Friday, April 29, 2022

वसुबारस २०२१

 सकाळी सहा सव्वासहाला शेतात जायला निघालो. भरपूर पाऊस झाल्याने कार शेतापर्यंत जाणं शक्यच नव्हतं. संतोषच्या मागे बसून मोटारसायकलवर गेलो. गेल्यागेल्या सूर्यनारायण आपल्या सोनेरी किरणांची पाखरण करत दिसू लागले. मग शेतात एक फेरी मारली. या वर्षी पावसाने मठ, तीळ, भगर आणि राळे यांची मातीच केलीये. पण तूर मात्र दिमाखात उभी होती. पाऊस थांबून केवळ तीन आठवडे झाले आहेत. आमच्या तुरील कोणतेही रासायनिक खत फवारणी नसते. त्यामुळे तुरीने पावसाच्या वेळापत्रकाप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं आणि आता तूर फुलावर येत आहे. अजून जमिनीत ओल आहे. आता उर्वरित शेतात गहू, जवस, हरबरा टाकायचा आहे. कुठे, काय आणि किती लावायचं हे ठरवत शेत फिरून झालं. 

आमच्या जंगलात मुद्दाम सुरुवातीला गेलो नाही. नाहीतर कामं तशीच राहतात आणि जंगलाजवळ बसून राहणं होतं. जंगलाचा एक टप्पा आता स्वयंपूर्ण झालेला आहे. सगळीच मोठी झाडं ३० फुटांपर्यंत गेली आहेत. खाली मोठमोठी खोडं दिसतात. झाडांचं एकूण आपसात छान चालू आहे. दुसरा टप्पा अजून दीड वर्षांचाच आहे. याला स्वयंपूर्ण व्हायला अजून दीड वर्ष लागेल. या टप्प्यात एक दोन प्रयोग केले होते. काही वेली लावल्या होत्या. त्यातील एक होती समुद्रशोक. ही वेल खूप मोठी होऊ शकते. याच्या पानांची भाजी, अळूवड्यांसारख्या वड्या वगैरे करतात. वाढ बघता, ही समुद्रशोक बहुदा या जंगलातील महालता होईल. केळीची गावरान रोपं लावली होती. एकूण ५-६ घड आले. त्यातील जी केळी बाहेरच्या बाजूने होती तिचे घड खायला मिळाले. आतली केळी प्राण्यापक्षांना 🙂

जंगल झाल्यावर आमचा बंधारा बघायला गेलो. पाऊस भरपूर झालेला असल्याने पाणी असणार याची खात्री होती. तीन आठवड्यापूर्वी शेवटचा पाऊस झाला होता त्यामुळे पाणी वाहतं असेल असं वाटलं नव्हतं. पण आश्चर्य म्हणजे खळखळ वाहणारं पाणी दिसलं. अगदी स्वित्झर्लंडला असतं तेवढं नितळ नसलं तरी बऱ्यापैकी स्वच्छ पाणी होतं. पाण्याला कोणताही वास नव्हता. तुंबाच्या दुतर्फा छान झाडं आहेत, ती पाण्यावर सावली धरून होती. याचा व्हिडीओ बघताना आवाज नक्की ऐका. मग आठवलं की, विहीर तर बघितलीच नाही. 

आमची विहीर मी तुडुंब पाऊस झालेल्या वर्षीही (२००५) बघितली होती. तेव्हाही पाणी जिथून विहीर बांधलेली आहे त्या दगडी भिंतीला टेकलं नव्हतं. आमची विहीर साधारण ५०-६० फूट खोल असेल. पैकी २०-२५ फूट बांधकाम आणि खाली खडक. आम्ही कायम खडक पाहत आलोय. मात्र या वर्षी पहिल्यांदाच विहीर ३५-४० फूट भरलेली आहे. आमच्या शेजारच्या शेतात १५ वर्षांपूर्वी विहीर केली होती. तिला कधीच पाणी नव्हतं. या वर्षी तुडुंब पाणी आहे. मामांच्या शेतातल्या विहिरीला आम्ही तिसरीत असताना पाणी बघितलं होतं. मागच्या वर्षी तिचा झरा पुन्हा फुटला ते इथे सांगितलं होतं. या वर्षी त्या विहीरीला वरतून १० फुटांवर पाणी आहे. त्याच्या बाजूच्याच शेतावर तर हाताने बादली घालून घेता येईल एवढं पाणी आहे. आमच्या "जलपूजनाला" या वर्षी पावसाने भरभरून दिलं. रब्बी हंगाम आणि कदाचित उन्हाळी पिकंही छान होतील!

मग घरी आलो. आमची गुरं सांभाळणारा एकनाथ तयारच होता. त्याने गोठ्यात गायी वासरं एकत्र केली. मग आई, मी, संतोष, संतोषचा छोटा मुलगा सगळे "वसुबारस" साजरी करण्यासाठी, गोवत्स पूजनासाठी गोठ्यात गेलो. गायींना, वासरांना ओवाळलं. त्यांची पूजा केली. आणि अर्थातच फोटोसेशन सुद्धा केलं. एवढं करून छान भूक लागली होती. मग बाजरीची भाकरी, ठेचा आणि पिठलं असा बेत झाला (भुकेमुळे ताटाचा फोटो नाही काढलाय 😜)

अशी आमची वसुबारस साजरी झाली. आता पुढच्या आठवड्यात अमोहासह शेतावर चक्कर असणार आहे!!!

सच्च्या शिवसैनिकाचं भांडण असं, चाले त्याच्याच मनात

मित्र प्रशांत आवले ने दोन ओळी दिल्या आणि विडंबन पाडायला सांगितलं. 
दर वर्षी दसरा येतो, दर वर्षी असं होतं
मेळाव्यात काढलेल्या ओकाऱ्यांनी, एका माणसाचं हसं होतं

या मूळ कवितेत "तो" आणि "ती" आहेत. पण मला यात एक मूळ सच्चा शिवसैनिक आणि सध्या "कदाचित" त्याच्या मनात चालू असलेलं द्वंद्व घ्यावं वाटलं. बाळासाहेबांच्या अनेक भूमिकांबद्दल कितीही वाद असले तरी जेव्हा शिवसेना ८०% समाजकारण आणि २०% राजकारण "म्हणत" होती, तेव्हा स्थानिक शिवसेना शाखा ही त्या वस्तीतल्या लोकांना हक्काचं व्यासपीठ असायची. अनेक स्थानिक प्रश्न तिथे चुटकीसरशी सुटायचे. त्यांच्या ऍम्ब्युलन्स असायच्या, रक्तदान शिबिरं व्हायची... आणि बरंच काही. हा शिवसैनिक जेव्हा आज दसरा मेळाव्याला जातो आणि भाषण ऐकतो तेव्हा त्याला काय वाटत असावं हे या विडंबनात बसवण्याचा प्रयत्न केला आहे. हसा, टिंगल करा, मजा करा... कारण विडंबनं मला होतात, कविता वगैरे होत नाहीत 😜😜😜

त्याला मेळावा आवडतो, पण भाषण आवडत नाही 
भाषण ऐकवल्याशिवाय, साहेब त्याला सोडत नाही 

मेळावा त्याला आवडतो, पण भाषण आवडत नाही 
असलं त्याचं गणित, साहेबाला कळत नाही

भाषण म्हणजे टाईमपास नुसता, भाषण म्हणजे कोथळा 
मेळावा म्हणजे संघटन, शिवसैनिकांचा मेळा 

भाषण कान किट्ट करतं, भाषण रिमेकचं गाणं  
मेळावा उत्साही मनं, मेळावा विचारांचं सोनं 

भाषण नुसतीच तोंडाची वाफ, काम नाहीच मुळी 
मेळावा तयार करत असतो, कार्यकर्त्यांची फळी  

दर वर्षी दसरा येतो, दर वर्षी असं होतं
दर वर्षी दसरा येतो, दर वर्षी असं होतं
मेळाव्यात काढलेल्या ओकाऱ्यांनी , एका माणसाचं हसं होतं

भाषण आवडत नसलं तरी, मेळावा त्याला आवडतो 
भाषण आवडत नसलं तरी, मेळावा त्याला आवडतो 
मेळावाही आवडू नये, म्हणून साहेब झगडतो 

बाळासाहेबांच्या स्मृती घेऊन, तो जातो मेळाव्यात 
सच्च्या शिवसैनिकाचं भांडण असं, चाले त्याच्याच मनात 

भार व्हा (गारवा विडंबन)

कुणाचीही माफी बिफी न मागता विडंबन सादर आहे

वजन जरा जास्त आहे
दर वेळी वाटतं
भर झोपेत ट्रॅकसूट घालून स्वप्न मनात दाटतं
स्वप्नात मन चालत राहतं
स्वप्नात मन चालत राहतं
पावलं चालत नाहीत
मनाने व्यायाम केल्याने शरीराला काहीच होत नाही

तितक्यात कुठूनसा दरवळ नाकाजवळ येतो
तितक्यात कुठूनसा दरवळ नाकाजवळ येतो
निश्चयाच्या खिडकीला थोडंसं उघडतो
मी विशीतल्या मुलासारखा पिझ्झा पास्ता खातो
फरसाण लाडू चिवडा सगळंच फस्त करतो

दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ
लंच मागून चालत येते डिनरची मस्त वेळ
चक्क डोळ्यांसमोर हँगरचा सिलेंडर होतो
अनोळखी पोट्ट्यांचा मी कुठून काका होतो
(किंवा - 
चक्क डोळ्यांसमोर बाटलीची बरणी होते
अनोळखी पोरांची मी कुठून आंटी होते)

Monday, September 20, 2021

Resilience

 Resilience हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. Flexibility, Plasticity, Elasticity असे त्याचे बरेच अर्थ सांगितले जातात. मराठीत लवचिकता वगैरे याचे अर्थ होतात. पण या पर्यायी शब्दांतून Resilience चा नेमका अर्थ लागत नाही. मला या शब्दाची लागलेली व्याख्या म्हणजे "एखाद्याची कितीही प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा सामान्य होण्याची जी असामान्य क्षमता असते" तिला Resilience म्हणतात.

डेव्हिड ऍटनबरो आजोबांच्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये हा शब्द आला.. आणि साक्षात्कारासारखा कळाला, त्याची ही गोष्ट!

२६ एप्रिल १९८६ ला चेर्नोबिल येथे जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात झाला. चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान भयानक स्फोट झाला आणि अण्विक गळती सुरू झाली. आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये हे प्रदूषण पसरलं. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. याशिवाय किरणोत्सर्गाच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगामुळे चार हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले असावेत.

यानंतर हा पूर्ण परिसर कायमचा प्रदुषित घोषित केला गेला. एकूण साडेतीन लाख नागरिकांचे स्थलांतर केलं गेलं. या सगळ्या घटनेमुळे सुमारे ६८ अब्ज डॉलरचा खर्च झाला. या दुर्घटनेनंतर काही तासांतच तिथून आणि आजूबाजूच्या परिसरातून कर्मचारी, नागरिक यांना सुरक्षित जागेवर हलवलं. स्फोट आणि त्यानंतरचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात रशिया, युक्रेन आणि बेलारूस या देशांमध्ये पसरले. त्याहून कमी प्रमाणात प्रदूषण हे अन्य १० देशांमध्येही पसरले. एकूण १ लाख ९१ हजार वर्ग किलोमीटर्स एवढ्या भागात हे प्रदूषण पसरलं. यातील १० हजार वर्ग किलोमीटर्स एवढा भाग हा मानवी वस्तीसाठी अयोग्य ठरवला गेला. पुढील चार वर्षात या भागात जे प्राणी जन्मले त्यांच्यात जन्मतःच अनेक व्यंगे होती आणि ते लगेच मृत्यू पावले. या सर्व घटनेमुळे या मोठ्या भागातून माणूस नावाचा प्राणी दूर गेला आणि मग निसर्गाने आपलं काम सुरू केलं... Resilience!!!

या प्रदूषित जागेपैकी १० वर्ग किलोमीटर्स जागा पूर्ण जळाली होती. तेथील मोठमोठाले वृक्ष जळून सर्व भागातील जंगल संपलं होतं. त्यामुळे या जागेला रेड फॉरेस्ट असं नाव पडलं. पहिल्या २-४ वर्षांनंतर या भागातील जैवविविधता कित्येक पटींनी वाढली. १९८६ नंतर पहिल्यांदा १९९६ मध्ये BBCने इथे एक डॉक्युमेंट्री (Inside Chernobyl's Sarcophagus) तयार केली. त्यात अणुभट्टीतून लहान मोठे पक्षी आत बाहेर जाताना दिसले. तरीही हा भाग मानवी वस्तीसाठी योग्य नव्हताच. त्यामुळे माणूस या भागापासून दूरच राहिला आणि निसर्गने आपलं काम सोडलं नाही.

२०१६ला म्हणजे या अपघातानंतर ३० वर्षांनी मरीना शक्विरिया नावाची अभ्यासक आपल्या टीमसह या भागात गेली. तिथे निसर्गाने केलेल्या किमयेने आश्चर्यचकित झाली. इतक्या भयंकर अपघाताचे ठिकाण हे कित्येक वन्यजीवांच्या हक्काचे आश्रयस्थान बनले होते. हरणं, अस्वलं, बीव्हर, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे, घोडे, गाढवं... असे कित्येक प्राणी तिथे आहेत. तिथे त्यांची पूर्ण परिसंस्था निर्माण झाली आहे. त्यात मानवाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याने ती बहरत गेली. या भागात कॅमेरा ट्रॅप्स बसवले आहेत. त्यात दिसणारी या सर्व प्राण्यांची संख्या वन्यजीव अभ्यासकांना अक्षरशः थक्क करून सोडते. येथील किरणोत्सारी पाण्यात हंस सहज विहार करत असलेले दिसतात. येथील किरणोत्सर्गाचा वन्यजीवांच्या संख्येवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. उलट माणूस नसण्याचा मात्र अत्यंत अनुकूल परिणाम झाला आहे. Przewalski नावाची घोड्यांची एक लुप्त होत चाललेली प्रजाती आहे. या भागात ही प्रजाती व्यवस्थित वाढत आहे. अन्य कुठेही न दिसणारी यांची उपप्रजाती केवळ याच भागात बघायला मिळते. अशीच एक बीव्हरचीही प्रजाती इथे आनंदाने बहरत आहे. येथील बीव्हरचे महत्व हे आफ्रिकेतील हत्तींच्याएवढेच आहे. येथील प्राण्याच्या आणि वनस्पतींच्या सहचर्याने जमीनही बदलत आहे. मोठमोठाली झाडं जेव्हा पडतात तेव्हा त्यांचं होणारं विघटन हे जमिनीला अधिक सुपीक करत आहे. अभ्यासकांच्या मते १०० वर्षांपूर्वी येथील जल-जमीन-जंगल जसं होतं, तसंच ते काही वर्षात पुन्हा होईल. युक्रेन आणि बेलारुसमधील १६०० वर्ग किलोमीटर्स परिसर हा आता अभयारण्य बनला आहे. गम्मत म्हणजे युरोपातील ते सर्वात मोठे अभयारण्य आहे.

हेच ते Resilient असणं... "कितीही प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा सामान्य होण्याची जी असामान्य क्षमता"

हे सर्व बघता मानवी वावर हा आण्विक प्रदूषण / किरणोत्सर्जन यापेक्षा निसर्गाला अधिक घातक आहे. कधीतरी माणूसही यातून शिकेल, नाहीच शिकला तर निसर्ग समर्थ आहे. तो नक्कीच धडा शिकवेल. एखादा मोठा धक्का बसण्याआधी माणसाने जागं होऊन निसर्गात लुडबूड कमी करावी, हेच यातून शिकावे...

संदर्भ:

https://en.wikipedia.org/wiki/Chernobyl_disaster

https://www.nationalgeographic.com/.../060418-chernobyl...

https://en.wikipedia.org/wiki/Red_Forest

Few other documentaries

Monday, August 30, 2021

बिनाखर्चाचे खेळ

मी लहान असताना, म्हणजे माझ्या दुसरीपर्यंत, फुलंब्रीला राहत होतो. माझे पट्टमित्र म्हणजे स्वाती पुराणिक आणि प्रदीप निंबाळकर. मी आणि स्वाती, भराडकरांच्या वाड्यात राहायचो. प्रदीपचा वेगळा वाडा होता. आमची कुटुंबमैत्री असलेलं आणखी एक कुटुंब म्हणजे गोलटगावकर. प्रदीपच्या वाड्याच्या समोरून उजवीकडे वळालो की फर्लांगभर अंतरावर ते राहायचे. त्यांची मुलं केदार आणि योगिता. केदार माझ्यापेक्षा मोठा आणि योगिता छोटी. आमचा खेळ काय तर भराडकर वाड्यावरून निघायचं. मध्येच एखादी काडी शोधायची. प्रदीपला हाक मारायची. तिथून ते गोलटगावकरांच्या घरापर्यंत जेवढं म्हणून गाजरगवत दिसेल ते झोडपून काढायचं. एकूण अंतर फार तर १० मिनिटं. पण आम्ही किमान अर्धा पाऊण तास बाजीप्रभू आणि तानाजी आणि मुरारबाजी आणि काय काय होऊन गनिमांना झोडपत गोलटगावकरांच्या घरी पोहोचायचो.

केदार आणि प्रदीप, मी आणि स्वातीपेक्षा शूर होते. ते भिंगोटे पकडायचे. त्याला हलका दोरा बांधायचे. मग भिंगोटे सोडून, दोऱ्याचं दुसरं टोक पकडून त्या भिंगोट्यामागे पाळायचे. मी आणि स्वाती त्या दोघांच्या मागे.

कधीतरी दोन तीन कुटुंबांची एकत्र सहल  म्हैसमाळला जायची. तिथे आम्ही सगळे पोरं कधी करवंदाच्या जाळीत करवंद शोधायचो, कधी वाहता ओढा असेल तर त्या पाण्याच्या गिरक्या बघत बसायचो. देवीच्या मंदिराच्या मागे आंब्याचं मोठं झाड होतं, त्यावर चढायचो. मंदिरापासून ते वरच्या गेस्टहाऊस पर्यंत पळत जायचो आणि परत यायचो. यात स्पर्धा नसायची, उगाच पळत जायचं आणि यायचं. आमचा दिवस दिवस हे खेळ खेळण्यात जायचा.

उन्हाळ्यात २ चिंचोके घ्यायचे, ते उभे फोडायचे. मग एक पाट घ्यायचा. उलटा करून त्यावर खडूने चंफुलचे चौकोन करायचे. मग चार आकारांचे दगड किंवा काहीही घ्यायचं आणि खेळ सुरू. आख्खी दुपार या चंफुलमध्ये सहज जायची. तेवढ्या वेळात कधी पापडाच्या लाट्या तयार व्हायच्या, कधी लोणच्याचा खार तर कधी कुरडायांचा चीक व्हायचा. मग तोच खाऊ आम्हाला मिळायचा.

नंतर आम्ही संभाजीनगरला राहायला आलो. तिथे सिडकोत एन ९ - एल ५१ मध्ये राहत होतो. ५१ क्रमांकाचं घर रांगेत पाहिलं. याच्या पलीकडे एक झरा होता. तेव्हा पावसाळ्यात वाहायचा. त्यात डिंभक, लहान मासे सुळूसुळू पोहायचे. आम्ही ओंजळीत माश्यांसह पाणी घ्यायचो आणि परत सोडून द्यायचो. कधीतरी चतुरांचा मोठा थवा यायचा. त्याच्याकडे बघत बसायचो. पाण्यावर तरंगणारे कीटक असतात. ते या झऱ्याच्या डोहात (घरापासून थोडं पुढे, बळीराम पाटील शाळेकडे जाताना हा डोह होता) असायचे. त्यांच्या हालचाली, त्यामुळे पाण्यावर उठणारे तरंग आम्ही बघत असू. ते कसे तरंगतात याचं फार फार अप्रूप वाटे. 

हे आणि असे कितीतरी बिनाखर्चाचे खेळ आम्ही खेळत असू. आज याची आठवण झाली कारण मी आणि अमोहा घरातून खाली सोसायटीत गेलो. साधारण १०-१५ मिनिटं शोधल्यावर आम्हाला २-३ छान पीसं सापडले. त्यातलं एक खेळायला उत्तम होतं. ते घेऊन पुढे एक तास आम्ही खेळत होतो. मज्जा आली👨‍👧



कर्ण

हॅरी - आपण आत्ता कुठे आहोत?

प्रोफ. डम्बलडोर - तुला काय वाटतंय?

हॅरी - मला वाटतंय की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. फक्त इथे गर्दी नाहीये, स्वच्छता जास्त आहे...

प्रोफ. डम्बलडोर - अच्छा...

हॅरी - आता मला परत जावे लागेल ना?

प्रोफ. डम्बलडोर - ते तुझ्या निवडीवर अवलंबून आहे.

हॅरी - म्हणजे मला ठरवता येईल?

प्रोफ. डम्बलडोर - मी तुला खूप आधी सांगितलं होतं की तू किंवा कुणीही जे काही आहात ते निवडीवर अवलंबून आहे. कुणाचीही निवड ही क्षमतेहून अधिक महत्वाची असते. यासाठी तुला एक गोष्ट सांगतो.

तुला महाभारत माहित आहे. तुझ्या अभ्यासक्रमात होतं... त्यात एक पात्र होतं - कर्ण! तो कुंतीचा पुत्र होता. विवाहाच्या आधी झालेला होता. त्यामुळे कुंतीने त्याला त्यागले होते. त्याला वाढवले एका सारथी कुटुंबाने. राधेने त्याचा स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे सांभाळ केला. त्याची दुर्योधनाशी मैत्री झाली. जेव्हा तू, रॉन आणि हर्मायनी यांच्यातील कुणी चूक करत असेल तर अन्य दोघे, किमान एकजण ते थांबवण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर ना? यालाच निवड म्हणतात. मैत्री अशीच असली पाहिजे. पण कर्णाने कधीही दुर्योधनाला वाईट वागण्यापासून थांबवले नाही. दुर्योधनाने जेव्हा भीमाला विष दिले, तेव्हा तर कर्ण आणि अर्जुन यांच्यातील तीव्र स्पर्धा सुरू व्हायची होती. भीमावर केलेल्या विषप्रयोगाला त्याने थांबवले नाही. पांडवांना जाळून मारावे म्हणून लाक्षागृहात पाठवले, चुकीच्या पद्धतीने द्यूत खेळले, द्रौपदीची विटंबना केली, विराट राजाच्या लहानश्या राज्यावर आक्रमण केलं, पांडवांकडून पाच गावांचा प्रस्ताव कृष्णाने आणला तोही नाकारला. युद्धात अभिमन्यूला अनेकांनी मारलं. तो निःशस्त्र झाला होता तरीही कर्णाने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तोच कर्ण, जेव्हा अर्जुन त्याला निःशस्त्र असताना मारत होता तेव्हा नियमांची ग्वाही देत होता. जेव्हा मैत्री करता तेव्हा ती निभावता आली पाहिजे. निभावणे म्हणजे प्रत्येक बाबतीत सोबत असणे नव्हे, तर मित्राला योग्य मार्गावर ठेवणे म्हणजे मैत्री. हीच ती निवड.

हॅरी - बरोबर. पण किमान तो मैत्री निभावताना दुर्योधनाच्या सोबत तर राहिला ना?

प्रोफ. डम्बलडोर - नाही ना... त्याचा अहंकार मैत्रीच्या वर होता... जेव्हा रॉन जखमी होता तेव्हा त्याला तू आणि हर्मायनी सगळे निर्णय घेत आहात आणि त्याला साईडलाईन केलं जातंय असं वाटलं. त्याचा अहंकार, मैत्री आणि प्रेम दुखावलं गेलं. तो निघून गेला. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की हीच वेळ आहे. तेव्हा तुमचा काहीही पत्ता नसताना रानोमाळ तो तुम्हाला शोधत फिरला आणि जेव्हा ते लॉकेट फोडायचे होते तेव्हा तो तुझ्यासोबत होता. पण कर्णाने काय केलं... दुर्योधनाच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई तो पहिले १० दिवस लढलाच नाही. कारण त्याला भीष्म म्हणाले की तू अर्धरथी आहेस. हा त्याला अपमान वाटला. त्यामुळे जोवर भीष्म सेनापती आहेत तोवर त्याने लढाईत भागच घेतला नाही.

हॅरी - पण त्याच्यावर लहानपणापासून अन्याय झाला. त्याला आयुष्याच्या सर्वात मोठ्या लढाईच्या वेळी वाटणारच ना, की त्याला महारथी म्हणावे...

प्रोफ. डम्बलडोर - अन्याय कुणावर झाले नाहीत... माझं आयुष्य तुला आता बरंच कळालं आहे. मी, माझा भाऊ, बहीण, आई... कितीतरी कठीण गोष्टी होत्या. त्या सर्व मागे ठेऊन योग्य मार्ग निवडता आला पाहिजे. नियतीने तुझ्यावरही किती अन्याय केलाय. तू वर्षाचा होतास तेव्हा आईबाप गेले. मावशीने सांभाळ केला, तोही नाईलाजाने. शाळेत तुला काही चांगले, प्रेम करणारे शिक्षक भेटले तर काही सदैव भीती घालणारे, तुझा अत्यंत द्वेष करणारे भेटले. मित्र भेटले, सोबतच वैरीही भेटले. माझ्यासारखा तुला निव्वळ एक शस्त्र म्हणून तयार करणारा हेडमास्तर भेटला... हे होऊनही तू आज माझ्याशी अत्यंत प्रेमाने, आदराने बोलत आहेस. ज्याने तुझ्याशी सदैव वैर पत्करलं, जो माझ्या मृत्यूला एका अर्थाने कारणीभूत झाला, त्या ड्रेकोला तू काही तासांपूर्वी मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढलंस... या सगळ्या तुझ्या निवडी होत्या आणि त्यातूनच तुझं चारित्र्य दिसून येतं. कर्णाला तर उदाहरण म्हणून कृष्ण होता. त्याच्यावरही नियतीने कितीतरी प्रकारे अन्याय केला आणि तरीही तो न्यायाच्या, नीतीच्या बाजूने ठाम उभा राहिला. त्यामुळे हॅरी, हे कायम लक्षात ठेव की एखाद्या व्यक्तीची क्षमता तिचं चारित्र्य ठरवत नाही तर त्या व्यक्तीची निवड तिचं चारित्र्य ठरवते. त्यामुळे तुला निवड करायची आहे. तू आता काय करणार?

हॅरी - मला ठरवावे लागेल...?

प्रोफ. डम्बलडोर - हो

हॅरी - माझ्यापुढे पर्याय काय आहेत?

प्रोफ. डम्बलडोर - तू आत्ताच म्हणाला होतास ना की आपण किंग्स क्रॉस स्टेशनवर आहोत. त्यामुळे परत जाण्याचं ठरवलंस तर परत जाऊ शकशील, किंवा तू जर ठरवलं इथे थांबायचं तर असं समज की एक ट्रेन येईल आणि तुला घेऊन जाईल

हॅरी - कुठे?

प्रोफ. डम्बलडोर - पुढे...




Monday, August 2, 2021

मेकेलीन - पूर व्यवस्थापन

आमच्या मेकेलीनची दैलं (Dijle) नदी बेल्जियमच्या वालोनिया या डोंगराळ प्रांतात उगम पावते. तिथून थोडं पुढे आलं की वालोनिया आणि फ्लॅण्डर्सची सीमा होते आणि मग सपाट फ्लॅण्डर्समध्ये सावकाश वाहते. अनेक लहान मोठ्या गावातून, बाहेरून वळणं घेत घेत ल्यूवन या विद्यापीठाच्या गावाबाहेरून मेकेलीनमध्ये येते. एवढ्या सगळ्या प्रवासात सर्वात मोठं गाव मेकेलीन. सगळी मिळून नदी ८०-९० किलोमीटर. बेल्जियम मध्ये सगळ्याच नद्यांच्या काठांना उंच करून दोन्ही तीरांवर सायकल रस्ता केलेला असतो. तसा तो दैलंला पण आहे. साधारण २० मीटर खोल पात्र, दोन्ही सायकल ट्रॅकमध्ये ४०-५० मीटर अंतर, म्हणजे पात्राची जास्तीत जास्त रुंदी ५० मीटर. अशी छोटीशीच नदी. तरीही दोन्ही किनाऱ्यांवर उत्तम शेती, पशुपालन असलेली. नदी छोटी असली, तरी पाणलोट क्षेत्र डोंगरात आहे. पुढेही लहान मोठे ओहोळ या नदीला भेटतात. शिवाय बेल्जियम मध्ये एकदा पाऊस सुरू झाला की पडsssत राहतो. त्यामुळे नदीला पूर येणं फार काही विशेष नाही. पात्राची रुंदी जास्त नसल्यानेही नदीचा वेग जास्त पाऊस झाल्यास बराच वाढतो आणि सखल भागात पूर येतो. मेकेलीन हे गाव या नदीच्या किनाऱ्यावर दुतर्फा आहे.
मेकेलीनमध्ये मोठं बांधकाम आधीही झालेलं होतं. सन १२०० ते १५२० मध्ये संत रॉम्बाऊट्स कॅथेड्रल (आम्ही याला रामभाऊ म्हणतो) बांधलं गेलं. (राजाला याच्या पायऱ्यांवरून चंद्रावर जायचं होतं. पण चंद्र हळूहळू जास्त वर गेला आणि मग बांधकाम थांबवलं). नंतर २०० वर्षांनी ल्यूवन कालवा बांधला (याबद्दल पुढे लिहितो) त्यामुळे छोटासा बायपास बांधणं फार काही अवघड नव्हतं. मेकेलीनच्या थोडं आधी नदीला एका वळणावर बायपास दिला. दोन्हीकडे बंधारे घातले. बायपास चांगला खोल ठेवला. तेव्हाच्या मेकेलीनला चहूबाजूंनी भिंत होती आणि त्यापलीकडे खंदक. याच खंदकाचा उपयोग करून हा बायपास बांधला आणि जिथून अँटवर्प शहरासाठीचा जलमार्ग सुरू होतो तिथे पुन्हा मूळ नदीला जोडला. हे सगळं पूर्ण केलं १८९३ ते १९०४च्या दरम्यान. आधीपासून खंदक असल्याने कदाचित सोपं गेलं असेल. पण खंदक अधिक खोल करताना यात लोहयुगीन वस्तू आणि लाकडी होड्या सापडल्या. त्या अर्थातच जतन करून ठेवल्या आहेत. आता या भिंतीच्या आणि बायपासच्या मध्ये मेकेलीनचा रिंग रोड आहे. त्यामुळे पंधराव्या शतकापासून असलेले नकाशे आणि आत्ता गुगलमॅप वरील नकाशा यात फार फरक जाणवत नाही. हा बायपास झाल्यापासून गेल्या शंभर सव्वाशे वर्षात नदीने कधीच मेकेलीनला वाहून नेलं नाही.

पण निव्वळ बायपासने पूर थांबत नसतात. पाण्याला जशी वाहून जाण्यासाठी जागा हवी, तशी गती कमी करण्यासाठी पण जागा लागते. जर नदीचा जोर प्रचंड वाढला तर मूळ नदी आणि बायपास नदी या दोन्हीवरील बंधारे नदी सहज तोडू शकते. यासाठी इथे पाणथळ आहेत. ते आधीपासून आहेत, की नंतर तयार केले याची माहिती मिळाली नाही. त्यातील एक आहे मेकेलीन शहराच्या आधी, बायपासच्या थोडासा आधी. याचं नाव मेकल्स ब्रूक. इथे दोन तळी आहेत आणि मोठ्या भागात चर आहेत. नदीचे पाणी जास्त झाले तर नदी आणि हे पाणथळ यातील दरवाजे उघडून पाण्याला पसरायला जागा दिली जाते. पाणी पसरलं की वेग कमी होणारच. या दोन तळ्यांपैकी एकाचा पूर्ण कमर्शियल उपयोग करून दि नेकर नावाचे स्पोर्ट्स सेंटर तयार केले आहे. मात्र दुसरे तळे आणि पाणथळ यात माणसांना मज्जाव आहे. थोडेफार रस्ते आहेत, पण केवळ चालत जाता येईल असेच. तेही अत्यंत आतपर्यंत नाहीत. त्यामुळे इथे माणूस नावाच्या प्राण्याचा वावर अत्यंत मर्यादित असतो. अर्थातच अन्य प्राणी-पक्षी सुखाने नांदतात.

असंच दुसरं पाणथळ आहे जिथं झिनं आणि दैलंचा संगम होतो त्याच्या अलीकडे. ही झिनं नदी वालोनिया प्रांतात नास्त नावाच्या गावाजवळ उगम पावते आणि सुमारे १०० किमी प्रवास करून दैलंमध्ये विलीन होते. इथे नदीच्या एका बाजूला तळं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणथळ. तळं नदीला जोडलेलं नाहीये. पाणथळ मात्र ५-६ दरवाजांना जोडलेलं आहे. या पाणथळात तर माणसांना पूर्ण मज्जाव आहे. रस्ताच दिलेला नाही. जायचं असेलच तर चिखलात जावे लागेल अशी पूर्ण व्यवस्था आहे. त्यामुळे आत राजहंस, बदकांचे अनेक प्रकार, पाणकोंबड्या, पाणकावळे आणि कितीतरी पक्षी, मासे, बेडकं... खूप असतात. हिवाळ्यात प्रवासी पक्षीही बरेच येतात. याच संगमावरून ल्यूवन कालवा सुरू होतो. इथे पाणथळ असल्यामुळे पाणी कालव्यात वाढत नाही, आणि वाहूनही जात नाही. अतिरिक्त पाणी साठते, गरज असेल तेव्हा तेच नदीत सोडता येते.

आता आमचं जे #पाण्याकाठचंघर होतं, त्या पाण्याबद्दल. दैलं आणि झिनं यांच्या संगमावरून ल्यूवनकडे जाणारा कालवा केला आहे. १७५२ मध्ये हा कालवा पूर्ण केला गेला (१७६०-६१ मध्ये मराठ्यांना यमुना वेळेत ओलांडता आली नव्हती, त्याच्या आधी ८-९ वर्षे हा कालवा तयार झाला...). ५० मीटर्स रुंद आणि भरपूर खोल असलेल्या या कालव्याने अँटवर्प - ल्यूवन - ब्रुसेल्स हा जलमार्ग तयार करून दिला आहे. हा जलमार्ग अजूनही सुरू आहे. २०-३० कंटेनर्स असलेली जहाजं इथून सहज ये-जा करतात. दिवसाला ७-८ जहाजं जात येत असतात. विशेष म्हणजे हा चढ असलेला मार्ग आहे. त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर लाकडी दरवाजे आहेत (अजूनही लाकडीच आहेत). हे दरवाजे दुहेरी आहेत. म्हणजे एक दरवाजा, नंतर १०० मीटर्स जागा आणि पुन्हा दुसरा दरवाजा. जेव्हा जहाज येते तेव्हा एक दरवाजा उघडून जहाज दोन्ही दारांच्या मध्ये घेतात मग मागचं दार बंद करतात. पुढचं दार उघडलं की पाणी जहाजाला वर उचलतं. एका पातळीवर आलं कि जहाज बाहेर जातं आणि दार पुन्हा बंद. परतताना याच्या उलट. दर तीन महिन्यांनी पाणबुडे येऊन तळ तपासतात. मग यातून कधी मोडकी सायकल, मोडकी खुर्ची नाहीतर झाडाची तुटलेली फांदी असं कायकाय बाहेर येतं. मात्र ही शोधमोहीम कितीही थंडी असली किंवा कितीही ऊन असलं तरी सुरू असते. त्यामुळे हा मार्ग अजूनही सुरू आहे.

मागच्या शतकाच्या अखेरीस नदी, कालवा यात मासे जवळपास नव्हतेच. पाणी खूप घाण झालं होतं. नंतर मेकेलीनच्या नगरपालिकेने आणि राजाने पैसे खर्च करून एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. पुढील ४ वर्षात नदी आणि कालवा यांच्यात पुन्हा जीव आला. मासे आले, शेवाळ आलं, त्यामागे बदक, पाणकोंबड्या, बगळे, प्रवासी पक्षी असे सगळे आले. पाण्याचा वास गेला. आमचा घरमालक या कंपनीत कामाला होता. त्याची मुलाखत घेण्याचं या कोविडमुळे जमलं नाही ते नाहीच... कधी तीही माहिती मिळाली तर नक्की सांगेन!

दुहेरी दरवाजा 

बायपास 

बायपास आणि मेकेलीन 

दैलं  

ल्यूवन कालवा 

मेकल्स ब्रुक 

मेकल्स ब्रुक पाणथळ 

कालव्याजवळचे पाणथळ 

पशुधन 

दैलं, झिनं आणि कालवा