर एक दीड महिन्यानंतर यातील खत काढून वाफ्यांमध्ये टाकता येईल.
७. सर्वात आतील खड्डा पूर्ण भरल्यावर त्यावर एक मोठा दगड ठेवता येईल. अंघोळ, कपडे किंवा भांडे धुणे यासाठी तो वापरता येऊ शकेल. याद्वारे ते पाणी वापरात येईल.
८. सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी बांबूचा मंडप करून त्यावर काथ्याची जाळी तयार करून, त्यावर वेल सोडा.
९. रस्ते सोडून जी जागा आहे त्यात खड्डे करून, माती, लवकर विघटित होईल असा कचरा, शक्य असल्यास तांदळाचा किंवा डाळींचा भुसा, शेणखत/गांडूळखत वापरून भुसभुशीत वाफे तयार करा. त्यावर जीवामृत टाका ज्याद्वारे जमिनीतील जीवाणू वाढतील. सर्व वाफे एकमेकांना जोडा, म्हणजे पाणी सगळीकडे जाऊ शकेल.

गंगा माँ मंडल तयार करताना खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
१. वेल वर्गीय भाज्यांना खूप जास्त वारं सहन होत नाही. त्यामुळे गंगा माँ मंडल वेगवान वारं नसेल तिथे तयार करावं.
२. इथे जास्तीत जास्त वेळ ऊन असले पाहिजे.
३. प्राण्यांपासून योग्य संरक्षण झाले पाहिजे. त्यामुळे शक्यतो याच्या भोवती कंपाउंड असावे.
४. घरगुती वापरातील खराब पाणी (अंघोळ, कपडे-भांडी धुणे) सहजपणे यात जाऊ शकले पाहिजे. या पाण्यात शक्यतो रसायने जाऊ नयेत. यासाठी साबण वापरावर जरा बंधन येईल.
५. वेलभाज्या या मंडपावरच वाढवाव्यात. रस्त्यात अथवा वाफ्यात नको. म्हणजे भाजीचा दर्जा चांगला राखला जाईल.
६.  गंगा माँ मंडल स्वयंपाकघराजवळ केल्यास तेथील पाणी, जैविक कचरा सहजपणे गंगा माँ मंडलात टाकणे सोपे जाईल.


चित्रातील आराखड्यात दिल्याप्रमाणे तुम्ही भाज्या आणि अन्य वनस्पती लावू शकता. पण तुम्ही ज्या भागात राहता किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार यात बदलही करता येईल. या १००० चौरस फुटात सुमारे ४० ते ५० प्रकारच्या वनस्पती लावल्या जात आहेत. या नवीन प्रयोगासाठी शुभेच्छा!

ही सर्व माहिती येथून घेतली आहे
तयारीचा फोटो फेसबुकवरील पोस्ट मधून घेतले आहेत

यातील औषधी वनस्पतींची माहिती खालील दुव्यांवर मिळेल -

Tuesday, June 25, 2019

भारतीय जल वन संवर्धन ६ - समारोप

काही वर्षांपूर्वी व्हिएतनामला गेलो होतो. तिथे एका शेतकऱ्याच्या कृषी पर्यटन केंद्रावर राहिलो होतो. मग साहजिक त्या शेतकऱ्याशी गप्पा झाल्या. तेथील पाऊस हा आपल्यासारखाच ४ महिने पडतो. त्यातही जुलै ऑगस्ट मध्ये जास्त असतो. बाकी वर्षभर पाऊस पडत नाही. तरीही ते लोक वर्षभर झऱ्याचं पाणी पितात. सोबत त्या गावाच्या जवळ असलेल्या धबधब्याचा मे महिन्यातला फोटो दिलेला आहे. कारण त्या धबधब्यांच्या आणि झऱ्यांच्या भोवताली दाट जंगल टिकून आहे.



मागच्या वर्षी मे महिन्यात आमचे मित्र विशाल आणि मीनाक्षी व्यास यांच्या शेतावर गेलो होतो. शेत साताऱ्याच्या जवळ आहे. तिथे असलेल्या पांदीजवळ एक झरा भर उन्हाळ्यात वाहता होता. स्वच्छ पाण्याचा खळखळ आवाज सुखावत होता. तेथील पांदीचा (झऱ्याचा मिळाला नाही) फोटो सोबत आहे. त्यात सहज दिसेल कि भोवताली छान झाडं आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात, खुलताबादहून म्हैसमाळकडे जायला निघालो कि घाट सुरु होण्याआधी उजवीकडे लंबेश्वर नावाचे शंकराचे मंदिर (गुहा) आहे. त्या गुहेच्या बाजूला साधारण २० वर्षांपूर्वी वर्षभर वाहणारा झरा/धबधबा होता. आज दिवाळीच्या आधीच तो कोरडा असतो. कारण त्या डोंगरावर आता जे पावसाळी गवत यायचं ते आता येत नाही आणि मोठी झाडं केव्हाच तोडली गेली आहेत.

आमच्या गावाची नदी/ओढा पावसाळ्यात एवढा जोरदार वाहायचा की माझी मावशी तिच्या लहानपणी त्यात वाहून जाणार होती. नंतर मार्च/एप्रिल पर्यंत त्यातून पाणी वाहत असायचं. नंतरही वाळूत एखाद्या फुटाचा खड्डा केला तर पिण्यायोग्य पाणीसहज मिळायचे. मे महिन्यात असा खड्डा करून पाणी पिल्याचे मलाही आठवते. आईच्या लहानपणी या ओढ्याच्या आजूबाजूला एवढी झाडी होती कि तिथे दिवसाही लोक सोबत असेल तरच जायचे. बिबट्या सहजच दर्शन देऊन जायचा. आता तुकड्या तुकड्यात झाडं आहेत पण सलग झाडी कुठेच नाही. त्यामुळे आज सप्टेंबर मध्येच कोरड्या झालेल्या ओढ्यातून एखादा लहान गुराखी गुरं घेऊन फिरतो...

दुष्काळ निवारणासाठी आपण नदीजोड प्रकल्पाबद्दल बोलत आहोत. आज युरोपात सगळीकडे नद्या जोडलेल्या आहेत आणि तरीही मागील काही वर्षांत इथे सतत दुष्काळ पडतोय. गेल्या वर्षीपासून आम्ही बेल्जियम मध्ये आहोत. इथे उन्हाळ्यात पाणी वापरावर निर्बंध असतात. पूर्वीची इथे जी जंगले होती ती तोडून फायद्यासाठी वेगात वाढणारे सूचिपर्णी वृक्ष इथे लावले गेले. त्यातून उत्पन्नही मिळायचं. पण त्याचा दुष्परिणाम मोठा झाला. या भागात मोठ्या प्रमाणात पानगळीचे वृक्ष असायचे. ती पाने जमिनीवर लवकर कुजायची आणि त्यात पाणी थांबून थांबून वाहायचं आणि जमिनीत मुरायचं. सूचिपर्णी वृक्षांची पाने जमिनीवर पडली तर ती लवकर कुजत नाहीत आणि पाणी त्यावरून वाहून जातं. इथल्या जमिनीला ते नकोय... आता येथील सरकारने नवीन वृक्ष लावताना केवळ स्थानिक पानगळीचे वृक्ष लावण्याची सक्ती केली आहे.

सोबत चित्रलेखा वैद्य यांची आकाशवाणीवरील मुलाखत आणि माहितीचा व्हिडीओ दिला आहे. त्यात त्यांनी सांगितलेली चिंताजनक बाब ही आहे की भारत हा सर्वाधिक भूजल उपसा करणारा देश आहे. इस्रायल मध्ये भूजलावर सरकारचा हक्क असतो. कुणीही विहिरीतून/बोअर मधून हवे तेवढे पाणी उपसू शकत नाही. युरोपात माझ्या एका मित्राला गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या प्लॉटवर बोअर करायचा आहे. त्याला ती परवानगी मिळत नाहीये. भारतात भूजल उपशावर नियंत्रण तर नाहीच, पण जमिनीला भोकं पाडण्यावर सुद्धा कोणते बंधन नाही. एका सोसायटीत आपण १० बोअर केलेले असतात. आपल्याकडे विहिरी ५० ते ७० फुटाच्या असतात. तेथील भूजल हे दर वर्षी पुन्हा भरते. बोअर २००-२५० फुटापेक्षा जास्त खोल असतात आणि काही भागात तर ३००-४०० फूट खोल असतात. ते पाणी गेल्या ५००-१००० वर्षात जमा झालेले आहे. ते आपण उपसून निसर्गाची नेमकी काय हानी करत आहोत हे अजून कळायचे आहे. त्या पाण्यामुळे कदाचित भूकंप होत नसतील... किंवा काहीही असू शकतं. पण आपण एवढे करंटे आहोत की याचा कोणताही विचार न करता जो बोअर वाला ५०० फूट खोल जाईल त्याला काम देतो. शिवाय बऱ्याच कंपन्या बोअर करून त्यांचे दूषित पाणी सरळ बोअरमधून टाकून देतात आणि भूजल मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतात.

भारतात किंवा महाराष्ट्रात नेमकं झालंय काय... पाऊस फार कमी नाही, पण अनियमित झाला हे नक्की. जेवढा पाऊस ४ महिन्यात पडायचा तो आता दोन महिन्यात, त्यातही काही दिवसांत पडतो. म्हणजे पावसाचे प्रमाण तेवढेच आहे, पण तरीही नदी/झरा/ओढ्यातील पाणी दिवाळीच्या आधीच संपून जाते. त्याचं साधं कारण म्हणजे आपण पाण्याला वेगात जाऊ देऊन मोठ्या जलाशयात अडवत बसलो. पाणी थांबवायचं नसतं तर त्याची केवळ गती कमी करायची असते. हा साधा निसर्गनियम आपण विसरून गेलो. पाणी सावकाश वाहिलं तर ते जमिनीची तहान भागवून पुढे जातं. पाण्याची गती कमी करण्यासाठी आणि त्याचं बाष्पीभवन होऊ नये, म्हणून वृक्षलागवड केली पाहिजे. फक्त खड्डे करून काहीच होणार नाही. एकूण वृक्षतोड इतकी प्रचंड आहे की यावर आता मोठी जन चळवळ करूनच मोठी वृक्षलागवड करावी लागेल. सरकारी पातळीवरून काही होईल याची वाट बघत बसण्यात काहीही अर्थ नाहीये.

मग करायचं काय...
१. आपल्या आजूबाजूला जी नदी, ओढा, झरा किंवा पाणंद असेल तिच्या भोवती स्थानिक झाडे लावली टिकवली गेली पाहिजेत.
२. जे काही बंधाऱ्याचे कामं झाले असतील त्या बंधाऱ्याजवळ झाडं आणि अगदी पाण्याजवळ गवतवर्गीय वनस्पती लावल्या पाहिजेत. परिणिता दांडेकर यांची पोस्ट बघा.
३. आपल्या गावात, शेतात, कॉलनीत जिथे जागा मिळेल तिथे, अगदी काही गुंठे असेल तरीही, सोप्या पद्धतीने निसर्गबेट निर्माण केले पाहिजे.


काय आहे निसर्गबेट?
सध्या शब्दात - वटवृक्ष, फळझाडे, संरक्षक झाडे, फुलझाडे आणि गवतवर्ग असे पाच वनस्पती प्रकारांचे आदर्श मिश्रण. यात एकरी प्रमाण: वटवृक्ष (५), फळझाडे (२००), संरक्षक झाडे (१००), फुलझाडे (१० गुंठे) आणि गवतवर्गीय (५ गुंठे). प्रमाण एकरी दिलं असलं तरी १० गुंठ्यांपासून निसर्गबेट बनवता येतं. पाण्याची उपलब्धता आणि निसर्गबेटाच्या आकारानुसार पाणी-गरजेचा ताळेबंद ठरवून उपाययोजना जसे की, तलाव/कुंड, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, समतल चर आणि बांधबंदिस्तीने जलसंधारण. हे निसर्गबेट वैयक्तिक, सामूहिक/सहकारी, भांडवली अथवा सरकारी स्तरावर सहज करता येऊ शकेल. निसर्गबेटाचे थेट आणि अप्रत्यक्ष अनेक फायदे आहेत. थेट फायद्यांमध्ये फळे, फुले भाजीपाला व्यवसाय करता येईल. अप्रत्यक्ष फायद्यांमध्ये कीड नियंत्रण, उंदीर/घूस नियंत्रण, मित्र कीटक वाढणे, जमिनीतील ह्युमस वाढणे, जमिनीची जलधारण क्षमता वाढणे असे अनेक फायदे आहेत. निसर्गबेटाचा ढोबळ आराखडा सोबत दिला आहे. त्यात आपापल्या गरजा आणि परिसर अभ्यास करून बदल करता येऊ शकतात. तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी उपेंद्र दादा, डॉ उमेश मुंडल्ये किंवा अशा अभ्यासू मंडळींशी संपर्क साधावा.

हा पावसाळा खूप उशीरा सुरू होत आहे. पुढचा अजून किती वाईट असेल सांगता येत नाही. त्यामुळे ही सगळी कामे आजच सुरू केली पाहिजेत. "पुढच्या पावसाळ्यात करू" असा विचार हा अविचारच असेल.

या लेखमालेचा शेवट नलेश पाटलांच्या कवितेने करतोय... विचार तर कराच पण कृतीही लवकर करा... धन्यवाद!

माझ्या झाडांची हिरवी किती सांगू मी थोरवी
तुम्हा देऊन सावली ऊन माथ्यास मिरवी

असा निमूट सोसला ताप दिसभर जरी
सांज होताच मायेने घेती पाखरांना उरी

पाय मातीचेच तरी आकाशाला गवसणी
झाडांमुळेच ह्या माझ्या मिळे पावसाचे पाणी

ऊन पाऊस वादळ धरी भोवताली फेर
फक्त झाडांनाच नाही त्यांचे स्वतःचे घर

नाही स्वतःहून कधी त्यांनी मागितले पाणी
कधी कळलीच नाही त्यांची सळसळ वाणी

वर्षभरात एकदा फक्त ढाळतात पाने
त्या पिवळ्या आसवाने तेव्हा जळतात राने

दुःख गिळोनिया पुन्हा फुलतात फळतात
घाव कुऱ्हाडीचे तरी जन्मभर छळतात

त्यांची करुनी कत्तल तुम्ही थाटली शहरे
सुकुमार भुईवरी त्यांचे बकाल शहारे

काय पाप त्यांनी केले तुम्हा सावली देउनी 
अर्धी लाकडे त्यांचीही गेली सरण होऊनी

पुढे लागणार नाही एक थेंबसुद्धा ओठी
खेळ सरतेशेवटी मांडा वाळवंटी काठी... 

Monday, June 24, 2019

भारतीय जल वन संवर्धन ५ - बारव

समाजभान, धार्मिकता, तंत्रशुद्धता, जलव्यवस्थापन आणि अप्रतिम स्थापत्यशास्त्र याचा सर्वोत्तम मिलाफ म्हणजे बारव. बारव बांधून देणे हे सामाजिक - धार्मिक काम असायचे. ती बांधताना भूजल किती आणि कुठे असेल याचा अचूक अंदाज बांधला जायचा. ते भूजल कसे टिकून राहील यासाठी नियम असायचे आणि स्थापत्यशात्राने ती बारव नयनरम्य, शांत आणि भर उन्हात प्रसन्न थंडावा असायच्या.

परमार राजा भोजाने ‘समरांगण सूत्रधार’ या इ.स. १००० मधील ग्रंथात बारवांची उपयुक्तता, त्यातील पाण्याची शाश्वतता आणि बारव-रचना याबाबत नियम लिहून ठेवले आहेत. वराहमिहिराच्या बृहत्संहितेत बारवांना कायमस्वरूपी पाणी राहण्यासाठी भूजलस्रोतांचे संशोधन आणि पुनर्भरण कसे करावे याबाबत चांगले मार्गदशर्न केले आहे. त्यावर काटेकोर अंमलबजावणी केल्याने बारवा या अखंड-जल-सौभाग्यवती राहत होत्या. महाराष्ट्रातील बारवांची निर्मिती ही मुख्यत्वे यादवकाळात झाली होती.





मराठवाड्यात अत्यंत जुन्या आणि सुंदर बारवा या कंधार (राष्ट्रकूट राजांची उपराजधानी), येरगी, धर्मपुरी, गणेशवाडी (चालुक्य सामंतांनी विकसित केलेली नगरे) अंबाजोगाई, चारठाणा, अंबड यांसारखी यादवकालीन जुन्या गावांमधून दिसतात.

त्या आजही वापरण्यायोग्य आहेत. यादव काळानंतर महाराष्ट्राला एका नवीन सांस्कृतिक आक्रमणाला तोंड द्यावे लागले. येथे संपूर्ण विध्वंसाची लाट आली. तेव्हा अशा स्थानांचे महत्त्व लोप पावले. मंदिरे, मूर्ती नष्ट केल्या गेल्या, पण उपयुक्ततेचे शाश्वत मूल्य असलेल्या बारवा मात्र काहीशा उपेक्षेने का होईना जतन केल्या गेल्या. त्यांचे पावित्र्य संपवले गेले, पण बारवनिर्मितीचा मूळ हेतू व नगररचनेतील त्यांचे स्थान कायम राहिले. बारवेजवळ किंवा आत मातृदेवता असतात - उदा: आसरा, चौसष्ट योगिनी. संस्कृतीच्या संदर्भात बारव स्थापत्याचे विशेष महत्त्व आहे. या बारवांच्या जवळ कुठेतरी ओढा असतो, कधी फार जुना तलाव असतो, एखादा डोंगर आणि त्यातून वाहणारा झरा असतो. हे स्रोत बारवेला जलसंपन्न करतात.

इस्लामी राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणानंतर जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झाले त्यानंतर पुन्हा बारवांचे महत्त्व राज्यकर्त्यांना उमगले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करताना त्यासोबत बारव बनवली. शिवाय अनेक गावांमध्ये बारव उभ्या केल्या. महाराष्ट्रातून काशीकडे जाणाऱ्या रस्त्यात प्रत्येक गावात लोकांना राहता येईल अशी मंदिरे/धर्मशाळा आणि सोबत पाणीव्यवस्था म्हणून बारव बनविण्यात आली. आजही या बारवा आपल्याला उत्तमरित्या पाणी पुरवठा करू शकतात. पण आपण त्यांना केवळ उपेक्षा देत आहोत.

बहुतेक सगळ्या गावांमधून आता नळाने पाणी घरापर्यंत येते. ते टाकीत जाते कोणत्यातरी धरणातून किंवा जवळच्या तलावातून. मग उन्हाळ्यात शहराची तहान भागवायची असल्याने पाणी शहराकडे जाते आणि गावांमध्ये टँकर्सने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ज्या जुन्या बारवा आहेत त्या आपण गावकऱ्यांनी कचराकुंडीसारख्या वापरायला सुरुवात केली आहे. जी बारव कुप्रसिद्ध ७२च्या दुष्काळात सुद्धा आटली नाही ती आज कचरा, प्लास्टिक आणि माती/दगड ढासळून वापरण्यासारखी राहिली नाही. ज्या ज्या गावांमध्ये बारव आहेत, त्यांनी ठरवले आणि ती बारव पुन्हा स्वच्छ केली तर निश्चित तेथील पाणी प्रश्न संपुष्टात येईल.

आम्ही पूर्वी औरंगाबाद मध्ये सिडको एन ६ मध्ये राहत असू. तेथे सिद्धार्थ चौकातून महाराणा प्रताप चौकाकडे जाताना एक बारव होती उजव्या हाताला. तिची कचराकुंडी झालेली होती. आमच्या गावात देखील जुनी बारव आणि खोल आड आहे. पण आज दोन्ही वापरात नाहीत आणि बारवेची पडझड झालेली आहे. सर्व गावकऱ्यांनी मनावर घेतले तर बारव आणि आड दोन्ही नीट करता येतील.

औरंगाबाद येथे श्री किशोर शितोळे यांची जलदूत नावाची संस्था आहे. त्यांनी तेथील सातारा आणि मुकुंदवाडी येथील बारवांचे पुनरुज्जीवन घडवून आणले (खाली लिंक्स दिल्या आहेत). आज त्या बारवा भर दुष्काळात पाणी देत आहेत. गरज आहे केवळ प्रेमाने आपल्या भारतीय परंपरेला सांभाळण्याची. गरज म्हणून तरी याकडे आपण बघितले पाहिजे.

बारवांवर लोकप्रभामध्ये उत्तम लेख आले होते. त्याच्या लिंक्स
१. पुरातन जलस्रोत बारवांची धूळधाण!
२. बारव नव्हे, परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण
३. आजही वापरता येतील मराठवाडय़ातील बारव

औरंगाबाद येथील जलदूतच्या काही बातम्या
१. ऐतिहासिक बारव पाण्याने ओसंडणार
२. साताऱ्यातील बारवेचे पाणी पिण्यायोग्य

Monday, June 17, 2019

भारतीय जल वन संवर्धन ३ - पंचवटी

पंचवटी हे नाव ऐकल्यावर सर्वप्रथम कुणाही भारतीयाला सहज रामायण आठवेल. राम, सीता आणि लक्ष्मण जिथे राहिले, जिथून रावणाने सीतेचे हरण केले, जिथे बलशाली गिधाड जटायूची रामाशी ओळख व मैत्री झाली... ती पंचवटी!

पंचवटी म्हणजे - पंचानां वटानां समाहार इति पंचवटी  - पाच वृक्षांना सामावून घेणारी.

पाच हा अंक एकूणच भारतीय संस्कृतीमध्ये अनेक ठिकाणी दिसतो.
पाच तत्त्व - पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
पाच ज्ञानेंद्रीय - डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा
पंचकोष - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष
पंचप्राण - प्राण, व्यान, समान, उदान, अपान
पंचशील - अहिंसा, अचौर्य, अव्याभिचार, सत्य, नशा न करणे
कोणत्याही बाबीची परिपूर्णता पाच या अंकाने होते. तसेच मोठ्या जंगलाचे परिपूर्ण लघुरूप म्हणजे - पंचवटी.

वड, पिंपळ, बेल, सीता अशोक आणि आवळा ही झाडे विशिष्ट पद्धतीने लावून पंचवटी वन तयार करता येते. या पाचही वनस्पतींचे औषधी गुण आहेत, या वनस्पती वातावरण शुद्ध ठेवतात, मोठ्या प्रमाणात सावली देतात, सीता अशोक हा सदा हरित असतो. या झाडांचे धार्मिक महत्त्वही आहे. बेलपत्र महादेवाचे तर पिंपळ विष्णूचे आवडते झाड आहे. अशोक म्हटले की रावणाच्या कैदेत असून मुक्त असलेल्या सीतेची आठवण होतेच. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातूनही ही झाडे उपयुक्त आहेत. कृमी, कीटक, मुंगळे/मुंग्या, पक्षी आणि अन्य लहान मोठे प्राणी या झाडांच्या आधारे राहतात वाढतात. कारण बेलफळ उन्हाळ्यात मिळते, तर आवळा पावसाळ्याच्या शेवटापासून पूर्ण हिवाळ्यात मिळतो. त्यामुळे पंचवटीच्या भोवताली कायम पक्ष्यांचा किलबिलाट सुरूच असतो.

पंचवटीचेही दोन प्रकार आहेत
१. पंचवटी - यात पाचही झाडे एक एक लावावीत. केंद्र स्थान निश्चित करून १० मीटरचे वर्तुळ करावे. उत्तरेला बेल, पूर्वेला पिंपळ, आग्नेयेला अशोक, दक्षिणेला आवळा तर पश्चिमेला वड लावावे.

२. बृहद् पंचवटी - यात ४ पिंपळ, २ आवळे, २५ अशोक, ४ वड आणि ४ बेल असे ३९ झाडे  लावावीत. यातही केंद्रस्थान निश्चित करून ५, १०, २०, २५ आणि ३० मीटर त्रिज्येचे वर्तुळ आखून घ्यावे. सर्वात बाहेरच्या गोलावर चार दिशांना चार पिंपळ, त्या आत दक्षिणेला दोन आवळे, त्याच्या आत सामान अंतरावर गोलाकार २५ अशोक, चार उपदिशांना (ईशान्य, आग्नेय, नैऋत्य व वायव्य) वड आणि सर्वात आतील गोलात मुख्य दिशांना चार बेलाची झाडे लावावीत.

साधारण ५ वर्षात ही झाडे स्वावलंबी होतात (पुन्हा पाणी घालण्याची वा अन्य काळजी घेण्याची गरज उरत नाही). त्यानंतर मध्यभागी आपण आपल्याला ज्यात रुची असेल ते करू शकतो - उदा: ध्यानकक्ष, मंदीर, निवांत बसायला ओटा किंवा अजून काही.

पुण्यात गोखले नगर येथे वन उद्यानात पंचवटी वनासह अनेक प्रकारचे जैववैविध्य असलेले उद्यान विकसित केलेले आहे.

Thursday, June 13, 2019

भारतीय जल वन संवर्धन २ - नक्षत्रवन

सत्तावीस मधून नऊ वजा केले तर नेहमीच्या गणितात अठरा उरतात. परंतु बिरबलाने याचं उत्तर शून्य दिलं आणि ज्याने आव्हान दिलं त्याला हरवलं. कारण सत्तावीस नक्षत्रांपैकी नऊ नक्षत्रात पाऊस पडतो. जर पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य असणार आहे.

मृग नक्षत्रापासून ते हस्त नक्षत्रापर्यंत पाऊस असतो. गेल्या काही वर्षात आणि याही वर्षी मृग नक्षत्र कमी पावसाचे जात आहे. महाराष्ट्रात रोहिणी नक्षत्रात (२२ मे ते ६ जून) पूर्वमौसमी पाऊस पडायचा. तेव्हा वर्तमानपत्रात "रोहिण्या बरसल्या" अशी हमखास बातमी असायची. तो आता मृग नक्षत्रात पडतो. म्हणजे सत्तावीस मधून एक वजा झालेला आहे, शून्य बाकी राहायला अजून आठच राहिलेत!

भारतीय संस्कृतीत पर्यावरणाचा विचार केलाय. राशी आणि नक्षत्र यांना वृक्षांची जोड दिली आहे. माणूस जन्मतो तेव्हा त्याची जन्मकुंडली तयार करण्याची प्रथा आहे. त्यात रास व नक्षत्र कळते. त्या व्यक्तीने त्या नक्षत्राचे जे झाड आहे ते लावावे आणि वाढवावे अशी व्यवस्था नक्षत्रवन संकल्पनेत केली आहे. यात व्यक्तिगत आपण काही झाडे लावू शकतो, किंवा संपूर्ण गाव मिळून नक्षत्रवन तयार करू शकते. नक्षत्रवनाचा संपूर्ण अभ्यास सुभाष बडवे यांनी केला आहे. त्यांच्या अभ्यासातून सिद्ध झालेले पुस्तक म्हणजे नक्षत्रवन. या पोस्टसोबत त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ देत आहे.









त्याशिवाय राशी/नक्षत्रानुसार झाडे आणि पर्यायी झाडांचीही यादी आहे. इच्छूकांनी पुस्तक मिळवून वाचा.


निगडी प्राधिकरण पुणे येथे सेक्टर २८ मध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान आहे. त्यात नक्षत्रवनाच्या आधारे झाडे लावली आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या उद्यानाला नक्की भेट द्या.

नक्षत्रवनाप्रमाणेच नवग्रह वाटिका सुद्धा पूजेसाठी तयार करता येते.

सर्वांनी वैयक्तिक स्तरावर आपल्या राशीची/नक्षत्राची झाडे लावा आणि वाढवा. चांद्र आणि सौर राशी आणि जन्म नक्षत्र यावर आधारित झाडे लावायची ठरवली तर किमान पाच झाडे लावून होतील. शक्य असेल तर गावाने/कॉलनीने एकत्र येऊन त्या पुस्तकातील आराखड्यानुसार संपूर्ण नक्षत्रवन तयार करा.

पुढील भागात पंचवटीवनाबद्दल थोडी माहिती.

भारतीय जल वन संवर्धन १

आमचं गाव औरंगाबाद जिल्ह्यातील. बिडकीन DMIC जवळ. दुष्काळ नेहमीचा म्हणावा असा झालेला. गेल्या वर्षी आमचा बंधारा पूर्ण झाला. पण एकच मोठा पाऊस पडल्याने बंधाऱ्यात साठलेलं पाणी महिनाभरात जिरून, वाहून, वाफ होऊन संपलं. सध्या विहिरी कोरड्याच आहेत. एखाद्याच विहिरीला पाणी आहे.

जिल्ह्यात आणि एकूण मराठवाड्यात पाणी फाऊंडेशनचे काम खूप झाले. सगळीकडे CCT चर केलेले असतात. पावसाळ्यात त्यात पाणी साठलेले दिसते आणि उन्हाळ्यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती. कारण पाणी जमिनीत जिरण्यापेक्षा त्याचे बाष्पीभवन जास्त होते. Awareness वाढणं आणि एकत्र येऊन श्रमदान करणं याशिवाय पाणी फाऊंडेशनच्या कामातून फार काही हाती लागलेलं दिसत नाही.

पण एकूण सेलिब्रिटी काम असल्याने शासनावर या कामाचा खूप परिणाम झालेला आहे. या वर्षी आमच्या गावात शासनाने JCB पाठवले आणि सगळ्या शिवारांच्या बांधाजवळ मोठे चर खोदले. त्यात बांधाजवळ जी मोठी झाडे आहेत त्यांची मुळं उघडी पडली/तुटली. ती झाडं आता किती टिकतील हे माहीत नाही. एकूण या कामामुळे दुष्काळ कमी होण्याऐवजी वाढेल हीच शक्यता दिसते.

फेसबुकवर उपेंद्रदादा Upendra Dada, डॉ उमेश मुंडल्ये DrUmesh Mundlye यांचे लेख / दिलेली माहिती आणि त्यांचं बरंच साहित्य वाचत असतो. शिवाय नक्षत्रवन सारखी पुस्तके वाचलीत. उपेंद्र दादांशी पाणी फाउंडेशनचं काम, मियावाकी, देवराई यावर वादविवाद पण झाले. यातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे एकूण सामान्य जनतेची भारतीय वनपरंपरा, जलपरंपरा यात असलेली माहिती तर कमी आहेच, शिवाय श्रद्धाही कमी होत चालली आहे.

मी पूर्वी मियावाकी वननिर्मितीची माहिती दिली होती. त्याला प्रतिसाद सुद्धा छान मिळाला होता. तो प्रयोग आम्ही आमच्या शेतावर करतोय त्यामुळे ते सांगणं सोपं होतं. आता उपेंद्रदादांच्या माहितीवर आणि माझं जे वाचन झालं आहे त्यावर आधारित भारतीय वन/जल परंपरांच्या बाबतीत लिहावं असा विचार आहे. या गोष्टी बघितलेल्या, वाचलेल्या आहेत - केलेल्या नाहीत. त्यामुळे लिहिणं अवघड असेल.



यात पंचवटीवन, देवराई, पाणंद (पांदी), नक्षत्रवन, बारव, तलाव यावर लिहिण्याची इच्छा आहे. या पावसाळ्यात यातील काही बाबी जर कुणाला प्रत्यक्षात आणता आल्या तर लिहिल्याचे सार्थक होईल.

Tuesday, March 12, 2019

मियावाकी वननिर्मिती पद्धत





माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती विकसित केली आणि अलगदपणे जैविक साखळीच्या बाहेर पडला. मग शेतीसाठी सुरू झाली जमीन आणि पाण्याची वाढीव गरज. जैविक साखळीतून बाहेर पडल्यामुळे इतर प्राण्यांपेक्षा संख्या वेगाने वाढत गेली. पुढे अमर्याद गरजा वाढत गेल्या. माणूस जसजसा पृथ्वीवर वाढत गेला तसतसे वनाच्छादित जमीन कमी होत गेली. माणूस जैविक साखळीतून बाहेर पडण्याआधी ९०%हून अधिक असलेलं जंगल आता केवळ ३१% राहिलं आहे.

या सगळ्याचे दुष्परिणाम आपण अवर्षण, अतिवृष्टी, तापमानवाढ, असमान पर्जन्यमान असं बघत आहोत. यावर जो काही एकमेव उपाय आहे तो म्हणजे पुन्हा एकदा झाडांची संख्या वाढली पाहिजे. ती नुसती वाढून चालणार नाही तर ती त्या त्या प्रदेशातील जे देशी वृक्ष आहेत ते वाढले पाहिजेत. त्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती प्रयत्न करत आहेत. त्यातून महाराष्ट्र सरकार सारखे एका वर्षी तेरा कोटी झाडं लावणं असेल, कर्नाटकातील झाडांची आई थिम्मक्का असेल, आसामातील जादव पयेंग असेल. हे सर्व आपापल्या क्षमतेला ताणून वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.

असाच एक प्रयत्न अकिरा मियावाकी यांनीही केला आहे. १९९३ मध्ये त्यांनी नैसर्गिक वननिर्मिती पद्धत विकसित केली. त्यातून प्रभावित होऊन भारतातील एक अभियंता शुभेन्दू शर्मा याने टोयोटामधील नोकरी सोडून afforestt नावाची कंपनी सुरू केली आणि त्याद्वारे तो मोकळ्या जागेत जुन्या जंगलांप्रमाणे जंगल बनवून देतो. हेही एक प्रकारे निसर्ग संवर्धनच आहे. शुभेन्दू ते स्वतः करताना कमर्शियली करतो एवढेच. पण मियावाकी अथवा शुभेन्दूने ही पद्धत लपवलेली नाही. कुणालाही सहजपणे कमीतकमी एक गुंठा जागेत या पद्धतीने जंगल तयार करता येईल.

आपल्याकडे साधारण ८०-९० च्या दशकात सामाजिक वनीकरण राबवल्या गेलं. त्यात सरसकट सगळीकडे सुबाभूळ हा परदेशी वृक्ष आणून लावला गेला. वेगात वाढ असल्याने ते वनीकरण छान असा सर्वांचा समज झाला. त्यापाठोपाठ अनेक विदेशी वृक्ष भारतात आले आणि येथील मूळ देशी झाडांवर त्यांचे अतिक्रमण झाले. निलगिरीमुळे तर कित्येक भाग ओसाड बनत गेले. औरंगाबाद येथील जेएनइसीच्या मागे निलगिरी लावल्यानंतर १० वर्षात तेथील नैसर्गिक तलाव कामातून गेल्याचं मी पाहिलंय.

दुसऱ्या बाजूला फळबाग लागवड सुद्धा बरीच झाली. यात देशी झाडेही लावली गेली. मुळात फळबाग लागवड ही वृक्षारोपण या सदरात धरायला नको. कारण एकाच प्रकारचे वृक्ष सलग लावले तर ते वन होत नाही. यात सेल्फ हीलिंग हा प्रकार नसतो. फळबागेला सतत पाणी देणे, झाडांची छाटणी, फवारणी - भलेही मग ती गोमूत्राची असेल - करावी लागते, खत द्यावं लागतं.

आपण कधी ट्रेकला जंगलात गेलो तर तिथे कुणी खत-फवारणी-छाटणी करत नसतं. तरीही तिथल्या झाडांना कीड लागली तर आपोआप जाते, फळं जास्त चवीची असतात, वाढ छान झालेली असते. हे कसं होतं? याचं शास्त्र - शोधलं नाही म्हणणार - पण वाचलं, समजून घेतलं ते मियावाकी यांनी. जंगलात वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतात. वृक्ष, वेली, पसरट-उंच, मध्यम आकाराचे, झुडूप, फक्त पावसाळी, परोपजीवी असे अनेक प्रकारचे. ते एकमेकांच्या बाजूला, जवळ वाढतात आणि एकमेकांना मदत करतात. त्यावर प्राणी पक्षी येतात - ते सुद्धा झाडांना मदत करतात. उदाहरणार्थ - तांबट आणि सुतार पक्षी हे झाडाला जर खोड अळी लागली असेल तर बरोब्बर ते ठिकाण शोधून, तिथे भोक पाडून त्यातून अळी अक्षरशः ओढून काढतात आणि खाऊन टाकतात. जंगलात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पूर्ण पोहोचत नाही तिथे जिवाणू पडलेल्या पानांचं खत करतात, जर मोठ्या काटक्या पडल्या असतील तर त्यांना जिवाणू खाऊ शकत नाही त्यावर बुरशी म्हणजे अळंबी (मशरूम) वाढतं आणि त्याचं विघटन होतं. लहान कृमी कीटक गांडूळ यात सहज वाढतात आणि झाडांना खत मिळतं. वडासारखी मोठी झाडे आपल्या पारंब्यातून जैविक उत्प्रेरक (एंझाइम) सोडतात आणि वडाखालची माती आपोआप पोषक बनते. हे परस्परावलंबन जंगलात बिनबोभाट सुरू असतं.

आता मियावाकी यांनी हीच झाडे जपान मध्ये बघितली नसतील. पण त्यांच्या निरीक्षणाचा बिंदू हाच की जंगलात - no management is best management. मग याच तत्वावर त्यांनी जंगलात झाडे जेवढी जवळ असतात तेवढीच जवळ लावली. सुरुवातीला त्यांना पाणी दिलं आणि तीन वर्षात - self sustainable - स्वसंधारणीय जंगल विकसित झालं. त्यानंतर ना तिथे पाणी घालावं लागलं ना त्याला खत फवारणी करावी लागली.

अर्थात या जंगलात जाऊन फळ तोडणं अवघड कारण एका गुंठ्यांत ३२० झाडे असतात, म्हणजे दोन झाडातील अंतर हे फूट अथवा मीटर एवढं कमी ठेवलं जातं. याची कारणं
. ती झाडे सोबत वाढली पाहिजेत.
. वाढताना ती स्पर्धा करत वाढली पाहिजेत म्हणजे वेगात उंची आणि मुळांची खोली वाढते.
. जंगल लवकर स्वावलंबी बनते.

आम्ही शुभेन्दू शर्माशी काही वेळा बोललो. शुभेन्दूचा विद्यार्थी आणि औरंगाबाद येथील सर्वात जुन्या नर्सरीचा - साकला नर्सरीचा संचालक - सागर साकलाशी सुद्धा चर्चा झाली. सागरला आम्ही एकदा प्रश्न विचारला की अशी स्पर्धा करत तर लहान झाडे पण उंच वाढतील. ती स्पर्धा थांबणार कशी? त्यावर त्याने खूप छान उत्तर दिलं - झाडांना कळतं कुठे थांबायचंय ते!

मियावाकी पद्ध्तीने जंगल लावायचं असेल तर पुढील पायऱ्या अवलंबव्यात
. त्यातून काही उत्पन्न मिळेल ही आशा सोडून द्यावी. या जंगलातून उत्पन्न आर्थिक नाही पण शाश्वत स्वरूपाचे मिळू शकते. म्हणजे
. त्या भागात प्राणवायूचे प्रमाण तिप्पट होते
. तापमान पाच अंश सेल्सिअसने कमी होते
. पाऊस वाढू शकतो
. जमिनीची धूप शून्यावर येते
. पडलेला पाऊस जास्तीत जास्त जमिनीत मुरतो - कमी पावसाच्या ठिकाणी आपण १००% मुरतो असेही बघू शकतो
. स्थानिक प्राण्यांना पक्ष्यांना निवारा मिळतो - ते शेतावर कीड पडू देत नाहीत आणि उंदरांसारख्या त्रासदायक प्राण्यांवर नियंत्रण मिळवता येते
. मधमाश्यांसारखे कीटक वाढतात - ते परागीभवनाला मदत करतात शेतीचे उत्पादन वाढते
. यातील माती ही जैविक विरजण (culture) म्हणून वापरता येते - एक एकरात एखादा पोतं माती युरियासारखी फेकली तर उत्पन्न हमखास वाढतं...

. कमीतकमी एक गुंठा जागा यासाठी ठरवायची. या जागेची रुंदी कमीतकमी १० फूट असावी. जर चौरस म्हणजे ३३ X ३३ करू शकला तर उत्तम.

. वृक्ष निवड करणे ही मोठी पायरी आहे. एका गुंठ्यांत ३२० झाडे लावताना ती स्थानिकच असावीत. किमान ४० प्रजातींची झाडे असावीत. झाडांचे चार ढोबळ प्रकार आहेत - पसरट वृक्ष, उंच वृक्ष, मध्यम वृक्ष आणि झुडूप. प्रत्येक प्रकारातील साधारण ६० ते १०० झाडे असावीत. हे करताना आपल्या भागातील साठीच्या वरच्या ज्येष्ठांची मदत घेतली तर खूप उपयोगी पडते कारण त्यांनी त्यांच्या लहानपणी ही सगळी झाडे बघितलेली असतात. महाराष्ट्रातील कमी ते मध्यम पावसाच्या भागात येणारी झाडांची यादी उद्या देईन.

. लावणीची जागा तयार करताना आधी या एक गुंठ्यांत एक मीटर खोल खड्डा करावा. नंतर त्या मातीत ४० विटा कोकोपीट, १००० किलो तांदळाचा भुसा, ट्रॉली शेणखत, ट्रॉली गांडूळखत असं मिसळून खड्डा पुन्हा भरून घ्यावा. त्यानंतर तो किमान - दिवस तसाच पडू द्यावा. यात कोकोपीट ऐवजी गहू-ज्वारीचे धांडे बारीक करून घातले तरी चालेल. तांदळाच्या भूशाच्या ऐवजी डाळीचा भुसा वापरला तरी चालेल. जे स्थानिक उपलब्ध असेल ते वापरावे. कोणतेही रासायनिक खत घालायची आवश्यकता नाही आणि घालूही नाही.

. निवडलेली झाडे साधारण एक ते दोन फूट उंचीची असावीत, म्हणजे सहा महिने ते एक वर्ष वयाची असावीत. झाडे लावताना एका प्रकारचे झाड त्याच प्रकारच्या झाडाजवळ लावू नये. म्हणजे पसरट झाडाजवळ दुसरे पसरट झाड नसावे, एका झुडपाच्या जवळ दुसरे झुडूप नसावे. ही झाडे एकमेकांपासून फूट म्हणजे जास्तीत जास्त एक मीटर अंतरावर लावावीत.

. लावणी झाल्यावर झाडांना आधाराला किमान फूट उंच आणि सेंमी व्यासाचा बांबू द्यावा.

. त्यानंतर संपूर्ण जमिनीवर ज्वारी, बाजरी, गहू - जे उपलब्ध असेल - त्या धांडाचे आच्छादन (mulching) करावे.

यानंतर आपण केवळ पाणी देत राहायचे. सुरुवातीला रोज १००० लिटर पाणी लागते. एकदा झाडे सहा महिन्यांची झाली की महिन्याला १५००० लिटर पाणी पुरते. म्हणजे १० दिवसातून एकदा ५००० लिटर. एक वर्षानंतर ही गरज अजून कमी होते आणि तीन वर्षांनंतर काहीच करावे लागत नाही. जंगल स्वतः स्वतःची काळजी घेतं आणि आपलीही!

आमचं शेत औरंगाबादपासून २५ किमी अंतरावर, बिडकीन या मोठ्या गावापासून किमी अंतरावर गिधाडा शिवारात आहे. सामान्यपणे कमी ते मध्यम पाऊस पडतो.

जेव्हा आम्ही शेतात जंगल लावायचं ठरवलं तेव्हा सुरुवातीला जागा नक्की केली.  शेतात सुमारे १५ गुंठे जंगल करायचं ठरवलं. पहिला टप्पा आणि प्रयोग म्हणून मागच्या वर्षी एक गुंठा जागेत जंगल लावलं.

नंतर झाडं ठरवताना आई आणि मामा यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या लहानपणी सहज दिसणारी आणि आता दिसणारी झाडं आठवून आठवून त्यांनी सांगितली. नंतर पुण्यातील प्रांजल नर्सरीच्या जोग काकूंनी अजून झाडं सांगितली. यादी निश्चित झाली ती साकला नर्सरीच्या सागर साकलाशी बोलल्यानंतर. कारण पुढील सर्व कामं त्याच्या मार्गदर्शनाखाली होणार होती.

जंगल लावताना आधी सांगितल्या त्या सगळ्या पायऱ्या पूर्ण केल्या. त्याशिवाय काही टिपिकल भारतीय गोष्टी त्यात वाढवल्या. माझ्या वडिलांच्या दोन आत्या आहेत. दोघीही जंगल लावताना उपस्थित होत्या. त्यांच्या हातून वड लावले. मामांनी विष्णूचा अवतार म्हणजे पिंपळ, त्याची पूजा करून पिंपळ लावलं. नंतर आम्ही सर्व मित्रांनी, सागरच्या मार्गदर्शनाखाली उरलेली झाडं लावली. आच्छादन झाल्यावर झाडांना श्री सुभाष पाळेकर गुरुजींच्या पद्धतीचे अमृतपाणी दिले आणि पुढे तीन महिने, महिन्यातून एकदा अमृतपाणी देत राहिलो.

नंतर पावसाळा संपल्यापासून १५ दिवसातून एकदा आणि या महिन्यापासून १० दिवसातून एकदा ५००० लीटर पाणी देत आहोत. याशिवाय कोणतीही मशागत केली नाही. आज नऊ महिन्यानंतर सर्व झुडूप - फूट, बाकी झाडं किमान फूट आणि कमाल १७ फूट एवढी झाली आहेत.

या जंगलात पक्ष्यांची संख्या वाढलीये. आमच्या भागातील वेडा राघू, पोपट, सातभाई, चिमण्या, टिटवी हे तर आहेच आणि वाढत आहेत. आता शिकारी पक्षी - ससाणा, घुबड येतील आणि कदाचित नामशेष होत आलेले गिधाडेही... आता मुंगूस सहज दिसताहेत. घोरपडी बऱ्याच प्रकारच्या या भागात आहेत, त्याही येतील कदाचित, माझ्या आजोबांनी या भागात साळिंदर पाहिलंय जे आम्हाला कधी बघायला मिळेल माहीत नाही, कदाचित या जंगलात ते येईलही... १५ गुंठ्यांत ४५०० ते ५००० झाडं लाऊन जंगल पूर्ण झालं की यातील काही गोष्टी तर नक्की होतील.

जपान मधील शेतीविषयक तत्त्वज्ञान हे भारतीय तत्त्वज्ञानाशी खूप मिळते जुळते आहे. जर फुकुओका यांचं "एका कडातून क्रांती" आणि मोहन देशपांडे यांचं "ऋषी कृषी" वाचलं तर फरक आणि साम्य दोन्हीही सहजच कळेल. बुद्ध या समान दुव्यामुळे आणि एकूणच पौर्वात्य संकृतीमुळे हे झालं असू शकतं. त्यामुळे मियावाकी पद्धतीला जराशी भारतीय फोडणी घालून आपल्यात घेऊन टाकावी.

मियावाकी यांची जशी जपानी पद्धत आहे तशाच वनीकरणाच्या काही भारतीय पद्धतीही आहेत. पंचवटी वन, देवराई आणि नक्षत्रवन. ज्यांना गावात एकत्रीकरण करण्यासाठी जागा करायची त्यांनी पंचवटी वन (पाच वृक्ष) तयार करावं, ज्यांना मुलांना खेळ, पांथस्थांना जागा, जरा फळबाग किंवा कृषी पर्यटनासाठी झाडं लावायची त्यांनी देवराई (साधारण दहा गुंठ्यांत ३०० ते ५०० झाडं) लावावी, ज्यांना भारतीय ज्योतिषशास्त्राची आवड असेल अशांनी नक्षत्रवन (नक्षत्र आणि राशीनुसार वृक्ष) लावावं आणि त्यांना जंगल उभं करावं वाटतं त्यांनी मियावाकी पद्धतीने जंगल उभं करावं. पण नवीन वननिर्मिती आणि संवर्धन नक्की करावं!





परिशिष्ट
जीवामृत (अमृतपाणी)
पद्मश्री श्री सुभाष पाळेकर यांच्या संशोधनातून...

परसबागेकरिता जीवामृत बनविण्याची पद्धती -
1) 20
लीटर पाणी
2) 1
किलो देशी गार्इचे शेण
3) 250
मिली देशी गाईचे गोमूत्र
4)  250
ग्रॅम गूळ
5) 250
ग्रॅम बेसन
6)
झाडाखालील मूठभर माती

हे मिश्रण काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घ्या ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवा कपड्याने तोंड घट्ट बांधून ठेवा. दिवसातून दोनदा सकाळ  संध्याकाळ काठीने ढवळा.
48
ते 72 तासांनी जीवामृत तयार होते.
हे तयार झालेले जीवामृत साधारणपणे 1 कप ते 1 ग्लास पर्यंत दर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी द्यावे.
जीवामृत 5 दिवसांमध्ये संपवून टाकावे. उरलेले जीवामृत माती मध्ये मिसळून टाका. कंपोस्ट करण्यासाठी किंवा झाडावर फवारणी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.




परिशिष्ट २ - महाराष्ट्रात कमी ते माध्यम पावसात लावता येण्यासारखी झाडे
अनुक्रमांक
प्रकार
Botanical name
मराठी नाव
1
पसरट
Acacia catechu
खैर
2
छोटे वृक्ष
Acacia leucophloea
हिवर
3
वृक्ष
Acacia nilotica
बाभूळ
4
पसरट
Aegle marmelos
बेल
5
पसरट
Ailanthus excelsa
महारुख
6
पसरट
Alangium salvifolium
अंकोळ
7
वृक्ष
Albizia lebbeck
काळा शिरीष
8
पसरट
Albizia procera
किन्हई
9
छोटे वृक्ष
Anogeissus latifolia
धावडा
10
वृक्ष
Azadirachta indica
कडूनिंब
11
वृक्ष
Bauhinia purpurea
कांचन
12
छोटे वृक्ष
Bauhinia racemosa
आपटा
13
वृक्ष
Boswellia serrata
सालई
14
छोटे वृक्ष
Bridelia retusa
आसणा
15
छोटे वृक्ष
Buchanania cochinchinensis
चारोळी
16
छोटे वृक्ष
Butea monosperma
पळस
17
वृक्ष
Cassia fistula
बहावा
18
छोटे वृक्ष
Cochlospermum religiosum
सोनसावर
19
छोटे वृक्ष
Cordia dichotoma
भोकर
20
छोटे वृक्ष
Dalbergia lanceolaria
फाशी
21
वृक्ष
Dalbergia latifolia
शिसम
22
वृक्ष
Dalbergia sisoo
शिसू
23
छोटे वृक्ष
Diospyros melanoxylon
तेंदू
24
छोटे वृक्ष
Dolichandrone falcata
मेडशिंगी
25
वृक्ष
Emblica officinalis
आवळा
26
वृक्ष
Erythrina suberosa
पांगारा
27
छोटे वृक्ष
Ficus amplissima
पिपर, पिपरी
28
छोटे वृक्ष
Thespesia populnea
भेंड
29
छोटे वृक्ष
Ficus microcarpa
नांद्रूक
30
पसरट
Ficus racemosa
उंबर
31
छोटे वृक्ष
Gardenia latifolia
घोगरा
32
झुडूप
Gardenia resinifera
डिकेमाली
33
छोटे वृक्ष
Garuga pinnata
काकड
34
वृक्ष
Gmelina arborea
शिवण
35
छोटे वृक्ष
Grewia tiliifolia
धामण
36
पसरट
Hardwickia binata
अंजन
37
छोटे वृक्ष
Heterophragma roxburghii
वारस
38
छोटे वृक्ष
Holarrhena pubescence
कुडा
39
वृक्ष
Holoptelea integrifolia
वावळ
40
झुडूप
Ixora parviflora
रायकुडा
41
वृक्ष
Lannea coromandelica
मोई
42
छोटे वृक्ष
Limonia acidissima
कवठ
43
पसरट
Madhuca latifolia
मोह
44
पसरट
Mangifera indica
आंबा
45
छोटे वृक्ष
Manilkara hexandra
खिरणी
46
पसरट
Mitragyna parvifolia
कळम
47
झुडूप
Morinda pubescens
बारतोंडी
48
छोटे वृक्ष
Nyctanthes arbor- tristis
पारिजातक
49
छोटे वृक्ष
Phoenix sylvestris
शिंदी
50
वृक्ष
Pongamia pinnata
करंज
51
वृक्ष
Prosopis cineraria
शमी
52
वृक्ष
Pterocarpus marsupium
बिजा
53
छोटे वृक्ष
Pterocarpus santalinus
रक्तचंदन
54
छोटे वृक्ष
Salix tetrasperma
वाळूंज
55
झुडूप
Salvadora persica
पीलू
56
पसरट
Sapindus laurifolius
रिठा
57
पसरट
Schleichera oleosa
कुसुंब
58
छोटे वृक्ष
Semecarpus anacardium
बिब्बा
59
पसरट
Soymida febrifuga
रोहन, रोहिला
60
छोटे वृक्ष
Sterculia urens
करू
61
वृक्ष
Stereospermum chelonoides
पाटल
62
वृक्ष
Syzygium cumini
जांभूळ
63
पसरट
Tamarindus indica
चिंच
64
वृक्ष
Tectona grandis
साग
65
वृक्ष
Terminalia arjuna
अर्जुन
66
पसरट
Terminalia bellirica
बेहेडा
67
पसरट
Terminalia tomentosa
ऐन
68
झुडूप
Trema orientalis
खरळ
69
छोटे वृक्ष
Wrightia tinctoria
काळा कुडा
70
छोटे वृक्ष
Ziziphus mauritiana
बोर
71
झुडूप
Capparis grandis
पाचुंदा
72
झुडूप
Carissa congesta
करवंद
73
झुडूप
Cassia auriculata
तरवड
74
झुडूप
Clerodendrum serratum
भारंगी
75
झुडूप
flueggea microcarpa
पांढरफळी
76
झुडूप
Helicteres isora
मुरूडशेंग
77
छोटे वृक्ष
Murraya koenigii
कढीपत्ता
78
झुडूप
Plumbago zeylanica
चित्रक
79
झुडूप
Vitex negundo
निर्गुडी
80
झुडूप
Woodfordia fructicosa
धायटी
81
वेल
Abrus precatorius
गुंज
82
वेल
Argyreia nervosa
समुद्रशोक
83
वेल
Asparagus racemosus
शतावरी
84
वेल
Caesalpinia bonducella
सागरगोटा
85
झुडूप
Combretum albidum
पिळूकी
86
झुडूप
Cryptolepis dubia
कावळी, सुपर्णिका
87
झुडूप
Gymnema sylvestre
मधुनाशिनी, बेडकी
88
वेल
Hemidesmus indicus var. Indicus
अनंतमुळ
89
बांबू
Bambusa arundinacea
कळक बांबू
90
बांबू
Dendrocalamus strictus
मेस बांबू
91
पसरट
Alstonia scholaris
सप्तपर्णी
92
पसरट
Anthocephalus cadamba, Anthocephalus indicus
कदंब
93
पसरट
Ficus benghalensis
वड
94
पसरट
Ficus religiosa
पिंपळ
95
पसरट
milingtonia hortensis
गगनमोगरा
96
झुडूप
Jasminum sambac
मोगरा
97
झुडूप
Nerium oleander
कण्हेर
98
झुडूप
Calotropis Gigantea
रुई
99
छोटे वृक्ष
Sesbania grandiflora
हादगा
100
छोटे वृक्ष
Commiphora wightii
गुग्गुळ
101
झुडूप
Justicia adhatoda
अडुळसा
102
झुडूप
Lawsonia inermis
मेंदी
103
छोटे वृक्ष
Balanites roxburghii
हिंगणबेट
104
झुडूप
thevatia
बिट्टी
105
झुडूप
Tabernaemontana divaricata
तगर
106
छोटे वृक्ष
Artabotrys hexapetalus
हिरवा चाफा
107
छोटे वृक्ष
Michelia champaka
सोनचाफा
108
छोटे वृक्ष
Mimusops elengi
बकुळ
109
छोटे वृक्ष
Ficus carica
अंजीर
110
छोटे वृक्ष
Annona squamosa
सीताफळ
111
छोटे वृक्ष
Psidium guajava
पेरू
112
छोटे वृक्ष
Punica granatum
डाळिंब
113
छोटे वृक्ष
Putranjiva roxburghii
पुत्रवंती
114
छोटे वृक्ष
Saraca indica, Saraca asoca
सीताअशोक
115
छोटे वृक्ष
Thespesia populnea
पारस पिंपळ
116
छोटे वृक्ष
Moringa oleifera
शेवगा
117
वृक्ष
Cassia fistula
अमलताश
118
वृक्ष
Lagerstroemia Indica
तामण
119
वृक्ष
Albizia procera
पांढरा शिरीष
120
पसरट
Adansonia digitata
गोरख चिंच
121
पसरट
Bombax ceiba
काटेसावर
122
छोटे वृक्ष
Garcinia indica
कोकम
123
वृक्ष
Millingtonia hortensis
गगनमोगरा
124
छोटे वृक्ष
Manilkara zapota
चिकू
125
वृक्ष
Artocarpus heterophyllus
फणस
126
पसरट
Sterculia foetida
भारतीय बदाम
127
छोटे वृक्ष
Citrus limetta
मोसंबी
128
पसरट
Terminalia chebula
हिरडा
129
वृक्ष
Bauhinia racemosa
हिरवा आपटा
130
छोटे वृक्ष
Myristica fragrans
जायफळ
131
छोटे वृक्ष
Garcinia Indica
आमसूल
132
वृक्ष
Citrus × sinensis
संत्री
133
वृक्ष
Annona reticulata
रामफळ
134
वृक्ष
Annona atemoya
हनुमानफळ
135
वेल
Jasminum officinale
जाई
136
वेल
Jasminum auriculatum
जुई
137
वेल

सायली
139
झुडूप

सोनकेळ
140
वेल
Acacia concinna
शिकेकाई
141
वेल
Piper betle
पानवेल
142
वेल
Piper nigrum
मिरी
143
झुडूप
Pandanus amaryllifolius
केकताड
144
झुडूप
lantana camara
घाणेरी
145
पसरट
Haldina cordifolia
हळदु
146
झुडूप
Agave americana
घायपात
147
झुडूप
Cestrum diurnum
कुंती / कामिनी
148
झुडूप

आंबटी
149
छोटे वृक्ष
Tabebuia rosea
वसंत राणी
150
झुडूप

शेम्बडी
151
झुडूप
Ocimum sanctum
तुळस




परिशिष्ट - आमच्या वनाची वाढ