Monday, July 13, 2020

धनेश आणि बनेश

मित्रांनो, मागच्या वेळी फास्टर फेणेची अमेरिकेची वारी हुकली होती खरी पण हाँगकाँगला जायचा योग त्याच्या आयुष्यात लवकरच आला. त्यातला एक किस्सा सांगू? ऐका!

मामांची हँगकाँगला बदली झाली. एक वर्षासाठी. माली व मामी दिवाळीच्या सुट्टीत हँगकाँगला जाणार होत्या. त्यांनी बन्यालाही विचारलं तर तो म्हणाला, "ट्टॉक्, ही काय विचारायची गोष्ट आहे!"

हँगकाँगच्या एअरपोर्टवरून तुंगचुंगला यायला बराच वेळ लागला. टॅक्सीभर मामी बन्याला पुन्हा पुन्हा बजावत होत्या, "भलतेसलते चाळे करायचे नाहीत. आमच्या बरोबर राहायचं. लक्ष आहे का बन्या? बन्या लक्ष कुठंय?" बन्या नुसतंच ट्टॉक्...ट्टॉक् करत होता. याला कारण हँगकाँग मधल्या उंचच उंच, गगनचुंबी, ६०-७० मजली इमारती!

"मामी, कितवा मजला गं?", बन्याने विचारले. "सोळावा", मामी म्हणाल्या. "सोळा, सोळाव्या मजल्यावर राहणार आपण? ट्टॉक्!", बन्या बटन दाबता दाबता म्हणाला. 'चिंकाँगपेआं' असा आवाज आला आणि लिफ्टचं दार बंद झालं. मालीला याची गम्मत वाटली. तिनेपण डोळे बारीक केले आणि म्हणाली, "चिंकाँगपेआं!" आणि लिफ्टमध्ये हशा पिकला.

सोळाव्या मजल्यावरचं हे क्र. ३चं घर छोटं पण छान होतं. हॉलमध्ये मोठ्ठा सोफा, बाजूला मोठ्ठी खिडकी आणि खिडकीसमोर बसायला ओटा. दुसरीकडे डायनींग टेबल आणि चपला ठेवायला कपाट. हॉलच्या उजवीकडे छोटी खोली आणि डावीकडे किचन, बाथरूम आणि बेडरूम. हॉलच्या खिडकीतून दिसणारा देखावापण सुंदर. डावीकडे समुद्र आणि लहानमोठे खडक. उजवीकडे मोठ्ठा डोंगर. आणि मधे नागासारखी नागमोडी वळणं घेत जाणारा रस्ता. १० मिनिटं पाऊस पडला तरी लगेच झुळुझुळू झरे वाहणार. हे पाहून बन्याने इतक्या जोरात 'ट्टॉक्' केलं, की साठाव्या मजल्यापर्यंत आवाज पोहोचला असेल!

'फु तुंग' मार्केट मध्ये फिरणं, डोंगर चढणं, समुद्र किनाऱ्यावरच्या खडकांवरून उड्या मारणं आणि स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त पोहणं यामध्ये पाच दिवस कधी गेले, कसे गेले कळलंच नाही.

"बन्या ऊठ लवकर, बन्या ऊठ, बन्या ऊठ लवकर", माली बन्याला गदागदा हालवत होती. "अम्SSS, ए काय गं माले, भल्या पहाटे काय गं उठवतेस?" असं म्हणून बन्याने डोक्यावरून पांघरूण घेतले. मालीने ते खस्सकन् ओढून काढले. "भल्या पहाटे? जागा हो! सकाळचे साडेआठ वाजलेत. साडेदहा वाजता हाँगकाँग पार्कला फिरायला जायचंय!" 'फिरायला' हा शब्द ऐकताच बन्या टुणकन उठून बसला. "हं, आता का? झोप की...", असं म्हणत मालीनं बन्याच्या तोंडावर पांघरूण फेकलं. बन्यानं ते बाजूला फेकलं. ही फेकाफेकी चालू असताना मामी आत आल्या. "बन्या लवकर आवरून घे. मी नाश्ता तयार करते. साडेदहा वाजता आपल्याला..." "माहीत आहे, हाँगकाँग पार्कला जायचंय!", बन्या हसत हसत म्हणाला.
गोष्ट अशी होती की मामांना सकाळी त्यांच्या स्थानिक मित्राचा - बोहाई लॅमचा - फोन आला होता. आज रविवार असल्याने कुठेतरी फिरून यावं असा त्याचा बेत होता. त्याची बायको लिएन लॅम आणि मुलगा चेंग यांना हाँगकाँग पार्क पाहायची होती. म्हटलं मित्रालाही घेऊन जाऊ. त्यांची एक महिन्याची मुलगी - मेंग - तिच्याशी खेळायलाही नवे ताई दादा मिळतील. मामांनी मामींना विचारलं. त्याही हो म्हणाल्या. पुढे काय झालं ते आपण पहिलंच.

मेट्रो स्टेशन पर्यंत बस, मग हाँगकाँग पर्यंत मेट्रो, मग पार्क पर्यंत परत बस असा प्रवास करून मंडळी पार्कला पोहोचली. त्या, 'मंडळीं'मध्ये चार छोटे प्रवासी होते हे सांगायला नकोच. चेंग, मेंग, माली आणि बन्या.

"पार्कमध्ये आपल्याला खूप मजा येईल", बोहाई लॅम म्हणाला. त्यांचं संभाषण इंग्रजीत चाललं होतं, पण तुमच्यासाठी मराठीतून सांगते. "आधी पक्षी पाहू", असं म्हणून त्यांनी एक साखळ्यांचा पडदा बाजूला सारला आणि...... बन्याचं, 'ट्टॉक्, ट्टॉक्' थांबेचना! माली आणि चेंगचा 'आSS' वासला तो मिटेच ना. ते सगळे स्वतःच एका मोठ्ठ्या पिंजऱ्यात गेले होते, पिंजऱ्यात सगळीकडे फिरायला एक मोठा पूल होता आणि त्या पुलाच्या खालून वरून एकाहून एक असंख्य पक्षी उडत होते. मैना आणि पंचरंगी पोपटापासून टीचभर चोच आणि बोटभर लांबीच्या चिमणीपेक्षाही लहान पक्ष्यापर्यंत. लव्हबर्ड्सच्या तर कितीतरी शे जाती! "भारी", माली म्हणाली. "काय रंग आहेत बघ ना एकेकाचे!", बन्या म्हणाला. "आता तुम्हाला याहून आकाराने मोठे आणि शिकारी पक्षी दाखवतो", असं म्हणत बोहाई लॅम सर्वांना घेऊन दुसऱ्या साखळीच्या पडद्यातून बाहेर पडले. तिथं पांढरं घुबड, चहाच्या कपाएवढे डोळे असलेलं घुबड, मजबूत पायांचा ससाणा, पांढरा गरूड आणि फूटभर लांब, २ इंच जाड आणि टोकाने बाकदार चोच असलेला मोठ्ठा काळा पांढरा धनेश असे एकाहून एक पक्षी होते! "ट्टॉक्! मामा हाच का तो धनेश? याची खायची वेळ झाली आहे वाटतं... ट्टॉक्!" यावेळी 'ट्टॉक्' फक्त बन्याच्या तोंडूनच नाही तर पक्ष्याला खाऊ घालणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यातूनही निघाला होता. त्या धनेश पक्ष्याने आपली भलीभक्कम चोच त्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर मारली आणि तो बेशुद्ध पडला! त्या पक्ष्याने हवेत भरारी मारली. मनात म्हणत असावा, 'हू:, सुटलो बुवा. माझी उचलबांगडी केली होती ना जंगलातून. थांबा! आता मीच करतो कुणाचीतरी उचलबांगडी!' तो हवेत घिरट्या घालायला लागला. एवढ्यात त्याचं लक्ष गेलं ते लिएन जवळच्या बाबागाडीत शांतपणे अंगठा चोखत झोपलेल्या तान्ह्या बाळाकडे, मेंगकडे! आणि मग... बाप रे! पुढच्या भयंकर प्रकारची तुम्हाला कल्पनाही करवणार नाही. तो पक्षी मेंगकडे आला आणि परत झुपकन वर गेला... नुसता नाही, मेंगला सोबत घेऊन! सगळ्यांचं लक्ष तिकडं वेधलं गेलं. काही जण ओरडायला लागले काही पळायला लागले. लिएन तर भीतीने आणि काळजीने बेशुद्ध पडली. पण बन्या? एवढं सगळं घडल्यावर तो स्वस्थ कुठे बसायला? तोही त्या पक्ष्याच्या मागे पळायला लागला. त्याच्या मनात विचार आला, 'काय बेत काय आहे महाराजांचा? व्हिक्टोरिया पीक कडे का निघालेत? तिथे एखाद्या झाडावर घरटं बिरटं बांधायचंय की काय?' स्वतःच्याच विनोदावर खुश होऊन बन्याने वेग वाढवला.

व्हिक्टोरिया पीक म्हणजे, हाँगकाँग मधल्या काही टेकड्यांपैकी सर्वात उंच टेकडीचा माथा. तिकडे मुक्कामासाठी सर्व सोयीसुविधा असलेले एक हॉटेल आहे. मादाम तुसॉ वॅक्स म्युझियम आहे. टेकडीच्या खालच्या दरीमध्ये झाडं पुष्कळ आहेत. धनेश महाराज तिकडेच निघाले होते.

त्या पक्ष्याच्या मागे धावता धावता बन्या दमला. फास्टर फेणे असला तरी तोही एक माणूसच होता. शिवाय आता मोठा चढ लागला होता. तेवढ्यात त्याला बस येताना दिसली. संपूर्ण हाँगकाँग दर्शन घडवणारी बस. तिच्यावर छत नसल्याने पक्ष्यावर लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं. बन्याने बस पकडली, त्याच्या खिशात च्याऊम्याऊसाठी असलेले पैसे देऊन तो बसमध्ये वरच्या माळ्यावर जाऊन बसला.

व्हिक्टोरिया पीकच्या शेवटच्या स्टॉपवर बन्या उतरला. तिथून त्याला खालची दरी दिसत होती. दरीत झाडे भरपूर होती आणि माणसांची वर्दळही कमी होती. त्यामुळे धनेश महाराज तिकडेच निघालेले दिसताच बन्याने दरीकडे धाव घेतली. पण 'सेफ्टी फर्स्ट!'. पक्ष्याने डोक्यावर मारू नये, किंवा मारले तरी लागू नये यासाठी त्याला हेल्मेटसारखं काहीतरी हवं होतं. बन्या त्यासाठी इकडे तिकडे पाहू लागला. त्याला जास्त शोधावं लागलं नाही कारण, जवळच कशाचं तरी बांधकाम चालू होतं. बन्या तिकडे पळाला आणि एका कामगाराच्या डोक्यावरून हेल्मेट उडवलं. बन्या दरीकडे धावता धावता म्हणाला, "सॉरी, अर्जंट आहे. आल्यावर वापस करीन!" तो कामगार स्थानिक असला तरी त्याला इंग्रजी कळत होतं. त्यामुळे, 'सॉरी' आणि 'अर्जंट' एवढे शब्द त्याला कळाले. पण बाकी काहीही न समजल्यामुळे तो उगीच डोकं खाजवत बसला.

इकडे लिएन शुद्धीवर आली होती आणि रडत होती. मामांनी आणि बोहाई लॅमनी तिची समजूत घातली. पोलिसांना आणि बागेतील अधिकाऱ्यांना कळवलं आणि मोठ्ठी टॅक्सी पकडून पक्षी ज्या बाजूला गेला होता तिकडे निघाले. त्यांची गाडी व्हिक्टोरिया पीकच्या दिशेने निघाली.

बन्या दरीत पोहोचला होता. इकडे तिकडे पक्षी किंवा बाळ दिसतंय का याकडे त्याचं लक्ष होतं. तेवढ्यात त्याला एक मोठ्ठ झाड दिसलं. त्याच्या एका आडव्या पसरलेल्या जाडजूड फांदीवरून त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. जरा जवळ जाऊन पाहिलं तर ती मेंगच होती. एव्हाना संध्याकाळ झाली होती. अंधुकश्या प्रकाशात त्याला तो धनेश जवळच्याच एका फांदीवर बसलेला दिसला. बन्याला वाटले की तो आता इथेच डुलकी काढेल आणि थेट उद्याच उठेल. त्याने मनाशीच काही बेत आखले आणि हसला.

बन्याच्या अंदाज खरा ठरला. धनेश तिथेच झोपला होता. बन्या लपत छपत झाडापाशी गेला, झाडावर खारीसारखा सरसर चढला. त्याने एका फांदीवर बसून कमरेचा पट्टा काढला व मोठ्या हातरुमालाने पँट घट्ट केली. धनेश बसलेला होता ती फांदी काही लांब नव्हती. तो त्या फांदीपाशी गेला आणि धनेश पक्ष्याचा पाय व ती फांदी पट्ट्याने एकमेकांना करकचून बांधून टाकली. मनाशी म्हणाला, 'आर्धं काम तर झालं. आता मेंगला तिच्या आई बाबांकडे सुखरूप पोहोचवणं आणि बागेतील कर्मचाऱ्यांना धनेश कुठे आहे हे सांगणं तेवढं बाकी आहे.'

रात्रीच्या चांदण्यात बन्या हळूहळू रस्ता काढत आणि मेंगच्या, "या... बूव्व... य्यी य्यी..." ची पर्वा न करता टेकडी उतरत होता. तेवढ्यात त्याला दोन पिवळे दिवे चमकताना दिसले. हळूहळू ते जवळ येत होते. गाडीचा आवाजपण ऐकू येत होता. लगेच एक टॅक्सी जवळ येऊन थांबली. आतमध्ये मामा, मामी, माली, बोहाई लॅम, लिएन, चेंग आणि बागेतील एक कर्मचारी एवढे लोक होते. बन्या मेंगला घेऊन टॅक्सीत बसला आणि टॅक्सी परत निघाली.

बन्याने टॅक्सीत बसल्यावर सगळा पाढा वाचून दाखवला. हाँगकाँग पार्कला गेल्यावर तो कर्मचारी सोबत आणखी दोघांना व एक मोठा पिंजरा घेऊन बन्याने सांगितलेल्या दिशेने निघाला. पक्ष्याला पकडून आणल्यावर बागेतील सर्व अधिकारी-कर्मचारी बन्याला सारखं शेश्ये शेश्ये (थँक यू) म्हणत होते. लिएनला तर काय बोलू, काय नको, काय बक्षीस देऊ, काय नको असं झालं होतं.

पण बक्षिसाचा प्रश्न पार्कच्या अधिकाऱ्यांनी सोडवला. हाँगकाँग दर्शन आणि परतीचा प्रवास त्यांनी हेलिकॉप्टरमधून केला. शिवाय बन्याला पुढच्या रविवारची ओशन पार्कची चार तिकिटे सुद्धा दिली. मामी मात्र सारख्या पुटपुटत होत्या, "आत्ताच काट्याकुट्यातून चालून एवढं खरचटून घेतलंय, पुढे जाऊन काय करणार आहे कोण जाणे गं बाई!"

----  सगुणा माया ज्ञानेश

फास्टर फेणे आणि शुभमंगल सावधान

"ट्टॉक".

हा कसला आवाज? ओळखीचा वाटतोय नं? बरोब्बर! तुमच्या आमच्या लाडक्या, बनेश उर्फ फास्टर फेणेचा हा आश्चर्योद्गार. आता तुम्ही म्हणाल हे घड्याळ कशाला टकटकलं? सांगते.

बन्या दहावी पास झाला. शाळेचा निरोप समारंभ आटपून तो मामाच्या घरी आला. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो, तोच मालीनं धावत येऊन त्याच्या हातात एक कागद ठेवला. ते भाई फेण्यांचे पत्र होते. ते वाचता वाचता बन्याचे डोळे चमकले आणि अगदी सुरुवातीला सांगितलेला तो आवाज झाला. "ट्टॉक!"

त्या पत्रात लिहिलं होतं की त्याच्या मृदुलताईचं लग्न ठरलं होतं. नवरा मुलगा मयूर सासवडच्या एका बँकेत कामाला होता. भाई फेणे दागिन्यांची खरेदी करायला दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहोचणार होते. बन्याने धावत जाऊन मामा मामींना ही बातमी सांगितली व पत्राची नीट घडी करून खिशात ठेवली.

दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजता भाई फेणे, वहिनी (फाफेची आई) व ताईसह, मामांच्या घरी येऊन पोहोचले. चहा नाष्टा आटोपून पु. ना. गाडगीळ या पेढीत खरेदी करायला गेले. मग घरी येऊन, जेवण करून, विश्रांती घेऊन चार वाजता ते बन्या, माली, मामा, मामी, शकुमावशी व बन्याच्या आग्रहामुळे सुभाष देसाई व शरद शास्त्री या त्याच्या वर्गमित्रांना सुद्धा घेऊन फुरसुंगीला गेले.

बन्याला फुरसुंगीला येऊन सात-आठ दिवस झाले. त्याची मित्रमंडळी तिथल्या पोरांसोबत चांगलीच रमली होती. नव्या मित्र मैत्रिणींकडून खेळ शिकत-शिकवत होती. पण आज मात्र त्यांना खेळायला वेळ नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या लग्नाची धावपळ सुरू होती. पंगत बसली होती. बन्या, शरद आणि सुभाष वाढायचं काम करत होते. माली ताईला मेंदी काढत होती. मामी आणि शकुमावशी दागिने ठेवलेलं कोठीघर सांभाळत होत्या.

एकदम मालीची हाक आली, "बन्या, ताईला एकदा सगळे दागिने घालून पहायचे आहेत. आई आणि शकूमावशीकडून दागिने आण." बन्या दागिने आणायला गेला आणि, "ट्टॉक". दागिने ठेवलेली ट्रंक सताड उघडी व रिकामी आणि मामी व शकुमावशी तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडल्या होत्या. 'चोरी!', बन्याच्या मनात विचार आला, 'बाबांकडे फर्स्ट एडचा बॉक्स आहे आणि डॉक्टरकाका पण आले आहेत लग्नाला. त्यांना सांगून चोराला शोधायला जातो.' असा विचार त्याच्या मनात येतोय न येतोय तोच, 'याला इतका वेळ का लागतोय?', असा विचार करून भाई फेणे व मालीच तिथे आले. तिथले दृश्य पाहून त्यांनी बन्याजवळ संपूर्ण चौकशी केली. बन्याने काय घडलंय ते भराभरा सांगितले आणि, "मी चोरांना शोधायला जातो. तुम्ही या दोघींना शुद्धीवर आणा", असे सांगून तो, सुभाष, शरद, तात्या तनपुरे, रखमी आणि बन्या कंपूशी वैर असले तरीही लग्नाच्या वेळी वैर विसरून सोबत कामाला लागलेले लडकत कंपूचे पुढारी व दुय्यम पुढारी रंग्या लडकत व सायबा सुपेकर चोराचा शोध घ्यायला निघाले.

मंडपात शोध घेता घेता बन्याला आठवले की पंगत बसलेली असताना दोन माणसं जास्त न बोलता भराभर खात होती. मग ती हात धुवायला उठली ती नाहीशीच झाली. मग तो दागिने आणायला गेला तेव्हा चोरी झाली होती. तेव्हाच्या गडबडीत लक्षात आले नसेल पण आता मात्र बन्याला संशय येऊ लागला. तेच चोर असतील का?  बन्याने हे मित्रांना सांगितले व विचार करतच ते बाहेर पडले.

'वाहनतळ' ! जिथे सगळी वाहने लावली होती तिथे त्यांनी शोध घेतला. विशेष काही वाटले नाही, पण एक जागा जी थोड्या वेळापूर्वी भरलेली होती ती आता रिकामी दिसत होती. शरदला एक गोष्ट आठवली व ती त्याने बन्याला सांगितली, "बन्या, इथे एक मोटारसायकल होती. तिच्या एका बाजुला एक डब्बा जोडला होता. जास्तीचं सामान ठेवायला किंवा दुसऱ्या माणसाला बसायला. नंबरही मजेशीर होता."
"काय होता नंबर?", सर्वांनी विचारले.
"MMP 1137 ". शरदला नंबर सांगता सांगता हसू फुटले.
"मग? यात काय मजेशीर आहे?", बन्याने विचारले.
"कळलं नाही तुला? MMP  म्हणजे 'मॅन ऑफ द मॅच प्लेअर' मधलं मॅन मॅच प्लेअर ! आणि 1137 म्हणजे 'एक तेरा सात' म्हणजे 'एक तेरा साथ!'"
"वा! शरद, एवढं कसं लक्षात राहिलं तुझ्या?"
"विचित्र पण मजेशीर गोष्टी लक्षात राहतात माझ्या!", शरदने हसून उत्तर दिले.

त्या जागी तीन टायर्सचे ठसे सापडले. त्या ठशांचा माग घेत ते शिंदीच्या बनात गेले. बन्या, तात्या, रखमी, सायबा आणि रंग्याला ते पूर्वी तिथे शिंदोळ्या खायला येत असल्याने त्यांना बन तोंडपाठ होते. झाडाझुडुपातून माग काढत आणि शिंदोळ्या खात ते सातजण शिंदीचे बन ओलांडून त्याला लागूनच असलेल्या आमराईत पोहोचले. तिथे एका झुडुपामागे तीच मोटारसायकल व झाडामागे चोर लपलेले दिसले. बन्याने आवाजावरून त्यांना ओळखले. त्यांना त्याने 'पु. ना. गाडगीळ'मध्ये पाहिले होते. शिवाय दागिन्यांचा छनछनाट ऐकू येत असल्याने त्याला खात्रीच पटली. पण त्यामुळे जिभेवर आलेला 'ट्टॉक' त्याला आतल्या आत गिळावा लागला.

त्या सात जणांनी एक योजना आखली. चोर आजची रात्र आमराईत काढून उद्या पुण्याला जाऊन दागिने विकणार असं त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं होतं. त्यापूर्वीच पोलीसांना आणणे आवश्यक होते. त्यामुळे शरद, रंग्या व रखमी पोलिसांना आणायला गेले व बन्या, सुभाष, सायबा व तात्या तिथेच थांबले.

शरद, रंग्या व रखमी पोलीस चौकीत पोहोचले तर भाई फेणे त्यांच्या आधीच तिथे पोहोचलेले होते.

इकडे चोरांचा बेत बदलला तर त्यांना लवकर निघता येऊ नये म्हणून बन्याने गाडीच्या चकातील हवा काढली. तेवढ्यात पोलीस आले. चोरांना अटक केल्यावर इन्स्पेक्टर म्हणाले, "पोरांनो, पुण्यातले हे चोर फुरसुंगीच्याही आसपासच्या गावात चोऱ्या करून गेले. आज तुम्ही त्यांना पकडून दिलंत. शाब्बास! नावं काय आहेत तुमची?" असं विचारून त्यांनी सगळ्यांची नावं लिहून घेतली.

दुसऱ्या दिवशी सगळ्यांची नावं पेपरात छापून आली! पण त्यावेळी ताईच्या डोक्यावर मंगलक्षता टाकता टाकता सुभाष व शरद एकमेकांच्या व बन्याच्या कानात कुजबुजत होते -
"यत्र यत्र
फास्टर फेणे
तत्र तत्र
संकट येणे!"

-- सगुणा माया ज्ञानेश

Saturday, June 13, 2020

पुस्तक परिचय - कॉर्पोरेटला रामराम, शेतीला सलाम

सहज किंडलवर पुस्तकं बघत होतो. अचानक विचित्र नावाचं पुस्तक दिसलं. सहज म्हणून वाचायला सुरुवात केली आणि वाचतच गेलो.

वेंकट अय्यर, एक केरळी पण मुंबईकर तरुण. IBM मध्ये, सन २००४ मध्ये, सहा आकडी पगाराची नोकरी. तिशीत शेती करायची ठरवतो आणि मग सुरू होतो एक विलक्षण प्रवास. त्या प्रवासाची गोष्ट म्हणजे "कॉर्पोरेटला रामराम, शेतीला सलाम"

वेंकट IBM मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होते. पत्नी मीना, वर्तमान पत्रात काम करणारी. गुजरात व अन्य काही भागातील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यावर तिचे काम सुरू असते. यातून वेंकटची सेंद्रीय शेतीशी ओळख होते. मग आपण शेती करावी हा विचार डोक्यात घट्ट होत जातो. नवीन मोठ्या प्रोजेक्टची संधी की शेती हा निर्णय घेणे भाग पडते आणि वेंकट मधला शेतकरी नवा प्रोजेक्ट नाकारतो.

जवळ शेतजमीन नाही, ती कुठे घ्यायची ठरलेलं नाही. अशा अवस्थेत नोकरी सोडलेली. शेत घेताना कुटुंबातील कुणाच्यातरी नावावर शेती असली पाहिजे हा नवा शोध. सोबत शासकीय अधिकाऱ्यांच्या पैसेवाल्या IBM मधल्या मॅनेजर कडून असलेल्या "अपेक्षा". या सगळ्याला पुरून उरत आणि एकही पैची लाच न देता सरळ मार्गाने वेंकट शेतजमीन विकत घेतो.

मीनाला त्याच काळात द हिंदू मध्ये मोठी नोकरी लागते, काही वर्षे मुंबई मग पाकिस्तान आणि अखेरीस दिल्ली अशा बदल्या होत जातात. त्यामुळे मीना एकीकडे आणि वेंकट शेतावर असा प्रवास नऊ वर्षे सुरू राहतो. त्यानंतर मात्र मीनाही शेतावर येते.

शेती करताना रासायनिक शेती करायची नाही यावर वेंकट ठाम असतो. मग सुरू होतं शेतीतील शिक्षण. वेंकटचं शेत निसर्गकृषक भास्कर सावे यांच्या शेताच्या जवळच असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत वेंकटचं शिक्षण सुरू होतं. सोबत गावातील लोक, शासकीय अधिकारीही अनेक प्रकारचं "शिक्षण" देत असतातच. स्थानिक वाणांची दुर्दशा आपल्याला कळते जेव्हा वेंकटला तांदूळ लावायचा असतो. तो तांदळाचा शोध आणि त्यातील अपयश बरंच काही सांगून जातं.

वेंकट शहरी असला तरी गावात पूर्ण समरस झालाय. गावातील प्रत्येक प्रसंगात तो जातो. वेळोवेळी मदतही करतो. पण आपली काही तत्त्व सोडत नाही आणि तरीही गावाला तो आपलंसं करतो. हे सगळं करताना शेती रसायनमुक्त, पण अन्य गावकाऱ्यांसारखीच करतो. मग त्यात शासनाकडून बियाणं घेणं, वादळ, अतिवृष्टी वगैरे काळात मदत मिळावी म्हणून प्रयत्न करणं हे सगळं करतो. शासकीय यंत्रणा शेतकऱ्याला मदत करण्यासाठी असतात पण अधिकारी अनेक प्रकारे शेतकऱ्याला नाडतात. हे सगळे अनुभव स्वतः घेतो आणि त्यावर मातही करतो.

शेतातील घराचे तर असंख्य अनुभव आहेत. घरात आलेला नाग ते शेतातील घोरपडी, बेडूक खाणारे साप, घोणसाचं मैथुननृत्य प्रत्यक्ष पाहणं, घरात कोंबडीपालन, मांजरी, कुत्रा आणि बरंच काही... या सगळ्या गोष्टी बघताना, करताना, वेंकट सतत विद्यार्थी राहून कुतूहल कमी न पडू देता पुढे जात राहतो.

बँक या गोष्टीशी गावातील लोकांचं सख्य कमी असतं. त्यातील अनेक अनुभव त्याला येतात. नोटाबंदीच्या काळात झालेला त्रास कोणताही राजकीय अभिनिवेश न आणता वेंकट सांगतो.

गावातील काही लग्ने, अनेकांच्या घरातील भानगडी, एक खून, जवळच्या मित्राची बायको जाणे व काही दिवसांनी तो मित्र जाणे या गोष्टी, दवाखाना ही बाब गावाला किती जड आहे, मुंबईपासून केवळ १०० किमी अंतर असताना, याची खंत... असं बरंच काय यातून कळतं.

सेंद्रीय शेतीचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करण्याचा प्रयत्न. पहिल्या हंगामातील अपयश आणि पुढील यश. तरीही त्यातून घेतलेली माघार. शेतकऱ्याला पैसे मिळायचे असतील तर काय केले पाहिजे याचे वेंकटने केलेले एकोत्तरी नाही तर दीर्घ चिंतन आपल्याला दिसते.

शेवटी वेंकट "मी सुखी आहे ना?" याचा शोध घेतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर -
आम्हाला सुख वेगळ्याच ठिकाणी भेटलं. मोकळं आकाश‚ निखळ निसर्गसौंदर्य‚ ताजा टवटवीत भाजीपाला‚ झाडावरून नुकतीच खुडलेली फळं आणि आपण पिकवलेलं अन्न खाणं‚ यातून आम्हाला खरा आनंद मिळतो. आपणच जमिनीत पेरलेल्या बियांमधून एक छोटा कोंब उगवतो आणि हळूहळू त्याचं रूपांतर एका महाकाय वृक्षात होतं. हा चमत्कार पाहण्याचं सुख तुम्हाला शहरातील मॉलमध्ये मिळू शकत नाही. तुमच्या समोर बेडूक पकडून फस्त करणारा पिवळसर पट्ट्यांचा नानेटी‚ तुमच्यापासून काही फुटांवर वेटोळं घालून फूत्कारणारा नाग किंवा स्वतःच्याच कैफात डोलत मैथुननृत्य करणारी घोणसाच्या नर-मादीची जोडी पाहताना जो थरारक आनंद तुम्ही अनुभवता‚ त्याची सर नॅशनल जिओग्राफी चॅनलवरून दाखवलेल्या दृश्यांना कधीच येऊ शकणार नाही.

मागे मी माझ्यासह अनेकांच्या मनातील "राजू रस्तोगी" बद्दल लिहिलं होतं. वेंकट एक यशस्वी राजू रस्तोगी आहे. त्याने अनेक राजूंना वाट दाखवावी ही इच्छा!!!

Sunday, May 24, 2020

संघातले शिक्षण

संघाच्या संचलनात (संघाचे ४०-४५ मिनिटांचे मार्चिंग) घोषही (संघाचा बँड) असतो. त्याच्या तालावर सगळं संचलन होत असतं. घोषात सर्वात पुढे घोषदंड घेऊन घोषप्रमुख असतो. त्यानंतर आनक (ड्रम) पथक, मग ढोल, झांझ पथक, वंशी (बासरी) पथक आणि शेवटी शंख (बिगुल) पथक असते. आनक, वंशी आणि शंख पथकात एक एक प्रमुख असतो.

सगळे एका तालात चालत असतात. घोषाची एक रचना (ट्यून) सुरू असते. तिचं शेवटचं चरण सुरू असतं. सगळे पथक प्रमुख सतर्क असतात. शेवटच्या चारणाच्या शेवटच्या समेच्या आधी घोषप्रमुख हातातल्या घोषदंडाने पुढची रचना कोणत्या पथकाची आहे याची सूचना करतात. रचना संपल्यावर तीन पावलांसाठी (दीड सेकंड) आनक वाजतो, एका पावलासाठी (अर्धा सेकंद) शांतता असते. त्या शांततेत ज्या पथकाला पुढची रचना वाजवायची आहे त्या पथकाचा प्रमुख पुढील रचनेचं नाव सांगतो. आनक पुन्हा एकदा तीन पावलांसाठी वाजतो. लगेच ती रचना ते पथक, आनक पथक आणि ढोल पथक वाजवू लागते.

१. घोषप्रमुखाला रचना केव्हा संपते त्या वेळी सतर्क राहून बदलाची सूचना द्यायची असते.
२. कोणत्या पथकाची पुढची रचना आहे हे कळाल्यावर त्या पथकातील सर्वांनी तयार राहायचे असते.
३. त्या पथकातील प्रमुखाला विचार करून रचनेचे नाव सांगायला सगळा मिळून काही सेकंद वेळ मिळतो.
४. आपल्या पथकातील सर्वांना कोणत्या रचना येतात हे पथकप्रमुखाला माहीत असावे लागते.
५. रचनेचे नाव कळाल्यावर त्या पथकाला आणि आनक पथकाला रचना सुरू करण्यासाठी दीड सेकंद वेळ मिळतो.
६. दीड सेकंदानंतर नवीन रचना सुरू होते.
७. हे सगळं घडत असताना संपूर्ण घोषपथकाची पावले एक-दोच्या ठोक्यावर डावा-उजवा बरोबर सुरू असतात.
८. या सगळ्या तालावर संपूर्ण संचलन सुरू असतं.

सतर्कता, पथकातील सर्वांची माहिती, वेगवान निर्णयक्षमता, नियमांचे पालन, आदेशाची अंमलबजावणी, पावलासोबत जोडलेली मने... हे सगळं आम्ही सहज शिकतो, केव्हा शिकलो ते कळतही नाही...

आज जेव्हा कोविड१९ च्या साथीत संघाचं योजनाबद्ध काम बघितलं तेव्हा माझे मामा प्रकाश कुळकर्णी यांच्याशी सुमारे २२ वर्षांपूर्वी झालेला वरील संवाद आठवला!

Thursday, March 12, 2020

देवराई

लेखक डॉ उमेश मुंडल्ये (DrUmesh Mundlye)
प्रकाशक हिंदुस्थान प्रकाशन संस्था
मूल्य ₹१७५

डॉ उमेश मुंडल्येंचा परिचय फेसबुकवरचा. त्यांची कामं, त्यातून होणारं जल, मृद संवर्धन, त्यांच्या कामामुळे सुखावणारे अनेक लोक, गावं हे वाचनात येत होतंच. त्यांच्या अभ्यासाचा, डॉक्टरीचा, मूळ विषय देवराई. त्यावर त्यांचं पुस्तक येत आहे कळाल्यावर लगेच बुक केलं, पण हाती पडायला बरेच महिने गेले.

उमेशजींचा मूळ अभ्यासाचा विषय देवराई असल्याने, त्यांनी या पुस्तकात देवराई आणि त्यांची ओळख कशी झाली इथपासून ते देवराई कशी असते, तिचे संवर्धन धार्मिक आधारावर लोक कसे करतात, देवराईतील जैववैविध्य, काही प्रजाती केवळ देवराईतच का सापडतात, देवरायांपुढील समस्या आणि आव्हाने तसेच ही आव्हाने आपण परतवून कसे लावू शकतो या सर्वांबाबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे विषय अभ्यासाचा असला तरी अजिबात कंटाळवाणा न होता सहजपणे समजावून सांगितला आहे.

पुस्तकाची सुरुवात होते ती देवराईच्या अभ्यास कसा सुरु झाला इथपासून. जेव्हा हा अभ्यास सुरु झाला तेव्हा महाराष्ट्रातील नोंदणी झालेल्या देवरायांची संख्या होती साधारण ४५०. पण जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा केवळ सावंतवाडी या एका तालुक्यात ४०० पेक्षा अधिक देवराया आहेत हे कळालं. त्यानंतर उमेशजींनी १६०० पेक्षा अधिक देवरायांना प्रत्यक्ष भेट दिली आहे आणि ३७६८ देवरायांची नोंद त्यांच्या PhDच्या अभ्यासात आहे.

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं जंगल. ही संकल्पना भारतभर सगळीकडे आहेच, शिवाय भारताबाहेरही अनेक देवराया आहेत. संकल्पना तीच - हे वन देवाचं आहे. इथून कोणताही आर्थिक लाभ मिळवायचा नाही. इतकंच काय कित्येक ठिकाणी देवराईत चप्पल घालून जायलाही बंदी आहे. या देवराया केवळ आदिवासी भागात आहेत असं नाही. आदिवासी भागात, खेड्यात, गावाच्या अगदी जवळ ते गावापासून दूर अंतरावर अशा सगळीकडे देवराया आजही उभ्या आहेत आणि आपल्या या परंपरेची साक्ष देत आहेत. या देवरायांमुळे अनेक गोष्टी साधल्या जातात - पर्यावरण समतोल, जैवविविधतेचे संरक्षण, गावाचं मिळून एक सांस्कृतिक केंद्र, औषधी आणि पर्यटनातून होणारा आर्थिक विकास. पण यासाठी देवराया वाचल्या पाहिजेत आणि वाढल्या पाहिजेत.

या देवराईत विविध दैवतं असतात. ती कोपिष्टही असतात. त्या श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या भीतीने सुद्धा देवराया सुरक्षित राहतात. या देवरायांचे वय मोजण्याच्याही अनेक पद्धती असतात. नगर जिल्ह्यातील एका देवराईत दर ३० वर्षांनी एक वाघ्या देवाचा दगड बसवतात. तिथे असे १७ दगड दिसून आले, म्हणजे ती देवराई सुमारे ५०० वर्षे जुनी असावी. एका देवराईत एक प्राचीन मंदिर आहे, एका साधूने बनवून घेतलेलं. ते ४०० वर्षे जुनं आहे, म्हणजे देवराई त्याहून जुनी असणार. इतकं हे जुनं वैभव आपल्याकडे आहे. त्याची पुसटशीही ओळख आपल्यापैकी अनेकांना नसते. या पुस्तकातून ही ओळख करून दिली आहे.

देवराई जर गावाजवळील डोंगरावर किंवा उंच भागात असेल तर गावाच्या पाण्याचा प्रश्न ती सोडवते. दापोलीतील कुडावळे गावातील देवराईतून वर्षभर गावाला पाणीपुरवठा होतो. त्या पाण्याला जर नळाने बंद केलं तर पाईप/नळ फुटतात इतका त्या पाण्याला प्रवाह असतो. देवराईच्या अशा पाण्यावर आजूबाजूच्या गावात बागाईत फुलली आहे. यामुळेही लोक देवराई जपतात.

देवराईतील जैववैविध्य प्रचंड असते. अगदी छोट्या देवराईत शंभर सव्वाशे प्रकारची झाडे दिसून येतात. एका देवराईतील आंब्याच्या झाडाची पहिली फांदी चाळीस फुटांवर आहे. ते झाड आंब्याचं आहे हे लवकर ओळखूही येत नाही. देवराईतील जुने वेल इतके मोठे असतात की वेलीच्या खोडाचा व्यास एक मीटर एवढा असू शकतो. शिवाय अनेक पक्षी, दुर्मिळ होत चाललेले प्राणी (साळींदर, खवले मांजर) यात सुरक्षित वास करतात.

हे पुस्तक वाचताना वाईट वाटलेली गोष्ट म्हणजे आमच्या मराठवाड्यात एकही देवराई नाही... :-( मराठवाड्याशिवाय दुष्काळी जिल्हे सोलापूर, अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि नागपूर - यातही एकाही देवराईची नोंद नाही. पाऊस कमी असल्याने देवराई नाही की देवराई नाही म्हणून पाऊस नाही... काहीही असले तरी देवराई ही असलीच पाहिजे हे नक्की.

या सगळ्या आणि याहूनही खूप जास्त गोष्टी हे पुस्तक वाचताना आपल्याला कळतात.

आम्ही आमच्या शेतात (जिल्हा औरंगाबाद) मियावाकी घनवन पद्धतीने देवराई तयार करत आहोत. एकूण अर्धा एकर करायचा विचार आहे. आतापर्यंत एक गुंठ्याचे दोन टप्पे लावून झाले आहेत. यात १५० स्थानिक प्रजातींची ६३० पेक्षा अधिक रोपे लावलेली आहेत. पहिल्या टप्प्यातील झाडं आता जास्तीत जास्त २० फूट तर सरासरी ८ फूट आहेत. यात आता मुंगूस येऊन राहू लागले आहेत, अनेक पक्षी येत आहेत, घोरपडी येत आहेत. उन्हाळ्यात हरणांचे कळप सहजच वस्तीला येतात. आमच्या भागातून १० वर्षांपूर्वी गायब झालेले मोर अधून मधून इथे हजेरी लावून जातात. हे सगळं केवळ दीड वर्षांच्या जंगलात होतंय. सोबत लागवडीच्या आधीचा आणि नंतरचा गुगल मॅप वरील फोटोही आहे.







आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं, देवराई समजावून घ्यावी आणि झाडं लावावीत, जगवावीत.

या परिचयावर प्रत्यक्ष लेखकाने प्रतिक्रिया दिली होती - 
पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Dnyaneshजी.
देवराई ही एक समृद्ध परंपरा आहे. यामधे माणसाचा हस्तक्षेप नसतो किंवा नसेल याची काळजी घेऊन ठेवली गेली आहे. चांगल्या जंगलात जसे जमिनीवर असणाऱ्या गवतापासून लहान झुडूपं, मोठी झुडुपं, लहान वृक्ष, मध्यम वृक्ष, मोठे वृक्ष आणि या सर्वांवर असलेल्या विविध आकाराच्या वेली यांचं उत्तम सहजीवन असतं, त्याची लहान प्रतिकृती म्हणजे देवराई असते. नवीन देवराई तयार करणं हे एका पिढीचं काम नाही. सुरूवात आपण करावी आणि दोन पिढ्यांनी ते हस्तक्षेप न करता जपावं तेव्हा देवराई काही आकाराला येईल.
मियावाकी आणि देवराई यात मात्र काहीच साम्य नाही. मुंबईच्या संदर्भात उपमा द्यायची तर मियावाकी म्हणजे सकाळच्या गर्दीच्या वेळातील मुंबईकडे जाणारी आणि डोंबिवलीला आलेली जलद लोकल आहे. प्रचंड संख्येने लावलेली झाडं म्हणजे देवराई नाही. झाडं लावताना आपण आपला हेतू साध्य करण्यासाठीच लावतो बरेचदा. त्याचे इतर परिणाम लक्षात घेत नाही आणि नंतर ते परिणाम निस्तरण्यासाठी परिश्रम करावे लागतात पुढच्या पिढ्यांना. हरितक्रांती हे एक उत्तम उदाहरण आहे याचं.
देवराई ही लोकसहभागातून चालवली जाणारी जैवविविधता, पाणी, मृदा यांचं संरक्षण आणि संवर्धन करणारी परंपरा आहे. यात माणसाचा सहभाग फक्त जपण्यासाठी आहे. मियावाकीचं तसं नाहीये. कमीतकमी जागेत जास्तीत जास्त झाडं ही केवळ गर्दी झाली. त्यासाठी येणारा खर्च याबद्दल मी बोलत नाही. तो स्वतंत्र विषय होईल.
त्यामुळे कृपया मियावाकी म्हणजे देवराईचं एक वेगळं रूप असलेयासारखं आहे असा गैरसमज ठेवू नका ही विनंती.

या प्रतिक्रियेला मी दिलेले उत्तर -
उमेशजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपला देवराई विषयातील अभ्यास आहे. मी कोणत्याही प्रकारे प्रतिवाद करत नाहीये, कारण माझा अभ्यास अथवा अनुभव तुमच्यासारखा अजिबातच नाहीये. मी देवराईची तुलना मियावाकी घनवनाशी करत नाहीये. माझ्या पोस्टमधील वाक्यांमधून तसा अर्थ निघत असेल तर ती माझी चूक आहे.
मला देवराई म्हणजे काय हे कळलंय ते खालीलप्रमाणे -
१. देवराई हे मिश्रवन असलं पाहिजे
२. त्यात माणसांचा वावर शून्य ते मर्यादित असावा
३. ते परंपरेने आणि समाजाने जपलेलं जंगल असावं
४. हे संवर्धन, संगोपन श्रद्धेने केलेलं असावं
दुर्दैवाने आमचं शेत जिथे आहे त्याच्या आजूबाजूला कुठेही अशी देवराई नाहीये. संपूर्ण गावाला सोबत घेऊन गायरानावर वा कोणत्या सामायिक जमिनीवर देवराई तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि संयम आमच्याकडे नाहीये. त्यामुळे आमच्याच शेतात (एकूण साडेतीन एकर) मध्ये साधारण अर्धा एकर आपणच देवराई करावी असा विचार केला. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी हा विचार करता सर्वात आधी मियावाकी पद्धतीची माहिती मिळाली आणि त्यावर आतापर्यंत दोन गुंठे लागवड केली आहे. पहिला टप्पा साधारण दीड वर्षांपूर्वी केला, दुसरा टप्पा मागील महिन्यात केला
मागे उपेंद्र दादांशी यावर बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलेला देवराईचा किंवा निसर्गबेटाचा आराखडा बघितला. त्यात उणीव काहीच नाहीये, पण एक अडचण आहे - ती म्हणजे त्यात मानवी वावर शून्य होणार नाही. त्यामुळे घनवन करणे सुरु ठेवले. आजच्या घडीला यात आतमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळे मानवी वावर हा शून्य होईल आणि आज नाही पण कदाचित शंभर वर्षांनी ही जागा जंगल म्हणून असेल.
आम्ही हे तयार करताना मिश्रवन असावे याचे भान ठेवतोय - १५० प्रजातींमध्ये झुडूप, छोटे वृक्ष, स्थानिक बांबू/वेत, मोठे वृक्ष, वड/पिंपळ/नांद्रुक सारखे पसरट वृक्ष लावत आहोत. बाकी परोपजीवी (आर्किड सारखी) यात आणण्याचं काम इथे येणारे प्राणी/पक्षी करतील अशी आमची अपेक्षा आहे. श्रद्धा तर आमची यावर आहेच. हा सामाजिक उपक्रम मात्र होत नाहीये.
असलेल्या जंगलाच्या जागी, असलेल्या देवराईला पर्याय म्हणून अथवा आहेत ती वृक्षराजी तोडून मियावकीने जंगल लावणे अयोग्य आहे. किंवा हजारो वर्षांच्या जंगलाची तुलना मियावाकीशी होऊच शकत नाही. पण जिथे झाडं, जंगल, देवराई नाही अशा ठिकाणी वन उभारणी आम्ही करत आहोत. हे वन लगेच देवराई होणार नाही. कदाचित १०० वर्षांनी तिला देवराई म्हणता येईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठीची ही पहिली पायरी असू शकेल.
काही चुकीचं बोललो असल्यास क्षमस्व...
🙏🏼🙏🏼

या उत्तरावर उमेशजींनी दिलेले उत्तर आणि सल्ला - 
चूक किंवा बरोबर असं नाही. देवराई मधे नैसर्गिक जंगल असतं. प्रत्येक जीव त्याची जागा घेत असतो. आपण मियावाकीच नव्हे तर इतर कोणत्याही पद्धतीने संवर्धन करताना हे विसरतो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे (खरंतर आवडीप्रमाणे) प्रजातींची निवड करतो. स्थानिक प्रजाती असतील तर हेही ठीक. पण दोन वृक्षांमधील अंतर किती असावं आणि ते तेव्हढेच का असावं, त्यामुळे नैसर्गिक वाढीवर काही परिणाम होणार का, अशा गच्च लावलेल्या (नैसर्गिकरित्या झालेल्या नव्हे) वनस्पतींमुळे त्यातल्याच काही प्रजातींवर काय परिणाम होणार, इतर जैवविविधतेबद्दल आपण काही विचार करतोय का, जर हे मानवी वस्तीजवळ असेल तर एवढ्या गर्दीने लावलेल्या जंगलामुळे सुरक्षिततेचे काही प्रश्न उपस्थित होतात त्याचं काय, असे असंख्य प्रश्न उभे राहतात.
एक करता येईल तुम्हाला. जर तुम्ही आधीच झाडं लावली असतील तर जी झाडं स्पर्धेत नाहीशी होतील त्याजागी लगेच नवीन लावू नका. म्हणजे नैसर्गिक जंगल तयार व्हायला मदत होईल.

Friday, March 6, 2020

समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन

पुस्तक परिचय -  समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन
लेखक - कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक - मोरया प्रकाशन
मूल्य ₹१७०

मागील १ महिन्यात कौस्तुभ कस्तुरेंची ३ पुस्तके वाचली. "प्रतिशोध पानिपतचा"चा परिचय या आधी दिला होता. सदाशिवराव भाऊंवरील "सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ" हे दुसरं (याचा परिचय नंतर देईन) आणि समर्थांवरील "समर्थ - समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन" हे तिसरं. अजून एक "पुरंदरे" आता वाचायला घेईन...

कौस्तुभ कस्तुरेंचं वैशिष्ट्य हे की, रामदासांनी सांगितलेलं - अभ्यासोनि प्रकटावे - हे ब्रीद ते कसोशीने पाळतात. कुठेही अतिरंजितपणा नाही. इतिहास म्हणजे इति + ह् + आस म्हणजेच - हे असे घडले. जे घडले तेच इतिहासातून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थातच काय घडले यासाठी समकालीन कागदपत्रे हाच सर्वोत्तम पुरावा आहे. समकालीन कागदपत्रांमधून बखरी या हद्दपार होतात कारण यात अतिरंजितपणा आणि ज्याने बखर लिहून घेतली त्याचा अति उदोउदो असतो. त्यामुळे पत्रे,  सनदा आणि समकालीन व्यक्तींनी लिहिलेली चरित्रे यावरच ते अवलंबून असतात आणि विश्वास ठेवतात.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच समर्थ आणि महाराजांची भेट ही स्वराज्य स्थापनेच्या आधी झाली नसून ती बरीच उशिरा झाली हे सांगितलंय. महाराजांचे स्वराज्य हे जिजाऊंच्या प्रेरणेचे आणि महाराजांच्या कष्टानेच उभे राहिले आहे हे स्पष्ट केलंय. पण जेव्हा भेट झाली तेव्हापासून महाराजांचा आणि समर्थांचा स्नेह किती बळकट होता तेही सप्रमाण सिद्ध केलंय.

या पुस्तकासाठी कौस्तुभ कस्तुरे यांनी समर्थ संप्रदायातील कागदपत्रे, भीमस्वामी, गिरीधर स्वामी, दिनकर गोसावी यांनी लिहिलेली समर्थ चरित्रे अभ्यासली. शिवाय रघुनाथ पंडितांनी लिहिलेलं समर्थांचं वर्णनसुद्धा अभ्यासलं. हे सर्व समकालीन आहे. याशिवाय भीमाजी बुवांनी लिहिलेलं समर्थ चरित्रही घेतलंय, जे उत्तरकालीन आहे. या सर्वांवर लिहीत असताना एक बाब कौस्तुभ वारंवार सांगतात ती म्हणजे चमत्कार खरे नाहीत. त्यांना इतिहासात काहीही स्थान नाही. पण ही सर्व चरित्रे आपल्याला थोडक्यात यातून सहज कळतात.

या चरित्र आणि वर्णनाशिवाय समर्थांनी महाराजांना राजधर्म आणि क्षात्रधर्म यावर जो उपदेश केला होता त्याबद्दलही लिहिले आहे.

या पुस्तकात अनेक चित्रेही आहेत. विशेषतः महाराजांचा आणि समर्थांचा संबंध दाखवणारी चाफळची सनद - तिचाही फोटो आहे. या सनदेवरून संकेत कुलकर्णी (लंडन) आणि कौस्तुभ यांनी शोधून, अभ्यासून हा संबंध "पुराव्यानिशी शाबीत" केला आहे!

Wednesday, March 4, 2020

दोन मी

थ्री इडियट्स मधलं "बहती हवा सा था वो" गाणं आठवतंय?
हम को तो राहें थी चलती
वो खुद अपनी राह बनता,
गिरता संभालता
मस्ती में चलता था वो
हमको कल की फिकर सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हें को खुल के जीता था वो
स्वानंद किरकिरेने सहज शब्दात तो आणि मी याबद्दल सांगितलंय. वास्तविक हे गाणं त्या चित्रपटात "दोन मीं"चं नाहीये. पण एकूणच असे "दोन मी" आपल्यात असतात. कधी ते दुसऱ्यात दिसतात तर कधी आपल्यातच.

ही "दोन मी"ची संकल्पना असलेल्या मराठीतल्या सुंदर कविता आहेत. पहिल्यांदा माझ्या पिढीतील संदीपची कविता -
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मला खूपदा माझा मित्र, संदीप सरदेसाई, हा दुसऱ्या मी सारखा वाटायचा. म्हणून एकदा त्याला ही कविता ऐकवली. त्यावर त्याचं म्हणणं असं की, हा कट्ट्यावर बसलेला अगदी तुझ्यासारखा आहे आणि हजार चिंतांनी डोके खाजवणारा माझ्यासारखा :-). आता हे grass is always greener at other side सारखं असू शकतं. पण खरंच हे दोन्ही मी आपल्यातच असतात. त्यातील कुणाला आपण जास्त वाव देतो, ते आपल्या हातात असतं.

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

कुसुमाग्रजांनी तर हा दुसरा मी भेटायला आलेला दाखवला. त्याच्याशी गप्पा, भांडण, जुन्या आठवणी असं सगळं बोलून झालं. मग तो गेला... पण जो गेला तो कोण "मूळचा मी" की "भेटायला आलेला मी" यावर प्रश्नचिन्ह टाकून ठेवलं. वास्तविक दोघेही पुन्हा आपल्यातच आहेत, या दोघांचा संवाद व्हावा आणि त्यातून त्या-त्या वेळी आवश्यक तो "मी" समोर असावा...

बसलो असता निवांत रात्री
टक टक झाली दारावरती
दार उघडता आत सरकली
कोणी एक व्यक्ती

बारीकतेने बघता कळले
हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती
घाबरलो मी,चाचरलो मी
पुसले तयाला ,कोण कशाला

स्मित संभावित करुनी म्हणे तो,
पिशाच्च मी तव
गत काळाच्या थडग्या मधला
निवास कोंदट असह्य झाला
म्हणुनी आलो

पिशाच्च पण ते माझे होते
आपुलकीने स्वागत केले
गप्पा झाल्या,दूर पणाचे अंतर सरले
आठवणींचे पर्व साधता काळीज कढले

वाद बखेडे कधी पेटता,क्रुद्ध शार्दुलासम गुरगुरलो
प्रेम,द्वेष ,हास्यात रंगता स्वरही चढले

अखेर होता पहाट,गेला एक आमुच्यातला निघुनी

गेला कोण अन कोण राहिला
हे मज जन्म भराचे कोडे पडले...!

आरती प्रभू यांची "दोन मी" कविता. यातील दुसरा मी हा अग्निज्वाळेसारखा नग्न आहे कारण त्याचेच कपडे विकून मी माझा चरितार्थ चालवतोय... स्वत्व विकून त्यावर गुजराण करणारे अनेक "मी" यात दिसत राहतात...
दोन मी
तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो
तरिही मी कां चालतो ? तो बोलतो ना थांबतो.
वाकल्याला अन् मला पाहुनीयां मोडतो,
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखितो.
अग्निजाळेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन् अजुन आहे ती खरी.
कोणते पोषाख त्याचे चोरिले मी भर्जरी,
विकित बसलो येथ हाटीं, आणि खातो भाकरी.
तो उपाशी तरिहि पोटीं लाज माझी राखतो,
राख होतांनाहि ओठीं गीतगाणी ठेवितो.
मैफ़लीला तो नि मी दोघेही जातो धावुनी;
ऐकितो मी सूर, तो अन् दूरचे घंटाध्वनी.
तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो.

आरतीप्रभूंची आणखी एक याच विषयावरची कविता आहे -
कधी तो कधी मी 
कधी माझी कधी त्याचीही सावुली
रेंगाळे माझिया चोरट्या पावुली
कधी त्याच्या पायीं उमाटे माझा ठसा
कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा
चारी डोळ्यातून दोघेही जगतो
दारीं तोही कधी पणत लावतो
ऊन मीठपाणी काळजाच्या मागे
भिजे माझा पीळ; त्याचे धागे धागे
वाळू घातलेले माझे पांघरून
कैसे ओढू? त्याचे मावळेल ऊन
एकाच घनाच्या दोन आम्ही सरी
प्राणावर एक, दुजी अंगावरी
गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यांतले राखितो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू उडू पाहे

इंदिरा संतांची "कात" ही अजून एक. चैतन्य दीक्षितच्या निरुपणासह -
आपल्या प्रत्येकात स्वतःचीच दोन रूपं असतात. कधी हे द्वंद्व अगदी असून नसल्यासारखे कोपऱ्यात बसलेले असते तर कधी ते अगदी प्रखरपणे पुढे येते. त्या दोन रूपांतला खरा मी कोण? याचा थांग लागणे स्वतःलाच अशक्य होऊन जाते. त्रयस्थ नजरेने पाहता, हा म्हणजे आपल्याच दोन्ही रूपांत जणू अटीतटीचा सामना असल्यासारखा! आपलं एक रूप सोशिक, इतरांना कमीत कमी दुखावणारं (त्यासाठीच सोशिक, स्वतः कष्ट सहन करणारं) तर दुसरं रूप स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण करणारं आणि म्हणूनच कणभरही अन्याय्य गोष्ट सहन न करणारं. या दोन रूपांतला हा सामना मात्र आपल्याला एका नव्याच 'मी' कडे नेत असतो. हीच आपली वाढ!
सोशिकपणा जात्याच काकणभर अधिक असलेल्या स्त्रियांच्याबाबतीत हे द्वंद्व कसे असेल? याचं चित्र इंदिराबाई 'कात' या कवितेत उभं करतात.
कात
येथे मी स्तब्ध अशी
स्तब्ध तशी तेथे मी ।
स्वच्छ उभी काच मधें
दाखविते मजला 'मी' !
नजरेला नजर तिच्या
भिडवाया मी न धजे
कंपित निःश्वास तिचा
काचेवर गूढ़ थिजे ।
विलगावे ओठ ज़रा
बोलावे काही तर
गिळलेल्या शब्दांची
लिपी तिच्या ओठांवर ।
स्वतःचं सोशिक रूप इतकं आंगवळणी पडलेलं असतं की त्यातून आपल्याला कुणी बाहेर काढू पाहत असेल तर तीच व्यक्ती आपल्याला दुष्ट वाटू लागते. आपल्याला त्या कोशातून बाहेर यायचंच नसतं.
"दुष्ट, अशी मजपुढती
मुळिच उभी राहु नको;
निजलेली मी कधीच:
जाग मला आणु नको.
स्वप्नांच्या भस्माचा
थर अगदी ढळवु नको."
"काय असे वेडेपण?
मी न दुजी, तूहि मीच."
----पण समोर धुकट धूर
आणि चूर चूर काच ।
स्तब्ध अशी येथे मी
नाही कुणि पण समोर
सोलिव ही कात इथे
नागिण अदृश्य दूर...

शिवाय पाडगांवकरांची "जिप्सी" काही अंशी मला अशीच "दोन मीं"ची कविता वाटते.

या दोन्ही "मीं"चा वाद-संवाद होत राहिला पाहिजे. तुकोबा म्हणतात तसा
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाची वाद आपणासी...
आणि अखेरीस आपल्यातला रसिक, सृजनशील, तरल मी हा सहज आपल्याला गवसला पाहिजे...