Tuesday, March 20, 2018

मैत्री आणि प्रेम

प्रेम एकतर्फी असू शकतं, मैत्री नाही. मैत्रीत सादाला प्रतिसाद देणं आवश्यक असतं. तसं नसतानादेखील जर मैत्री कायम असेल तर ती प्रेम, गरज किंवा स्वार्थ यात मोडते

#कुणीसं

दि. १ ऑगस्ट २०१७

मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो

लहानपणी मला अरे अरे ज्ञाना झालासी पागल... असं चिडवायचे. मग मुद्दाम हा अभंग लक्ष देऊन ऐकला - 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले'. स्वतः कोण आहोत हे कळले की माणूस पावन होतो. मग या आशयाच्या अभंग, गाणी यांच्याकडे लक्ष जाऊ लागले ते अगदी 'होता है आदमी को अपना ग्यान, कहेलाए वो शक्तिमान' सुद्धा याच अर्थाने ऐकलं.
मग पुढे बायकोमुळे मोस्लॉचा त्रिकोण कळाला. त्यातील self actualization आणि 'तुझे तुज ध्यान कळो आले' यातील समानता कळू लागली ती डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पुस्तकांमुळे.
त्यातच आधी वाचलेली काही पुस्तके परत वाचली गेली. त्यातील एक गोनीदांचे मृण्मयी. तिचा संघर्ष, कोकणात रमणं आणि शेवटी 'जे व्हायचे ते या झाडावेलींच्या साक्षीने होऊ दे' असं म्हणणं... हा सगळा तिचा 'स्व'च्या शोधाचा प्रवास वाटला. ध्रुव भट्टांच्या तत्त्वमसि, अकुपार मधील नायकांचाही शोध हा 'स्व'चा शोध होता. त्यांचा संघर्ष सुंदर होता, तितकाच त्या त्या व्यक्तीला आतून उन्मळून टाकून पुन्हा उभा करणारा होता.
संतांचाही असा प्रवास अनेक अभंगांमधून दिसतो. ज्ञानेश्वरांची 'दिन तैसी रजनी' ही विरहिणी ही कदाचित पहिली पायरी, मग 'कानडा ओ विठ्ठलू' मधील पाया पडू गेले, तर पाऊल दिसत नाही. सामोरा की पाठमोरा ते कळत नाही. क्षेम (आलिंगन) देऊ गेले तर मी ची मी एकली हा अनुभव. हे सगळं त्यांच्यासाठी किती त्रासाचं असेल. पण या सोबत त्यांना जी जाणीव झाली ती एकत्वाची, अद्वैताची. मग यातून 'ध्यान कळो आले'. अद्वैतात परमेश्वर आणि भक्त हे एकरूप झाले म्हणतात पण ज्ञानेश्वरांनी त्याही पुढे 'तुझा तूचि देव, तुझा तूचि भाव' हे सांगितलंय आणि देवाच्या एकत्वासोबत भावाचेही एकत्व सांगितले.
हा प्रवास सगळ्याच संतांच्या वाट्याला आला असणार. त्याचे अत्यंत भिडणारे शब्दरूप तुकोबांनी उभे केले आहे.
'चुकलिया माये बाळ हुरुहुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी'. किती अनिवार इच्छा प्रकट केलीये. पुढे वृक्षवल्लींच्या सानिध्यात 'अपुलाची वाद आपणासी' झाला असेल. स्वतः कसे आहोत हेही अगदी मोकळ्या मनाने स्वीकारले ते 'मन माझे चपळ, न राहे निश्चळ' या अभंगात. आणि अखेरीस 'आनंदाचे डोही आनंद तरंग'. पण या साखळीत कुठेतरी आपण हुकतोय असं वाटायचं. कारण स्व सापडतानाची जी वेदना असेल ती असलेला अभंग ऐकण्यात आला नव्हता (माझी कमतरता)
अशात एक चित्रपट पाहिला, वाय झेड. नाव ऐकून आधी बघितलाच नाही. नंतर सहज म्हणून पहिला आणि त्यात गजानन कुलकर्णी जो बदलत गेला ते भारी वाटलं. जेव्हा सगळं सोडून गजानन सुटतो तेव्हा backgroundला अभंग सुरू होतो
सावलीची आस ना, कोवळसे ऊन मी
सूर नाही संगती, एक तरीही धून मी
यात एक ओळ आली
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो
हे ऐकून ती साखळी पूर्ण झाली. स्वतःच स्वतःला व्यालो यापेक्षा कोणती वेदना मोठी असेल? आणि जन्मल्यावरच्या आनंदापेक्षा कोणता आनंद मोठा असेल? Just amazing!!!
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो


दि. २६ ऑगस्ट २०१७

अतरापी - पुस्तक परिचय

अतरापी: ध्रुव भट्टांच्या कल्पनाशक्तीतून आलेलं अजून एक अप्रतिम पुस्तक
आपण मराठीत ज्याला अत्राब म्हणतो तेच गुजराथी मध्ये अतरापी. शेतकरी मराठी बोलीत जित्राब आणि अत्राब हे शब्द येतात. शेतीसाठी उपयुक्त जनावरे म्हणजे जित्राब आणि उपयोगी नसलेले अत्राब. सरधोपट पाहिलं तर दोन कुत्र्यांची ही कथा. ते जन्मतात तिथपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत. दोघे भाऊ स्वतंत्र आणि वेगवेगळ्या विचारांचे. एक, याचं नाव कौलेयक, शिकून सवरून साधक बनतो तर दुसरा, याचं नाव सारमेय, न शिकता, पण समजावून घेऊन मोक्षाप्रत जातो.
मालक आणि पृथा या दाम्पत्याकडे सद्भाविनी नावाची एक कुत्री असते तिला ही दोन मुले होतात. कौलेयक शिकवू ते शिकणारा, मोठं होऊन कुणीतरी थोर 'बनायचं' असं ध्येय असलेला बनतो तर सारमेय त्याच्या नैसर्गिक भावनांना अधिक प्रगल्भ करत सभोवताल समजावून घेत राहतो.
सारमेय घरातून पळून जातो आणि त्याला अनेक लोक भेटतात. त्यांच्यासोबत जीवनानुभव घेत तो मोठा होत जातो. यात त्याचे अनेक संवाद/प्रसंग निव्वळ अप्रतिम आहेत.
घरी पृथा व माळी, हे दोघेच त्याला काही शिकवायला जात नाहीत. फक्त भवताल समजून घेण्यासाठी मदत करतात.
घराबाहेर पडल्यावर प्रथम त्याला एक घरंदाज कुत्रा भेटतो. तो सारमेयला हाकलतो आणि हा माझा इलाखा आहे असं म्हणतो. त्यावर सारमेय म्हणतो, "जो सोडून बाहेर जाणं असुरक्षित वाटतं त्याला तुम्ही 'इलाखा' म्हणता. असंच ना?" सहजपणे आपल्याला comfort zone कसा असतो हे सांगतो.
एका नदीकिनाऱ्यावर 'नदी कुठे आहे?' हा प्रश्न नदीचं सतत प्रवाही असणं अधोरेखित करतो.
शकू नावाच्या एका छोट्या मुलीकडे काही दिवस राहतो. तिथे त्याचा सत्कार होणार असतो पण त्यात गुंतायचं नसल्याने तिथून निघतो. त्यावर शकू पृथाला सांगते की तो अजून 'बंधनाच्या भीतीपासून मुक्त' झालेला नाहीये. बंधनात न राहणे हे बंधनाच्या भीतीचे बंधन असू शकते!
एका महादेव मंदिराच्या पुजाऱ्याकडे तो काही दिवस राहतो. तिथे अकस्मात मंदिरात सुवर्णपात्रे प्रकट होतात तशीच ती चोरीलाही जातात. चोरी झाल्यावर पोलिसात रीतसर तक्रार होते. एका मुसलमानावर चोरीचा आरोप होतो, पोलीस त्याला घेऊन जातात, त्याचा कोठडीत मृत्यू होतो. तेव्हा सारमेय पुजाऱ्याला विचारतो, "एका सकाळी भांडी प्रकट झाली, एक सकाळी अदृश्य झाली. या दोन सकाळींमध्ये तुम्हाला तक्रार नोंदविण्याजोगा मोठा फरक कोणता वाटला?" आणि पुजारी ते मंदिर सोडून निघून जातो. सारमेय आपल्या प्रवासाला लागतो.
सारमेय एका श्रीमंत पण एकट्या माणसाकडे राहतो. त्याच्या मुलाचे आणि त्याचे काही वाद असतात. ते सारमेयामुळे मिटतात. तेव्हा मुलगा सारमेयाला म्हणतो, "मी शिकलो नाही, मला समजलं आहे. शिकण्यापेक्षा समजणं अधिक उचित आहे, हे मी मान्य करतो."
हे आणि असं बरंच काही या पुस्तकात आहे. ते वाचणे हे मी लिहून सांगण्यापेक्षा अधिक उचित आहे

प्रयत्नवादी - दैववादी

आयुष्यात "दुसरी संधी" असं काही नसतं. प्रयत्नवादी लोक अत्यंत प्रतिकूल परिस्थिती स्वीकारतात, अथक परिश्रम करतात, त्यानंतर त्यांना जे मिळतं त्याला दैववादी लोक "दुसरी संधी" असं म्हणतात.

एका प्रयत्नवाद्याचे अपयश दुसऱ्या प्रयत्नवाद्यासाठी मार्गदर्शक ठरते तर दैववाद्यासाठी निराशाजनक

#कुणीसं

दि. २४ नोव्हेंबर २०१७

गंगाजमनी तहजीब

एक फुर्रोगामी मेसेज फिरतोय... त्याचे उत्तर
ताजमहाल कि तेजोमहाल हे माहित नसलेल्या लोकांसाठी ,
== ताज महाल की तेजोमहालय हे स्कॅनिंग आणि सगळे ताज मध्ये असलेले दरवाजे उघडून स्पष्ट होईल. ते काम संशोधकांचे आहे. मी त्यात पडणार नाही. आणि योगी आदित्यनाथ यांनी एक मुद्दा स्पष्ट केलाय तो म्हणजे ताज भारतीयांनी बांधला आहे. भारतीय वास्तुकलेचा (मुस्लिम प्रभाव असलेला) तो एक उत्तम नमुना आहे. एवढं कारण ताज ला आपलं मानण्यासाठी more than sufficient आहे.
पण त्याखाली शहाजहानच्या प्रेमाचे गोडवे गायले जातात ते चुकीचे आहे. एका बाईच्या नवऱ्याला मारून तिच्याशी निकाह करायचा, तिला १७ वर्षांत १४ वेळा प्रसूती सहन करायला लावायची, त्यात १४व्या वेळी ती मरते, नंतर तिच्या बहिणीशी निकाह करायचा... यात मुमताज वर असलेलं प्रेम कुठे आहे? पण हे विचारणं इतिहास असला तरी सोयीचं नाही.
---
तक्रार , फिर्याद ,गुन्हा शब्द माहितेय का ? ह्या शब्दांचा वापर मराठीत सरकारी भाषेत सहजपणे केला जातो त्याच मूळ माहितेय का ? किंवा त्याचा मराठी प्रतिशब्द माहितेय का ?
== नाही माहीत. भाषा ही अन्य भाषांमधून नवे शब्द घेऊन समृद्ध होत असते. जी भाषा हे नाकारते ती मृत होते.
---
आंब्याच मूळ माहितेय का ?
गुलाबाच मूळ माहितेय का ?
== आंबा पूर्व भारत आणि म्यानमार
== गुलाब मेक्सिको आणि उत्तर आफ्रिका
याचा ताजशी काय संबंध आहे ते माहीत नाही. उगा प्रश्न अनुत्तरित राहू नये म्हणून सांगितले
---
ज्या मुघल खानदानीच्या नावाने कडाकडा बोट मोडली जातात त्या अकबराच्या सेनापतीच नाव राजा मानसिंग होत हे माहितेय का ?
== माहितीये ना. म्हणून मानसिंगला आम्ही महाराणा म्हणत नाही तर केवळ प्रतापांना महाराणा म्हणतो. जे परकीय अकबराच्या विरोधात लढले होते.
---
अकबराच्या दरबारातली नवरत्न माहितेय का ? तानसेन माहितेय का ?
लहानपणी ज्याच्या गोष्टी वाचून मोठे झालोय तो बिरबल कुणाच्या पदरी काम करायचा माहितेय का ?
== अकबराच्या दरबारात होते. जेव्हा अकबराला लक्षात आले की आपण केवळ मुस्लिम म्हणून भारतात राज्य करू शकत नाही तेव्हा दीने इलाही ची सुरुवात त्याने केली. पहिल्या ६० वर्षातला अकबर आणि नंतरचा अकबर यात खूप अंतर आहे. पाहिले ६० वर्ष दडवून ठेवले जातात करण ते पुरोगाम्यांना सोयीचे नाहीत.
---
हळदीघाटी च्या लढाईत जेव्हा मानसिंग अकबराचा सेनापती होता तेव्हा राणा प्रतापाचा सेनापती कोण होता ?
हाकिम खान सुरी हा पश्तून लढवय्या राणा प्रतापाचा सेनापती होता हे माहितेय का ?
== So what?
---
हिंदू व्यापारी सुरक्षितपणे व्यापार करावेत आणि प्रवास करावेत म्हणून त्यांना संरक्षण देणारा आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावून, पाण्याची व्यवस्था करून सराया बांधणारा शेरशहा सुरी माहितेय का ?
== Good. पण हे केवळ हिंदू व्यापाऱ्यांसाठी नव्हतं तर सगळ्याच व्यापाऱ्यांसाठी होतं. आणि त्याच बरोबर केवळ हिंदूंवर औरंगजेबाने लावलेले जिझिया सारखे कर सुद्धा माहीत आहेत.
---
मुघलांच्या कबिल्यात सगळ्यात जास्त विवाहसंबंध करणाऱ्या राजपुतांचा इतिहास माहितेय का ?
== राजपुतांनी महाराणा प्रतापांनंतर मुघलांना विरोध केलाच नाही. त्यांनी मुघली पद्धत आत्मसात केली आणि विवाहसंबंध वाढवले. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठलाही आदर बाळगण्याची गरज वाटत नाही.
---
खापरी नळाने खडकी गावाला आणि अहमदनगर शहराला पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करणारा हबशी मलिक अंबर माहितेय का ?
शेतसारा , जमीन मोजणी ह्या प्रशासकीय कामात सुसूत्रता आणून राज्यकारभार करणारा मलिक अंबर माहितेय का ?
== मलिक अंबर चांगला होता. त्याने शहाजी राजांना बरीच मदत केली होती. त्याचे अनुकरण नानासाहेब पेशव्यांनी करून कात्रज तलावातून पुण्यात पाणी व्यवस्था केली.
---
शिवाजी महाराजांना पराभूत करून तह करून आग्र्याला यायला लावणारा मिर्झा राजे जयसिंग माहितेय का ?
== माहीत आहे. पण मग शिवाजी महाराजांनी गंगा जमनी तहेजीब म्हणून औरंगजेबापुढे मान नाही झुकवली. परत येऊन २३ किल्ले परत घेतले आणि त्यापुढे पहिल्या बाजीरावाने दिल्लीला धडक दिली.
---
दिल्लीच्या बादशहाच्या बरोबर केलेल्या कराराच पालन करायला पानिपतावर प्राण देणारे सव्वा लाख मराठे माहितेय का ?
पानिपतावर खंडण्या भरून मराठा सरदारांची प्रेत ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणारा सुजा माहितेय का ?
== याच सुजाला सदाशिवराव भाऊंनी अब्दाली बाहेरचा आहे आणि तू भारतीय आहे. त्यामुळे अब्दालीला मदत न करता तू आम्हला मदत अशी विनंती केली. पण नजीब खानाच्या नादी लागून सुजाने अब्दालीला केवळ मुस्लिम आहे म्हणून मदत केली आणि त्याचे सैन्य मराठ्यांच्या विरोधात लढलं, मराठ्यांना मारलं आणि मग अंत्यसंस्कार केले. आम्हाला हे सुद्धा माहीत आहे.
---
१८५७ ला इंग्रजांच्या विरोधात लढलेली लढाई ज्याच्या नेतृत्वाखाली लढली तो बहादूरशहा माहितेय का ?
== कारण दिल्ली दरबाराशी झालेले करार मराठे १८५७ मध्ये पण पाळत होते. म्हणून दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांनी बहादूरशहाचे नेतृत्व पुढे ठेऊन सगळी तयारी केली.
---
आजही ग्रामीण महाराष्ट्रात गावच्या पिराला पहिली चादर आणि शेरणीचा मान हिंदू कुटुंबाला असतोय हे माहितेय का ?
== मुळात पीर ही संकल्पना मुस्लिम विरोधी आहे कारण ते प्रतीक पूजन आहे. पण काही सुफी संत आणि हिंदू संत यांनी तो केलेला एक ऐक्याचा प्रयत्न आहे. म्हणून कट्टर सुन्नी कधीही पिराला जात नाही. मुहर्रम मध्ये ताबूत नाचवत नाही. त्यामुळे प्रतीक पूजेला हिंदू असणं हे सामान्य आणि सहजमान्य आहे.
---
हि यादी लांबवत नेली तर पाच पन्नास नाही तर शेकडो पान कमी पडतील.
इतिहास कधीही सोयीचा नसतोय. इतिहासाची थडगी उकरायला गेल कि आपल्याला सोयीचे असणारे सांगाडे जसे सापडतात तसेच गैरसोयीचे सांगाडे हातात हात घालून उकरून वर येतात.
== Exactly. म्हणूनच
१. शिवाजी महाराजांनी मंदिर पाडून उभी केलेली मशीद जमीनदोस्त केली व पुन्हा मंदिर उभारले हे सांगितले जात नाही
२. हैदर अलीला नानासाहेब, माधवराव पेशव्यांनी किती वेळा हरवले हे सांगितले जात नाही
३. टिपू सुलतान किती क्रूर होता आणि त्याने हिंदूंना संपवण्याचे काय प्रयत्न केले हे समोर येत नाही. समोर येते ते त्याने आपले राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांना विरोध केला ते, आणि त्यालाच भारतमातेसाठीचे स्वातंत्र्ययुद्ध म्हटले जाते.
४. पण टिपूच्या न्यायाने दुसऱ्या बाजीरावाने त्र्यंबक डेंगळे यांच्यासोबत इंग्रजांना दिलेली लढत दाखवली जात नाही. इथे इंग्रजी सैन्याच्या महार रेजिमेंटचा पेशव्यांवरील विजय आजही साजरा होतो.
५. औरंगजेबाने काशीचे मंदिर पाडले आणि तिथे ज्ञानवापी मशीद बांधली ये ऐतिहासिक सत्य बोलायचेही नसते
६. संभाजी महाराज आणि त्यांचा मित्र कवी कलश यांना हाल हाल करून मारले हे कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात नसतं. आपल्याकडील काही मुस्लिम अजूनही औरंगजेबाला सुफी संत म्हणतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही.
हे आणि असे अनेक सांगाडे गंगा जमनी तेहजीब म्हणून गाडलेले आहेत आणि ते खरे इतिहास जाणणारे, संघ आणि हिंदुत्ववादी लोक उकरून काढत आहेत. यात सोयीचे सांगाडे असावेत म्हणून हा उद्योग सुरू नाहीये तर खरा इतिहास लोकांना माहीत असावा म्हणून सुरू आहे.
------
हि गंगा जमनी तेहजीब भारताची खरी संस्कृती आहे.
हे धागे एवढे घट्ट विणलेले आहेत कि जे उसवायला गेलात तर तुमची बोटच काय तुम्हीही उखडून पडाल.
== वर दिल्याप्रमाणे खरा इतिहास जेव्हा जनतेसमोर येईल तेव्हा जनताच खोटा इतिहास पसरवणाऱ्यांची बोटं उखडायची की त्यांना आख्खं उखडायचं ते ठरवेल. एखाद्या गोष्टीची शांतपणे वाट पाहणे यात संघवाल्यांपेक्षा अजून केवळ शास्त्रज्ञच पुढे आहेत. त्यामुळे वाट बघू.

दि. ३१ ऑक्टोबर २०१७

'ए'ग्रेडी आणि 'बी'ग्रेडी



जेव्हा सगळे भारतीय नि:संदिग्धपणे A गट निवडतील तो दिवस सोन्याचा


दि. २२ नोव्हेंबर २०१७

मराठी/हिंदू/भारतीय कालगणनेची थोडी माहिती

१. महिन्यांची नावे - आपल्या महिन्यांची नावे नक्षत्रांवरून दिलेली आहेत. जेव्हा चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रात (किंवा जवळ) असतो त्या नक्षत्राच्या नावावरून महिन्याचे नाव असते.
उदा: चित्रा - चैत्र, विशाखा - वैशाख, ज्येष्ठा - ज्येष्ठ, मृग - मार्गशीर्ष
२. अधिक मास - आपले महिने हे चंद्रकलेवर अवलंबून असतात. सौर आणि चांद्र मासात साधारण ०.९ दिवसाचे अंतर एका महिन्यात पडते. त्यामुळे दर ३ वर्षांनी हे अंतर match करण्यासाठी अधिक मास असतो. अधिक मास केवळ पहिल्या सात महिन्यातच असतो, म्हणजे चैत्र ते अश्विन हे महिने अधिक मास म्हणून येतात त्यापुढील नाही.
हिजरी कालगणना (मो. पैगंबरांनी जेव्हा मक्केतून मदिनेत पलायन - हिजरात केलं त्या दिवसापासूनची कालगणना) ही सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. पण त्यात अधिक मास नसतो. म्हणून दर ३ वर्षांनी एकत्र येणारे हिंदू व मुस्लिम सण बदलतात. मात्र चिनी कालगणना चांद्र असूनही त्यात अधिक मासासारखी व्यवस्था असल्याने ग्रेगोरियन कालगणनेनुसार ते पुन्हा जुळते.
३. तिथी निश्चिती - आपले काही सण हे चंद्र उगवताना त्याची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात तर काही सूर्य उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असतात. जसे संकष्टी चतुर्थी ही चंद्र उगवताना चंद्राची कोणती कला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे सकाळी तृतीया आणि त्याच दिवशी संकष्टी असं बऱ्याचदा होतं. कोजागिरी पौर्णिमा ही रात्री चंद्राची कला कोणती आहे यावर अवलंबून असते तर ज्येष्ठ पुत्र/पुत्रीला ओवळण्याची अश्विन पौर्णिमा ही सकाळी कोणती चंद्रकला आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे आपण दूध एका रात्री पितो तर ओवाळण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होतो.
४. तिथी क्षय - काही वेळा एका तिथी नंतर एक skip करून त्या पुढची तिथी येते. त्याला तिथी क्षय म्हणतात. सूर्य उगवताना चंद्राची कला जी असेल ती त्या दिवशीची तिथी असते. पृथ्वीची परिवलन गती आणि चंद्राची परिभ्रमण गती वेगवेगळी असल्याने हे होते.
उदा: द्वितीयेनंतर चतुर्थी आली. या वेळी द्वितीया ही अगदीच सूर्य उगवण्याच्या नंतर संपली, तृतीया सुरू होऊन ती दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याआधी संपली आणि सूर्योदयाला चतुर्थी लागलेली होती. या उदाहरणात तृतीयेचा क्षय झाला.
५. सौर सण - भारतीय सणांमध्ये एकमेव संक्रांत हा सण आहे जो सौर स्थितीवर अवलंबून असतो. संक्रांत ही १४ जानेवारीला येत नाही तर ती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा येते. शिवकाळात संक्रांत १२ जानेवारीला यायची. आता १४ किंवा १५ जानेवारीला येते. याचे कारण गेल्या ३०० वर्षात पृथ्वीच्या गतीत झालेला बदल हे आहे. लोकमान्यांच्या अभ्यासानुसार मकर संक्रांत महाभारत काळात नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये येत असे.
दैनंदिन व्यावहारिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

दि. १ जानेवारी २०१८