Friday, April 24, 2026

१७७१ : चिंकुर्लीची (मोती तलाव) लढाई - मराठा सामर्थ्य आणि पळपुटे हैदर व टिपू

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण भारताचे राजकारण तापले होते. एकीकडे मराठा साम्राज्याने पानिपतच्या जखमा भरून काढत पुन्हा उभारी घेतली होती, तर दुसरीकडे मैसूरचा हैदर अली आपल्या महत्त्वाकांक्षेच्या बळावर दक्षिणेत झपाट्याने विस्तार करत होता. यात ६ मार्च १७७१ रोजी झालेली चिंकुर्लीची लढाई हा एक निर्णायक टप्पा ठरला. इतिहासात फारसा चर्चिला न जाणारा, पण मराठा सामर्थ्याची खरी ओळख दाखवणारा.

माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीने मराठा साम्राज्याला नवजीवन दिले होते. त्यांच्या नेतृत्वात सैन्य पुन्हा संघटित झाले, सरदारांमध्ये शिस्त निर्माण झाली आणि मराठा साम्राज्याचा आत्मविश्वास परत आला. हैदर अलीने मराठ्यांशी केलेल्या करारांचे उल्लंघन करून उत्तरेकडील प्रदेशात घुसखोरी सुरू केली तेव्हा माधवरावांनी हे आव्हान स्वीकारले. दक्षिणेकडे मोर्चा वळवताना त्यांचा उद्देश फक्त बदला नव्हता; तो होता मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करणे.

मैसूरच्या सीमेजवळील चिंकुर्ली हे गाव त्या काळी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. आसपासचा प्रदेश सपाट, पण काही ठिकाणी दगडी टेकड्यांनी भरलेला होता. जिथे सैन्य लपवता येऊ शकत होते, अचानक हल्ले करता येऊ शकत होते. हैदर अलीने याच भौगोलिक फायद्याचा उपयोग करून मराठ्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत टिपूही होता. यावेळी टिपू २० वर्षांचा होता.

मराठा सैन्य चिंकुर्लीच्या दिशेने सरकत असताना हैदर अलीने आपल्या फौजा रचल्या, पण त्याला मराठ्यांच्या वेगाचा आणि शिस्तीचा अंदाज आला नव्हता. माधवरावांनी सैन्याची मांडणी इतक्या अचूकतेने केली होती की मैसूरच्या फौजांना प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. मराठ्यांच्या घोडदळाने केलेल्या झंझावाती हल्ल्याने हैदरची पहिली फळी अक्षरशः उडून गेली. तोल सावरायच्या आत दुसरी फळीही ढासळली. लढाई काही तासांतच निर्णायक वळणावर पोहोचली.

हैदर अलीला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाली. त्याने तातडीने माघार घेण्याचा निर्णय घेतला. टिपू त्याच्यासोबत होता. दोघांनीही रणांगण सोडून अक्षरशः पळ काढला. ही माघार नियोजनबद्ध नव्हती, तर जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड होती. मराठा सैन्याच्या वेगवान धडाक्यामुळे मैसूरच्या छावणीत गोंधळ माजला. अनेक सैनिक पळाले, काहींनी शस्त्रे टाकली, तर काहींना मराठ्यांनी बंदी बनवले.

याच गोंधळात हैदर कसा वाचला तेही मजेदार आहे. हैदर अलीच्या सैन्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला मराठ्यांनी पकडले. त्याचे रूप, पोशाख आणि त्याच्या आसपास असलेली गडबड पाहून मराठ्यांना क्षणभर वाटले की हा माणूसच हैदर अली असावा. या चुकीच्या ओळखीमुळे मराठ्यांचा पाठलाग काही काळ थांबला. आणि हा काही मिनिटांचा विलंबच हैदर अलीसाठी वरदान ठरला. तो आणि टिपू या दोघांना श्रीरंगपट्टणपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला वेळ मिळाला.

लढाई संपली तेव्हा रणांगणावर मराठ्यांचा संपूर्ण विजय उभा होता. हैदर अलीची फौज तुटली होती, त्याचे मनोबल खच्ची झाले होते आणि त्याच्या खजिन्यावर प्रचंड ताण आला होता. मराठ्यांनी त्याला शांतता करारासाठी भाग पाडले. या करारात हैदर अलीला तुंगभद्रेच्या उत्तरेतील सर्व प्रदेश परत करावे लागले, तसेच मोठी खंडणी भरावी लागली. इतकी की त्याचा खजिना जवळजवळ रिकामा झाला. हा पराभव हैदरसाठी अत्यंत अपमानास्पद होता.

चिंकुर्लीची लढाई फक्त एक सैनिकी विजय नव्हता; तो मराठा साम्राज्याच्या पुनरुत्थानाचा अजून एक निर्णायक पुरावा होता. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांची शक्ती संपली असे अनेकांना वाटत होते, पण माधवराव पेशव्यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि नेतृत्वगुणांनी हे सिद्ध केले की मराठा साम्राज्य अजूनही भारतीय उपखंडातील सर्वात प्रभावी शक्ती आहे. हैदरला राघोबादादाने चूक करून जी थोडी मोकळीक दिली होती ती माधवरावांनी दुरुस्त केली. चिंकुर्लीच्या विजयाने दक्षिणेत मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले आणि हैदर अलीसारख्या महत्त्वाकांक्षी शासकाला मर्यादा ओलांडण्याची किंमत काय असते हे दाखवून दिले.

आज या लढाईचा उल्लेख इतिहासाच्या मुख्य प्रवाहात फारसा आढळत नाही. पण ज्यांनी त्या काळातील मराठा–मैसूर संघर्षाचा अभ्यास केला आहे, त्यांना माहीत आहे की चिंकुर्ली हा एक टर्निंग पॉइंट होता. एक अशी लढाई ज्याने मराठ्यांच्या सामर्थ्याला नवा आत्मविश्वास दिला आणि दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलून टाकली. या लढाईत रणांगणावर उभा राहून माधवरावांनी दाखवलेली रणनीती, मराठा घोडदळाचा वेग अप्रतिम होता. चिंकुर्लीची लढाई मराठा इतिहासातील एक तेजस्वी अध्याय आहे.

संदर्भ : Tipu Sultan: The Saga of Mysore's Interregnum by Vikram Sampath

२२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा हा भारतीय समाजाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा होता. या प्रतिज्ञांनी नवबौध्द समाजाला "हिंदू" अस्मितेपासून दूर नेलं. आणि आता तर बाकी प्रतिज्ञा न आठवता so called डॉ आंबेडकर अनुयायी केवळ ४-५ प्रतिज्ञा लक्षात ठेवतात. या प्रतिज्ञांमधील मानसिक, नैतिक आणि सामाजिक पुनर्जन्म कुणी लक्षात ठेवत नाही आणि लक्षात घेतही नाही.

या प्रतिज्ञांमध्ये, बुद्धांच्या शिकवणीतील तीन महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणजे पंचशील, अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता, यांचा थेट समावेश आहे. 

१. पंचशील म्हणजे पाच नैतिक नियम. हे नियम कोणत्याही धर्मापुरते मर्यादित नाहीत; ते सार्वत्रिक मानवी मूल्ये आहेत. अहिंसा, सत्य, संयम, प्रामाणिकपणा आणि व्यसनमुक्ती—ही पाच तत्त्वे व्यक्तीला स्थिर करतात आणि समाजाला सुरक्षित करतात.
- अहिंसा मनातील क्रूरता कमी करते. हिंसा कमी झाली की समाजात भीती कमी होते आणि विश्वास वाढतो.  
- चोरी न करणे म्हणजे इतरांच्या हक्कांचा आदर. यामुळे परस्परांमध्ये सुरक्षितता निर्माण होते.  
- कामवासनेचा दुरुपयोग न करणे हे कुटुंबव्यवस्थेला स्थिर ठेवते.  
- खोटे न बोलणे समाजातील संवादाला पारदर्शकता देते.  
- मद्य व व्यसनांपासून दूर राहणे व्यक्तीचे आरोग्य, विवेक आणि कुटुंबातील शांतता टिकवते.
पंचशील म्हणजे स्वत:वर नियंत्रण ठेवून इतरांच्या कल्याणाचा विचार करणारे जीवन.

२. अष्टांग मार्ग हा बुद्धांनी मानवी जीवनाला दिलेला मार्ग आहे. यात विचार, वाणी, कृती, उपजीविका आणि मनाची शिस्त या सर्वांचा समतोल साधला जातो.
- सम्यक दृष्टि: व्यक्तीला अंधश्रद्धा आणि भीतीपासून मुक्त करते.  
- सम्यक संकल्प: करुणा आणि अहिंसेवर आधारित विचार निर्माण करतो.  
- सम्यक वाणी: कटू, खोटे किंवा हिंसक बोलणे टाळते.  
- सम्यक कर्म: म्हणजे नैतिक आणि समाजहिताचे आचरण.  
- सम्यक उपजीविका: इतरांना हानी न पोहोचवणारा व्यवसाय निवडण्याची प्रेरणा देते.  
- सम्यक प्रयत्न वाईट प्रवृत्ती कमी करून चांगल्या प्रवृत्ती वाढवतो.  
- सम्यक स्मृती: सजगता आणि आत्मपरीक्षण वाढवते.  
- सम्यक समाधी: मनाला स्थिरता आणि शांतता देते.
अष्टांग मार्ग म्हणजे मानसिक आरोग्य, सामाजिक सौहार्द आणि वैयक्तिक प्रगतीचा मार्ग.  

३. दहा पारमिता म्हणजे मानवी गुणांचे सर्वोच्च रूप. या गुणांचा विकास म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला उन्नत करण्याचा मार्ग.
- दान स्वार्थ कमी करते आणि सहकार्य वाढवते.  
- शील नैतिकता आणि विश्वासार्हता वाढवते.  
- नेक्कम्म/नैष्कर्म (त्याग) लोभ कमी करतो.  
- प्रज्ञा विवेक आणि तर्कशक्ती वाढवते.  
- वीर्य सकारात्मक कृती करण्याची ऊर्जा देते.  
- क्षांती/शांती क्षमाशीलता वाढवते.  
- सत्य नातेसंबंधातील विश्वास टिकवते.  
- अधिष्ठान ध्येयपूर्तीची ताकद देते.  
- मेत्ता (मैत्री) सर्व जीवांप्रती मैत्रीभाव निर्माण करते.  
- उपेक्षा (स्थितप्रज्ञता) समत्व आणि मानसिक स्थैर्य देते.
या पारमिता म्हणजे मानवतेचा सर्वोच्च नैतिक आराखडा आहेत.

आज या बौद्ध शिकवणी सोडून विद्रोही प्रतिज्ञांचा वापर केवळ विद्वेषासाठी केला जातोय. त्यामुळे जर कुणी विद्रोही प्रतिज्ञांबद्दल बोलायला लागला की, तिरंगा मधील नाना पाटेकर सारखं म्हणायचं - अगर भगवान बुद्ध की तीन शिक्षाओं का पालन किया हैं तो ही बाकी उन्नीस को हाथ लगाना।

पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता या प्रतिज्ञांतील सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि मानवी मूल्यांचा सार आहेत. त्यांचा अधिकाधिक प्रसार व्हावा.

सर्वांना डॉ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा