Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

Friday, June 30, 2023

राजी २

बॉलिवूड उत्तम कथा सादर करताना माती खातात. अशीच एक उत्तम कथा, तीही सत्य घटना - सेहमत खान! त्यावरील पुस्तक Calling Sehmat आणि चित्रपट राज़ी.

जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा मला तो खूप आवडला होता (त्यावर मी लिहिलंही होतं, http://dnyanamhane.blogspot.com/2018/06/blog-post.html?m=1) रजित कपूर, जयदीप अहलावत, विकी कौशल आणि अर्थातच आलिया भट. सर्वांनी उत्तम कामे केली होती. पण अशात Calling Sehmat वाचलं. त्यानंतर मेघना गुलजारने नेमकी कुठं माती खाल्ली ते ठळक दिसून आलं. कथा जवळपास जशीच्या तशी दाखवली होती. सेहमतच्या आयुष्यातील पाहिलं प्रेम गाळलं होतं. ते एकूण वेळ कमी असल्याने गाळलं असेल असं वाटलं. त्याबद्दल फार काही चुकीचं आहे असंही वाटलं नाही. तिच्या हिंदू आई आणि वडिलांचं प्रेमप्रकरण सुद्धा महत्वाचं वाटलं नाही.

पुढे ती लग्न होऊन पाकिस्तानात जाते आणि तिथे जी हेरगिरी करते ते मात्र अगदी जसंच्या तसं सिनेमात पण दाखवलं आहे. एकच बाब जरा बदलली ती म्हणजे सेहमतचा नवरा इकबाल हा मूळ कथेत फार काही हुशार नाहीये, इथे तो मूळ कथेपेक्षा जास्त हुशार दाखवला आहे. पण तेवढंच. 

सगळ्यात जास्त कथेला धक्का दिला तो शेवटच्या सीन मध्ये (ज्यावर बरेच मीम सुद्धा तयार झाले). सेहमत शेवटी मीर (जयदीप) आणि अन्य भारतीय हेर ज्या घरात आहेत तिथे जाते. मूळ कथेत सेहमत इथे अजिबात कोसळत नाही. तिला स्वतःच्या कामगिरीचा अभिमान वाटत असतो. या सगळ्यात तिला अब्दुल आणि तिच्या दिराला मारावं लागलं आणि शेवटी इकबालसुद्धा मेला याचं तिला कुठेतरी वाईट वाटलेलं असतं, मात्र देशहितासाठी ते आवश्यक होतं हे तिला अगदी पटलेलं असतं. मात्र घरी परत आल्यावर तिला ते दुःख छळू लागतं. त्यानंतर ती अब्दुलच्या मूळ गावी घर घेऊन तिथे राहू लागते. तिला मूल होतं. पण तरीही ती त्या दुःखातून बाहेर येऊ शकत नाही. ते मूल तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर सांभाळतो. नंतर अचानक एक फकीर त्या गावात येतो. तिचं दुःख समजावून घेतो. तिला कृष्णभक्तीमध्ये रममाण करतो. तिची आई मूळ हिंदू आणि कृष्णभक्त असल्याने या सगळ्यात सहजपणे सोबत असतेच. तो फकीर तिला उपनिषदांवर प्रवचने देतो. त्यांच्या घरात कृष्णभक्ती नांदू लागते. घर जवळपास मंदिरच होतं. नंतर हळूहळू सेहमत त्या दुःखातून बाहेर येते.

आता हा कथाभाग मोठा आहे. सव्वादोन तासात किती आणि काय दाखवणार... अगदी बरोबर. हे दाखवणं शक्य नव्हतं तर ज्या क्षणी सेहमत कोसळली नाही त्या क्षणी तिला कोसळलेली दाखवणं हे तिच्यावर अन्यायकारक होतं. तिला ज्यावेळी स्वतःच्या कामगिरीवर अभिमान वाटत होता तिथे मेघना गुलजारने तिला कोसळलेली दाखवून देशहिताला essential evil करून टाकलं. अब्दुल, सेहमतचा दीर आणि नवरा यांना बिचारं केलं. भारतीय गुप्तचर यंत्रणेला गुन्हेगार बनवलं. एकूणच सिनेमात आलिया भट्टने अप्रतिम काम केलंय आणि हा सीन तर तिने जबरदस्त दिलाय. त्याचा impact खोल रुतून बसतो. ज्यामुळे देशहित essential evil असतं हे मनावर बिंबवलं जातं. आणि इथेच मेघना गुलजारने भयंकर माती खाल्ली आहे!

Friday, June 8, 2018

राजी

राज़ी
काही लोकांना हा सिनेमा पाकिस्तानची भलामण करणारा वाटला. कारण हे की त्यात पाकिस्तानी प्रेमळ कुटुंब दाखवलंय ज्याला भारतीय गुप्तहेरांनी फसवलं. एका अर्थाने हे खरंय. पण हा खूपच एकांगी विचार आहे.
या सिनेमाचा विषय होता एका सामान्य मुलगी, सहमत, देशासाठी गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते आणि तिथून आवश्यक ती माहिती कोणताही धोका पत्करून भारतात पाठवते. त्यासाठी ती तयार होते आणि शेवटपर्यंत आपला देश आणि कर्तव्य यापुढे सर्व गोष्टींना दुय्यम स्थान देत काम पूर्ण करते.
हा सगळा तपशील आपल्याला सहमतच्या बाजूने कळत राहतो. त्यामुळे सहजपणे "भारताने केलेल्या कारवाया किंवा कटकारस्थान" आपल्याला दिसते. पण ज्या गोष्टी सहमत पाहत नाही त्या आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे पाकिस्तानी सेना पंजाबी वर्चस्वासाठी बांगाल्यांवर अन्याय करते आहे, युद्ध सुरू झालेले नसताना INS विक्रांतला बुडावण्यासाठी गाझी पाणबुडीला पाठवत आहे, काश्मीर मधील मुसलमानांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे हे सहमत प्रत्यक्ष बघत नाही म्हणून आपल्याला ते प्रत्यक्ष दाखवलेही जात नाही. पण नीट बघितले तर हे सगळे संदर्भ त्यात दिसत राहतात. ते explicitly दाखवलंच पाहिजे हा अट्टाहास योग्य नाही.
जेव्हा इकबालला (सहमतचा नवरा) कळतं की सहमत हीच हेर आहे तेव्हा तो हदरतो. हे स्वाभाविक आहे पण नंतर तोच हे म्हणतो की "वतन के आगे कुछ नही". याचा अर्थ पाकिस्तानीही कट्टर दाखवले आहेतच.
या चित्रपटात जी गोष्ट महत्वाची आहे ती हीच की "वतन के आगे कुछ नही". एक अत्यंत सामान्य, साधी स्वप्न असलेली मुलगी देशासाठी मोठं दिव्य करायला तयार होते, मार्गातील अडचणी प्रसंगी जीव घेऊन दूर करते.

गुलजार यांचे सोपे शब्द, शंकर-अहेसान-लॉय यांची साधी चाल यातून साकारलेलं गाणं या चित्रपटाचं सार आहे.

ऐ वतन.. मेरे वतन..
ऐ वतन.. आबाद रहे तू
आबाद रहे तू.. आबाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू

मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. मेरे वतन
ऐ वतन.. मेरे वतन

तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
पहुंचू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू
पहुंचू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू मैं
जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. मेरे वतन..

ऐ वतन.. मेरे वतन
तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं
तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू

ऐ वतन.. ऐ वतन.. मेरे वतन.. मेरे वतन..
आबाद रहे तू.. आबाद रहे तू..
ऐ वतन.. मेरे वतन.. आबाद रहे तू..

https://m.imdb.com/title/tt7098658/

- ज्ञानेश

Friday, April 6, 2018

माझी कथा – राजू रस्तोगी


नमस्कार! मी राजू रस्तोगी. तोच... 3 Idiots मधला... त्या सिनेमात काही गोष्टी सांगितलेल्या, दाखवलेल्या नाहीत. आता बरीच वर्षे झाली आणि मीही पुढे काही करायचं ठरवत आहे. म्हटलं तुम्हाला सांगावं...

तुम्हाला सर्वांना माझी परिस्थिती माहित आहेच. पोस्ट मास्तर वडील, गरीब घर, लग्नाळू मोठी बहिण वगैरे. ते सर्व साधारण कॉलेजच्या सुमाराचे. मला नंतर नोकरी लागली. कम्मोचं लग्न झालं, तेही बिना हुंड्याचं. चांगला नवरा मिळाला तिला. मग २ वर्षात माझंही लग्न झालं. नंतर वर्षभरातच वडील गेले. आई कधी कम्मोकडे तर कधी माझ्याजवळ असते. चतुरने जेव्हा फोन केला तेव्हा तुम्ही माझ्या बायकोला नक्कीच बघितलं असेल. फुल्ल योगावाली आहे ती. ही गोष्ट तिची आणि माझी, रँचोशी पुन्हा भेट झाल्यानंतरची.

चतुर मुळे आमची पुन्हा रँचोबरोबर भेट झाली. आणि तिथून माझी अस्वस्थता बाहेर पडू लागली जी गेली अनेक वर्षे माझ्यात मी दडवून ठेवली होती.

मी चौथीत होतो. शाळेत बेंचवर ठेका धरणं हे शाळेतलं सगळ्यात आवडतं काम. एकदा आमच्या वरच्या शाळेतल्या संगीत शिक्षकांनी ते ऐकलं आणि मला बोलावून घेतलं. मग शास्त्रोक्त तबला शिक्षण सुरू झालं. घरी फक्त एक एक्सट्रा तास शाळेत थांबतो यापेक्षा अधिक माहित नव्हतं. माझी तबल्याची आवड वाढत गेली. मी आता नववीत होतो. अचानक एक दिवस वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला आणि नोकरी गेली. आधीच पगार तुटपुंजा होता त्यात पेन्शन अजून कमी. शाळेत विज्ञानाच्या सरांनी बोलावून घेतले. सांगितले की तुझा तबला छान आहे पण आत्ताच्या परिस्थितीत तू तुझ्या कलेतून कुटुंबाची गरज भागवू शकणार नाही. तुझ्या वडिलांची पेन्शन कमी, तुझी बहिण शिकत असताना छोटी मोठी कामं करून घराला हातभार लावत आहे. अशावेळी तू शालेय शिक्षणावर अधिक लक्ष दे. पुढे जेव्हा या कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होतील तेव्हा पुन्हा तबला सुरू कर. थोडी मलाही समज आलेली होती. मला ते पटलं आणि तबला बंद झाला.

१० वीत उत्तम गुण आणि १२ वी नंतर इंजिनीयरिंग. त्यापुढे तुम्ही बघितलं आहेच. माझे घरातले लोक तर विसरले होते की कधी काळी मी तबला वाजवायचो. याच दरम्यान मला खूप त्रास झाला तो रँचो सोबत. साला काबिल बनो इतक्या वेळा सांगत होता की कित्येकदा वाटायचे इंजिनीयरिंग सोडून पुन्हा तबल्याकडे वळावे. पण मग घर दिसायचे. फरहानचं सिक्रेट काही सिक्रेट राहिलं नाही. त्याच्यावर घराची कोणती जबाबदारीही नव्हती. त्यामुळे त्याला निर्णय घेणं जमलं. माझा निर्णय मात्र पक्का होता. रँचोला काही कळूच द्यायचं नाही. हातात भरमसाठ अंगठ्या आल्यामुळे तबला बंद होताच, मी तोंडही बंद ठेवले.

जवळपास दहा वर्षांनी रँचोला भेटलो. फरहान सुद्धा त्याच्या आवडीच्या क्षेत्रात रमला होता. मी काही फार मनाविरुद्ध करत होतो असं नाही. पण १००% मनाजोगं सुद्धा करत नव्हतो. या भेटीनंतर हे खूप तीव्रतेने वाटू लागलं. माझी अस्वस्थता बायकोने ओळखली. तिला सांगितलं. मी तबला वाजवायचो हे तिला माहीतच नव्हतं. मग तिला टेबलवर काही वाजवून दाखवलं. पुढे ती मागेच लागली की काहीही करून मी पुन्हा तबला शिकायला सुरुवात करायची. पस्तिशीत शिकावं की नाही या विचारात असताना तिने चांगल्या तबला शिक्षकाकडे माझा क्लास सुरू करून दिला.

सहा महिने शिकलो आणि मग आपली लाईफ स्टाईल आणि तिला लागणारे पैसे यावर विचार सुरू झाला. शेवटी निर्णय लागला की आताचे सेविंग्स आणि अर्धा पगार यावर नक्की घर छान चालेल आणि अर्धा वेळ तबल्याला मिळाला. पाच वर्षे अशी काढली आणि आता मी पूर्णवेळ तबल्यात करियर करायचे ठरवले आहे.

रँचोला त्यावेळी कळूच न देणं ही माझी आणि माझ्या कुटुंबाची गरज होती. सगळ्यांच्याच आयुष्यात जबाबदाऱ्या असतात आणि त्यामुळे काही आवडीच्या गोष्टी मागे पडतात. जेव्हा मार्ग मिळेल तेव्हा त्यातून आवडीच्या गोष्टीला वेळ नक्की द्या. रँचो सारख्या मस्तमौलाला हे सहज जमतं, फरहान सारख्याला थोड्या संघर्षाने जमतं आणि माझ्यासारख्याला संघर्ष आणि वेळ दोन्ही देऊन मगच मिळतं. पण इच्छा असेल तर मिळतं हे नक्की.

तुमच्या शुभेच्छा नक्कीच पाठीशी असतील. धन्यवाद!

-- राजू रस्तोगी.

Tuesday, March 20, 2018

माझी कथा - भैरवसिंग (चित्रपट - उडान)

मी भैरवसिंग. उडान मधल्या रोहनचा बाप. मला त्यात उगाचच व्हिलन दाखवलं आहे.
माझ्याकडे वडिलोपार्जित काहीच नव्हते. माझा कारखाना मी सुरू केला. त्यात मेहेनतीने पैसा कमावला. माझा भाऊ, जिमी, त्याला शिकवलं. लग्न झाले. रोहन झाला पण त्याची आई लगेच वारली. काही दिवस रोहनला एकटं सांभाळायचा प्रयत्न केला. पण जमलं नाही आणि खरं तर बायकोशिवाय मी राहणं मला अवघड होतं. त्याच्यावर सावत्रआईचा त्रास नको आणि त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून त्याला बोर्डिंगला पाठवलं. त्यानंतर लग्न केलं. दुर्दैवाने अर्जुन 5 वर्षांचा असताना त्याची आईही वारली. माझ्या दोन्ही बायका गेल्या पण माझं कुणी ना सांत्वन केलं ना मदत. बायकोच्या माहेरहून कोणी माझ्यावर कसलेही आरोप केले नाहीत हे माझं नशीबच म्हणावं लागेल.
रोहनला भेटायला मी काही वेळा बोर्डिंगला गेलो होतो. पण त्याला भेटण्याची हिम्मत झाली नाही. आणि तोही त्याच्या मित्रांमध्ये खुश दिसला. फुटबॉल छान खेळत होता. चांगलं वाटलं. परत आलो. म्हटलं मुलगा मोठा होतोय, शिकेल आणि आपल्या मेहेनतीवर कमावेल.
पण अचानक त्याने दारू पिऊन धिंगाणा केला, मास्तरांच्या खोड्या काढल्या आणि बरंच काही होऊन त्याला बोर्डिंग मधून काढून टाकल्याचं कळालं. पण तरीही त्याचं शिक्षण नीट व्हावं म्हणून मी त्याला इथल्या कॉलेजात ऍडमिशन मिळवून दिली. कठोर मेहेनत आणि करडी शिस्त त्याला पुन्हा रुळावर आणेल याची खात्री होती मला. कारण मी स्वतः तेच करून इथवर आलोय. पण हा कॉलेज मध्ये न जाता भटकत होता. माझ्या व्यायामाच्या शिस्तीला, अभ्यासाला तो त्याच्यावरचा अन्याय समजत होता. त्याला म्हणे लेखक व्हायचे होते. बेशिस्त, व्यायाम न करणारा, रात्री वडिलांचे पैसे चोरून, गाडी चोरून मित्रांबरोबर दारू पिणारा, सिगारेटी फुंकणारा हा तुम्हा प्रेक्षकांनापण अन्यायग्रस्त वाटला हे माझं दुर्दैव.
माझ्या चुका आहेत, मला मान्यही आहेत. दारू ही प्रमुख चूक. नशा जास्त झाला तर माझा कंट्रोल राहत नाही. अर्जुनला त्या दिवशी चुकून मारलं गेलं. मोठी चूक झाली. दुसऱ्या दिवशी बिझनेससाठी दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते. रोहन त्याचा मोठा भाऊ आहे. त्याच्यावर सोपवून गेलो. ते जाणे हे जबाबदारीतून पळणे नव्हतेे तर पुढील जबाबदाऱ्या घेण्यासाठी होते. पण रोहनने ही घटना फारच विचित्र पद्धतीने घेतली. मी पुन्हा एकटा पडू लागलो. जिमीला तर माझी शिस्त कधीच आवडली नव्हती. त्याने रोहनला समजावणे तर दूर पण उलट भडकावले. माझे एकटेपण दूर करण्यासाठी मी तिसऱ्या लग्नाचं ठरवलं. या सर्वांचा परिणाम म्हणजे रोहन खूप दूर गेला. त्याने लेखक बनण्यात मला काही अडचण नव्हती. पण शिक्षण पूर्ण करून, स्वतःच्या पायावर आधी उभं राहावं आणि मग काय वाटेल ते करावं एवढंच माझं म्हणणं होतं.
पण कठोर मेहेनत आणि करडी शिस्त म्हणजे वाईट असं मानणाऱ्या या पिढीला हा भैरवसिंग कळाला नाही.
एका गोष्टीचं बरं वाटलं ते म्हणजे माझ्या व्यायामाच्या बळजबरीमुळे रोहन माझ्यापेक्षा वेगात पळू शकला.
पोलिसात तक्रार केल्याने मला अर्जुन पुन्हा मिळू शकला नाही. I hope both are doing good...
मी दुसरीकडे नेहमी म्हणतो, "अक्सर जो दिखता हैं वो होता नही और जो होता है वो दिखता नही"
कधीतरी अर्जुन आणि रोहनला त्यांचा बाप कळेल या अपेक्षेत आणि प्रतीक्षेत

https://g.co/kgs/SSr4Pj

दि. २९ मार्च २०१७

रंग दे बसंती

उडत्या चाली त्या गाण्याला योग्य असल्या तरी काही वेळा अर्थ झाकून टाकतात. पण कधीतरी तो गीतकार त्या गाण्याबद्दल, त्या गाण्याच्या जन्माबद्दल बोलतो आणि ते गाणं पुन्हा ऐकलं की शब्दरचना संगीतापेक्षा जास्त आवडायला लागते. असंच एक गाणं “रंग दे बसंती” चित्रपटाचं शीर्षक गीत.
राकेश मेहरा प्रसून जोशीकडे रंग दे बसंतीचे शीर्षक गीत मागण्यासाठी आला. प्रसून जोशीने काही दिवस घेतले आणि राकेश मेहराला फोन केला. त्यात सांगितले की मी देशप्रेमाची रेसिपी लिहिणार आहे, चालेल का? राकेशचा प्रसूनवर विश्वास होता. आणि सुरू झाला एका सुंदर गाण्याच्या निर्मितीचा प्रवास. त्या शब्दांना अस्सल पंजाबी मातीची चाल संगीताच्या जादूगाराने लावली... ए आर रेहमान. त्यावर चित्रा आणि होम पीच वर खेळत असलेल्या दलेर मेहंदीने कहर केला आणि अप्रतिम गाणं बनलं!!!
या देशाची थोडी धूळ माती, थोडा सुगंधित, मुक्त, मनस्वी - मोकाट वारा, तो श्वास आणि ज्यात जुनून (प्रेमासाठी हौतात्म्य पत्करायला तयार) आहे असं रक्त. हे सगळं एकत्र कर. यातून जो रंग प्रकट होईल त्या बसंती रंगाने मला रंगवून टाक!
थोडीसी धूल मेरी धरती की मेरे वतन की
थोडीसी खुशबु बौराई से मस्त पवन की
थोडीसी ढूंढने वाली धक् धक् धक् धक् धक् धक् साँसें
जिन में हो जूनून जूनून वो बूंदे लाल लहू की
यह सब तू मिला मिला ले फिर रंग तू खिला खिला ले
और मोहे तू रंग दे बसंती यारा मोहे तू रंग दे बसंती
या रंगाने माझी स्वप्ने, माझा आनंद, माझी शेते आणि माझ्या सगळ्या पिढ्या, माझी गाणी आणि मनाचा ठाव रंगव.
सपनें रंग दे अपने रंग दे खुशियाँ रंग दे गम भी रंग दे
नस्लें रंग दे फ़सलें रंग दे रंग दे धड़कन रंग दे सरगम
और मोहे तू रंग दे बसंती यारा मोहे तू रंग दे बसंती
आता पुन्हा रेसिपी...
मध्यम आचेवर थोडं प्रेम ठेव, त्यात थोडे ओढे, नद्या, समुद्र घे आणि हे सगळं एका घड्यात एकत्र करून हलव. ('गागर में सागर' अशी म्हण सुद्धा इथे वापरली आहे, साठा उत्तराची कहाणी सारखी. हे सगळं प्रचंड आहे पण ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय.) त्यातून एक बसंती रंग तयार होईल, त्याने मला रंगवून टाक!
धीमी आंच पे तू ज़रा इश्क़ चढ़ा
थोड़े झरने ला थोड़ी नदी मिला थोड़े सागर ला थोड़ी गागर ला
थोड़ा छिडक छिड़क थोड़ा हिला हिला फिर एक रंग तू खिला खिला
मोहे मोहे तू रंग दे बसंती यारा
या रंगाने माझं गाव, माझी वस्ती, माझी ओळख – माझं स्वत्व, माझ्या शरीराची एकून एक नस, माझं बालपण – तारुण्य सगळं सगळं रंगवून टाक. आज आत्ता ताबडतोप रंगव... आता उशीर नको.
बस्ती रंग दे हस्ति रंग दे हंस हंस रंग दे नस नस रंग दे
बचपन रंग दे जोबन रंग दे अब देर न कर सचमुच रंग दे
रंग रेज़ मेरे सब कुछ रंग दे मोहे मोहे तू रंग दे बसंती यारा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दि. २६ जानेवारी २०१८

कायद्याचा टोला

पूर्वपीठिका - अभिजीत आणि हर्षवर्धन हे दोघे मित्र 2005 मध्ये जीवाची मुंबई करायला जात असताना एका प्रकरणात अडकतात. त्यात त्यांना अभिजीतचा वकील मामा केशव सोडवतो. या दरम्यान केशवला त्याची कॉलेज मधील मैत्रीण नेहा भेटते, मदत करते.
पुढे
केशव आणि नेहाचं 2006 मध्ये धुमधडाक्यात लग्न होतं. नेहाच्या वडिलांची अट केशवने पूर्ण केल्यामुळे ते कोणतीही नवी अट न लादता लग्न लावून देतात. लग्नात अभिजीत आणि हर्षवर्धन मात्र सहभागी होऊ शकत नाही कारण त्यांची शेवटच्या वर्षाची परीक्षा. केशव आणि नेहा गावी येतात आणि केशवचे शेतीमधील प्रयोग सुरू होतात. बीडमधील दुष्काळी भागात केशव शेती फुलवतो आणि सोबत गावातील अन्य शेतकऱ्यांनाही खूप मदत करतो. 2008 मध्ये त्यांना गोड मुलगा होतो.
2007 मध्ये अभिजीत आणि हर्षवर्धन इंजिनियर होतात. हर्षवर्धन त्याच्या बाबांच्या सोबत तालुक्याच्या राजकारणात जातो. त्याची दिशा मात्र अन्य राजकारण्यांपेक्षा वेगळी असते. त्यांच्यावर 3 वर्षांपूर्वी आलेल्या प्रसंगामुळे तो बदलून जातो आणि लोकोपयोगी कामे हीच दिशा ठेऊन राजकारणात उतरतो.
अभिजीतवरही पोलीस कोठडीचा परिणाम झाला. इंजिनिअर झाल्यावर नोकरी शोधण्याऐवजी तो IPSची तयारी करतो आणि 2008 मध्ये मुंबईत ACP अभिजीत वैद्य कामाला सुरुवात करतो.
मुंबई वरील 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी तो ड्युटीवर असतो आणि कामा हॉस्पिटल मधील अनेकांना वाचवतो. या वेळी त्याने दाखवलेले प्रसंगावधान त्याला महाराष्ट्र ATS मध्ये घेऊन जाते. तिथे अनेक केसेस वर काम करत अभिजीत आपले वेगळेपण सिद्ध करतो. (या दरम्यान त्याला एक मैत्रीण द्यायची असेल तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी द्यावी. मला तरी कथेची गरज वाटत नाही)
पुण्यात अचानकच 1 ऑगस्ट 2012 मध्ये 5 साखळी स्फोट झाले. अभिजीतची या केसवर नियुक्ती झाली आणि तो त्याच्या पद्धतीने काम करत होता. हर्षवर्धनच्या चांगल्या कामांमुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्यामुळे त्याला अनेक सुगावेही तरुणांकडून कळायचे. या प्रकारणाचाही सुगावा त्याला लागला आणि तो खूप मोठा होता. तेव्हाच त्याला हेही कळते की अतिरेक्यांना मुंबई लोकलमध्ये 2005 मध्ये स्फोट करायचे होते. पण नेमका 'तो' प्रसंग घडला आणि त्यांचा सगळा प्लॅन बारगळला. शिवाय केशवच्या हुशारीने आणि कोर्टाच्या दट्ट्याने ते पकडले गेले. पण पुरेश्या पुराव्यांशिवाय ते बेल वर सोडले गेले. त्यांनीच पुढे 11 जुलै 2006 ला लोकल मध्ये स्फोट घडवले आणि 26/11च्या हल्ल्यात कसाबच्या टोळीला मदत केली. हे सर्व अभिजीतला प्रत्यक्ष सांगणं आवश्यक होतं, फोनवर बातमी लीक होण्याची शक्यता होती. पण बातमी कुठूनतरी लीक झालीच आणि पुणे मुंबई प्रवासात हर्षवर्धनवर हल्ला झाला. त्यात 24 डिसेंबर 2012 ला हर्षवर्धन मारला गेला. हा हल्ला अपघात दाखवून हल्लेखोर फरार झाले.
सर्वांना हा अपघातच वाटला पण हर्षवर्धन च्या वडिलांना यात घातपात असावे असे वाटले आणि त्यांनी अभिजीतचा बोलावून घेतले. त्यांचे सगळे अंदाज त्यांनी अभिजीतला सांगितले. अभिजीत आता हात धुवून अतिरेक्यांच्या मागे लागला.
त्याच दरम्यान नेहा माहेरपणाला आपल्या 4 वर्षांच्या रोहनला घेऊन पुण्यात आली. एका मॉलमध्ये असताना कुतूहलापोटी रोहन दोन व्यक्तींच्या मागे जातो. ते तेच अतिरेकी असतात आणि त्या धावपळीत अतिरेकी रोहनला घेऊन पसार होतात. त्यांना जेव्हा रोहन हा केशवचा मुलगा आहे हे कळतं तेव्हा ते त्याला त्यांच्या अड्डयावर ओलीस ठेवतात.
सबइन्स्पेक्टर अंबिलढगेला 2005 मध्ये केलेल्या चुकीमुळे गडचिरोलीत बदली मिळालेली असते. तेथे मात्र ते आपली चमक दाखवतात आणि आपल्या शौर्याच्या बळावर लवकरच सिनियर इन्स्पेक्टर बनतात. पुढे पुण्यात त्यांची बदली होते आणि अभिजीतला मदत करायला ते पुढे येतात. अभिजीतही मागील गोष्टी विसरून या केसवर लक्ष केंद्रित करतो.
केशव पुण्यात येतो. पोलिसी पद्धतीने अभिजीत शोध घेत असतो पण आणखी काहीतरी करायला पाहिजे म्हणून केशव भाईला मुंबईत भेटतो. भाई त्याला पुण्यातील उस्मानला भेटायला सुचवतो.
एकीकडून अभिजीत आणि अंबिलढगे तर दुसऱ्या बाजूने केशव, नेहा आणि उस्मान गुन्हेगाराचा छडा लावण्याचा प्रयत्न करतात. (इथे अजित दळवी यांनी प्रसंग लिहावेत) अखेरीस सर्व पुराव्यांसह अतिरेकी पकडले जातात आणि रोहनचीही सुटका होते.
कोर्टात केस उभी राहते आणि पहिल्याच हिअरिंग मध्ये फडणवीस अशी काही सुरुवात करतात की न्यायाधीश म्हणतात हा आहे कायद्याचा टोला
कलाकार
अभिजीत - उमेश कामत
हर्षवर्धन - अक्षय पेंडसे
(हर्षवर्धनची भूमिका करणारा अक्षय पेंडसे अपघातात वारला. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असलेला एकही प्रसंग यात नाही. सर्व प्रसंगात तो फोनवर बोलतोय आणि दुसऱ्या बाजूने बोलणारा काय बोलतो त्यावरून हर्षवर्धन काय करतोय ते कळाले पाहिजे)
केशव - मकरंद अनासपुरे
नेहा - शर्वरी जमेनिस
हर्षवर्धनचे वडील - अरुण नलावडे
अंबिलढगे - गणेश यादव
भाई - संजय मोने
उस्मान - सिद्धार्थ जाधव
फडणवीस - सचिन खेडेकर
न्यायामीश - मोहन आगाशे
रोहन - कुणीही 4 वर्षांचे गुणी बाळ
अतिरेकी - बिना चेहऱ्याची 2 पात्रे
दि. १८ फेब्रुवारी २०१८