Tuesday, February 26, 2019

वंशवृक्ष - एस् एल् भैरप्पा

श्रीनिवास श्रोत्री - व्यासंगी, वेदशास्त्रसंपन्न, श्रीमंत कुटुंबातील अत्यंत साधेपणाने पण धर्माच्या कसोटीवर घासून जीवन उन्नत करणारा पन्नाशीतला मनुष्य. याचा मुलगा नदीच्या पुरात वाहून जातो. बायको भागीरथी, घरी काम करणारी पण घरचीच असणारी लक्ष्मी, सून कात्यायनी आणि नातू चिनी यांना सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा निवृत्त जीवनातून गृहस्थी जीवनात येतो.

यांचे एक विद्यार्थी असतात - सदाशिवराव. विद्वान! सदाशिवरावांना भारतीय इतिहासावर मोठा ग्रंथ लिहायचा आहे. त्यासाठी ते श्रोत्रींचे मार्गदर्शन घेत असतात. त्यांची एक पत्नी आहे - नागलक्ष्मी, मुलगा पृथ्वी आणि भाऊ राज.

नागलक्ष्मी साधी गृहिणी आहे. पतीवर प्रेम, निष्ठा आहे पण त्याच्या व्यासंगापासून ती खूप दूर आहे. सदाशिवरावांना अजिंठ्याला एक सिंहली मुलगी भेटते - करुणा रत्ने. करुणा हुशार असते आणि सदाशिवरावांचा विषय - इतिहासाची - विद्यार्थिनी असते. ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करायला मैसूरला येते. PhD करताना सदाशिवरावांच्या खंडप्राय ग्रंथाच्या पहिल्या खंडासाठी त्यांना मदत करते. त्यानंतर ती परत जाते पण ते दोघेही एकमेकांशिवाय आपण अपूर्ण आहोत. त्यानंतर करुणा पुन्हा मैसूरला येते. पण यावेळी सदाशिवराव तिला लग्नाची मागणी घालतात. दोघे लग्न करतात पण नागलक्ष्मी आणि करुणा एका घरात राहत नाहीत. सदाशिवरावांची दोन बिऱ्हाडे होतात.

राज इंग्रजीचा प्राध्यापक आणि नाट्यकलेवर प्रेम करणारा आहे. कात्यायनी पतीची ग्रॅज्युएशनची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेते. राजला ती आवडते आणि कात्यायनीही राजला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न होते. कात्यायनीला श्रोत्री विरोध करत नाहीत पण एक गोष्ट सांगतात की उन्नतीची एक पायरी चढल्यावर पुन्हा त्याच पायरीवर येणे ही अवनती आहे. लग्न करून मातृत्व मिळाल्यावर पुन्हा लग्न करणे त्यांच्या दृष्टीने एक पायरी खाली येणे आहे. ती जेव्हा तिच्या मुलाला न्यायला येते तेव्हा त्याला न्यायचे की नाही ही गोष्ट ते तिच्या न्यायबुद्धीवर सोडतात आणि कोणतीही बळजबरी करत नाहीत. पण कात्यायनी मुलाला श्रोत्रींंकडेच राहू देते आणि नवा संसार सुरू करते.

श्रोत्री-भागीरथी-लक्ष्मी-चिनी, सदाशिवराव-नागलक्ष्मी-करुणा, राज-कात्यायनी-पृथ्वी यांचा प्रवास सुरु राहतो. सुमारे वीस वर्षांचा प्रवास दाखवलाय. त्यात अनेक वळणे येतात. प्रत्येक परीक्षेच्या प्रसंगी सदाशिवराव-करुणा बुद्धीला, राज-कात्यायनी प्राकृतिक स्वभावाला आणि श्रोत्री धर्माला (कर्तव्याला) प्रमाण मानून निर्णय घेतात.
पुढील कथा तुम्ही प्रत्यक्षच वाचावी!

यातील प्रत्येक परीक्षा ही प्रत्येकासाठी अवघडच असते आणि प्रत्येकजण आपापल्या समजुतीने पुढे जातो. भैरप्पांचे वैशिष्ट्य हे की आपल्याला कुणीच "खल" वाटत नाही. पण सर्वात उठून दिसतात श्रोत्री. ते कधीच कुणावर रागावत नाहीत, त्यांच्या धर्म-कर्तव्याच्या कसोटीवर घासून निर्णय घेतात आणि कात्यायनीला सांगितलं वाक्य - एकदा उन्नतीच्या वरच्या पायरीवर आल्यावर पुन्हा खालच्या पायरीवर कधीच जात नाहीत. त्यांच्या काही गोष्टी आजच्या युगात आपल्याला पटत नाहीत पण काळ आणि धार्मिक बाजू लक्षात घेतली तर निश्चितच आपण श्रोत्रींंपुढे नतमस्तक होतो.

मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद

शस्त्रात ताकद नसते, ताकद असते ते शस्त्र धारण करणाऱ्या हातात. पण खरंतर हातातही ताकद नसते, ती असते कणखर मनात. जेव्हा मन कणखर नसते तेव्हा संत तुकारामांनी सांगितलेल्या रडक्या माणसाप्रमाणे हाल होतात.

ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी जुंझार कैसा झुंजो ।।
पोटी पडदाळे सिले टोप ओझे । हे तो झाले दुजे मरणमूळ ।।
बैसविले मला येथे अश्वावरी । धावू पळू तरी कैसे आता ।।
असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हाय हाय काय करू ।।
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ।।

माझे हात ढाल आणि तलवार यांना धरण्यात गुतंले आहेत, मी लढू कसा असा त्याला प्रश्न पडतो. पायाला पोटीस बांधलंय आणि डोक्यावर सिले टोप आहे, त्याचं मला ओझंच होतंय. मला घोड्यावर बसवलेलं असल्याने मला पळणेही शक्य नाहीये. असा विचार करणारा जे उपाय आहेत त्यालाच अपाय समजतोय आणि हाय हाय करत काहीही करू शकत नाही.

२६-११ ला जेव्हा मुंबईवर हल्ला झाला किंवा त्या दरम्यान जेवढे घातपाती हल्ले झाले तेव्हाही आपली सेना हीच होती, एवढीच सक्षम होती. म्हणजे ढाल-तलवार-पोटी-पडदाळे आणि घोडा होताच. म्हणजे शस्त्रे होती, विमाने होती. ती धरणारा हात म्हणजे प्रत्यक्ष सैनिक सुद्धा होते. ते आज जेवढे सक्षम आहेत तेवढेच सक्षम होते. पण "कडी निंदा" करण्यापलीकडे काहीच झालं नाही. कारण या शस्त्रामागे - हातामागे जे मन होतं ते कमकुवत होतं. उरी नंतरचा सर्जिकल स्ट्राईक असो की आज झालेला एअर स्ट्राईक यात सेनादलाचे श्रेय आहेच. ते असलंच पाहिजे. पण त्या बलदंड सेनेमागे जे कणखर मन आहे ते सध्याच्या सरकारचे आहे.

मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद ।
या ओळीचा अर्थ आज पुन्हा एकदा भारतीय वायुसेनेने आणि भारतीय सरकारने दाखवून दिला!!!

शतशः नमन _/\_

#SurgicalStrike2

Monday, December 3, 2018

सार्थ - एस् एल् भैरप्पा

भैरप्पांची पुस्तके भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान यावर विचार करायला खाद्य पुरवणारी असतात. आत्ताच "सार्थ" वाचून झाले. किंडल वर पुस्तक वाचण्याची तशी पहिलीच वेळ. त्यातही सार्थ सारखं पुस्तक मिळाल्याने किंडल सत्कारणी लागलं...

एका वेदशास्त्र शिकलेल्या ब्राह्मणाला, नागभट्टला, तारावती नगरीचा राजा सार्थाचा, म्हणजे व्यापारी तांड्यांचा, अभ्यास करण्यासाठी एका तांड्यांसोबत पाठवतो. पण मूळ हेतू नागभट्टच्या बायकोला मिळवणे हा असतो. नागभट्ट जेव्हा घरापासून दूर असतो तेव्हा त्याला हे कळतं आणि पुढे त्याचा शांती मिळवण्याचा प्रवास सुरू होतो. सुरुवातीला तो एका नाटक कंपनीत काम करतो, त्यातील नटी चंद्रिका उत्तम अभिनेत्री, गायिका असते. ती योगिनी असते. दोघांचाही एकमेकांवर जीव जडतो पण चंद्रिका योगिनी असल्याने यम नियमांत बांधलेली असते आणि ती संबंध नाकारते. तिथून पुढे नागभट्ट सुद्धा बाहेर पडतो आणि प्रथम योगी बनण्याचा प्रयत्न करतो. त्यात बायको आणि मित्र राजा यांवरील राग कमी होत नाही. मग पुढे तो वाममार्गी-तांत्रिक होतो, योनीपूजेच्या विधीसाठी चंद्रिकेला तयार करतो. मात्र पूजेनंतर ती त्याला स्वतःच्या घरी ठेऊन घेते आणि त्यातून तो पुन्हा बाहेर पडतो. मग नालंदा विद्यापीठात बौद्ध तत्त्वज्ञान शिकायला जातो, तिथे त्रिपिटक व अन्य बौद्ध पुस्तकांसोबत त्याला बौद्ध तांत्रिक मार्गही दिसतो. पुढे बोधगयेला जातो. पण तरीही आंतरिक शांती मिळत नाही.
नालंदेत जाऊन, तिथे सांगून पुन्हा नवीन शोधण्यासाठी तो तिथे पोहोचतो पण तेव्हा त्याला कळतं की सर्वात वयोवृद्ध विद्यार्थी हे कुमारील भट्ट होते, त्याचे गुरू माहिष्मतीचे मंडनमिश्र यांचे गुरू व गुरुपत्नी भारतीदेवीचे वडीलबंधू. तो त्यांच्या मागे त्यांच्या गावी पोहोचतो. तिथे त्याला प्रथम शंकराचार्यांचे दर्शन होते. शंकराचार्य तिथे वादविवाद करण्यासाठी आलेले असतात. पण कुमारील भट्ट गुरूला फसवले आणि काही दिवस तरी वेद नाकारले म्हणून भाताच्या काड्यात स्वतःला जाळून घेणार असतात. त्यामुळे ते वादविवाद नाकारतात आणि गुर्जर प्रतिहार राजाच्या अश्वमेध यज्ञाचे प्रमुखपदही नाकारतात. दोन्हीसाठी ते मंडन मिश्र यांच्याकडे पाठवतात.
इथून पुढे ऐतिहासिक वादविवाद आणि मंडन मिश्र यांचे संन्यस्त होणे हा भाग येतो.
नागभट्ट यानंतर गुर्जर प्रतिहार राजाच्या स्नेही असलेल्या जयसिंहांच्या सोबत परत मथुरेला येतो. तिथे बातमी येते की मुस्लिम आक्रमकांनी मूलस्थानवर (मुलतान) कब्जा केला असून तिथून पुढे भारतीय व्यापाऱ्यांना माल ते सांगतील तसा व त्या भावात अरबांनी विकावा लागतोय. गुर्जर राजे मूलस्थान पुन्हा मिळवावे यासाठी कृष्ण नाटक तिथे करायचे आणि जनतेला उठाव करण्यास प्रवृत्त करायचे असा बेत आखातात आणि नाटकात नागभट्ट आणि चंद्रिका यांची प्रमुख भूमिका ठरते. आता नाटक केवळ नाटक राहिलेले नसते तर देशाप्रती कर्तव्य झालेले असते. जीवाचा धोका असूनही सगळे उत्तम नाटक करतात. पण तरीही राष्ट्रकूटांनी दक्षिणेकडून केलेला हल्ला आणि स्थानिकांकडून न मिळालेली मदत यामुळे योजना पूर्ण होत नाही. चंद्रिका आणि नागभट्ट मुस्लिम आक्रमकांच्या ताब्यात जातात. चंद्रिकेवर बलात्कार होतात आणि नागभट्टावर अमानुष अत्याचार. शेवटी ते सुटतात आणि चंद्रिकेच्या गुरूंना भेटायला जातात. नागभट्ट चंद्रिकेला पुनःपुन्हा लग्नाची मागणी घालत असतो पण यम नियम आणि आता बलात्कारामुळे असलेला गर्भ यामुळे ती नाकारत राहते. गुरू त्यांच्या मृत्यूपश्चात विवाहाचा आदेश देतात. नागभट्ट आणि चंद्रिका विवाह करतात आणि कथा संपते.

यात नागभट्ट आणि मुस्लिम सरदार यांच्यात काही संवाद आहेत. ते जसेच्या तसे इथे देत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये असलेली धर्म (Religion या अर्थी) ही संकल्पना यातून खूप छान अधोरेखित होते. काहींना जी समृद्ध अडगळ वाटते तीच व्यवस्था कशी होती हे यातून समजते.

‘‘कोणता उपाय?’’ मी विचारलं.
‘‘क्षमेची याचना करायची. पश्चात्ताप झाल्याची खूण म्हणून आमच्या धर्मात प्रवेश करायचा. संपूर्ण क्षमा कदाचित त्यानंतरही मिळणार नाही, पण मृत्युदंड खचित चुकेल. चार-दोन वर्षं कारागृहात काढायची. त्यानंतर तुझी वागणूक बघून उरलेली शिक्षाही रद्द होर्इल. बऱ्यापैकी जगण्यासाठी एखादं कामही मिळेल. तू आमचाच होऊन जाशील ना!’’ त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं.
‘‘धर्म बदलायचा? एवढ्या क्षुल्लक कारणासाठी?’’
‘‘जीव वाचतोय, ही क्षुल्लक गोष्ट आहे?’’
‘‘जीव जातो की राहतो, हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. आमच्याकडेही धर्मपरिवर्तन होत असतं. दोन जिज्ञासू विद्वान शेकडो विद्धानांसमोर एकमेकांसमोर बसून तात्त्विक वादविवाद करतात. जो हरेल, त्यानं जिंकलेल्याचा धर्म स्वीकारणं बंधनकारक असतं. तुमच्यापैकी एखाद्या जिज्ञासू विद्वानाला सर्वांसमोर माझ्याशी वादविवाद घालण्यासाठी बसवा, दोघंही तर्कशुद्ध पद्धतीनं वाद घालू. मी हरलो, तर तुमच्या धर्मात येर्इल आणि जिंकलो, तर त्यानं माझ्या धर्मात यावं.’’
‘‘धर्मालाच पणाला लावून चर्चा करायची?’’ त्यानं भुवया उंचावल्या.
‘‘आमच्याकडे सगळे असंच करतात. केवळ यासाठी विद्वान मंडळी गावोगाव फिरत असतात. एखाद्याची वाद-भिक्षा नाकारणं अत्यंत अपमानास्पद मानलं जातं.’’
‘‘आम्ही धर्माला वादामध्ये ओढत नाही.’’
‘‘पण तुम्ही धर्माला तलवारीच्या पात्यावर पेलता. खरंय हे?’’
‘‘नि:संशय! ते जाऊ दे. तुमच्यामध्ये किती जाती-पंथ आहेत?’’
‘‘ते कसं सांगता येर्इल? एकेका धर्म-पंथाच्या अनेक शाखा-उपशाखा आहेत. मुख्य वैदिक धर्मच घ्या. त्यात पूर्व मीमांसक, उत्तर मीमांसक, नैयायिक, वैशेषिक, सांख्य, योगी! बौद्धांमध्ये हीनयान, महायान, हीनयानामध्ये वैभाषिक, सौतांत्रिक; महायानींमध्ये योगाचार्य, माध्यमिक; जैनांमध्ये दिगंबर-श्वेतांबर, यांशिवाय प्रत्येक जातींमध्ये तांत्रिक, पाशुपत्य –’’
त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला. ‘‘असं असेल, तर तुमचा एक देश नाहीच.’’
‘‘का?’’
‘‘एवढे मत-धर्म आहेत म्हणतोस, कुठला राजा स्वत:च्या धर्मापेक्षा इतर धर्माला वाव देर्इल?’’
‘‘आमच्याकडे सगळे राजे सगळ्या मत-पंथांना वाव देतात. प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा तो प्रश्न आहे. मी म्हणजे बुद्धी. बुद्धीचं गृहीत म्हणजे मत. जगात जितकी माणसं आहेत, तितकी गृहीतं आहेत. तेवढी मतं असतात.’’
‘‘शुद्ध अव्यवस्था ही!’’ तो गोंधळून म्हणाला.
‘‘अंहं – तीच व्यवस्था आहे! पाहिजे, तर याविषयी मी वाद घालू शकेन.’’
‘‘मला वाटतं, तू तुझ्या देशातल्या सगळ्या धर्म-पंथांचा अर्क प्यायलेला विद्वान आहेस. बरं, ते जाऊ दे. तुमच्या सगळ्या धर्म-पंथातला समान अंश कोणता?’’
‘‘धर्म!’’
‘‘धर्म म्हणजे काय? देव ना?’’
‘‘देवाला धर्माची गरज नाही. देव ही माणसाची गरज आहे. शिवाय आमच्याकडचे सगळे पंथ देवाला मानत नाहीत. जैन, बौद्ध आणि सांख्य हे तर देवाचा तिरस्कार करतात. पूर्व-मीमांसक देवाचा पुरस्कार करत असले, तरी त्यांनी देवाला मर्यादित अधिकार दिले आहेत. माणसाच्या धर्माचरणासाठी देवाची गरजही नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायचीही गरज नाही, असं बरेच धर्म-पंथ सांगतात.’’

- ज्ञानेश

Monday, July 9, 2018

मन्वंतर

सीता स्वयंवरात राम जेव्हा शिवधनुष्याला प्रत्यंचा लावायला गेले तेव्हा जुने झालेले शिवधनुष्य कडकडाट करत मोडले. जेव्हा परशुरामांना हे कळालं तेव्हा ते क्रुद्ध झाले. साहजिक आहे, जे धनुष्य परशुरामांना शिवशंकरांनी दिले, जे धनुष्य अनेक लढायांत वापरले गेले आणि ज्याद्वारे अनेक युद्धे जिंकली गेली ते धनुष्य मोडल्यावर परशुरामांना राग येणे स्वाभाविक होते.

मग रीतसर राम परशुरामांना भेटायला गेले. तिथे आता परशुराम रामांशी युद्ध करतील किंवा शाप देतील अशी शक्यता बऱ्याच जणांना वाटत होती. पण रामांना बघितल्यावर परशुरामांना आपला अवतार संपला हे लक्षात आले, नवा अवतार राम आहेत हेही लक्षात आले आणि त्यांनी शर आणि शाप यापैकी काहीही न वापरता रामांना आशीर्वाद दिले आणि ते पुढे मार्गस्थ झाले.

१९२७ मध्ये आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. त्या मनुस्मृतीच्या जोरावर अनेक वर्षे भारतात कारभार चालला. बऱ्याच अंशी चांगलाही चालला असेल, पण कुठेतरी त्यातून अन्यायही झाला. म्हणून आंबेडकरांनी ती जाळली. पुढे जेव्हा त्यांनी राज्यघटना लिहिली तेव्हा त्याच मनुस्मृतीतील योग्य गोष्टी राज्यघटनेत घेतल्या. जर मनू जिवंत असते तर त्यांनी आपली स्मृती आता जुनी झाली/मोडली हे मान्य केलं असतं आणि नवा मनू जन्मला हे बघून, आनंद व्यक्त करून, आशीर्वाद देऊन ते मार्गस्थ झाले असते. दुर्दैवाने मनू परशुरामांसारखे चिरंजीव नाहीत, म्हणून हे होऊ शकले नाही.

पण ज्यांना परशुराम आणि मनू, दोघेही आपले वाटतात त्यांनी परशुरामांची कथा समजावून घेऊन मनुस्मृती आता डोक्यातून पूर्ण काढून राज्यघटना आत्मसात करावी ही अपेक्षा!

Friday, June 8, 2018

सशक्त विरोधीपक्ष

अशक्त विरोधीपक्ष असेल तर सशक्त लोकशाही उभी राहू शकत नाही. "आग को पानी से डर बने रहेना चाहीये" हा नियम आहे. पण सध्यातरी तशी परिस्थिती पोटनिवडणूका सोडल्या तर दिसत नाही.

सध्या मोदींसमोर/भाजपासमोर कुणी एक सशक्त विरोधी नेता नाहीये. जे आहेत ते मोदींना कुठल्याही थराला जाऊन, प्रसंगी पाकिस्तानची मदत मागून हरवायला बघत आहेत. देशात राजकीय विरोधक असूच नये असा प्रयत्न काँग्रेसमुक्त भारत या घोषणेत आहे. पण विरोधक असूच नये असे झाले तर ते लोकशाहीला आणि पर्यायाने भारताला घातक असेल. मोहनजींनी यामुळेच काँग्रेसमुक्त भारत या घोषणेला विरोध प्रदर्शित केला होता. (https://m.timesofindia.com/city/pune/congress-mukt-bharat-merely-a-political-slogan-rss-chief/articleshow/63576543.cms)

विरोधक हवेत, सशक्त हवेत आणि राष्ट्रवादी हवेत. जर सध्याचे विरोधी नेते असे विरोधक बनू शकत नसतील तर एक जगातील सर्वात मोठी असलेली संघटना म्हणून संघालाच हे काम करावे लागेल.

मी मागच्या वर्षी लिहिलं होतं की
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तीन सर्वोच्च राजकीय पदांवर स्वयंसेवक विराजमान झाले आहेत. त्यामुळे सर्व संघ संबंधितांना आनंद होणे स्वाभाविक आहे. अर्थात संघाचे सत्ता हे साध्य कधी नव्हते आणि असणारही नाही. पण राजकीय उद्दिष्ट म्हणून विचार केला तरीही आणखी एक महत्वाच्या पदावरही स्वयंसेवक/सेविका असायला पाहिजे, ते पद म्हणजे विरोधी पक्ष नेता!

बहुदा संघाने आता हे काम हातात घेतले असं वाटतंय. प्रणवदांचं भाषण एका राष्ट्रवादी नेत्याचं भाषण होतं.
भाषणातील प्रमुख मुद्दे:
१. २५०० वर्षांची राजकीय उथलपुथल ५००० वर्षांच्या संस्कृतीला संपवू शकली नाही.
२. लोकशाहीची व्याख्या अमेरिकेच्या "ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल"च्या कित्येक शतके आधी चाणक्याने जगाला दिली.
३. जगाचा ज्ञानाशी संबंधही नव्हता तेव्हा आमच्याकडे ७ मोठी विद्यापीठं होती.
४. आम्ही इतरांसारखे आक्रमक वा हिंसक नाही आम्ही वसुधैव कुटुंबकम्, सर्वेपि सुखिन: सन्तु या विचारांचे आहोत. भारतात सहिष्णुता आणि वैविध्यतेचा सन्मान होतो.
५. या भारतमातेसाठी त्याग करणाऱ्या आणि या भारताला वैभवशाली बनवू इच्छिणाऱ्या सर्वांचे मिळून हे राष्ट्र आहे.
६.  बुद्धाचा प्रचार हिंदू प्रभावातूनच झाला आणि या देशाला मौर्य, गुप्त, अशोक अशा थोर घराण्याचा वारसा आहे.
७. या देशात आलेल्या विदेशी विचारवंतांनीही या देशाच्या संस्कृतीचे गोडवे गायले.
८. पाश्चात्यांची राष्ट्र संकल्पना एक भूभाग, एक धर्म, एक शत्रू यावर आधारित आहे आणि ती योग्य नाही, आपली सर्वसमावेशक संस्कृती खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राष्ट्र आहे. प्रत्येक देशाचा राष्ट्रवाद हा त्या देशाची खरी ओळख असते.

हे भाषण इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्याचं भाषण होतं, इंदिरा काँग्रेस किंवा इटालियन काँग्रेसच्या नेत्याचं नव्हतं. अशा नेत्यांना बळ देऊन सशक्त राष्ट्रवादी विरोधी पक्ष तयार होणे आवश्यक आहे.

जय हिंद!

राजी

राज़ी
काही लोकांना हा सिनेमा पाकिस्तानची भलामण करणारा वाटला. कारण हे की त्यात पाकिस्तानी प्रेमळ कुटुंब दाखवलंय ज्याला भारतीय गुप्तहेरांनी फसवलं. एका अर्थाने हे खरंय. पण हा खूपच एकांगी विचार आहे.
या सिनेमाचा विषय होता एका सामान्य मुलगी, सहमत, देशासाठी गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते आणि तिथून आवश्यक ती माहिती कोणताही धोका पत्करून भारतात पाठवते. त्यासाठी ती तयार होते आणि शेवटपर्यंत आपला देश आणि कर्तव्य यापुढे सर्व गोष्टींना दुय्यम स्थान देत काम पूर्ण करते.
हा सगळा तपशील आपल्याला सहमतच्या बाजूने कळत राहतो. त्यामुळे सहजपणे "भारताने केलेल्या कारवाया किंवा कटकारस्थान" आपल्याला दिसते. पण ज्या गोष्टी सहमत पाहत नाही त्या आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे पाकिस्तानी सेना पंजाबी वर्चस्वासाठी बांगाल्यांवर अन्याय करते आहे, युद्ध सुरू झालेले नसताना INS विक्रांतला बुडावण्यासाठी गाझी पाणबुडीला पाठवत आहे, काश्मीर मधील मुसलमानांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे हे सहमत प्रत्यक्ष बघत नाही म्हणून आपल्याला ते प्रत्यक्ष दाखवलेही जात नाही. पण नीट बघितले तर हे सगळे संदर्भ त्यात दिसत राहतात. ते explicitly दाखवलंच पाहिजे हा अट्टाहास योग्य नाही.
जेव्हा इकबालला (सहमतचा नवरा) कळतं की सहमत हीच हेर आहे तेव्हा तो हदरतो. हे स्वाभाविक आहे पण नंतर तोच हे म्हणतो की "वतन के आगे कुछ नही". याचा अर्थ पाकिस्तानीही कट्टर दाखवले आहेतच.
या चित्रपटात जी गोष्ट महत्वाची आहे ती हीच की "वतन के आगे कुछ नही". एक अत्यंत सामान्य, साधी स्वप्न असलेली मुलगी देशासाठी मोठं दिव्य करायला तयार होते, मार्गातील अडचणी प्रसंगी जीव घेऊन दूर करते.

गुलजार यांचे सोपे शब्द, शंकर-अहेसान-लॉय यांची साधी चाल यातून साकारलेलं गाणं या चित्रपटाचं सार आहे.

ऐ वतन.. मेरे वतन..
ऐ वतन.. आबाद रहे तू
आबाद रहे तू.. आबाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू

मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. मेरे वतन
ऐ वतन.. मेरे वतन

तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
पहुंचू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू
पहुंचू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू मैं
जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. मेरे वतन..

ऐ वतन.. मेरे वतन
तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं
तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू

ऐ वतन.. ऐ वतन.. मेरे वतन.. मेरे वतन..
आबाद रहे तू.. आबाद रहे तू..
ऐ वतन.. मेरे वतन.. आबाद रहे तू..

https://m.imdb.com/title/tt7098658/

- ज्ञानेश

Thursday, April 19, 2018

पुस्तक परिचय - फिडेल, चे आणि क्रांती

फिडेल, चे आणि क्रांती हे अरुण साधू यांचे पुस्तक वाचतोय. अत्यंत सहज त्यांनी क्युबाच्या क्रांतीची गोष्ट सांगितली आहे. बलाढ्य अमेरिकेशी आणि भ्रष्टाचारी स्थानिक सरकारशी असलेला संघर्ष आणि त्याची पार्श्वभूमी या पुस्तकात आहे. अमेरिकेने क्युबा आपल्या अंकित असावा म्हणून प्रचंड प्रयत्न केले. पण अखेरीस फिडेल, चे आणि त्यांच्या साथीदारांनी अमेरिकेला पराभूत केलेच. एवढेच नाही तर स्वतःच्या देशातील मातीशी इमान राखणारी (रशिया किंवा चीनच्या अधिपत्याखाली नसलेली) साम्यवादी रचना निर्माण केली. त्याने प्रस्थापित पोथीनिष्ठ साम्यवादाला आव्हान दिले आणि नवीन साम्यवादी रचना निर्माण केली. सर्वात चांगली बाब म्हणजे ती यशस्वी करून दाखवली. क्युबात श्रीमंती मॉल आणि मल्टिप्लेक्स नसतीलही पण आरोग्य, शिक्षण, प्रशासन या गोष्टी खूप चांगल्या आहेत.

अमेरिकेशी असलेले हे वैर गेल्या काही दिवसात संपले. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी मार्च 2016 मध्ये क्युबाला भेट दिली. क्युबाला भेट देणारे ते पहिले अमेरिकन अध्यक्ष आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये फिडेल कॅस्ट्रो वारले आणि त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रो क्युबाचा अध्यक्ष झाला. क्युबाची दारे आता भांडवलशाही साठी थोडी किलकिली झाली आहेत. पुढे काय होईल ते कळेलच.

पुस्तकाविषयी:
२६ जुलै ही दिनांक आपल्यासाठी मुंबईमध्ये झालेली ढगफुटी याच्याशी निगडीत आहे. पण सुदूर, दक्षिण अमेरिकेत, २६ जुलै एक प्रचंड शक्ती आहे. जी शक्ती सामान्य भारतीयांना १९४२ या अंकातून मिळते त्याहून अधिक शक्ती २६ जुलै मधून क्यूबन लोकांना मिळते.

२६ जुलै १९५३… या दिवशी फिडेल कॅस्ट्रो या ध्येयवेड्या तरुणाने बाटिस्टा या क्युबाच्या अत्यंत भ्रष्टाचारी अध्यक्षाविरोधात सशस्त्र क्रांतीची पहिली लढाई लढली होती. क्युबाच्या अध्यक्षांच्या सैन्यापुढे काही शे तरुणांचा सहज पराभव झाला. पण सुदैवाने फिडेल त्यातून वाचला. त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि "इन्कलांब झिंदाबाद", "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा" च्या सारखे वाक्य त्या खटल्यातून फिडेलने म्हटले, "मला दोषी ठरवून ठार करा. त्याने काहीही बिघडणार नाही. इतिहास मला दोषमुक्त करील!" यातूनच History will absolve me किंवा इतिहास मला दोषमुक्त करील या ऐतिहासिक पुस्तिकेचा जन्म झाला!

१९५५ मध्ये पुन्हा अध्यक्षीय (खोट्या) निवडणुकीत बाटिस्टा पुन्हा जिंकला आणि त्याने मोठी चूक केली. लोकांच्या आणि संसदेच्या मागणीसमोर त्याने मान तुकवली आणि फिडेल तुरुंगातून सुटला. त्याने एक निःशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश येण्याची १००% खात्री झाल्यावर तो आणि त्याचे अनुयायी मेक्सिकोत गेले. तिथे २६ जुलै या संघटनेची व्याप्ती वाढवली आणि सशस्त्र क्रांतीची ज्योत पुन्हा पेटवली.

अर्नेस्ट गव्हेरा हा अर्जेन्टिनामधील एक तरूण डॉक्टर. दक्षिण अमेरिका बघण्यासाठी बाईकवरून निघाला आणि बाईक खराब झाल्याने पायी, सायकल, ट्रक मधून फिरून त्याने दक्षिण अमेरिका पहिली. त्याला दुःख दारिद्र्य दिसले आणि सहजपणे तो क्रांतिकरकांमध्ये सामील झाला. तो बोलताना मध्ये "चे" हा शब्द खूप वेळा वापरायचा. म्हणून त्याला चे हे टोपणनाव पडले. चे आणि फिडेलची भेट मेक्सिकोत झाली आणि पुढे दोघांनी क्रांती केली. चे खरेतर क्युबात क्रमांक दोनचा नेता होता पण सत्तेत न राहता त्याने उर्वरित दक्षिण अमेरिकेत क्रांती करण्यासाठी क्युबा सोडला आणि अशाच एका युद्धात तो मारला गेला. तो उत्तम लेखक आणि कवी होता. त्याची एक कविता -
उषेच्या जहाल भविष्यवेत्त्या,
चल, निघू या,
काटेरी नागमोडी वळणांच्या गुप्त रस्त्याने
तू ज्या हिरव्या भूमीवर प्रेम करतोस तिला मुक्त करण्यास.
चाल, निघू या,
अनंत अन्याय पुसून काढण्यास,
आपल्या मस्तकात फुटतात बंडखोर तारे,
मृत्यू वा विजय-शपथ घेऊन निघू या.
आणि जेव्हा पहिल्या गोळीच्या आवाजाने,
झोपेतून दचकून जागे झालेल्या तरुणीप्रमाणे,
ती भूमी खडबडून उठेल,
तेव्हा आम्ही तुझ्या साथीला असू,
निश्चयाने, हाती बंदुका घेऊन.

(ही कविता वाचल्यावर मुक्त चित्रपटातील "रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो" आठवली...)

पुढील फिडेल आणि चे यांची गाथा तुम्ही स्वतः वाचा!

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5459360203247863073?BookName=Fidel,-Che-Ani-Kranti