Friday, April 24, 2026
१७७१ : चिंकुर्लीची (मोती तलाव) लढाई - मराठा सामर्थ्य आणि पळपुटे हैदर व टिपू
२२ प्रतिज्ञा
Tuesday, January 13, 2026
पानिपतचे परिणाम
Friday, December 5, 2025
मार्तंड वर्मा (पद्मनाभदास) - त्रावणकोर Gods Own Country
भारतातील व्यापारामुळे युरोपीय सत्ता मोठ्या झाल्या आणि भारताशी संबंध बदलल्याने लयाला गेल्या. पोर्तुगीज आणि विजयनगरचे संबंध अतिशय उत्तम होते, त्यामुळे विजयनगरच्या भरभराटीच्या काळात पोर्तुगीजांची भरभराट झाली. पण विजयनगर साम्राज्य बुडाल्यावर पोर्तुगीज सुद्धा मागे पडले. त्याचप्रमाणे अजून एक युरोपीय सत्तेने आधी भरभराट आणि नंतर उतरती कळा पहिली, ती म्हणजे डच! डचांना उतरती कळा लागल्यानेच इंग्रजांना ती पोकळी मिळाली. त्या पोकळीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.
आपल्याला सागरी सत्ता म्हणून चोल राजा राजेंद्र माहीत असतात. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं आणि कान्होजी आंग्र्यांनी ज्याचा दबदबा निर्माण केला ते मराठा आरमार माहीत असतं. पण ज्या सागरी आणि जमिनीवरील सत्तेने एक परकीय सत्ता केवळ भारतातून नाही तर जगाच्या क्रमवारीत तिला मागे टाकले अश्या त्रावणकोरच्या मार्तंड वर्मांचे नाव क्वचितच माहीत असते...
१८व्या शतकाच्या सुरुवातीला केरळच्या इतिहासात एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व उदयास आले – मार्तंड वर्मा, त्रावणकोरचा राजा. त्यांचा जीवनपट भारतीय किनारपट्टीवरील परकीय वर्चस्व मोडून काढणारा आणि राज्याला धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान देणारा ठरला.
मार्तंड वर्मा यांचा जन्म १७०६ मध्ये झाला. ते त्रावणकोरच्या राजघराण्यातील होते, पण बालपणातच त्यांना राजकीय संघर्षांचा सामना करावा लागला. स्थानिक सरदार, नायर प्रमुख, आणि परकीय व्यापारी यांच्यातील सत्तास्पर्धा तीव्र होती. या संघर्षातूनच मार्तंड वर्मा यांनी आपली राजकीय बुद्धिमत्ता आणि लढाऊ वृत्ती विकसित केली.
१७२९ मध्ये ते त्रावणकोरच्या गादीवर बसले. गादीवर बसताच त्यांनी राज्य एकत्र करण्याचे आणि परकीय शक्तींना आव्हान देण्याचे ठरवले.
त्या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने मलबार किनाऱ्यावर आपली पकड मजबूत केली होती. मसाल्यांच्या व्यापारावर त्यांचे नियंत्रण होते आणि स्थानिक राजांना ते आपल्या धाकात ठेवत होते. मार्तंड वर्मा यांनी या परकीय शक्तीला आव्हान दिले.
१७४१ मध्ये कोलाचेलची लढाई झाली – भारतीय तसेच जागतिक इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा. मार्तंड वर्मा यांच्या सैन्याने डचांना पूर्ण पराभूत केले. ही लढाई विशेष होती कारण युरोपीय शक्तींना भारतीय भूमीवर स्थानिक राजाने निर्णायक पराभव दिला.
मार्तंड वर्मांच्या या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड मोडली. मसाल्याच्या व्यापारावर असलेला अग्रहक्क मोडला. डच कमांडर डेलनॉय याला कैद केलं. पण मार्तंड वर्मा त्यांची गुणग्राहकता खूप चांगली होती. या कामंडरला मार्तंड वर्मा यांनी आपल्या सैन्यात सामील केले. डेलनॉयने पुढे त्रावणकोरच्या सैन्याला युरोपीय तंत्रज्ञान दिले आणि किल्ले बांधण्यात मदत केली.
मार्तंड वर्मा यांनी सैन्याची पुनर्रचना केली. त्यांनी नायर सैनिकांना संघटित केले, युरोपीय शस्त्रास्त्रांचा वापर सुरू केला, आणि किनाऱ्यावर मजबूत किल्ले बांधले.
- उदयगिरी किल्ला – युरोपीय तंत्रज्ञानाने बांधलेला, तोफखान्याने सज्ज.
- विझिंजम (विळींझम) बंदर – व्यापार आणि नौदलासाठी महत्त्वाचे केंद्र.
- पद्मनाभपुरम किल्ला – राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र.
या किल्ल्यांमुळे त्रावणकोर दक्षिण भारतातील सर्वात सुरक्षित राज्य बनले.
मार्तंड वर्मा यांचे दुसरे महान कार्य म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण राज्य भगवान श्री पद्मनाभस्वामींना अर्पण केले. १७५० मध्ये त्यांनी औपचारिकपणे घोषणा केली की त्रावणकोर हे देवाचे राज्य आहे, आणि ते स्वतः व त्यांच्या पुढील पिढ्या केवळ विश्वस्त (पद्मनाभदास) म्हणून राज्य करतील. यामुळेच केरळला आजही Gods Own Country असं म्हटलं जातं.
ही घटना भारतीय राजकारणात अद्वितीय होती. राजा स्वतःला देवाचा सेवक मानून राज्यकारभार चालवतो, अशी संकल्पना त्रावणकोरमध्ये रुजली. यामुळे राज्याला धार्मिक अधिष्ठान मिळाले आणि लोकांमध्ये एकात्मता निर्माण झाली.
मार्तंड वर्मा यांनी करव्यवस्था सुधारली, व्यापाराला चालना दिली, आणि शिस्तबद्ध प्रशासन उभारले. त्यांनी जमिनीचे पुनर्वाटप केले, भ्रष्ट सरदारांना रोखले, आणि राज्यात स्थैर्य आणले. त्यांच्या कारकिर्दीत त्रावणकोर हे दक्षिण भारतातील सर्वात स्थिर आणि समृद्ध राज्य बनले. मसाल्यांचा व्यापार सुरक्षित झाला, आणि परकीय शक्तींना त्रावणकोरशी करार करावा लागला.
१७५८ मध्ये मार्तंड वर्मा यांचे निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली परंपरा आजही जिवंत आहे. त्रावणकोरचे वंशज आजही स्वतःला "पद्मनाभदास" म्हणवतात आणि केरळ स्वतःला Gods Own Country म्हणवते.
त्यांच्या विजयामुळे डचांची भारतीय किनारपट्टीवरील पकड संपली. त्यांच्या धार्मिक अर्पणामुळे त्रावणकोरला अद्वितीय ओळख मिळाली.
म्हणूनच मार्तंड वर्मा यांना आपण भारतीय इतिहासातील एक अद्वितीय राजा म्हणून स्मरले पाहिजे "कोलाचेलचा विजेता आणि पद्मनाभदास."
(संदर्भ : ब्रेव्हहार्टस ऑफ भारत - विक्रम संपत)
Wednesday, December 3, 2025
भाग्यचंद्र: स भूपति:
मणिपूरच्या इतिहासात राजर्षी भाग्यचंद्र हे एक विलक्षण राजे होऊन गेले (संघाचे प्रातःस्मरण - भाग्यचंद्र: स भूपति:). त्यांचा जन्म 1748 मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव जयसिंह होते. त्या काळी मणिपूरच्या राजघराण्यात एक क्रूर परंपरा होती - राज्याची गादी मिळवण्यासाठी पुढे भावाभावांत भांडणे होऊ नये म्हणून, मोठ्या राणीचा मोठा मुलगा वाचवला जाई, बाकी सर्व मुलांना मारून टाकले जाई. या निर्दयी परंपरेतून भाग्यचंद्र कसे वाचले याची कथा थरारक आहे. ते मोठ्या राणीचे अपत्य नव्हते, त्यामुळे नियमानुसार त्यांचा जीव धोक्यात होता. पण आईने त्यांना दूर पाठवून दिले. ते डोंगरात राहिले आणि त्यांना नवीन नाव मिळाले - चिंग-थांग खोम्बा. त्यांच्याच वडिलांना पुढे जेव्हा ते एका प्रवासात दिसले तेव्हा वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दत्तक घेतले आणि राजवंशात त्यांचे स्थान सुरक्षित केले. या दत्तकत्वामुळेच पुढे ते गादीवर बसू शकले आणि मणिपूरच्या इतिहासात अमर झाले.
राज्यारोहणानंतरही त्यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. 1759 मध्ये ते गादीवर आले. त्या काळात ब्रह्मदेशातून या भागावर कायम आक्रमणे होत असत. त्यात त्यांच्या एका भावासोबत गादी दोघांनी मिळून चालवावी असं ठरलेलं होतं. ते व्यवस्थित पार पडलं नाही. यामुळे राज्य कमकुवत झालं आणि ब्रह्मदेशाच्या आक्रमणामुळे त्यांना राज्य सोडावे लागले. ते असामच्या अहोम राजेश्वर सिंहाकडे आश्रयाला गेले. या राजाचे ते खास होते, पण लोकांनी राजाचे कान भरले आणि तिथे त्यांची अतिशय अवघड अशी परीक्षा झाली. राजेश्वर सिंहाने त्यांना एका जंगली हत्तीला निःशस्त्र पकडण्याची अट घातली. भाग्यचंद्रांनी भगवान गोविंदाची प्रार्थना केली आणि अद्भुत धैर्याने हत्तीला वश केले. या घटनेनंतर त्यांनी गोविंदजीची मूर्ती स्थापण्याचा संकल्प केला. पुढे त्यांना स्वप्नात कृष्णाने राज्यात परतायला सांगितलं. त्यानंतर ते माणिपुरात पोहोचले. त्यांचे भाग्य त्यांना कायम पुढे नेत गेले म्हणून त्यांना भाग्यचंद्र हे नाव मिळाले.
मणिपुरात परतल्यावर त्यांनी रासलीला नृत्याची परंपरा सुरू केली, जी आज मणिपुरी शास्त्रीय नृत्याचा आत्मा मानली जाते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वारसा म्हणजे सांस्कृतिक पुनरुत्थान. त्यांनी हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेला राजधर्म मानले आणि भक्तीभावाचा प्रसार केला. कृष्ण-राधेच्या प्रेमलीलेवर आधारित रासलीला त्यांनी सुरू केली, ज्यामुळे मणिपुरी समाजाला एक नवी सांस्कृतिक ओळख मिळाली. गोविंदजी मंदिर हे त्यांच्या काळात बांधले गेले आणि आजही ते मणिपुरातील धार्मिक जीवनाचे केंद्र आहे.
राजकीय दृष्ट्या त्यांनी ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड दिले, अहोमांशी मैत्री केली आणि ब्रिटिशांशीही संबंध ठेवले. त्यांच्या राज्यकाळात मणिपुरने आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले. पण त्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकारणासोबत अध्यात्माला आणि कलांना समान महत्त्व दिले. म्हणूनच त्यांना राजर्षी म्हटले जाते.
विक्रम संपत यांनी Bravehearts of Bharat मध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. विक्रम संपत म्हणतात की भाग्यचंद्र हे केवळ राजा नव्हते, तर संस्कृतीचे रक्षक होते. ब्राह्मदेशाच्या आक्रमणांना तोंड देताना त्यांनी धैर्य दाखवले, त्याचबरोबर मणिपुरी समाजाला सांस्कृतिक ओळख दिली.
1799 मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. मणिपुरी नृत्याची जागतिक ओळख, गोविंदजी मंदिराचे महत्त्व आणि वैष्णव भक्तीची परंपरा हे सर्व त्यांच्या योगदानामुळे आहे. त्यांचा एका निर्दयी परंपरेतून जीव वाचला, दत्तकत्वामुळे गादी मिळाली, संघर्षातून राज्य टिकवले आणि संस्कृतीला नवा आकार दिला. म्हणूनच राजर्षी भाग्यचंद्र हे मणिपुरच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरतात.
- ज्ञानेश
Thursday, July 17, 2025
अरण्यानीपासून देवराईपर्यंत — निसर्गसंवर्धनाची भारतीय परंपरा
Saturday, July 12, 2025
हिंदू महासभा घटना आणि भारतीय राज्यघटना
Monday, April 28, 2025
प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, गीता आणि उपनिषदे 😀
Thursday, March 20, 2025
शिवाजी महाराजांचे मोठेपण
शिवाजी महाराजांचे मोठेपण दिसावे म्हणून औरंग्याचं थडगं असलं पाहिजे असं लॉजिक बरेच जण मांडत आहेत. यात हिंदुत्ववादीही आहेत. मुळात महाराज कळण्यासाठी कोण्या खलनायकाची आवश्यकता नाहीच. कुणाच्या रेषेशी महाराजांची रेष ताडून मग महाराज मोठे आहेत हे दाखवण्याची काही एक गरज नाही. On the absolute terms सुद्धा महाराज महान आहेत.
केवळ त्यांचे लोकोपयोगी कामे बघितली तरी हे सहज लक्षात येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेले राज्य हे स्वराज्य, न्यायप्रिय राज्य आणि लोकहितवादी प्रशासनाचा उत्तम नमुना होते. त्यांचे लोकोपयोगी कार्य समकालीन संदर्भांवर आधारित बघूया.
न्यायव्यवस्था: शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेस प्राधान्य होते. त्यांचे प्रशासन अन्यायाविरुद्ध कठोर आणि पारदर्शक होते. "जेधे शकावली" आणि "शिवभारत" यांमध्ये उल्लेख आहे की महाराजांनी स्थानिक पातळीवर न्यायनिवाड्यासाठी पंचायत प्रथा सुरू केली. त्यांनी हक्कांचे रक्षण करताना निष्पक्षता कायम ठेवली, यामुळे रयतेला नवा विश्वास व आधार मिळाला.
शेती व सिंचनव्यवस्था: महाराजांनी शेती आणि सिंचनाच्या सुधारणांवर भर दिला. "बुधभूषण" या ग्रंथात शेतीसाठी तयार केलेल्या कालव्यांचा उल्लेख आहे. त्यांनी पाण्याच्या व्यवस्थित व्यवस्थापनासाठी तलाव बांधले व जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन केले. जमिनीचा उपयोग योग्य प्रकारे व्हावा व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी त्यांनी जमिनीच्या मोजणीची प्रथा सुरू केली. त्यामुळे शेती उत्पादन वृद्धिंगत होऊन लोकांचे जीवनमान सुधारले.
व्यापाराला प्रोत्साहन: महाराजांनी अंतर्गत आणि परदेशी व्यापाराला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आरमारी ताफ्याने समुद्रमार्गे व्यापाराच्या संधी निर्माण केल्या. "शिवभारत" ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, महाराजांनी व्यापारी बांधवांना संरक्षण दिले आणि व्यापाराच्या अडचणी दूर केल्या. त्यांनी कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून व्यापारी दृष्टिकोनातून राज्याची आर्थिक ताकद वाढवली.
कर नाही तर लोकवर्गणी: "जेधे शकावली" मध्ये असाही उल्लेख आहे की शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेत लोकवर्गणी महत्त्वाची होती. लोकांना कररूपी बोजा न लादता गरजेनुसार वर्गणी मागितली जायची. यातून उभारलेले सगळे संपत्ती व संसाधने लोकांसाठी वापरण्यात आली. यामुळे प्रजेचा शासनावर विश्वास वाढला.
सुरक्षेचे मजबूत जाळे: महाराजांनी गडकोटांच्या माध्यमातून फक्त संरक्षण नव्हे, तर गावांमधील लोकांना आसरा आणि मदत पुरवली. "शिवभारत" ग्रंथात उल्लेख आहे की त्यांच्या गडांच्या योजनांमध्ये पिण्याचे पाणी, अन्नसाठा आणि संकटसमयी संरक्षक उपायांची सोय असायची. गडांवरील प्रबळ व्यवस्थापनामुळे प्रजेचा सुरक्षा व्यवस्थेवर विसंबून राहण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.
सांस्कृतिक / धार्मिक वारसा: शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा आदर ठेवत ते कायम जपले. "बुधभूषण" मध्ये नमूद आहे की त्यांनी देवस्थानांची काळजी घेतली आणि मुस्लिम वा ख्रिश्चन लोकांकडून होणारे मंदिरांचे विध्वंस थांबले.
केवळ हे कार्य बघितलं तरी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि प्रजा कल्याणाच्या तत्त्वाचा साक्षात्कार आपल्याला होईल. त्यासाठी कुण्या औरंगजेब वा अफझलखानासोबत तुलना करण्याची गरजच नाहीये.
आपण आता मध्ययुगीन व्यवस्थेत नाही. पण औरंगजेबाला मानणारे अजूनही त्याच मध्ययुगीन मानसिक अवस्थेत आहेत. त्यामुळे केवळ "कबर नको" एवढं म्हटलं की थेट संघाच्या मुख्यालयाच्या जवळ सुनियोजित हल्ला केला.
म्हणूनच उत्तर आवश्यक आहे आणि तेही आजच्या कायद्यात. त्यामुळे अफझलखानाचं थडगं ज्याप्रमाणे वनकायद्याने हटवलं त्याचप्रमाणे औरंगजेबाचं थडगं ASI च्या कायद्यात घालून मूळ अवस्थेत तरी नेऊन ठेवलं पाहिजे.
- ज्ञानेश
Tuesday, March 18, 2025
चंद्रहार आणि पीटर व फास्टर फेणे
"आसब्लीफ" vfs च्या बेल्जियम खिडकीतून डॉक्युमेंट्स देताना बनेश उर्फ फास्टर फेणे म्हणाला.
"अरे, खिडकी बेल्जियमची असली तरी हे ऑफिस पुण्यातच आहे!" तो कागदांचा गठ्ठा आपल्या ताब्यात घेत तेथील ऑफिसर म्हणाली.
"ट्टॉक!"
"हा! आता बरं वाटलं बघ"
तर झालं असं की बन्याच्या मामाला बेल्जियममध्ये वर्षभर जायला मिळणार होतं. प्रवास दिवाळीच्या आधीच होता. मालीची सहामाही परीक्षा व्हायची असल्याने माली आणि बन्याने परीक्षा संपल्यावर जायचं असं ठरलं होतं. मग दिवाळी ते नाताळ तिकडेच राहायचं. नाताळच्या सुट्या संपायच्या आत परत यायचं.
यामुळे बन्या आणि माली मामासोबत vfs पुणे ऑफिसात आलेले होते.
"मामा, आपण अर्ध्या वाटेत जातोय. अर्ध्या वाटेत त्याला बोलावू या का?" बन्या म्हणाला.
(वाचा "सिक्रेट सेव्हनच्या सूरपारंब्या आणि फास्टर फेणे")
"पीटर!", माली उद्गारली, "मलाही त्याला आणि जेनेटला भेटायचंय"
"चालेल, तू कळव त्याला" मामाने अनुमती दिली.
घरी पोहोचल्यावर लगेचच बन्याने पीटरला इमेल लिहिला. रात्री उशिरापर्यंत प्लॅन फायनल झालासुद्धा. फक्त जेनेटला यायला जमणार नव्हतं. पीटरसुद्धा नाताळच्या काही दिवस आधी येणार होता आणि नंतर दोन आठवडे राहणार होता.
मामा आणि मामीचा व्हिसा आल्यावर ते दोघे निघाले. पाठोपाठ तीन आठवड्यांनी माली आणि बन्याही. मामाला बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सपासून ३५ किमी अंतरावरील मेकेलीन नावाच्या छोट्या टुमदार गावात काम मिळालं होतं. मेकेलीन कधीकाळी राजधानी राहिलेलं गाव. गावाभोवती तटबंदी. गावातून छोटी दैलं नावाची नदीही गेलेली. त्या नदीच्या पुराने गावाला त्रास होऊ नये म्हणून नदीला एक छानसा बायपाससुद्धा दिलेला होता. या नदीचा पुढच्या मोठ्या नदीसोबत संगम आहे. त्या संगमापासून ब्रुसेल्सकडे एक कालवा काढलेला आहे. त्याच कालव्याच्या काठावर मामाचं घर होतं.आता थंडी सुरू झाली होती. पण एखादा दिवस मस्त ऊन पडायचं. मामाने बन्या आणि मालीला छान गियरच्या सायकली घेऊन दिल्या. बाहेर ऊन असलं की नदीच्या किंवा कालव्याच्या काठाने भटकणे हा यांचा उद्योग. शिवाय जवळच मोठं पार्क होतं. त्यामुळे भटकंती आणि भटकंती चालू होती.
मामा आणि मामीला तिथे एक मावशी भेटली. म्हणजे ती होती बेल्जियन पण यांची एवढी छान मैत्री झाली की दोघे तिला मावशीच म्हणू लागले. तिचं घर दैलं नदीच्या वरच्या अंगाला रैमनम नावाच्या गावात होतं. एकदा सगळे बसने तिच्या घरी जाऊन आहे. मग तिने नकाशावर सायकलने येण्याचा नदीकाठचा रस्ता दाखवला. तो वळणावळणाचा रस्ता पाहून बन्या फार खुश झाला.
नाताळाच्या आधी आठवडाभर पीटर पोहोचला. आता तिघांची भटकंती सुरू झाली. मामाच्या मित्राने त्यांना एक सायकल काही दिवसांसाठी दिली. तिघे नदीच्या काठाने बऱ्याचदा रैमनम पर्यंत जाऊन आले. आता बन्या, माली आणि पीटरला मेकेलीनच्या २० किमी परिघातले सगळे सायकलचे रस्ते पाठ झाले होते.
मेकेलीनमध्ये एक भलं मोठं कॅथेड्रल आहे. म्हणजे चर्चच, पण खूप मोठं असलेलं. त्यांच्या राजाला त्या चर्चवरून म्हणे चंद्रावर जायचं होतं. त्यामुळे मोठा पाया घेऊन बांधत गेले. शेवटी साडेपाचशे पायऱ्या झाल्यावर राजाने नाद सोडला. त्यामुळे शिखर पूर्ण नसलेलं हे सेंट रॅम्बोस कॅथेड्रल आहे. पण राजाच्या वेडामुळे चंद्र आणि या कॅथेड्रलचा संबंध आला तो अजूनही टिकून आहे.नाताळच्या एक दिवस आधी, म्हणजे ख्रिसमस इव्हला, कॅथेड्रलमध्ये मोठ्ठा चंद्र लावणार होते. त्याचं वैशिष्ट्य असं की अगदी खऱ्या चंद्रासारखे त्यावर खड्डे, डोंगर असं सगळं असणार होतं. जणूकाही चंद्राचं छोटं रूपच. आणि त्या चंद्राच्या बरोब्बर खाली हिऱ्यांनी सजवलेला चंद्रहार!
हे बघायला अख्खा गाव तिथे पोहोचला. चंद्रामुळे चंद्रहार चमकतोय की चंद्रहारामुळे वरील चंद्र हे कळू नये इतकी ती रचना सुरेख होती. कॅथेड्रलच्या मागच्या गल्लीत सायकली लावून बन्या, पीटर आणि माली कॅथेड्रलमध्ये आले. रात्र झालेली होती. बाहेर थंडीही चांगलीच पडली होती. बन्या नेहमीप्रमाणे इकडेतिकडे बघत होता. अचानक त्याला काळ्या कोटवाला एक माणूस दिसला. त्याने पीटरला खुणेनंच दाखवलं. पीटरलाही काहीतरी गडबड वाटली. माली मात्र चंद्र आणि हाराकडे अनिमिष नेत्रांनी बघत होती.त्या मोठ्या हॉलमध्ये सुमारे ५०० लोक होते. एका बाजूने आत जाऊन, चंद्राला आणि हाराला गोल चक्कर मारून दुसऱ्या दरवाजाने बाहेर जात होते. बन्या, पीटर आणि माली त्या काळ्या कोटवाल्याच्या जरासे मागे होते. काळ्या कोटाच्या हातात काहीतरी छोटं यंत्र दिसत होतं. बन्याची आता खात्री पटली होती हा नक्की काहीतरी घफलेबाज माणूस आहे. काळ्या कोटाने बाहेर जाण्याच्या दरवाजाजवळ आल्यावर त्या यंत्राचे बटन दाबले. अचानक सगळीकडे अंधार झाला. इतरांना काय झालंय ते कळायच्या आत दरवाज्याजवळ बन्याला काळ्या कोटाची आकृती पळताना दिसली. बन्याने पीटर आणि मालीचा हात धरला आणि तो दरवाज्याकडे पळाला.
तेवढ्यात दिवे परत लागले आणि एकच गोंधळ ऐकू आला. चंद्रहार गायब झाला होता!
एवढ्या वेळात बन्या, पीटर आणि माली त्यांच्या सायकलजवळ पोहोचले होते. काळा कोट त्याच्या इलेक्ट्रिक सायकलवर स्वार होऊन गल्लीतून बाहेर पडत होता. तिघांनीही सायकली काढल्या आणि पाठलाग करायला सुरुवात केली. काळ्या कोटाने त्याची इलेक्ट्रिक सायकल नदीच्या काठाने पळवायला सुरुवात केली. पाठोपाठ बन्या आणि पीटर निघाले होते. हा रस्ता दगडी असल्याने इलेक्ट्रिक सायकलचा वेग फार जास्त नव्हता. पण लवकरच चांगला डांबरी रस्ता सुरू होणार होता. बन्याने जोरात ओरडला, "माले, मामाला सांग की मावशीच्या गावाकडे या"
मालीला बरोबर कळाले, पण काळ्या कोटाला नेमकं हा काय ओरडला ते कळालं नाही. अजून त्याला आपला पाठलाग सुरू आहे हे ही नीट कळालं नव्हतं.
माली परत फिरली आणि मामाला गाठून सगळं सांगितलं. आता तिथे पोलीस आणि दुभाष्या शोधून त्यांना सांगेपर्यंत १५-२० मिनिटं गेलीच. पोलिसांनी आपल्या सायकली आणि गाड्या भरदाव काढल्या. मामाच्या मित्राच्या गाडीतून मामा, माली निघाले. मामीला आपल्या पराक्रमी भाच्याला घरी आल्यावर घोड्याएवढी भूक लागेल हे माहीत होतं, त्यामुळे ती घरी निघाली.
आता डांबरी रस्ता सुरू झाला होता. काळ्या कोटाचा वेग भन्नाट वाढला. त्याच्या आता पाठलाग लक्षात आला होता. त्यामुळे त्याचा वेग अजूनच वाढला. पण बन्याला पुण्यातल्या गर्दीत बिना गिअरच्या सायकलीला पळवायची सवय होती. इथे गर्दीही नव्हती आणि सायकलला गिअरसुद्धा होते. त्यामुळे तोही फार मागे नव्हताच. तरी फुटाफुटाने काळा कोट आणि बन्यामधील अंतर वाढत चाललं होतं.
आता ते अशा ठिकाणी आले होते की इथून मोठ्या डांबरी रस्त्याकडेही जाता येत होतं आणि नदीकाठचा डांबरी रस्ता संपून कच्चा रस्ता सुरू होत होता. बन्याने मनोमन प्रार्थना केली की काळा कोट सरळ नदीच्याच रस्त्यावर जाऊ दे.
आता त्यांच्यातील अंतर वाढत गेलं होतं. थंडीने बन्याचे हात काकडले होते. पीटरला थंडीची सवय असली तरी ती हातमोजे घालून होती. तोही काकडला होता. डावीकडे असलेल्या डांबरी रस्त्याकडून पोलीसांच्या सायरनचा आवाज आला. बन्याने हुश्श केलं. कारण आता काळ्या कोटाकडे एकच पर्याय होता तो म्हणजे नदीकाठच्या कच्च्या रस्त्याने सायकल पळवणे. आता बन्यालाही जोर चढला. त्याने जोरात सायकल दामटली. एका पुलाजवळ आल्यावर त्याने पीटरला नदीच्या दुसऱ्या बाजूने जायची खूण केली. आता काळा कोट आणि बन्या नदीच्या एका बाजूला आणि पीटर नदीच्या दुसऱ्या बाजूला होते.
"ट्टॉक"
मावशी आजीच्या घरी चांगल्या चार चकरा सायकलने झालेल्या असल्याने हा रस्ता बन्याला तोंडपाठ झाला होता. इथून पुढे नदीच्या वळणामुळे रस्ताही नागमोडी होता. त्यामुळे इलेक्ट्रिक सायकल काय पार रेसिंगची मोटारसायकल आणली तरी बन्या तिला गाठेल याची त्याला खात्री होती.
अपेक्षेप्रमाणे काळा कोट आणि बन्यामधील अंतर कमी होत होतं. दुसऱ्या बाजूला पीटर अगदी सोबत सायकल चालवत होता. आता ती वेळ आली होती. बन्याने काळ्या कोटाच्या डावीकडे सायकल घातली आणि एक जोरदार मुसंडी मारून त्याने सायकलवरून उडीच मारली. त्याच्या पाठीवरची बॅग धरून बन्या नदीच्या उतारावर घसरला. काळा कोटसुद्धा सायकलसह त्याच्या मागे फरफटत आला. दोघेही नदीत पडले. पीटरने चपळाईने उतारावर झेप घेतली. नदीचं पाणी गोठलेलं नव्हतं पण बर्फापेक्षा जास्त थंड होतं. बन्याने बॅग पीटरकडे फेकली. त्याने ती वर सायकलकडे फेकली आणि बन्याला गार पाण्यातून ओढलं. काळा कोट मागून बन्याला ओढण्याचा प्रयत्न करत होता पण पीटरने जोर लावून एक गुद्दा त्याच्या नाकावर मारला. आधीच थंडी, त्यात पाण्यात भिजलेला असल्याने त्याला तो मार सहन झाला नाही आणि तो कळवळला. पीटर आणि बन्या रस्त्यावर पोहोचले. बन्या पीटरच्या मागे बसला. ते परत फिरले. काळ्या कोटाने पाठलाग सुरू केला, पण तो भिजलेला होता आणि पळत होता. तो मागे पडला.
एव्हाना पोलीससुद्धा तिथवर पोहोचले होते. बन्याने बॅग त्यांच्या स्वाधीन केली. काळ्या कोटाला पोलिसांनी धरलं. पोलिसांच्या गाडीमागे सगळ्या सायकली लावून पीटर व बन्या गाडीत बसले.
सगळे सोपस्कार होईपर्यंत मामा आणि मालीसुद्धा स्टेशनवर पोहोचले. पोलिसांनी बन्या, पीटर आणि मालीला धन्यवाद दिले.
घरी जाईपर्यंत बन्या कुडकुडत होता. घरी मामीने मावशी आजीने नव्याने सांगितलेल्या रेसिपीने केलेलं लाल भोपळ्याचं सूप तयार होतं. ते सूप, भाजी, पोळी पोटभर खाऊन सगळे झोपले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच बेल वाजली. मामाने दार उघडलं तर समोर पोलीस. ते म्हणाले, "मेरी ख्रिसमस!"
"ट्टॉक"
त्यांनी सोबत आपल्या तीन वीरांसाठी तीन इलेक्ट्रिक सायकली आणल्या होत्या!!!
__PRESENT

.jpeg)

