Monday, August 2, 2021

शुद्ध वाण (?)

 एकदा एका वयस्क व्यक्तीशी गप्पा सुरू होत्या. आंतरजातीय विवाह आणि वर्णसंकर. त्यातून येणारी नवी पिढी... वगैरे वगैरे... हे बोलताना काका म्हणाले की, अरे तुम्ही लोक गायी, घोडे, कुत्रे यांच्या जाती बघता. त्या बघताना शुद्ध वाण ठेवण्याचा प्रयत्न करता. जेवढे अधिक शुद्ध वाण तेवढा जास्त भाव देऊन तो प्राणी विकत घेता. त्याच तुम्हाला जातीत लग्न करून शुद्ध वाण ही संकल्पना पटत कशी नाही...

काय परफेक्ट आर्ग्युमेण्ट वाटतं नाही...

आता पुढची गम्मत वाचा...

माणूस जेव्हा पृथ्वीवर तयार झाला तेव्हा माणसाचे सात वाण होते. Homo habilis (“handy” man), Homo erectus (“upright man”), Homo neanderthalensis (the Neanderthal), The Denisovans, Homo floresiensis (the “hobbit”), Homo naledi (“star man”) आणि Homo sapiens (“wise man”, or “modern humans”). यातील शेवटचं वाण म्हणजे होमो सेपियन्स, म्हणजे आपण उरलेले माणसं.

आपण होमो सेपियन्सने बाकीच्या सहा जाती - वाण (बहुदा) मारून टाकल्या आणि केवळ आपण एकच वाण (बेणं) पृथ्वीवर शिल्लक राहिलो.

जर कदाचित आपल्यासह हे सहा वाण पृथ्वीवर असले असते तर वरच्या काकांचे म्हणणे खरे ठरले असते. क्रॉस ब्रीड / वर्णसंकर नको रे बाबा. सेपियन्सनी फक्त सेपियन्स सोबतच लग्न वगैरे करावे. त्यांनी होमो इरेक्टस बरोबर संबंध ठेऊन त्यापासून अशुद्ध वाण तयार करू नये. आता एकच वाण शिल्लक असल्याने असला काही प्रकारच अस्तिवात असू शकत नाही ना!

युवान हरारी काकांचा विजय असो!

Friday, July 23, 2021

माझा प्रवास माझा वेग

सकाळी हिंजवडीला जायला तुम्ही निघता. गर्दीतून कशीबशी वाट काढत तुम्ही डोंगराच्या बाजूच्या पार्किंग मध्ये बाईक स्टॅण्डवर लावता. सगळे जसे निघालेत तसेच पायऱ्या किंवा लिफ्ट घेऊन खाली उतरता. काही पावलं चालल्यावर बदामाच्या गर्द सावलीत अचानक केकावली ऐकू येते. तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची रेष चमकते...

परत घरी जायची वेळ येते. दिवसभर भरपूर पाऊस झालेला असतो. त्यामुळे आणि एकूणच हिंजवडीच्या अत्यंत शिस्तबद्ध वाहतुकीमुळे संथपणे बस, कार्स आणि बाईक्स रस्त्यावरून वाहत वाहत जात असतात. कसेबसे विप्रो सर्कल पार होते. थोडीफार भुरभुर सुरु असते, भवताल वैतागलेला असतो. पण तुम्ही रस्त्याच्या डावीकडून मुद्दाम जाता, कारण तिथून खळाळत वाहणारं पाणी दिसत असतं...

बरीच जुनी गोष्ट आहे. असेच पावसाळी दिवस असतात. माझ्यापेक्षा दोन-चार लेव्हल वर असलेला एक मॅनेजर असतो. त्याची केबिन दूरपर्यंत आकाश दिसेल अशी असते. त्याला इंद्रधनुष्य दिसतं. त्याचा सगळ्यांना मेल येतो. अरे १० मिनिट काम सोडा आणि खिडकीतून बाहेर बघा. सुंदर इंद्रधनुष्य दिसतंय...

भराभर कुठेतरी जायचं / यायचं असतं. मध्येच एक रानजाई फुलून आलेली असते. आधी दिसत नाही, केवळ वास येतो. मग तुम्ही वासाच्या दिशेने वळून बघता. तो वास तुम्हाला दोन क्षण तरी गुंगवून ठेवतो आणि मगच तुम्ही पुढे निघता...

प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेग असतो. त्या वेगाशी जुळवून घेणारे ज्याचे त्याचे रिफ्लेक्सेस असतात. जसं काही लोक वेगात गाडी चालवताना आजूबाजूला काय सुरु आहे हे अगदी डिटेलवार बघू शकतात तसंच... पण हे रिफ्लेक्सेस ज्याचे त्याचे वेगळे असतात. त्यानुसार ज्याची त्याची गती असावी. दुसरा किती वेगात आणि कसा पळतोय त्यानुसार आपली गती कमी जास्त होऊ नये. आपल्याला या प्रवासात जे बघायचं आहे, अनुभवायचं आहे ते न सुटू देता जी गती शक्य असेल ती असावी/वाढवावी. मात्र गती वाढताना, हे अनुभव सोडून द्यावे लागत असतील तर पुन्हा विचार करावा.

आपल्याला जिवंत ठेवणारे अनुभव कोणते, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. ते आपलं आपल्याला कळतंच. तो जिवंतपणा जर कधी कमी होतोय हे दिसलं तर एक पॉज घेऊन, पुन्हा विचार करावा... नेमकं काय आणि का सुटतंय... कधीतरी अपरिहार्य असू शकतं, त्याची नोंद घ्यावी. पुढे कोणत्या टप्प्यावर दुरुस्ती शक्य आहे ते ठरवावं आणि मग पुन्हा प्रवास... तो तर सुरु राहणारच...

Wednesday, June 9, 2021

स्वयंभू भीम


महाभारताची नायिका कोण? असा प्रश्न विचारला की विनाविलंब उत्तर येते - द्रौपदी! पण महाभारताचा नायक कोण? या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येते. कुणी म्हणतात कृष्ण, कुणी भीष्म, कुणी अर्जुन तर केवळ मृत्युंजय वाचून महाभारत कळलेले म्हणतात कर्ण.

संघाच्या एकात्मता स्तोत्रात "भीष्मो धर्मस्तथार्जुन:" असा उल्लेख आहे. त्यात भीमाचा उल्लेख नाही. मी मागे जेव्हा एकात्मता स्तोत्रावर असलेल्या पुस्तकाची मालिका केली होती तेव्हा याबद्दल बोललो होतो की यात भीम असायलाच पाहिजे. कारण माझ्या मते महाभारताचा नायक जर कुणी असेल तर तो आहे भीम! कधीही कर्तव्यात चुकला नाही, कधीही संभ्रमात अडकला नाही, कधीही स्वतःच्या गरजा, इच्छा यांच्यासाठी कोणतीही चूक केली नाही, सगळ्या कठीण प्रसंगात सर्वात पुढे उभा राहून संकट पूर्ण परतवून लावलं आणि युद्धात सगळ्या धृतराष्ट्र पुत्रांचा एकट्याने वध केला. याहून अधिक काय लागतं नायक होण्यासाठी. तरीही नायक म्हणून भीमाचे नाव लगेच कुणाला आठवत नाही...

तो जेव्हा लहान होता तेव्हाच शकुनी, दुर्योधन आणि भावंडांना कळालं होतं की हाच खरा शत्रू आहे. हा गेला की बाकीच्यांना सहज लोळवू. त्यामुळे बालपणात ज्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असा पांडव भीमच. त्याला लाडूतून विष देऊन, बांधून नदीत टाकलं. हा नाग लोकात पोहोचला, तिथे त्यांचा विश्वास संपादन करून अधिक बलशाली होऊन पुन्हा परतला. इथून पुढे प्रत्येक संकटात भीमाने पुढे जाऊन सर्वांना वाचवलं, सावरलं.

पहिल्या संकटापासून सुरुवात करू या 
* लाक्षागृह - हवापालट म्हणून कुंती आणि पांडव यांना दुर्योधन आणि शकुनी नवीन महालात पाठवतात. तिथे काहीतरी दगाफटका होणार याची कुणकुण लागते. भीम विदुराच्या मदतीने अंदाज घेतो. तिथून जवळच्या गावात कुठे जाता येईल ते पाहतो. संपूर्ण भुयार एकहाती खोदतो. कौरवांनी आग लावण्याआधीच आई आणि भावंडांना सुखरूप बाहेर काढतो.
* हिडिंब - लाक्षागृहातून बाहेर पडल्यावर ते अरण्यात येतात. त्या अरण्यावर राज्य असतं हिडिंब राक्षसाचं. आपल्या भावंडांना संरक्षण म्हणून भीम प्रत्येक रात्र जागून काढतो आणि हिडिंब जेव्हा हल्ला करतो तेव्हा त्याचा वध करतो. त्याची बहीण जेव्हा मागणी घालते तेव्हा आईच्या संमतीने मोठ्या भावाच्या आधी लग्न करतो. पुढील प्रवास सुखकर करून घेतो.
* बकासूर - संपूर्ण गाव बकासुराचा दहशतीखाली असतं. कुंती विश्वासाने पाठवते केवळ भीमाला. भीम बकासुराला कोणत्याही शस्त्राविना मारतो आणि केवळ आपलं कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव सुरक्षित करतो 
* द्रौपदी स्वयंवर - अर्जुन पण जिंकतो पण त्याचवेळी अनेक राजे विरोधात उभे राहतात. भीम लढण्यासाठी त्याच सभागृहाचा खांब तोडून हातात घेतो आणि युद्ध सुरू होण्याआधीच संपतं 
* द्यूत - जेव्हा द्रौपदीची विटंबना होत असते त्यावेळी भीष्म, द्रोण, कृप आणि सगळे पांडव खाली मान घालून बसलेले असतात. तेव्हा भीम प्रतिज्ञा करतो की, दु:शासनाची छाती फोडून ते रक्त पिईन आणि त्या रक्ताने द्रौपदीला स्नान घालेन आणि दुर्योधनाची मांडी फोडून त्यास ठार करेन. या प्रतिज्ञांनी ज्येष्ठांना जाग येते आणि सुरू असलेली विटंबना थांबते, युधिष्ठिराला गेलेलं राज्य मिळतं 
* वनवास - हे होऊनही पुन्हा युधिष्ठिर द्यूत खेळतो आणि राज्य घालवतो. १२ वर्षांच्या वनवासात जयद्रथ द्रौपदीची पुन्हा विटंबना करू पाहतो. त्यावेळी त्याला पराजित करून आणि अपमानित करूनच भीम थांबतो.
* कीचकवध - अज्ञातवासात कीचक अनेकदा द्रौपदीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. हे युधिष्ठिराच्या समोर घडत असताना केवळ आपण ओळखले जाऊ आणि पुन्हा वनवास नशिबी येईल, म्हणून तो काहीच करत नाही. अखेरीस द्रौपदी भीमाला सांगते. विराट राजाचा साला आणि राज्याचा सेनापती असलेल्या महाशक्तिशाली कीचकाचा भीम केवळ हातांनी वध करतो. तोही असा की कुठेही आवाज जाणार आणि. त्याच्या शरीराचा कणिक मळल्याप्रमाणे गोळा करून भीम त्याला संपवतो. 
* विराट राजासाठी युद्ध - विराट राजाकडे पांडव असल्याची कुणकुण दुर्योधनाला लागते आणि त्याच्या गायी पळवून तो युद्धाची कुरापत काढतो. तेव्हा सर्वच पांडव पराक्रमाने विराटाच्या लहान राज्याला वाचवतात. इथे भीमाने एकट्याने कोणताही पराक्रम केलेला नाही. तरी हा प्रसंग मुद्दाम घेतला. लक्षात घ्या या युद्धाच्या वेळी कर्णाकडे कवच कुंडले होती. त्याचा रथ कुठे जमिनीत अडकला नव्हता. त्याने कुंतीला कोणतेही वचन दिलेले नव्हते. त्याचा सारथी शल्य नव्हता. भीष्म त्याला वाईट बोलले नव्हते. तरीही कर्ण असलेली बाजू हरली! एवढं लक्षात घेतलं तरी "मृत्युंजय"चं भूत मानेवरून उतरेल.
* जरासंध वध - राजसूय यज्ञ आणि त्यानंतर वाढवलेलं राज्य हा सर्वच पांडवांनी केलेला पराक्रम होता. पण याच दरम्यान ज्या जरासंधामुळे कृष्णाला मथुरा सोडून द्वारका वसवावी लागली होती (आणि त्यामुळे कृष्णाचे एक नाव रणछोड आहे) त्या जरासंधाला द्वंद्वयुद्धात भीमाने हरवलं. नुसतं हरवलं नाही तर त्याचे हातांनी दोन तुकडे केले.
* महाभारत युद्ध - 
- सुरू होताना भीमाला कोणतेही प्रश्न पडले नाहीत (अर्थात अर्जुनाला पडले त्यामुळे आपला फायदा झाला :-))
- भीम आणि हिडिंबेचा मुलगा घटोत्कच जेव्हा मारला गेला तेव्हा भीमाने कोणतीही आततायी प्रतिज्ञा घेतली नाही (अर्जुनाने अभिमन्यू मारला गेल्यावर जयद्रथाला सुर्यास्ताच्या आधी मारेन अथवा अग्निप्रवेश करेन अशी प्रतिज्ञा केली होती)
- सर्वच्या सर्व धृतराष्ट्र पुत्रांना भीमाने मारलं. हे करताना कोणतीही बाह्य मदत त्याने घेतली नाही (उदा - शिखंडी, "नरो वा कुंजरो वा", सुदर्शन चक्राने सूर्य झाकोळने...)
- युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात जेव्हा अश्वथाम्याने द्रौपदीच्या पाचही पुत्रांना झोपेत मारलं तेव्हा द्रौपदीचं सांत्वन करणारा पहिला आणि एकमेव भीमच होता.
- दुःशासनाची छाती फोडून त्याचे रक्त प्याला आणि त्याच रक्ताने द्रौपदीला अंघोळ घातली (त्यानंतर द्रौपदीने आपले केस पुन्हा बांधले). दुर्योधनाची मांडी फोडून त्याला मारलं. इथे नियम मोडू कि नको या विवंचनेत तो अडकला नाही. द्रौपदीचे सगळे सूड भीमाने पूर्ण केले.

असं असूनही भीमाला महाभारताचा नायक म्हणण्यात येत नाही हा मोठा अन्याय आहे. स्वयंभू या पुस्तकातून हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न प वि वर्तकांनी केला होता. महाभारत समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी स्वयंभू नक्की वाचावे.

Monday, October 5, 2020

पुस्तक परिचय - उत्तरकांड

पुस्तक परिचय - उत्तरकांड

अगदी खरं सांगतो, आधी हे पुस्तक वाचायची इच्छा नव्हती. कारण हे पुस्तक जेव्हा कळालं तेव्हा, अनुवादाचा प्रकाशन सोहळा आणि त्यावेळी भैरप्पांनी केलेलं मोदीस्तुतीगान हे कळालं होतं. त्यामुळे या पुस्तकात आजच्या संदर्भाने अनावश्यक ओढाताण असेल असं वाटलं होतं. ओढाताण आहे, रामायणातील अनेक प्रसंग गाळले आहेत, किंवा बदलले आहेत. पण ती ओढाताण मोदींना महान ठरवण्यासाठी नक्कीच नाहीये.

एक तर "पर्व" प्रमाणे भैरप्पांनी सर्व व्यक्तिरेखा मानवी पातळीवर आणल्या आहेत. त्यामुळे कोणेतेही चमत्कार नाहीत. असं वाचायला खरंच चांगलं वाटतं. दुसरं म्हणजे सगळी कथा सीता सांगत आहे. त्यामुळे सीतेला झालेले त्रास अगदी थेट दाखवून दिलेले आहेत.

ओढाताण केलेले अथवा बदललेले प्रसंग
- दशरथावर आणि राण्यांवर उपचार केले असं सांगितलेलं आहे. यज्ञही नाही किंवा नियोगही नाही
- सीतेचं स्वयंवर न दाखवता, "ज्यांना पण जिंकायचा त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन यावे आणि धनुष्य उचलावा", असं दाखवलं आहे
- कैकयीला दिलेली वचने ही, तिच्या वडिलांना दिलेली आहेत असं दाखवलेलं आहे
- रामाला वनवासासाठी लागणारे एकही हस्तकौशल्य येत नाही ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे. एवढी की जर लक्ष्मण सोबत नसता तर राम आणि सीता जिवंतच राहू शकले नसते
- जटायू आणि रावण युद्ध पूर्णपणे गाळून टाकलंय. मुळात रावणाने सीताहरण न करता त्याच्या सैनिकांनी ते केलंय असाच प्रसंग घेतला आहे
- तारा, वाली, सुग्रीव यांची कथा वेगळीच वाटते
- हनुमान रामापेक्षा सुमारे १५ वर्ष मोठा दाखवलाय ("पर्व" लिहिताना प्रमुख प्रसंग आणि प्रमुख पात्रे यांचे कोष्टक करून त्यांची वये काय असतील त्याचा अभ्यास भैरप्पांनी केला होता. इथे हनुमान १५ वर्षे मोठा दाखवल्याने अचानक भैरप्पांनी हे काय केलंय असं वाटून जातं)
- रावण सीतेवर बळजबरी न करता तिची मनधरणी का करतो, याचे कोणतेही कारण मिळत नाही
- राम सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावतो याचे कारण, सीतेने "हरणाची मागणी केल्याने हे सगळं घडलं" असा विचार करतो, चिडतो हे दाखवलं आहे
- राम अयोध्येला परत येताना अयोध्या कशी दरिद्री झाली ते दाखवलंय. राम येतोय म्हणून गुढ्या-तोरणे उभारली वगैरे काहीच नाही
- जंबुक हत्या ही रामायणातही प्रक्षिप्त असलेली कथा यात येते (यानंतर तर पुस्तक पुढे वाचूच नये असं वाटत होतं. निव्वळ भैरप्पा या नावामुळे पुढे वाचत राहिलो)
- शेवटी राम लव-कुशांची जबाबदारी लक्ष्मणाच्या खांद्यावर टाकून जलप्रवेश करतो. वास्तविक लक्ष्मण हा रामाच्या आधी जलप्रवेश करतो असं मी वाचलेलं आहे

एवढे बदल, एवढी ओढाताण असली तरी पुस्तक का वाचायचे...
१. सीतेच्या तोंडून आलेलं हे रामायण आहे. संपूर्ण मानवीकरण आणि स्त्रीमनाच्या गाभ्यातून आलेलं रामायण नक्कीच वेगळं वाटतं
२. रामाच्या दृष्टीने त्याने शेवटी दिलेली उत्तरे पूर्णपणे पटत नाहीत, तरीही प्रामाणिक वाटतात. त्यातून राजा आणि त्याची कर्तव्ये, त्याही पुढे कर्तव्यांशिवाय काहीच नाही... हे दिसतं आणि त्याचा अर्थातच त्रासही होतो
३. कथेच्या शेवटी बृहदारण्यक उपनिषद आणि त्यातील तत्त्वांवर भाष्य आहे. मुळात माणूस प्रत्येक गोष्ट स्वतःसाठीच करत असतो. साहित्य, कला तर स्वानंदासाठीच असते असं म्हणतात. मी धर्माचरण केलं तर मला स्वर्ग मिळेल, म्हणून मी धर्माचरण करतो. इतकंच नाही तर, मी प्रेम केल्याने मला समाधान मिळतं, म्हणून मी प्रेम करतो. प्रेम, भक्ती, त्याग, समर्पण या सगळ्या बाबी या केवळ 'आत्म'च्या आनंदाशी जोडल्या गेल्या आहेत. तो आनंद मिळतो, म्हणून लोक हे सगळं करतात. बृहदारण्यक उपनिषदात कोणतीही गोष्ट, "स्व" अथवा "आत्म"साठी प्रत्येकजण करत असतो हे सांगितलं आहे. त्यावर पुस्तकातील काही भाग - "तुझा आनंद तूच शोधला पाहिजेस, असं याज्ञवल्क्य महर्षींनी आपल्या पत्नीला थेटच सांगितलं होतं. संसाराचा त्याग करून परिव्राजकाच्या जीवनाला प्रारंभ करताना त्यांनी सांगितलेला 'आनंद' कोणता? आत्मतत्त्व हेच सगळ्याचं अंतिम सत्य आहे आणि त्यामुळे लौकिक गोष्टी, पुत्र-पौत्र यांच्यापेक्षा प्रिय असतं. त्यामुळे ‘आत्म’च प्रिय असतं हे जाणून त्या ‘आत्म’चीच उपासना केली पाहिजे. ‘आत्म’ हेच आनंदाचं मूळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे! पती-पत्नी-मुलं हे संबंध मर्यादित आहेत, असं सांगतात."
शेवटच्या प्रकरणातील उपनिषदावरील भाष्य या पुस्तकाला प्रचंड मूल्य प्रदान करतं.
४. याशिवाय रामाचा आणि सीतेचा शेवट अतिशय भावपूर्ण रेखाटलेला आहे. वनवासाच्या मध्यापर्यंत एकतानता असलेली राम-सीतेची जोडी वनवासाच्या अखेरच्या पर्वापासून एकमेकांना समांतर चालत जाते. तिचा शेवटही समांतर होतो. अगदी शेवटी महर्षी वाल्मिकी म्हणतात - ‘‘तारका, काय सांगू? पक्ष्यांच्या जोडीतल्या एकाला मारून त्यांच्यामध्ये विरह निर्माण झाल्यानंतर मनात निर्माण झालेली वेदना व्यक्त करण्यासाठी मी राम-सीतेच्या जीवनाचा आधार घेतला. निदान हे काव्य तरी सुखान्त करायची माझी आस होती; पण ते शक्य झालं नाही. कवीला काहीही शक्य आहे, हे खरं नाही बघ! याचंच वैफल्य मनाला ग्रासून टाकत आहे.’’

असा दुःखांत असलेलं हे पुस्तक... "उत्तरकांड"

पुस्तक - उत्तरकांड
लेखक - एस् एल् भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने - ३०४
मूल्य - ₹३९५

Friday, September 4, 2020

पुस्तक परिचय : या सम हा

बाजीराव पेशवे म्हटलं की सोबतच मस्तानी म्हणणं हे कर्तव्य असल्यासारखे लोक बाजीरावांना केवळ मस्तानीसोबत जोडतात. हे आजचं आहे असं नाही. नव्वदच्या दशकात राऊ कादंबरीवर आधारित राऊ याच नावाची मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू झाली होती. त्यात बाजीराव मनोज जोशी होते आणि मस्तानी अश्विनी भावे! साहजिकच अश्विनी भाव्यांना भाव देण्यासाठी असेल पण त्याही मालिकेत मस्तानीचा प्रभाव वाढला होता आणि पराक्रमी बाजीराव झाकोळले गेले होते. संजय भन्साळीच्या सिनेमामुळे "मस्तानीचे प्रेमी" बाजीराव हे "पराक्रमी" बाजीरावापेक्षा मोठे ठरले. बाजीरावांवरील एका कार्यक्रमात मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे सर गेले होते. त्यात पराक्रमी बाजीराव कुठेच न दिसल्याने ते अस्वस्थ झाले. शांतपणे कार्यक्रम सोडून बाहेर आले. पण याच अस्वस्थतेतून "या सम हा" हे प्रचंड अभ्यासपूर्ण पुस्तक तयार झाले.

विसाव्या शतकाच्या आरंभी म्हणजे बाजीरावांनंतर सुमारे २०० वर्षांनी, युद्धतत्त्वांची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली. या युद्धतत्त्वांवर आणि युद्धशात्र शिकवताना जे महान जागतिक युद्धविषयक तत्त्वज्ञ आहेत, त्यांच्या युद्धनीतीवर बाजीरावांची प्रमुख युद्धे पित्रे सरांनी तोलून दाखवली आहेत. या सर्व युद्धात ज्याला जागतिक मापदंड म्हणता येतील अशा पद्धतीने बाजीरावांनी सर्व युद्धे लढली आणि जिंकली आहेत. या युद्धांमध्ये खांडवा - बाळापूरची लढाई, गुजरात आणि कर्नाटक मधील मोहिमा या सुरुवातीला आहेत. या पुस्तकात सर्वाधिक चर्चा असलेली पालखेडची लढाई आहे. नंतर अमझेरा आणि बुंदेलखंड या लढाया आहेत. स्वराज्यातील आपसातील कलहाचे पर्यावसान म्हणजे दाभाड्यांच्या विरुद्ध केलेली डभईची लढाई आहे. शिवाजी महाराजांपासून सर्वांनी प्रयत्न करूनही हाती न आलेल्या जंजिऱ्याची मोहीम आहे. बाजीरावांनाही जंजिरा जिंकता आला नाहीच पण किमान सिद्दीने मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. ही आर्धी जिंकलेली लढाई सुद्धा आहे. त्यांनंतर बाजीराव दिल्लीच्या दारात जाऊन परत आले त्याची संपूर्ण व्यूहात्मक चर्चा आहे. निजामाला भोपाळच्या किल्ल्यात वेढून पुन्हा गुडघ्यावर आणलं ते आहे. वसईच्या लढाईत चिमाजी अप्पांनी केलेली शर्थ आहे आणि शेवटची लढाईत निजामाच्या मुलाला - नासिरजंगला - हरवले ते आहे. या सर्व लढाया/युद्धे याबद्दल लिहिताना पित्रे सर कुठेही बाजीरावांना "आपल्या कादंबरीचा हीरो" म्हणून कोणतीही सवलत देत नाहीत. जी आधुनिक युद्धतत्त्वे मानली गेली आहेत, त्या प्रत्येक कसोटीवर घासून बघतात आणि अखेरीस एक अजिंक्य सेनापती म्हणून बाजीरावांचं सोनं झळाळून उठतं.

ज्या १० आधुनिक युद्धतत्त्वांवर बाजीरावांच्या लढाया तोलून बघितल्या ती तत्त्वे आहेत -
१. उद्दिष्टाची निवड आणि पाठपुरावा
२. सुरक्षितता
३. गतिक्षमता
४. आक्रमक चाल
५. बळाचा मितव्यय
६. बळाचे केंद्रीकरण
७. विस्मयकारकता
८. मनोधैर्य
९. सहकार्य
१०. युद्धव्यवस्थापन
पालखेडच्या लढाईवर या पुस्तकात ३ प्रकरणे आहेत. वरील प्रत्येक पैलू त्यात तोलून बघितला आहे. उदा: निजामाला पूर्ण मात हे उद्दिष्ट होतं, त्याचाच पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी शाहूंनी माघारी बोलावल्यावरही त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करून, बाजीराव माघारी आले नव्हते. सहा महिने बाजीराव निजामाला आपल्या मागे लागण्यासाठी उद्युक्त करत होते. निजाम त्यांना गाठण्याआधीच पुढील टप्प्यावर पोहोचत होते. जेव्हा निजामाने बाजीराव आपल्या पकडण्याच्या बाहेर गेले आहेत असं वाटून माघारीची वाट धरली तेव्हाच बाजीरावांनी औरंगाबादवर चढाई केली आणि निजामाला पुन्हा बाजीरावांच्या मागे जावं लागलं. बाजीरावांकडे मुख्यतः घोडदळ असायचे. त्यामुळे गती, कमीत कमी बळाचा वापर आणि व्यवस्थापनात बुणग्यांची कोणतीही सोय करावी लागत नसे. पालखेडच्याच लढाईत निजामाचा तोफखाना हा युद्धक्षेत्रापासून काही किलोमीटर दूर अडवून ठेवला आणि बिना दात/पंजे असल्याप्रमाणे निजामाचे मनोधैर्य खच्ची केले. बाजीराव हे बारगिरांचे सेनापती होते. ते कायम आपल्या सैन्यात एका सैनिकासारखे वावरत. यामुळे त्यांच्या सैन्याचे मनोधैर्य कायम उच्च असे. अनेक लढायांमध्ये वेगवेगळ्या तुकड्यांचे निर्णय हे शिंदे, होळकर, पवार, चिमाजी आणि अन्य सरदार घेत. मात्र मूळ आराखडा बाजीरावांचा असे. त्यामुळे सैन्य विखुरलेले असताना केव्हा एकत्र करायचे आणि एकत्रित हल्ला करायचा याचे गणित पक्के असायचे.

या युद्धतत्त्वांशिवाय सुन्त्झू या चिनी युद्ध तत्त्वज्ञाने अडीच हजार वर्षांपूर्वी "द आर्ट ऑफ वॉर" नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यातील तत्त्वे आजही जगन्मान्य आहेत. याही कसोटीवर बाजीरावांची युद्धे तपासून पाहिली आहेत. यातील मुख्य बाबी -
१. न लढताच जिंकणे सर्वात उत्तम - निजामाची सगळीकडून कोंडी केली, त्याचा तोफखाना त्याच्याजवळ येऊ शकला नाही आणि पालखेडला प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढाई न होता निजाम शरण आला
२. जे अवघड आहे त्याची योजना ते सहज असतानाच आखावी, जे प्रचंड आहे, ते लहान असतानाच हाताळावे - निजामाने साताऱ्यावर चढाईचा विचार करताच बाजीराव वेगाने त्याच्या भागात घुसले आणि निजामाला त्याचा बेत बदलावा लागला. इथे जर निजाम साताऱ्यावर चालून गेला असता तर एकूण युद्ध खूप मोठं झालं असतं.
३. विजयाचा उन्माद साजरा करू नये, जे करतात ते रक्ततृषार्त असतात - बाजीरावांनी कधीही विजय साजरा केला नाही. दाभाड्यांना डभईला हरवल्यावर तर त्यांच्या आईंना भेटायला स्वतः गेले होते.
४. तुम्ही स्वतःला अजेय बनवा आणि शत्रू जेव्हा असुरक्षित असेल तेव्हाच त्याच्यावर हल्ला करा. आपण हरणार नाही अशाच ठिकाणी मुरब्बी लढवैये मोर्चेबंदी करतात आणि पराभवाला कारणीभूत ठरेल अशा कोणत्याही निमित्ताकडे दुर्लक्ष करत नाहीत - डभईच्या लढाईत बाजीरावांनी आधी दाभाड्यांना बाकी सैन्यापासून दूर नेले आणि नंतर नदीच्या चंद्रकोरीत अडकवले. इथे बाजीराव हरण्याच्या सगळ्याच शक्यता दूर झाल्या.
याच तत्त्वज्ञानातील दुसरा एक तत्त्वज्ञ, चुंग हो ची, म्हणतो की - गोंधळ होण्यापूर्वी गोंधळाची जाणीव असणे, संकट येण्यापूर्वी संकटाची जाणीव असणे, विध्वंसापूर्वी विध्वंसाची जाणीव असणे आणि आपदेपूर्वी आपदेची कल्पना असणे हे गहन ज्ञान आहे... या आणि अशा सर्व बाबी या बाजीरावांच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरतात.

कार्ल फॉन क्लाऊजवित्स हा बाजीरावांनंतर ८० वर्षांनी जन्मला. त्याने "ऑन वॉर" या ग्रंथात हालचालप्रधान युद्धांबद्दल लिहिले आहे. त्याने खालील मुद्दे मांडले होते -
१. शत्रूचा अन्नपुरवठा तोडणे/कमी करणे - भोपाळच्या किल्ल्यात निजामाला जेवण मिळणे मुश्किल झाले होते 
२. शत्रूच्या तुकड्या विलग राखणे - पालखेड आणि डभई या दोन्ही ठिकाणी मुख्य तुकडीला विलग केले गेले होते
३. शत्रूला माघार अधिक धोकादायक करणे - प्रत्येक लढाईतच शत्रूला परतीच्या वाटा पूर्ण बंद केल्या होत्या 
४. शत्रूची स्वतंत्र ठाणी मोडणे - दिल्लीच्या चढाईच्या आधी बाजीरावांनी आपल्या लहान लहान तुकड्यांच्या मार्फत अनेक ठिकाणी शत्रूला मात दिली होती (अपवाद - होळकरांचा पराभव)
५. शारीरिक आणि नैतिक परिश्रमाची तयारी - जे अंतर सामान्य घोडदळ ५ दिवसात पूर्ण करे, तेच अंतर बाजीरावांचे सैन्य २ दिवसात पूर्ण करत असे. घोड्यावर बसल्याबसल्याच शेतातील दोन कणसं घेऊन जेवण पूर्ण होत असे.
६. नेमकेपणा आणि शिस्त - बाजीरावांच्या सैन्याने कधीही लुटालूट केली नाही, कधीही कोणत्याही स्त्रीवर हात टाकला नाही 
याही प्रत्येक मुद्यांमध्ये बाजीरावांचे युद्धकौशल्य वादातीतपणे सिद्ध होते.

बेसिल हेन्री लिडेल हार्ट हा हालचालप्रधान युद्धावरील मोठा भाष्यकार आहे. त्याच्या मांडणीत
- उद्दिष्ट आणि क्षमता या जुळल्या पाहिजेत - बाजीराव दिल्लीच्या दारी जाऊन हल्ला न करता परतले
- बदलत्या परिस्थितीत लवचिकता असली पाहिजे - होळकरांची तुकडी पराभूत झाल्यावर आग्र्याला शत्रुसैन्याची पार्टी सुरू होती. ते बघून बाजीरावांनी आग्र्याला वळसा घालून थेट दिल्ली गाठली
- शत्रूला अनपेक्षित बाजूने हल्ला केला पाहिजे - बंगश जेव्हा बुंदेलखंडात होता तेव्हा ५ दिवसांचे अंतर २ दिवसात कापून त्याच्यावर अनपेक्षित हल्ला केला होता
- शत्रूच्या क्षमता ओळखून, घाई न करता निर्णय घेतले पाहिजेत - निजामाला पालखेड आणि भोपाळ या दोन्ही ठिकाणी त्याचा तोफखाना वापरता आला नाही
- शत्रू सावध असताना हल्ला न करणे - बाजीरावांनी आग्र्याला हल्ला न करता थेट दिल्लीला धडक मारली
- जिथे विजय झाला तिथेच पुन्हा हल्ला न करणे आणि जिथे पराजय होतोय तिथेच अधिक वेळ न घालवणे - थोडक्यात लवचिकता असली पाहिजे - प्लॅन बी कायम तयार असले पाहिजेत

अशा विविध युद्धतत्वज्ञांच्या मुद्द्यांवर बाजीराव हे अद्वितीय योद्धे ठरतात.

अर्थात काही चुकीच्या म्हणता येतील अशा बाबीही होत्याच. त्याही पित्रे सरांनी व्यवस्थित मांडल्या आहेत.
१. त्यातील पहिली म्हणजे अति सौजन्यशीलता - सद्गुणविकृती. चाणक्यनीतीतील
अग्नि: शेषं ऋण: शेषं, शत्रु: शेषं तथैव च ।
पुन: पुन: प्रवर्धेत, तस्मात् शेषं न कारयेत् ।।
ही बाब बाजीरावांनी अमलात आणली नाही आणि निजामाला दोन वेळा मारता येत असतानाही सोडलं. वसईला सगळ्या धर्मांध पोर्तुगीजांना जिवंत जाऊ दिलं...
२. वसुलीच्या पद्धतीत कोणत्याही सुधारणा त्यांनी केल्या नाहीत. त्यात त्यांना स्वारस्य नव्हते, किंवा तेवढा वेळ मिळाला नाही
३. आधुनिक शस्त्रे, तोफा या आपल्या सैन्यात असाव्यात असा प्रयत्न केला नाही. त्यांचा भर वेगावर असल्याने दुर्लक्ष केले असेल, पण दुर्लक्ष केले हे खरे...
४. समुद्र केवळ आंग्ऱ्यांवर सोडला, त्यात कोणतेही नवीन प्रयोग केले नाहीत.
या उणिवा या गालावर लावलेल्या तीटासारख्या आहेत. 

बाजीरावांनी शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हयातीत मोगल साम्राज्य नावापुरते शिल्लक राहिले. हिंदूपदपातशाही निर्माण होऊ शकेल हा विश्वास आला. मराठा सरदार हे गुजरात, माळवा आणि उत्तरेत स्थायिक झाले. या भागात सतत सुलतानी कराच्या ओझ्याखाली पिचलेल्या जनतेने मराठ्यांना मनापासून स्वीकारले आणि मराठ्यांनीही त्यांना सांभाळले. छोट्या स्वराज्याचे रूपांतर बाजीरावांनी आपल्या शौर्याने मराठा साम्राज्यात केले. छत्रपतींच्या या सेवकाला शतशः नमन 🙏🙏

पुस्तकाचे नाव - या सम हा
लेखक - मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे 
प्रकाशक - राजहंस प्रकाशन 
पृष्ठे - ३३५
किंमत - ₹४००

Saturday, August 15, 2020

अखंड भारत संकल्प दिन

काल अनेकांनी अखंड भारत संकल्प दिनाच्या पोस्ट टाकल्या, लेख लिहिले. तर काही पक्क्या हिंदुत्ववाद्यांनी अखंड भारत ही संकल्पना १९४७ला आणि आताही कशी अव्यवहार्य आहे यावर लिहिलं. दोन्ही बाजू वाचल्यावर मला काय वाटतंय ते लिहिण्याचा हा प्रयत्न.

"गांधीजी व काँग्रेसने अखंड भारत का नाकारला?" या शेषराव मोरेंच्या पुस्तकात अखंड भारत असणं किती त्रासदायक झालं असतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे. तेव्हाही आणि आताही एकूण मुस्लिम लोकसंख्या ही ४०% च्या आसपास असली असती. सावरकरांनी जे सुचवलं होतं, त्यानुसार तर तेवढं प्रतिनिधित्व मुस्लिमांना मिळालं असतं. ते नाही तरी एकूण मुस्लिमबहुल मतदारसंघ हे ३०%-३५% नक्कीच राहिले असते. आज खंडित भारतात जिथे २०% मुस्लिम लोकसंख्या आहे, तिथेही कट्टरतावादी सामान्य मुस्लिमाला फितवतात आणि जिहादी कारवाया, अशांत काश्मीर, अन्य भारतात बॉम्बस्फोट ते आझाद मैदान, बेंगळुरू मधील झुंडशाही हे घडत आहे. जर हीच लोकसंख्या ४०% असती तर किती नुकसान होऊ शकतं. या तर्कावर पुन्हा अखंड भारत होणं हे अव्यवहार्य आहे हे या मंडळींचं म्हणणं आहे. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य उद्धृत केलं जातं, "आज भारताला लागलेला मोठा रोग संपला". हे सगळं तर्कनिष्ठ आहे यात वाद नाहीच. पण तर्काच्या पुढे गेलं तरच इतिहास घडत असतो.

भारतीयांनी रामजन्मभूमीचं स्वप्न गेली ५०० वर्षे पाहिलं. दोन पिढ्यांनंतर जर ते स्वप्न हे अव्यवहार्य आहे या तर्कावर सोडून दिलं असतं तर आज ते पूर्ण झालं नसतं.
बलाढ्य मोगल आणि अनेक शाह्या आजूबाजूला असताना, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहणं हे अतार्किकच होतं.
प्रचंड तोफखाना असलेल्या निजामाला केवळ घोडदळाच्या जोरावर बाजीरावांनी पालखेडला गुढग्यावर आणलं, अडीच लाखांच्या मोगल सैन्याला पंचवीस हजारांच्या मराठ्यांच्या सैन्याने शिंदे होळकर पवार यांच्या नेतृत्वात पाणी पाजलं आणि त्यामागोमाग बाजीराव थेट दिल्लीच्या दारात जाऊन आले हे सगळंच अतार्किक आणि अव्यवहार्य होतं.
गांधीजींनी मीठ उचलणं, अनेक क्रांतिकारकांनी जीवनाची आहुती देणं, सावरकरांनी जहाजातून उडी मारणं आणि नेताजींनी भारताबाहेर सैन्य उभारून भारत स्वतंत्र करण्यासाठी युद्ध करणं हे सगळंच अतार्किक होतं
हजार वर्षांहून अधिक काळ आपल्या मायभूमीपासून दूर राहून ज्यू लोक स्वतंत्र इस्राएलचं स्वप्न पाहत राहिले. ते अतार्किक, अव्यवहार्य आणि अशक्यप्राय होतं.
दोन शहरं पूर्ण बेचिराख झालेली असताना जपानने केलेली प्रगती तर्काच्या कुठल्याही कसोटीवर बसत नाही, पण ते झालंय.
प्रत्येक वेळी तर्क, व्यवहार यावरच मदार ठेवली असती तर वरील कुठलाच इतिहास घडला नसता. 

ध्रुव भट्टांच्या तत्त्वमसीमध्ये नायक पुजाऱ्यांना विचारतो की, "या सगळ्या पूजा, व्रत यामागील तर्क, ज्ञान तुम्हाला माहीत आहे का?" 
पुजारी सांगतात, "नाही"
नायक पुन्हा विचारतो, "जर हे सगळं का करायचं माहीत नाही, तर का करता?"
पुजारी सांगतात, "मला कळालं नाही म्हणजे पुढील पिढ्यांनाही कळणार नाही असं नाही. पण जर मी हे थांबवलं तर पुढील पिढ्यांना "हे असतं" हेच माहीत असणार नाही. त्यामुळे यामागील तर्क कळण्याची शक्यताच मावळून जाईल. ते व्हायचं नसेल तर मला कळो अथवा न कळो, या गोष्टी मला पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे."

अखंड भारत हे असंच एक १९४७ला अव्यवहार्य असणारं, आज कदाचित अतार्किक असणारं स्वप्न किंवा व्रत आहे. ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आपल्या पिढीचं काम आहे. ते पोहोचवत राहिलं तर कदाचित १००, २००, ५०० वर्षांनी ते साकार होईल. पण जर त्याला अव्यवहार्य ठरवून सोडून दिलं तर पुढील पिढी यावर काम करणारच नाही.

कोणतंही मोठं काम एकाच टप्प्यात होत नसतं. त्याप्रमाणे अखंड भारत हा काही पाकिस्तानशी एक युद्ध करून सगळा पाकिस्तान भारतात विलीन करून घेणं असं असू शकत नाही. मग हे टप्पे कोणते असू शकतात -
०. भारत मजबूत बनवणं
१. गिलगिट बाल्टिस्तान, अक्षय चीन भारतात विलीन करणे
२. पाकिस्तानची अजून शकले होऊन सिंधदेश, पंजाब, पश्तुनीस्तान, बलुचिस्तान हे नवीन देश तयार होणे
३. तिबेट स्वतंत्र होणे
४. युरोपियन युनियनच्या धर्तीवर अफगाणिस्तान पासून ते इंडोनेशिया पर्यंत आर्थिक एकता साधणे
५. इथून पुढे कदाचित एक राष्ट्र ही संकल्पना मांडता येईल...

हे सगळं घडणं सहजसाध्य असणार नाहीच. हे असंच घडेल असंही नाही. पण स्वप्न अतार्किक, अव्यवहार्य आहे म्हणून सोडून देणं अयोग्य होईल. कारण त्यामुळे स्वप्नाचे अस्तित्वच संपून जाईल.

त्यामुळे दर वर्षी १४ ऑगस्ट रोजी "अखंड भारत संकल्प दिन" हा झालाच पाहिजे.

🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

Thursday, July 30, 2020

वेगळाच "दोन मी"

सामान्यपणे "दोन मी" असलेल्या कवितांमध्ये "पहिला मी" म्हणजे आपण नेहमीचे, नोकरी-धंदा करणारे, "रोजमर्राह की जिंदगी जिने वाले" वगैरे असतो. आणि "दुसरा मी" सामान्यपणे चिंता न करणारा, आहे तो क्षण जगणारा, वाईटातून चांगलं शोधणारा/घडवणारा वगैरे असतो. पण कधीतरी हा "दुसरा मी" फार वाईट असू शकतो. जो आपल्यात असतो, पण आपण त्याला प्रयत्नपूर्वक दूर ठेवलेलं असतं. माझा एक मित्र त्याला दारू ऑफर केली की नाकारताना एकच गोष्ट सांगतो, "मी सुरू केली, तर थांबायचं भान राहणार नाही, म्हणून मी दारू पीत नाही." हे जसं आहे तसंच हा "दुसरा मी" सगळ्या षड्रिपूंना अगदी जवळ बाळगून असतो. जरा जागा मिळाली की वर येतो. आपण कुठे थांबायचं याचा विवेक काढून घेतो.

संदीपच्या एका कवितेतला हा वाईट्ट "दुसरा मी" काहीसा असा आहे - हा मनाच्या कोपऱ्यात लांब दूर कुठेतरी असतो. पण तिथूनही तो एकप्रकारे दबा धरून बसलेला असतो. नेहमी हा कधी बाहेर दिसत नाही. कुठेतरी अंतरंगात लपून असतो. त्याला "पहिला मी" कधी हटकायला जात नाही. पण अचानकच एखाद्या अनामिक वेळी याची सावली आपल्यावर पडू शकते. ती सावली जर पडली तर आपलंच एक विकृत मन समोर येतं. त्याला साध्या सुंदर गोष्टी विकृत वाटू लागतात. त्याची हाव सुटते. अशा वेळी जर "दुसऱ्या मी"ला उठू दिलं, तर या विकृतींची एक चटकच लागते. ही जर चटक लागली तर जी पंचेंद्रिये आपल्याला आनंद देतात, एक नवी अनुभूती देतात, ज्याद्वारे आपण एक प्रकारे तरल होऊन विहार करू शकतो त्याऐवजी केवळ सुरू होतं ओरबाडणं. आस्वाद घेणं बंद करतो आणि विचार, कृती मधून फक्त ओरबाडतच राहतो, शोषण करतो. याची सुरुवात फार सहज होऊ शकते. आपण कधीतरी काहीतरी चुकीचं करतो. ती चूक पकडली जात नाही. त्यातून आपल्याला काहीतरी फायदा मिळतो. मनाला एक प्रकारे आपण हेही करून यश मिळवू शकतो असं वाटतं. मग त्या चुका वाढत जातात. चुका थांबून अपराध सुरू होतात आणि त्यातूनच हा "दुसरा मी" मोठा होत जातो. मुळातला "पहिला मी" नंतर कुणाला दिसत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच चूक केली/झाली तर थांबा. नाहीतर हा शतकानुशतके असलेला "दुसरा मी" तुमचा कधी ताबा घेईल सांगता येणार नाही.

आता संदीपची या "दुसऱ्या मी"ची कविता -

आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून
पडका वाडा बसला आहे दबा धरून
त्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर
दिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर
परंतु तेथे जावयास ना कोणा धीर
कारण आहे पक्के ठाऊक आम्हाला
त्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा

कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी
उच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी
दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ
काठावरती येऊन बसते संध्याकाळ
पाण्यावरती पडता छाया सांजेची
दिवसावर हो काळी जादू रात्रीची
घुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे
विरून जाती रूप धारती घुबडांचे
घुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या
तरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या
भीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला
आळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा

हिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस
नाकाजागी केवळ भोके अठ्ठावीस
उडता येते परी आवडे सरपटणे
गाळ चोपडे अंगाला जैसे उटणे
उठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक
पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप
अन्य न काही चाले या बुंबुंबाला
भूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला
जे जे दिसते त्याची चटणी जोडीला
खा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा

खोडी काढी खोटे जर बोले कोणी
आणेल कोणी आईच्या डोळा पाणी
चोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी
बुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी
जवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे
त्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे
बुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा
खापरखापरपणजोबांहून पूर्वीचा
तयास न भितो असा जगातून कोण भला
बुंबुंबाही घाबरतो बुंबुंबाला
करण्याआधी वाईट काही रे थांबा
दिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा

गम्मत वाटली ना!

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात सलीलने शुभंकर सोबत काही युट्युब व्हिडीओ केले होते. त्यात अग्गोबाई... चे काही एपिसोड होते. या छान गप्पांमध्ये सलीलने आणि संदीपने खूप गमतीदार गोष्टी सांगितल्या. शेवटच्या कडव्यात "दिसेल अथवा आरशातूनी" मुळे बुंबुंबा हे आपलंच रूप आहे हे जाणवलं होतं, पण आख्खी कविताच "दोन मी"ची आहे हे संदीपने एका एपिसोडमध्ये सांगितलं. वर म्हणाला की आता पुन्हा नीट ऐका... अमोहामुळे अग्गोबाई... घरात सुरूच असतं. मग संदीपने सांगितल्याप्रमाणे पुन्हा या दृष्टिकोनातून (श्रुतिकोनातून) ऐकलं. ही "दोन मी"ची वेगळीच संकल्पना जाणवली. तुम्हीही ऐकून बघा...