Tuesday, March 20, 2018

प्राचीन भारतीय ज्ञान

भारतात मारुती शेपटीने उडायचा, नारदाची वीणा म्हणजे रॉकेट होतं, गणपती हा क्लोन आणि प्लास्टिक सर्जरीने डोकं बसवलेला होता ही निव्वळ मिथकं आहेत. पण लोकांनी मिथकाला विज्ञान म्हणायला सुरुवात केल्याने सध्या गोंधळ झालाय आणि त्यामुळे अनेक लोक म्हणतात की भारतात विज्ञान नव्हतंच. भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, कालमापन, गणित हे उच्च स्तरावर होते, त्यातील काही नमुने खाली दिले आहेत.
1. वस्त्रोद्योग - हा भारत आणि चीन शिवाय अन्य कुठेच नव्हता. भारत सुती आणि चीन रेशमी कापड विकत असे.
2. धातुकला - कथिल मिळवणे ही अत्यंत अवघड कला आहे. 3℃ चा फरक पडला तर कथिलाच्या पाण्याची वाफ होते. त्यामुळे त्याचे ऊर्ध्वपातन अत्यंत कौशल्याने करावे लागते जे केवळ भारतात होते. लोखंडावर सुद्धा आपले प्रभुत्व होते. अशोकस्तंभासारखे स्तंभ आपल्याकडेच उभे राहिलेत. सुवर्णालांकर ही गोष्ट अन्य फारशी परिचयाची नव्हती आणि आपण त्यात कलाकुसर करायचो
3. प्रगत शेती - यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. ईच्छा असेल तर ऋषी कृषी हा मोहन देशपांडेंचा (ज्ञानेश नाही 😉) ग्रंथ वाच. शिवाय पराशर मुनींचे शेतीवरील काही ग्रंथ आजही उपलब्ध आहेत.
4. मानवी जीवनाच्या 'काम' या पुरुषार्थाकडे भारतीयांचा बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भ होता. कामसूत्र हा ग्रंथ आणि अनेक लेण्या व मंदिरे आजही त्याची साक्ष देतात.
5. मूर्तिकला - भारतात आजही 3000 वर्षांपूर्वीची मंदिरे/लेण्या आहेत.
6. स्थापत्यशास्त्र - दक्षिणेतील मंदिरे काही इंग्रजांनी येऊन बांधलेली नाहीत. 2 हजार वर्षे आणि त्याहून अधिक टिकू शकतील अशी मंदिरे इथेच बांधली गेलीत.
7. आयुर्वेद - औषधशास्त्रात भारत अत्यंत पारंगत होता आणि आहे. त्या काळी जे रोग होते त्यावर (क्षय सोडून) भारतात उपचार उपलब्ध होते. आजही जे surgical instruments वापरले जातात त्यांचे designs सुश्रुत संहितेतून घेतलेले आढळते.
8. खगोल - आकाशाचे 27 भागांत विभागणी आणि त्याद्वारे केलेले कालमापन, चंद्र व सूर्याची गती वेगळी असल्याने होत असलेल्या चंद्राच्या कलांचा वापर करून महिना मोजणी आणि दर 3 वर्षांनी अधिक मास टाकून त्यांची केलेली बरोबरी. नक्षत्रानुरूप वार्षिक नियोजन. 12 राशी व त्यावरून केलेले कालमापन. ग्रह तारे गोल असण्याचा सिद्धांत, अनेक ग्रह ताऱ्यांविषयी माहिती. उदाहरण म्हणून सांगतो, सप्तर्षींमध्ये वसिष्ठ-अरुंधती ही ताऱ्यांची जोडी आहे आणि दोघेही एकमेकांभेवती फिरतात. ही गोष्ट आज निरीक्षण करायला खूप सोपी आहे कारण आज दुर्बिणी उपलब्ध आहेत. पण आधी त्या नव्हत्या आणि तरीही भारताला हे माहीत होतं की हे दोन तारे एकमेकांभेवती फिरतात. म्हणून नवीन लग्न झालेल्याना त्याला नामस्कार करायला सांगायचे की तुम्ही बरोबरीचे आहात एक मोठा एक छोटा नाही म्हणून एकमेकांभेवती फिरा. एक स्थिर आणि दुसरा फिरतोय असं नको. आणि बरंच काही
9. गणित - दशमान पद्धती. ही जर नसती तर आजचे कोणतेच विज्ञान उभे राहू शकले नसते. गणितातील पायथागोरसचा सिद्धांत, पायचे मूल्य आणि त्याचा वापर करून काढलेले वर्तुळाचे क्षेत्रफळ, गुणाकार भागाकराच्या असंख्य पद्धती, फिबोनासी सिरीज सारख्या एकेक सिरीज आणि वैदिक गणितातील quick answer पद्धती या इथेच विकसित झाल्या.
10. संगीत - वेदकाळापासून राग, वेळ वा ऋतू नुसार असलेले राग हे आहेत. हे अन्यत्र कोणत्याही ठिकाणी नाही. गायनाशिवाय अनेक वाद्ये विकसित झाली.
11. नौका विज्ञान - भारतातील स्थानिक नौका विज्ञान प्रगत होते ते शिवाजी महाराजांनी सुद्धा कान्होजी आंग्रे यांच्या करवी वापरले होते.
अशा अनेक गोष्टी आहेत.
हे सर्व असताना पुढील वैज्ञानिक प्रगती का होऊ शकली नाही? याचे मानसशास्त्रीय आणि दोन कालखंडात उत्तर देता येईल. पहिला इस्लामी आक्रमणपूर्व आणि इस्लामी आक्रमणापश्चात. मानसशास्त्रीय यामुळे की समाज म्हणूनही एक मन असतं.
भारतात एक विशिष्ट स्तरापर्यंत ज्ञान विज्ञान वाढलं पण ते पुढे थांबलं. असं का घडलं असावं याबद्दल हे माझं मत. एक गोष्ट आधीच स्पष्ट करू इच्छितो की मी या विषयातील तज्ञ नाही. जे काही थोरांकडून ऐकले, वाचले, त्यावरून हे मांडले आहे.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. भारतात साधारण 8 महिने व्यवस्थित ऊन, 4 महिने पुरेसा पाऊस, उत्तम खनिज संपत्ती, शास्त्रीय शेती होती. या बळावर भारत सुजलाम सुफलाम होता. त्यामुळे मॉस्लोच्या सिद्धांतानुसार अन्न, वस्त्र, निवारा, विश्रांती आणि त्यानंतर सुरक्षा या प्राथमिक गरजा भारतात सर्वांना सहज उपलब्ध होत्या. संपत्ती निर्माण या जोरावर केव्हाच सुरू झाले होते. प्रेम आणि मैत्र असणं ही गरज त्यापुढची असते आणि ती पूर्ण करायला कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. त्यापुढे जाऊन आयुष्याची परिपूर्णता शोधणे हे सुरू होते आणि इथेच नवनवीन गोष्टी शास्त्रज्ञ (कोणतेही शास्त्र असो) शोधायला सुरुवात करतात आणि पुढच्या टप्प्यात तो शोध पूर्ण होतो. यात पुढे काय तर स्वरूप दर्शन, "तुझे तुज ध्यान कळो आले", याचा प्रवास.
हा सगळा प्रवास का होतो तर आधीच्या गरजा पूर्ण होत जातात आणि मानवी मन पुढील गोष्टी शोधत राहतं. तसंच समाजमन सुद्धा या प्रवासाला प्रोत्साहन देत राहतं आणि मदत करतं. आहे तिथे संपन्नता मिळाल्याने भारताने दुसऱ्यावर आक्रमण कधीच केले नाही. उलट अनेक निर्वासितांना भारताने आनंदाने आश्रय दिला. यामुळे संहारक शस्त्रे, वेगवान प्रवास याची गरज भासली नाही आणि त्याची निर्मितीही झाली नाही.
इस्लामी आक्रमणाआधी हा प्रवास इथवर झाला होता आणि शेवटच्या पातळीवर (काही लोक याला अध्यात्मिक पातळी म्हणतात, काही परिपूर्णता म्हणतात) होता. जे शोध लागले ते जशा गरजा होत्या तसेच लागले. त्यामुळे त्या काळासाठी ते परिपूर्ण होते. कदाचित अजून पुढे शोध लागले असते पण हा प्रवास पुन्हा प्राथमिक गरजेवर आला तो इस्लामी आक्रमणामुळे. ती गरज म्हणजे सुरक्षितता. आणि त्याच गरजेत तो अडकून बसला. पहिली काही वर्षे तर केवळ लूट झाली. ही लूट केवळ भौतिक संपत्तीची नव्हती तर ज्ञानाची होती. खरं तर ज्ञानाची लूट म्हणता येणार नाही, ज्ञानाचा अंत म्हणावे लागेल, कारण भारतातील विद्यापीठे जाळली गेली (https://en.m.wikipedia.org/wiki/Muhammad_bin_Bakhtiyar_Khilji?wprov=sfla1). सोबतच त्यातील ज्ञानी शिक्षकांना मारले गेले. इथे कळतं की भारतीय ज्ञान documented का नाही. कारण जे documentation होतं ते पूर्ण नष्ट केलं गेलं. Documented ज्ञान जाळले गेले तरी परंपरागत आणि गावठी शाळांच्या मार्फत अनेक जमातींनी हे ज्ञान जातं करून ठेवले. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी एकतर इस्लामी राज्य आले किंवा भारतीय राजे मंडलिक बनले. पण यामुळे सुरक्षितता आली असं झालं नाही.
याच दरम्यान युरोपात गरजही वाढत होती आणि शोधासाठी असलेले वातावरण सुद्धा होते. या बळावर तेथे नवीन विज्ञान सिद्ध झाले आणि मग युरोपने जग पादाक्रांत करायला सुरुवात केली.
इस्लामी आक्रमणापासून सुरू झालेली असुरक्षिततेची भावना आजही कायम आहे.
भारतीय ज्ञान परंपरेवर शेवटचा आणि निर्णायक घाव घातला तो इंग्रजांनी. इंग्रजांनी कशा पद्धतीने भारतीय ज्ञान आणि शिक्षण परंपरा मारली यावर गिरीशजी प्रभुणे यांच्याशी बऱ्याचदा बोलणे झाले. त्यावर त्यांची एक लेखमाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची "गुरुकुलम्" किल्लीही आहे. (कमेंट 3 पहा).
भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी नवीन शोधांच्या बाबतीत आपण मागेच आहोत. मागील 1000 वर्षांची असुरक्षितता आता नाही. तरीही मॉस्लोची पुढची पायरी, एक समज म्हणून आपण गाठू शकली नाही. याचे एक कारण आपण भारतीय मिथकांमध्ये विज्ञान शोधत बसलो. आणि दुसरे, जे मिथकाला मिथक मनात होते त्याचे brain washing असे झाले होते की सर्व ज्ञान हे युरोपातूनच जन्मले असे त्यांना वाटते. त्यामुळे नवीन शोधांच्या बाबतीत भारत जागतिक पटलावर नाही.
त्यामुळे सर्वांनी आपली ज्ञान महान परंपरा ध्यानी ठेऊन पुन्हा ती स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी संशोधन करावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पौराणिक कथांना विज्ञान मानले नाही तरच हे होऊ शकेल.

दि. ५ मे २०१७

राज्जुभैय्यांची आठवण

आमच्या वर्गात एक चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. आम्ही दहावीला असताना शाळेत एकदा त्यावेळी मा. सरकार्यवाह असलेले रज्जूभैय्या आले होते. बहुदा डिसें'९३ किंवा जाने'९४ असावा. मग चुणचुणीत मुलगा त्यांना भेटला आणि त्याने त्यांची सही घेतली. तेव्हा ते व्यस्त असल्याने मला काही सही मिळाली नाही. पण मी एक शाखेचा गणशिक्षक होतो त्यामुळे त्याच दिवशी निवासी वर्गात माझी रज्जूभैयांशी भेट होणार होती. वर्ग सुरू झाला. मी भोजनानंतर त्यांच्याकडे गेलो आणि मला सही द्या अशी विनंती केली. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, "कभी कोई अपने नानाजी या दादाजी की स्वाक्षरी लेता है भला"
या वाक्यांनी खूप छान वाटलं, पण एक हुरहूर लागून राहिलीच की आपल्याकडे सही नाही. मार्च'९४ मध्ये रज्जूभैय्या प. पू. सरसंघचालक झाले आणि चुणचुणीत मुलाने मला जरा चिडवलेच...
पुढे २ वर्षांनी १२वीची परीक्षा झाल्यावर ३ एप्रिल ९६ ला रज्जूभैयांच्या हस्ते रायगडावर रोप वे चे उद्घाटन होणार होते. आमच्या शहरातील आमच्यासारख्या माकडांचा एक वानरयुथमुख्य होता रवींद्र पूर्णपात्रे. तो घरी आला आणि माझ्या आई वडिलांची या सहलीला जाण्याची परवानगी मिळाली. तेव्हाची अशा सहलींसाठी बेष्ट गाडी म्हणजे ट्रॅक्स. आम्ही ९ स्वयंसेवक आणि एक चालक असे निघालो.
जाताना दुपारी शिवथरघळ येथे गेलो. समर्थांचं दर्शन घेतलं. संध्याकाळपर्यंत थांबून साधारण ७ च्या सुमारास तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती होती. त्यामुळे वाटेवर लख्ख चंद्रप्रकाश. झाडं अक्षरशः चांदणं पीत आहेत असं वाटत होतं. वळणं घेत गाडी रायगडाकडे निघाली. रात्री १० ला आम्ही पाचाडला पोहोचलो. एका घरी जेवण व निवासाची सोया झाली. भरपेट खाऊन झोपलो.
पहाटे ३:३० ला रवीच्या हाका सुरू झाल्या. आणि त्याने आम्हाला सर्वांना ४ ला गडाच्या वाटेवर आणलं. मग सर्वांचाच उत्साह वाढला. संघाच्या कोणत्याही शिबिरात सकाळी एकात्मता स्तोत्राने सुरुवात होते. मग "ॐ नम: सच्चिदानंद..." ची सुरुवात झाली आणि रवी सोबत मी आणि मागून सर्व असं स्तोत्र म्हणत आम्ही गड चढायला लागलो.
हनुमान जयंती असल्याने पूर्णाकृती चंद्र पश्चिमेला होता आणि रायगडाची चढण सगळी पश्चिमेकडून असल्याने आम्हाला सहजच रस्ता दाखवत होता. आमची वानरसेना पटापट गड चढली आणि पहाटेच्या प्रकाशात गडावरील बाजारापर्यंत आम्ही पोहोचलो. जर लगेच समाधीच्या मागच्या बाजूला गेलो तर सूर्योदय दिसेल याची खात्री असल्याने धावत तिकडे पोहोचलो.
जोर-बैठका आणि तळ्यात पोहून झाले तोवर सूर्यनारायणाने दर्शन द्यायला सुरुवात केली होती. भव्य सह्यकडे, तिथून दिसणारे किल्ले, त्यामागे सृष्टीला जागा करणारा भगवंत आणि गडावरील भारावलेलं वातावरण. आम्ही नि:शब्द होऊन तसेच उभे राहिलो.
मग जाणीवेच्या पातळीवर आल्यावर पहिली जाणीव झाली ती भुकेची. तिथल्या हॉटेलात, "प्लेटचे भाव नाही किलोचे सांगा भाऊ", असं सांगत किलोंनी पोहे खाल्ले. गड फिरलो. आणि कार्यक्रमाच्या जागी येऊन पोहोचलो.
तेवढ्यात कळाले की रज्जूभैय्या अतिथीकक्षात आलेले आहेत. सुरक्षरक्षकाला विनंती करून मी आत गेलो. त्यांना नमस्कार करून परिचय सांगितला. "स्वाक्षरी मांगने वाले तुम ही थे ना?", रज्जूभैय्यांचा प्रश्न! मी अवाक झालो, हो सांगितलं. फोटो काढू का विचारलं आणि त्यांनी हसून होकार दिला. मी फोटो काढून पुन्हा नमस्कार करून बाहेर पडलो.
मग उद्घाटन झालं. एक वारकरी महाराज आले होते. त्यांनी सांगितलं की, शिक्षणासाठी वार लावून जेवणारे, वारीला जाणारे आणि शत्रूवर वार करणारे हे सगळेच वारकरी. एक ज्ञानासाठी, एक देवासाठी आणि एक राष्ट्रासाठी! हे सगळेच वारकरी थोर काम करत असतात.
रज्जूभैया भाषणाला उभे राहिले. "आज रोप वे का उद्घाटन है। हिंदी में रोप वे को रज्जूमार्ग कहेते हैं। ये रज्जूमार्ग खाई एवं शिखर को जोडता हैं। संयोग से मेरा नाम भी रज्जू है। संघ का स्वयंसेवक हूं, और संघ का भी यही काम है की खाई और शिखर जोडनां।" अगदी सहजतेने त्यांनी संघकामाचे फलित सांगितले, कितीही अंतर असते तरी समाज जोडणे.
कार्यक्रम संपला, अन्य जिल्ह्यातील स्वयंसेवकांना भेटून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 
डोक्यात विचार घुमत होते...
एका सामान्य स्वयंसेवकाच्या घरातील दादाजी किंवा नानाजी होणं, तो स्वयंसेवक 2 वर्षांनी लक्षात राहणं आणि Physics Gold Medalist राजेंद्र सिंह यांचा रज्जू होणं... सगळंच विलक्षण!!!



दि. ३१ मे २०१७

आनंद

'सुख' आणि 'दुःख' हे विरुद्धार्थी शब्द, भावना आहेत. 'आनंद' या शब्दला, भावनेला विरुद्धार्थी काहीच नाही.

#कुणीसं

दि. २८ जून २०१७

त्याचं तिचं भांडण असं वर्ल्डकपच्या दिवसात

पाऊस, सौमित्र आणि सर्व गारवाप्रेमींची माफी मागून...
तिला क्रिकेट आवडत नाही, त्याला क्रिकेट आवडतं
मॅचच्या दिवशी रिमोट त्याच्या तावडीत सापडतं
मी तुला आवडतो, पण क्रिकेट आवडत नाही
असलं तुझ गणित खरंच मला कळत नाही
क्रिकेट म्हणजे टाईमपास नुसता क्रिकेट अनरोमॅंटिक इव्ह
क्रिकेट म्हणजे चौकार-षटकार क्रिकेट सरळ बॅटचा ड्राईव्ह
क्रिकेट कान किट्ट करतं क्रिकेट आळश्यांना चान्स
क्रिकेट म्हणजे डोळ्यांचं पारणं क्रिकेट हळुवार लेग ग्लान्स
क्रिकेट कामांना हुलकावणी क्रिकेट खेळ नाहीच मुळी
क्रिकेट म्हणजे स्लोअर वन क्रिकेट म्हणजे गुगली
नेहमी वर्ल्डकप येतो नेहमीच असं होतं
नेहमी वर्ल्डकप येतो नेहमीच असं होतं
क्रिकेटवरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
क्रिकेट आवडत नसलं तरी तिला तो आवडतो
क्रिकेट आवडत नसलं तरी तिला तो आवडतो
क्रिकेटसकट आवडावा तो म्हणूण तोही झगडतो
रूसून मग तो बघतो मॅच रिमोट ठेऊन हातात
रूसून मग तो बघतो मॅच रिमोट ठेऊन हातात
त्याचं तिचं भांडण असं वर्ल्डकपच्या दिवसात

दि. २८ जून २०१७

बदल आणि सवय

कोणत्याही बदलाचा त्रास सवय होईपर्यंतच होत असतो

#कुणीसं

दि. १ जुलै २०१७

सूर्य हा सूर्यच असतो

पृथ्वीवरून एकाच क्षणी सूर्य कुणाला उगवताना दिसतो, कुणाला तळपताना, कुणाला मावळताना तर कुणाला त्याचे अस्तित्वच दिसत नसते. म्हणजे सूर्य नसतो असं नाही तर बघणाऱ्याची जशी दृष्टी, जसा दृष्टिकोन, जशी वेळ तसा तो बघणाऱ्याला दिसतो. पण या प्रत्येक वेळी सूर्य हा सूर्यच असतो आणि तो जसा आहे तसाच असतो.

#कुणीसं

दि. ३ जुलै २०१७

शेतकऱ्याच्या 'अनैतिहासिक' आसूड

इतिहास हे शास्त्र आहे. एखादे 'मत' इतिहास म्हणून मांडणे किंवा इतिहास म्हणून स्वीकारणे हे दोन्ही चूक.
उदाहरण म्हणून महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकातील एक परिच्छेद देत आहे. यातील एकूण एक वाक्य अनैतिहासिक आहे.
1. महंमद पैगंबरांच्या जहामर्द शिष्यांनी सोमनाथ शेतकऱ्यांची भट ब्राह्मणापासून सुटका करण्यासाठी फोडले नाही. ते फोडले लूट करण्यासाठी आणि इस्लामचा प्रसार करण्यासाठी. त्यांना येथील शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नव्हते
2. ज्ञानोबांनी भागवत बखरीतील कल्पित भाग उचलून ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ती लिहिली गीतेवरून. गीतेत इस्लामच्या विरोधी काही असण्याची शक्यता नाही कारण गीता इस्लामच्या हजारो वर्षे आधी लिहिली गेली. गीतेशिवाय अन्य धर्मकारण/राजकारण या कशावरही ज्ञानेश्वरांनी काही लिहिले नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरांमुळे शेतकरी मुस्लिमांना नीच मानू लागले हे चुकीचे आहे
3. तुकाराम नावाचा साधू शेतकऱ्यांत निर्माण झाला, हे धादांत खोटे वाक्य आहे. तुकाराम शेतकरी नव्हते, सावकार होते. त्यांनी सावकारी सोडल्यावर शेती केली. शिवाजी महाराज देखील 3 पिढ्यांपासून शेतकरी नव्हते तर सरदार होते.
4. पुढील वाक्यात महाराजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे. ज्यांना मराठी, संस्कृत, फार्सी या भाषा व्यवस्थित अवगत होत्या, ज्यांनी आपली राजमुद्रा संस्कृत मधून तयार करवून घेतली अशा शिवाजी राजांना अक्षरशून्य आणि अज्ञानी म्हटले आहे
5. पेशव्यांनी शाहू आणि पुढील राजांना साताऱ्यास कैदेत ठेवले हे म्हणणे इतिहासाचे अज्ञानच दर्शवते. बाळाजी विश्वनाथांपासून, बाजीराव, नानासाहेब, माधवराव ते अगदी ज्याला पळपुटा म्हणतात (यावर सुद्धा प्रतिवाद आहेत) त्या दुसऱ्या बाजीरावांपर्यंत सर्वांनी सातारच्या गादीशी इमान राखले आणि पूर्ण मान दिला.

हे सगळं जोतिरावांनी का लिहिलं असावं? कारणं अनेक असू शकतात. उदा:
1. त्यांचं शिक्षण इंग्रजांच्या शाळेत झालं होतं. त्यामुळे आर्य भारतात आले आणि त्यांनी मूलनिवासी लोकांवर अत्याचार केले हे त्यांच्यावर बिंबवले गेले. आर्य म्हणजे केवळ ब्राह्मण आणि इतर सर्व शेतकरी हा शोध असाच लादला असेल. (डॉ आंबेडकरांनी यावर प्रतिवाद करून हे चुकीचे आहे हे सिद्ध केले आहे)
2. जेव्हा गोविंदराव (वडील) यांनी रुढीवाद्यांना घाबरून, किंवा त्यांचं ऐकून जोतिरावांना घरातून काढलं तेव्हा फातिमा आणि उस्मान शेख या बहीण भावांनी त्यांना आपल्या घरात जागा दिली. कदाचित त्यामुळे इस्लाम बद्दल प्रेम निर्माण झाले असावे.

कारणं काहीही असली तरी आधी निष्कर्ष आणि मग पुरावे अशा पद्धतीने हे लिखाण झालेले आहे. जोतिरावांचे कार्य महान आहे. ते महात्मा आहेतच. पण त्यामुळे त्यांनी सांगितलेली, लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही शंभर टक्के बरोबर असलीच पाहिजे असे नाही. चुकून असेल, त्यावेळची गरज असेल किंवा काहीही या महात्म्याकडून दुहीचे बी पेरले गेले. आणि आज त्या वृक्षाला फळं आली आहेत ही खेदाची बाब आहे. असो!

मुद्दा असा की इतिहास हे मत नसते, जे खरोखरीच झाले आहे तो इतिहास असतो. कधी सगळे पुरावे एकत्र मिळतात कधी सुटे सुटे. ते सगळे जोडून इतिहास सिद्ध होतो. त्यात कधी जुने सिद्धांत खोडले जातात तर कधी ते अधिक सिद्ध होतात.




दि. २६ जुलै २०१७